मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 174 ☆ माझ्या वर्गातल्या मुली… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 174 ?

💥 माझ्या वर्गातल्या मुली… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती वर्षांनी भेटल्या

माझ्या वर्गातल्या मुली

आणि मनाची कवाडे

केली सर्वांनीच खुली !

वाट शाळेची सुंदर

आणि हातामधे हात

सरस्वतीची प्रार्थना

होई एकाच सुरात

गणवेश नील – श्वेत

खूप आवडे मनास

कुणी हुषार, अभ्यासू

कुणा वेगळाच ध्यास

एक मुलगी निर्मल

नेहमीच नंबरात

छान करियर झाले

टेलिफोन ऑफिसात

संजू,मंगलची मैत्री

होती खासच वर्गात

अशा मैत्र गाठी सखे

देव बांधती स्वर्गात

लता, हर्षा, सरसही

होत्या माझ्याच वर्गात

अल्प स्वल्प साथ त्यांची

खूप राहिली लक्षात

पुष्पा रेखितसे हाती

मेंदी सुबक, सुंदर

जयू अलिप्त,अबोल

साथ परी निरंतर

मधुबाला, उज्वलाही

सख्या सोबतीणी छान

उद्योजिका म्हणूनही

मोठा मिळविला मान

शशी – शारदा असती

दोन मैत्रीणी जीवाच्या

गुणवंत, कलावंत…

वलयांकित नावाच्या

मुग्ध माधुरी, फैमिदा

होत्या दोघीही हुशार

आठवणीच्या कुपीत

त्यांचे निखळ विचार

अशा वर्गातील मुली

अवखळ, आनंदीत

जिने तिने जपलेले

जिचे तिचे हो संचित

अशा आम्ही सर्वजणी

एका बागेतल्या कळ्या

जेव्हा भेटलो नव्याने

सुखे नाचलो सगळ्या

© प्रभा सोनवणे

१६ मार्च २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत वनी आला ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंत वनी आला ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

कुहू कुहूची तान ऐकता

निसर्गाचा सांगावा आला

पुन्हा नव्याने सृष्टी फुलविण्या

ऋतुराज वसंत आला ||

 

पानगळीने सरले जीवन

नवे कोंब फुलून आले

इवली नाजूक पाने पोपटी

झाड मोहरून डोलू लागले ||

 

रंगबिरंगी फुले डोलती

तरुवर अंगोपांगी फुलती

मकरंदला टिपण्यासाठी

फुलपाखरे भिरभिरती ||

 

पळस पांगारा बहव्याच्या

सवे फुलला गुलमोहर

निसर्गाच्या रंगपंचमीला

अवचित आला किती बहर ||

 

आमराई ती घमघमते

नवयौवना जणू अवनी

वसंताच्या आगमनाने

चैतन्य पसरते जीवनी ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #180 ☆ जन्मदर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 180 ?

☆ जन्मदर… ☆

रावणांचा जन्मदर हा वाढलेला

भ्रूण स्त्रीचा उकिरड्यावर फेकलेला

 

लग्नसंस्थेचाच मुद्दा ऐरणीवर

अन् तरीही माणसा तू झोपलेला

 

साधु संताचे अता संस्कार नाही

वासनेचा डोंब आहे पेटलेला

 

पायवाटा नष्ट केल्या डांबराने

कृत्य काळे आणि रस्ता तापलेला

 

कोणताही पक्ष येथे राज्य करुदे

अन्नदाता दिसत आहे त्रासलेला

 

पाय मातीवर म्हणे आहेत त्याचे

गालिच्यावर तो फुलांच्या चाललेला

 

छान संस्कारात सारे वाढलेले

का तरीही एक आंबा नासलेला ?

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रतिबिंब… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रतिबिंब… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

मीच मला जन्माला घालताना

भासे प्रतिबिंब तुला पाहताना

 

आसवांची जलधारा

नेत्रातून अखंड वाही

गर्भांकुरातील  अंकुर

जगण्याचे दुःख साही

मीच मला जन्माला घालताना

भासे प्रतिबिंब तुला पाहताना

 

एकसंध धवल मळभ

घट्ट  तिमिर  स्थितप्रज्ञ

वाट..ग्रहण सुटण्याची

जणू सारे बंध अनभिज्ञ

पहारा आहे तुझ्यावर, जन्मताना

तरीही..होईल हर्ष तुला पाहताना

 

येशील  घेऊन प्रतिबिंब

माझ्यातलीच मी होऊन

तरणोपाय नाही सृष्टीस

बीजांकुरण नव्याने रुजून

आयुष्य भरडणार स्वत्व जोखताना

कष्टाचे चीज  होईल तुला पाहताना

 

विश्वाची जननी असे नारी

काली,दुर्गा,लक्ष्मी,सरस्वती

अधर्माचा विनाश करण्यास

नानाविध रूप घेई संस्कृती

आनंदाला उधाण येईल तू जन्मताना

जीवनाचा सोहळा होईल तुला पाहताना

 

मीच मला जन्माला घालताना….

भासे प्रतिबिंब तुला पाहताना…

© सुश्री पार्वती नागमोती

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 122 ☆ अनामिक तू… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 122 ? 

☆ अनामिक तू…

तुला काय बोलावे, मला कळत नव्हते

तुझ्याशिवाय दुसरे, पहावत सुद्धा नव्हते.!!

 

अशी कशी आलीस, हवे सारखी तू

अर्धवट एक, रात्रीचे स्वप्न माझे तू.!!

 

तुला पाहण्यात, माझा वेळ खर्ची झाला

लोभस मोहक सोज्वळ, भुरळ माझ्या मनाला.!!

 

अबोल स्तब्ध अन्, अचेतन मी क्षणभर झालो

पाहुनी तुझ्या सौंदर्याला, मलाच मी विसरलो.!!

 

पुन्हा कधी भेटशील, शक्यता नाहीच आता

कधी भेटू वळणार, तर ती वेळ कुठे आता.!!

 

अनामिक ललना तुला, नामना सांग काय देऊ

असेच कधी भेटू पुन्हा, मनाला दिलासा देऊ.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरती गंगेची… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आरती गंगेची… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

किती प्रवाह घेउनी ,

गंगा वाहते प्रवाही.

ओढ द्वैताची तरीही ,

देत अद्वैताची ग्वाही.

 

पात्रं अथांग अतर्क्य ,

डोह खोल खोल.

सुखदुःखाच्या काठाचे,

नदी सांभाळते तोल.

 

लावू निरांजनी ज्योत ,

पेटवून प्राण दीप.

करु आरती गंगेची ,

पैलतीराच्या समीप.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

(हरिद्वार मुक्काम)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाग्यवान मी… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ भाग्यवान मी… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

उगा काळजी करीत असते

आई माझी भोळी आहे

आले संकट घालवण्याला

रामबाण ही गोळी आहे

भाग्यवान मी तनय जाहलो

तुडुंब माझी झोळी आहे

बांधले तिने घर नात्यांनी

कुटुंब प्रेमळ मोळी आहे

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मी घर बांधतो घरासारखं… कवि- अज्ञात ☆ प्रस्तुती सुश्री मीनल केळकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

?  मी घर बांधतो घरासारखं… कवि- अज्ञात ? ☆ प्रस्तुती सुश्री मीनल केळकर

मी घर बांधतो घरासारखं

आणि

हा पक्षी माझ्याच घरात घर बांधतोय त्याच्या मनासारखं

 

मी विचारलं त्याला , “बाबारे, ना तुझ्या नावाचा सातबारा,

ना तुझ्या नावाचं मुखत्यारपत्र!”

तर म्हणतो कसा,

 

“अरे सोपं असतं का कुणाच्या घरात जागा करणं 

आणि कुणाच्या मनात घर करणं”

 

माझं घर तर काड्यांचं आहे.

तुझं घर माडीचं आहे!

 

नात्यांची घट्ट वीण, विणत गेली नाही, तर

माडीचं घर सुद्धा काडीमोलाचं असतं!

 

मला नेहमी वाटायचं माझ्यामुळेच त्या पक्ष्यांचं घर झालं.

आता वाटतंय.

त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लास्टर पक्क झालं.

 

आता त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी पसायदान असते.

तो डोळे झाकून घरट्यात बसला, की समाधिस्त आणि समृद्ध वाटतो.

 

त्या पक्षाने शिकवलं मला…

 

एका घराची दोन घरं होण्यापेक्षा घरात घर करुन राहाणं

 

आणि

 

दुसऱ्याच्या मनात घर करुन राहणं कधीही चांगलं….. 

 

कवि – अज्ञात 

प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋतुराज… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ऋतुराज… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

आला आला वसंत आला

चहूकडे आनंद पसरला

धरती ल्याली हिरवा शालू

बघता बघता गुलमोहर फुलला….

 

चैत्र महिना नव वर्षाचा

गुढी उभारती घरोघरी

वनवास संपवुनी चौदा वर्ष्ये

सीता राम परतले अयोध्यानगरी….

 

तरूवर हसले नव पल्लवीने

पक्षी विहरती स्वच्छंदाने

खळखळ वाहे निर्झर सुंदर

सृष्टी बहरली ऊल्हासाने….

कळ्या उमलल्या वेलीवरती

धुंद करितसे त्यांचा दरवळ

गुंजारव करी मधुप फुलांवर

वसंत वैभव किती हे अवखळ….

 

जाई जुई मोगरा फुलला

सुवर्ण चंपक गंध पसरला

रंग उधळित गुलाब आला

ऋतुराज कसा हा पहा डोलला….

 

ऋतु राजा आणिक धरती राणी

मुसमुसलेले त्यांचे यौवन

आम्रतरूवर कोकिळ गायन

वसंत वसुधा झाले मीलन….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 144 – नामाचा जयघोष ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 144 – नामाचा जयघोष ☆

वारीचा जल्लोष नामाचा जयघोष।

गर्जती दश दिशा चाले भावोत्कर्ष।।।धृ।।

भक्ता अधिष्ठान विठाई भूषण ।

चालू आहेनित्य नाम संकीर्तन।

मनोमनी आज दाटलासे हर्ष।।१।।

टाळ चिपळ्यांचा नाद हा मंजूळ ।

मृदुंग खजिरी जमले सकळ।

अभंग गायान सुस्वरे विशेष ।।२।।

दीनांचा हा नाथ भक्तांचा कैवारी।

युगे अठ्ठावीस असे भिमा तिरी।

उभा विठेवरी सोडोनिया शेष।।३।।

गोरा तुका चोखा नामा नि जनाई ।

एकनाथ म्हणे भेट गे विठाई।

आळवी विशेष करोनी जयघोष ।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares