मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 178 ☆ मन झाले ओलेचिंब… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

 

? कवितेच्या प्रदेशात # 178 ?

💥 मन झाले ओलेचिंब… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

तुझ्या आठवाने आज

झाले पुरती घायाळ

मनी दाटले काहूर

कोण हृदयी वाचळ?

किती काळ हा लोटला

रंग प्रीतीचा गहिरा

रिती रिवाजाची चाड

रात्रंदिन तो पहारा

आले दाटून मनात

तुझे राजबिंडे रूप

क्षण एक तो प्रेमाचा

किती अप्रुप अप्रुप

आता सांजावल्या दिशा

साक्षीदार जुना लिंब

एक एक सय येता

मन झाले ओलेचिंब

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बॅग भरणे कळले आहे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ बॅग भरणे कळले आहे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

बॅग कशी भरायची कळले आहे

बरेच विचार सरले आहेत

काही थोडे उरले आहेत

 

सगळ्यातून सुटका झाली आहे

काही पाश उरले आहेत

पाशात नुसतेच भास आहेत

 

भास अडवणूक करत आहेत

पैलतीर मात्र खुणावतो आहे

तिकडेच मात्र जायचे आहे

 

आयुष्य परिपूर्ण झाले आहे

सगळे अनुभव मिळाले आहेत

सुख दुःखे अनुभवली आहेत

 

आयुष्याने खूप शिकवले आहे

परके जवळचे झाले आहेत

जवळच्यांनी अनुभव दिले आहेत

 

खूप हुशारी जमली आहे

पण व्यवहार मात्र तसेच आहेत

काही अवगुण तसेच आहेत

 

आनंद मात्र खूप आहे

गुरू नेहेमीच बरोबर आहेत

त्यांचे उपदेश पटले आहेत

 

 गुरू शिक्षा कायम बरोबर आहे

त्यामुळेच मार्ग सुकर आहेत

पाश सगळे आवरायचे आहेत

 

पैलतीर जवळ भासत आहे

पथ सगळे आनंदी झाले आहेत

समाधानी भाव जमले आहेत

 

कारण ,

बॅग कशी भरायची कळले आहे.

 

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #184 ☆ भूमिका … ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 184 ?

☆ भूमिका…  ☆

सर्व निजानिज झाल्यानंतर निजते बाई

सूर्य उगवण्या आधी रोजच उठते बाई

 

चारित्र्याला स्वच्छ ठेवण्या झटते कायम

कपड्यांसोबत आयुष्याला पिळते बाई

 

चूल तव्यासह भातुकलीचा खेळ मांडते

भाकर नंतर त्याच्याआधी जळते बाई

 

ज्या कामाला किंमत नाही का ते करते ?

जो तो म्हणतो रिकामीच तर असते बाई

 

सासू झाली टोक सुईचे नवरा सरपण

रक्त, जाळ अन् छळवादाने पिचते बाई

 

तिलाच कळते कसे करावे गोड कारले

कारल्यातला कडूपणाही गिळते बाई

 

पत्नी मुलगी बहीण माता सून भावजय

एकावेळी किती भूमिका करते बाई

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

स्वागत ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

चैत्रपालवी, नवी पोपटी,

कुहू§ कोकिळा,घुमते रानी,

पांगाऱ्याची, शाल केशरी,

पिंपळपाने, मऊ गुलाबी.

 

 चाफा अनोखा, सुगंध उधळी,

 मोगऱ्याची, कळी खुललेली,

 मोहर आंब्याचा, मनमोही,

 लेकुरवाळा, फणस खुणावी.

 

  पांढरी फुले, करवंदाची,

  घोस हिरवे, जांभूळवृक्षी,

  काटेसावर, गर्द गुलाबी,

  बहाव्याचे, झुंबर सोनेरी.

 

 अनंत-कुंदा, मधुमालती,

 मुकुट फुलांचे, शिरी मिरविती.

 पारिजात अन् रातराणी ही,

 धुंद आसमंता या करिती.

 

 गुलबाक्षी, रंगीत कोरांटी,

 गुलमोहोर, गालिचा पसरी.

 शेवंती अन् सदाफुलीही,

 वसंतऋतूचे स्वागत करिती.

 

 कडूनिंबाची, छोटी डहाळी,

 वस्त्र रेशमी, गाठी केशरी,

 कलश झळकता, वेतावरती,

 चला उभारू, गुढी सौख्याची.

 

© सुश्री प्रणिता खंडकर

सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस पापणीचा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

पाऊस पापणीचा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

दाटूनी जो गरजला ,

तो बरसलाच नाही.

 

देहात ओथंबला जो

ओघळलाच नाही.

 

नुसतीच रेघ वीजेची,

नुसताच मेघ नभीचा .

 

पाऊस मात्र भासाचा,

उरला हुलकावणीचा.

 

पाऊस फक्त प्रतिमा,

कल्पित प्रतिभेचा.

 

डोळ्यात जो जपावा,

पाऊस पापणीचा.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 127 ☆ अभंग… ज्ञान…  ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 127 ? 

☆ अभंग… ज्ञान… 

ज्ञानाने उद्धार, ज्ञानाने आकार

ज्ञानाने आचार, साध्य होय.!!

 

ज्ञान हे मोचक, ज्ञान हे व्यापक

ज्ञान हे देयक, मोक्ष पद.!!

 

ज्ञाना-विन काही, नसे श्रेष्ठ जगी

आपण सु-त्यागी, होवावेची.!!

 

योग्य ज्ञान व्हावे, योग्य कर्म व्हावे

योग्य लक्ष व्हावे, जीवनाचे.!!

 

कवी राज म्हणे, अज्ञानी जीवाला

ज्ञान दातृत्वाला, कृष्ण येई.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आंधळा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आंधळा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

 

आंधळा होतास मनुजा, आजही तू आंधळा,

पाऊले चंद्रावरीं, पण तू मनाने पांगळा ||धृ||

 

वास्तवाशी खेळता तू, आंधळी कोशिंबीरी,

अंधश्रद्धा जोजवितो, आपल्या मनमंदीरी,

चालल्या वाटा पुढे, अन तूच मागे चालला  ||१ ||

 

भूवरी ग्रह तारकांची, झेलूनी तू सावली,

धरुनिया वेठीस त्यांना, मांडितो तू कुंडली,

देव दैवा शोधणारा, तू कसा रे वेंधळा?||२||

 

सोडूनी वाटा रूढींच्या, जाऊ या क्षितिजाकडे,

सप्तपाताळात गाडू , अंधश्रध्देचे मढें,

जोडूनी नाते भ्रमाशी, तू कशाला थांबला?||३||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुगंधस्मृती… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

🌸 सुगंधस्मृती… 🌸 श्री सुहास सोहोनी ☆ 

पहाट समयी विखरुन पडला

सडा अंगणी शुभ्र फुलांचा

प्राजक्ताचा परिमळ पसरे

स्मरण देतसे हरिनामाचा …

 

रामप्रहरी कानि सांगतो

सुगंध मोहक बकुल फुलांचा

राखुन ठेवी दोन घास रे

दुर्मिळ अतिथी आज यायचा …

 

चांफेकळि ये उतून मातुन

सायंकाळी सौेरभ फेकित

शुभंकरोती राहुन जाइल

विसरु नको रे घाईगर्दित …

 

परिमळ सांगे रातराणिचा

घालित रुंजी देइ आठवण

सखे सोबती अन् स्वकियांची

काळाने ज्या दिले देवपण …

 

हलके फुलके गंध सुवासिक

जाग्या करिती स्मृती शुचिर्भुत

गुलाब जाई जुइ चमेली

भरून घ्यावी नित्य ओंजळित …

 

उत्तररात्री गंध न उरती

स्मृतीहि अवघ्या विरून जाती

रिक्त मनाच्या पटलावरती

शून्य भावना केवळ उरती

 

सुगंधापरि ध्वनी स्पर्श अन्

दृष्टीहि चमको सतेजतेने

लाभ मिळो आगळा तयांचा

जीवन अवघे व्हावे सोने …

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

दि. १९-०३-२०२३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – हळदीचं शेत – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– हळदीचं शेत– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

हळदीचे पिक बहरले

झुळझुळ वाहे पाणी ग

वार्‍याच्या ओठावरती

हिरवी पिवळी गाणी ग

तृप्तपणाने बळीराजाही

सोडी पाटाचे पाणी ग

वयात आलेल्या पोरीसम

रान हळदीचे पाही  ग

हिरवाईची ही श्रीमंती

सुखवी घरादारा शेता ग

हिरवाई  वर सळसळते

पिवळेपण पेलते भुई ग

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 148 – पंढरीची वारी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 148 – पंढरीची वारी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

आषाढी कार्तिकी

पंढरीची वारी।

नामाचा जल्लोष

करी वारकरी।।

 

विरालासे दंभ।

नसे भेदभाव ।

भजनात रंगे

रकं आणि राव ।।

 

श्रद्धेची पताका

खेळती पावली।

टाळ मृदुंगाच्या

तालात चालली ।।

 

सजले कळस

डोई ही तुळस ।

गाऊया अभंग

सोडूनी आळस ।।

 

वैष्णवांचा धर्म

नाम संकीर्तन

धरोनी रिंगन

सद्भावे नर्तन ।।

 

वरी भीमा तीरी

धन्यती नगरी ।।

भक्तांच्या संगती

भुलला पंढरी।। 

 

अनाथाची आई

माझी ग विठाई।

रूसली कौतुके

राई रूख्माबाई।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares