☆ द्वारकेतील श्रीकृष्ण मंदिराची भव्य ध्वजा ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
आपल्या देशातील अनेक मंदिरांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. पुरी येथील जगन्नाथ मंदिर असो किंवा तिरुपतीचे व्यंकटेश मंदिर असो, तेथील शेकडो वर्षांपासून असलेली ही वेगळी वैशिष्ट्ये आजही लोकांना थक्क करीत असतात. गुजरातमधील द्वारका येथील भगवान द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या मंदिराचीही अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये या मंदिराच्या शिखरावर असलेल्या ध्वजेचाही समावेश आहे.
देशातील सप्त मोक्षपुरींमध्ये द्वारकेचा समावेश होतो. मथुरेवर जरासंधाचे वारंवार आक्रमण होत असल्याने भगवान श्रीकृष्णांनी सौराष्ट्रात समुद्राला मागे हटवून द्वारकानगर वसवले होते. श्रीकृष्णाच्या निधनानंतर आठ दिवसांनी समुद्राने ही द्वारका पुन्हा गिळंकृत केली. सध्याची द्वारका ही बुडालेल्या द्वारकेनंतर वसवलेली नवी नगरी आहे. तेथे अतिशय प्राचीन काळापासून भगवान द्वारकाधीशाचे भव्य मंदिर आहे. हे मंदिर पाच मजली असून ७२ खांबावर उभे आहे. मंदिराचे शिखर ७८. ३मीटर उंचीचे असून त्यावर सुमारे ८४ फूट लांबीची धर्मध्वजा फडकत असते. असेही म्हंटले जाते की ही ध्वजा ५२ गजांची आहे. या ध्वजेवर सूर्य आणि चंद्राच्या प्रतिमा आहेत. त्याचा अर्थ जोपर्यंत सूर्य चंद्र असतील तर तोपर्यंत भगवान द्वारकाधीशांचे नाव कायम राहील. ही ध्वजा इतकी मोठी आहे की ती दहा किलोमीटर वरूनही दिसते. दुर्बिणीतून पाहिल्यावर तिच्यावरील चिन्हेही दिसून येतात. ही ध्वजा नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकत असते. वाऱ्याची दिशा कोणतीही असली तरी ही ध्वजा पूर्व दिशेकडेच फडकत असते. हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे दिवसांतून तीन वेळा म्हणजेच सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ५२ गजाच्या ध्वजेचे आरोहण केले जाते. ही ध्वजा भाविकांनी अर्पण केलेली असते. आणि या भाविकांना आपला क्रमांक येण्यासाठी दोन दोन वर्षे वाट पहावी लागते. ध्वजा बदलण्याचा विधी हा एक खास कार्यक्रमच असतो. ही ध्वजा एक विशिष्ट शिंपीच शिवून देतो. ही ध्वजा उतरवणे – चढवणे हे कामही विशिष्ट लोकच करतात.
माहिती संकलन व प्रस्तुती : सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
☆ पत्रदुर्गा नीलाताई – लेखक श्री आनंद देवधर☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆
नीलाताई उपाध्ये यांच्या निधनाची बातमी आज सकाळी समजली आणि मन आपोआपच भूतकाळात शिरले. महिला पत्रकारितेतील एक पर्व संपले.
माझे वडील वि ना उर्फ विसुभाऊ देवधर महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना नीला पाटील त्यांच्या सहकारी होत्या. नीला पाटील म्हणजे शेकापचे ज्येष्ठ नेते दत्ता पाटील यांची भाची. तरुण भारतचे वसंतराव उपाध्ये यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या नीला उपाध्ये झाल्या आणि त्याच नावाने प्रसिद्ध झाल्या
मुंबईच्या पत्रकारितेच्या इतिहासातील पहिल्या पिढीतील दोन गाजलेल्या महिला पत्रकार म्हणजे इंग्रजी पत्रकारितेतील ओल्गा टेलीस आणि मराठीतील नीला उपाध्ये. मराठी पत्रकारितेतील आपले करिअर त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये व्यतीत केले.
ज्या काळात पत्रकारिता ही Male dominated होती. वार्ताहर हे पुरुष असत. त्या काळात नीलाताईंनी ते वर्तुळ भेदले. माझ्या माहितीप्रमाणे रात्रपाळीच्या वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला पत्रकार होत्या. राजकीय पत्रकारिता करता करता साहित्य, कला, चित्रपट आदी क्षेत्रांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली, विपुल लेखन केले आणि महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांना भरभरून खाद्य पुरवले. प्रेमळ परंतु कडक शिस्तीच्या नीलाताई निर्भीड होत्या. सडेतोड बोलत परंतु प्रेमळ होत्या.
“बाळशास्त्री जांभेकर- काळ आणि कर्तृत्त्व ” हे आज दुर्दैवाने आऊट ऑफ प्रिंट असलेले पुस्तक, त्यांचे वरिष्ठ सहकारी दि वि गोखले यांच्यावर लिहिलेले “पत्रकार दि. वि. गोखले व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व” हे चरित्रात्मक पुस्तक आणि प्रतिभावांत कवयित्री शांताबाई शेळके यांच्यावर “शब्दवती शांताबाई” ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके.
मराठी तरुण तरुणींना पत्रकारितेचे धडे देण्याचे नीलाताईंनी केलेले कार्य हिमालयाएवढे आहे. गरवारे व्यवसाय विकास संस्थेसाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले आणि पत्रकारांच्या दोन पिढ्या निर्माण केल्या. कोकण मराठी साहित्य परिषदेसाठीही त्यांनी उत्तम कार्य केले.
दोन व्यक्तिगत आठवणी सांगायच्या मोह अनावर होत आहे. सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर (आता नेमके वर्ष आठवत नाही) मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक होती. त्या वर्षी माझे वडील खजिनदार म्हणून निवडून आले होते. दादांबरोबर मी संध्याकाळी आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात गेलो होतो नीलाताईंनी दादांचे अभिनंदन केले. त्यावेळी कोणीतरी निवडणूक हरले असा उल्लेख आला. त्यावेळी मी दादांना विचारले की “त्यांचे डिपॉझिट जप्त झाले असेल ना?” माझ्या त्या प्रश्नावर नीलाताई खळखळून हसल्या, माझा गालगुच्चा घेतला आणि दादांना म्हणाल्या “विसूभाऊ तुमचा मुलगा चुणचुणीत आहे. ” माझे वय जेमतेम १२-१३ असावे.
सुरुवातीला त्या सायनजवळ प्रतीक्षानगर येथे राहत असत. आम्ही तिघे भाऊ नॉनव्हेज खात होतो. एक दिवस त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी खास आगरी पद्धतीचे मासे खायला बोलवले होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी घरी बनवलेले मासे खाल्ले. कोणतीही गोष्ट जेंव्हा आपण पहिल्यांदा करतो आणि ती आवडते तेंव्हा ती विसरता येत नाही. नीलाताईंच्या हातची “तुकडी” मी कधीही विसरू शकत नाही.
नवरात्राच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर सुरू असतानाच पत्रदुर्गा नीलाताई उपाध्ये यांच्या निधनाची बातमी यावी हा केवढा मोठा दैवदुर्विलास.
नीलाताईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखक : आनंद देवघर
प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर
बदलापूर – मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेल सर्जीकल वॉर्ड मधील एका बेडवरून एका आवाजाने माझे लक्ष वेधून घेतलं! वयाच्या सुमारे पन्नाशीत असलेला एक गृहस्थ बेडवरून उठण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या सोबत कुणी नव्हतं. त्याच्या डोक्यावरची पगडी तशी सैल पडली होती. अंगावरच्या शर्टची वरची बटणे तुटलेली, पँट गुडघ्यावर फाटलेली होती. एका हाताच्या मनगटावर स्टीलचं कडं होतं, त्याच्या वरच्या भागावर खरचटल्याच्या जखमा होत्या अगदी ताज्या. कोणत्याही शीख बांधवास साजेशी भक्कम देहयष्टी, पण डोळ्यांत खूप आर्जव आणि आवाजात कंप.
मी त्याला धरून स्वच्छतागृहापर्यंत नेले. . . “शर्माईगा नहीं!” मी त्याला सांगितले, त्याने माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी एकदा पाहिलं. त्याला तिथून परत आणताना त्याच्या चेहऱ्यावर अगतिकतेचे भाव दाटून आले होते!
नाव विचारलं. . अडखळत उत्तर आलं. . “जी, गुरमित. . . गुरमित सिंग!”
सकाळी एका टेंपोवाल्याने त्याला वायसीएम मध्ये आणून इमर्जंसी मध्ये भरती केलं होतं. . . आणि तो भला माणूस निघून गेला होता.
गुरमितचं जवळचं असं कुणी नव्हतं इथं. पुण्याजवळच्या एका औद्योगिक वसाहतीत पोटासाठी कमवायला गुरमित आला होता, काही वर्षांपूर्वी. मराठी समजत होतं, पण बोलता येत नव्हतं. कारखान्यातील काम अंदाजे शिकला आणि आता सीएनसी मशीन व्यवस्थित ऑपरेट करू शकत होता. पंजाबातील एका शहरात जन्मलेल्या या साध्या शेतमजूर माणसाचं लग्न झालेलं होतं, पण पत्नी अकाली निवर्तली होती आणि मूल झालेलं नव्हतं. . . पुन्हा लग्न करायचं त्याच्या मनात कधी आलं नाही. पोटासाठी दिल्ली गाठली, भावाला बोलावून घेतलं, त्याला रोजगाराला लावून दिलं, उपनगरातल्या एका गरिबांच्या वस्तीत जागा मिळवून घर बांधून दिलं पण भावजय आली आणि याला दिल्ली सोडावी लागली. कारण गुरमित आजारी झाला. . . एका वाहनाने धडक दिल्याने पायात रॉड टाकला होता. . . त्याने सगळं आपलं आपण केलं. भावाला उपद्रव नको म्हणून खरडत, रखडत दूर मैदानात शरीरधर्मासाठी जाई. कमाई थांबली होती पण खाण्या पिण्याचे नखरे अजिबात नव्हते. बरे झाल्यावर मजुरीला जाण्याची वाट पाहत होताच. . . पण भावाला जड झाला थोड्याच दिवसांत.
आयुष्याला काही दिशा नव्हती. भावाच्या संसारात मन गुंतवत आयुष्य काढायचं मनात होतं. . आईबाप आधीच देवाघरी गेले होते. गावची शेती अगदी नगण्य. एका ट्रकमध्ये क्लिनर बनून पुण्यात आला. आरंभी मिळेल ते काम केलं आणि नंतर उपनगरात कुणाच्या तरी ओळखीने कारखान्यात हेल्पर झाला. कारखान्यात इतर राज्यातून मजुरीसाठी आलेल्या कामगार मुलांसोबत नाईलाजाने राहावे लागले छोट्या भाड्याच्या खोलीत. हा शीख, ते इतर कुणी. याचा स्वभाव तसा अबोल. व्यसन नाही त्यामुळे कुणाशी देणे घेणे व्यवहार नाही.
कोरोना आला आणि खोली रिकामी झाली. . . गुरमित कुठे जाणार? कारखान्याच्या शेड मध्येच मुक्काम आणि काम. नंतर जवळ एक खोली भाड्याने मिळाली. पैसे शिल्लक पडलेले होते थोडे. अडीअडचणीमध्ये उपयोगी पडावेत म्हणून बँकेत जपून ठेवले होते.
गुरमित टायफॉइडने आजारी झाला. असाच एका संध्याकाळी गोळ्या औषधं आणायला म्हणून गावात निघाला होता. . . रस्त्यावरच्या दगडाला पाय अडखळून पडला. . . तो नेमका उताणा. कमरेला मार बसला आणि त्याचं अंग, विशेषतः संपूर्ण उजवा भाग बधिर झाला आणि सतत थरथरू लागला!
आज गुरमित थरथरत्या देहाने बेडवर पडून होता. रुग्णालयातील सेवाभावी संस्थेच्या लोकांनी गुरमितला मदतीचा हात दिला. त्यावेळी ycm मध्ये सहा बेवारस रुग्ण होते!
संस्थेने गुरमित ची जेवणाची व्यवस्था केली, जेवणाचे पार्सल आणून ठेवले. गुरमितची अवस्था तशी बरी वाटत नव्हती. विविध तपासण्या झाल्या. . रिपोर्ट यायचे होते.
गुरमितने डाव्या हाताने जेवणाच्या प्लास्टिक पिशवीची गाठ कशीबशी सोडवली, भाजी प्लेटमध्ये ओतली. . . उजवा हात आणि आता पायही थरथरू लागले होते. कसाबसा एक घास त्याने तोंडपर्यंत नेला. . . पण त्याला वेळ लागत होता. मी त्याच्या पोळीचा एक तुकडा तोडला, भाजीत बुडविला आणि त्याच्या मुखात घातला. . . . त्याने माझ्याकडे पाहिले. . . “मैं खा लूंगा प्राजी!” तो म्हणाला. . . मी म्हणालो” रहने दो. . . आराम से खाना”
आणखी तीन घास तोंडात घातल्यावर मात्र त्याने मला थांबायला सांगितले. . . संकोच होत होता त्याला. . . एवढा मोठा माणूस लहान मुलासारखा दुसऱ्याच्या हातून जेवतो आहे. . . त्याला कसं तरी वाटत असावं!
वॉर्डातील इतर रुग्णांचे नातेवाईक आणि नर्स आणि वॉर्डबॉय, मामा सुद्धा गुरमितला पाहून हळहळत होते!
दुपारी गुरमित सीरियस झाला! त्याला श्वास घेता येईना! डॉक्टरांनी धावपळ करून त्याला ऑक्सीजन लावला तिथेच. आय सी यू मध्ये बेड उपलब्ध नव्हता त्यावेळी. मग सर्व यंत्रे तिथेच आणून लावली. गुरमित घामाघूम झाला होता. . . . चार तास त्याने दम काढला. . . “लकवा मार गया क्या मुझे?” तो विचारू लागला. एकटा माणूस, अर्धांगवायू म्हणजे काय ते त्याला ठाऊक होते. . . आयुष्यभर परावलंबित्व!
मी त्याचा मोबाईल मागितला. . त्यात अगदी मोजकेच नंबर. छोटू म्हणून एक नंबर सेव्ह होता. . . “वो हमारे लिये मर गया”. . . . त्या भावाने मला उत्तर दिले. . फोन बंद!
एका सेवाभावी संस्थेविषयी गुरमितला वरवर माहिती होती, त्याने सांगितलेल्या गोष्टींवरून मी इंटरनेटवर अंदाजे शोध घेतला. दिल्लीतील एका संस्थेचे नाव, फोटो दिसले. गुरमितने त्या व्यक्तीला ओळखले. . . “उनसे बात करावो”. . . त्याने विनंती केली! पुढे पंजाबी भाषेत झालेल्या संवादात एवढेच समजले की. . ती संस्था फक्त रस्त्यावर बेवारस सापडलेल्या मानसिक रुग्णांवर मोफत उपचार करते!
“ऐसी हालत में जी के मैं क्या करुंगा?” गुरमित त्यांना विचारत राहिला. “प्राजी. . . . मेरी कुछ मदद करो. . बडी मेहरबानी होग्गी”. . . पण पलीकडून सोरी जी. . . एवढंच ऐकू आलं. “आप पुना में ही किसी से बात करो!”
काहीवेळाने गुरमित ची अवस्था आणखी बिघडली. पण तेवढ्यात आय सी यू मध्ये एक बेड उपलब्ध झाला. . . सर्वांनी मिळून गुरमितला स्ट्रेचरवर चढवले आणि त्या वॉर्ड मध्ये नेले!
थोड्यावेळाने समजले. . . सरदारजी सीरियस झाला आणखी. अंतर्गत रक्तस्राव झालाय. . . अवघड आहे! वॉर्डातील लोक हे ऐकून चुकचुकले!
आय सी यू मधील अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ गुरमित पहात होता. . . त्याला त्याचा एकाकीपणा अधिकच टोचू लागला असावा. . . रुग्णाची जगण्याची इच्छा संपली की औषधे उपयोगाची नसतात!
रात्री गुरमित गेला! अशी अफवा पसरली. . . पण लगेच विरून गेली! कोणतेही रक्ताचे नाते नसलेले लोक क्षणभर मनातून हलले होते. . . सिस्टर आणि कर्मचारी त्यांना अशा बाबींची सवय असली तरी त्यांचे चेहरे बदलून गेले होते. . . . पण सरदार अभी जिंदा है! अशी पक्की बातमी आली आणि सर्वांनी दीर्घ निःश्वास टाकले. . . चला, या मरणाच्या खोट्या बातमीने बिचाऱ्याचे आयुष्य वाढू दे. . . एका मावशींनी देवाला हात जोडून म्हटले!
तीन आठवडे झाले. . . आज अचानक गुरमित जनरल वॉर्ड मध्ये पाय मोकळे करण्यासाठी हळूहळू फिरताना दिसला! अर्धांगवायूने त्याला बरीच सवलत दिली होती. . . उजवा हात अजुनही काहीसा बधीर होता, नीट चालता येत नव्हते. . . पण चालता येत होते हे महत्वाचे! डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, मामा, मावश्या सगळे या तगड्या पण निरागस माणसाला काही कमी पडू देत नव्हते!
गुरमितने मला पाहिले आणि त्याचा चेहरा उजळला. . . त्याने नुकतेच त्याचे लांब केस धुतले होते आणि तो पगडी बांधण्याच्या तयारीत होता! त्याने मला मिठी मारली!
“कुछ खावोगे?” मी विचारले. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. ” नहीं, भाईसाब! खाना आताही होगा! ” तो संकोचून म्हणाला!
“पनीर रोटी?” मी म्हणालो तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. . . गावाकडे असताना आईच्या हातची रोटी त्याला आठवली असावी. . . ट्रक वर असताना ढाब्यावर बाजेवर बसून खाल्लेली पनीर रोटी, दाल तडका त्याला नजरेसमोर दिसला असावा!
“पंजाबी हो. . . पनीर रोटी बिना खाना फिका फिका लगा होगा पिछले महिनाभर!”
मी पार्सलची पिशवी त्याच्या हातात दिली. . . . गुरमित ने माझा हात हाती घेतला. . . . आणि त्याच्या चेहऱ्यावर मला सारा पंजाब हसताना दिसला!
मी म्हणालो. . . सत् श्री अकाल. . . गुरमित म्हणाला. . जय महाराष्ट्र!
☆ “शौर्यसूर्यांवरील डाग !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
मेजर शैतान सिंग
ही तर आपली खरी पितरे !!!!!!
अगदीच विपरीत परिस्थिती होती. इथले हवामान अगदीच नवीन. या हवामानाशी जुळवून घ्यायला कित्येक महिने लागू शकतात.. आणि या १२४ बहादूर जवानांना इथे पाठवले जाऊन केवळ काहीच दिवस झालेले आहेत. उभ्या आयुष्यात कधी बर्फाचे डोंगर पाहिलेले नाहीत, पावसासारखा बर्फ पडताना पाहिला आणि अनुभवलेला नाही. थंडी या शब्दाचा अर्थ या आधी कधी समजला नव्हता तो आता समजू लागलेला आहे. कपभर पाणी उकळायला काही तास लागताहेत. पायांतले बूट सर्वसाधारण हवामानासाठी बनवलेले. बोटे उघडी राहिली तर गळून जाण्याची शक्यता. तंबूही तसेच…. अगदी साधे.
.३०३ (point three-not-three) रायफली.. एक गोळी झाडल्यावर दुसरी गोळी झाडण्याआधी ती रायफल परत कॉक करावी लागे…. म्हणजे पुढची गोळी झाडायला रायफल तयार करावी लागे…. मिनिटाला फार तर वीस-तीस गोळ्या या रायफलमधून बाहेर पडणार! थंडीपासून बचाव करण्यासाठी हातात हातमोजे घालावेच लागतात.. पण मग या मोज्यामुळे रायफल फायर करण्यासाठी असणारा ट्रिगर (खटका, घोडा) ज्या धातूच्या गोलाकार रिंगमध्ये असतो, त्या रिंगमध्ये बोट नीट आत जात नाही… रायफल तर फायर करायचीच आहे… मग उजव्या हातातील मोजा काढावाच लागतो… आणि भयावह थंडीत उघड्या राहिलेल्या बोटाला हिमदंश होतोच… बोट मृत होऊन गळूनही पडू शकते! एका जवानाकडे फारतर सहाशे गोळ्या. पलटणीकडे असलेली अग्निशस्त्रे अगदीच सामान्य. आणि समोर…. अमर्याद संख्या असलेला लबाड शत्रू ! संख्या किती… तर आपल्यापेक्षा किमान वीसपट. आणि त्यांची हत्यारे आपल्यापेक्षा उजवी…. मिनिटाला पाचशे गोळ्या झाडणारी…. शिवाय ते तोफगोळेही झाडू शकत होते… आपल्या जवानांना आपला तोफखाना साहाय्य करण्याच्या भौगोलिक स्थितीत नाही… कारण तोफखाना आणि आपली युद्धभूमी यांमध्ये उंच डोंगर. आणि तरीही आपली अत्यंत महत्वाची हवाई धावपट्टी राखायची आहे…. अन्यथा शत्रू पुढे सरकरणार… आणि आपला मोठा भूप्रदेश ताब्यात घेणार अशी स्थिती. त्यांची मोठी टोळधाड येणार हे निश्चित होते… आणि त्यांची संख्या पाहता माघार घ्यावीच लागणार हे (तिथे क्वचितच दिसणा-या) सूर्यप्रकाशाएवढे लख्ख होते. दलनायक नावाने शैतान ! पण वृत्तीने देवासारखा… लढाऊ आणि सत्याची बाजू न सोडणारा…. जणू पांडवांचा सारथी… श्रीकृष्ण… मूळचा यादवच. तुम्ही माघारी निघून या… अशी सूचना वरिष्ठ लष्करी अधिका-यांनी दिलेली असताना दलनायक आपल्या जागी ठाम उभा. एकशे चोवीस वीर…. शत्रूला घाबरून माघारी पळून जाणे हे रक्तात नव्हतेच कधी… आताही नाही… कोई भी जवान पीछे न हटेगा !… ठरले ! हे एकशे चोवीस… ते हजारोंच्या संख्येने चालून आले… शत्रूकडे माणसांची कमतरता नव्हती….. आणि शस्त्रांची सुद्धा. आपल्या या १२४ जवानांची शत्रूस मारता मारता मरेतो झुंज सुरु झाली आणि चार तासांत संपली सुद्धा. आपल्या शूरांनी त्या हजारो शत्रूसंख्येतील किमान हजारभर तरी आपल्या. ३०३ रायफली, संगीनी आणि नुसत्या हातांनी यमसदनी धाडले होते. शत्रूने ती लढाई तांत्रिकदृष्ट्या जिंकलेली असली तरी त्यांची हृदयं भारतीय सैन्याच्या मृत्युंजयी पराक्रमाने काळवंडून गेली… ते माघारी निघून गेले… त्यांनी आणखी पुढे येण्याची हिंमत दाखवलीच नाही असे म्हटले जाते… आणि दोनच दिवसांत त्यांच्या बाजूने युद्धविराम जाहीर केला ! या युद्धात इतर कोणत्याही आघाडीवर चीनला एवढ्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले नव्हते… It was a real Last Stand of Indian soldiers!
११४ सैनिक सहकारी त्यांच्या प्रिय अधिका-यासह.. मेजर शैतान सिंग साहेबांसह, देशाच्या सीमेच्या रक्षणार्थ प्राणांचे बलिदान देऊन बर्फाच्या कड्यांच्या आड, बर्फात, खंदकांमध्ये निपचित पडलेले होते. सर्वांनी छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. एकाने तर तब्बल सत्तेचाळीस गोळ्या उरात सामावून घेतल्या होत्या.. ३०३ रायफल फायर करता यावी म्हणून सर्वांनी हातातले मोजे काढून फेकून दिले होते… एकाच्या हातातील हातागोळा तसाच त्याच्या हातात होता… उभ्या स्थितीतच प्राण गेला होता! वैद्यकीय सहायकाच्या हातात इंजेक्शनची सिरीन्ज तशीच होती… त्याला डोक्यात गोळ्या लागल्या होत्या… तब्बल ११४ देह बर्फात बर्फ होऊन थिजून गेलेले… पण पुन्हा कधीही जिवंत होतील आणि शत्रूवर तुटून पडतील असे वाटावे!
या दिवशी लढाईत उतरलेल्या आठ-दहा जवानांच्या प्राणांवर त्यादिवशी यमदूतांची नजर पडली नसावी… ते बचावले… त्यातील एकाने, रामचंद्र यादव यांनी जबर जखमी झालेल्या मेजर शैतान सिंग साहेबांना स्वत:च्या अंगावर बांधून घेऊन काही अंतरावर वाहून नेले… तशाही स्थितीत मेजर साहेबांनी “छावणीत पोहोचा… आपले जवान कसे शेवटच्या श्वासापर्यंत लढले ते त्यांना सांगा!” असे बजावले. पण साहेबांना असे टाकून माघारी येण्यास त्याने नकार दिला. रात्रीचे सव्वा आठ वाजले होते मेजर साहेबांच्या मनगटी घड्याळात…. काळजाच्या धडधडीवर चालणारे ते पल्स घड्याळ… बंद पडले… साहेबांच्या हृदयाची धडधड बंद पडल्यावर!…. मेजर शैतानसिंग साहेब देवतुल्य कामगिरी बजावून निजधामाला निघून गेले. रामचंद्र यादव यांनी मेजर साहेबांचा देह शत्रूच्या हाती लागू नये असा लपवून ठेवला! जिवंत सापडलेल्या सहा जणांना चीनी सैनिकांनी युद्धकैदी म्हणून पकडून नेले… याट रामचंद्र यादव सुद्धा होते…. रामचंद्र यादव साहेब अंधारात शत्रूची नजर आणि पहारे चुकवून निसटले आणि भारतीय हद्दीत आले… त्यांनी छावणीतल्या मुक्कामात खायला घालून सांभाळलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्यांना आपल्या लष्करी छावणीपर्यंत वाट दाखवली! हा जखमी जवान भारतीय लष्कराच्या ताब्यात आला, त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले गेले. दरम्यान २१ नोव्हेंबर, १९६२ रोजी म्हणजे रेझांग ला (चुशुल) येथे झालेल्या प्रचंड लढाईनंतर चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केला गेला होता….. चीनी जरी जिंकले असले तरी त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले होते….. कदाचित त्यामुळेच त्यांनी युद्धविराम जाहीर केलेला असावा.. असे अनेकांना वाटते. सुमारे १८००० फूट उंचीवर झालेले हे रणकंदन प्रत्यक्षात पाहणारे आणि त्याची कहाणी सांगण्यासाठी जिवंत राहिलेले केवळ सहाजणच होते.. त्यातील चार चीनच्या ताब्यात… त्यातील एक तिथेच मृत्यू पावला. एक जण तिथून निसटला होता.
जो जिवंत परतला होता तो सांगत असलेली युद्धकथा इतकी अविश्वसनीय होती की मोठमोठ्या लष्करी अधिका-यांना ही भाकड कथा भासली… एकशे चोवीस जवान हजारो चिन्यांचा खात्मा करू शकले, हे त्यांच्या पचनी न पडणे साहजिकच होते…. कारण अत्यंत अपु-या साधन सामुग्रीच्या जोरावर अगदी ऐनवेळी अनेक सैनिक तिथे पाठवले गेले होते. जो सैनिक हे सांगत होता त्याला दिल्लीत बोलावले गेले… चुकीचे, खोटे सांगितले तर अगदी कोर्ट मार्शल होईल अशी तंबीही दिली गेली… जवान म्हणाला… ”साहेब, आपण प्रत्यक्ष येऊन बघा… तिथली परिस्थिती समजावून घ्या. मेजर साहेब अजूनही तिथेच बसून आहेत.. त्यांचे रक्ताळलेले हातमोजे त्यांच्या देहाशेजारीच ठेवलेत मी… साहेब तिथेच आहेत… निश्चेष्ट !”
अधिक माहिती घेतली गेली… दरम्यान काही युद्धकैदी भारताच्या ताब्यात मिळाले.. त्यांनी या गौरवशाली लढ्याच्या हकीकतीला दुजोरा दिला ! पण तरीही शंका होतीच…. प्रत्यक्ष डोळ्यांना पुरावा दिसत नव्हता…. प्रत्यक्ष जिथे लढाई झाली तिथपर्यंत जाणे युद्धाच्या वातावरणात शक्य नव्हते !
चिन्यांच्या तावडीतून सुटलेले हे वीर आपल्या मूळ गावी परतले…. आणि सामाजिक बहिष्काराचे बळी ठरले ! जिथे मुळात युद्धाची हकीकतच लष्करी अधिकारी मान्य करायला तयार नव्हते तिथे सामान्य गावकरी का वेगळा विचार करतील? कारण त्यांच्या समाजात युद्धात लढता लढता मरण्याची परंपरा…. हे पाच सहा जणच माघारी आले म्हणजे हे शत्रूला पाठ दाखवून माघारी पळाले असतील ! गावाने यांना वाळीत टाकले.. यांच्या मुलांच्या शाळा बंद केल्या…. भगोडे (पळपुटे) म्हणू लागले सारे यांना ! हे आपेश मात्र मरणाहुनी ओखटे होते…. प्रश्न जवानांच्या हौतात्म्याचा होता… त्यांचा पराक्रम असा संशयाच्या भोव-यात सापडणे किती दुर्दैवाचे होते!
१३, कुमाऊ रेजीमेंट होती ती. कुमाऊ हा उत्तराखंडमधील एक प्रदेश आहे. त्यावरून या रेजिमेंटचे नाव ठेवण्यात आले. राजस्थानात एका लष्करी अधिका-याच्या पोटी जन्मलेले मेजर शैतानसिंग भाटी या सेनेचे नायक होते. त्यांच्या नेतृत्वात ‘आभीर’ (अभिर) अर्थात नीडर, लढाईत शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहण्यात जीवनाचे सार्थक मानणारे ‘अहीर’ या लढाऊ हरयाणा भागातून आलेल्या समाजाचे कित्येक सैनिक होते… हिंदुस्तानात अगणित लढाऊ समाजघटक आहेत… ते सर्व सैन्यात एकमेकांच्या खांद्यास खांदा लावून लढत आहेत…. म्हणून आज देश उभा आहे !
फेब्रुवारी, १९६२. युद्धाविराम होऊन तीन महिने उलटून गेले होते. एक गुराखी आपले याक प्राणी हाकत हाकत तसा चुकूनच रेझांगला (चुशूल) नावाच्या परिसरातल्या त्या बर्फाच्या पहाडावर पोहोचला…. लढाख मधले हे 2. 7 किलोमीटर्स लांब आणि 1. 8 किलोमीटर्स रुंदी असलेले हे पठार ! तेथील दृश्य पाहताच त्याचे डोळे प्रचंड विस्फारले असतील ! तिथे भारतीय सेनेची एक सबंध तुकडी शत्रूच्या प्रतिकारासाठी बर्फात पाय रोवून उभी होती… सर्वांच्या रायफली लोड केलेल्या आणि शत्रूच्या दिशेने तोंड केलेल्या होत्या… शत्रू टप्प्यात येताच… रायफली फायर होणार होत्या… हातातल्या हातबॉम्बची फक्त पिन उपसायची बाकी होती… काहींच्या हातात रायफलच्या संगीनी होत्या… शत्रूच्या छातीत भोसकण्यासाठी सज्ज… फक्त या सेनेतील प्रत्येकाचे डोळे मिटलेले होते… कुडीतून प्राण निघून गेले होते… एका महाप्रचंड युद्धाचे एक शिल्पचित्रच जणू निसर्गाने तिथल्या बर्फात कोरले होते…. त्यात मेजर शैतान सिंग साहेबही होते… प्रचंड जखमी अवस्थेत एका खडकाला टेकून बसलेले…. शांत, क्लांत!… त्या देहात एका क्षणासाठी जरी देवाने पुन्हा चेतना निर्माण केली असती तरी ते म्हणाले असते…. ”.. पीछे न हटना… फायर !”
त्या गुराख्याकडून ही खबर पहाडाखाली आणि तिथून वायुवेगाने दिल्लीपर्यंत पोहोचली…. योजना झाली… पाहणी पथक युद्धभूमीवर पोहोचले…. पाहणा-या प्रत्येकाच्या डोळ्यांत आसवांनी गर्दी केली…. देशासाठी प्राणांचे बलिदान म्हणजे काय याचा बर्फात थिजलेला वस्तुपाठ त्यांच्या समोर होता… आता त्यांच्या हौताम्याबद्दल कसलीही शंका उरली नव्हती….. देहांची मोजदाद झाली… ओळख पटवली गेली…. कित्येक देह सापडलेच नाहीत…. आहेत त्या देहांवर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार झाले ! मेजर शैतान सिंग साहेबांचा देह त्यांच्या जन्मगावी पाठवण्यात आला ! ते जिवंतपणी परमवीर म्हणून लढले.. ते मरणोपरांत परमवीरचक्र विजेते ठरले. त्यांच्या हुतात्मा सहकारी सैनिकांचाही यथोचित गौरव करण्यात आला ! बचावल्या गेलेल्या बहादूर सैनिकांना मानाची पदे बहाल केली गेली. १९४ शौर्य सूर्य आता उजळून निघाले होते… त्यांच्यावरील डाग पुसले गेले होते ! पळपुटे म्हणून हिणवल्या गेलेल्या सैनिकांना देशाने आता वीर म्हणून स्वीकारले….. युद्धभूमीत स्मारक उभारले गेले… १९४ आत्मे शांततेत परलोकीच्या प्रवासास निघून गेले असतील…. ताठ मानेने !
१८ नोव्हेंबर, १९६२.. या दिवशी कृष्ण शुद्ध सप्तमी तिथी होती. या दिवशी आपल्या या पितरांनी हे जग त्यागले होते…. आज पितृपंधरवड्याचा अखेरचा दिवस… सर्वपित्री अमावास्या ! या सर्वपितरांसाठी आज एक घास बाजूला काढून ठेवू !
(काल परवाच भारतीय रेल्वेने आपल्या नव्या इंजिनला ‘ १३, कुमाउ ‘ हे नाव देऊन एक चांगले पाऊल उचलले. त्यावरून हा लेख लिहावासा वाटला. आपल्यासाठी जीवाचे बलिदान दिलेल्या सैनिकांचे स्मरण सतत व्हायला पाहिजे हा ह्या कथा सांगण्यामागील उद्देश ध्यानात घ्यावा. मी काही अभ्यासू लेखक नाही… पण तरीही लिहितो…जय हिंद! 🇮🇳)
(पहिले छायाचित्र परमवीर मेजर शैतान सिंग साहेब यांचे. दुस-या छायाचित्रात युद्धभूमीवर मृत सैनिकांच्या देहांवर अंत्यसंस्कार केले गेले ते दृश्य.. )
☆ शौर्य गाथा : नायक जदुनाथ सिंह राठोड… परमवीर चक्र – लेखक : अज्ञात ☆ भावानुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
नौशेरा सेक्टर येथे एकट्याने डझनावारी शत्रू सैनिकांशी लढून भारतीय सैन्यासाठी महत्वाचा असा एक दिवस वाचवलेला योद्धा.
ही खऱ्या अर्थाने हिरो असलेल्या नायक जदुनाथ सिंह राठोड या राजपूताची वीरगाथा आहे. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ रोजी उत्तरप्रदेशातील शहाजहानपूर च्या खजुरी गावी झाला होता. भारतीय सैन्याच्या 1/7 राजपूत रेजिमेंट (आताची ब्रिगेड ऑफ गार्डस् ची चौथी बटालियन) मध्ये ते सेवेत होते..
६ फेब्रुवारी १९४८ रोजी काश्मिर मधील नौशेरा सेक्टरच्या तैंधर येथे शत्रूसैन्याच्या अगदी समोरची दोन नंबरची चौकी आर्मी नंबर 27373 जदुनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली होती. ही चौकी शत्रुच्या अगदीच समोर होती. हत्यारांनी सज्ज मोठ्या संख्येतील शत्रुला सामोरे जाण्यासाठी फक्त नऊ सैनिक या चौकीवर होते. ही चौकी जिंकण्यासाठी शत्रूने हिरीरीने लागोपाठ हल्ले केले. शत्रूसैन्याच्या हल्ल्याची पहिली लाट या चौकीवर येऊन आदळली. आपले शौर्य व नेतृत्वगुणाचे प्रदर्शन करीत आपल्या जवळ असलेल्या छोट्या तुकडीच्या हिंमतीच्या बळावर नायक जदुनाथ सिंह यांनी शत्रुला गोंधळात टाकत पळवून लावले.
आपल्यापैकी चार सैनिक जखमी झाले पण तरीही जदुनाथ सिंह यांनी आपले उच्च नेतृत्वगुण व समजदारीच्या बळावर आपल्या हुकुमातील, संख्येने कमी असलेल्या सैनिकांचा मोर्चा बांधून पुढच्या हल्ल्यास सामोरे जाण्यास ते सज्ज झाले. त्यांचे धीरगंभीर व्यक्तिमत्त्व व हिम्मतीवर त्यांच्या सैनिकांना पुर्ण विश्वास होता व ते शत्रुच्या हल्ल्याचा सामना करण्यास जय्यत तयार होते. शत्रूसैन्याने दुसरा हल्ला मोठ्या उमेदीने व आधीपेक्षा जास्त सैनिकांसह प्रखरतेने चढवला. शत्रूच्या अपेक्षेविपरीत, अगदीच नगण्य सैनिक राहिले असतांनाही, नायक जदुनाथ सिंह यांच्या शौर्यपुर्ण नेतृत्वाखाली त्यांनी ही चौकी लावून धरली. सर्वच सैनिक जखमी झाले होते. नायक जदुनाथ सिंह यांचाही उजवा हात जखमी झाला होता, तरीही घायाळ ब्रेन गनरला बाजूला सारून त्यांनी स्वतः ब्रेनगनचा ताबा घेतला.
शत्रुसैन्य चौकीच्या अगदी भिंतींपर्यंत येऊन पोहोचले होते, पण नायक जदुनाथ सिंह यांनी पुन्हा अतुलनीय धैर्य दाखवत शर्थीने शत्रूशी लढत राहिले. स्वतःच्या जिवीताची पर्वा न करता जखमांकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आपला धीरगंभीर स्वभाव व शौर्य दाखवत लढत रहाण्यासाठी आपल्या सैनिकांचा उत्साह वाढवत राहिले.
नायक जदुनाथ यांचा गोळीबार इतका विध्वंसक होता की, चौकी हरण्याच्या स्थितीत असतांनाही विजयश्री खेचून आणल्याचे स्पष्ट दिसत होते. शत्रूसैन्य जमीनीवर विखुरलेल्या त्यांच्या मृत व जखमी सैनिकांना सोडून आरडाओरडा करत पळून गेले.
आपल्या अतुलनीय शौर्याने अत्यंत बिकट परिस्थितीत खऱ्याखुऱ्या योद्ध्याप्रमाणे लढत, कणखर नेतृत्वगुणाचे उदाहरण स्थापित करीत नायक जदुनाथ सिंह यांनी दुसऱ्या हल्ल्यापासून आपल्या चौकीचे रक्षण केले. आतापर्यंत या चौकीवरील इतर सर्वच भारतीय सैनिक वीरगतीस प्राप्त झाले होते. ही चौकी जिंकायचीच या निर्धाराने शत्रूसैन्याने मोठ्या संख्येने आपला तिसरा निर्णायक हल्ला चढवला.
आतापर्यंत खूपच जखमी झालेले नायक जदुनाथ सिंह अक्षरशः एकहाती तिसऱ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज झाले. अगदी हिंमतीने व कणखरपणे ते आडोशामधून बाहेर आले व पुढे सरसावत असलेल्या शत्रुसैन्याच्या तुकडीवर एकट्याने आपल्या स्टेनगनने अविश्वसनीय असा हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने विस्मयचकीत होत शत्रूसैन्याची तुकडी सैरावैरा पळत सुटली.
नायक जदुनाथ सिंह यांना या तिसऱ्या व निर्णायक हल्ल्यात डोक्यात व छातीवर अशा दोन गोळ्या लागल्याने वीरमरण प्राप्त झाले. अशारीतीने पुढे सरसावणाऱ्या शत्रूवर एकहाती हल्ला चढवतांना दाखविलेल्या धाडस व अतुलनीय शौर्य गाजवत केलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे युद्धातील महाभयंकर अडचणीच्या वेळी या वीर सैनिकाने, नौशेराच्या संरक्षणासाठी असलेल्या आपल्या सैन्याची कुमक व संपुर्ण विभागावर शत्रूसैन्याला चाल करून जाण्यापासून रोखले होते.
अशी अत्यंत धोकादायक परिस्थिती समोर दिसत असतांनाही अतुलनीय शौर्य दाखवत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वोच्च बलिदान देत हौतात्म्य पत्करल्याचे उतराई होत, नायक जदुनाथ सिंह राठोड यांना युद्धकाळातील सर्वोच्च सन्मानाचे पदक, ‘परम् वीर चक्र’ (मरणोपरांत) प्रदान करुन गौरविण्यात आले. हा सन्मान मिळवणारे ते चौथे वीर होते.
देशाला त्यांच्यावर गर्व आहे. “ हे वीर जवान, तुझे सलाम।”
मूळ लेखक- अनामिक.
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तीन हजार फूट उंचीवरील डोंगरावरील गुहेत एक – दोन नव्हेत, तब्बल वीस अतिरेकी लपून बसलेले आहेत… ते कधीही खाली उतरून आपल्या भारताच्या सीमेत घुसून रक्तपात घडवून आणतील अशी खात्रीच आहे. आपल्या हद्दीत एक पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेकी घुसणे म्हणजे एकावेळी शेकडो नागरीकांच्या आणि सैनिकांच्याही जीवाला मोठा धोका.. हे तर वीस होते! ही पिसाळलेली श्वापदे माणसांत घुसण्यापुर्वीच त्यांना गाठून मारलं पाहिजे! ठरलं…
कॅप्टन अरुण ‘सिंह’ साहेब या श्र्वापदांचा समाचार घ्यायला निघाले.. सोबत निवडक सहकारी होतेच. पण त्या पहाडावर पोहोचायला तब्बल दहा तासांची उभी चढण चढावी लागली… खांद्यांवर, पाठींवर शस्त्रे घेऊन. निघताना थोडंफार काही खाल्लं असेल तेवढेच. सोबतीला अंधार आणि पाऊस होताच… पण थांबता येणार नव्हतं.
अतिरेकी शोधायचे आणि त्यांना खलास करायचे काम अतिशय धोकादायक. कारण ते अगदी आरामात नेम धरून बसलेले असतात. खालून वर येणारे लोक त्यांच्या शस्त्रांच्या टप्प्यात अलगद येतात. याला एकच उपाय जीवाची पर्वा न करता त्यांच्यावर चालून जायचे… सिंह जसा हत्तीवर धावून जातो तसे!
आपण कोणत्या कामगिरीवर निघालो आहोत, कुठे निघालो आहोत हे घरच्यांना सांगण्याची सोय, परवानगी आणि इच्छाही नव्हती.
ही काही पहिलीच मोहीम नव्हती अरुणसिंग यांची. काश्मीर खोऱ्यात केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल एक सेना मेडल आधीच त्यांच्या नावावर आहे. घरी सेवानिवृत्त सैन्य अधिकारी असलेले वडील आहेत, आई आहे. आजोबा सुद्धा फौजेत अधिकारी होते. त्यांच्या सारखाच गणवेश अरुण सिंग यांनी अंगावर चढवला होता.. स्वकर्तृत्वाच्या जोरावर.
अरुण सिंग यांनी केवळ सहा वर्षांच्या कारकीर्दीत अनेक कठीण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. यात पर्वतारोहण, अतिउंचीवरील युद्धाभ्यास, खोल समुद्रात सूर मारून कामगिरी फत्ते करणे, पाण्याखालून केले जाणारे युद्ध, कमांडो अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश होता. पुढे ते स्वयंस्फूर्तीने 9, PARA SPECIAL FORCES मध्ये दाखल झाले.
त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी साहेबांचा साहाय्यक (ए. डी. सी. ) म्हणून काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती, पण अरुण साहेबांना प्रत्यक्ष युद्धभूमीत लढण्यातच जास्त रस असल्याने त्यांनी ही मोठी संधी नाकारली.
कठोर शारीरिक मेहनत करण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. एका प्रशिक्षणात पाठीवर चाळीस किलोग्राम वजन घेऊन साठ किलोमीटर्सचे अंतर चालून जायचे होते. त्यांच्या पाठीवरच्या पिशवीचा बंद तुटला. हे प्रशिक्षण नंतर पूर्ण करण्याची सवलत प्रशिक्षकांनी त्यांना देऊ केली होती. पण सवलत घेण्यास स्पष्ट आणि नम्रपणे नकार देऊन अरुण साहेबांनी एका हातात रायफल आणि एका हातात ती वजनदार पिशवी घेऊन निर्धारित वेळेत साठ किलोमीटर्स अंतर पार केले होते!
आज त्यांच्या नेतृत्वात निवडक सैनिकांची तुकडी अतिरेकी लपले होते त्या गुहेच्या अगदी समीप पोहोचण्यात यशस्वी झाली होती. पण अतिरेक्यांना चाहूल लागली आणि त्यांनी वरून बेफाम गोळीबार सुरु केला, हातगोळे फेकायला सुरुवात केली. आता सर्वांनाच धोका होता… आता काही नाही केले तर सर्वांनाच मरणाला सामोरे जावे लागणार….
अरुण सिंग त्वरेने गुहेकडे झेपावले… समोर आलेल्या एका अतिरेक्याच्या दिशेला ग्रेनेड फेकून त्याला उडवले…. तेवढ्यात दुसरा अतिरेकी अंगावर धाऊन आला… अरुण सिंग यांनी हातातल्या धारदार सुऱ्याने भोसकून त्याला यमसदनी धाडले.
तोवर इतर अतिरेक्यांच्या रायफलीतून सुटलेल्या काही गोळ्या अरुण सिंग यांच्या पायांत घुसल्या होत्या.. पण सहकाऱ्यांचा जीव धोक्यात होता म्हणून स्वत: पुढे होऊन स्वतः च्या जीवाची तमा न बाळगता अरुण सिंग यांनी प्रखर हल्ला चढवल्याने मागील सैनिकांना आडोसा घेऊन गोळीबार करण्यास सज्ज होण्याची संधी मिळू शकली.
अरुण सिंग जखमी अवस्थेतच गुहेत शिरले…. आत लपलेले अतिरेकी अंदाधुंद गोळीबार करीत होतेच… अरुण सिंग यांच्या छातीत गोळ्या घुसल्या… पण तरीही न थांबता पुढे सरसावत आपल्या जवळ होते ते सर्व हातबॉम्ब त्यांनी गुहेत भिरकावून द्यायला सुरुवात केली… अजून तीन अतिरेक्यांच्या चिंधड्या उडाल्या! तोवर आपले बाकीचे सैनिक गुहेत शिरले आणि त्यांनी उर्वरीत अतिरेक्यांना थेट वरचा रस्ता दाखवला.
त्या दिवशी त्या गुहेत वीस मृतदेह पडले होते…. वीस जिवंत बॉम्बच जणू आपल्या बहादूर सैनिकांनी डीफ्यूज केले होते! पण या धुमश्चक्रीत कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया गंभीर जखमी झाले होते. तब्बल नऊ दिवस हा सिंह सैनिकी रुग्णालयात मृत्यूशी झुंजत राहिला… प्रचंड वेदना होत असतांनाही या अवघ्या सत्तावीस वर्षे वयाच्या शूर सैन्याधिकाऱ्याच्या मुखावर हास्य विलसत होते….. स्वतः ला होत असलेल्या त्रासापेक्षा आपल्या हातून घडलेल्या पराक्रमाचा आनंद त्यांना जास्त होता… यासाठीच तर अट्टाहास केला होता सैन्यात येण्याचा.
त्यांना आपल्या तिसऱ्या पिढीत शौर्याची परंपरा कायम राखायची होती. पण यावेळी मृत्यू वरचढ ठरला… आणि कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया यांच्या नावाआधी ‘हुतात्मा’ शब्द लागला!
दिवस होता २६ सप्टेंबर, १९९५. आपले वडील ले. कर्नल प्रभात सिंग आणि मातु:श्री सत्यदेवी यांना मागे ठेवून ‘अरुण’ नावाचा शौर्य-सूर्य मृत्यूच्या क्षिताजापल्याड मावळून गेला!
सैन्यात अधिकारी झाल्यानंतर अरुण सिंग पहिल्यांदा लष्करी गणवेशात घरी आईसमोर आले होते, तेंव्हा त्यांनी आईला छान साडी भेट म्हणून आणली होती आणि आग्रह करून लगेचच ती साडी तिला परिधान करून यायला सांगितले आणि दोघा मायालेकांनी छान फोटो काढून घेतला…. हा फोटो आता एक स्मरणचिन्ह बनून राहिला आहे आई-वडीलांसाठी.
‘अशोक चक्र’ हा आपल्या देशाचा शांतता काळातील सर्वोच्च सैन्य पुरस्कार कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया यांना मरणोत्तर देण्यात आला. ले. कर्नल प्रभात सिंग (सेवानिवृत्त) आणि मातु:श्री सत्यदेवी यांनी कै. अरुण सिंग यांच्या वतीने हे ‘अशोक चक्र’ मोठ्या अभिमानाने स्वीकारले.
पंजाबातील पठाणकोट जिल्ह्यात सुजनपूर येथे जन्मलेला हा ‘सिंह’ जम्मू-कश्मीर मधल्या लोलाब खोऱ्यातील जंगलाचा ‘वाघ’ (Lion of Lolab Valley, Jammu-Kashmir) म्हणून सैन्य इतिहासात अमर आहे!
२२ सप्टेंबर…. कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया साहेबांच्या पराक्रमाचे स्मरण करण्याचा दिवस !
☆ “एक वरदहस्त जन्मतो तेव्हा !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
आपल्या देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब बंगळुरू मध्ये त्यांच्या प्रयोगशाळेत काही कामात मग्न होते. त्या शहरात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून सेवा करीत असलेले डॉक्टर प्रसाद काही निमित्ताने साहेबांच्या प्रयोगशाळेत आले. त्यांनी सहज उत्सुकता म्हणून तेथील एका उपकरणास हात लावला. ते धातूचे उपकरण एका महत्वाच्या संरक्षण प्रणालीमध्ये वापरले जायचे होते. आणि तो विशिष्ट धातू पदार्थ खास प्रयोगांती तयार केला गेला होता.
डॉक्टर प्रसाद यांनी ते उपकरण दोन्ही हातांनी उचलून ते किती जड आहे, हे पाहण्यासाठी उचलले… तर ते अगदी सहज उचलले गेले ! एखादा प्याला पाण्याने भरलेला आहे असा आपला समज असतो आणि आपण तो त्याच्या वजनाच्या अंदाजाने उचलायला जातो आणि तो प्याला उचलला की तो अनपेक्षितपणे हलका आहे, हे आपल्या ध्यानात येते तेंव्हा जशी आपल्या मनाची अवस्था होते, तशी अवस्था डॉक्टर प्रसाद यांची झाली !
एवढे मजबूत आणि मोठे उपकरण आणि वजन अगदी नाममात्र ! डॉक्टर प्रसाद यांच्यातील मेडिकल डॉक्टर आता जागा झाला ! त्यांनी डॉक्टर कलाम साहेबांना विचारले… “ माझ्या पोलिओ रुग्णांना तीन चार किलो वजनाचे calipers (आधार देणाऱ्या धातूच्या पट्ट्या) शरीरावर वागवत वावरावे लागते. त्या पट्ट्या या धातूंच्या बनवल्या तर? “
कलाम साहेबांनी स्वतः रुग्णालयात जाऊन ते बालरुग्ण पाहिले… त्या धातूच्या पट्ट्यांचे वजन पेलत पेलत केविलवाण्या हालचाली करणारे… वीस – तीस रुग्ण होते !…. कलाम साहेब तात्काळ त्यांनी प्रयोगासाठी वापरायला म्हणून तयार केलेल्या धातूपासून पोलिओग्रस्त रुग्णांसाठी calipers तयार करण्याच्या कार्याला लागले…. देशाच्या संरक्षण विषयक प्रकल्पात अतिशय व्यग्र असतानाही साहेबांनी मुलांसाठी वेळ काढला… आणि तीन चार किलो वजनाचे caliper अगदी काही शे ग्राम वर आणून ठेवले… मुलांच्या शरीरावरचा आणि त्यांच्या पालकांच्या मनावरील भार या महान शास्त्रज्ञाच्या सहकार्यामुळे, संशोधनामुळे अगदी हलका झाला होता ! सुमारे पन्नास हजार रुग्णांना या नव्या पद्धतीच्या उपकरणाचा त्यावेळी लाभ झाला!
१५ ऑक्टोबर…. डॉक्टर कलाम साहेबांचा जन्मदिवस…. ! एवढा प्रचंड माणूस भारताला दिल्याबद्दल देवा… तुझे किती आभार मानावेत?
(१५ ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे जगाने मान्य केले. पण जगात हा दिवस तसा फारसा साजरा केला जात नाही, असे दिसते… पण आपण केला पाहिजे!)
☆ सगळीकडे फक्त आणि फक्त ‘टाटा‘ ? – श्री चारुचंद्र उपासनी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, कुणी एक अमेरिकन इंजिनिअर, त्याच्या तेथील उद्योगाशी निगडित असलेल्या मुंबईतील उद्योगाच्या कामासाठी जेमतेम एका दिवसासाठी मुंबईत येणार होता. त्या निमित्तानं त्याचं भारतात प्रथमच येणं होणार होतं. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला आशियातील गरीब देश आहे, या व्यतिरिक्त त्याला भारताची फारशी माहिती नव्हती.
या एकदिवसीय वास्तव्यात भारताविषयी प्रत्यक्ष जी माहिती मिळेल ती घ्यावी या उद्देशानं त्यानं, भारतीय विमान कंपनीनं, Air India नं भारतात येण्याचं ठरवलं. एका गरीब देशाची ही विमान सेवा त्याला अपेक्षेपेक्षा उत्तम वाटली. Air India विषयी थोडी चौकशी केली असता त्याला कळलं की कुणी ‘ टाटा ‘ नावाच्या उद्योजकानं – ही कंपनी स्थापन करून ती नावारूपाला आणली. त्याला मोठं कौतुक वाटलं, त्यानं ठरवलं की त्याला आता पुढे भारतात ज्या ज्या उत्तम गोष्टी आढळतील त्या त्या गोष्टींसंबंधी असलेल्या श्रेष्ठ भारतीयांची नावं लक्षात ठेवायची. ‘ टाटा ‘ हे नाव प्रथमच समोर आल्यामुळे ते त्याच्या मनात पक्क ठसलं होतं.
ऐन रात्री तो जेव्हा मुंबई विमानतळावर उतरला तेव्हा त्याच्या नावाचा फलक मोठ्या तत्परतेनं हातात घेऊन एक सेवक गणवेशात बाहेर उभा होता, त्या सेवकानं मोठ्या नम्रतेनं त्या इंजिनिरचं स्वागत केलं. हॉटेल मध्ये नेण्यासाठी आणलेल्या कारकडे पहाताच गाडीवरील ‘ टाटा मोटर्स ‘ ह्या नावानं तो अचंबित झाला. तो मनात म्हणाला,
‘अच्छा, अच्छा हा टाटा गाड्या पण बनवतो वाटतं ‘ एकच माणूस विमान आणि गाड्या अश्या दोन्ही उद्योगांत आहे ह्या योगायोगाचं त्याला आश्चर्य वाटलं. आता त्याला भारतातील इतर उद्योग आणि उद्योगपति यांच्या विषयी उत्सुकता वाटत होती. बोलता बोलता त्याचं नियोजित हॉटेल आलं. ते भव्यसुंदर हॉटेल समोर असलेल्या समुद्राच्या सान्निध्यात अधिकच सुंदर दिसत होतं, त्यावर केलेली मोजकी रोषणाई रात्री डोळ्यांना सुखवीत होती, वास्तुशिल्पाच्या सौंदर्यानं विनटलेल्या त्या हॉटेलनं त्याचं चित्त चांगलच आकर्षून घेतलं. आत शिरल्यावर तेथील टोकाची स्वच्छता टापटीप शिस्त अन् अगत्य पाहून तो भारावून गेला. त्यानं कुतूहलमिश्रित आश्वर्यानं विचारलं, ‘ कुणाचं हॉटेल आहे हे? ‘
‘टाटांचं, टाटा समूहाचं ताज हॉटेल आहे हे ‘ या उत्तरानं त्याला वाटणारं आश्चर्य आणखीनच वाढलं.
ताजातवाना होण्यासाठी तो तेथील न्हाणीघरात गेला, तिथल्या अत्यंत स्वच्छ वातावरणात त्याचं लक्ष समोरच्या पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत टॉवेलनं वेधून घेतलं. अंग पुसण्यासाठी त्यानं तो सुंदर टॉवेल हातात घेतला अन् आश्चर्याचा आणखी एक सुखद आघात त्याच्यावर झाला, त्या टॉवेलवर मुद्रा होती ‘ टाटा टेक्स्टाईल ‘ ची. मनातल्या मनात तो म्हणाला ‘आश्चर्यच आहे या टाटाचं ! या एवढ्याश्या वेळात अप्रत्यक्षपणे किती वेळा सामोरा येतो आहे हा ‘ टाटा ‘.
तेवढ्यात एका चिनी भांडयांच्या संचात चहा आला, त्या चहाच्या घमघमाटानं तो प्रसन्न झाला, त्या चिनी मातीच्या छानश्या कपबश्या, किटली त्यानं निरखल्या, त्यावर लिहिलेलं ‘ टाटा सिरॅमिक्स ‘ हे उत्पादकाचं नाव वाचल्यावर मात्र त्यानं आश्चर्य वाटून घ्यायचं नाही असं ठरवलं. आता एखादं दुसरं नाव वाचायला ऐकायला मिळालं तर त्याला आश्चर्य वाटणार होतं. चहाचा स्वाद त्याला इतका आवडला की, तसा चहा बरोबर घेऊन जावा म्हणून त्यानं त्या चहाची चौकशी केली आणि त्याला आता अपेक्षितच उत्तर मिळालं कारण तो होता ‘ टाटा टी ‘
रात्रीची उशिराची वेळ होती, तो आता लगेच झोपणार होता. तेथील सर्व सेवक आणि सेविका यांची हसतमुख आणि नम्र वागणूक त्याला आवडली होती. त्यांच्यापैकी संबंधित व्यक्तींचे आभार मानून तो झोपायला निघाला. स्वागतकक्षात ओळख झालेली मुलगी समोर होती. तिनं त्याला शुभेच्छा दिल्या पण तिच्याकडे पहाताच त्याच्या लक्षात आलं की त्या सर्व हसतमुख सेवकांमध्ये ती एकटीच काहीशी उदास दिसत होती. झोपण्यापूर्वी क्षणभरासाठी त्यानं टी व्ही लावला, तिथे त्याला एक जाहिरात पहायला मिळाली, ती होती टाटा सॉल्ट्ची.
सकाळी वेळेवर तो मुंबईतील त्याच्या अमेरिकेतील सहयोगी कंपनीत पोहोचला. तिथे त्यांना अडचणीत आणणाऱ्या काही यांत्रिक अन् अभियांत्रिक समस्यांवर चर्चा होणार होती. त्यासाठी एका तरुण शास्त्रज्ञालाही बोलवण्यात आलं होतं. चर्चा खूप उत्साहजनक आणि प्रश्न मार्गी लागतील अशा दिशेनं झाली, आणि अपेक्षेपेक्षा ते बरेच लवकर निष्कर्षापर्यन्त पोहोचले. त्या शास्त्रज्ञाशी त्याची तेवढ्या वेळातच छान गट्टी जमली आणि त्याच्या विनंतीवरून तो अमेरिकन इंजिनिअर त्याच्या बरोबर एक फेरफटका मारायला निघाला. तो म्हणाला, ‘ मी ज्या जागतिक कीर्तिच्या संस्थेत उपयोजित भौतिक शास्त्र आणि उपयोजित गणितशास्त्र यांचा अभ्यास केला तिला आपण प्रथम धावती भेट देऊ. ‘.. तिथे पोहोचताच त्याला संस्थेचं नाव दिसलं, ‘ टाटा इन्स्टिट्यूट् ऑफ् फंडामेंटल् रीसर्च् ‘ बाहेर पडताच त्या शास्त्रज्ञानं त्याला सांगितलं की इथे मानवशास्त्रांच्या अभ्यासाला वाहिलेली ‘ टाटा इन्स्टिट्यूट् ऑफ् सोशल् सायन्सेस् ‘ ही पण एक संस्था आहे. त्या फोर्ट् भागातून फिरतांना मध्येच एका भव्य वास्तुकडे बोट दाखवीत तो शास्त्रज्ञ म्हणाला, ‘ ह्या भागातील जागांचे भाव तुमच्या न्यूयॉर्कपेक्षाही अधिक आहेत तरी एका दानशूर घराण्याच्या उदारतेमुळे नाट्य, संगीत आदि क्षेत्रातल्या नवोदित व्यक्तींना आपली कला विनासायास सादर करता यावी म्हणून हे ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् ‘ इथे उघडलं आहे.
‘हे दानशूर घराणं टाटांचं ना? ‘ त्या अमेरिकेन इंजिनिअरनं विचारलं,
‘तुम्हाला कसं माहिती? ‘ त्या शास्त्रज्ञानं चकित होऊन विचारलं. ‘ हा माझा तर्क आहे ‘ अमेरिकेन म्हणाला.
‘तुमचा तर्क अगदी बरोबर आहे ‘ शास्त्रज्ञानं उत्तर दिलं. याच टाटा समूहानं TCS या त्यांच्या कंपनीद्वारे लाख्खो तरुणांना रोजगार दिला आहे.
फेरफटका झाला आणि तो हॉटेलमध्ये पोहोचला. जेवण करून रात्रीच्या विमानानं जाण्यासाठी तो आता हॉटेल सोडत होता. आदल्या दिवशी रात्री त्याला भेटलेल्या स्वागतकक्षातील मुलीनं त्याचा अगदी हसत निरोप घेत त्याला प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. तिचे आभार मानतांना तो म्हणाला, ‘ तुम्हाला असं प्रसन्न पाहून मला बरं वाटलं, काल फारच तणावग्रस्त दिसत होता तुम्ही ! ‘
ती म्हणाली, “ माझ्या आईच्या मानेत एक छोटी गाठ होती ती शस्त्रक्रिया करून काढली, ती कॅन्सरची आहे की नाही हे तपासण्यासाठी इथल्या ‘ टाटा कॅन्सर हॉस्पिटल ‘ मध्ये पाठवली होती. काल मी त्या चिंतेत होते, आज सकाळी तो रिपोर्ट आला, गाठ साधीच निघाली त्यामुळे मी चिंतामुक्त झाले “. यावर तिचं अभिनंदन करून तो निघाला.
मुंबईच्या आकाशात विमान झेपावलं आणि त्या लखलखत्या महानगरीकडे पहात असतांना त्याच्या मनात विचार आला, ‘ एवढा प्रचंड लोकसंख्येचा देश पण इथे एकच माणूस खरं काम करतो आहे ! ‘
ज्या टाटा समूहानं हा देश अशा उंचीवर आणून ठेवला त्या टाटा समूहाचे शेवटचे कुलतंतु रतन टाटा यांना कृतज्ञतापूर्ण आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक : चारुचंद्र उपासनी
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ रतन टाटा´ यांची अंत्ययात्रा – –☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
(‘रतन टाटा यांची अंत्ययात्रा कव्हर करतांना जाणवलेल्या ठळक बाबी-)
१) रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता काढलेल्या अंत्ययात्रेत कुठलाही मोठा तामझाम नव्हता… साधी फुलांनी सजवलेली लहानशीच गाडी ज्यातून टाटांचं पार्थिव स्मशानभूमीत अवघ्या १५ ते २० मिनीटांत पोहोचलं… एवढा मोठा इतिहास घडवणारा उद्योगपती पण, त्याची अंत्ययात्रा सामान्य मुंबईकराची कोंडी करणारी, त्यांची नेहमीची गती कमी करणारी नव्हती…
२) स्मशानभूमीत सुरुवातीला मोजके १५० लोकच उपस्थित होते… सुरुवातीला सामुहिक शांती प्रार्थना झाली… `कोणताही धार्मिक विधी न करता´ शांतपणे पार्थिव विद्युतदाहिनीत नेलं गेलं…
३) टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हिआयपी स्मशानभूमीबाहेर आले… आणि बाहेर इतका वेळ रोखुन धरलेला जवळपास तीन-चारशेचा जमाव एकदम स्मशानभूमीत आला… काहींनी आम्हांलाही अंत्यदर्शन हवं म्हणून पोलिसांसोबत थोडीशी हुज्जतही घातली… तेवढ्यात एक किरकोळ शरिरयष्टीचा मुलगा जमावाच्या नजरेस पडला… `शांतनु सर, शांतनु सर´ अश्या हाका गेल्या… चेहरा उतरलेला तो बावीशी-पंचवीशीचा तरुण- शांतनु नायडू अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून म्हणाला `everything is over´… केवळ या तीन शब्दांत जमाव शांत झाला.. आणि त्यातले काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले
४) शांतनु मान खाली घालुन, मिडीयाला काहीच उत्तर न देता बाहेर आला… एकाही कॅमेराकडे शांतनुनं साधी नजरही फिरवली नाही… बाहेर येताच त्यानं आपली बाईक शोधायला सुरुवात केली… अमित शहा आणि इतर व्हिआयपी येत असल्यानं रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या हटवल्या होत्या… त्यात शांतनुची बाईकही कुठेतरी गेली… शांतनु हळु आवाजात आपल्या सहका-याला म्हणाला-
`टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है´… बाईक हरवलेल्या शांतनुला घेऊन जाण्यासाठी अनेक बड्या गाड्या तिथे दरवाजा उघडून तयार होत्या मात्र, तरीही शांतनुच्या तोंडुन निघालं –
`टॅक्सी´से जाते है… स्मशानभूमीसमोरचा रस्ता बंद केल्यानं तिथे टॅक्सी येणार नव्हतीच… शेवटी कोणाच्यातरी खाजगी गाडीत मागच्या सीटवर तीन जणांमध्ये बसून शांतनु तिथुन गेला
५) या प्रसंगानंतर मात्र माझं लक्ष गर्दीतल्या काही चेह-यांनी वेधलं… माझ्यासकट अनेकजण तिथे असे होते की ज्यांना तिथला माहौल मोबाईलमध्ये टिपायचा होता… काही जण मात्र कमालीचे स्तब्ध आणि शून्यात नजर लावलेले होते… समोरुन टाटांचं पार्थिव गेलं, पोलिसांनी रायफलचे तीन राऊंड झाडत मानवंदना दिली पण यांचे कॅमेरे वर आलेच नाहीत- त्यांचे हात मोबाईलवर नव्हते तर दोन्ही हात जोडलेले होते… डोळ्यांच्या कडा भिजलेल्या होत्या…
६) त्यांपैकीच एकजण पटन्याहून १५ दिवसांपूर्वीच टाटांना भेटायला आलेला- साधारण तीशीचा हा तरुण सॅनिटरी पॅडच्या स्टार्टअपसाठी टाटांची मदत मागायला मुंबईत आला होता… ईमेलवरुन अपॉईंटमेंट ठरत असतांना टाटा आजारी पडले… तरुणाला काही दिवस वाट बघ सांगितलं आणि वाट बघता बघताच टाटा गेले… भेट झालीच नाही
७) एक जण इमर्जन्सी फ्लाईट पकडून हैदराबादहून मुंबईत पोहोचला… हा पण तिथला लहानसा उद्योजकच… मी माझ्या घरात टाटांचा फोटो लावतो म्हणाला
८) एकजण ठाण्यात मिस्त्री काम करणारा, एकजण पुण्यातला रिक्षावाला आणि एकजण टाटांच्याच कंपनीत बड्या हुद्द्यावर काम करुन रिटायर्ड झालेला… एकमेकांचं कधीच तोंड न पाहिलेली ही माणसं अक्षरश: एकमेकांच्या गळ्यात पडून रडली… यांना जोडणारा समान दुवा होता तो टाटांचा हात… या प्रत्येकाच्या आयुष्याला टाटा या नावानं कलाटणी दिली होती… रिक्षावाल्याला प्रशिक्षण मिळाल्यानं चांगला जॉब मिळणार होता, मिस्त्री कामगाराला कॅन्सरमधून जिवनदान मिळालं होतं, आणि हायप्रोफाईल रिटायर्ड व्यक्तीला जगण्यातलं समाधान मिळालं होतं
९) अनेकांना रतन टाटांचं शेवटचं दर्शन तर झालं नाहीच… पण रतन टाटांच्या शरीराचा अखेरचा स्पर्श ज्याला झालाय- त्या अंत्ययात्रेसाठी वापरलेल्या गाडीला हात लावून अनेकांनी नमस्कार केला… त्या गाडीला सजवलेली फुलं, त्यांची पाकळी घेऊन या लोकांनी आपल्या पाकीटात ठेवली…
१०) टाटांच्या ताज हॉटेलचा संपूर्ण स्टाफ अंत्यविधीवेळी उपस्थित होता… आणि तिथेही हा हॉटेलचा स्टाफ स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांना टाटा मिनरल वॉटरच्या बाटल्या देऊन
`टाटांचंच पाणी´ पुरवत होता…
☆
लेखिका : सुश्री मनश्री पाठक
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈