☆ श्री उप्पिलियाप्पन कोविल….सुश्री मानसी घाणेकर ☆ सुश्री वीणा छापखाने☆
तमिळनाडूला गेलो होतो तेव्हा कुंभकोणम्ला एका मंदिरात दर्शनाला गेलेलो… ‘श्री उप्पिलियाप्पन कोविल’. याची गोष्ट गंमतीशीर आहे. श्री मार्कंडेय ऋषींनी भूदेवी—लक्ष्मीदेवी आपली मुलगी म्हणून जन्माला यावी यासाठी घनघोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन श्री लक्ष्मीदेवी त्यांच्या आश्रमासमोरच्या तुळशीवृंदावनाखाली लहान बालिकेच्या रूपानं प्रकट झाली. मार्कंडेय ऋषींनी अगदी प्रेमळ बापाच्या जिव्हाळ्यानं काळजीकाट्यानं तिला लहानाची मोठी केली. इतकी वर्षं श्री लक्ष्मीदेवीचा विरह भगवान विष्णूंना अजिबात सहन होईना. ते मार्कंडेय ऋषींकडे साधंसुधं रूप घेऊन गेले. पौंगडावस्था आणि तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचा हात मागण्यासाठी. त्यांना मार्कंडेय ऋषींनी ओळखलं नाही. ऋषी म्हणाले, ‘ अहो, माझी गोडुली मुलगी अजून किती लहान आहे ! तुम्ही किती मोठे आहात…छे छे..ते काही जमणार नाही…तिला अजून काहीच दुनियादारी येत नाही…तापत्रय असलेल्या संसाराचा भार ती कशी सांभाळेल? अहो…तिला अजून पदार्थ शिजवताना मीठ किती टाकावं याचाही अंदाज नाही…! ‘ त्यावर भगवान श्रीमहाविष्णू म्हणाले, ‘ नका काळजी करू…मी सांभाळून घेईन तिला संसारात…अजिबात अंतर देणार नाही…तिला जेवण बनवताना मिठाचा अंदाज येत नाही ना….काही हरकत नाही…मी आजपासून बिनामिठाचं भोजन करेन! ‘
आणि मग तिथे श्री महाविष्णू—लक्ष्मीदेवीचं लग्न झालं. तेव्हापासून त्या मंदिरात बिनामिठाचा नैवेद्य दाखवला जातो !!
’ उप्पू (मीठ) + इल्लेया (नाही) + अप्पन (स्वामी) म्हणजे मीठ न खाणारा देव ‘ असं श्री महाविष्णूंना बिरूद दिलं गेलं.
अतिशय चवदार आणि अफलातून प्रसाद आहे तिथला !!!
परिपूर्ण पुरूष !!!
— मानसी घाणेकर
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ स्मिता अशोक झगडे – श्री सुहास मुकुंद मोरे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑफिसची गाडी बंद पडली. त्यामुळे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर कालिना ते सायन स्टेशनपर्यंत ऑटोने यावे लागले.
पावसाची रिपरिप थोडीशी चालूच होती. तोंडावर मास्क, त्यामुळे डोळ्यावर असलेल्या चष्म्यावर धुकं जमलेलंं… घाईघाईत ऑटोतून उतरतानाच टॅक्सी स्टँडवर असलेल्या एका टॅक्सीकडे हात दाखवत सवयीप्रमाने मोठ्याने विचारले, “बरकत अली नाका चलोगे क्या?”
त्याच वेळी ड्रायव्हर सीटच्या बाजूचा दरवाजा उघडत एक हसऱ्या डोळ्यांचा चेहरा बाहेर डोकावत बोलला, “कुठे…?”
तोवर माझ्या चष्म्याची काच क्लीअर झाली होती. आता मला स्पष्ट दिसले… ती एक महिला होती !
मी थोडा गोंधळलो…मागे फिरणारच होतो, इतक्यात पुन्हा प्रश्न आला, “कुठे जायचेय?”
मी गोंधळलेल्या चेहऱ्याने कसेतरी हसत (मास्कमुळे न दिसलेले) मराठीत बोललो, “बरकत अली नाका, वडाळा.”
त्या म्हणाल्या, “बसा सर.”
मी आणि आझे एक सहकारी दोघे आत बसलो. नवीकोरी टॅक्सी, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पुढच्या आणि मागच्या सीटमध्ये प्लास्टीकचा पारदर्शक पडदा.
टॅक्सी स्टार्ट करून त्यांनी विनंती केली, ” सर, मला रस्ता गाईड करा प्लीज.” मी हो म्हणालो.
असे विचारणारा ड्रायव्हर नवा असतो हे सांगायला नको.
सरदार नगर, सायन कोळीवाडा येथे माझे सहकारी उतरले.
महिला टॅक्सी ड्रायव्हर, विशेष म्हणजे आपली मराठी महिला, असलेल्या टॅक्सीत मी प्रथमच प्रवास करत होतो…
त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांचा प्रतिसाद कसा असेल याचा विचार करत होतो.
बरकत अली नाक्यापर्यंत प्रवासात त्यांच्याशी बोलावे म्हणून विचारले,
” किती वर्षं झाली टॅक्सी चालवता? “
” एक महिना झाला..”
त्यांचे उत्तर आणि माझे प्रश्न असा प्रवास चालू होता..
काळाचौकी येथे राहणाऱ्या या धाडसी महिलेचे नाव स्मिता अशोक झगडे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली…..चिंचपोकळी येथील प्रसिद्ध शोरूम लॉकडाऊनकाळात बंद असल्याने तिथली नोकरी नसल्यातच जमा…… कुटुंबाची जबाबदारी, वाढत्या महागाई मध्ये पती पत्नी दोघेही कमावते असले तरच निभाव लागेल अशी परिस्थिती…. हाताला काम नाही….
ड्रायव्हींग लायसन्स २०१२ ला बनवून घेतले होते.
मग डोक्यात विचार आला, खचून न जाता नव्या क्षेत्रात धाडस करायचे.
एका महिलेने टॅक्सी चालवणे हा विचार तसा सहजासहजी कोणालाही न पटणाराच.
पाय ओढणाऱ्या आपल्याच लोकांचा नेहमीचा बुरसटलेला प्रश्न तयार होताच,
” लोकं काय म्हणतील??”
पण हे अपेक्षित होतेच.
काठावर बसून बुडणाऱ्याची मजा पाहणाऱ्या लोकांची पर्वा न करता स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडता येणे हीच मोठी गोष्ट.
स्मिता झगडे यांनी घरातल्यांच्या पाठबळावर टॅक्सी चालवायचा निर्णय घेतला…!
स्मिता झगडे यांना रोज वेगवेगळे अनुभव येतात. पण इतरांना वाटते तशी आमची_मुंबई वाईट नाही याचा त्यांना विश्वास वाटतो.
ड्रायव्हिंग करत असताना मुंबईच्या रस्त्यांची पुरेशी माहिती नसते, तेव्हा प्रवाश्यांनाच विनंती करण्याची त्यांची तयारी असते. प्रवाश्यांशी वागताना सौजन्य हा महत्त्वाचा गुणधर्म त्यांच्या अंगी जाणवला. विशेष म्हणजे त्यांनी भाडे नाकारले नाही. (भाडे नाकारणे हा इथल्या टॅक्सीचालकांचा जन्मसिध्द अधिकार आहे की काय असे वाटते.)
प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत असताना ड्रायव्हर सीटवर महिला पाहून कधी कधी लोकं न विचारताच पुढे जातात. बरेचदा लोकांना कुतुहल वाटते. महिलांना असे काही वेगळे करताना पाहण्याची सवय नसल्याचा हा परिणाम असेल.
स्मिता झगडे यांच्याशी बोलताना एक गोष्ट सतत मनात येत होती…यांच्या धाडसाची दखल माध्यमांनी घेतली पाहीजे. महिला सबलीकरणाच्या फक्त गप्पा मारून चालणार नाही. अशा वेगळ्या वाटा निवडणाऱ्या हिरकणींना प्रोत्साहन दिलेच पाहीजे. स्मिता झगडेसारखी परिस्थितीवर मात करू पाहणारी स्त्री इतर स्त्रियांसाठी उदाहरण असते.
कोणतेच काम लहान मोठे नसते. तुमची मानसिकता आणि स्वत:ला स्वयंप्रकाशित करण्याची जिद्द तुमच्या कामाचा दर्जा ठरवते. परिस्थितीपुढे हतबल होणारे, खचून जाणारे समाजाचे आदर्श होऊ शकत नाहीत. समाजाचे खरे आदर्श असतात ते स्मिता झगडे यांच्यासारखी सामान्यांतली असामान्य माणसं !
अशा धाडसाला हवी असते ती प्रोत्साहनाची शाबासकी, आत्मविश्वास वाढवणारे दोन शब्द. त्यांची लढाई ते लढत असतात. आपण फक्त लढ म्हटले तरी त्यांना हत्तीचे बळ मिळते.
मी असेच त्यांच्या धाडसाला प्रोत्साहन दिले. बरकत अली नाका आल्यावर एक फोटो काढू का विचारले तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. मास्क घातलेला एक फोटो क्लिक केल्यावर त्यांनीच मास्क बाजूला करून दुसरा फोटो काढायची परवानगी दिली. नंतर माझा मोबाईल नंबर मागून घेतला. त्यांचे नाव पत्ता दिला.
मुंबई सारख्या ठिकाणी २५-३० मिनिटांच्या प्रवासातल्या ओळखीत आपल्यावर कोणी असा विश्वास दाखवते, ते ही एक महिला, तेव्हा एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी नक्कीच वाढलेली असते.
स्मिता अशोक झगडे यांची मुंबईतल्या प्रवासात कधी कुठे भेट झाली तर त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरू नका…!
आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,” मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”
उद्योगपती वरमले आणि म्हणाले, ” हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले. घरमालक उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, ” मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.
हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एखाद्या सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,” सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”
उद्योगपती म्हणाले, ” आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘ उद्योगपती ‘ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ” एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला.
तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.
एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, ” तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?” हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.” उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड “. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.
असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता ??”
उद्योगपती म्हणाले, ” अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘ तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा .”—–
—” तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘ खरोखरच आपण कोण आहोत ‘ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत ‘ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”
या उत्तुंग उद्योगपतीचे नाव—–‘ रतन टाटा…‘
खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी—कुठलीही गुंतागुंत नसलेली— अशीच होती. .
खरेतर—-साधे राहणे हेच कठीण असते. अशा व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…
म्हणूनच, ” तुम्ही कोण आहात . ” हे महत्वाचे नाही—- ” तुम्ही कसे आहात ” हे महत्वाचे आहे—-
विचार जरूर करा—
संग्राहक : – श्री सुनीत मुळे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 2 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
(बायकांना बचतीची सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय? इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !) इथून पुढे ——
त्यांच्या दवाखान्यात येणार्या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी पडतात याचं कारण समजावलं. त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं. पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली, ” पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून? “. यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते. ” घरी गाय पाळा “. हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला. ” एक पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत, तर गाय कुठून आणणार? ” डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, ” मी कर्ज देतो. त्यातून गाय घ्या “. पुढचा प्रश्न होता कर्ज परत करायचे कसे? यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली. ” बघा तुमच्या जमा पैशांतूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल “.
लक्षात घ्या हा १९२०-३० चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर -अडाणी होते. ही योजना त्यांचा गळी उतरायला वेळ लागला. पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली. त्यानंतर ‘मी पण – मी पण ‘ असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली. हळूहळू कर्ज फिटायला लागले, घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागले, बचत वाढायला लागली. काही वर्षांतच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूध संस्था उभी राहिली.
दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरु केली. तिचं नाव होतं- “ कॅनरा इंडस्ट्रीअल अँड बॅकींग सिंडीकेट लिमिटेड.” १९२५ साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात उडूपी इथे सुरु झाली. १९३७ साली मुंबईच्या चेक क्लीअरींगमध्ये या बँकेची नोंदणी झाली. याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षांतच मेडिकल -इंजीनिअरींगची कॉलेजेस पण सुरु झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या मणिपाल विद्यापीठाची स्थापना अशी झाली. डॉक्टरांनी सुरु केलेल्या बँकेला आज आपण सिंडीकॅट बँक म्हणून ओळखतो.
एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडीकेट बँकेची ही कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांच्या आयुष्यातली आणखी एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख अपूर्णच राहील.
डॉक्टर टी. एम. ए. पै हे नेहेमी व्यवसाय वाढवायच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांचीओळख एका गुजराती व्यापार्याशी झाली. त्या व्यापार्याला यार्नचे लायसन्स हवे होते. पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टर टी. एम. ए. पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले. त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरुभाई अंबानी. धीरुभाई अंबानी डॉ. पैंनी केलेली मदत कधीच विसरले नाहीत. डॉ. पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा. आजही रिलायन्सचा मुख्य बँकर सिंडीकेट बँकच आहे.
महिन्याभरापूर्वी सिंडीकेट बँकेचे कॅनरा बॅकेत विलीनीकरण झाले. पण दुधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही.
समाप्त
—डॉ. तोन्से माधव अनंत पै
प्रस्तुती :-सुनील इनामदार
संग्राहक : – श्री सुनीत मुळे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
(एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ !!)
खुलभर दुधाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल. पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्यात ओतायला सांगतो. गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही. संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्यात अर्पण करते आणि काय आश्चर्य !! गाभारा दुधाने भरून वहायला लागतो. या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की विकासाच्या गाभार्यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्याआज्जीबाईसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं ! अशीच एक पेला दूधाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत !
ही कथा आहे तोन्से माधव अनंत पै यांची. कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या माधव अनंत पैंचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावात त्यांनी दवाखाना सुरु केला. खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. त्याला आईवडीलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून माधव अनंत पैंनी आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता.
मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं. सर्दी-खोकला-हगवण-उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंज्या कमाईवर दवाखाना कसाबसा चालत होता. एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईपण नव्हती. अशावेळी इतर तरुणांचे होते तेच झाले ! त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले.
अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत. मग साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार ! थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारुत खर्च करायचे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्या बायकांना त्यांची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चार आणे स्वत:कडे जमा करायला सुरुवात केली.
दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरु झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे, तर दुसरी खातेधारकाकडे !
सुरुवातीला येणारे नकार, नकाराची कारणं मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसांतच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात हजार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण १९२० साली ही रक्कम फारच मोठी होती. असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं- ‘ पिग्मी डिपॉझिट स्कीम ‘. इथे या कथेचा पहिला भाग संपला. बायकांना बचतीची सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय? इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !
क्रमशः….
—डॉ. तोन्से माधव अनंत पै
प्रस्तुती :-सुनील इनामदार
संग्राहक : – श्री सुनीत मुळे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆
आज “धायरी” पुण्यातील एक विकसित होणारे उपनगर म्हणून ओळखले जाते. पण एकेकाळी ते गावाबाहेरचे निर्जन ठिकाण होते. धायरी या नावाला ओळख दिली ती महादेवशास्त्री जोशी यांनी. गोवा ही जन्मभूमी आणि पुणे ही कर्मभूमी असलेल्या जोशी यांचा १२ डिसेंबर हा स्मृतीदिन. त्या निमित्त या लेखक-संशोधक महादेवशास्त्री यांना ही आदरांजली!
बापाविना पोरे वाढवणाऱ्या थोर मातांच्या कहाण्या आपल्याला नेहेमीच वाचायला मिळतात. पण आई स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने तुरुंगात गेलेली आणि इकडे बाप मुलांना वाढवतो. डॉक्टर – संशोधक करतो. आईविना मुलांना वाढवताना आपले सामाजिक सांस्कृतिक योगदान देण्यात हे पिताश्री कोठेही कमी पडत नाहीत, हे वाचले की, निर्धार आणि कष्ट एकत्र आले की कुटुंबाचा काय कायापालट होतो हे समजते. महादेवशास्त्री यांचा जन्म गोव्याचा. पण नाव काढायचे, मोठे व्हायचे म्हणून ते पुण्यात आले आणि पुणेकरच झाले.
भिक्षुकी, पूजा, ज्योतिष या पिढीजात पेशापासून प्रयत्नपूर्वक दूर राहात त्यांनी लेखन हाच आपल्या आयुष्याचा श्वास आणि ध्यास केला. भाषेवर प्रभुत्व होते आणि कल्पनाशक्तीही अचाट होती. योगायोगाने एका मासिकात उपसंपादक म्हणून नोकरीही मिळाली. मोठ्या हिमतीने त्यांनी स्वतःची ज्ञानराज प्रकाशन ही संस्था सुरु केली. स्वतःमधील लेखकाचा सन्मान करण्यासाठी केलेला हा प्रयोग कालांतराने यशस्वीही झाला.
या संघर्षमय आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारे एक आव्हान समोर ठाकले. १९५५ मध्ये गोवा-मुक्ती संग्रामाची धामधूम सुरु झाली. यांना पुण्यात स्वस्थ बसवेना. या स्वातंत्र्य-यज्ञात उडी घ्यायचीच, असा निर्धार त्यांनी केला. कुठे मच्छरदाणी शिव, बांगड्या वीक, असे करत संसाराचा गाडा ओढायला मदत करणारी पत्नी पुढे आली आणि म्हणाली – “ तुमच्यावर संसाराची, उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे, तुम्ही नका भाग घेऊ, मी जाते.” शेवटी हे तयार झाले आणि सुधाताई जोशी यांनी या संग्रामात बेधडक उडी घेतली. थोडीथोडकी नव्हे १३ वर्षांची त्यांना शिक्षा झाली. पण ४ वर्षातच त्यांची सुटका झाली.
हा त्यांचा त्याग अतुलनीय आहेच, पण महादेवशास्त्री यांनी सुधाताई यांच्याशिवाय कच्च्याबच्यांचा सांभाळ केला आणि ते करताना आपली साहित्यसेवाही सुरु ठेवली. पत्नीशी झालेल्या ताटातुटीनंतर “भारतीय संस्कृती कोश”सारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. १० खंडात भारतीय संस्कृतीची सांगोपांग चर्चा करणारे साहित्य निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधला. किती वर्षे लागतील, किती पैसा लागेल याची तमा न बाळगता महादेवशास्त्री यांनी या कामात स्वतःला बुडवून घेतले.
शास्त्रीबुवांच्या लेखनात आणखी एक पैलू होता – तो म्हणजे कथालेखकाचा. “कन्यादान” हा चित्रपट, अतिशय गाजलेला “मानिनी” हा सिनेमा त्यांच्याच लेखणीतून पडद्यावर अवतरला. “थांब लक्ष्मी कुंकू लावते”, “जिव्हाळा”, “वैशाख वणवा” या लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत लेखक म्हणून यांचे नाव कोरलेले आहे. हे असे काम पुढेही मिळणे सहज शक्य होते. पैसाही चांगला मिळाला असता. पण “संस्कृतीकोश” हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोरून ढळू दिले नाही.
आज आपण विकिपीडिया सर्रास वापरतो. ५० वर्षांपूर्वी हा कोशही एक प्रकारचा विकिपीडियाच होता. १० खंड लिहिणे म्हणजे काय, हे जे लिहिणे जाणतात, त्यांनाच कळेल. एवढे करून ते थांबले नाहीत. मुलांसाठीही चार खंडात भारतीय संस्कृती त्यांनी रसाळपणे नोंदवली. “आत्मपुराण” हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक गाजले.
धायरीचे गावकरी त्यांना खूप मानत असत. त्यांचे अंत्यसंस्कारही धायरीतच झाले. तिथेच मोठी श्रद्धांजली सभाही झाली. तेव्हा एका गावकऱ्यांनी काढलेले उद्गगार शास्त्रीबुवा किती थोर होते, याची साक्ष देणारे आहेत. जोशी यांच्याच मुलाने ते एका लेखात सांगितले आहेत.
गावकरी म्हणाला, “शास्त्रीबुवा म्हंजी लई मोठा मानूस. मोठा म्हंजी किती मोठा? तर असं बघा, त्यांनी एव्हढी बुकं लिहिली. ती बुकं जर येकावर येक, येकावर येक ठेवली, तर त्यांची उंची बाबांच्या उंचीपेक्षा जास्त होईल. एवढा मोठा मानूस होता हा.’’
महादेवशास्त्री जोशी यांना विनम्र अभिवादन !
– केशव साठये
संग्राहिका : सुश्री सुलु साबणे-जोशी.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
पती आणि दोन्ही मुलगे इंजिनियर. त्यांनी १९७७ नो्हेंबर ला हेम इले्ट्रॉनिक्स ह्या नावे उद्योग सुरू केला.
त्यांना १९९१ साली पुरस्कार: व्यवसायातील अतिशय प्रतिष्ठीत जी एस पारखे पुरस्कार त्यांच्या एका उपकरणास मिळाला.
स्नेहलता गाडगीळ ना २०१८ साली महिला उद्योजक राज्य परिषदे कडून संजीवनी पुरस्कार त्यांच्या इंजिनिअरिंग मधील योगदान साठी देण्यात आला.
तसेच २०१९ साली लोकमत सखी मंच कडून नवदुर्गा हा पुरस्कार त्यांच्या इंजिनिअरिंग क्षेत्रात केलेल्या कार्य बद्दल प्रदान करण्यात आला.
स्नेहलता गाडगीळ गेल्या १० वर्षा पासून सांगली मिरज एम आय डी सी च्या डायरेक्टर आहेत .
त्या श्री शिल्प चिंतामणी हौ सोसायटीच्या डायरेक्टर आहेत. त्याना नाटकात काम करण्याची आवड आहे. त्यांनी ए डी ए ह्या नाट्य संस्थेतून राज्यं नाट्य स्पर्ध मध्ये भाग घेतला होता. वाचन आणि भरपूर प्रवास करायची ही आवड .
कधी कधी कर्तृत्वाची उंचीच इतकी असते की सन्मानाचं वजन त्यामुळे वाढते. काहीसा हाच अनुभव २०१८ वर्षीच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्रीमुळे पद्मश्री सन्मानाला आला आहे. सुभासिनी मिस्त्री वय वर्ष ७५, जेव्हा अगदी साध्या साडीत आणि स्लीपर घालून राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार स्वीकारत होत्या, तेव्हा पूर्ण भारतच काय, पूर्ण जग अवाक होऊन बघत होतं. कारण एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री.
अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनीचं लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुलं खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या अकाली मृत्यूला कारण होतं ते म्हणजे वेळेवर न मिळालेले उपचार. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने वेळेवर नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्रीनी आपलं आयुष्याचं ध्येय निश्चित केलं, ते म्हणजे आपण हॉस्पिटल काढायचं— असं हॉस्पिटल जिकडे सगळ्या गरजूंचे उपचार होतील. एकही माणूस उपचार नाही मिळाले म्हणून मृत्युमुखी पडणार नाही. ‘ ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडे मी हॉस्पिटल काढेन ‘ असं त्यांनी निक्षून सांगितलं. लोक त्यांच्यावर हसले, समाजाने त्यांची टिंगल उडवली. एक २३ वर्षाची स्री, अंगावर ४ मुलं- ज्यात सगळ्यात मोठा ८ वर्षाचा तर लहान ४ वर्षाचा, अशिक्षित आणि गरीब असताना, “ हॉस्पिटल काढायचं तर सोड पण स्वतःच घर नीट करून दाखव “ अशी लोकांनी तिची अवहेलना केली.
हरेल तर ती भारतीय स्री कुठली…. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुभासिनी मिस्त्रीनी आपल्या लक्षाकडे वाटचाल सुरु केली. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामं करून त्यांना महिन्याला १०० रुपये मिळायला लागले. आपल्या मुलाला त्यांनी अनाथाश्रमात ठेवलं आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी बँकेत आपलं खातं सुरु केलं. आपल्या मुलांची शिक्षणं आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते त्या बँकेत बचत करत गेल्या. तब्बल २० वर्ष हे प्रामाणिकपणे करत राहिल्या.
१९९२ साल उजाडलं . सुभासिनी मिस्त्री यांनी हन्सपुकुर ह्या गावात १०,००० रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. २० वर्षात बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. त्यांच्या सगळ्यात लहान मुलाने आईच स्वप्न पूर्ण करण्याचं निश्चित केलं होतं. त्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी मिळवली होती. जी लोकं २० वर्षापूर्वी तिच्या स्वप्नावर हसली होती, त्याच गावातील लोकांना आपण ही जमीन हॉस्पिटलसाठी दान देत आहोत हे सांगताना गावकऱ्यांनी ह्या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी गावातील लोकांना केलं. आपल्याच लोकांसाठी ह्याचा फायदा होईल हे बघून गावातील लोकं येत गेले आणि कारवा बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री ह्यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता.
ह्यूमॅनिटी हॉस्पिटल हे नाव आजूबाजूच्या गावात पसरलं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या. एका वर्षाच्या आत ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाला, जो हॉस्पिटल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात गरजेचा होता. आज हे हॉस्पिटल पूर्णतः अद्ययावत असून ह्यात ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, एक्स रे अश्या, तसेच इतर विविध उपकरणांनी सुसज्ज आहे. ह्या हॉस्पिटलचं एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इकडे सुरु केलं. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणं हाच आहे.
अशिक्षित, गरीब आणि वयाच्या ऐन उमेदीच्या काळात ४ मुलांची आई असून पण समाजातील प्रत्येकाला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील एक एक पैसा वाचवून ह्यूमॅनिटी हॉस्पिटलचं स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणं, हे शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकं मोठं काम त्यांनी केलं. भारताचा ४ था सगळ्यात मोठा नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यावर त्यांचे शब्द होते—
“I am very happy to get the award, but I would like to request all hospitals in the world, please don’t refuse a patient who needs immediate medical attention. My husband died because he was refused admission and I don’t want anyone else to die in a similar way.”
पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लिपर वर सुभासिनी मिस्त्री राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर पण गर्वाचा एक लवलेश सुभासिनी मिस्त्री ह्यांच्या बोलण्यात नव्हता. त्यांच्या मते माझ्या कामाचा पुरस्कार मला तेव्हाच मिळाला जेव्हा आमच्या हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला. तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालं.
सुभासिनी मिस्त्री ह्यांना पद्मश्री देऊन सरकारने त्यांचा गौरव नाही केला– तर त्या सन्मानाची शान वाढवली आहे. गरीब, अशिक्षित, उमेदीच्या काळात विधवा होऊन ४ मुलांची जबाबदारी वयाच्या २३ वर्षी असणारी एक स्त्री एक स्वप्न बघते की आपण हॉस्पिटल काढायचं, आणि ह्या समाजात एकाही व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय मदतीशिवाय होता कामा नये– ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी त्यांनी हॉस्पिटल काढण्यासाठी लावून नुसतं हॉस्पिटल काढून न थांबता आपल्या मुलाला डॉक्टर करून समाजाच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत राहण्याचे संस्कार त्यांनी केले. स्त्रीने ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाही, आणि कोणाच्या आधाराशिवाय ती आपली स्वप्नं पूर्ण करू शकते हा आत्मविश्वास भारतात आणि जगातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या विनम्र वागणुकीतून देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुभासिनी मिस्त्री ह्यांना माझा दंडवत. त्यांना माझा कडक सॅल्यूट.
जय हिंद!!!
आजची दुर्गाच —–
— शब्दांकन (विनीत वर्तक)
संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मेरा देश बदल रहा है… ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆
केंद्र सरकारकडून नुकताच ‘ पद्म पुरस्कार वितरण समारंभ ‘ संपन्न झाला . यंदा अनेक सामान्य व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्यापैकीच एक नाव म्हणजे पर्यावरणवादी तुलसी गौडा. तुलसी गौडा यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित केले .
तुलसी गौडा यांना त्यांच्या झाडे व वनस्पतींच्या अफाट ज्ञानामुळे ‘एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट’ असे म्हटले जाते.
72 वर्षीय तुलसी गौडा मागील अनेक दशकांपासून जंगल संवर्धनाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी कार्य करत आहेत. गौडा या कर्नाटकच्या होनाल्ली गावातील आहेत. हलाक्की आदिवासी कुटुंबात वाढलेल्या तुलसी यांनी एकटीने राज्यात लाखो झाडे लावली आहेत.
त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र त्यांना झाडे आणि औषधी वनस्पतीचे अफाट ज्ञान आहे. वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वनीकरणाच्या कार्यक्रमात देखील त्या सहभागी होतात व स्वतः लावलेले झाड वाढत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतात.
अश्या या महान समाजसेविकेच्या चरणी लक्ष लक्ष प्रणाम —-
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(मेजर विवेक मुंडकुर आणि बाणेर टेकडीवरचं हँग ग्लायडिंग):-
२४ मे १९८१ हा रविवारचा दिवस उत्साही पुणेकरांच्या स्मरणातून कधीही जाणं शक्य नाही ! या दिवसाच्या साधारण 8-10 दिवस आधीपासून पुण्याच्या सगळ्या वर्तमानपत्रांमधून सामान्य पुणेकरांना नवा शब्द कळला होता –” हँग ग्लायडिंग..”. म्हणजे छोट्या त्रिकोणी आकाराच्या धातूच्या फ्रेमवर ताणलेल्या, रंगीबेरंगी पॅराशूटच्या कापडानी बनवलेल्या मिनी-विमानानी (याला इंजिन नसतं) वाऱ्याच्या सहाय्याने पक्ष्यासारखं उडायचं !
CME, दापोडी मधल्या मेजर विवेक मुंडकुर या अद्वितीय व्यक्तीने हा आगळा छंद जोपासला आणि काही सहकाऱ्यांच्या मदतीने समस्त पुणेकरांना या छंदाशी परिचित करायचा घाट घातला.
आता हवेवर आकाशात उडायचं म्हणजे उंचावरची मोकळी जागा हवी… म्हणून निवडली होती बाणेरची टेकडी ! या टेकडी वर एक देऊळ होतं, पण बाकी फारसा झाड-झाडोरा नसून मोकळी जागा होती. त्या काळात पुणे विद्यापीठाच्या गेटजवळ औंध आणि पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या मधे एक अर्धा-कच्चा रस्ता बाणेर टेकडीकडे जात असे. त्या दिवशी सकाळपासून चतु:शृंगी जत्रेला नसेल,एवढी शाळा-कॉलेजच्या मुलांपासून अनेक तरुणांची आणि त्यांच्या पालकांची अलोट गर्दी बाणेर टेकडीकडे लोटली होती. कुणी स्कूटर-मोटरसायकलवरून, कुणी गावापासून सायकली हाणीत, तर बरेचसे विद्यापीठ गेटपर्यंत बसनी आणि पुढे चालत, असे आलेले होते. तिथे पोहोचल्यावर मात्र वेगळंच वातावरण होतं ! संपूर्ण लष्करी तळाचा थाट होता. टेकडीच्या वाटेवरच मिलिटरीचे असंख्य ट्रक उभे होते, टेकडीच्या पायथ्याच्या मैदानात अत्यंत सुबक लष्करी पद्धतीचे शामियाने आणि त्यात बसायला आरामदायी खुर्च्या वगैरे होत्या… पण अर्थातच हा जामानिमा आमच्यासारख्या आम-जनतेसाठी नव्हता, तर लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी होता ! आम्ही सगळे जण टेकडीचा चढ तुडवत वर पोहोचलो होतो. आमची टाळकी सोबतच्या फोटोत दिसत असण्याची शक्यता नाकारता येत नाही !
आम्ही टेकडीच्या माथ्याजवळ असल्याने उडण्याच्या तयारीत असलेली हँग ग्लायडर आणि त्यांचे चालक जवळून दिसत होते. हा संपूर्ण खेळ वाऱ्यावर अवलंबून असल्याने वाऱ्याची दिशा आणि वेग पाहूनच उड्डाणे होऊ शकत होती. वारा पडला की आमची तोंडही पडत होती !
मेजर मुंडकुर स्वतः हातात छोटा पवन-मापी घेऊन हवेचा अंदाज सतत घेत होते, आणि परिस्थिती चांगली असेल तर उड्डाणाला परवानगी देत होते. अर्थातच ही उड्डाणे फक्त त्यांच्या प्रशिक्षित सहकाऱ्यांंनाच करायची परवानगी होती ! जम्प सूट, हेल्मेट असा त्या लोकांचा पेहराव होता. हँग ग्लायडरच्या दांड्याला पकडून काही पावलांचा स्टार्ट घ्यायचा आणि टेकडीवरून स्वतःला झोकून द्यायचं, असा कार्यक्रम होता. एकदा जमीन सोडली की टेकडीखालच्या दरीतून येणाऱ्या वाऱ्यानी ग्लायडरला वरच्या दिशेनी जोर मिळायचा आणि दरीत लुप्त झालेलं ते रंगीत गारुड परत टेकडीच्याहून उंच तरंगताना दिसायचं. वारा साथ देईपर्यंत दरीवर घिरट्या मारून 5-7 मिनिटांनी छान वळणदार गिरकी घेऊन खाल्री शामियान्यांसमोर आखलेल्या गोलात लँडिंग करणं, हे एक अचाट कौशल्य तिथे पाहायला मिळालं.
या सगळ्या सोहळ्याने भारून गेलेल्या कित्येकांनी नंतर हँग ग्लायडिंग, पॅरा ग्लायडिंगचं प्रशिक्षण घेतलं. मेजर मुंडकुर हे प्रशिक्षण देणाऱ्यात अग्रणी मानले जातात.
पुढच्या तीस वर्षांत अर्थातच या साहसी खेळाला जगभरात खूप लोकप्रियता मिळाली, पण १९८१ साली या खेळाशी तोंडओळख होण्याचं भाग्य (माझ्या मते भारतात प्रथमच)पुण्याला मिळालं, यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विवेक मुंडकुरांचे सदैव ऋणी राहावं लागेल.
— सुश्री शुभा गोखले
संग्राहिका :- सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈