? इंद्रधनुष्य ? 

☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 2 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !) इथून पुढे ——

त्यांच्या दवाखान्यात येणार्‍या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी पडतात याचं कारण समजावलं. त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं. पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली,  ” पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून? “. यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते. ” घरी गाय पाळा “. हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला. ” एक पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत, तर गाय कुठून आणणार? ” डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, ” मी कर्ज देतो. त्यातून गाय घ्या “.  पुढचा प्रश्न होता कर्ज परत करायचे कसे? यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली.  ” बघा तुमच्या जमा पैशांतूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल “.

लक्षात घ्या हा १९२०-३० चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर -अडाणी होते. ही योजना त्यांचा गळी उतरायला वेळ लागला. पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली.  त्यानंतर ‘मी पण – मी पण ‘ असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली. हळूहळू कर्ज फिटायला लागले, घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागले, बचत वाढायला लागली. काही वर्षांतच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूध संस्था उभी राहिली.

दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरु केली. तिचं नाव होतं- “ कॅनरा इंडस्ट्रीअल अँड बॅकींग सिंडीकेट लिमिटेड.”  १९२५ साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात उडूपी इथे सुरु झाली. १९३७ साली मुंबईच्या चेक क्लीअरींगमध्ये या बँकेची नोंदणी झाली. याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षांतच मेडिकल -इंजीनिअरींगची कॉलेजेस पण सुरु झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या मणिपाल विद्यापीठाची स्थापना अशी झाली.  डॉक्टरांनी सुरु केलेल्या बँकेला आज आपण सिंडीकॅट बँक म्हणून ओळखतो.

एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडीकेट बँकेची ही कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांच्या आयुष्यातली आणखी एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख अपूर्णच राहील.

डॉक्टर टी. एम. ए. पै हे नेहेमी व्यवसाय वाढवायच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांचीओळख एका गुजराती व्यापार्‍याशी झाली. त्या व्यापार्‍याला यार्नचे लायसन्स हवे होते. पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टर टी. एम. ए. पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले. त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरुभाई अंबानी. धीरुभाई अंबानी डॉ. पैंनी केलेली मदत कधीच विसरले नाहीत. डॉ. पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा. आजही रिलायन्सचा मुख्य बँकर सिंडीकेट बँकच आहे. 

महिन्याभरापूर्वी सिंडीकेट बँकेचे कॅनरा बॅकेत विलीनीकरण झाले.  पण दुधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही.

 समाप्त

—डॉ. तोन्से माधव अनंत  पै

प्रस्तुती :-सुनील इनामदार

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments