खरं तर मानवाची जसजशी प्रगती होत गेली तशी मनुष्य प्राणी समाजप्रिय प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला.. समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, नाती गोती हे मनुष्य जीवनाचे अविभाज्य घटक बनले.. रानावनात भटकणारा माणूस वस्ती करून राहू लागला.. वाड्या, वस्त्या, मग गावं, शहरं बनत गेली.. आई वडील, बहिण भाऊ, नवरा बायको अशी कित्येक नाती जोडली गेली.. पण पूर्वी असलेली नाती प्रगती बरोबरच बदलत गेली.. पितृसत्ताक पद्धती मध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत होत पण आज स्त्रियांनी स्वतःला अस सिद्ध केलंय की नात्यांच्या परिभाषा ही आपोआप बदलल्या..पूर्वी घरी वडिलधारी माणसं किंवा बाबा, काका ह्यांना घरात एक वेगळाच दर्जा होता.. त्यांचा धाक कुटुंबावर होता..घरात बाबांचे पाऊल पडताच अख्खं घर शांत होत होत.. अर्थात ती आदरयुक्त भिती होती अस म्हणू शकतो आपण.. हळू हळू कुटुंब व्यवस्था विभक्त होत गेली आणि हे चित्र बदललं..स्त्रिया ही बाहेर पडू लागल्या..मोकळा श्वास घेऊ लागल्या.. जीवनशैली बदलली..डोक्यावरचा पदर खांद्यावर आला,.. आणि पुन्हा एकदा नात्यांची परिभाषा बदलली.. नवऱ्याला हाक मारताना अहो.. जाऊन अरे आलं.. नावाने हाक मारण्याची पद्धत सुरू झाली..अहो बाबा चा अरे बाबा झाला.. नात्यांमधील भिती जाऊन ती जागा मोकळीक आणि स्वतंत्र विचारांनी घेतली.. जिथे तिथे मैत्री चा मुलामा लावून नवीन नाती बहरू लागली.. सासू सुनेचे नातं बदललं.. सूना लेकी झाल्या,.. नणंद भावजय मैत्रिणी.. दिर भाऊ.. जाऊ -बहिण.. अशी नाती जरी तीच असली तरी बघण्याचा दृष्टिकोन बदलला… अर्थात प्रत्येक नात्याचा आधार असतो तो म्हणजे विश्वास.. हा विश्वास डळमळीत झाला की नाती विद्रूप रूप घेतात.. विकृत बनतात..नात कसं असावं तर धरणी च आणि अवकाशाचे आहे तस.. मातीच पावसाशी आहे तस.. निसर्ग आणि जीव सृष्टीच नात.. ज्यात फक्त देणं आहे.. त्याग आहे समर्पण आहे.. नात कसं असावं तर राधेचं कृष्णाचं होत तसं.. प्रेम, त्याग, समर्पण आणि दृढ विश्वास असलेलं.. नात मिरा माधव सारखं.. ज्यात फक्त त्याग आहे तरी ही प्रेमाने जोडलेलं बंध आहेत.. नातं राम लक्ष्मण सारखं असावं.. एकाने रडलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारं.. नात भरत आणि रामा सारखं असावं जिथे बंधुप्रेम तर आहेच पण त्याग आणि समर्पण जास्त आहे..कुंती पुत्र कर्णा सारखं असावं..ज्यात फक्त हाल अपेष्टा, उपेक्षा असूनही निस्सीम प्रेम आणि त्यागाच प्रतीक असणारं.. नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, मायेचा ओलावा, एकमेकांची काळजी घेण्याची वृत्ती, त्याग, समर्पण, निस्वार्थ असेल तर अशी नाती अजरामर बनतात.. हल्ली मात्र हे चित्र बदलत चाललं आहे.. सोशल मीडियाचा अती वापर.. प्रगतीच्या नावाखाली चाललेले अनेक घोटाळे.. ह्या सगळ्यात बाजी लागते आहे ती नात्यांची.. एकमेकांमध्ये स्पर्धा येणं.. आदर कमी होणं आणि जे नात आहे त्यापेक्षा दुसऱ्याची अपेक्षा लोभ मनात ठेवणं ह्याने नात्यांचं स्वरूपच बदलत चाललं आहे .. सोशल मीडिया, इंटरनेट ह्या गोष्टींचा अती वापर आणि नात्यांमध्ये येणारा दुरावा काळजी करण्यासरखा झाला आहे.. काही नाती फक्त समाजासाठी असतात.. फोटो पुरते किंवा असं म्हणू की व्हॉटसअप स्टेटस पुरती मर्यादित राहिलेली असतात.. त्या नात्यांमधल प्रेम विश्वास ह्याला कधीच सुरुंग लागलेला असतो… आणि ही परिस्थिती खरच विचार करायला लावणारी आहे.. शेवटी एवढच म्हणावंस वाटतं की कुठलं ही नातं असुदे ते नात समोरच्या व्यक्तीवर लादलेलं नसावं.. त्याच ओझ नसावं.. नात्यांमध्ये स्वतंत्र विचार.. एकमेकांबद्दल आदर.. मायेचा ओलावा.. प्रेम.. आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर सतत आनंद ठेवण्यासाठी चाललेली धडपड असेल तर कुठलेच नातं संपुष्टात येणार नाही.. कुठल्याच नात्याला तडा जाणार नाही… विश्वास हा नात्यांमधला मुख्य दुवा आहे.. आणि जिथे विश्वास, त्याग, समर्पणाची भावना आहे तिथे प्रत्येक नातं म्हणजे शरदाच चांदणं.. मोग्र्याचा बहर.. आणि मृद्गंधाचा सुगंधा सारखं निर्मळ आणि मोहक आहे ह्यात शंका नाही..
(ॲनिमल फार्म ” आणि ” 1984 ” या दोन प्रसिद्ध साहित्य कृतीनी विसाव्या शतकात खपाचा उच्चांक गाठला होता. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. जॉर्ज ऑरवेलला केवळ 46 वर्षांचे इतके अल्प आयुष्य लाभले . 21 जानेवारी 1950 मध्ये लंडनमध्ये त्याचे निधन झाले.)
“ॲनिमल फार्म ” ही नुसती परिकथा किंव्हा मनोरंजनात्मक कादंबरी नसून तत्कालीन साम्यवादी व्यवस्थेवरील टीका, रशियामध्ये घडलेली बोलशेविक क्रांती ,आणि स्टॅलीनने केलेला सामान्यांचा विश्वासघात, आणि जुलूम केलेल्याचे ते रूपक आहे .शतकातील राजकीय उपहासात्मक आणि कलात्मक रितीने, प्रथमच लिहिलेल्या साहित्य प्रकारातील सर्वाधिक
प्रसिद्ध कादंबरी ! त्याने एका निबंधात म्हटले आहे,” मी जेव्हा लिहायला बसतो , तेव्हा माझ्यासमोर जे असत्य असते, ते मला लिखाणातून उघड करायचे असते “. आणि त्याने त्याप्रमाणे बोल्शेविक क्रांतीची भ्रामक बाजू उघडकीस आणली.
“Friends of fatherless, fountain of happiness —– – – – -like the sun in the sky. Comrade Nepoleon. झेंड्याचा रंगही बदलला .सगळं पहाताना प्राण्यांचा गोंधळ व्हायला लागला. पवन चक्की चा दगड ओढताना बॉक्सर जखमी झाला.
अत्यंत स्वाभिमानाने प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या बॉक्सरला “दवाखान्यात नेतो”असं खोटं सांगून कसायाकडे पाठवलं जातं .बेंजामिन गाढवाला सगळं कळत होत. पण गप्प बसून तो सगळं पाहत होता इतर प्राणी खवळले .” नेपोलियन महान आहे असं शेवटी बॉक्सर बोलला, आणि त्याला वीर मरण आले ” असं स्क्विलर ने सांगून सर्वांचा राग शांत केला.
हळूहळू डुकरे (बोलशेविक) पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागायला लागतात. सर्वसामान्यांना काहीच कळत नाही . जी तात्विक मू ल्ये दाखवून सत्तेवर आले , ती मूल्ये बदलून, पूर्वीचे आणि आत्ताचे सत्ताधारी मॅनोर फार्म वर गप्पा मारत असतात. सगळे प्राणी खिडकीतून पाहतात . त्यांना प्राणी आणि माणसात काहीच फरक कळत नाही. सर्वसामान्यांना गप्प बसण्या वाचून मार्ग नसतो. येथे कादंबरीचा शेवट होतो.
कितीतरी लेखक दारिद्र्यातून जात असताना, लोकांची टीका सहन करत, करत एक दर्जेदार सिद्ध लेखक म्हणून नावारूपाला येतात. अशा अनेकांपैकी जॉर्ज ऑरवेल याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
जॉर्ज ऑरवेलचे मूळ नाव एरिक आर्थर ब्लेयर. 25 जून 1903 मध्ये, भारतात बंगालमध्ये मोतीहरी येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सिविल सर्विसेस मध्ये नोकरी करीत होते .1907 साली त्यांचे कुटुंब इंग्लंडला गेले. 1911 मध्ये ससेक्स मधील बोर्डिंग स्कूलमध्ये आणि नंतर इंग्लंडमध्ये इटन येथे ( 1917 ते 21) स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेतले तेथे त्यांना अल्डस हक्सले हे शिक्षक लाभले. आणि तेथूनच त्यांचे लेखनाला सुरुवात झाली कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी वेगवेगळ्या मॅगझिन्स मध्ये लेखन करायला सुरुवात केली त्यांची पहिली कविता “awake young men of england “. हे लिहिली तेव्हा तो फक्त अकरा वर्षाचा होता. 1922 मध्ये बर्मा मध्ये भारतीय इंपिरियल पोलीस दलात डिस्ट्रिक्ट सुपरीटेंडंट म्हणून पाच वर्षे नोकरी केली. त्या काळात त्याला 650 पाउंड इतका चांगला पगार होता. पण त्याचे मन नोकरीत रमेना. वडिलांचा विरोध पत्करूनही त्याने ती नोकरी सोडली .आणि लेखक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन वर्षे त्याला खूपच दारिद्र्यावस्थेत काढावी लागली. इंग्लंडला आल्यानंतर त्याने प्रसिद्ध लेखकांचा अभ्यास केला. आणि आपले लेखन विकसित करायला सुरुवात केली. उदारमतवादी आणि समाजवादी विचारांच्या संपर्कात तो आला. आणि तेथेच त्याच्या राजनैतिक विचारांना सुरुवात झाली. इंग्लंडला परत येण्यापूर्वी तो पॅरिस मध्ये दोन वर्षे राहिला होता. 1933 मध्ये त्याचे पहिले पुस्तक ” डाऊन अँड आऊट इन पॅरिस अंड लंडन ” मध्ये त्याने आपले अनुभव लिहिले. आणि या प्रकाशानापूर्वीच त्याने आपल्या नावात बदल करून, जॉर्ज ऑरवेल या टोपण नावाने लेखन करायला सुरुवात केली. इंग्लंडला परत येण्यापूर्वी तो पॅरिसमध्ये दोन वर्षे राहिला होता .तेथे खाजगी शिक्षक, शाळा शिक्षक, पुस्तकाच्या दुकानात काम करत होता .1936 मध्ये त्याला लंके शायर आणि आणि याँर्कशायर मधील बेरोजगारी असलेल्या भागांना भेट देण्यासाठी नियुक्त केले. आणि तेथील गरीबीवर त्यांनी पुस्तक लिहिले.( The road to vighan pear 1937.) 1936 साली तो रिपब्लिकन पक्षासाठी लढण्यासाठी स्पेनला गेला . तेथे तो जखमी झाला .नंतर तो पूर्ण तंदुरुस्त झालाच नाही . दुसऱ्या महायुद्धा दरम्यान त्याने होमगार्ड मध्येही काम केले .1941 ते 43 मध्ये बी. बी .सी .साठी प्रचाराचे काम केले. पुढे 1943 साली “ट्रिब्यून”, या साप्ताहिकाचे संपादक झाले .रशियन राज्यक्रांतीवरील उपरोध प्रचूर रूपक, अनेक टीकात्मक लेखसंग्रह , स्पेन मधील यादवी युद्धाचे अनुभव आणि कादंबऱ्या असे बरेच लिखाण झाले. त्याने लिखाणात कल्पनाधारीत, तत्वनिष्ठ पत्रकारिता, समीक्षा, काव्य असे अनेक लेखन प्रकार हाताळले.
17 ऑगस्ट 1945 साली , इंग्लंडमध्ये आणि एक वर्षानंतर अमेरिकेत , त्याची ” ॲनिमल फार्म ” ही (रुपक )कादंबरी प्रकाशित झाली. 1949 मधे एक दीड वर्ष खर्च करून “1984” हे कादंबरी प्रकाशित झाली .या दोन कादंबऱ्यांनी सर्वत्र खळबळ उडवून दिली. जर्मनीचा पाडाव झाला .आणि स्टॅलिनने रशियाला वाचवले. त्याविरुद्ध लिहिण्याची कोणाची ताकद नव्हती .सरकार आणि व्यवस्थेचा भीतीचा पगडा, विचारांची घुसमट त्याने प्रकट केली आहे. ” ॲनिमल फार्म ” हे एक भाष्य आहे. संपूर्ण कादंबरी रशियन राज्यक्रांतीचे हुबेहूब रूपक आहे. झारशाही विरुद्ध होणारे रशियन बंड उत्तमरीत्या साकार केले आहे .त्याचा एकाधिकारशाहीला विरोध होता. आणि सामाजिक विषमतेबद्दल प्रचंड चिड होती .लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजवादावर त्याचा विश्वास होता. एका शेतातली प्राण्यांची राजनीतिक कथा ,पण स्टॅलिनच्या राज्यक्रांती, जनतेचा विश्वासघात ,स्वार्थीपणा यावर ही रूपकात्मक कादंबरी आहे . स्टॅलीनचा
तो टीकाकार होता. ब्रिटिश बुद्धिजीवींनी, स्टॅलीनचा उच्च आदर केलेला त्याला पटला नव्हता . त्याचे लेखन तत्त्वज्ञान हे सत्या.चा शोध घेण्याची संबंधित होते. मार्क्सवाद्यांना त्याचे लेखन पटले नाही .या कादंबरीवर त्यांनी आक्रमण केले. आणि अनेक दिवस या कादंबरीवर बंदी आली. दोन कादंबऱ्यांनी त्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली. 1995 मध्ये त्याला w. H. Smith अँड penguin बुक्स ऑफ द सेंचुरी पुरस्कार मिळाला.1950 पर्यंत इंग्लंड मध्ये 25 हजार 500 आणि अमेरिकेत पाच लाख 90 हजार प्रति होत्या. या आकडेवारीवरून या पुस्तकाचे यश लक्षात येते. टाईम मॅगेझिनने इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक म्हणून ती निवडली. सर्व युरोपियन भाषा, पर्शियन, आइसलैंडिक, तेलगू भाषांमध्ये या कादंबरीचे भाषांतर झाले आहे. ” ॲनिमल फार्म ” आणि ” 1984 ” या दोन प्रसिद्ध साहित्य कृतीनी विसाव्या शतकात खपाचा उच्चांक गाठला होता. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. जॉर्ज ऑरवेलला केवळ 46 वर्षांचे इतके अल्प आयुष्य लाभले . 21 जानेवारी 1950 मध्ये लंडनमध्ये त्याचे निधन झाले.
माणूस जन्माला यायच्या आधी पासून साठा त्याच्याशी निगडीत आहे. मुलं जन्माला यायच्या आधी पासूनच आई त्याच्या साठी कपड्यांचा साठा करते. जन्मानंतर जसे वय वाढते आपण वेगवेगळ्या गोष्टीचा साठा करत जातो.
लहानपणी रेल्वेची तिकिटे, शंख शिंपले, बाटल्यांची झाकणे, रंगीत कागद, टरफले, काचांचे तुकडे अश्या विविध गोष्टी आपण साठवतो.
जसे वय वाढते साठवण्याचे प्रकार बदलत जातात.
शाळेत जायला लागलो की झाडाची पाने, वर्तमान पत्रातील व मासिकातील आवडीची कात्रणे, रंगीत सागरगोटे, स्टिकर्स, पत्ते, खोडरबर, पेन्सिली अश्या अनेक गोषटींबाबत आवड निर्माण होते.
तरुणपणी सौंदर्य सामुग्रिंचा साठा, कानातली, बांगड्या, टिकल्या, अत्तर, रुमाल, काही आवडत्या व्यक्ती चे फोटो, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, चपला व पुस्तकांचा आपण साठा करत असतो.
मधल्या वयात ह्यात आणखी बदल आढळतो जसे की सासरी गेलेल्या मुलीकडे नवीन कपडे, दागिने, भांडी, पर्स सारेच नवे नवे आणि हवे हवे असे असते.
पन्नाशीच्या आसपास हा साठा अजून बदलतो. पूर्वी बायका धान्याचा साठा करायच्या, तळणीच्या पदार्थांचा साठा नाहीतर मसाल्यांचा साठा करायच्या. स्वयंपाक घरात डब्यात पैस्यांचा साठा असायचा.
पन्नाशीच्या बायकांचा तर साड्या, दागिने, घरातील भांडी ह्यांचा साठा आपोआप झालेलाच असतो. त्यात अजून नाविन्य पूर्ण वस्तूंचा भर पडतो. पुरुषांच्या बाबतीत जसे की कपडे, चपला, पुस्तके, पेन व पाकिटं ह्या वस्तूंचा साठा आढळतो.
जसे जसे वय वाढते तसे तर आपण आपल्याकडचा साठा कमी करायला पाहिजे पण तो वाढतच जातो मग तो पैश्याचा असो नाहीतर आणखी काही.
वृद्ध व्यक्ती औषधांचा साठा करतात. त्यातील काही पुस्तकांचा, छायाचित्रांचा तर काही वर्तमान पत्राच्या कात्रणांचासंग्रह करतात. काहिंकडे पिशव्या, टॉवेल आणि पैष्यांचा साठा असतो.
नवीन पिढीला वस्तु साठवायला आवडत नाही. ते जुन्या वस्तू काढून नव्या घेत असतात. म्हणजे जुना साठा संपतो आणि नवीन वस्तूंचा साठा सुरू होतो.
असा सर्व गोष्टींचा साठा करत एक दिवस जेव्हा आपल्याला हे जग सोडून जायची वेळ येते तेव्हा आपण आयुष्यभर जपलेल्या ह्या वस्तू दुसऱ्यांसाठी निरुपयोगी ठरतात.
कधी कधी विचार येतो माणसाला सर्व वस्तू वर घेवून जाता आले असते तर त्याने किती वस्तु साठवल्या असत्या.
खरं तर आपण चांगल्या विचारांचा, कृतींचा आणि आरोग्याचा साठा केला तर आपण आपले आयुष्य अधिक सुखकारक रित्या जगू शकू……
☆ “या जन्मावर शतदा प्रेम करावे…” ☆ सौ राधिका भांडारकर☆
या जन्मावर शतदा प्रेम करावे.
सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की, या विषयावर लेख लिहिताना माझी भूमिका उपदेश करण्याची नक्कीच नाही. हे करा, ते करा, असे करावे, असे वागावे, सकारात्मक काय, नकारात्मक काय असे काहीही मला सांगायचे नाही. कारण माझी पक्की खात्री आहे की जे लोक दुसऱ्याला सांगण्याचा किंवा उपदेश करण्याचा अधिकार गाजवतात, त्यांना एक श्रेष्ठत्वाची भावना असते आणि जी अहंकारात परावर्तित होते आणि तिथेच त्यांच्या आनंदी जगण्याची पहिली पायरीच कोसळते.
“या जन्मावर शतदा प्रेम करावे” हा ही एक सल्लाच आहे खरंतर. पण तो पाडगावकरांसारख्या महान कवीने अत्यंत नम्रपणे दिलेला आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाला मान देऊन मी फक्त माझ्या जगून झालेल्या आयुष्यात मी खरोखरच जगण्यावर प्रेम केले का या प्रश्नाचे फक्त उत्तर शोधणार आहे. आणि ते जर “हो” असेल तर कसे,आणि त्यामुळे मला नक्की काय मिळालं एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी तुमचं जीवन तुमचं जगणं यात मला ढवळाढवळ अजिबात करायची नाही.
जीवन एक रंगभूमी आहे, जीवन म्हणजे संघर्ष, जीवन म्हणजे ऊन सावली, खाच खळगे, चढ उतार, सुखदुःख,शंभर धागे, छाया प्रकाश असे खूप घासलेले, गुळगुळीत विचारही मला आपल्यासमोर मांडायचे नाहीत. कारण मी एकच मानते जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे. आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असूच शकतो. त्यामुळे आता या क्षणी तरी मी कशी जगले, हरले की जिंकले, सुखी की दुःखी, निराश की आनंदी, माझ्या जगण्याला मी न्याय दिला का, मी कुणाशी कशी वागले, कोण माझ्याशी कसे वागले या साऱ्या प्रश्नांकडे मी फक्त डोळसपणे पाहणार आहे. नव्हे, माझ्या आयुष्यरुपी पुस्तकातले हे प्रश्न मी स्वतःच वाचणार आहे.
७५ वर्षे माझ्या जीवनाच्या इनबॉक्समध्ये कुणी एक अज्ञात सेंडर रोजच्या रोज मला मेल्स पाठवत असतो. त्यातल्या मोजक्याच मेल्सकडे माझं लक्ष जातं आणि बाकी साऱ्या जंक मेल्स मी अगदी नेटाने डिलीट करत असते. आणि हे जाणत्या वयापासून आज या क्षणापर्यंत मी नित्यनेमाने करत आहे. आणि याच माझ्या कृतीला मी “माझं जगणं” असं नक्कीच म्हणू शकते.
मला माहित नाही मी आनंदी आहे का पण मी दुःखी नक्कीच नाही. त्या अज्ञात सेंडरने मला नित्यनेमाने माझ्या खात्यातील शिल्लक कळवली, सावधानतेचे इशारे दिले, कधी खोट्या पुरस्कारांचे आमीष दाखवून अगदी ठळक अक्षरात अभिनंदन केले, कधी दुःखद बातम्या कळवल्या, कधी सुखद धक्के दिले, अनेक प्रलोभने दाखवली, अनेक वाटांवरून मला घुमवून आणलं, दमवलं, थकवलंही आणि विश्रांतही केलं. पण त्याने पाठवलेली एकही मेल मी अनरेड ठेवली नाही. कधी व्हायरसही आला आणि माझे इनबॉक्स क्रॅशही झाले. मी मात्र ते सतत फॉरमॅट करत राहिले.
CONGRATULATIONS! YOU HAVE WON!
हा आजचा ताजा संदेश. या क्षणाचा.
पण हा क्षण आणि पन्नास वर्षांपूर्वीचा एक क्षण याचं कुठेतरी गंभीर नातं आहे याची आज मला जाणीव होत आहे.
पन्नास वर्षांपूर्वी मी एका भावनिक वादळात वाहून गेले होते. एका अत्यंत तुटलेल्या, संवेदनशील अपयशामुळे खचून गेले होते. माझा अहंकार दुखावला होता, माझी मानहानी झाली होती, मला रिजेक्टेड वाटत होतं.
घराचा जिना चढत असताना एक एक पायरी तुटत होती. दरवाजातच वडील उभे होते. त्यांची तेज:पूंज मूर्ती, आणि त्यांच्या भावपूर्ण पाणीदार डोळ्यांना मी डोळे भिडवले तेव्हा त्यांनी मूक पण जबरदस्त संदेश मला क्षणात दिला,
” धिस इज नॉट द एन्ड ऑफ लाईफ. खूप आयुष्य बाकी आहे. बघ, जमल्यास त्या “बाकी” वर प्रेम कर आपोआपच तुला पर्याय सापडतील.”
वडील आता नाहीत पण ती नजर मी माझ्या मनात आजपर्यंत सांभाळलेली आहे. आणि त्या नजरेतल्या प्रकाशाने माझे भविष्यातले सगळे अंधार उजळवले. तेव्हांपासून मी जीवनाला एक आवाहन समजले. कधीच माघार घेतली नाही. क्षणाक्षणावर प्रेम केले. फुलेही वेचली आणि काटेही वेचले. कधीच तक्रार केली नाही.
महान कवी पर्सी शेले म्हणतो
We look before and after,
And pine for what is not:
Our sincerest laughter
With some pain is fraught;
Our sweetest songs are those that tell of saddest thought.
शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातील काळे सरांनी शिकवलेली ही कविता हृदयाच्या कप्प्यात चिकटून बसली आहे. तेव्हां एवढाच अर्थ कळला होता की,
“आपण मागे आणि पुढे बघतो आणि नसणाऱ्या,न मिळालेल्या गोष्टींवर दुःख करतो आणि या दुःखी भावनेवर आपण आपलं सारं हास्यच उधळून लावतो. मग आपले जीवन गाणे हे फक्त एक रडगाणे होते.
जगत असताना, पर्सी शेलेच्या या सुंदर काव्यरचनेतला एक दडलेला उपहासात्मक अर्थ आहे ना, त्याचा मागोवा घेतला आणि नकळतच कसे जगावे, जगणे एक मधुर गाणे कसे करावे याची एक सहज आणि महान शिकवण मिळाली. लिव्ह अँड लेट लिव्ह हे आपोआपच मुरत गेलं.
चार्ली चॅपलीन हे माझं दैवत आहे. तो तर माझ्याशी रोजच बोलतो जणू! मी थोडी जरी निराश असले तर म्हणतो,” हसा! हसा! भरपूर आणि खरे हसा. दुःखांशी मैत्री करा,त्यांच्यासमवेत खेळायला शिका.”
एकदा सांगत होता,” मी पावसात चालत राहतो म्हणजे माझ्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत.”
“अगं! मलाही आयुष्यात खूप समस्या आहेत पण माझ्या ओठांना त्यांची ओळखच नाही ते मात्र सतत हसत असतात.”
गेली ७५ वर्ष मी या आणि अशा अनेक प्रज्वलित पणत्या माझ्या जीवनाच्या उंबरठ्यावर तेवत ठेवल्या आहेत ज्यांनी माझं जगणं तर उजळलं पण मरणाचीही भिती दूर केली.
परवा माझी लेक मला साता समुद्रा पलीकडून चक्क रागवत होती.
“मम्मी तुझ्या मेल मध्ये फ्रेंड चे स्पेलिंग चुकले आहे. तू नेहमी ई आय एन डी का लिहितेस? इट इज एफ आर आय ई एन् डी.”
ज्या मुलीला मी हाताचे बोट धरून शिकवले ती आज माझ्या चुका काढते चक्क! पण आनंद आहे, मी तिला, “टायपिंग मिस्टेक” असं न म्हणता म्हटलं,
“मॅडम! मला तुमच्याकडून अजून खूपच शिकायचे आहे. तुम्ही नव्या तंत्र युगाचे,आजचे नवे शिल्पकार. त्या बाबतीत मी तर पामर, निरक्षर.”
तेव्हा ती खळखळून हसली. तिच्या चेहऱ्यावरचा हा दोन पिढ्यांमधला अंतर संपवून टाकणारा आनंद मला फारच भावला.
तेव्हा हे असं आहे. तुम्ही असं जगून पहा, शंभर वेळा प्रेम करा जीवनावर.
सॉरी! असा उपदेश मी तुम्हाला करणार नाही कारण मला तो अधिकारच नाही. मी फक्त माझा अनुभव सांगितला बाकी मर्जी तुमची.
नाव विचित्र वाटते ना? पण या मामांचा घेतलेला अनुभव सांगते,मग तुम्हालाही पटेल.तर गंमत अशी झाली परवा ( हे आपले म्हणायचे.शब्दशः घ्यायचे नाही.) घरा बाहेर पडले माझ्याच नादात आणि काही कळण्या पूर्वी एकदम हल्लाच झाला.अचानक डोक्यावर टप टप कशाचे तरी वार होऊ लागले.मी एकदम घाबरुनच गेले.वर बघते तर कावळे महाराज डोक्यावर अजून मार देण्याच्या प्रयत्नात होते.कशीबशी पुढे गेले.मनात नाना विचार.आता कावळा अंगावर आला काही अशुभ घडेल का? इतके विचार आले की मी पार याची डोळा ( मनातच हं ) मरण पण बघितले.पुन्हा घरी आल्यावर हे महाराज स्वागताला हजरच.घरात पण जाऊ देई ना.कुलूप उघडून घरात जाईपर्यंत पाठलाग केला.कशीतरी घरात गेले.नंतर समजले आज हा प्रसाद घरातले,शेजारचे,आमच्या घरा समोरून जाणाऱ्या प्रत्येकाला मिळाला होता.मग जरा निरीक्षण केले तर त्या कावळीणीचे पिल्लू खाली पडले होते.आणि त्याच्या रक्षणासाठी ती आमच्यावर हल्ला करत होती.
मग आधीचे काही दिवस आठवले,थोडे गुगलले आणि सगळे लक्षात आले.काही दिवसांपूर्वी वसंत ऋतूत कोकीळ कुजन चालू असते.तेव्हा हे कावळे घरटे ( झाडाच्या अगदी टोकावर उंच ) तयार करतात.यांची अंडी घरट्यात विराजमान झाली की कावळीणीचे काम असते.त्यात ही कोकीळ जोडी त्यांच्या घरट्या भोवती कर्कश्श ओरडुन त्यांना मागे यायला भाग पाडतात.कोकीळ त्यांना लांब घेऊन जातो.आणि कोकिळा कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालते.जेवढी अंडी घालते तेवढी कावळ्याची अंडी खाली ढकलून देते.नंतर दुसरे घरटे शोधायला निघतात.आणि कावळ्याची जोडी त्या अंड्यांची निगुतीने काळजी घेतात.आमच्याही दारातील अशोकाच्या झाडावर हेच झाले होते.यथावकाश कावळ्याने पिल्लांना उडायला शिकवले.ते पण अगदी बघण्या सारखे होते.पिल्लू घरट्याच्या काठावर येऊन बसले की त्यांची आई पिल्लांना ढकलून देत असे.थोडा वेळ होलपटून ते पिल्लू छान गिरकी घेऊन उडत असे.हे सगळे बघणे मोठीच पर्वणी होती.त्यातच हे कोकीळेचे आळशी पिल्लू होते.त्याला ढकलल्या नंतर ते धप्पकन खाली पडले आणि आम्ही त्याला इजा करू नये म्हणून आपले मामा चे कर्तव्य पार पाडत,हे मामा आम्हाला डोक्यात चोचीने मारत होते.
अखेरीस एक दिवस ते पिल्लू उडाले आणि कावळे मामा कृतकृत्य झाले.ते पिल्लू लांब जाऊन बसले आणि कुहूकुहू करू लागले.
ही पक्ष्यांची गंमत बघताना आश्चर्य वाटून गेले.अवती भोवतीचा निसर्ग किती वास्तविकता दाखवतो.
जसा कावळा दरवर्षी फसतो तसेच आम्ही पण दरवर्षी कावळे मामांचा प्रसाद खातो.
अर्धवट झोपेत जाणवले की गाडी थांबली आहे. रात्री ११ वाजता नाशिक फाट्याला गाडीत बसल्यापासून ड्रायव्हरने दोन तीन वेळा चहापाण्यासाठी गाडी थांबवली होती. तशीच थांबली असेल असे वाटले. खिडकीतून बाहेर नजर टाकली अन दिसला एक डोंगर आणि वरपर्यंत गेलेली दिव्यांची रांग. पहाटेचे चार वाजत होते. शेजारी झोपेत असलेल्या मिनीला उठवलं आणि सांगितलं, “मिने, आलं कळसूबाई”. कळसूबाईच्या पायथ्याशी असणारं नगर जिल्ह्यातलं अकोला तालुक्यातलं बारी नावाचं गाव होतं ते. तिथून २०-२५ मिनिटं थोड्या चढाच्या रस्त्याने चालत निघालो.
मागे घर पुढे मोकळी जागा अशा बर्याच गडांवर टिपिकल रूपात दिसणार्या एका हाॅटेलमध्ये गेलो, हाॅटेल सह्याद्री त्याचं नाव. तिथे पोहे चहा घेऊन अंधारातच साडे तीनला चालायला सुरवात केली. पायथ्यापासून दिसणारी डोंगरावरची दिव्यांची रांग पाहून असं वाटलं होतं की तेवढंच चढायचं आहे, पण नंतर लक्षात आलं की तो पूर्ण डोंगराचा अगदी छोटासा टप्पा आहे. ओबडधोबड पायर्या होत्या, काहीची उंची फुटापेक्षा जास्त होती. बारीक बारीक दगडगोट्यांवरून पाय घसरत होते. मी तीन चार वेळा सह्याद्रीला लोटांगण घातलं. अफाट दम लागत होता. स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. पण महाराष्ट्राच्या सर्वोच्य ठिकाणी पोहचायचे आहे या जिद्दीने फक्त एकएक पावलावर लक्ष देऊन मार्गक्रमणा चालू होती. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंच असलेल्या कळसूबाई शिखराचं वैशिष्ठ म्हणजे अगदी टोकाला पोहचल्याशिवाय खालून कुठूनही तिथला पिकपाॅईंट, कळसूबाईचं मंदिर दिसत नाही. आता बर्याच ठिकाणी रेलिंग बसवली आहेत. एकुण चार ठिकाणी लोखंडी शिड्या उभारल्या आहेत. त्यामुळे चढाई बरीच सोपी झाली आहे. पण इतक्या उंचीवर देवळाचे बांधकाम कसे केले असेल, पूर्वी लोकं देवीच्या दर्शनाला कशी जात असतील याचं आश्चर्य वाटतं.डोंगराच्या पायथ्याशी असणार्या गावात शुभकार्याची सुरवात देवीच्या दर्शनाने होते. त्यामुळे स्थानिक लोकांची तिथे बर्यापैकी ये जा असते. चालत असताना वर एक टप्पा दिसायचा आणि वाटायचे की तिथेपर्यंत पोहोचलो की झाले. पण तिथे पोहोचलो की कळायचे की अजून वर चढायचे आहे. असे भ्रमनिरास दूर करत एकएक टप्पा पूर्ण करत शेवटी त्या सर्वोच्य ठिकाणावर पोहोचलो. सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मी मनातल्या मनात गाऊ लागले “आज मैं उपर,महाराष्ट्र नीचे”. महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणी पोहचल्याचा आनंद, तिथून चारी बाजूने खाली दिसणारे विहंगम दृष्य याचे वर्णन मला पामराला अशक्यच आहे. थोड्यावेळाने खाली उतरायला सुरुवात केली. चढण्यापेक्षाही उतरणे अवघड असणार याची कल्पना होती, आणि तसेच झाले.काही ठिकाणी तर बसून उतरावे लागले. उन्हाचे चटके बसत होते. लोखंडी शिड्या व रेलिंग तापले होते, पण त्यांचे चटके सहन करणे अनिवार्य होते. माझा थकला भागला जीव शेवटी हाॅटेल सह्याद्री पर्यंत पोहोचला. तांदळाची भाकरी, पिठंल, वांग बटाट्याची भाजी, मिरचीचा ठेचा, वरण भात असा फक्कड बेत होता. जेवण खरंच चवदार होते. त्या हाॅटेलचे मालक तानाजी खाडे दादांनी कळसूबाई देवीची माहिती सांगितली. छानच बोलले ते. तृप्त मनाने, अभिमानाने परतीचा प्रवास सुरू झाला. आॅगस्ट महिन्यात परत तुला भेटायला रायगडावर येईन असे सह्याद्रीसमोर नतमस्तक होऊन वचन दिले. परतीचा प्रवास जोरदार अंताक्षरीने अगदी मजेचा झाला.गंमत म्हणजे ११ जून म्हणजे किरण ईशानच्या लग्नाचा वाढदिवस. पुण्यात आल्यापासून मी इथे आहे तर तुम्ही दोघे ११ जूनला कुठेतरी बाहेर जा असे मी म्हणत होते, पण झाले उलटेच. अचानक ध्यानीमनी नसताना माझेच ट्रेकला जायचे ठरले. अर्थात याचे श्रेय नक्की मिनीचेच. ११ जूनला श्रीराम ट्रेकर्स या ग्रुपतर्फे केलेला हा ट्रेक म्हणजे किरण ईशानला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाठी मी दिलेली गिफ्ट आहे असे मला वाटते.
माझ्या पाटनूर गावच्या पंचक्रोशीतील दोन तरुण, पुण्याच्या कोर्टात अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना भेटण्यासाठी मी त्या दिवशी गेलो होतो. दोघे कामात होते. दोघांनीही थांबा थोडा वेळ, असा इशारा केला. मी कोर्टाच्या बाहेर आलो. बाहेर येणारे- जाणारे कैदी, भेटायला येणारे नातेवाईक, पोलिस, त्या कोर्टातली गर्दी किती मोठी… बापरे!
रागाच्या आणि इगोच्या, अहंकाराच्या भरात कायदा हाती घेणाऱ्या त्या प्रत्येकाला वाईट वाटत असेल; पण वेळ निघून गेल्यावर काही होणारे नव्हते. कैद्यांचे, सतत कोर्टाच्या पायऱ्या चढून सुकलेले डोळे आता वेळ निघून गेली, असेच सांगत होते. ते वातावरण कोर्टाची पायरी कुणीही चढू नये, असेच सांगत होते.
कोर्टात मागच्या बाजूला माझी नजर गेली. एक लहान मुलगी एका मुलाला राखी बांधत होती. माझ्या मनात विचार आला आता जवळपासही राखी पोर्णिमा नाही; तरीही ही मुलगी राखी का बांधत असेल? बाजूला एक चहावाला ते सारे दृश्य पाहून खांद्यावर टाकलेल्या रुमालाने, स्वतःचे डोळे पुसत होता. मी अजून बारकाईने पाहिले. एका बाजूने एक माणूस आणि दुसऱ्या बाजूला एक महिला दोघेजण बसले होते.
मी त्या चहावाल्याला विचारले “का रडताय तुम्ही? काय झाले?”
तो म्हणाला, “काय व्हायचे आहे साहेब, आम्ही दिवसभर कोर्टात असतो ना, आम्हाला पावलोपावली कलियुगाचे दर्शन होते.”
“तुम्ही ज्या मुलांकडे बघून रडताय ती कोण आहेत?”
चहावाला म्हणाला, “ते बाजूला एकमेकांच्या तोंडाकडे न पाहणारे नवरा-बायको आहेत ना, त्यांची ही मुले आहेत. यांच्या भांडणापायी या मुलांचा त्रास पाहवत नाही.” माझ्याशी एवढे बोलून चहावाला आपल्या कामात गुंतला.
त्या मुलांकडे बघून मलाही खूप वाईट वाटत होते. ती महिला उठली आणि चहा घ्यायला मी जिथे थांबलो होतो तिथे आली. तिने चहा घेतला आणि तिथूनच मुलाला ‘चल आता निघायचे,’ असा आवाज देत होती. त्या महिलेने त्या चहावाल्याकडे पहिले आणि त्याला म्हणाली, “कारे चहा चांगला करता येत नाही का? फुकट पैसे घेतोस का?” त्या बाईचे बोलणे ऐकून त्या चहावाल्याचा चेहरा एकदम पडला.
मलाही त्या बाईला काहीतरी बोलायचे होते; पण हिंमत होईना. त्या बाईसोबत एक म्हातारी बाई होती. जेव्हा ती बाई फोनवर होती तेव्हा मी त्या म्हाताऱ्या बाईला म्हणालो, “आजी, तुम्ही त्या ताईच्या आई का?”
त्या ‘हो’ म्हणाल्या. हळूहळू मी तिला बोलते केले. तो मुलगा, मुलगी आजीकडे आले. आजीने मुलीच्या पाठीवरून हात फिरवत जा म्हणत निरोप दिला. आता तो मुलगा, जाणार इतक्यात मी त्या चहावाल्याच्या बरणीतले दोन चॉकलेट बाहेर काढले आणि त्या मुलांच्या हातात ठेवले.
मुलगी नम्र होती. मुलगा जरा बेशिस्त होता. कोर्टात त्या दोघांनाही पुकारा झाला, त्या मुलांचे आईवडील दोघेही कोर्टात गेले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते.
ते गेल्याचे पाहताच मी, त्या आजी, ती दोन मुले, मध्येमध्ये तो चहावाला, असे आम्ही बोलत होतो. ‘देव देतो आणि कर्म नेते’ अशी कहाणी या कुटुंबाची होती. त्या आजी सांगत होत्या आणि आम्ही ऐकत होतो.
डॉ. मीरा देशमुख, डॉ. रमेश कांबळे (दोघांची नावे बदलली आहेत) या दोघांनी कॉलेजला असताना पळून जाऊन लग्न केले. लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा प्रचंड विरोध होता. दोन मुले झाली तोपर्यंत यांचे चांगले होते; पण पुढे छोट्या छोट्या कारणावरून भांडणे व्हायला लागली. ही भांडणे जीव घेण्यापर्यंत गेल्यावर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
विभक्त झाल्यावर पोटगी देण्यावरून खूप वादंग झाले, ते
आजही कोर्टात सुरू आहेत. मुलगी सरिता बापाकडे राहते आणि मुलगा सचिन आईकडे. त्या आजीने बोलता बोलता अगदी थोडक्यात सारी कहाणी सांगितली.
ती आजी माझ्याशी बोलत असताना ती मुले एकमेकांशी बोलत होती. मुलगी म्हणाली, ‘दादा तू मला घरी भेटायला येशील ना?
मुलगा ‘मी नाही सांगू शकत, मम्मी काय म्हणेल, सुट्टी मिळेल का नाही, माहिती नाही’.
बिचारी मुलगी त्या मुलाचा नकारार्थी सूर ऐकून एकदम नाराज झाली. तो मुलगा जाग्यावरून उठला, त्या मुलीजवळ जाऊन म्हणाला, “अगं तायडे नाराज नको होऊ. मी येण्याचा प्रयत्न करीन ना?”
मुलगी पुन्हा म्हणाली, “मागेतर वर्षभर आला नाहीस ना?”
त्या दोघांचा तो भावनिक संवाद आणि संवादाशेवटी एकमेकाला मिठी मारत रडलेला तो क्षण पाहून आता काळजाचे ठोके बंद पडतात की काय, असे वाटत होते. ती मुले, आणि आम्ही सारे अक्षरशः रडत होतो.
ती आजी म्हणाली, “या कोर्टाच्या चकरा मारून खूप कंटाळा येतो. अगोदर माझी मुलगी आणि जावई या दोघांच्याही पाया पडून सांगितले होते, लग्न करू नका. आता यांनी केले, तर ते निभावून तरी दाखवावे ना..! यांची रोज होणारी भांडणे, पाहून मुले पोटाला येऊच नाही, असे वाटते.
मुलीने दुसऱ्या जातीचा नवरा केला म्हणून आमचे नाक कापले, दोन मुले झाली आता दुसरे लग्न करायचे आहे, असे दोघेही म्हणतात, पहिल्या लग्नाला न्याय देता आला नाही, दुसऱ्याला काय देणार.
आम्ही अडाणी माणसे. लग्नाच्या वेळी एकमेकांना पहिलेदेखील नव्हते. ही जेवढी शिकलेली आहेत, तेव्हढी ही माणसे वेड्यासारखी वागतात. लग्नामध्ये विधीच केल्या नाहीत, संस्कृती, परंपरा पाळल्या नाहीत, यांचे लग्न टिकणार कसे?” आजी अगदी पोटतिडकीने सांगत होत्या.
कोर्टात गेलेले ते दोघेजण पडलेला चेहरा घेऊन बाहेर येताना दिसताच त्या दोन्ही लहान मुलांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. आता आपण एकमेकांना सोडून जाणार, याची खात्री त्यांना झाली. त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. ते दोघे जसे त्या मुलांजवळ आले, तसे ती महिला त्या मुलाला आणि त्या माणसाने त्या मुलीला धरून ओढले. त्या दोन्ही मुलांची ती ताटातूट पाहवणारी नव्हतीच. ते दृश्य पाहून चहावाला मामा पुन्हा रडताना मला दिसला.
त्या लहान मुलाला घेऊन ती महिला तिच्या आईला म्हणाली, ‘माझे पैसे वेळेवर दे नाहीतर जेलमध्ये जावे लागेल, असे न्यायालयाने खडसावले त्याला’, असे डोळ्यात अहंकाराचे आव आणून ती सांगत होती.
त्या छोट्या मुलाला घेऊन असलेला तो माणूस त्या तावातावाने बोलणाऱ्या बाईकडे रागारागाने पाहत होता. ती बाई, तिची आई आणि तिचा मुलगा तिथून गेला. तो माणूस आपल्या मुलीला घेऊन त्या चहावाल्याकडे आला त्याने चहा मागितला. तो माणूस एका हाताने चहा पीत होता आणि त्यांच्या दुसऱ्या हातात त्यांची असलेली मुलगी अजून तिचा भाऊ परत येईल, या आशेने तो गेलेल्या त्या वाटेकडे पाहत होती.
मी त्या माणसाला म्हणालो, “मुलांचे फार प्रेम आहे एकमेकांवर.”
मी बोलताच त्या माणसाने माझ्याकडे पाहिले. तो काहीही बोलला नाही, एकदम शांत बसला. मी आणि तो चहावाला एकमेकांशी बोलत होतो. तो चहावाला त्या माणसाकडे बघत म्हणाला, “याची पत्नी जेव्हा जेव्हा येते तेव्हा खूप गोंधळ घालते आणि हे नेहमी शांत बसलेले असतात.”
तो माणूस अगदी शांतपणे म्हणाला, “एक दोन वेळा बोललो होतो. त्यामुळे एवढी स्थिती निर्माण झाली. माझ्या बायकोला काही सांगायचे म्हणजे कठीणच आहे. आमचे भांडण जातीवरून व्हायचे. लग्नाच्या आधी एकमेकांची जात काढायची नाही, असे ठरवले होते; पण छोट्या छोट्या भांडणामध्ये जात निघायची आणि हेच भांडण पुढे वाढत गेले.”
मी म्हणालो “आज न्यायालयात काय झाले साहेब?”
ती व्यक्ती म्हणाली, “न्यायालयाने पोटगी वेळेत द्या, ठरलेली रक्कम का देत नाही, नाही दिली तर शिक्षेला सामोरे जा, असे सांगितले.”
मी पुन्हा म्हणालो, “मग तुम्ही काय म्हणालात?”
“मी काय म्हणणार त्यांना, देण्याचा प्रयत्न करणार एवढे म्हणालो.”
त्या व्यक्तीने मला प्रतिप्रश्न केला “अहो माझ्याकडे नाहीच तर मी देऊ कसे? जे काही होते ते सर्व बायकोच्या नावे होते. मी हे खूप ओरडून सांगितले, पण माझे ऐकले गेले नाही.
पोटगीच्या नावाने मला खूप मोठी रक्कम द्या, असे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून माझी मुलगी आजारी आहे. तिची शाळा, या सगळ्या कामात मी कामच केले नाही, तर पैसे येणार कुठून? माझी बायको मोठी डॉक्टर असून मलाच तिला पैसे द्या, असे सांगण्यात आले. सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत.”
त्या व्यक्तीचे बोलणे ऐकूण मी शांत होतो. तो चहावाला एकदम म्हणाला, “रोज येथे असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. सगळ्यांचा इगो इथे दिसतो? बाकी काही नाही?”
ती लेक आणि बाप हळुवार पावलांनी तिथून गेले. त्या मुलीच्या डोळ्यात भाऊ आणि आईविषयी प्रचंड प्रेम दिसत होते.
मी ज्या मित्राची वाट पाहत होतो, ते आपाराव आणि संजय एक एक करून दोघेही आले. चहाचा एक एक घोट घेत आज कोर्टात काय झाले, ते सांगत होते. पहिला म्हणाला, “आज पोटगीच्या चार केस आल्या होत्या, कुठे महिलांचा द्वेष; तर कुठे पुरुष. सर्वांचे एकच असते, ते म्हणजे मीच खरा आहे. तिथे माणसे बोलतच नव्हते, त्यांचा इगो बोलत होता.” कोर्टातले ते सर्व वातावरण अत्यंत क्लेशदायक होते. दुसरा म्हणाला, “सर्व माणसे उच्च शिक्षित होती, कोणी नम्रपणे बोलायला तयार नाही. नवरा मुलगा कितीही गरीब असू द्या, त्याची परिस्थिती असो की नसो, पोटगीची रक्कम घेतांना त्याची कुणाला दया येतच नाही. आज दोन प्रकरणे तर अशी होती, अनेक वेळा समन्स पाठवूनही महिलेला पैसे दिले जात नाहीत. इतकी वर्षे सोबत राहून एकमेकांची तोंडे पाहणारच नाही, अशी भूमिका माणसे कशी काय घेऊ शकतात?”
मी दोन दिवसांपूर्वी राज्याचा रेषो पाहिला आणि हैराण झालो. पोटगी आणि घटस्फोट हा विषय सर्वच ठिकाणी गंभीर होऊन बसला आहे. चहावाला म्हणतो, “या कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रत्येक माणसाने मागच्या जन्मी अहंकारातून मोठे पाप केले असणार.”
पोटगीसंदर्भात जे काही वातावरण आणि किस्से होते, त्याने मी हादरून गेलो होतो. काय ती माणसे आणि काय त्यांचे जीवन! सर्व काही ईगोच्या रोगाने त्रासून गेलेले होते. आम्ही कोर्टातला तो विषय कट करून बाकी विषयावर बोलत होतो, पण माझे सर्व लक्ष पोटगी या विषयाकडे लागले होते.
आम्ही कोर्टातून बाहेर पडलो, ज्याच्या त्याच्या कामाला लागलो. कामात खूप व्यस्त झालो, तरी ती इगोवाली माणसे आणि त्या लहानग्याचा रडका चेहरा काही डोळ्यासमोरून काही जात नव्हता. कधी थांबणार हे कायमस्वरूपी?
(आजचा हा लघुलेख स्वतः लेखक श्री. संदीप काळे, संपादक, मुंबई सकाळ, यांच्या सौजन्याने.)
काय राव… तुम्ही कमालच केली की… दुपारची झोप पार उडवली की… किती गोंधळ झाला सगळ्यांचा… नाही म्हटलं तरी काकासाहेब काही बोलले असतीलच नं… पण आता हे निस्तरणार कसं…
अहो मी कशाला निस्तरायचं… म्हणजे मी काही सगळ्यांना आणि सगळं सोडलेलं नाही… आता मी नाही… असा समज काकांचा झाल्यावर सावरायचं कसं?… आणि मी पण आलोय याची जाणीव या दोघांना झाल्यावर आवरायचं कसं?… हा त्यांचा प्रश्न आहे. जे होईल ते त्यांनी निस्तरायचय आहे. मी नाही…. ते काय करतात हे बघायचं काम माझं…
पण आता जी आरडाओरड होईल त्याच काय?…
अरे आरडाओरड अगोदरही होती, आणि नंतरही होणार आहे. आरडाओरड सगळेच करतात. बऱ्याचदा तर संदर्भ सुध्दा तेच असतात. फक्त नांव बदलावी लागतात. अगोदर कौतुक केलं असेल तर आता करायचं नाही. आणि अगोदर कौतुक केलं नसेल तर आता करायला विसरायचं नाही. हे लक्षात घेतलं की संपलं. मी काही कमी आरडाओरड केली का?… चालायचंच.
अहो पण लोकं अगोदर तुमच्यासाठी फिरले, झटले त्याचं काय?….. असं काही जणं विचारतात. त्यांना काय सांगायचं?…
अरे मग मी काय वेगळं करतोय?… लोकं आमच्यासाठी झटतात, झगडतात पण आम्ही पण त्यांच्यासाठीच झगडतोय ना. विरोधात असलो तर चांगल्या कामासाठी झगडतो. आणि सत्तेत असलो तर चांगली कामं झगडल्याशिवाय होत नाहीत. अनेक अडथळे येतात, आणले जातात ते पार करावे लागतात. असंच सांगतो ना. मग फरक आहे कुठे?… झगडणं दोन्ही बाजूला आहेच की…
आणि तुमच्या झोपेचं ते काय कौतुक? आम्ही सकाळी सकाळी काही केलं तरी त्रास, दुपारी केलं तरीही त्रासच. आमच्या झोपेचा विचार करा की. यासाठी रात्र रात्र सुध्दा जागवाव्या लागतात याचा विचार करा जरा…
सारखं वेगवेगळ्या पद्धतीने गणित मांडावं लागतं. उत्तर थोडं कुठे चुकतंय असं वाटलं की परत नवीन पद्धत. बरं गणित मांडायचं पण आपणच आणि सोडवायचं पण आपणच… हे गणित बरोबर आहे का? असं कोणाला विचारावं हा सुद्धा काही वेळा प्रश्न असतो. कारण ज्याला विचारावं तोच यावरून स्वतः नवीन गणित मांडू शकतो. त्यामुळे समोरचा वेगळं गणित मांडणारा नसावा. हे पण बघावं लागतं. वाटतं तेवढं सोपं नसतं हे…
काकांच काय… “सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय” हे त्यांनीच लिहिलेलं पुस्तक त्यांच्याकडे आहे. प्रश्न आहे तो दुसऱ्या दोघांचा. ते कोणतं पुस्तक वापरतात हे बघायचं…
दुसरे दोघं म्हणजे कोण?… अगोदरचे की आता नव्याने जवळ केलेले…
परत तेच… मला गणित घालू नका. मी सांगितलं ना की गणित मांडायचं पण आपण आणि सोडवायच सुध्दा आपणच… चला निघतो. पुढची काही गणितं मांडून सोडवायची आहेत.
शब्दाची अंगभूत वैशिष्ट्येच त्या शब्दाला अर्थपूर्ण बनवतात. घन हा अगदी छोटा, अल्पाक्षरी शब्द याचं अतिशय समर्पक उदाहरण म्हणता येईल.
या शब्दाच्या एका रुढ अशा आणि अनेक प्रतिभासंपन्न कवींनी रसिकमनांत अधिकच दृढ केलेल्या एका अर्थाने तर या शब्दाचे थेट आकाशाशीच अतूट नाते निर्माण निर्माण केलेले आहे आणि याच शब्दाच्या दुसऱ्या अर्थाने हे नाते अधिकच घट्ट झालेले आहे. घन या शब्दाचे हे दोन्ही अर्थ परस्परवेगळे असूनही परस्परपूरकही ठरलेले आहेत हेच या शब्दाचं अंगभूत असं वेगळं वैशिष्ट्य आहे.
घन म्हणजे मेघ आणि घन म्हणजे घट्ट.म्हणजेच अप्रवाही.या दुसऱ्या अर्थाचं अप्रवाहीपण हे पहिल्या अर्थाच्या मेघाचं,ढगाचंही अंगभूत वैशिष्ट्य असावं हा निव्वळ योगायोग असेल तर तोही किती अर्थपूर्ण आहे याचे नवल वाटते!
मेघ हा या शब्दाचा रसिकमनांत रुजलेला काव्यमय अर्थ थेट माणसाच्या जगण्याशी,सुखदु:खाशी जोडलेला आहे हे खरेच.तथापी ‘घट्ट’ या दुसऱ्या अर्थाची व्याप्ती आणि घनताही घन या शब्दाचे मोल अधिकच वृध्दिंगत करते असे मला वाटते.गंभीर शब्दातील गांभीर्य अधिक गडद करायला ‘घनगंभीर’ या शब्दाला ‘घन’च सहाय्यभूत ठरतो.घनघोर हा शब्द युध्दाचे विशेषण म्हणून येतो आणि युध्दाची भयावहता अधिकच वाढवतो, तर जंगलाची व्याप्ती आणि नेमकं चित्र उभं करायला घनदाट शब्दाला पर्यायच नसतो. झांजा, टाळ,चिपळ्या, टिपऱ्या…. यासारख्या अनेक वाद्यांना सामावून घेणारा ‘घनवाद्य’ हा शब्दही फारसा प्रचारात नसला तरी आवर्जून दखल घ्यावी असाच.घन या शब्दाच्या सहाय्याने आकाराला आलेल्या अशा इतरही अनेक अर्थपूर्ण शब्दांनीच शब्दाशब्दांमधील परस्परसंबंध अधिकच दृढ केलेले आहेत एवढे खरे!
घन या शब्दांचे वर उल्लेख केलेले मेघ आणि घट्ट हे दोन्ही अर्थ या शब्दाला एक वेगळंच रुप बहाल करतात.घन हा एकच शब्द ‘मेघ’ या अर्थाने नाम तर दुसऱ्या अर्थाने विशेषणाचे भरजरी वस्र परिधान केलेला असा बहुगुणी शब्द बनतो!
घन हा शब्द नाम आणि विशेषण म्हणूनच नाही तर प्रत्यय म्हणूनही वापरला जातो.प्रत्यय म्हणून येताना तर तो स्वतःचं अनोखं वैशिष्ट्यही अधोरेखित करतो.प्रत्ययरुपात एखाद्या शब्दाच्या आधी जागा पटकावून घननीळ,घनदाट,घनघोर,अशा विविध विशेषणांना जन्म देणारा हा, प्रत्यय रुपात एखाद्या शब्दानंतर येत जेव्हा त्या शब्दाशी एकरुप होतो, तेव्हा आकाराला आलेली ‘आशयघन’,’दयाघन’ यासारखी विशेषणे त्या शब्दांमधील मूळ नामांचे (आशय,दया इ.)अर्थ अधिकच सघन करतात.
घन हा असा विविध वैशिष्ट्यांनी अर्थपूर्ण ठरणारा शब्द म्हणूनच मराठी भाषेच्या विस्तृत,व्यापक आकाशाशी दृढ नाते जडलेला एक चमचमता ताराच आहे असे मला वाटते.