सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – बदललेली नाती…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

#बदललेली नाती…नात्यांचं नवं स्वरूप…

खरं तर मानवाची जसजशी प्रगती होत गेली तशी मनुष्य प्राणी समाजप्रिय प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला.. समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, नाती गोती हे मनुष्य जीवनाचे अविभाज्य घटक बनले.. रानावनात भटकणारा माणूस वस्ती करून राहू लागला.. वाड्या, वस्त्या, मग गावं, शहरं बनत गेली.. आई वडील, बहिण भाऊ, नवरा बायको अशी कित्येक नाती जोडली गेली.. पण पूर्वी असलेली नाती प्रगती बरोबरच बदलत गेली.. पितृसत्ताक पद्धती मध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत होत पण आज स्त्रियांनी स्वतःला अस सिद्ध केलंय की नात्यांच्या परिभाषा ही आपोआप बदलल्या..पूर्वी घरी वडिलधारी माणसं किंवा बाबा, काका ह्यांना घरात एक वेगळाच दर्जा होता.. त्यांचा धाक कुटुंबावर होता..घरात बाबांचे पाऊल पडताच अख्खं घर शांत होत होत.. अर्थात ती आदरयुक्त भिती होती अस म्हणू शकतो आपण.. हळू हळू कुटुंब व्यवस्था विभक्त होत गेली आणि हे चित्र बदललं..स्त्रिया ही बाहेर पडू लागल्या..मोकळा श्वास घेऊ लागल्या.. जीवनशैली बदलली..डोक्यावरचा पदर खांद्यावर आला,.. आणि पुन्हा एकदा नात्यांची परिभाषा बदलली.. नवऱ्याला हाक मारताना अहो.. जाऊन अरे आलं.. नावाने हाक मारण्याची पद्धत सुरू झाली..अहो बाबा चा अरे बाबा झाला.. नात्यांमधील भिती जाऊन ती जागा मोकळीक आणि स्वतंत्र विचारांनी घेतली.. जिथे तिथे मैत्री चा मुलामा लावून नवीन नाती बहरू लागली.. सासू सुनेचे नातं बदललं.. सूना लेकी झाल्या,.. नणंद भावजय मैत्रिणी.. दिर भाऊ.. जाऊ -बहिण.. अशी नाती जरी तीच असली तरी बघण्याचा दृष्टिकोन बदलला… अर्थात प्रत्येक नात्याचा आधार असतो तो म्हणजे विश्वास.. हा विश्वास डळमळीत झाला की नाती विद्रूप रूप घेतात.. विकृत बनतात..नात कसं असावं तर धरणी च आणि अवकाशाचे आहे तस.. मातीच पावसाशी आहे तस.. निसर्ग आणि जीव सृष्टीच नात.. ज्यात फक्त देणं आहे.. त्याग आहे समर्पण आहे.. नात कसं असावं तर राधेचं कृष्णाचं होत तसं.. प्रेम, त्याग, समर्पण आणि दृढ विश्वास असलेलं.. नात मिरा माधव सारखं.. ज्यात फक्त त्याग आहे तरी ही प्रेमाने जोडलेलं बंध आहेत.. नातं राम लक्ष्मण सारखं असावं.. एकाने रडलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारं.. नात भरत आणि रामा सारखं असावं जिथे बंधुप्रेम तर आहेच पण त्याग आणि समर्पण जास्त आहे..कुंती पुत्र कर्णा सारखं असावं..ज्यात फक्त हाल अपेष्टा, उपेक्षा असूनही निस्सीम प्रेम आणि त्यागाच प्रतीक असणारं.. नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, मायेचा ओलावा, एकमेकांची काळजी घेण्याची वृत्ती, त्याग, समर्पण, निस्वार्थ असेल तर अशी नाती अजरामर बनतात.. हल्ली मात्र हे चित्र बदलत चाललं आहे.. सोशल मीडियाचा अती वापर.. प्रगतीच्या नावाखाली चाललेले अनेक घोटाळे.. ह्या सगळ्यात बाजी लागते आहे ती नात्यांची.. एकमेकांमध्ये स्पर्धा येणं.. आदर कमी होणं आणि जे नात आहे त्यापेक्षा दुसऱ्याची अपेक्षा लोभ मनात ठेवणं ह्याने नात्यांचं स्वरूपच बदलत  चाललं आहे .. सोशल मीडिया, इंटरनेट ह्या गोष्टींचा अती वापर आणि नात्यांमध्ये येणारा दुरावा  काळजी करण्यासरखा झाला आहे.. काही नाती फक्त समाजासाठी असतात.. फोटो पुरते किंवा असं म्हणू की व्हॉटसअप स्टेटस पुरती मर्यादित राहिलेली असतात.. त्या नात्यांमधल प्रेम विश्वास ह्याला कधीच सुरुंग लागलेला असतो… आणि ही परिस्थिती खरच विचार करायला लावणारी आहे.. शेवटी एवढच म्हणावंस वाटतं की कुठलं ही नातं असुदे ते नात समोरच्या व्यक्तीवर लादलेलं नसावं.. त्याच ओझ नसावं.. नात्यांमध्ये स्वतंत्र विचार.. एकमेकांबद्दल आदर.. मायेचा ओलावा.. प्रेम.. आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर सतत आनंद ठेवण्यासाठी चाललेली धडपड असेल तर कुठलेच नातं संपुष्टात येणार नाही.. कुठल्याच नात्याला तडा जाणार नाही… विश्वास हा नात्यांमधला मुख्य दुवा आहे.. आणि जिथे विश्वास, त्याग, समर्पणाची भावना आहे तिथे प्रत्येक नातं म्हणजे शरदाच चांदणं.. मोग्र्याचा बहर.. आणि मृद्गंधाचा सुगंधा सारखं निर्मळ आणि मोहक आहे ह्यात शंका नाही.. 

 नात्यांचे रेशीम बंध असावेत..

  बंधन, ओझ नसावं..

गुंतलीच कधी गाठ तर पटकन सैल होणारी असावी..

नात्यांचा बहर हा सिझनल नको..

तर बारमाही फुलणारा असावा…

नुसतच घेण्यात काय मिळवावं..

थोड कधी द्यायला ही शिकावं..

विश्वास आणि त्याग समर्पण

प्रत्येक नात्याच एक सुंदर दर्पण..

एकमेकांना दिलेला वेळ ही अमूल्य भेट आहे..

आदर आणि मायेने फुलणारं नात ग्रेट आहे..

नात्यात बसल्या जरी गाठी..

त्या सोडवण्याची कला ही असावी..

कधी नमत घेऊन तर कधी नमवण्याची ताकत ही असावी..

नातं जपणं एक फॉर्म्यालिटी नसावी..

हृदयातून हृदयापर्यंत पोचणारी मायेची हाक असावी..

नातं नको स्टेटस पुरतं जपलेलं..

नातं असुदे मनातून मनापर्यंत पोहचलेले…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments