अनेक पक्षी, प्राणी विशिष्ट दिशेकडे तोंड करून स्थलांतर करतात. या सर्वांमध्ये आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी सगळ्यात दूरवरचा पल्ला गाठतात. याबाबतीत त्यांना स्थलांतर बहाद्दर किंवा उड्डाण बहाद्दरच म्हंटलं पाहिजे. आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी स्थलांतर करतात, कारण उन्हाळी ऊबदार वातावरण वर्षभर त्यांच्याभोवती असावं असं त्यांना वाटतं. त्यांना दिवसभर प्रकाश असावा, असं वाटतं. दरवर्षी स्लेंडर, काळे-पांढरे पक्षी ३५२००कि. मी. चा वर्तुळाकार प्रवासकरतात. ही म्हणजे, जगाभोवती केलेली प्रदक्षिणाच असते.
उन्हाळ्याच्या दिवसात अगदी उत्तरेच्या प्रदेशात ते घरटी करतात. यावेळी उत्तर धृव सूर्याकडे कललेला असतो. सूर्य जवळ जवळ पूर्ण वेळ डोक्यावर असतो.
या प्रदीर्घ सूर्यप्रकाशाच्या काळात त्यांना व त्यांच्या छोट्या पिलांना समुद्रातील भरपूर मासे दिसतात आणि पकडता व खाता येतात.
उन्हाळा संपत येता येता दिवस लहान होऊ लागतो. थंडी वाढत जाते आणि ऑर्टिक टर्न आपला प्रवास सुरू करतातआणि अंटार्टिकाला जातात. अलास्कन टर्न उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक सागराच्या किनारपट्टीवरून जातात. इतर अनेक टर्न उत्तरेकडच्या इतर घरटी बांधण्याच्या क्षेत्राकडे उडतात आणि ब्रिटीश बेटांमध्ये भेटतात. तिथून ते दक्षिणेकडे आफ्रिकन किनारपट्टीकडे झडप घेतात.
प्रवासाला सुरुवात करायची वेळ झाली, हे आर्टिक टर्नना कसंकळतं? तापमानातील बदल, सूर्यप्रकाशातील बदल यामुळे बहुदा त्यांना ते कळतं. पण हे प्रवासी पक्षी इतकी भली मोठी आश्चर्यकारक राउंड ट्रीप दरवर्षी काघेतात, ते कुणालाच कळले नाही. जलचरांचं स्थलांतर –
१. उत्तरेकडील फर सील
उत्तरेकडील फर सील प्रत्येक वर्षी स्थलांतराच्या वेळी खूप लांबवरचा प्रवास करतात. सीलची मादी जवळ जवळ ९६००कि. मी. एवढा प्रवास करते. मे ते नोहेंबर सीलची नवी पिल्लं प्रिबिलॉफ आयलंडवर जन्माला घालतात. हे बेट दक्षिण-पश्चिम अलास्का येथे आहे. नर आणि मादी दोघेही त्याबेटा पासून दूर पोहत जातात. नर अलास्का गल्फमध्ये थांबतात. पण माद्या खूप लांबचा प्रवास करतात. जवळ जवळ ४८०० कि. मी. एवढा प्रवास करून दक्षिण कॅलिफोर्निया इथे येतात.
२. व्हेलचं स्थलांतर
मार्च-एप्रीलच्या दरम्यान दक्षिण कॅलिफोर्निया येथे सॅन डिआगो बे जवळ करड्या रंगाच्या (ग्रे) व्हेलचं स्थलांतर बघायला मिळतं. हे भले मोठे सस्तन प्राणी खरं तर मासे, १९, २००कि. मी. एवढी राउंड ट्रीप घेतात. ते आपला उन्हाळा, उत्तर पॅसिफिक महासागरात घालवतात. तिथे क्रीलसारखे छोटे जलचर आणि समुद्री प्राणी खातात. नंतर पानगळीच्या दिवसात ते पुन्हा आपल्या स्थलांतराला सुरुवात करतात. दक्षिण दिशेला, दक्षिण कॅलिफोर्नियाकडील खार्यापाण्याच्या सरोवरांकडे ते जातात. गर्भवती माद्या आपला प्रवास आधी पूर्ण करतात. डिसेंबरमध्ये त्या आपल्या पिलांना जन्म देतात. ही पिले ४ मीटर लांबीची असतात. एखाद्या महिन्यानंतर अन्य माद्या तिथे येतात आणि त्यांचे नराशी मीलन होते. मार्चमध्ये सर्व व्हेल उत्तरेकडे आपल्या उन्हाळी अन्नदात्या क्षेत्रात आपला परतीचा प्रवास सुरू करतात. सनडिअॅगोच्या किनार्यापासून ते सुमारे दीड किलो मीटर अंतर ठेवून ते प्रवास करतात. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अगणित व्हेल पोहत जाताना पाहण्यासाठी किनार्यावर गर्दी करतात.
३. माशांचेस्थलांतर – ईल आणि सालमन गोड्या पाण्यातील ईल मासे आणि पॅसिफिक महासागरातील सायमन या माशांचे स्थलांतर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असते. पानगळीच्या दिवसात उत्तर अमेरिकन आणि युरोपियन ईल त्यांच्या गोड्या पाण्यातून अटलांटिक महासागरातील बर्म्युडा बेटाजवळील सरगॅसो समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथील निरुपयोगी झाडात ते आपली अंडी घालतात आणि नंतर मरतात. अंडी फुटून जेव्हा छोटे जीव बाहेर येतात, तेव्हा ते बोटाच्या नखांएवढे असतात. त्यांना लार्व्हा असं म्हणतात.
या छोट्या लार्व्हा प्रवाहाबरोबर आपल्या मूळ प्रदेशा कडे वाहू लागतात. या माठ्या होत जाणार्या ईलपैकी उत्तर अमेरिकेकडून आलेल्या ईलची पिल्ले युनायटेड स्टेटस आणि कॅनडाकडे पोहत जातात. हे स्थलांतर पूर्ण व्हायला जवळ जवळ एक वर्ष लागतं. तरुण युरोपियन ईल सरगॅसोच्या वेगळ्या भागातून प्रवाहाबरोबर पोहू लागतात आणि ते युरोपकडे येतात. त्यांचा प्रवास लांबचा असतो आणि मूळ ठिकाणी पोचायला त्यांना२/३वर्षे लागतात. जेव्हा ते वेगवेगळ्या काठाने पोहत आपल्या मूळ ठिकाणी परत येत असतात, तेव्हा छोट्या लार्व्हांमध्ये बदल होत जातो. ते बारीक, निमुळते आणि पारदर्शक होत जातात. त्यांना ग्लास ईल असे म्हणतात. नंतर ते मोठे होतात आणि त्यांचा रंग काळा होतो. ते काठाशी पोचतात, तेव्हा त्यांना एलव्हर्स असे म्हणतात. नर एलव्हर्स खार्या पाण्याच्या बंदरालगतच्या दलदलीच्या प्रदेशात राहतात आणि माद्या पोहत वरच्या बाजूला गोड्या पाण्याकडे येतात. खूप वर्षानंतर त्यांच्या जन्मदात्यांप्रमाणे ते पुन्हा गोड्या पाण्यातून खार्या सॅरॅगॉन समुद्राकडे आपलं रहस्यमय स्थलांतर सुरू करतात.
पॅसिफिक सालमनचं स्थलांतर याच्या अगदी विरुद्ध असतं. आपलं सगळं आयुष्य खार्या पाण्याच्या समुद्रात घालवल्यानंतर, हे मासे जवळ जवळ ३२०० कि. मी. चा प्रवास करून गोड्या पाण्याच्या प्रवाहात अंडी घालण्यासाठी येतात. त्यांना यावेळी, धबधबे, नदीच्या उताराच्या बाजूला वाहणारे वेगवान प्रवाह इ. अडथळ्यांना तोंड देत पोहावं लागतं. शरद ऋतूत, अनेक अडथळे पार करून अंडी देण्याच्या जागी आलेले सालमन अंडी देतात आणि मरून जातात. अंडी फुटतात आणि छोटे सालमन समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. काही काळानंतर ते पुन्हा, जिथे त्यांचा जन्म झाला, त्याच गोड्या पाण्याच्या प्रवाहाकडे परत येतात. त्यांना परतीचा मार्ग कसा सापडतो? नक्की माहीत नाही, पण शास्त्रज्ञांना वाटतं, त्यासाठी त्यांना त्यांच्या घ्राणेंद्रियांचा उपयोग होत असावा.
४. डाल्फिन-
स्क्वीड माशांचा थवा हे डाल्फिनचं अन्न. जेव्हा हे मासे वसंत ऋतूत उत्तरेकडे जातात, तेव्हा डिल्फिन त्यांच्या मागोमाग जातात. हिवाळ्यात ते पुन्हा दक्षिणेकडे येतात, तेव्हा डाल्फिनही त्यांच्या मागोमाग दक्षिणेकडे येतात.
५. अलास्कन कॅरिब्यू –
सागरकाठच्या किनारपट्टीच्या जमिनीवरून अलास्कन कॅरिब्यूंचा कळप फिरतो. जमिनीवरील गवत आणि पाण्यालगतंचं शेवाळं ते खातात. वसंत ऋतूत ते उत्तरेकडच्या किनारपट्टीलगत फिरतात. तिथे पानगळीला सुरुवात होताच ते पुन्हा दक्षिणेकडच्या सदाहरित जंगलाकडे येतात. ते १६००कि. मी. पर्यंतचा प्रवास करतात.
नवे जीव जन्माला घालण्यासाठी स्थलांतर बेडूक उन्हाळ्यात बागेत जमिनीवर राहतात. पण उन्हाळ्याच्या मागोमाग तेजवळच्या तळ्याकाठी, पाण्याचा साथ असेल, तिथे जातात आणि त्यांची अंडी पाण्यात घालतात. अंडी फुटली, की त्यातून बाहे येणार्या जिवांना ताडपोल म्हणतात. त्यांना कल्ले असतात. नंतर त्यांचे पाय आणि फुफ्फुसे तयार होतात.
पूर्ण वाढ झालेले बेडूक तळ्यातून बाहेर येतात आणि जमिनीवर राहतात.
मगर आणि सुसर मगरी आणि सुसरी त्यांचं बहुतेक आयुष्य पाण्यात घालवतात. पण त्यांची अंडी घालण्याची वेळ झाली, की मादी नदीच्या पाण्यातून बाहेर येते. दलदलीच्या पाणथळ किनार्यावर येते. गवत रानटी झुडुपाच्या वगैरेचा उपोग करून घरटे तयार करते. तिथे अंडी घालते. अंडी फुटून पिलं बाहेर येईर्यंत त्यांचे रक्षण करते.
६. समुद्री कासव
हिरव्या रंगाची समुद्री कासवं त्यांची अंडी जमिनीवर घालतात. त्यासाठी ती समुद्रातून बाहेर येऊन विशिष्ट ठिकाणापर्यंत सरपटत जातात. ब्राझीलमधील किनारपट्टीच्या पाण्यातील हिरवी कासवं दर दोन-तीन वर्षांनी आपलं नित्याचं वसतीस्थान सोडून दक्षिणेकडे अटलांटिक समुद्रातील आसेंशन आयलंड बेटाकडे जातात. हे बेट ८८चौ. कि. मीटर क्षेत्रफळाचे आहे, पण त्यासाठी कासवं १६०० कि. मी. चा प्रवास करून तिथे पोचतात. मीलन काळात माद्या प्रवाहातून पोहतात. त्या काळात त्या अनेकदा अंडी घालतात. त्याच किनार्यावर त्या पुन्हा पुन्हा अंडी घालतात. अंडी फुटली, की लहान कासवं स्वत:चं स्थलांतर सुरू करतात. ती पाण्यात पोहू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते. पण त्यांचं तोंड नेहमी पाण्याकडे असतं. अर्थात अनेकजण अन्य भुकेल्यांचं भक्ष बनतात. पण काही कासवं समुद्रात पोचतात. त्यांच्या जन्मदात्यांच्या मूळ मुक्कामी परत येतात. त्यापूर्वी त्यांनी ते ठिकाण कधीही पाहिलेले नसते. ते पुरेसे वयस्क झाले, म्हणजे पुन्हा असेन्शन बेटाकडे येतातआणि आपली अंडी समुद्राकाठी वाळूवर घालतात. या एकाकी बेटावरती का येतात? त्यांना ते बेट कसं सापडतं, याचं उत्तर शास्त्रज्ञांना अजूनपर्यंत सापडलेले नाही.
अशी ही प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर यांच्या स्थलांतराची रंजक माहिती.
☆ डॉ बाबासाहेब जयंती चिंतन… ☆ श्री सुनील देशपांडे☆
असाध्य ते साध्य , करिता सायास ।
कारण अभ्यास ! तुका म्हणे।।
या विश्वगुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय डॉ बाबासाहेब आंबेडकर!
विद्यार्थीदशे पासूनच शिक्षणासाठी किती अभ्यास केला आणि त्या अभ्यासासाठी किती सायास केले हे त्यांच्या चरित्रावरून साऱ्यांनाच माहिती आहे. आपल्याजवळ कोणतीही साधने असोत किंवा नसोत. कोणाचेही पाठबळ असो किंवा नसो. प्रत्यक्ष शिकवणारा असो किंवा नसो. ग्रंथ हेच गुरु मानून आणि अभ्यासाचा प्रचंड सायास करून त्यांनी जे करून दाखवले ते खरोखरच असाध्य होते परंतु ते साध्य करून दाखवले.
विशेषतः त्यांच्या घटना समितीच्या शब्दांकन विभागाच्या प्रमुख पदाच्या कामगिरीबद्दल हे मोठेपण विशेष करून जाणवते.
वकील झाल्यानंतर त्यांनी विशेष आवड म्हणून अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करणे हा छंद म्हणून जोपासला होता. त्यामुळे घटना समितीमध्ये त्यांना सामावून घेताना त्यांच्या या अभ्यासाचा मान राखून त्यांना या शब्दांकन उपसमितीचे प्रमुख बनवले.
तरीसुद्धा त्यांचे खरे मोठेपण पुढेच आहे.
या शब्दांकन उपसमिती मध्ये त्यांचे शिवाय आणखी काही सदस्य होते. परंतु वेगवेगळ्या कारणाने ते सदस्य ही उपसमिती सोडून गेले. शेवटी शब्दांकन समितीचे ते एकमेव सदस्य त्या समितीत शिल्लक राहिले. तरीसुद्धा त्यांनी या समितीमध्ये माझ्या मदतीसाठी आणखी कोणी सदस्य मला द्या. सोडून गेलेल्या सदस्यांबद्दल कोणी पर्यायी सदस्य माझ्या मदतीला हवेत. अशी कोणतीही मागणी न करता. नेटाने एकट्याने रात्रंदिवस खपून आणि अभ्यास करून घटना समितीच्या शब्दांकन उपसमितीची जबाबदारी सर्वोत्कृष्ट पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण केली. हे त्यांचे कार्य हे एकमेवाद्वितीयच आहे.
आज त्यांच्या जयंतीदिनी या सर्व सायासातून घडलेल्या आणि आपल्या देशाची घटना घडवलेल्या या महान तपस्वी अभ्यास विभूतीला माझा साष्टांग प्रणिपात!
परंतु या व्यक्तीच्या या सर्व सायासांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे हे मात्र आज कुणाच्याही खिजगणतीतही नाही.
स्व बाबासाहेबांनी राज्यघटनेनुसार आम्हाला एखाद्या न्याय्य मागणीसाठी किंवा हक्कासाठी आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे एवढेच आमच्या लक्षात आहे. परंतु ते आंदोलन करताना त्यातून हिंसात्मक उद्रेक किंवा बेकायदेशीर नुकसानकारक कृत्य किंवा राष्ट्रीय संपत्तीचा नाश करण्याची राष्ट्र विघातक कृती घडू नये यासाठी जे नियम आहेत ते मात्र आम्ही पाळणार नाही. अशा पद्धतीने आम्ही जर वागू लागलो तर त्यात स्व. बाबासाहेबांच्या सायासांचे आम्ही विडंबन करतो आहोत असे नाही का वाटत?
ज्या जातीअंताची लढाई स्व. बाबासाहेबांनी आरंभली आहे त्या जातींअंताकडे आमचा प्रवास चालू आहे की त्या विरुद्ध दिशेने चालू आहे याचा कोणी विचार करतो आहे का? व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक समतेकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असलेले किती कार्यकर्ते समाजात दिसतात?
कोणत्याही चांगल्या कृतीमध्ये कालांतराने विकृती घुसत जातात हे जगात सगळीकडेच दिसून येते. परंतु लोकशाही सारख्या चांगल्या विचारांमध्ये घुसलेल्या सामाजिक विकृती विरोधात कार्य करण्यासाठी सायास करणारे व स्व. बाबासाहेब यांच्या मूळ विचारधारेशी प्रामाणिक राहून कार्य करणारे कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने निर्माण होतील का? या प्रश्नाचिन्हावर भविष्याकडून काही आशादायक घडावे एवढी प्रार्थना करून आज स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!!!
जेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जातात, तेव्हा आपण म्हणतो, ते स्थलांतर करतात आणि त्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. आपली मूळची जागा सोडून ते काही काळापुरते दुसर्या ठिकाणी जातात. काहींच्या बाबतीत स्थलांतर हा खूप लांबचा प्रवास असतो, तर काहींच्या बाबतीत तो जवळचा असतो.
स्थलांतर कशा प्रकारचं?
काही प्राणी एकाच मार्गाने, एकरेशीय स्थलांतर करतात. इतर काही वर्तळाकार प्रवास करतात. म्हणजे ते स्थलांतर करतात आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या पहिल्या घरी परत येतात. काही प्राणी स्थलांतर करतात. तिथे आपल्या छोट्या बाळांना जन्म देतात आणि मरतात. नंतर त्यांची आपत्य, त्यांच्या मूळ जागी एकटीच परततात.
कोणत्या प्रकारे प्राणी स्थलांतर करतात?
प्राणी विविध प्रकारांनी स्थलांतर करतात. बेडूक अंडी घालायच्या वेळी नद्या, तळी वगैरे पाण्याचे स्त्रोत असलेल्या जागी स्थलांतर करतात. रॉबीन उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. सालमन समुद्राच्या पाण्यातून पोहत नदीच्या गोड्या पण्यात येतात. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांचा थवा वर्षातील विशिष्ट काळात ठरावीक ठिकाणी जातो.
प्राणी स्थलांतर का करतात?
एकाच ठिकाणी न राहता प्राणी स्थलांतर करतात. का? प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे शोधून काढली आहेत.
१. थंड हवेपासून दूर जाण्यासाठी
२. काही प्राणी दुसर्या जोडीदाराबरोबर एकत्र येऊन नवीन आपत्यांना जन्म देण्यासाठी
३. काही जण आपल्या अन्नाच्या शोधात
४. काहीजण आपल्या घरात गर्दी होऊ नये म्हणून.
स्थलांतर कसं करायचं हे प्राण्यांना कसं कळतं?
आपण काळ आणि वेळ बघण्यासाठी कॅलेंडर आणि घड्याळाचा उपयोग करतो, पण प्राण्यांना कसं कळतं, की आता स्थलांतराची वेळ झाली आहे. शास्त्रज्ञांना असं वाटतं, की दिवसाचा काळ, हे प्राण्यांचे कॅलेंडर असावे दिवसाचा प्रकाश कमी जास्त होणं, ही त्यांच्यासाठी खूण असावी. काहींसाठी तापमानातला फरकही खूण असावी.
स्थलांतर कसं करायचं, हे प्राण्यांना कसं माहीत होतं?
स्थलांतर करताना पक्षी आपल्या प्रवासात काही परिचित खुणांकडे लक्ष ठेवतात. उदा. नद्या किंवा समुद्र किनारे. सूर्य, तारे यांचाही मार्गदर्शक म्हणून ते उपयोग करतात. पण इतर प्राण्यांचं काय? ती कशाचा उपयोग करतात? आपल्याला माहीत नाही, पण स्थलांतर ही त्यांच्या आयुष्यातली आश्चर्यकारक आणि अद्भुत अशी गोष्ट आहे.
मोनार्क जातीच्या फुलपाखरांचं स्थलांतर
काही प्रकारची स्थलांतरे सहजपणे लक्षात येतात. पानगळीच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला मोनार्क जातीच्या फुलपाखरांच्या लांबच लांब ओळी दिसतात. दक्षिणेकडे ती उडत जातात. त्यांच्यापैकी काही तर ३२००कि. मी. चा प्रवास करतात. ते त्यांचा हिवाळा कॅलिफोर्निया किंवा मेक्सिकोच्या गल्फच्या भागात व्यतीत करतात. ते विशिष्ट झाडांच्या फांद्यांवर गोळा होतात. फूटभरच्या अंतरात शंभर शंभर फुलपाखरे बसलेली शास्त्रज्ञांना आढळली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एकत्र गोळा झालेली फुलपाखरे बघितल्यावर त्या झाडाला जसा फुलपाखरांचाच बहर आल्यासारखे दिसते. वसंत ऋतू आला, की मोनार्क फुलपाखरे आपला उत्तरेकडचा परतीचा प्रवास चालू करतात. वाटेत फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात आणि मरून जातात. जेव्हा अंडी फुटतात, तेव्हा नवजात फुलपाखरे आपला उत्तरेकडचा प्रवास चालू करतात. पुढच्या पानगळीच्या काळात आपल्या आई-वडलांप्रमाणे ती पुन्हा दक्षिणेकडे येतात. आई-वडील ज्या झाडावर बसले होते, त्याच झाडावरती ही बसतात.
काही विशिष्ट जातीच्या भुंग्यांचं स्थलांतर
ज्या प्रदेशात अत्यंत थंडी असते, हिमवर्षाव होतो, आणि थंडीत गवताचं पातंसुद्धा कुठे दिसत नाही, अशा युरोपमधील देशात लेडी बग नावाचे भुंगे बागेतून कंपाऊंडवॉलच्या ऊबदार फटीत जातात. ते त्यांचे स्थलांतर असते. काही जण आणखी पुढचा प्रवास करतात. एखाद्या टेकाडाकडे तेउडत जातात. तिथे अनेक लेडी बग एकत्र गोळा होतात. अगदी जवळ जवळचिकटून मोठा गट करून, एकमेकांना ऊब देत ते थंडीचे दिवस घालवतात. वसंत ऋतू आला, की ते पुन्हा आपल्या मुळच्या घरी परत येतात.
या प्रकारच्या आणि इतरही अनेक प्रकारच्या स्थलांतरामुळे शास्त्रज्ञ गोंधळात पडतात. प्राण्यांना, पक्षांना, कीटकांना कसं कळतं, की त्यांना कुठं जायचं आहे? आता हे ठिकाण सोडायची वेळ झाली आहे, याची उत्तरे अद्याप कुणालाच कळलेली नाहीत.
मुंग्यांची फौज
दक्षिण अमेरिकेत अमीझॉन जंगलातील मुंग्या विशिष्ट काळानंतर स्थलांतर करतात. पण त्या तसं का करतात, हे कुणालाच माहीत नाही. त्या काही अन्नाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करत नाहीत. कारण खूपसं अन्न त्यांनी मागे ठेवलेलं असतं. त्या विशिष्ट दिशेने जाताहेत, असंही दिसत नाही. कुठल्या तरी अज्ञात कारणाने त्या स्थलांतर करतात. स्थलांतर करताना त्या लष्करी शिस्तीने ओळी करून जाताना दिसतात. जेव्हा त्यांचं लष्कर स्थलांतर करतं, तेव्हा रस्त्यात जर एखादा सजीव दिसला, तर सैनिक मुंग्या त्याच्यावर हल्ला चढवतात आणि त्याला खातात. घनदाट जंगलातून आणि जाळ्यांच्या गुंत्यातून लढाऊ मुंग्या पुढे पुढे जातात. ही फौज जेव्हा नदीच्या अरुंद पात्राजवळ येते, तेव्हा त्या पानाच्या देठावरून किंवा गवताच्या पात्यावरून पलिकडे जातात. किंवा मग त्या पळत पळत येऊन प्रवाहात एकमेकिंना चिकटून राहून पूल तयार करतात. अर्थात् त्यांच्यातील काही काही मुंग्या पाण्यात पडतात. पण त्या लष्करात इतक्या मुंग्या इतक्या मुंग्या असतात. की अखेर त्या सजीव पूल बनवण्यात यशस्वी होतात आणि उरलेली फौज त्या पुलावरून पुढे जाण्यात यशस्वी होते. जर नदी रुंद असेल, तर मुंग्या एकत्र गोळा होऊन मुंग्यांचा बॉलच बनवतात. या बॉलच्या मधे राणी मुंगी आणि अंडी सुरक्षित ठेवली जातात. बॉल पाण्यातून घरंगळतो आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. तळाकडच्या मुंग्या वर येत राहतात. या सततच्या हालचालीमुळे काही मुंग्या पाण्यात पडतात, पण अखेर बॉल नदीच्या दुसर्या तिरालापोचतो, तेव्हा मुंग्या पुन्हा सुट्या सुट्या होऊन त्यांची पुन्हा फौज बनते व त्यांची आगेकूच पुन्हा सुरू होते. त्यांचं हे स्थलांतर बघायला अनेक लोक जमतात. पुढे एखाद्या पडलेल्या झाडाचा कुजलेला ओंडका किंवा झाडाची पोकळ ढोली असेल, तिथे त्या थांबतात. तिथे राणी मुंगी अंडी घालते. ३०,००० पर्यंत ती अंडी घालते. त्यानंतर ती मरते. बाकीची मुंग्यांची फौज ती अंडी घेऊन पुन्हा कूच करते. त्या सतत कूच का करतात? त्या कुठे जातात? आपल्याला माहीत नाही. कदाचित् ते त्यांनाही माहीत नसेल. हे अद्याप न सोडवलं गेलेलं कोडं आहे.
☆ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले… ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆
एवढे अनर्थ एका अविद्येने केले
विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविद्येने केले!”
वरील माहिती लहानपणी अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने समोर आली होती. काल महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती होती. त्यानिमित्ताने ती परत समोर आली. त्यांच्या कार्याविषयी लिहावे असे दिवसभर वाटत होते. पण दिवसा व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. आता रात्री बसून हा लेख लिहितो आहे.
वरील ओळींमधून ज्योतिराव फुलेंना नक्की काय म्हणायचे होते ते लहानपणी कधी नीट कळले नाही. पण या ओळींनी मनात कुतूहल निर्माण केले होते. नंतर जरा वाचन वाढल्यावर या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही गोष्टी उमगल्या. त्या तुमच्या समोर मांडतो आहे.
विद्या अर्थात शिक्षण नसल्याने मती अर्थात बुद्धी नष्ट होते. बुद्धी म्हणजे प्राप्त परिस्थितीचे योग्य आकलन करून चांगले दुरोगामी परिणाम देणारे निर्णय घेण्याची क्षमता.
दैनंदिन काम उत्तम दर्जाने आणि वेगाने करण्यासाठी नीती (रणनीती) आखावी लागते. पण त्यासाठी मति/बुद्धी/योग्य निर्णयक्षमता आवश्यक असते. पण मति तर आधीच अविद्येने नष्ट केलेली असते. अशा प्रकारे शिक्षणाच्या अभावामुळे दैनंदिन कामातील गती म्हणजे प्राविण्य नष्ट होते.
दैनंदिन कामातील गतीच आपल्याला वित्त अर्थात पैसे मिळवून देते. अशा प्रकारे अविद्येने (शिक्षणाच्या अभावाने) मनुष्याची आर्थिक परिस्थिती खराब होते.
तात्कालिक समाजव्यवस्थेत शूद्रांना शिक्षण देण्याची व्यवस्था नव्हती. त्या काळी शूद्रांनाही शिक्षणाची गरज वाटत नव्हती. शिक्षणाने मनुष्यात काय बदल होतात हेच मुळी त्यांना माहित नव्हते. शिक्षणाच्या अभावाने शूद्रांची आर्थिक परिस्थिती खराब झालेली होती. आर्थिक स्थिती खराब झाल्याने शूद्रांची सामाजिक स्थिती खराब झालेली होती. ज्योतीरावांनी तात्कालिक समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून वरील ओळींच्या स्वरूपात आजारी समाजव्यवस्थेचे निदान केलेले होते.
जगातील कुठल्याही समाजात बलवान आणि कमजोर असे दोन गट तयार झाल्यास बलवान गटाकडून कमजोर गटाचे शोषण सुरू होते हा इतिहास आहे. असे शोषण होऊ लागल्यास सामाजिक न्याय नष्ट होतो. समाजातील काही दुर्बल घटकांवर अन्याय झाल्याने त्यांच्यामध्ये बलवान गटाविरुद्ध आणि एकंदरीत समाजव्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होते. असा समाज गटातटात विभागाला जातो. भारतात तर जातीच्या मडक्यांची उतरंड मांडलेली होती. या उतरंडीतील प्रत्येक मडके वरच्या मडक्याकडून होणाऱ्या अन्यायामुळे त्याच्यावर चिडलेले होते मात्र त्याच वेळी आपल्यापेक्षा खालच्या मडक्याला हलके समजत त्याच्यावर अन्याय करत होते. जेव्हा समाजातील एक गट दुसऱ्या गटाला दुखावतो तेव्हा दुसरा गट प्रतिक्रियेत पहिला गट दुखावला जाईल असे काही तरी करतो. हिंसेच्या क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणून हिंसाच परत मिळते. हा प्रकार चालू राहिल्याने गटागटामध्ये टोकाचे शत्रुत्व निर्माण होते. अशा गटातटात विभागलेल्या समाजातील प्रत्येक गट दुसऱ्या गटाला सत्ता मिळू नये म्हणून प्रयत्न करत असतो. गटागटामध्ये शत्रुत्व इतके टोकाला जाते की ते एक वेळ परक्या व्यक्तीची सत्ता स्वीकारायला हे गट तयार होतात पण आपल्याच समाजातील दुसऱ्या गटाला सत्ता मिळू द्यायला ते तयार नसतात. असा विघटित समाज ‘फोडा झोडा आणि राज्य करा’ नीती वापरणाऱ्या परक्या लोकांकडून सहज गुलाम होतो. म्हणून गटातटात विभागले जाणे ही गुलामांची मानसिकता आहे असे म्हणतात. परक्या लोकांकडून गुलाम झाल्यावर नव्या राज्यकर्त्यांकडून कुठल्या एका गटाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे शोषण चालू होते. प्रथम राजकीय सत्ता जाते. मग आर्थिक शोषण सुरू होते. शेवटी धार्मिक शोषण चालू होते. गुलामगिरीत गेलेला संपूर्ण समाज रसातळाला जातो.
अविद्येमुळे अर्थात शिक्षणाचा अभाव असल्याने इतका मोठा अनर्थ निर्माण होतो.
युगसुत्रानुसार अविद्येचा अर्थ वेगळा आहे. स्वतःचे खरे अस्तित्व आत्मा असताना स्वीकारलेले अहंकार /आयडेंटिटी यात आत्मभाव शोधणे म्हणजे अविद्या. देहधर्म आणि चरितार्थ चालवण्यासाठी आपण काही रोल/ भूमिका स्वीकारतो. आपल्या एखाद्या रोलची आपल्या मनात निर्माण झालेली प्रतिमा म्हणजे अहंकार. अहंकारात आत्मभाव ठेवणे म्हणजे अमिताभ बच्चनने आयुष्यभर विजय दीनानाथ चौव्हान होऊन जगल्यासारखे आहे. असत् म्हणजे अहंकारांना सत् म्हणजे आत्म/स्वयं समजणे म्हणजे अविद्या. योगसुत्रानुसार विद्येचा अर्थ शिक्षणाहून वेगळा असला तरी परिणाम तोच होतो. समाज गटातटात विभागाला जाऊन शेवटी गुलामगिरीत जातो.
ज्योतीरावां इतकी सामाजिक समस्यांची खोलवर जाण आजवर खचितच कुणाला झालेली असेल.
पण सामाजिक समस्येची नुसती जाण असून उपयोग नसतो. सामाजिक समस्येचे कारण समजल्यावर त्यावर उपाय करणे आवश्यक असते. कृतीविना वाचाळता व्यर्थ ठरते. पण मग कृती का घडत नाही? कळतंय पण वळत नाही असे का घडते?
समाजाचे रहाटगाडगे एक ठराविक वेग धरून चालू असते. समाजाच्या प्रत्येक घटकाला समाजाकडून काहीतरी फायदे मिळत असतात. समाजव्यवस्थेत बदल करायचा म्हटले की आपले हक्क हिरावले जातील या भीतीने समाजातील लाभार्थी त्याला विरोध करतात. फिरणाऱ्या चाकाची गती बदलायच्या प्रयत्न करणाऱ्या पहिल्या व्यक्तीला चाकाकडून सर्वात जास्त विरोध होतो. त्याप्रमाणे सर्वप्रथम जो समाज सुधारणेचा प्रयत्न करतो त्याला समाजाचा सर्वात जास्त विरोध सहन करावा लागतो. समाजाच्या दुरोगामी हितासाठी तात्कालिक समाजाचा विरोध पत्करून सामाजिक समस्येवर प्रत्यक्ष कृतीतून उपाय करणे हे म्हणजे दिव्य करण्याप्रमाणे असते. 19 व्या शतकाच्या सुरवातीचा भारतीय समाज तर आजपेक्षा खूप जास्त अशिक्षित आणि बुरसटलेल्या विचारांचा होता. तरी समाज सुधारणेचे दिव्य करायला सुरुवात करणारे पहिले समाज सुधारक म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले (1827-1890).
गटागटात विभागलेली मराठेशाही संपून आणि इंग्रजांचे संपूर्ण भारतावर राज्य प्रस्थापित होऊन केवळ 9 वर्ष पूर्ण झालेले असताना जोतीराव फुलेंचा पुण्यात जन्म झाला. ज्या काळी शिक्षणाला निरोपयोगी समजले जाई त्या काळात त्यांनी मिशन शाळेत जाऊन इंग्रजी शिक्षण घेतले. मुलाला इंग्रजी शिक्षण देण्यात त्यांच्या आई वडिलांचा सुज्ञपणा दिसतो. या शिक्षणामुळे केवळ भारतात नव्हे तर जगात घडलेल्या घटनांची ओळख ज्योतिरावांना झाली. अमेरिकन क्रांतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या थॉमस पेणच्या विचारांचा त्यांच्या मनावर विशेष प्रभाव पडला. अमेरिकेला ब्रिटिश सत्ते विरुद्ध उठाव करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या त्याच्या Common Sense (1776) या लेखाचा, फ्रेंच क्रांतीचे समर्थन करणाऱ्या त्याच्या The Rights of Man (1791) या पुस्तकाचा आणि धर्मातील अंधश्रद्धांवर टीका करणाऱ्या त्याच्या The Age of Reason या पुस्तकांचा त्यांच्या मनावर गहिरा परिणाम झाला. राजेशाही, धर्माधिकार आणि विषम सामाजिक रचना यांच्या दुष्परिणामांच्या विषयी त्यांच्या मनात गाढ समज निर्माण झाली. माणसाच्या नैसर्गिक आणि सामाजिक हक्कांचे समर्थन करणारे विचार त्यांच्या मनात जागृत झाले. विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिकता यांचे समर्थन करणारे विचार पक्के झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या शिक्षणा मुळे त्यांना इतके अफाट ज्ञान मिळाले होते त्या शिक्षणाचे महत्व त्यांना पटले. आपल्या प्रमाणे सर्वांना हे ज्ञान मिळावे आणि आपला गुलाम देश परत वैभवशाली व्हावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. पण त्यासाठी समाजात खुप बदल करणे आवश्यक आहेत याची जाणीव त्यांना झाली.
प्रथम स्वतः व्यवसाय करत त्यांनी आपली आर्थिक स्थिती सुधारली. पुणे नगरपालिकेत बांधकाम, रस्ते, पाणीपुरवठा आदी कामांची कंत्राटे ते घेऊ लागले. सोबत पिढीजात आलेला फुलांचा व्यवसाय आणि शेती सुद्धा होती. आपली वित्तीय स्थिती चांगली नसेल तर समाजात आपल्या शब्दाला आणि कृतीला काडीची किंमत नसेल याची जाणीव त्यांना होती. म्हणून त्यांनी आपली वित्तीय स्थिती सुधारली. परंतु त्यांच्या उत्पन्नाचा बहुतांश भाग नंतर समाजसुधारणेच्या कामावर खर्च होई.
शिक्षण मनुष्यात किती बदल घडवू शकतो हे जोतिरावांना स्वतःच्या अनुभवावरून समजले होते. संपूर्ण स्त्री जमात म्हणजे अर्धा समाज त्या काळी शिक्षणापासून वंचित होता. स्त्रिया फक्त चूल आणि मूल करत होत्या. अर्थ आणि संरक्षण यासाठी स्त्रिया पुरुषावर अवलंबून असल्याने त्या समाजाचा कमजोर घटक बनल्या होत्या. ज्या समाजात पुरुष प्रबळ आणि स्त्रिया दुर्बल असतील त्या समाजात स्त्रियांचे शोषण झाले नाही तर नवल!
त्या काळी प्रथम इंग्रजांची राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी, मग जातिभेदाची सामाजिक गुलामगिरी आणि शेवटी प्रत्येक घरात स्त्री-पुरूष भेदातून निर्माण झालेली घरगुती गुलामगिरी सुरु होती. सर्वत्र अन्याय आणि शोषण सुरू होते. जोतिरावांनी सर्वप्रथम शिक्षणाचे आणि खास करून स्त्रीशिक्षणाचे महत्व ओळखले. पण त्या काळी मुलींना शिकवणार कोण? स्त्री शिक्षका अस्तित्वातच नव्हत्या. पुरुष शिक्षक असलेल्या शाळेत मुलींना पाठवेल इतका तात्कालिक समाज प्रगत विचाराचा नव्हता. मग त्यांनी स्वतःच्या बायकोला आधी घरी शिकवले. पहिली शिक्षिका निर्माण करून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. 1848 साली बुधवार पेठेत तात्यासाहेब गोवंडेंच्या भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. आपण ज्योतिबा फुलेंचे पोक्तपणातील फोटो पाहतो. पण ज्योतीरावांनी हे पहिले दिव्य वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी केले होते. अर्थात सावित्रीबाई तर त्याहून लहान होत्या. तात्यासाहेब गोवंडे तर स्वतः ब्राह्मण होते. तरी फुले दांपत्याच्या या समाजोपयोगी कामाचे महत्व समजून ते पुण्यातील कर्मट ब्राह्मणाच्या विरोधात गेले. सावित्रीबाई पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. पुरुषांना आपले हक्क हिरावले जातील अशी भीती वाटू लागली. अशी भीती केवळ सवर्ण नव्हे तर सर्व जातीतील पुरुषांना वाटत होती. त्यामुळे या पहिल्या मुलींच्या शाळेला तात्कालिक पुरुषप्रधान समाजातील प्रत्येक स्तरातून टोकाचा विरोध झाला. जाता-येता लोकांकडून शेण-अंडे खात अतिशय तरुण फुले दांपत्याने निर्धाराने त्यांचे काम चालू ठेवले.
त्या काळी दलितांवर होणारे अन्याय समाज उघडया डोळ्यांनी पाहत असे. हे अन्याय पाहून ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘हिच समाजाची रित आहे’ असे म्हणणारे तर समाजात होतेच, पण ‘यांची लायकीच ही आहे’ असे म्हणणारे निर्लज्ज पण तात्कालिक समाजात होते. त्यावर उपाय म्हणून जोतिरावांनी दलितांना शिक्षण देवून त्यांना सक्षम करण्याचे ठरवले. पण त्यात अस्पृश्यतेची मोठी अडचण होती. त्यावर तोडगा काढत त्यांनी 1852 साली बुधवार पेठेत फक्त दलित मुलांसाठी शाळा काढली. भारतात दलितांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली.
ज्योतीरावांनी समाजातील जातीभेदावर कितीही टीका केली असली तरी ते ब्राह्मण वा सवर्ण विरोधी नव्हते. उलट समाजातील अनेक सुज्ञ ब्राह्मण वा सवर्णांच्या मदतीने त्यांनी ही चळवळ उभी केली होती. त्यांच्या टीकेचा रोख नेहमी भेदाभेद पाळणाऱ्यांवर असे. लिंग, पंथ, जाती, प्रांत, भाषा, खानपान, रूढी परंपरा यांच्या अहंकारातून असे भेदाभेद निर्माण होतात. ‘मनुष्याने सर्व प्रकारचे अहंकार सोडले पाहिजेत’ असे योगसुत्र, सांख्ययोग, गीता, वेदांत या सारखे हिंदू ग्रंथ ओरडून ओरडून सांगतात. सगळ्या जीवांचे खरे अस्तित्व केवळ आत्मा असल्याने सर्व जीव एकच आहेत ही मानवतावादी शिकवण भारतीय विसरून गेले होते.
कुठलाही अहंकार बाळगणे हा आत्मघात असतो. अहंकारातून अपेक्षा निर्माण होतात. अपेक्षांमधून चित्तविक्षेप निर्माण करणारे राग-द्वेष आदी व्यवधान निर्माण होतात. त्यातून हिंसेसारखे अधर्म घडतात. हिंसेची प्रतिक्रिया हिंसा असल्याने भय-चिंता निर्माण होऊन अजून चित्तविक्षेप निर्माण होतो. चित्तविक्षेप एकाग्रतेचा नाश करून कर्मनाश करतात. कर्मनाशामुळे वैयक्तिक हानी होते. लोकांच्या अहंकारामुळे समाज गटातटात विभागाला जाऊन धूर्त स्वकीय किंवा परकीय लोकांच्या गुलामगिरीत जातो. अशा प्रकारे अहंकार बाळगणे हा वैयक्तिक आणि सामाजिक आत्मघात आहे.
ज्योतिरावांचा समाजातील भेदाभेद सोडण्याचा आग्रह हिंदू धर्मग्रंथांच्या शिकवणीच्या अनुरूपच होता. पण तात्कालिक समाजातील जातीच्या उतरंडीतील प्रत्येक मडके इतके स्वार्थलोलुप झालेले होते की बहुतेकांना हे विचार कधी समजले नाही. किंबहुना आपल्या खालील मडक्याच्या शोषणातून मिळणाऱ्या स्वार्थाच्या आड हे विचार येत असल्याने त्यांना ते समजूनच घ्यायचे नव्हते. सगळे शिकले तर आमच्या शेतात आणि घरात कोण राबेल? त्यासाठी समजातील बहुतेक लोकसंख्येला शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. यात सवर्ण स्त्रियांचाही समावेश होता.
समाजातील काही स्वार्थी घटकांनी फुले दांपत्याला अनेक प्रकारे त्रास दिला. पण त्याच समाजातील काही सुज्ञ आणि निस्वार्थी लोकांनी त्यांना तितकीच मदत सुद्धा केली. तात्यासाहेब गोवंडे, कृष्णाशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित, महादेव रानडे यांच्या सारखे ब्राह्मण, बहुजन समाजातील अनेक लोक आणि उस्मान-फातिमा शेख दाम्पत्या सारखे मुस्लिम लोक सुद्धा फुले दांपत्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. काही चांगल्या इंग्रजांनी सुद्धा त्यांना मदत केली. अशा चांगल्या लोकांच्या मदतीने पुढे फुले दांपत्याने मुलींसाठी आणि दलित मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या.
त्या काळी लहानपणी लग्ने होत. तसेच स्त्री आणि पुरुषाच्या लग्नाच्या वयात अंतर पण फार असे. अगदी लहान मुलींचे म्हाताऱ्या वरासोबत लग्न होई. वैद्यकिय सुविधा अभावी मृत्युदर प्रचंड होता. बायको मेली तर बाप्या लगेच पुढील लग्न करून मोकळा व्हायचा. पण नवरा मेला तर विधवेला पुर्णविवाह करण्याची परवानगी नसे. तिच्या शारीरिक गरजांशी कुणाला काही देणे घेणे नसे. पण प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रकृतीने शारीरिक गरज हा निसर्गधर्म निर्माण केला आहे. जसे शरीर संवर्धन करणारे अन्न वा पाणी टाळल्यास व्याकुळता येते तसाच हा निसर्गधर्म टाळल्यास मनुष्य अगतिक आणि व्याकुळ होतो. त्यातून काही तरुण विधवांचे घरातील जवळच्या नातेवाईकांशी वा शेजारीपाजारील पुरुषांशी शरीरसंबंध येई. बऱ्याचदा घरातील जवळच्या लोकांकडून त्यांच्यावर जबरदस्ती सुद्धा केली जाई. असे जबरदस्तीचे प्रकार आजच्या समाजात सुद्धा सर्रास घडतात. त्या काळी गर्भनिरोधनाच्या कुठल्याही पद्धती उपलब्ध नसल्याने त्या बिचाऱ्या तरुण मुली गर्भवती होत. त्या काळी गर्भपाताची सुद्धा सोय नव्हती. काही दिवसांनी ती गर्भार असल्याचे समोर येई. मग जननिंदेच्या भितीने घरातील लोक तिलाच दोषी ठरवून तिच्यासोबत असलेले सर्व नाते संपवून टाकत. तिला घराबाहेर काढण्यात येई. अशा निराधार स्त्रीयांचे समाजात आणखी शोषण होई. तात्कालिक समाजात हे अतिशय विदारक चित्र अनेकदा पहायला मिळे. चांगल्या घरातील मुली रस्त्यावर येत आणि समाजातील कोल्हे-कुत्रे त्यांचे लचके तोडत. अशा बहुतेत स्त्रीया बाळ जन्मल्यावर त्याला टाकून देत. आई अभावी अशी मुले जगत नसत. सर्व जातीतील विधवा स्त्रियांचे असे हाल चालले होते. पण या समस्येवर कुणी बोलायला सुद्धा धजत नव्हते. जोतीरावांनी सर्वप्रथम याविरुद्ध आवाज उठवला. परिस्थितीने अगतिक झालेल्या अशा निराधार मुलींचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेल्या कोल्ह्या-कुत्र्यां पासून त्यांचे रक्षण करण्याचा निर्णय फुले दांपत्याने घेतला. अशा स्त्रियांना होणाऱ्या बाळांना आधार दयायचे ठरवले. त्यांच्यासाठी फुले दांपत्याने 1863 मध्ये एक होस्टेल सुरू केले. ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ असे त्याचे नाव ठेवले. आपले बाळ रस्त्यावर टिकणे बालहत्याच आहे असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे गर्भार स्त्रियांवर आपले बाळ रस्त्यावर न टाकण्याचे नैतिक दडपण निर्माण झाले. त्या या संस्थेत दाखल होऊ लागल्या. सावित्रीबाईंनी या निराधार मुलींचे रक्षण तर केलेच पण त्यांच्या डिलिव्हरी सुद्धा केल्या. बाळांना याच्या सानिध्यात ठेऊन या बाळांचे जीव वाचवले. यापैकी एका ब्राह्मण विधवा मुलीचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. त्याचे नाव त्यांनी यशवंत ठेवले. फुले दांपत्याच्या नावे हे एकमेव मूल आहे. हा यशवंत पुढे मोठा डॉक्टर झाला. जोतीराव आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे मुलगा डॉ यशवंत आणि सून राधाबाईने चालवला.
जसे फुले दांपत्याचे वय आणि कार्य वाढत चालले तसे ज्योतिराव-सावित्रीबाईंना आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी पुढील फळी तयार करणे गरजेचे झाले. कार्य मोठे झाले तसे अनेक लोक त्यांच्या या कार्याशी जोडले गेले. ज्योतिराव-सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारी तरुणांची फळी निर्माण झाली. 1873 साली फुलेंनी तरुणांच्या या फळीला सत्यशोधक समाज असे नाव दिले. या दुसऱ्या फळीत 316 सदस्य तयार झाले होते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विषमता दूर करणे, सर्वांना समान अधिकार मिळवून देणे आणि अंधश्रद्धा दूर करणे हे होते. दुसऱ्या फळीत 316 सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी जाऊन सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. दुसऱ्या फळीने ज्योतिरावांचे प्रबोधनाचे कार्य खेड्यापाड्यापर्यंत नेऊन पोहचवले.
स्त्री शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निवारण, दलितांसाठी पाणी पुरवठा, विधवा पुनर्विवाह, कुमारी गर्भवती आणि गर्भवती विधवांसाठी हॉस्टेल, अन्य जातीच्या मुलांना दत्तक घेणे, सत्यशोधक समाजाची स्थापना अशा क्रांतिकारी बदलांचा त्या काळात समाज विचारसुद्धा करू शकत नव्हता. मात्र अशा काळात समाजाचा सर्व प्रकारचा विरोध पत्करून जोतीराव आणि सावित्रीबाईंनी हे दिव्य केली.
एका मनुष्याच्या कार्याने त्याच्या आयुष्यात संपूर्ण समाजाला बदलण्याइतके किंवा समाजात दृष्य परिणाम समोर येण्या इतके मोठे बदल घडणे अवघड असते. ‘या जन्मात असा चांगला बदल घडणे शक्य नाही’ हा विचार मनात आल्यास बहुतेक जाणते लोक हातोत्साही होऊन निष्क्रीय होतात. बहुतेक लोक सुरुवात सुद्धा करत नाहीत. काही लोकांनी सुरुवात केली तरी इच्छित बदल लवकर न दिसल्याने त्यांचा उत्साह मावळतो. मग ते कार्य मध्येच बंद पडते. क्रांतिकारी बदल करण्याची सर्वप्रथम सुरुवात करणाऱ्यांवर समाजातील काही घटकांकडून सर्वात मोठा आघात होतो. तो सहन करण्याची ताकद भल्याभल्यांमध्ये नसते. सामाजिक अधःपतन झाल्याने नुकत्याच गुलामगिरीत पडलेल्या भारतात कुणीतरी कुठेतरी सुरुवात करून समाजसुधारकांच्या पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत होणे गरजेचे होते. आपल्या नावाला जगात ज्योतीरावांनी क्रांतीची ज्योती पेटवण्याचे हे महत्वाचे काम केले. त्यांनी ही ज्योत नुसती पेटवली नाही, तर आयुष्यभर समाजाचे आघात सहन करत तिला तेवत ठेवली. याच ज्योतीच्या उजेडात भारतातील समाजसुधारकांच्या पुढील पिढ्यांनी आपले मार्गक्रमण केले. हळूहळू समाज सुशिक्षित होऊ लागला. या *विद्ये* मुळे समाजात योग्य निर्णय क्षमता म्हणजे *मती* आली. गटातटात विभागलेल्या समाजाने संघटीत होऊन गुलामगिरी विरुद्ध आंदोलन करण्याची *नीती* स्विकारली. भारतात अहिंसक आणि क्रांतिकारी असे दोन्ही आंदोलन उभे राहिली. सुशिक्षित लोकांच्या पाठींब्याने या आंदोलनाला खरी *गती* मिळाली. त्यातून शेवटी 1947 साली भारत स्वतंत्र झाला. जनतेच्या शिक्षणामुळे अर्थव्यवस्थेला *गती* मिळून भारताकडे आता पुन्हा *वित्त* जमा होते आहे. त्यामुळे अनेक वर्षे गुलामगिरी आणि शोषण सहन करूनही केवळ 70-80 वर्षात आज भारत पुन्हा आर्थिक महासत्तेच्या आणि विश्वगुरु होण्याच्या दिशेने समर्थपणे वाटचाल करतो आहे.
राष्ट्राची कोसळली इमारत पुन्हा उभी करण्यासाठी पायाभरणी करणाऱ्या या क्रांतिसूर्याची काल जयंती होती!
रस्ते, अनेक असतात वाट वळणाचे वाकडे तिकडे सरळ दिशाभूल करणारे आपल्या नशिबी कोणता आहे, हे माहित नाही म्हणून गप्प बसायचे नसते, वाट जरी लहान असली तरी ती मुख्य रस्त्याला मिळणार आहे हे ध्यानी ठेवायचे असते…
पाहिजे ती दिशा दाखवणारेही भेटतात, नाही असे नाही, चांगुलपणा पार संपला असे मानण्याचेही कारण नाही, आमच्या पिढीत अशी चांगला रस्ता दाखवणारी महान माणसे होती, म्हणून मूठ मूठ धान्य जमवून वसतीगृहे काढून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून कर्वे, व कर्मविरांसारख्यांनी अनेक रस्ते दाखवून उपकृत केले व साने गुरूजींसारखे महात्मे शिकून देशासाठी समर्पित झाले.
राजर्षी शाहू महाराजांनी सर्वधर्मियांसाठी वसतीगृहे स्थापन करून कागल सारख्या छोट्या रस्त्यावरून डॅा. आनंद यादव पुण्याच्या रस्त्याला लागून माय मराठीची सेवा करण्यासाठी पुणे येथे डीन झाले, अन्यथा रोज भाकरीची भ्रांत असणाऱ्या अशा कुटुंबातील किती मुले रस्ता चुकून त्यांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
म्हणून रस्ते लहान असले तरी त्यांना जोडणारे हमरस्ते असतात हे लक्षात घेऊन आपण चालत रहायचे असते म्हणजे आपण बरोबर इच्छित स्थळी पोहोचतो. ध्येय आणि निष्ठा मात्र प्रामाणिक हवी. वाट कितीही लहान असली तरी ती वाट असते सतत पुढे पुढे जाणारी व आपली ताकद संपली की चालणाऱ्याला महान रस्त्यावर सोडून महान बनवणारी त्या अर्थाने वाटही महानच असते ना?
ती सांगते, जा बाबांनो पुढे, माझे काम संपले, मी पुढचा मार्ग दाखवला आहे, तो थेट शिखरावर जातो, तुमच्या पायात मात्र बळ हवे, ते वापरा व इच्छित स्थळी पोहोचा. सारेच महान, लहान वाटेवरून चालतच महान झाले हे आपण विसरता कामा नये. आंबेडकरही आंबेवडीहून चालत(कोणी बैलगाडीत बसवेना)थेट संसदेत पोहोचत संविधान कर्ते झाले, “ आचंद्रसूर्य” तळपण्यासाठी. म्हणून आधी त्या वाटेला वंदन करा ज्यामुळे तुम्ही हमरस्त्याला येऊन मिळालात. रस्ते उपलब्ध असले तरी ते कसे वापरायचे याचे ज्ञान हवे नाहीतर सारीच गणिते फसतात. दिशाभूल करणाऱ्या पाट्या व चकवे ज्यांना ओळखता आले ते थेट मुक्कामी पोहोचतात बाकी मग आयुष्याची संध्याकाळ झाली तरी चाचपडत वेड्यामुलासारखे गोल गोल त्याच रस्त्यावर फिरत राहतात. रस्ते असले तरी अंगभूत शहाणपणा हवाच ना? तो नसेल तर शंभर रस्ते असले काय नि नसले काय? तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. रस्ते दिशादर्शक व शहाण्या मुलासारखे असतात. विना तक्रार घेऊन जातात, काटेकुटे वादळवाऱ्याची पर्वा न करता न थांबता…
कारण.. ” रस्ता कधीही थांबत नसतो, क्षितिजा पर्यंत”…
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ४ – संत सोयराबाई… ☆ सौ शालिनी जोशी ☆
संत सोयराबाई या संत चोखोबांची पत्नी होत्या. १४ व्या शतकातील मंगळवेढ्याचे हे कुटुंब. नवऱ्याबरोबर ग्राम स्वच्छतेत काम करणाऱ्या सोयराबाई पण त्यानी सांगितलेले तत्त्वज्ञान अचंबित करते. जातीव्यवस्थेला प्रश्न विचारून दलीतांच जगणं त्यांनी वेशीवर मांडलं. त्यांना चोखोबा गुरुस्थानी होते. चोखोबांची सगुणभक्ती, नामभक्ती, अभंग रचना या अध्यात्मिक जगाबरोबर त्यांच्या गरिबीतल्या संसारातही त्या अर्धांगिनी होत्या. नामस्मरणातून त्यांनी भक्तीयोग सांगितला. त्या म्हणतात,
नामेची पावन होती जगी जाण l नाम सुलभ म्हणा विठोबाचे ll
संसार बंधने नामेचि तुटती l भक्ती आणि मुक्ती नामापाशी ll
त्यांची नामभक्ती हे त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत. असे ९२ अभंग त्यांनी लिहिले आणि अभिमानाने स्वतःचा उल्लेख ‘महारीचोखियाची’ असाच केला. त्यांच्या अभंगांची भाषा साधी, सरळ, सोपी पण रसाळ आहे. हळूहळू सगुणाच्या वाटेकडून निर्गुणाच्या वाटेकडे त्या चालू लागल्या आणि मग शब्द स्फुरु लागले.
अवघा रंग एक झाला l रंगी रंगला श्रीरंग ll १ ll
मी तू पण गेले वाया l पाहता पंढरीच्या राया ll. २ ll
नाही भेदाचे ते काम lपळून गेले क्रोध काम ll ३ ll
देही असोनि विदेही l सदा समाधिस्थ पाही ll ४ ll
पाहते पाहणे गेले दूरी l म्हणे चोखियाची महारी ll५ ll
किती सोप्या भाषेत सोयराबाईनी आपला अनुभव सांगितला. शेकडो वर्षे लोटली तरी आजही ते शब्द आपलं मन हळव करतात, मंगल करतात. किशोरीताईंच्या स्वर्गीय आवाजाने हा अनुभव अमर केला आहे.
शूद्रांच्या सावलीचाही विटाळ मानण्याचा तो काळ होता. तरीही त्यांनी भागवतांच्या मांदियाळीत मानाचे स्थान मिळवले. समाजाने त्या कुटुंबाचा छळ केला. खालची म्हणून नुसता अपमान नाही तर मारही खावा लागला. ती व्यथा सोयराबाईंच्या अभंगातून दिसते. त्या म्हणतात, ‘हीन हीन म्हणूनी का ग मोकलिये l परि म्या धरिले पदरी तुमच्याl’ विठोबाच्या दर्शनाची आज धरली म्हणून बडव्यांनी चोखोबाना कोंडून मारले. इच्छा असूनही देवाची भेट झाली नाही.
सोयराबाईनी शरीराच्या विटाळा संबंधी धर्मशास्त्रने निर्माण केलेल्या कल्पना साफ नाकारल्या. देहापासून निर्माण झालेली आणि देहात गुंतून पडलेली विटाळाची संकल्पना त्या स्पष्ट करतात. देहाच्या निर्मितीमध्ये विटाळ ही सक्रिय सहभागी झालेला असतो. म्हणून देह आहे तेथे विटाळ असणारच. मग कोणताही वर्ण विटाळातून अलिप्त राहू शकत नाही. असे असेल तर सर्व मानव जातच विटाळलेली, अपवित्र, अस्पृश्य म्हटली पाहिजे. म्हणून स्त्रिया आणि शूद्र यांच्यावर केलेला विळालाचा आरोप मानवनिर्मित आहे. असा तर्कशुद्ध युक्तिवाद सोयराबाईनी केला. त्या थेट पांडुरंगालाच प्रश्न विचारतात,
देहासी विटाळ म्हणती सकळ l आत्मा तो शुद्ध बुद्ध ll
देहाचा विटाळ देहीच जन्मला l सोवळा तो झाला कवण धर्म ll
विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान l कोणी देह निर्माण नाही जगी ll
म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी l विटाळ देहांतरी वसतसे ll
देहीचा विटाळ देहीच निर्धारी l म्हणतसे महारी चोखियाची ll
यातून विटाळाची संकल्पना जीवशास्त्रीय असल्याचे त्या स्पष्ट करतात.
उशीराने पुत्र प्राप्ती झाल्यावर आनंदीत झालेली सोयरा बारशासाठी विठ्ठलरखमाईला आमंत्रण देते. ‘विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदानी’ असे ती म्हणते. असे म्हणतात की विठ्ठल तिचे बाळंतपण करण्यासाठी तिच्या नणंदेचे, निर्मलेचे रूप घेऊन एक महिना तिच्या घरी राहिला होता. शेवटी देव भावाचा भुकेला. कर्ममेळा हा सोयराबाईं चा मुलगा. निर्मळा ही नणंद तर बंका हा निर्मळेचा नवरा. हे सर्व कुटुंब विठ्ठल भक्त. सर्वांनी चोखोबांना गुरुस्थानी मानलं होतं. सर्वांच्याच अभंग रचना अर्थपूर्ण व परिस्थितीचे चित्र उभे करणाऱ्या आहेत. पराकोटीचे दारिद्र्य, अपमान, अवहेलना व्यक्त करण्याचे अभंग हेच एकमेव साधन त्यांच्याकडे होते. संतांच्या मांदियाळीत हे कुटुंब वेगळे उठून दिसते.
सोयराबाईंची समाजाचे उपेक्षा केली. त्यांना लिहिला वाचायला येत नव्हतं म्हणून त्या निरक्षर असल्या तरी त्याच खऱ्या सुशिक्षित, सुसंस्कृत ठरतात.
अगदी मोजक्या शब्दात काव्याची केलेली व्याख्या. सर्वांना पटेल आणि रुचेल अशीच,.
कोण असतो कवी ?
काय असतं काव्य ?
व्हिक्टर ह्युगो म्हणतात, त्याप्रमाणे कवी म्हणजे एका देह कोशात सामावलेली समग्र सृष्टी.
एखाद्याला जे काही सांगायचंय ते गद्यात चार पाने किंवा चारशे पाने होईल. आणि तेच काव्यात फक्त चार ओळीत सांगता येईल,. ही आहे ताकद कवितेची.
सुख दुःख, प्रेम विरह, श्रीमंती गरिबी, आई वडिल, परमेश्वर, पंचमहाभुते, भूत भविष्य वर्तमान, कुठलाही विषय कवीला आणि पर्यायाने काव्याला वर्ज्य नाही.
एकाच कवितेतून प्रत्येक रसिक वेगवेगळा अनुभव घेऊ शकतो.
कसं असतं काव्य?
अक्षरे सांधुनी ओली
शब्दांचे राऊळ झाले
अर्थाच्या गाभाऱ्याशी
कवितेचे विठ्ठल आले
आणि अशा काव्याला म्हणावंच लागत नाही की,
” माझे काव्य रसाळ रंजक असे
ठावे जरी मन्मना
” द्याहो द्या अवधान द्या ” रसिकहो
का मी करू प्रार्थना ? “
रसिकहो, कवी या शब्दाच्या भोवती किती आवरणं असावीत? आणि काव्याचे तरी किती प्रकार?
ओवी, अभंग, श्लोक, भूपाळी, आरती, वेचे, कविता, गझल, अष्टाक्षरी, भावगीत, भक्तीगीत, बालगीत, बडबडगीत, बोलगाणी, पाळणे, डोहाळे, उखाणे, लावणी, पोवाडे ‘, समरगीत, स्फूर्ती गीत, देशभक्ती गीत, प्रार्थना अबबब. आणखी कितीतरी आहेत. तरीही कवीची ही काव्यकन्या दशांगुळे उरलेली असतेच.
जवळजवळ प्रत्येक कवीने काव्या विषयी खूप काही लिहून ठेवलंय
केशवसुत तर साभिमान म्हणतात
आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे
आणि हे खरं आहे. श्री रामप्रभू घराघरात पोहचले कारण, वाल्मिकी, तुलसीदास आणि आधुनिक वाल्मिकी गदिमा यांच्यामुळे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.
कवी हा आपल्याच एका विश्वात रमणारा प्राणी असतो. त्याच्या आनंदात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवं. कवीला येणारा अनुभव हा साधुसंतांना येणाऱ्या आध्यात्मिक आनंदाच्याच जातीचा असतो.
कवितेवर जो प्रेम करू शकतो, काव्यानंदाचा जो उपभोग घेऊ शकतो, त्याचा आत्मा कधीही मलीन होणे शक्य नाही. त्याच्या ठायी मानवी दोष, उणिवा, दुबळेपणा, असेलही कदाचित, पण त्याचा आत्मा मात्र सदैव एका तेजोमय वातावरणात भरारी घेत असतो. प्रत्येक कवी हा ” ज्ञानोबामाऊली तुकाराम ” या मध्यमपदलोपी समासा इतकाच मोठा आहे.
उंची इमला शिल्प दाखविल
शोभा म्हणजे काव्य नव्हे
काव्य कराया जित्या जिवाचे
जातीवंत जगणेच हवे
राहिला प्रश्न रासिकाचा
रसिकहो थोडेसे तरी काव्य आपल्या वृत्तीत असल्याखेरीज तुम्हाला खऱ्या काव्याचा साक्षात्कार कुठेही होणार नाही.
(पूर्वसूत्र – ही घटना म्हणजे – दत्तसेवेबद्दलची नकळत माझ्या मनावर चढू पहाणारी सूक्ष्मशा अहंकाराची पुटं खरवडून काढण्याची सुरुवात होती हे त्या क्षणी मला जाणवलं नव्हतंच. पण आम्हा सगळ्यांचंच भावविश्व उध्वस्त करणाऱ्या पुढच्या सगळ्या घटनाक्रमांची पाळंमुळं माझ्या ताईच्या श्रद्धेची कसोटी बघणारं ठरलं एवढं खरं! त्या कसोटीला ताई अखेर खरी उतरली पण त्यासाठीही तिने पणाला लावला होता तो स्वतःचा प्राणपणाने जपलेला स्वाभिमानच!!)
“हे गजानन महाराज कोण गं?” त्यादिवशी मी कांहीशा नाराजीने ताईला विचारलेला हा प्रश्न. पण ‘ते कोण?’ हे मला पुढे कांही वर्षांनी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर समजलं. अर्थात तेही माझ्या ताईमुळेच. तिच्या आयुष्यात आलेल्या, तिला उध्वस्त करू पहाणाऱ्या चक्रीवादळातही गजानन महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच ती पाय घट्ट रोवून उभी राहिलीय हे मी स्वतः पाहिलं तेव्हा मला समजलं. पण त्यासाठी मला खूप मोठी किंमत मोजावी लागली होती! तिचं उध्वस्त होत जाणं हा खरं तर आम्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का होता! या पडझडीत ते ‘आनंदाचं झाड’ पानगळ सुरू व्हावी तसं मलूल होत चाललं.. आणि ते फक्त दूर उभं राहून पहात रहाण्याखेरीज आम्ही काहीही करू शकत नव्हतो. नव्हे आम्ही जे करायला हवे होते ते ताईच आम्हाला करू देत नव्हती हेच खरं. तो सगळाच अनुभव अतिशय करूण, केविलवाणा होता आणि टोकाचा विरोधाभास वाटेल तुम्हाला पण तोच क्षणभर कां होईना एका अलौकिक अशा आनंदाचा साक्षात्कार घडवणाराही ठरणार होता !!
एखाद्या संकटाने चोर पावलांनी येऊन झडप घालणे म्हणजे काय याचा प्रत्यय आम्हा सर्वांना आला तो ताईला गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा! या सगळ्याबाबत मी मात्र सुरूवातीचे कांही दिवस तरी अनभिज्ञच होतो. मला हे समजलं ते तिची ट्रीटमेंट सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर. कारण मी तेव्हा विदर्भ मराठवाड्यातल्या ब्रॅंचेसचा ऑडिट प्रोग्रॅम पूर्ण करण्यांत व्यस्त आणि अर्थातच घरापासून खूप दूर होतो. तेव्हा मोबाईल नव्हते. त्यामुळे मला वेळ मिळेल तसं मीच तीन चार दिवसांतून एकदा रात्री उशीरा लाॅजपासून जवळच असलेल्या एखाद्या टेलिफोन बूथवरून घरी एसटीडी कॉल करायचा असं ठरलेलं होतं. कामातील व्यस्ततेमुळे मी त्या आठवड्यांत घरी फोन करायचं राहूनच गेलं होतं आणि शिळोप्याच्या गप्पा मारायच्या तयारीने नंतर भरपूर वेळ घेऊन मी उत्साहाने घरी फोन केला, तर आरतीकडून हे समजलं. ऐकून मी चरकलोच. मन ताईकडे ओढ घेत राहिलं. ताईला तातडीनं भेटावंसं वाटत होतं पण भेटणं सोडाच तिच्याशी बोलूही शकत नव्हतो. कारण तिच्या घरी फोन नव्हता. ब्रँच ऑडिट संपायला पुढे चार दिवस लागले. या अस्वस्थतेमुळे त्या चारही रात्री माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. आॅडिट पूर्ण झालं तशी मी लगोलग बॅग भरली. औरंगाबादहून आधी घरी न जाता थेट ताईला भेटण्यासाठी बेळगावला धाव घेतली. तिला समोर पाहिलं आणि.. अंहं… ‘डोळ्यात पाणी येऊन चालणार नाही. धीर न सोडता, आधी तिला सावरायला हवं.. ‘ मी स्वत:लाच बजावलं.
“कशी आहे आता तब्येत?”… सगळ्या भावना महत्प्रयासाने मनांत कोंडून टाकल्यावर बाहेर पडला तो हाच औपचारिक प्रश्न!
“बघ ना. छान आहे की नाही? सुधारतेय अरे आता.. “
ताईच्या चेहऱ्यावरचं उसनं हसू मला वेगळंच काहीतरी सांगत होतं! ती आतून ढासळणाऱ्या मलाच सावरू पहातेय हे मला जाणवत होतं.
केशवरावसुद्धा दाखवत नसले तरी खचलेलेच होते. त्यांच्या हालचालीतून, वागण्या बोलण्यातून, उतरलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलता बोलता भरून येतायत असं वाटणाऱ्या डोळ्यांवरून, त्यांचं हे आतून हलणं मला जाणवत होतं!
मी वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान. त्यांची समजूत तरी कशी आणि कोणत्या शब्दांत घालावी समजेचना.
“आपण तिला आत्ताच मुंबईला शिफ्ट करूया. तिथे योग्य आणि आवश्यक उपचार उपलब्ध असतील. ती सगळी व्यवस्था मी करतो. रजा घेऊन मी स्वत: तुमच्याबरोबर येतो. खर्चाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. तुम्ही खरंच अजिबात काळजी करू नका. ताई सुधारेल. सुधारायलाच हवी…. “
मी त्यांना आग्रहाने, अगदी मनापासून सांगत राहिलो. अगदी जीव तोडून. कारण थोडंसं जरी दुर्लक्ष झालं, उशीर झाला,.. आणि ताईची तब्येत बिघडली तर.. ? ती.. ती गेली तर?.. माझं मन पोखरू लागलेली मनातली ही भीती मला स्वस्थ बसू देईना.
केशवरावांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आणि मलाच धीर देत माझी समजूत घातली. बेळगावला अद्ययावत हॉस्पिटल आहे आणि तिथे सर्व उपचार उपलब्ध आहेत हे मला समजावून सांगितलं. त्यांनी नीट सगळी चौकशी केलेली होती आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वदृष्टीने विचार केला तर तेच अधिक सोयीचं होतं. मी त्यापुढं कांही बोलू शकलो नाही. ते सांगतायत त्यातही तथ्य आहे असं वाटलं, तरीही केवळ माझ्याच समाधानासाठी मी तिथल्या डॉक्टरांना आवर्जून भेटलो. त्यांच्याशी सविस्तर बोललो. माझं समाधान झालं तरी रूखरूख होतीच आणि ती रहाणारच होती!
केमोथेरपीच्या तीन ट्रीटमेंटस् नंतर ऑपरेशन करायचं कीं नाही हे ठरणार होतं. ती वाचेल असा डॉक्टरना विश्वास होता. तो विश्वास हाच आशेचा एकमेव किरण होता! केमोचे हे तीन डोस सर्वसाधारण एक एक महिन्याच्या अंतराने द्यायचे म्हणजे कमीत कमी तीन महिने तरी टांगती तलवार रहाणार होतीच आणि प्रत्येक डोसनंतरचे साईड इफेक्ट्स खूप त्रासदायक असत ते वेगळंच.
ताईचं समजल्यावर माझी आई तिच्याकडे रहायला गेली. त्या वयातही आपल्या मुलीचं हे जीवघेणं आजारपणही खंबीरपणे स्वीकारून माझी आई वरवर तरी शांत राहिली. घरातल्या सगळ्या कामांचा ताबा तिने स्वतःकडे घेतला. तिच्या मदतीला अजित-सुजित होतेच. औषधं, दवाखाना सगळं केशवराव मॅनेज करायचे. ताईचे मोठे दीर-जाऊ यांच्यापासून जवळच रहायचे. त्यांचाही हक्काचा असा भक्कम आधार होताच. हॉस्पिटलायझेशन वाढत राहिलं तेव्हा योग्य नियोजन आधीपासून करून तिथं दवाखान्यांत थांबायला जायचं, आणि एरवीही अधून मधून जाऊन भेटून यायचं असं माझ्या मोठ्या बहिणीने आणि आरतीने आपापसात ठरवून ठेवलेलं होतं. प्रत्येकांनी न सांगता आपापला वाटा असा उचलला होता. तरीही ‘पैसा आणि ऐश्वर्य सगळं जवळ असणाऱ्या माझं या परिस्थितीत एक भाऊ म्हणून नेमकं कर्तव्य कोणतं?’ हा प्रश्न मला त्रास देत रहायचा. जाणं, भेटणं, बोलणं.. हे सगळं सुरू होतंच पण त्याही पलिकडे कांही नको? सुदैवाने ताईच्या ट्रीटमेंटचा संपूर्ण खर्च करायची माझी परिस्थिती होती. मला कांहीच अडचण नव्हती. ‘हे आपणच करायला हवं’ असं मनोमन ठरवलं खरं पण आजवर माझ्यासाठी ज्यांनी बराच त्याग केलेला होता त्या माझ्या मोठ्या बहिणीला आणि भावाला विश्वासात न घेता परस्पर कांही करणं मलाच प्रशस्त वाटेना. मी त्या दोघांशी मोकळेपणानं बोललो. माझा विचार त्यांना सांगितला. ऐकून भाऊ थोडा अस्वस्थ झाला. त्याला कांहीतरी बोलायचं होतं. त्याने बहिणीकडं पाहिलं. मग तिनेच पुढाकार घेतला. माझी समजूत काढत म्हणाली, ” तिच्या आजारपणाचं समजलं तेव्हा तू खूप लांब होतास. तू म्हणतोयस तशी तयारी मी आणि हा आम्हा दोघांचीही आहेच. शिवाय मी आणि ‘हे’ सुद्धा खरंतर लगेचच पैसे घेऊन बेळगावला भेटायला गेलो होतो. केशवरावांना पैसे द्यायला लागलो, तर ते सरळ ‘नको’ म्हणाले. ‘सध्या जवळ राहू देत, लागतील तसे खर्च करता येतील’ असंही ‘हे’ म्हणाले त्यांना, पण त्यांनी ऐकलं नाही. “मला गरज पडेल तेव्हा मीच आपण होऊन तुमच्याकडून मागून घेईन’ असं म्हणाले. मला वाटतं, या सगळ्यानंतर आता तू पुन्हा त्यांच्याकडे पैशाचा विषय काढून लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. जे करायचं ते आपण सगळे मिळून करूच, पण ते त्या कुणाला न दुखावता, त्यांच्या कलानंच करायला हवं हे लक्षा़त ठेव. ” ताई म्हणाली.
केशवराव महिन्यापूर्वीच रिटायर झाले होते. फंड आणि ग्रॅच्युइटी सगळं मिळून त्यांना साडेतीन लाख रुपये मिळालेले होते. अजित आत्ता कुठे सी. ए. ची तयारी करीत होता. सुजितचं ग्रॅज्युएशनही अजून पूर्ण व्हायचं होतं. एरवी खरं तर इथून पुढं ताईच्या संसारात खऱ्या अर्थाने स्वास्थ्य आणि विसावा सुरू व्हायचा, पण नेमक्या त्याच क्षणी साऱ्या सुखाच्या स्वागतालाच येऊन उभं राहिल्यासारखं ताईचं हे दुर्मुखलेलं आजारपण समोर आलं होतं.. !
“तुला.. आणखी एक सांगायचंय…. ” मला विचारांत पडलेलं पाहून माझी मोठी बहिण म्हणाली.
पण…. आहे त्या परिस्थितीत ती जे सांगेल ते फारसे उत्साहवर्धक नसणाराय असं एकीकडे वाटत होतं आणि ती जे सांगणार होती ते ऐकायला मी उतावीळही झालो होतो… !!
गाईगुर, वासरं, म्हशीरेडक, शेळ्या यांनी भरलेला गोठा हे श्रीमंतीचं लक्षण समजले जातं. ती एक संपत्तीच होय. शेतकरी माणसाच्या घरी स्वतःचे बैल असणे हे ही एक श्रीमंतीचे लक्षण होय. आता जरी ट्रँक्टर आले असले तरीही किरकोळ कामाला बैलच उपयोगी पडतात. त्यांच्यावरच शेतकऱ्यांचा संसार, घरं उभी राहीलेली असतात. काही वेळा या शेतकऱ्यांच्या घरापेक्षा गोठाच मोठा असतो. मग त्यात पोटमाळाही असतो. खाली जनावरे आणि पोटमाळ्यावर गवत, पेंडीची पोती, तसेच धांन्याच्या कणग्या, एका बाजूला उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या शेणी अस बरच काही ठेवता येते. मग त्यात गाईच्या शेणाच्या वेगळ्या व इतर जनावरांच्या शेणाच्या वेगळ्या करून ठेवल्या जातात. गाईच्या शेणाच्या शेणी देवक्रुत्यासाठी केल्या जाणाऱ्या होम, यज्ञ, याग यासाठी वापरल्या जातात. त्याचप्रमाणे गाईच्या शेणापासून तयार केलेल्या शेणींचा उपयोग करून त्यात कापूर, हळद, डिंक घालून दात घासायला वापरायची राखुंडीही तयार करण्यात येते. या शेणी सोवळ्याचा स्वयंपाक करतांना चुलीत जाळायला, बाळंतीण, बाळाला शेकशेगडीसाठी ही वापरतात.
आपल्या हिंदू धर्मात तर गाईला खूप महत्त्व आहे. तीला गोमाता म्हणतात. गाईगुरांच्या संगतीने वाढलेला आपला देव श्री क्रुष्ण तर सर्वांनाचाच आवडता देव आहे. त्याच्या मुरलीचे स्वर तर या गाईंना नेहमीच भान हरपायला लावत होते. आणि आपलेही भान या मुरलीच्या स्वरांनी हरपतेच.
लहानपणी लपाछपी खेळताना गोठा हेही एक लपण्याचे ठिकाण असे. गोठ्यात लपलेला खेळगडी लवकर सापडत नसे. तसेच बालपणी एखादा हट्ट मोठ्या माणसांनी पुरवला गेला नाही म्हणून गोठ्यात रुसून बसलेल्याच्याही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तसेच एखादी माहेरवाशीण आपला सासरी झालेला छळ आठवून आईवडिलांच्या नकळत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिल्याच्याही अनेक कथा आपण ऐकत असतो. कधीतरी एखादा महत्त्वाचा निर्णयही या गोठ्यातच ठरवला जातो. तर काही वेळा तिथंच प्रेमाच हितगूज किंवा महत्त्वाची गोष्ट गुपचुप एखाद्याला सांगायला ही ह्याच गोठ्यात बोलावले जाते.
खूप ठिकाणी विशेषतः कोकणात एखादा माणूस मरण पावला की त्याच्या आकऱ्याव्या, बाराव्या, तेराव्या दिवसाचा स्वयंपाकही निशिद्ध मानला जात असल्याने व खूप ठिकाणी ह्यावेळी जेवणारे ब्राह्मण मिळत नाहीत. त्यामुळे तो स्वयंपाक या गोठ्यात करून तिथेच अशी पाने वाढून नंतर ती पाने वाढल्याचे शास्र करून मग ती पाने नदीत सोडून देण्याचीही प्रथा आहे.
हल्लीच्या दिवसात तर गाईगुरं नसलेल्या रिकाम्या गोठ्यात कोरांटिईन केलेल्या माणसांची सोय केली गेल्याच्या बातम्याही ऐकू येतात. तर असा हा गोठा खूप महत्त्वाचे ठिकाण आहे.
☆ 🐱 रागावलेले प्राणी 🐜 ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आज एक मुंगीची इमेज बघितली आपल्या गुगल बाबांची कृपा! आणि ती इमेज बघून एकदम घाबरलेच. आपली साधी घरात वावरणारी वेळेला आपल्या कपड्यांवर,अंगावर फिरणारी हीच ती मुंगी का? असा प्रश्न पडावा आणि भीती वाटावी असा तिचा चेहरा दिसत होता. एक विचार असा आला की देव मुंगी ( आपली गुदगुल्या करणारी काळी मुंगी ) आपल्याला चावत नाही. आपणच बरेचदा तिला त्रास देतो. म्हणूनच या लाल मुंग्यांना राग येत असावा आणि स्वत:ला मिळणारी वागणूक आणि काळ्या मुंगीला मिळणारी वागणूक हे दोन्ही मिळून ती एवढी रागीट चेहेऱ्याने आपल्याला कडकडून चावत असावी. 🐜
असेच सकाळी सकाळी म्हणजे साखर झोपेत असताना कोंबडा इतका कर्कश्श का ओरडत असावा? आमच्या शेजारच्या घरातील कोंबडा तर घड्याळाच्या दर तासाला नियमित पडणाऱ्या ठोक्या प्रमाणे दर तासाला आरवतो. बहुतेक दिवसभर त्याला माणसांच्या आवाजाचा जो त्रास होतो त्याचे उट्टे काढत असावा. 🐔
तीच गोष्ट कुत्र्यांची. कितीही लक्ष ठेवा आपला डोळा चुकवून आपण कंबर मोडून स्वच्छ केलेल्या दरवाजावर व त्या समोरील स्वच्छतेवर घाण करून जाणार. अनेक उपाय केले पण कुत्र्यांना आमच्या घरा समोरची जागा फारच आवडली होती. जणू मला चिडवायचे ठरवूनच टाकले होते. मग मी गुगल साहेबांची मदत घेऊन उपाय शोधले आणि उग्र वासाच्या फिनाईलची मदत घेतली. त्याचा कुत्र्यांना एवढा राग आला की त्यांनी रात्रभर निरनिराळ्या आवाजात ( प्रत्येक कुत्र्याचा आवाज वेगळाच असतो म्हणा ) ओरडून माझ्या झोपेवर घाला घातला. असेही वाचनात आले होते की, लाल व निळ्या रंगाचे पाणी भरून बाटलीत ठेवले तर कुत्री, मांजरे यांचा त्रास होत नाही. मग मी पण तो उपाय केला. पण बाटल्या गायब होऊ लागल्या. शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी त्यातील एक बाटली चक्क कुत्र्याच्याच तोंडात बघितली. आणि या रंगीत पाण्याच्या बाटल्या कोण पळवत आहे याचे उत्तर मिळाले.🐶
आमच्या काकांच्या घरी एक लाडाची मांजर होती. कोणी आणले नव्हते. तीच आपणहून आली होती. आणि बळेच सगळ्यांच्या पायात येऊन लाड करून घ्यायची. आम्ही कॅरम खेळायला बसल्यावर तिला खूप राग यायचा. ती त्या बोर्ड वर बराच वेळ बसायची. सोंगट्यांचे बराच वेळ निरीक्षण करायची आणि रागाने आपण स्वतःच सर्व सोंगट्या बिळात पंजाने ढकलून द्यायची. ती इतकी शहाणी होती की एखादा पदार्थ आवडला नाही तर पळून जायची. आणि जबरदस्तीने दिला तर जीभ बाहेर काढून उलटी आल्या सारखे करायची आणि तो पदार्थ देणाऱ्याला पंजाचा प्रसाद द्यायची. 🐱
अशीच एकदा आपण जिला गरीब समजतो अशा शेळीची गंमत कसली, रागच बघितला होता. एका शेळीला एक व्रात्य मुलगा शेपटीला हात लावून,ओढून सारखा त्रास देत होता. चार पाच वेळा ती पुढे पळाली. नंतर मात्र ती त्या मुलाकडे वळली आणि त्याला आपल्या छोट्या शिंगाने मारले. जणू तिने अन्यायाचा प्रतिकार करा हीच शिकवण दिली. 🦙
अशा काही थोड्या गमती,काही राग सहज ओरडणाऱ्या कोंबड्या मुळे आठवले. तशा प्राण्यांच्या बऱ्याच आठवणी,अनुभव व गमती जमती आहेत. त्या पुन्हा केव्हातरी.