मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- समीर जिवंत राहिला तरी कधीच बरा होणार नाही हे डॉ.देवधर यांनी मला अतिशय सौम्यपणे समजावून सांगितलेलं होतं. त्यावेळी त्यांच्या केबिनमधे माझ्याबरोबर आलेले माझे ब्रँचमॅनेजर घोरपडे साहेब होते फक्त. ही गोष्ट घरी किंवा इतर कुणालाच मी मुद्दाम सांगितलेली नव्हती. असं असताना हे लिलाताईला कसं समजलं? मला प्रश्न पडला.)

विशेष म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी कुणाला न विचारताच त्याच दिवशी मला परस्पर मिळणार होतं आणि माझ्या दुःखावर फुंकर घालत मला

दिलासाही देणार होतं हे त्या क्षणी मात्र मला माहित नव्हतं. सगळं घडलं ते योगायोगाने घडावं तसंच.

‘ समीर पृथ्वीवरील औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेल्यामुळे तो बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि बरा होऊन परत येणाराय ‘

हे लिलाताईच्या पत्रातील वाक्य पुत्रवियोगाच्या धक्क्यातून मला अलगद बाहेर घेऊन आल़ं होतं. ही अंतर्ज्ञानाची खूणगाठच होती जशीकांही! एका क्षणार्धात माझं पुत्रवियोगाचं दु:ख विरुनच गेलं एकदम…

“कुणाचं पत्र..?”

“लिलाताईचं. घे. बघ तरी काय लिहलंय? वाच”

ती न बोलता उठली. ‘चहा करते..’ म्हणत आत जाऊ लागली.

“आधी वाच तरी.. मग चहा कर.”

“सांत्वनाचंच पत्र असणार. काय करू वाचून? आपला समीर गेलाय हे कटू सत्य बदलणाराय कां?” तिचा आवाज भरून आला.

“हो बदलणाराय. बघशील तू. आधी वाच..मग तूही कबूल करशील.”

तिने ते पत्र घेतलं. वाचलं. निर्विकारपणे मला परत दिलं.

“तुला हे वाचून खरंच काहीच वेगळं वाटलं नाही?”

“नाही. लिलाताईंचं मराठी भाषेवर प्रभुत्त्व आहे म्हणून त्यांनी चांगल्या भाषेत आपलं सांत्वन केलंय एवढंच. बाकी वेगळं काय आहे त्यात?” ती म्हणाली.

तिचंही बरोबरच होतं. समीरच्या आजारपणाच्या बाबतीतल्या कांही गोष्टी तिला त्रास होऊ नये म्हणून मी त्या त्या वेळी मुद्दामच सांगितल्या नव्हत्या. आता सगळं घडून गेल्यानंतर ते तिला सांगण्यात कशाचाच अडसर नव्हता. ते नाही सांगितलं तर या पत्रातलं मला जाणवलेलं वेगळेपण तिला कसं  जाणवावं….? पण ती ते सगळं समजून घेण्याइतकी सावरलेली नाहीय. सगळं ऐकल्यानंतर ती बिथरली तर? नकोच ते‌. जे सांगायचं ते तिचा मूड पाहून तिच्या कलानेच सांगायला हवं. तरीही ती केव्हा सावरतेय याची वाट पहात आता गप्प राहून चालणार नाही. लवकरात लवकरात लवकर तिला या एकटेपणातून बाहेर काढायलाच हवं….’

कितीतरी वेळ असे उलट सुलट विचार माझ्या मनात गर्दी करत राहिले. तिने चहाचा कप माझ्यापुढे ठेवला आणि मी भानावर आलो. डोळे पुसत ती किचनमधला पसारा आवरु लागली.

“आरती, ऐक माझं. पटकन् जा आणि आवर तुझं. मी तयार होतोय..”

“कां ? कुणी येणार आहे कां?”

“नाही..” मी हसून म्हटलं “कुणीही येणार नाहीय, आपणच जायचंय..”

“आत्ता? कशाला? कुठं जायचंय..?”

मला एकदम लिलाताईच्या माहेरघराची आठवण झाली.ते सर्वजण किर्लोस्करवाडी सोडून कोल्हापूरला आले त्याला दहा वर्षं होत आली होती. सुरुवातीची एक दोन वर्ष कष्टात गेली तरी आता त्यांचं छान बस्तान बसलं होतं.स्वत:चं घर झालं. कोल्हापूरला उद्यमनगरमधे स्वतःचं वर्कशॉप होतं, दोन लेथ होते, मशिनरी स्पेअर पार्टसचं स्वतःचं दुकान होतं. सगळे भाऊ स्वतः राबत होते. दोन वर्षांपूर्वीपासून लिलाताईचे वडिल प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व पसारा मुलांच्या हवाली करून अलिकडे घरी अंथरुणाला खिळून असायचे. क्वचित मधे कधीतरी एक दोनदा कामानिमित्ताने त्या भागात गेल्यानंतर मी उभ्या उभ्या त्यांच्या घरी जाऊन आलो होतो. पण त्यालाही बरेच दिवस गेले होते. शिवाय सगळी हालहवाल लिलाताई वाडीला भेटली की वेळोवेळी तिच्याकडून समजायचीच. माझा लहान भाऊ कोल्हापूरमधेच असल्याने नेहमी त्यांच्या संपर्कात असायचा. त्याच्याकडून चार दिवसांपूर्वीच लिलाताईचे वडील गेल्याचे समजले होते. या रविवारी मी त्यांच्या घरी भेटून यायचे ठरवले होतेच.त्यापेक्षा आरतीलाही बरोबर घेऊन आजच गेलो तर…? हा विचार मनात आला तेव्हाच आरतीने मला पुन्हा विचारले…”सांगा ना, कुठं जायचंय..?”

उद्यमनगरमधे. लिलाताईचे वडील नुकतेच गेलेत. तिच्या आईला भेटून तरी येऊ.” मी म्हणालो.

आरती गप्पच झाली एकदम.

“का गं? काय झालं?”

“नाही… नको.”

“का ?”

“आपला समीर अडीच तीन महिने दवाखान्यात अॅडमिट होता. त्यांच्यापैकी कुणी आलं होतं कां बघायला? तो गेल्याचंही समजलं असेलच ना त्यांना? त्यानंतरही कुणी आलं नाही.आपणच कां जायचं?”

मी निरुत्तर झालो. ती बोलली यात तथ्य होतंच.पण तरीही मला ते स्विकारता येईना.

हे बघ, त्यांनी केलं ते न् तसंच आपणही करायचं कां? लिलाताईचे वडीलही झोपून होते. त्यांचा कांही प्रॉब्लेम असेल. इतर कांही अडचणी असतील. त्यामुळे येणं जमलं नसेल. पण ती अगदी साधी माणसं आहेत गं. माणुसकी सोडून वागणारी तर अजिबातच नाहीयत.आणि आपण रहायला जातोय कां तिकडे? घटकाभर बसून बोलून येऊ. त्यांनाही बर वाटेल.”

ती न बोलता स्वतःचं आवरू लागली. मला तेवढं पुरेसं होतं. ती यायला तयार झालीय

हेच खूप होतं माझ्यासाठी.  

त्यांच्या घराचं दार उघडंच होतं. हॉलमधे दारासमोरच्या भिंतीला टेकून लिलाताईच्या  आई नेहमीसारख्या बसून होत्या.

मला दारात पहाताच त्यांना गलबलून आलं.

“ये रेss माज्या लेकरा..ये…” रडवेल्या आवाजातच त्यांनी अतीव मायेनं आमचं स्वागत केलं.आम्ही आत जाताच आरतीकडं पाहून त्यांचे डोळे भरुन आले.त्यांनी तिला जवळ बोलावलं..

“तू कां उबी? ये माझ्याजवळ.बैस अशी..” म्हणत तिला जवळ बसवून घेतलं.

” खूप आजारी होते कां हो बाबा?”

” हां तर काय? तरण्या वयापासून घाण्याला बांदलेल्या गुरासारका राबराब राबल्येला जीव त्यो. दोन वर्सं झाली आंथरुन सोडलं नव्हतं बग ल्येका. मी ही अशी.लांबून बघत बसायची निस्ती. पण समद्या पोरांनी लै शेवा केली बग त्येंंची.”

बोलता बोलता आरतीकडं लक्ष जाताच त्या बोलायचं थांबल्या.

” हे बघ बै.झालं गेलं गंगेला अर्पण करुन टाकायचं बग.त्यातच रुतून बसायचं न्है.कळतंय का? यील त्ये पदरात घ्यायचं न् पुढं जात -हायचं बग.” त्यांनी तिला समजावलं. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द त्यांच्या अंत:करणातूनच उमटलेला असावा इतका आपुलकीने ओथंबलेला होता.”गप.रडू नको. तुजा इस्वास नाई बसनार,पन इतं गेटभाईर जीप हाय नव्हं , तिची डिलीवरी कवा मिळालीती सांगू?तुजं बाळ देवधर डाकतराकडं अॅडमीट झालंय त्ये आमाला समजलं त्याच दिवशी. मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दरसन घ्यून लई वर्सं झाली बग.पोरं म्हनत हुती ‘चल.तुला उचलून नव्या जीपमंदी बशीवतो न् अंबाबाईच्या दरसनाला बी तसंच उचलून घ्यून जातो म्हणून.तवा म्या काय म्हनले ठाव हाय? मी म्हनले, त्या म्हाद्वार   रस्त्यावरच अरविंदाचं बाळ हाय नव्हं दवाखान्यात? अंबाबाईचं दरसन राहूं दे.. मला उचलून त्या दवाखान्यात नेताय का सांगा.तरच मी जीपमध्ये बशीन. त्येच्या बाळाला बगून तरी येते यकडाव. पन दोन अवगड जिनं चढाय लागत्यात म्हनली पोरं.त्ये कसं जमणार हुतं? म्हनून मग जीपमदे बसनं न् देवीचं दरसन दोनी बी नगंच वाटलं. आज तुमी दोगं आला झ्याक वाटलं बगा…

आरती थक्क होऊन ऐकत होती. तिच्या मनातल्या प्रश्नाचं प्रश्न न विचारताच तिला परस्परच उत्तर मिळालं होतं!

“तुझ्या आईला न् तुला बी माजी लिलाबाई भेटती न्हवं वाडीत न्हेमी? ती सांगत असती मला…”

“हो.बऱ्याचदा भेट होते आमची”

” तिची पन लई सेवा झालीय बग दतम्हाराजांची.तुला म्हनून सांगत्ये..,तुझ्या बाबावानी लिलाबाई बोलती त्ये बी खरं व्हाय लागलंय बग.”

त्या सहज बोलायच्या ओघात बोलून गेल्या न् मग लिलाताईबद्दलच कांहीबाही सांगत राहिल्या.तिच्या वाचासिध्दीबद्दलच्या अनुभवांबद्दलच सगळं. त्यातला प्रत्येक शब्द मला निश्चिंत करणारा होता! सगळं ऐकत असताना लिलाताईच्या पत्रातला मजकूर माझ्या नजरेसमोर तरळत राहिला होता! त्यातला शब्द न् शब्द खरा होणाराय हा विश्वास आरतीपर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न मात्र त्याक्षणीतरी अनुत्तरीतच राहिला होता..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ … जुळल्या सगळ्या त्या आठवणी… ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ … जुळल्या सगळ्या त्या आठवणी… ☆ सौ. अमृता देशपांडे 

परवाच आमच्या ऑफिसने निवृत्त स्टाफसाठी स्पेशल पिकनिक ठरवली होती……त्याबद्दल..

एखादा दिवस असाही असेल… याची कधी कल्पनाही केली नव्हती. असा विचार करताना मन मागच्या 25 वर्षे मागे धावलं. खूप खूप आठवणी  ” मी आधी, मी आधी ” करत धावू लागल्या.

आपल्या शिक्षणाचा आणि डिग्रीचा कोट घालून, दर्जेदार पोस्टचा काटेरी मुकुट स्वीकारलेले सर्वेसर्वा ऑफिसर्स.

जबाबदारीची जागा सांभाळताना त्यांची होणारी तारेवरची कसरत त्यांच्या व्यक्तिमत्वातून व्यक्त होत होती. बिनचूकपणा, शिस्त, आणि वक्तशीरपणा यांचा परिपाठ स्वतः कृतीत आणून इतरांना मार्गदर्शन करणारे वरच्या श्रेणीचे ऑफिसर्स ही काॅर्पोरेशनची दर्जेदार संपत्ती होती. तसेच

त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे काम करणारे कर्मचारी ह्या सर्वांचा एकसंध परिवार म्हणजे आपले काॅर्पोरेशन. हा परिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र एका छताखाली नांदत होता.

लहान लहान कामापासून मोठ्या मोठ्या कामात येणा-या अडचणी एकमेकांच्या सहाय्याने, सल्लामसलतीने सोडवल्याही जात होत्या. काम करताना अनेकदा चुकाही होतच होत्या, पण त्यात सुधारणा करून आपला परफाॅर्मन्स चांगला होण्यासाठी धडपडही होती.

व्यक्तिगत आयुष्यातले चढ-उतार, आनंदाचे-दुःखाचे प्रसंग , एकमेकांना मानसिक आधार देणे, अशी वाटचाल चालू होती.

प्रमोशन मिळालेले खुशीत, तर न मिळालेले नाराज! अशा संमिश्र घटना 3-4 वर्षात घडायच्या.

त्यावेळी  काम करताना ऑफिस फाईल्स हे महत्वाचं आणि एकमेव माध्यम होतं. जेव्हा आपल्या प्रपोजल नोटवर APPROVED असा शेरा मिळून ठसठशीत, वळणदार सही दिसली की खूप मस्त वाटायचं.

कित्येकदा अनेक शासकीय, बिन शासकीय आस्थापनातून, विभागातून ( गोव्यातच नव्हे तर देशभरात ) लेडीज स्टाफवरती होणारे नकोसे अनुभव कानावर यायचे. त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये मिळणारी मानसिक, भावनिक आणि शारिरीक सुरक्षितता प्रकर्षाने जाणवायची.

ऑफिसमधले असलेलं वातावरण अतिशय सौजन्यपूर्ण होतं. साधेपणा, शालीनता , आदर, नम्रता ह्या शब्दांना मान होता. तो प्रत्येकाच्या बोलण्यातून     वागण्यातून दिसत होता. माझ्याकडे जर कुणी काही विचारायला आले तर नकळत उभी राहून त्यांचे बोलणे ऐकणे, ही न सांगता होणारी प्रतिक्रिया होती. आवाज मोठा करून बोलणे, मोठमोठ्याने हसणे ह्यावर  स्वतःच घातलेली बंधने होती.

 हा

ऑफिसमधल्या आधीच्या लोकांनी घालून दिलेला संस्कार- ठेवा होता.

वर्षामागून वर्षे गेली. हळूहळू एक एक जण 58-60 वयाला येवून निवृत्तीला पोचले. आणि गेल्या दहा पंधरा वर्षात बघता बघता एक पिढीच निवृत्त झाली.

काल पहिल्यांदाच कितीतरी वर्षांनी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि पूर्वीचे राग-लोभ, रुसवे-फुगवे सर्व विसरून एकमेकांना भेटताना, बोलताना, क्षेमकुशल विचारताना होणारा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वहात होता. जे कुणी हे जग सोडून गेले, त्यांच्या आठवणींनी मन भरून येत होते. कालचा दिवस एक अलौकिक, अकल्पनीय आनंदाने भारलेला होता. . काहीतरी हरवलेलं सापडल्याचा अनुभव होता.

इतक्या वर्षांनी एकत्र भेटून झालेला आनंद एक अनामिक आत्मिक सुखदायी होता. हे मात्र नक्की.

तरूण पिढीच्या शिलेदारांनीही भरभरून , आपुलकीने आणि आतिथ्यपूर्वक सरबराई केली, पाहुणचार केला.

PICNIC EVENT

WELL PLANNED

WELL ORGANISED

WELL MANAGED

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आयुष्याची सुरावट ”सा रे ग म प ध नी सा’ या सप्तसुरातून साकार होत असते किंवा केली जाते. हे सूर जितके सच्चे, तितके त्यातून निर्माण होणारे गीत सुरेल निघते. सप्तसुरांच्या संगतीने आपले आयुष्य सुंदर सुरमयी बनते कारण यातील प्रत्येक सूर हा त्याच्या विचाराशी किंवा आशयाशी सच्चा राहतो.

*सा.. *आयुष्याचा प्रारंभ हाच ‘सा’ मधून होतो त्यामध्ये जीवनाचे सातत्य समाविष्ट आहे.

 रे… रेंगाळणे.. आयुष्याची वाटचाल चालू असताना आपण अधून मधून थांबतो किंबहुना रेंगाळतो..

ही वाटचाल जेव्हा शांतपणे सुरू असते, तेव्हा ‘रे’ सुराची निर्मिती होते.

ग.. विचारांना ‘ग’गती देतो. तर कधी

‘ग’ हा गमावल्याची भावनाही निर्माण करतो.

म… मानून घेणे, हे ‘म’ चे वैशिष्ट्य आहे.. जे आहे त्यात समाधान मानून आपल्या आयुष्याची वाटचाल आपण सुखद करतो.

प.. मनाची व्याप्ती वाढवणे किंवा पसरवणे हे ‘प’ चे वैशिष्ट्य! सप्तसुरांतील ‘प’हा चढती कमान दाखवतो. !

ध.. ‘ध’धारण करणे.. मनाची शांतता धारण करणे हे शिकवणारा

हा ‘ध’ आहे. ‘ध-‘ धारयती हा पुढे

‘नि’ मध्ये जातो.

नि – निवृत्ती कडे वाटचाल..

जगण्यातून निवृत्ती घेता येणे हे बोलणे सोपे पण आचरण्यास अवघड असे तत्व!ही निवृत्ती ज्याला साधली त्याला ‘सा’ची सायुज्यता साधणे कठीण जात नाही..

सायुज्यता – मोक्षाच्या चार अवस्थांपैकी चौथी सायुज्यता!

ही साधली तर वरच्या ‘सा’च्याजवळ आपण पोचू शकतो असे म्हणायला हरकत नाही..

आयुष्याच्या सरगमातील हे ‘सारेगमपधनीसा’ चे सूर विचार केला तर किती वेगळे अस्तित्व दाखवतात ना?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळख…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओळख…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

ओळख असणं आणि ओळखत असणं यातलं अंतर म्हणजे एक प्रवास आहे. हा एकमेकांनी सोबत करावा लागतो. या प्रवासात येणारे अनुभव, यात आपसात झालेली अनेक गोष्टींची देवाणघेवाण, वागणं, चालणं, बोलणं, विचार, आवडनिवड, व्यवहार यावरून आपण केलेले तर्क, आणि त्यावरुन घेतलेला निर्णय, या सगळ्या गोष्टींवरून ओळख असणं इथून सुरू झालेला प्रवास ओळखत असणं इथे थांबतो.

ओळख हि सुरुवात आहे. तर ओळखण याचे बरेच टप्पे आहेत. लहान मुलांना सुध्दा सुरुवातीला ओळख लागते. आणि ओळख झाली की मग ते ओळखायला लागतात.

ओळख निर्माण व्हायला काही कारण असावं लागतं. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींनी ओळख होते. आणि ओळखत असण्यात याच छोट्या छोट्या गोष्टींचा काही प्रमाणात, काही बाबतीत विस्तार असतो.

ओळख करावी का? दाखवावी का? असा संभ्रम ओळखीच्या सुरुवातीला असू शकतो. पण ओळखत असल्यावर बऱ्याच गोष्टीत आपलं स्पष्ट मत आणि ठाम निर्णय सांगू शकतो.

ओळख असणं आणि ओळखत असणं हा एक अभ्यास आहे. या अभ्यासाची सुरुवात सुध्दा इतर विषयासारखी तोंडओळख झाल्यावर सुरू होते. काही भाग समजायला सोपे आणि सहज वाटतात. तर काही भाग समजून घ्यावे लागतात. तर काही लक्षात सुद्धा येत नाहीत.

एखाद पुस्तक नुसतं चाळणं, आणि ते व्यवस्थित वाचणं यात जेवढा फरक आहे, तेवढाच ओळख असणं आणि ओळखत असणं यात आहे.

एखादा श्लोक किंवा स्तोत्र पाठ असणं म्हणजे ओळख असणं, तर त्याच्या शब्दाच्या अर्थासह तो, का? केव्हा? कसा म्हणावा…. हे माहिती असणं म्हणजे ओळखत असणं.

जवळपास सगळ्याच कार्यक्रमात प्रमुख पाहूण्यांची ओळख करून दिली जाते. बरेच जण त्यांना ओळखत असतात, तरीही ओळख करून देतांना काही विशेष गोष्टींवर भर दिला जातो. ज्यामुळे त्यांची ओळख नव्याने होईल असा प्रयत्न असतो.

एखादी गोष्ट, व्यक्ती, संस्था, वस्तू या सगळ्यांच्या बाबतीत ओळख असणं ते ओळखत असणं असा संबंध असतो. आणि ओळख जशी वाढत जाईल, तसं काही बारकावे समजतात आणि मग आपण ओळखायला लागतो.

ओळख असण कदाचित एकांगी असेल, पण ओळखण हे एकांगी नसतं, नसावं. ओळखण्यात अनेक गोष्टी, पैलू, आवड, सवयी, आणि मुख्य म्हणजे व्यवहार माहिती असतात किंवा माहिती असावे लागतात.

ओळख असणं याच रुपांतर ओळखत असण्यात होतं तेव्हा एकमेकांबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला असतो. आणि या विश्वासावरच ते ओळखत असणं किती काळ टिकेल हे ठरतं.

ओळख असण्यात सुखदुःखाची विचारणा असते. पण त्याच सुखदुःखाची जाणीव मात्र ओळखत असण्यात असते.

जेवणाच्या पानात अनेक पदार्थ असले तरी त्यांचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं, आणि ते किती असावेत याच सुध्दा एक प्रमाण असतं. तसंच स्वभावात सुध्दा अनेक गोष्टी, वैशिष्ट्य असतात आणि स्वभावातली हि वैशिष्ट्य कोणती, आणि किती आहेत हे ओळखता आली तरच आपण म्हणतो, मी ओळखतो……….

अगोदर ओळख असणं आणि ओळखत असणं या दोघांमध्ये प्रत्यक्ष संबंध असायचा. पण आधुनिक काळात आणि वेगवेगळ्या साधनांमुळे बऱ्याच जणांशी आपली ओळख असते. पण आपण एकमेकांना ओळखत मात्र नसतो. त्यामुळे एकमेकांचा सहवास नसला, काही चांगले वाइट अनुभव आले नाही तरीही ओळख असू शकते. पण ओळखत असायला सहवास आणि अनुभव गरजेचे असतात.

कदाचित याच कारणामुळे ओळख असणं ही संकल्पना विस्तारित आणि संकुचित दोन्ही अर्थांनी असते. फेसबुक, व्हाॅटस्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर यामुळे आपण प्रत्यक्ष न पाहिलेल्या आणि बऱ्याच लांबच्या लोकांनाही ओळखतो.

पण चार घरं सोडून पलिकडे कोण राहत यांना मात्र आपण ओळखत नाही. या ओळखण्यात, कोण? वयस्कर व्यक्ती आहेत का? त्यांना कशाची गरज, मदत लागते का? अशा खूप गोष्टींचा संबंध आहे…..

एखादी गोष्ट नुसती बघणं, आणि खरेदी करण्यासाठी बघणं यात जितका फरक असतो तितकाच ओळख असणं आणि ओळखत असणं यात असू शकतो.

ओळख असण्याच ओळखत असण्याच्या प्रवासात काही टप्पे, पायऱ्या असतात. या व्यक्ती, स्वभाव, आवडनिवड, जमवून घेण्याची पद्धत, विश्वास, त्याग यावर अवलंबून असतात. आणि गरजेनुसार त्या कमीजास्त असू शकतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😅 रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“काय पंत आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून नेहमी सारखा.”

“अरे वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी!”

“काय केबल गेली की काय तुमची?”

“अरे केबलला काय धाड भरल्ये?  व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स.”

“मग तुमचा सखा सोबती आज मुका कसा?”

“अरे काय सांगू तुला, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट!  दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्या चॅनेलवाल्यांनी.”

“पंत, बजेट हाच सध्याचा गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय?”

“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे मोरू,  पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा  शब्द सुद्धा नीट उच्चारता देखील येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार? “

“पंत, सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार?”

“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी दिल्लीवरून चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला t. v. बंद!”

“पण पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”

“त्यात कसले बुवा माझे नुकसान? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय?”

“पण पंत सरकारने कर सवलत किती दिली?  काय काय स्वस्त होणार? काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल?”

“कसं म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी तूच लंपास करून वाचतोस!”

“काय पंत मी…. “

“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते?”

“नाही खरच माहीत नाही पंत, मला कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे!”

“तुला सांगतो ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’ शब्दा पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करीत असत आणि या पिशवीला ते तेंव्हा ‘बुजेत’ असे म्हणत. पण अर्थशंकल्पला बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे बघ मोरू!”

“कोणता किस्सा पंत?”

 “अरे १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना  त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला. मग काय, तेव्हापासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला.”

“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास. बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे, पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “

“अरे इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून?”

“तसच काही नाही, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “

“होतात, होतात पण तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या. नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते!  You know,  public memory is very short.”

“हो, पण पंत आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि……”

“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना? अरे मोरू म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे  तोंड कडवट होतेच, त्याचे काय? “

“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पण…… “

“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट  सांभाळतांना घरच्या फायनान्स मिनिस्टरची काय हालत होते हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का?”

“हो बरोबर, या बाबतीत सगळ्याच आपल्या घरातल्या फायनान्स कम होम मिनिस्टरनां माझा सलाम! महागाईचा कितीही भडका उडाला तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच  जाणोत! पंत पटल बुवा तुमच म्हणण.”

“पटल ना, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती!”

“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला काही पटत नाही.”

“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे. सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या दहा मार्गानी दोन हातांनी काढून घ्यायच! आता तो आकडयांचा खेळ खरंच नकोसा वाटायला लागलाय रे! अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे!  मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”

“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना!”

“तू तसा ऐकण्यातला नाहीस माहित आहे मला. मोरू आता तुला शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांवच ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसाच करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियमच आहे! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम!”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीता शास्त्र – भाग – ६ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… गीता शास्त्र  – भाग – ६ ☆ सौ शालिनी जोशी

गीताशास्त्र

गीतेचा प्रत्येक शब्द जेवढा त्या काही आचरणी होता, तेवढा आजही आहे. कारण काळ बदलला तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही. अर्जुनाला निमित्त्य करून भगवंतांना चिंता आहे सर्व मानव जातीच्या कल्याणाची. त्या दृष्टीने आवश्यक सर्व शास्त्रांचा समावेश गीतेत आहे. म्हणून गीतेला ‘सर्व शास्त्रांचे माहेर’ म्हणतात. जीवनाला प्रेरणा व योग्य मार्ग देणारा प्रत्येक विचार म्हणजे शास्त्र.

गीता हे नीती प्रधान भक्तीशास्त्र, आचरण शिकवणारे कर्मशास्त्र, ज्ञानाचा अनुभव देणारे अध्यात्मशास्त्र, संयम शिकवणारे योगशास्त्र आहे. अशा प्रकारे कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती यांचा समन्वय येथे आहे. सर्व शास्त्रे येथे एकोप्याने नांदतात. कोणाची निंदा नाही. कोणाला कमी लेखले नाही. अधिकाराप्रमाणे आचरण्याचा उपदेश आहे.

गीता हे खचलेल्या मनाला उभारी देणारे आणि मन बुद्धीचा समतोल साधणारं मानसशास्त्र आहे. योग्य व सात्विक आहार यांचे महत्त्व आणि फायदे सांगणारे आहार शास्त्र आहे. त्याचबरोबर राजस व तामस आहाराचे तोटेही सांगितले आहेत. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणार आचरणशास्त्र आहे. त्याचबरोबर अति खाणाऱ्याला किंवा अजिबात न खाणाऱ्याला, अती झोपणाऱ्याला किंवा अजिबात न झोपणाऱ्याला योग साध्य होत नाही असेही गीता सांगते म्हणजे कसे असावे आणि कसे असू नये हे दोन्ही सांगणारे तारतम्य शास्त्र आहे.

ज्येष्ठांना त्यांच्या जबाबदारीची आणि समाजातील सर्व घटकांना (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शूद्र )त्यांची कर्तव्य सांगणारे, सर्व जातींना व स्त्रियांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. समाजातील उच्चपदस्थ जे जे आचरण करतात त्याला प्रमाण मानून इतरलोका आचरण करतात हा समाजशास्त्राचा महान सिद्धांत येथे सांगितला आहे.

गीता हे पंचभुतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र आहे. यालाच गीता अपरा प्रकृती म्हणते. भूमि, आप, अनिल, वायु, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ही तिची आठ अंगे. यातच सगळी भौतिकशास्त्रे सामावली आहेत. ‘उतिष्ठ, युद्धस्व’ असे सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणार हे विवेक शास्त्र आहे. स्वधर्माची व स्व कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा गीता देते. कामक्रोधादि पतनापर्यंत नेणाऱ्या अंत: शत्रूंचा निषेध गीता करते. याशिवाय अक्षय सुखाची प्राप्ती करून देणारे हे आत्मशास्त्र आहे.

‘उद्धरेदात्मनात्मानं ‘ हा स्वावलंबनाचा मंत्र गीता देते. यज्ञ, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, सुख प्रत्येकाचे गुणाप्रमाणे भेद सांगून सात्विकतेला महत्त्व देते. फलासक्तीचा त्याग, संयम, विवेक यांनी शुद्ध क्रिया गीतेला अपेक्षित आहेत. म्हणून ग्राह्य आणि अग्राह्य ( दैवी आणि आसुरी गुण) गीता समोर ठेवते. अग्राह्य गोष्टींचा त्याग का करावा हे पटवून देते. गीतेला सक्ती मान्य नाही. अंधश्रद्धेला वाव नाही. ‘ यथेच्छसि तथा कुरु ‘असे स्वातंत्र्य गीता देते. गीतेत कोणतेही कर्मकांड नाही. स्वधर्म हाच यज्ञ आणि स्वकर्म हाच धर्म म्हणून स्वकर्मानेच ईश्वराची पूजा. अशा प्रकारे गीता आहे जीवनाचे एक रहस्य पूर्ण शास्त्र आहे.

गीतेचा अभ्यास तरुणांनी अवश्य करावा. त्यांच्यासाठी ज्ञान मिळवण्याचे ते तीन मार्ग गीता सांगते. ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाl’ ( ४/३४). ज्ञानी गुरूला साष्टांग नमस्कार (नम्रता) प्रश्न विचारणे (शंका निरसन) आणि सेवा (अहंकार गलीत) केल्याने त्यांचे कडून ज्ञान प्राप्ती होते. अशा प्रकारे तरुणांपासून सर्वांना मार्ग दाखवणारे शास्त्र. म्हणून गीता महात्म्यातील पहिला श्लोक सांगतो

गीताशास्त्रमिदं पुण्यं य: पठेत् प्रयत: पुमान्l

विष्णो: पदमवाप्नोति भयशोकादिवर्जित:ll

गीता हे पुण्यमय शास्त्र आहे. त्याच्या चिंतनाने भयशोकादि उर्मीतून मुक्त होऊन माणसाला विष्णूपदाची प्राप्ती होते. त्यानुसार आचरण करणारा पूर्ण सुखाला प्राप्त होतो. अशाप्रकारे संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्याचे संसारातील खरे कर्तव्य काय हे तात्विक दृष्ट्या उपदेश करणारे गीता शास्त्र आहे. केवळ म्हातारपणी वाचण्यासाठी किंवा संसार त्याग करण्यासाठी नाही. तरुण वयात अभ्यासाला केलेली सुरुवात आयुष्यभर दीपस्तंभ होते.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ९. पशू पक्षी यांचा आदर करावा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ९. पशू पक्षी यांचा आदर करावा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपण ज्या पृथ्वीवर रहातो तेथे मानव एकटाच नसतो. पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे त्यातील माणूस हा एक प्राणी आहे. माणूस बुध्दीने सर्वश्रेष्ठ असल्याने सर्वांच्या वरचढ ठरला आहे. तसे पाहिले तर इतर प्राण्यांच्या कडे जे आहे त्यातील काहीच माणसाकडे नाही. पण आपल्या बुद्धीच्या बळावर तो सर्वांना ताब्यात ठेवू शकतो. प्राण्यांच्या ठायी असलेल्या शक्ती मशिन द्वारे प्राप्त करतो. खरे तर सर्व पशू पक्षी निसर्गात महत्वाचे असतात. ते निसर्गाचा समतोल राखतात. त्यांच्या मुळे निसर्गाचे संवर्धन होते. या मुळे आपले जीवन समृध्द होते. निसर्गाचे चक्र अव्याहत चालू रहायचे असेल तर हे पशू, पक्षी, कीटक, वृक्ष, नद्या, डोंगर आवश्यक आहेत. परंतू हे लक्षात न घेता माणसाने आपल्या बुद्धीचा स्वार्थी व बेबंद वापर केला तर माणसाचीच सर्वात जास्त हानी होणार आहे. ज्या जीवसृष्टीच्या आधारे माणूस सुखात जगत असतो, ज्यांच्या आधाराने जगत असतो त्यांचे आपण ऋणी असले पाहिजे. ही साधी माणुसकी आहे.

या विषयी भारतीय संस्कृतीने उच्च आदर्श जपला आहे. श्राद्ध या कृतज्ञता विधीमध्ये धर्मपिंड दिले जाते. ते सर्व पशू, पक्षी, वृक्ष, नद्या, पर्वत ज्या सर्वांनी आपल्याला पोसले त्या सर्वांना हे धर्मपिंड असते.

कोणीही कितीही श्रेष्ठ असेल, बुद्धिवादी असेल तरी कोणालाही क्षुद्र म्हणून हिणवू नये, निंदा करू नये, लाथाडू नये. या निसर्गा पुढे नम्र व्हावे. आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- इथं कोल्हापूरात लहान वयाच्या पेशंटना देवधर डागतरकडंच आणत्यात समदी. माज्या रिक्षाच्या तर रोज चार-पाच फेऱ्या हुत्यात. म्हनून तर सवयीनं त्येंच्या दवाखान्याम्होरंच थांबलो बगा.. ” तो चूक कबूल करत म्हणाला. पण…. ?

 पण ती त्याची अनवधानानं झालेली चूक म्हणजे पुढील अरिष्टापासून समीरबाळाला वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न होता हे सगळं हातातून्या निसटून गेल्यानंतर आमच्या लक्षात येणार होतं… !!)

डॉ. जोशींच्या हॉस्पिटलमधे गेलो त्याआधीच आपलं काम आवरून रिसेप्शनिस्ट घरी गेलेली होती. हॉस्पिटलमधे एक स्टाफ नर्स होती. तिने ‘डॉक्टर अर्जंट मीटिंगसाठी राऊंड संपवून थोड्याच वेळापूर्वी गेलेत, आता उद्याच येतील’ असे सांगितले. आम्ही इथे तातडीने येण्याचे प्रयोजन तिला सांगताच तिने आम्हाला एका रूममधे बसवले. लगबगीने बाहेर गेली. ती परत येईपर्यंतची पाच दहा मिनिटेही आमचं दडपण वाढवणारी ठरत होती. ती येताच तिने बाळाला अॅडमिट करून घ्यायच्या फॉर्मलिटीज पूर्ण केल्या.

“डॉक्टर कधी येतायत?”

मी उतावीळपणे विचारले.

डॉक्टर सपत्निक केशवराव भोसले नाट्यगृहात नाटक पहायला गेले होते हे नर्सला असिस्टंट डॉक्टरशी बोलल्यावर समजले होते. समीरच्या केसबद्दल त्याच्याशी डॉक्टरांची जुजबी चर्चा झालेली होती. त्यानुसार त्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे नर्सने तातडीने समीरबाळाला सलाईन लावायची व्यवस्था केली.

डाॅ. जोशी दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे राऊंडला आले. समीरला तपासताना असिस्टंट डॉक्टरही सोबत होते. आम्हाला औषधांचं प्रिस्क्रिप्शन त्यांनी लिहून दिलं.

“दोन दिवस सलाईन लावावं लागेल. या औषधाने नक्कीच फरक पडेल. डोण्ट वरी. “

आम्हाला धीर देऊन डाॅक्टर दुसऱ्या पेशंटकडे गेले. योग्य निर्णय तातडीने घेतल्याचं ‌त्या क्षणी आम्हाला मिळालेलं समाधान कसं भ्रामक होतं हे आमच्या लक्षात यायला पुढे आठ दिवस जावे लागले. दोन दिवसांपुरतं लावलेलं सलाईन चार दिवसानंतरही सुरू ठेवल्याचं पाहून आमच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली खरी पण त्यातलं गांभीर्य तत्क्षणी जाणवलं मात्र नव्हतं. अलिकडच्या काळात सलाईन लावताना एकदा शीर सापडली की त्या शीरेत ट्रीटमेंट संपेपर्यंत कायमच एक सुई टोचून ठेवलेली असते. त्यामुळे सलाईन बदलताना प्रत्येकवेळी नव्याने शीर शोधताना होणारा त्रास टाळला जातो. पण त्याकाळी ही सोय नसे. त्या चार दिवसात प्रत्येक वेळी सलाईन बदलायच्या वेळी शीर शोधताना द्याव्या लागणाऱ्या टोचण्यांमुळे असह्य वेदना होऊन समीरबाळ कर्कश्श रडू लागे. त्याचं ते केविलवाणेपण बघणंही आमच्यासाठी असह्य वेदनादायी असायचं. बॅंकेत मित्रांसमोर मन मोकळं केलं तेव्हा झालेल्या चर्चेत तातडीने सेकंड ओपिनियन घ्यायची निकड अधोरेखित झाली. डाॅ. देवधर हाच योग्य पर्यायही पुढे आला पण ते काॅन्फरन्सच्या निमित्ताने परगावी गेले होते. सुदैवाने आमच्या एका स्टाफमेंबरच्या बहिणीने नुकतीच पेडिट्रेशियन डिग्री मिळाल्यावर डाॅ. देवधर यांच्याच मार्गदर्शनाखाली राजारामपुरीत स्वत:चं क्लिनिक सुरु केल्याचं समजलं. मी तिला जाऊन भेटलो. माझ्याजवळची फाईल चाळतानाच तिचा चेहरा गंभीर झाल्याचे जाणवले.

” मी डाॅ. देवधर यांच्याशी संपर्क साधते. ही वुईल गाईड अस प्राॅपरली. “

पुढे हे प्रोसेस पूर्ण होईपर्यंत एक दिवस निघून गेला. आम्ही डिस्चार्जसाठी डाॅ. जोशीना विनंती केली तेव्हा ते कांहीसे नाराज झाल्याचे जाणवले.

“तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण होण्याआधीच डिस्चार्ज घेणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर घेणार आहात कां? तसे लिहून द्या आणि पेशंटला घेऊन जावा. पुढे घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीला मी जबाबदार रहाणार नाही” त्यांनी बजावले.

पुढे डॉ. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ट्रीटमेंट चालू झाली तरी आधीच डॉ. जोशींमुळे स्पाॅईल झालेली समीरची केस त्याचा शेवट होऊनच फाईलबंद झाली. केस स्पाॅईल कां आणि कशी झाली होती ते आठवणं आजही आम्हाला क्लेशकारक वाटतं. समीरच्या अखेरच्या दिवसांत देवधर डॉक्टरांच्याच सल्ल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्याला केईएम हॉस्पिटलमधे रातोरात शिफ्ट केल्यानंतर त्याचं ठरलेलं ऑपरेशन होण्यापूर्वीच त्याने शेवटचा श्वास घेतला होता!!

घरी आम्हा सर्वांसाठीच तो अडीच तीन महिन्यांचा काळ म्हणजे एक यातनापर्वच होतं!

पण या सर्व घटनाक्रमामधे लपलेले अघटिताचे धागेदोरे अलगद उलगडून पाहिले की आश्चर्याने थक्क व्हायला होतं!माझे बाबा १९७३ साली गेले ते इस्लामपूरहून पुण्यात शिफ्ट केल्यानंतर तिथल्या हाॅस्पिटलमधेच. २६सप्टे. च्या पहाटे. तिथी होती सर्वपित्री अमावस्या. समीरचा मृत्यू झाला तोही त्याला रातोरात पुण्याला शिफ्ट केल्यानंतर तिथल्या हाॅस्पिटलमधेच. तोही २६सप्टें. च्या पहाटेच. आणि त्या दिवशीची तिथी होती तीही सर्वपित्री अमावस्याच! हे थक्क करणारे साम्य एक अतर्क्य योगायोग असेच आम्ही गृहित धरले होते. शिवाय घरी आम्ही सर्वचजण विचित्र दडपण आणि प्रचंड दु:खाने इतके घायाळ झालेलो होतो की त्या योगायोगाचा विचार करण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतोही. पण त्याची उकल झाली ती अतिशय आश्चर्यकारकरित्या आणि तीही त्यानंतर जवळजवळ पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आणि तेही अशाच एका चमत्कार वाटावा अशा घटनाक्रमामुळे. ते सर्व लिहिण्याच्या ओघात पुढे येईलच.

समीरच्या आजारपणाचा हा तीन महिन्यांमधला आमचा आर्थिक, भावनिक, मानसिक आणि शारीरिक अस्वास्थ्य अशा सर्वच पातळ्यांवरचा आमचा संघर्ष आम्ही अथकपणे निभावू शकलो ते आम्हा सर्व कुटु़बियांच्या ‘त्या’च्यावरील दृढ श्रध्दा आणि निष्ठा यामुळेच! ‘तो’ बुध्दी देईल तसे निर्णय घेत राहिलो, या संघर्षात लौकिकार्थाने अपयश आल्यासारखे वाटत असले तरी तोल जाऊ न देता समतोल विचारांची कास कधी सोडली नाही. त्यामुळेच कदाचित आमच्या दु:खावर ‘त्या’नेच हळुवार फुंकर घातली तीही अगदी ध्यानीमनी नसताना आणि त्यासाठी ‘त्या’ने खास निवड केली होती ती लिलाताईचीच! तो क्षण हा ‘तो’ आणि ‘मी’ यांच्यातील अनोख्या नात्यातला एक तेजस्वी पैलू अधोरेखित करणारा ठरला आणि म्हणूनच कायम लक्षात रहाणाराही!

समीर जाऊन पंधरा दिवस होऊन गेले होते. आरतीची मॅटर्निटी लिव्ह संपल्यानंतर त्यालाच जोडून बाळाच्या आजारपणासाठी तिने घेतलेली रजाही तो गेल्यानंतर आठवड्याभरात संपणार होती. पण आरती पूर्णपणे सावरली नसल्याने घराबाहेरही पडली नव्हती. रजा संपताच ती बँकेत जायला लागावी तरच ती वातावरण बदल होऊन थोडी तरी सावरली जाईल असं मलाही वाटत होतं पण ती तिची उमेदच हरवून बसली होती. मीही माझं रुटीन सुरू केलं होतं ते केवळ कर्तव्याचा भाग म्हणूनच. कारण या सर्व धावपळीत माझं बॅंकेतल्या जबाबदाऱ्यांकडे आधीच खूप दुर्लक्ष झालं होतं. स्वतःचं दुःख मनात कोंडून ठेवून ड्युटीवर हजर होण्याशिवाय मला पर्यायही नव्हताच. रोज घरून निघतानाही पूत्रवियोगाच्या दुःखात रुतून बसलेल्या आरतीच्या काळजीने मी व्याकुळ व्हायचो. त्यामुळे मनावरही प्रचंड दडपण असायचं आणि अनुत्साहही.. !

अशा वातावरणातला तो शनिवार. हाफ डे. मी कामं आवरुन घरी आलो. दार लोटलेलंच होतं. दार ढकलून पाहिलं तर आरती सोफ्यावर बसून होती आणि दारात पोस्टमनने शटरमधून आत टाकलेलं एक इनलॅंडलेटर. ते उचलून पाहिलं तर पाठवणाऱ्याचं नाव आणि पत्ता… सौ. लिला बिडकर, कुरुंदवाड!

ते नाव वाचलं आणि मनातली अस्वस्थता क्षणार्धात विरूनच गेली. एरवी तिचं पत्र कधीच यायचं नाही. तसं कारणही कांही नसायचं. मी नृसि़हवाडीला जाईन तेव्हा क्वचित कधीतरी होणाऱ्या भेटीच फक्त. जी काही ख्यालीखुशाली विचारणं, गप्पा सगळंं व्हायचं ते त्या भेटीदरम्यानच व्हायचं. म्हणूनच तिचं पत्र आल्याचा आनंद झाला तसं आश्चर्यही वाटलं. मुख्य म्हणजे माझा घरचा हा एवढा संपूर्ण पत्ता तिला दिला कुणी हेच समजेना.

मी घाईघाईने ते पत्र फोडलं. वाचलं. त्यातला शब्द न् शब्द आम्हा उभयतांचं सांत्वन करणारा तर होताच आणि आम्हाला सावरणाराही. त्या पत्रातलं एक वाक्य मात्र मला मुळापासून हादरवणारं होतं!

‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि तो पूर्ण बरा होऊन परत येणाराय या गोष्टीवर तू पूर्ण विश्वास ठेव. आरतीलाही सांग. आणि मनातलं दुःख विसरून जा. सगळं ठीक होणाराय. ‘

समीरच्या संपूर्ण आजारपणात मी घरच्या इतरांपासूनच नव्हे तर आरती पासूनही लपवून ठेवलेली एकच गोष्ट होती आणि ती सुद्धा त्यांनी उध्वस्त होऊ नये म्हणून. समीर जिवंत राहिला तरी कधीच बरा होणार नव्हता. हे कां ते डॉ. देवधर यांनी मला अतिशय सौम्यपणे समजून सांगितलेलं होतं आणि त्या प्रसंगी एकमेव साक्षीदार होते त्यादिवशी डॉक्टरांच्या केबिनमधे माझ्यासोबत असणारे माझे ब्रॅंच मॅनेजर घोरपडेसाहेब! ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला होता’ ही तिसऱ्या कुणालाही माहित नसलेली गोष्ट लिलाताईपर्यंत पोचलीच कशी याचा उलगडा तिला समक्ष भेटल्यानंतरच होणार होता आणि ‘समीर बरा होऊन परत येणाराय’ या तिच्या भविष्यवाणीत लपलेल्या रहस्याचाही! पण तिला समक्ष जाऊन भेटण्याची गरजच पडली नाही. तिच्या पत्रात लपलेल्या गूढ अतर्क्याची चाहूल लागली ती त्याच दिवशी आणि तेही अकल्पितपणे!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नयन जादूगार… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ नयन जादूगार…  ☆ सौ शालिनी जोशी

डोळे हे कवी मनाचा आवडता विषय. अनेक अजरामर काव्यातून डोळ्यांविषयी गोड संवेदना व्यक्त झाल्या. कोणी म्हणतात ‘डोळे हे जुलमीगडे‘, तर कोण म्हणते ‘डोळ्यात वाच माझ्या ‘, क्षणभर उघड नयन’, हे नयन बोलले काहीतरी, नयन तुझे जादूगार, जे स्वप्न भाव वेडे नयनी मूर्त होते, रूप पाहता लोचनी, डोळे मोडीत राधा चाले, ही आणि यासारखी अनेक गाणी भावभावना व्यक्त करण्यासाठी डोळ्यांचा उपयोग करतात. म्हणजे नुसते बघणे एवढाच डोळ्यांचा उपयोग नसून मनातील भाव व्यक्त करण्याचे ते साधन. मनाचा आरसाच ! कधी प्रेम कधी ममता, माया, भक्ती, निरागसता, डोळ्यातून व्यक्त होते. असे शब्दविण संवाद साधणारे हे डोळे राग, लोभ, द्वेष, मोह, मत्सरही व्यक्त करतात. कुतूहलाने टकमक बघतात. रागाने वटारतात. क्रोधाने लाल होतात. आश्चर्याने मोठे होतात. नुसत्या नजरेने हात न उचलता एखाद्याकडे संकेत करता येतो. हेच डोळे कधी मादक, कधी लाजरे, कधी प्रेमळ, कधी निष्टुर, कधी लबाड तर कधी पाणीदार, सतेज, निष्पाप असतात.

असे हे विविध ढंगी डोळे तसे त्याचे रंग आणि आकार ही विविध. कोणाचे घारे तर कुणाचे काळे, निळसर किंवा तपकिरी. डोळ्याच्या रंगानुसार माणसाचा स्वभाव बदलतो. म्हणून घाऱ्या डोळ्याची माणसे लबाड असतात. प्रदेशानुसारही डोळ्यांचा आकार व ठेवण बदलते. तिबेटी लोकांचे डोळे बारीक असतात तर काही लोकांचे डोळे गोल, काहींचे बटबटीत, तर काहींचे लांबट असतात. डोळ्याला निरनिराळे प्रतिशब्द ही आहेत चक्षु, नयन, अक्ष, लोचन.

तसेच डोळा हा नुसता शरीराचा अवयव नाही. तर सौंदर्याचा मापदंड. म्हणून कमलाक्षी, कमलनयना, मृगनयना, मृगाक्षी असे याचे वर्णन करतात. नृत्यांमध्येही शरीराच्या हालचाली इतकेच डोळ्यांच्या हालचालीला महत्त्व आहे. डोळ्यांच्या नजरेच्या स्थितीवरून ध्यानाचेही प्रकार होतात खेचरी, भूचरि, साचरी, आणि अगोचरी. नाक, कान आपल्याला बंद करता येत नाही पण डोळे स्वच्छेने पापण्यांच्या संपुटात बंद होतात आणि मग माणूस बाह्य जगापासून अलिप्त होतो त्यामुळे एकांतात मनाशी व परमेश्वराची ऐक्य साधता येते.

डोळ्यावरून तयार झालेले कितीतरी म्हणी व वाक्प्रचार आपण वापरतो. उदाहरणार्थ – आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन, डोळ्यात अंजन घालणे, डोळ्यात तेल घालून बघणे, डोळ्यात प्राण आणणे, डोळे झाक करणे, डोळे भरून पाहणे, डोळे पांढरे होणे इत्यादी.

असे हे डोळे ज्याच्यामुळे आपण साऱ्या जगाच्या सौंदर्याचा, आनंदाचा, दुःखाचा, ज्ञानाचा अनुभव घेतो पण ज्याला डोळेच नसतात किंवा कार्य करण्यास सक्षम नसतात ते या सर्वाला मुकतात. बाह्य जगाशी संपर्क डोळ्याकडून तुटला तरी त्यांचे मनोधैर्य त्यांना मार्ग दाखवते. त्यांचे अंतःचक्षु इतके प्रखर असतात की डोळसालाही लाजवेल असे ज्ञान त्यांना प्राप्त होते. उदाहरणार्थ प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. आता नेत्रदानामुळे अंधानाही दृष्टी येणे शक्य झाले आहे. ब्रेल लिपीमुळे शिक्षणाचे द्वार त्यांच्यासाठी खुले झाले आहे. एकंदरीत दृष्टी तेथे सृष्टी मग ती बाह्य असो अंतर असो.

सर्व भावना आपल्या पोतडीत लपवणारे व प्रसंगानुरू व्यक्त करणारे जादूगारच हे डोळे म्हणूनच म्हणतात, ‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदे भरीन तिन्ही लोक… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

🌸 विविधा 🌸

☆ आनंदे भरीन तिन्ही लोक… ☆ सौ. वृंदा गंभीर

अवघाचि संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक || १ ||

*

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटण माहेरा आपुलिया || २ ||

*

सर्व सुकृताचे फळ मी लाहिन |

क्षेम मी देईन पांडुरंगा || ३ ||

*

बापरखुमादेवी वरु विठ्ठलाची भेटी |

आपुल्या सवंसाठी करुनि ठेला || ४ ||

अवघाची संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक ||1||

अवघाची संसार म्हणजे सगळा संसार सुखाचा करिन संसार खूप अवघड आहे तो सोपा नाही वादळ वारे संकट झेलत सावरत संसार करावा लागतो,,,,,,,,

कुटुंबाची मर्यादा पाळत सगळ्यांची मनं सांभाळून हातोटीने संसार करावा लागतो नव्हे नव्हे करावाच लागतो.

 “आनंदे भरीन तिन्ही लोक “

आनंदाने, समाधाने राहून तिन्ही लोकांना आनंद देईल,,,,

तिन्ही लोक,,, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या तिन्ही लोकांत आनंद परमेश्वराच्या नामस्मरणाने देणार आहे.

परमार्थ करून प्रपंच करणं म्हणजे संसार सुखाचा होणं आहे.

संसार अवघड आहे तितकाच परमार्थ सोपा आहे पण, आपण सांसाराच्या मागे धावत परमार्थ अवघड करून ठेवतो.

वय झाल्यावर देवाची आठवण येते तेंव्हा लक्षात येत आपण आयुष्यभर विनाकारण पळालो ज्याने आपल्याला या जगात आणलं त्यालाच विसरलो.

तेंव्हा जाणीव होते आणि देवाचा धावा सुरु होतो. भक्ती कशी निस्वार्थी हवी. देव “दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू ” आहे आपल्या भक्तीचं फळ तो लगेच देतो.

संसार करत आनंद देण्याचा प्रयत्न करावा आनंद वाटत राहावा.

जाईन गे माये तया पंढरपूरा* भेटेन माहेरा आपुलिया

संसार करत परमार्थ करायचा आहे पांडुरंगा चरणी लिन व्हायचं आहे..

पंढरपूर माहेर आहे तिथे विठ्ठल रुख्मिणी माय बाप कर कटावर ठेऊन उभे आहेत…..

पंढरपूला माझ्या माहेरी जाऊन भेटून येणार आहे माझ्या माय माऊली, माझ्या मात्या पित्याला डोळेभरून बघणार आहे त्याचं ते सकुमार रूप डोळ्यात साठवणार आहे.

“सावळा तो श्रीहरी, सावळा तो विठ्ठल

रूप त्याचे मनोहर, पाहुनी होई मन समाधान “

सुंदर असे रूप पाहून देहभान हरपून जाते,,,,,

“पिवळा पितांबर, गळ्यात तुळशीमाळा

भाळी चंदनाचा टिळा, कटेवरी हात उभा वेटेवर”

असा तो पांडुरंग डोळ्यात साठवून मनाला शांती मिळते म्हणून माझ्या माहेरी मला जायचं भेटून यायचं आहे.

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन

क्षेम मी देईन पांडुरंगा

जे मी सत्कर्म केल जे पुण्य मी मिळवलं त्याचं फळ मला मिळेल किंवा मी ते घेऊन येईल मी पांडुरंगाची क्षमा मागेल,,,,,,

रोजचे कर्म करत असताना चूक होतेच अशी काही चूक झाली तर पांडुरंगाची क्षमा मागून प्रायश्चित घेईल,,,,,,

मी विठुराया चरणी नतमस्तक होईल,,,, विठुरायाला अलिंगन देऊन त्याच्या चरणी जागा दे ही विनवानी करेल त्याची दासी होऊन राहीन.

बापरखुमादेवी वरू विठ्ठलाच्या भेटी

आपुल्या संवसाठी करुनी ठेला

 विठ्ठल रुख्मिणी आई वडील आहेत.

माता पित्याची भेट हे विठ्ठलाच दर्शन म्हणजे एक वरदान आहे…..

आपल्या साठी तो विटेवर उभा आहे.

आपल्या रक्षणासाठी उभा आहे.

एक आषाढीची वारी निमित्य आहे आई बापाच्या भेटीचं संतांचा मेळा भरतो. संत संगत मिळते आणि आयुष्य बदलून जातं.

” दुमदूमली पंढरी, गजर कीर्तनाचा “

” मुखी नाम विठुरायाचे, सोहळा हरीनामाचा “

जय हरी माऊली 🙏🙏

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares