☆ तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले,”तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का?”
तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला. त्याला पूर्ण खात्री होती, की ती ‘हो’ असंच म्हणेल. कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती.
पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं,”नाही.” ती म्हणाली, “माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात!”
तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली, “मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही, मी स्वत:च आनंदात राहते.
मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे.
कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल.
आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. माणसं, संबंध, आपलं शरीर, हवामान, आपले ऑफिसातले बॉस, सहकारी, मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य… ही यादी न संपणारी आहे.
त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं, हे मीच ठरवायला हवं ना! माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय, मी आनंदीच असते!
मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहीन. मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असेन.
माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते. कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे!
माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचं हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलता- वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो.
आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका.
बोध : वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा. आजारी असलात तरी आनंदी राहा. कठीण परिस्थितीत, पैसे नसले तरी आनंदी राहा. कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात, तरी आनंदी राहा. तुम्ही स्त्री, पुरुष कुणीही, कितीही वयाचे असा. असाच विचार करायला हवा; नाही का?
लेखक : अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खिशातून ५०रुपयाची एक नोट जरी पडली तर कावराबावरा अन् बेचैन होणाऱ्या माणसात आयुष्याची ५० वर्षे उलटली तरी परिवर्तन येत नाही. तो बिनधास्तच वागतो.काय दुर्दैव आहे !
स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते, हे तर विचारूच नका, साहेब! अहो, पैसातर फार दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाहीत ! तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरी!
माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो: काल किती होते आणि आज ते किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो : काल किती होते आणि आज किती उरले आहेत !
तर चला, ‘उरलेले’आयुष्य ‘अवशेष’ बनण्यापूर्वी त्याला ‘विशेष’बनवूया!
‘पासबुक’आणि ‘श्वास बुक’, दोन्ही भरावे लागतात. पासबुकात ‘रक्कम’ आणि श्वासबुकात ‘सत्कर्म’.
म्हणून
एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.
आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?
जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.
रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.
रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठंही जायचं नाही.
ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.
बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.
ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.
मित्रांनो जीवन सुंदर आहेच.फक्त आहे, त्याचा मनमुराद आनंद घ्या. काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा. हेच जीवन आहे.
लेखक : अज्ञात
संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘दैव आणि कर्म…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
आमच्या गल्लीत एक दुकानदार आहे.
मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले, “बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे उत्तर देऊ शकतोस का?”
तो म्हणाला, ” तुम्ही खुशाल विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.”
मी विचारले, “माणूस मेहनत करतो. मग त्याला यश मिळाले,की तो म्हणतो, देवाने हे यश पदरात टाकले. मला सांग, दैव श्रेष्ठ की मेहनत?”
मला वाटले की, याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून मी अवाक झालो.
बोलती त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
त्याने उत्तर दिले. तो म्हणाला, “मला सांगा. तुमचा बँकेत सेफ डिपॉजीटचा लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात. एक तुमच्याकडे आणि एक बँक मॅनेजरकडे. लॉकर उघडताना त्या दोन्ही चाव्या लॉकरला लावाव्या लागतात. तरच तो लॉकर उघडतो.अन्यथा नाही.बरोबर ना?” मी म्हणालो, “बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाशी काय संबंध?”
तो म्हणाला, “जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात, तशाच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या आहेत . एक मेहनतीची चावी, ती आपल्या पाशी असते. तर दुसरी नशीबाची (दैव) चावी. ही त्या परमेश्वरापाशी असते.
आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची. जेव्हा परमेश्वर त्याच्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल, तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल. अन्यथा नाही.
यशासाठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहेत . त्याशिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग नाही व नुसती भक्ती करुनही उपयोग नाही.
यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ती दोन्ही आवश्यक आहे.
प्रस्तुती : श्री अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
खाऊचे डबे सगळे रिकामे झाले.इतके दिवस मुलांसाठी,घरातील वयस्कर लोकांसाठी करतो, ही मनातली तीव्र भावना.पण मुलांची आपापल्या दिशेने पांगापांग होऊन ही आता दोन चार वर्षे लोटलीत.वयस्कर मंडळी सगळ्याच्या पल्याड गेलेली आहेत.
तरीही..ठरावीक वेळेत डबे रिकामे होण्याचा क्रम काही चुकला नाही.मनात दबलेलं हसू हळूच ओठांवर आलं.मुलानांच कशाला,आपल्यालाही लागतंच की काहीतरी येताजाता तोंडात टाकायला.फक्त इतके दिवस मुलांच्या नावाखाली लपत होतं.आता उघड उघड मान्य करावं झालं. आपलेसुद्धा,डबे खाऊने भरुन ठेवण्यात अनेक स्व-अर्थ दडलेले असतात.शेवटी एकच खरं…
स्वान्त सुखाय…!
चिवडा फोडणीस टाकायला घेतलाच.
सकाळचा माँर्निग वाँक घेऊन सोसायटीतल्या डॉक्टर काकू घरावरुन जात होत्या.मला किचन खिडकीत बघून त्यांनी हाक मारली, “बाहेर ये.बघ मी काय केलंय.तुला दाखवायचंय.” हँड एब्राँडयरी केलेला कॉटन कुर्ता त्यांनी मला उलगडून दाखवला.”व्वा! किती सुंदर वर्क, काकू!”मी त्या एंब्रॉयडरीवरून हात फिरवत म्हणाले.”आवडलं ना?छान झालंय ना ग?”
अर्थातच काकू. “किती नाजूक काम आहे हे.फार सुरेख.कलर काँंबिनेशनही परफेक्ट!”माझ्या नकळत…पावती देऊनही झाली.
“मैत्रिणीसाठी करतेय.तिला सरप्राईज देणार आहे.आणि ती जेव्हा बघेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी अनुभवणार आहे.शरीराने दुसऱ्यासाठी करत असतो गं आपण.पण त्यातला खरा आनंद आपणच घेत असतो.हो ना?”
मी म्हटलं, ” हो.स्वांत सुखाय…!”
“काकू, मुलगा झाला मला.तुम्ही आठवणीने गरम गरम तूप-मोदक आणून खाऊ घातलेत मला प्रेग्नसीत!आठवतंय काकू?”माझ्यासमोर लहानाची मोठी झालेली जयू आनंदाने सांगत होती.गणपती बाप्पाच आलेत!तिच्या आवाजातला आनंद मला सुखावून गेला.
माझं हे करणं म्हणजे तरी काय, मोदक करून खाऊ घालण्यातला आनंद मीच अनुभवणं.म्हणजेच तर
स्वान्त सुखाय!
नव्वदी पार केलेले आजोबा.मंदिर परिसर नित्यनेमाने स्वच्छ झाडत असतात.क्षीण झालेली त्यांची क्रयशक्ती .मीच एकदा त्यांना म्हटलं, “कशाला, आजोबा, या वयात झाडता?” “मला आनंद मिळतो बाळा. उगाच का कोण करेल?
माणूस फार लबाड, स्वतःच्या सुखासाठी करत राहतो,पण आव मात्र दुसऱ्याला आनंद दिल्याचा आणतो.
त्यापेक्षा सरळ मान्य करावं,
स्वान्त सुखाय..
मला आजकाल हा स्वान्त सुखाय चा मंत्र फार पटला,रुचला आणि पचनीदेखील पडला.
जिथे आपल्या क्षुल्लक अस्तित्वाने जगतकार्यात तसूभरदेखील फरक पडणार नाही,तिथे माझं कर्म कुणासाठी का असणार?ते फक्त आणि फक्त मला हवं असतं.त्यात माझा आनंद, सुख समाविष्ट झालेलं असतं.म्हणून आपण करत असतो.अहंकाराचे, अट्टाहासाचे कवच इतके जाड असते की,त्या कर्मातून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहचतच नाही.’मी केल्याचा’ काटा,ते सुख,तो आनंद आपल्याला उपभोगू देत नाही. राग,अपेक्षाभंग, वैताग,दंभ या खाली सुखाच्या आनंदाच्या जाणिवाच बोथट होऊन जातात.
परवा आईला आंघोळ घालताना मी तिच्याभोवती पाणी ओवाळत तिला म्हटलं,”झाली बरं ग तुझी चिमणीची आंघोळ.चला आता.पावडर गंध लावायचं ना तुला?” आजाराने शिणलेला तिचा चेहरा खुदुकन हसला. आणि ती म्हणाली, “तुम्हां पोरींचे लहानपण आठवलं ग!”
मी म्हटलं, “आता तू लहान झालीस.होय ना?”
तिचा ओला हात माझ्या चेहऱ्यावरून फिरला.
तिचं हसणं, तिचा तो ओला स्पर्श!
सुखाची भाषा याहून काय वेगळी असणार!
स्वान्त सुखाय चा हा किती देखणा आविष्कार!
माऊली म्हणतात-सत् चित आनंद.म्हणजे आत्म्याचे मूळ स्वरूप चिरंतन सुख आहे.तो सदैव सुख असतो.विकार जडलेले आहेत ते देह इंद्रियांना! परमेश्वरापासून सुखापर्यंत सारं सारं आपल्यातच तर आहे.बस्स्! आपण थोडा बहिर्मुख ते अंतर्मुख प्रवास करायला हवाय.इतकंच तर!
लेखिका:सौ. विदुला जोगळेकर
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मी, आमचा मुलगा, आणि बायको रस्त्याने जात असताना समोरून एक समवयीन जोडपे येताना दिसले.
मी त्यातल्या बाईकडे बिनधास्त एकटक बघत होतो. बायकोच्या देखत. ही आहे साठीची खरी ताकद.
जोडपे जवळ आले.
मी त्या बाईकडे बोट दाखवत तिला तिच्या नवऱ्याच्या देखत थांबविले.
ही आहे साठीची ताकद.
“संगीता ना तू?संगीता शेवडे?” इति मी.ही आहे साठीची ताकद.
ती थोडी थबकली.
आणि तिच्या नवऱ्याच्या देखत मानेला झटका देऊन केसांचा शेपटा पाठीवर झटकून, “अय्या… Sss… भाट्या ना तू?” असे किंचाळतच म्हणाली. भाट्या माझे शाळेतले टोपण नाव.तिची साठीची ताकद.
“कित्ती वर्षांनी दिसतोयस रे! काहीच फरक नाही तुझ्यात”.
मी ढेरी आत घेऊन हसलो.
“पण आता संगीता शेवडे नाही बरं का, मी संगीता फडके… हे माझे मिस्टर.” ती बाजूच्या, तिचा काका वगैरे वाटणाऱ्या माणसाकडे बोट दाखवते.
(“काय पण टकल्या म्हातारा निवडलाय!” हे बोलण्याची छाती साठीत अजूनही होत नाही. हे मी मनातल्या मनातच म्हणालो.)
मी आपला तोंडदेखलेपणाने देखल्या देवा दंडवत करतो. “नमस्कार.”
त्याच्या कपाळाला मात्र आठ्या! फडकेचा शेजारी किंवा आजोळ बहुधा नेने किंवा लेले असावे.
मग एकमेकांच्या अर्धांगाची सविस्तर ओळख होते.
त्यात मी बायकोला “मी नाही का खूप वेळा सांगत तुला, ती खोपोलीच्या ट्रीप मध्ये,”सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला” गायलो होतो?
तीच ही संगीता!”
ही आहे माझी साठीची ताकद.
“अय्या तुला आठवतं आहे अजून ?” संगीता लाजत म्हणते.
तिची साठीची ताकद…
मी “हो, कसं विसरणार गं?” म्हणतो… परत एकदा माझी साठीची ताकद.
“मला इतकी वर्ष वाटत होते की मी तुला नाही म्हटल्यावर तू त्या सायली बरोबर लग्न केलेस.” परत तिचीही ही साठीची ताकद.
तिच्या नवऱ्याच्या कपाळावर आठ्या वाढतात.
पण तो हताशपणे बघत असतो.
माझ्या शेजारी निद्रिस्त ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत चुळबुळ करताना जाणवतो.
“नाही गं, माझं लग्न उशीरा झालं, सायली लग्न करून कधीच अमेरिकेत गेली होती.”… मी बायकोच्या देखत म्हणतो.आता परत माझी साठीची ताकद.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला हळूच विचारतो “येतेस का Starbucks मध्ये कॉफी प्यायला ?” माझी साठीची ताकद.
माझी बायको भुवया उंचावून बघते.
३५ वर्षांच्या संसारात तिला खात्री आहे,
मी काही Starbucksला जाण्याच्या भानगडीत पडणार नाही.
फार फार तर समोरच्या उडप्याकडेच बसणार… तिची साठीची ताकद.
नुकताच ३० वर्षाचा झालेला आपला पोरगा… “च्यामारी बाप या वयात सगळ्यांसमोर उघड उघड लाईन मारतोय!” असा आश्चर्यचकित चेहरा करून माझ्याकडे बघत होता.
मीही पोराकडे बघून डोळे मिचकावत म्हणालो “अरे आम्ही पूर्वी पण कॉफीच प्यायचो.नाही का गं संगीता ?” माझी साठीची ताकद.
ती नवऱ्याला सांगते, “मी जरा ह्याच्या बरोबर तास भर गप्पा मारून येते.तू घरी जा आणि टॉमीला खायला घाल.”तिची साठीची ताकद.
तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर, “तास दोन तास तरी टळली ब्याद” चा आनंद स्पष्ट दिसतोय मला. पण तो लपवण्याचा क्षीण आणि निष्फळ प्रयत्न करतोय बापडा, “अगं, काही हरकत नाही.ये आरामात.” असं म्हणतो. त्याची साठीची ताकद.
“अरे पण तुझ्या बायकोची परवानगी आहे का ?” माझ्या पोटात बोट खुपसून संगीता.
“मला काय दगडाचा फरक पडतोय ? या कधीही… नाहीतरी घरी येऊन काय दिवे लावणार आहेत कोलंबस ?”आता बायकोची साठीची ताकद.
“फक्त येताना अर्धा किलो रवा आणि १ किलो साखर आण.” हुकुमी आणि जरबेच्या आवाजात मला.परत एकदा बायकोची साठीची ताकद.
संगीताचा नवरा कधीच गायब झाला.
माझ्या बायकोने दोन पावलं जायला म्हणून पुढे टाकली आणि वळली. “अरे हो.तुझा गोदरेजचा डाय संपलाय वाटतं. हल्ली जरा लवकरच संपतो. तो ही आण! खरे तर केसच कुठं आहेत रंगवायला? मला नेहमी आश्चर्य वाटते कुठे लावतोस कलप? आणि तुझ्या गॅससाठीच्या चघळायच्या गोळ्याही आणि कायम चूर्ण आणायला विसरू नकोस! नाहीतर सकाळी चिंतनघरात बसशील तासाच्या ऐवजी दीड तास आणि हात हलवत बाहेर येशील!” असं संगीताकडे जळजळीत नजरेने बघत तिने सांगितले… परत बायकोची साठीची ताकद.
बायकोचे माहेर कोकणात अडीवऱ्यातले आहे, म्हणजे सदाशिव पेठेतील “सौजन्याची” मर्यादा जिथे संपते तेथे तिथली सुरू होते.
संगीता त्यावर फिदीफिदी हसते.तिची पण साठीची ताकद.
मित्रांनो, अशी सगळी साठी भलतीच ताकदवान असते.
अनुभवलात की कळेलच!
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे की ‘पृथ्वीवरील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे.’
कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे की , आपण आता कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.
“बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा,”असे जर सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.
वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल, ही अपेक्षा ठेवू नका. भाऊबंदकीचे नाते कुटुंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले.नातेवाईक पैसे देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला , कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो ,फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता , ह्याला मी किती मदत केली होती.
सगळे कटू अनुभव जमा झाले असतील , कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.
नाती बिघडली, सबंध बिघडले , वाट्याला एकटेपण आले , आता कुणाचे फोन येत नाहीत , दुखावलेले मन ‘कुणाला फोन कर’ असेही म्हणत नाही.
तरीपण एक नातं टिकून राहते ते नातं मुलीचं. तितक्यात मुलीचा फोन येतो , ती विचारते— “पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झालं काय ?”नाना प्रश्न काळजीचे.आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचं हेच एकमेव नातं.
थोडा पश्चातापही होत असतो.मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले.कसे होणार त्यांचे ?
लोक मुलगा झाला की, स्वतःला भाग्यवंत समजतात.मला असे वाटते ,ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत. एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरुन भांडत असतात, तेव्हा झालेली चूक सुधारण्यापलीकडे गेलेली असते. मुलगी म्हणते,” काळजी करू नका मी आहे.”
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ शुभेच्छांचा गैरसमज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी एका मित्राला फोन केला.’ तुला नव वर्षानिमित्त हार्दीक शुभेच्छा !’ तो एकदम चक्रावून म्हणाला,’ तुला कसं कळलं माझ्याकडं वर्षा कामाला लागली म्हणून?’
त्यामुळं ‘वर्षा’बद्दलचे गैरसमज टाळण्यासाठी मी ‘ईयर’ हा शब्द वापरण्याचं ठरवलं व दुसर्या मित्राला फोन केला.’एंजाॅय न्यू इयर!’ तो माझ्यावर चिडलाच. नंतर मला त्याच्या चिडण्याचं कारण समजलं.
त्याला ऐकायला जरा कमी येतं. त्यामुळं त्यानं नवीन कर्णयंत्रं विकत घेऊन ती आजपासून वापरायला सुरुवात केली होती. व मी त्याला हिणवण्यासाठी ‘ Enjoy new ear’ असा फोन केल्याचं त्याला वाटलं.
या प्रसंगामुळं मी ईयरऐवजी ‘साल’ चा प्रयोग करायचं ठरवलं.
मी तिसर्या मित्राला शुभेच्छा दिल्या ,’ तुला साल मुबारक !’
हा मित्रही भयंकर चिडला कारण तो आजच सालीवरुन घसरुन पडला होता!
चवथ्या मित्राचंही असंच झालं.आज तोही सालीवर भयंकर चिडलेला होता आणि तोही आज सालीवर घसरला होता. कारण त्याच्या सालीनं आज त्याच्या बायकोला घरी आणून सोडलं होतं!
मग ‘साल’ ला बाद करुन सालाबादप्रमाणं एका मैत्रिणीला मी ‘नव संवत्सरकी शुभकामनाएं’ असा संदेश पाठवला . ती माझ्यावर खूपच नाराज झाली. कारण तिला एक सवत होती.तिला मी नेहमी संवत्सर (सवत+मत्सर) म्हणून चिडवायचो.माझ्या संदेशावरुन तिला ‘आणखी एखादी सवत येवो,’ अशी मी इच्छा प्रकट केल्याचा संशय आला.
शेवटी मला रशियन भाषा येत असल्यानं माझ्या रशियन अवगत असणार्या मैत्रिणीला मी ‘नये गोद की शुभकामनाएं’ असा मेसेज पाठवला. ती विधवा असल्यानं नवीन गोदचा प्रश्नच नाही, अशी तिची धारणा होती.रशियनमधे ‘गोद’चा अर्थ वर्ष असा होतो, हे ती विसरली होती.तिनं खूप अकांडतांडव केलं व मी दिसलो, की ती मौनव्रत धारण करायला लागली.
मला हेच कळेना नवीन वर्षाला वर्ष म्हणावं की साल म्हणावं की इयर म्हणावं मग संस्कृतमधलं ‘संवत्सर’ व रशियनमधलं ‘गोद’ तर दूरच राह्यलं !
मग मी ‘वर्षा’चा नाद सोडला व महिन्यांवर आलो. मी माझ्या एका मैत्रिणीला संदेश पाठवला,’ तुला येणार्या महिन्यांमधे अजिबात त्रास न होवो.’ तिनं फणकार्यानं उत्तर पाठवलं,’ माझा महिन्याचा त्रास ही माझी खाजगी बाब आहे. त्यांत तू दखल न घेणं चांगलं !’
मी सर्दच झालो. तरी मी शुभेच्छा पाठवण्याचा चंगच बांधला होता. त्यामुळं मी महिन्यांच्या ऐवजी दिवसांवर यायचं ठरवलं व तिला परत लिहिलं,’ तुझा कांहीतरी गैरसमज होतोय. तुला चांगले दिवस जावोत असं मला म्हणायचं होतं.’ झालं!ती नवर्याला घेऊन माझ्याशी भांडायलाच आली.मी नवर्याला वर्ष, महिने व दिवसांचं स्पष्टीकरण दिलं तेव्हां तो म्हणतो कसा,’ आता वर्ष, महिने वा दिवस अशी काळाची गणती सोडून द्या नाहीतर तुमची काळाशी गाठ पडेल व नंतर घटकाही मोजाव्या लागतील.’
माझ्या माय मराठीनं इथं हात टेकले. खूप विचारांती मी त्यातून पुढील तोडगा काढला, तो आपणा सर्वांच्याही उपयोगी पडेल .
‘माझ्या सर्व सुहृदांना नूतन वर्षाच्या (आपण घ्याल त्या अर्थानं) मनापासून शुभेच्छा !
☆ “प्रसाद” – लेखक : श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते.
गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ ! माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते.
“फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.” गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.
देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला.
मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते!
गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही!” गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले.
गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली.
बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती, तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.
कार्यक्रम छान झाला.
निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’
गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही.
प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !
गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला; तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले, तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले.
मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल !
आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग !
जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी घालमेलच संपते. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.
एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली, तेव्हा सर्वांना प्रसादही दिला.
सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’ सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली.
तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला.
बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली,
“पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं !
परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’
मला तिचे पाय धरावेसे वाटले.
आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मनाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.
परमार्थ वेगळे काय शिकवतो?
आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणाकणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो.
पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते.
असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे.
एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो.
देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो.
परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.
लेखक: अज्ञात
संग्राहक – श्री कमलाकर नाईक
फोन नं 9702923636
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो.
रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.
परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले, “आजची वेळ संपली आहे, उद्या या.”
मी त्याला विनंती केली, “आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.”
क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला, याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना.”
माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, “चल. आता उद्या परत येऊ.” मी त्याला थांबवले व म्हणालो, ” मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.”
क्लार्कने आपली पिशवी उचलली व तो चालू लागला. मी त्याला काही बोललो नाही, पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो कॅन्टीनमध्ये गेला. त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.
मी त्याच्या समोरच्या बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो. मी म्हणालो, “तुम्हाला तर खूप काम आहे. तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय. मी तर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो. कित्येक आय. ए. एस., आय.पी.एस., आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.”
नंतर मी त्याला म्हणालो, “तुमच्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का?” तो “हो” म्हणाला. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.
मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, “तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते.” त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पुढे चालू ठेवलं.
मी त्याला म्हणालो,
” तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही.”
तो मला म्हणाला, “तुम्ही असं कसं म्हणू शकता ?”
मी म्हणालो, ” तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.
बघा. तुम्हाला कोणी मित्रही नाहीत. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.
बाहेरगावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,’सरकारला सांगा, कामासाठी जादा माणसं नेमा.’
अरे! जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल.
आपापसातील संबंध वाढविण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.
पण तुम्हाला चांगली संधी आली होती कुणावर तरी उपकार करण्याची… ती संधी तुम्ही घालवलीत.
मी म्हणालो, “तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे.
काय करणार पैशांचं ? तुमच्या रुक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत.”
माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला. तो म्हणाला, “साहेब, आपण खरं बोललात. खरोखरच मी एकटा आहे. बायको भांडण करून माहेरी गेलीय. मुलांनाही मी आवडत नाही. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?”
मी त्याला शांतपणे सांगितलं, “लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणाला मदत करता येत असेल तर करा. बघा. इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे, पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय. त्याच्यासाठी धडपडतोय. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाही.”
तो उठला व म्हणाला, “या माझ्या खिडकीसमोर. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो.” त्याने आमचे काम केले. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.
मध्ये कित्येक वर्षे गेली….
अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला…
“साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात. त्यावेळी तुम्ही मला सांगितले होते की पैशांऐवजी नातेसंबंध जोडा. “
“हां हां ,चौधरी साहेब, आठवलं.बोला, कसे आहात तुम्ही?”
खुश होऊन तो म्हणाला, “साहेब, त्यादिवशी आपण निघून गेलात. मग मी खूप विचार केला. मला जाणवलं की खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो. दुसऱ्या दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो. ती तयारच नव्हती. ती जेवायला बसली होती. तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो,’ मला पण खाऊ घालशील का?’
ती चकित झाली, रडायला लागली. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली. मुले पण आली.
साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत..नाती जोडतो.
साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं.
पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही.”
तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो. मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधाना इतके महत्त्व प्राप्त होईल.
मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही. नियमांवर तर मशीन चालतात.
लेखक – अज्ञात
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈