श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ शुभेच्छांचा गैरसमज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी एका मित्राला फोन केला.’ तुला नव वर्षानिमित्त हार्दीक शुभेच्छा !’ तो एकदम चक्रावून म्हणाला,’ तुला कसं कळलं माझ्याकडं वर्षा कामाला लागली म्हणून?’

त्यामुळं ‘वर्षा’बद्दलचे गैरसमज टाळण्यासाठी मी ‘ईयर’ हा शब्द वापरण्याचं ठरवलं व दुसर्‍या मित्राला फोन केला.’एंजाॅय न्यू इयर!’ तो माझ्यावर चिडलाच. नंतर मला त्याच्या चिडण्याचं कारण समजलं.

त्याला ऐकायला जरा कमी येतं. त्यामुळं त्यानं नवीन कर्णयंत्रं विकत घेऊन ती आजपासून वापरायला सुरुवात केली होती. व मी त्याला हिणवण्यासाठी ‘ Enjoy new ear’ असा फोन केल्याचं त्याला वाटलं.

या प्रसंगामुळं  मी ईयरऐवजी  ‘साल’ चा प्रयोग करायचं ठरवलं.

मी तिसर्‍या मित्राला  शुभेच्छा दिल्या ,’ तुला  साल मुबारक !’

हा मित्रही भयंकर चिडला कारण तो आजच सालीवरुन घसरुन पडला होता!

चवथ्या मित्राचंही असंच झालं.आज तोही सालीवर भयंकर चिडलेला होता आणि तोही आज सालीवर घसरला होता. कारण त्याच्या सालीनं आज त्याच्या बायकोला घरी आणून सोडलं होतं!

मग ‘साल’ ला बाद करुन सालाबादप्रमाणं एका मैत्रिणीला मी ‘नव संवत्सरकी शुभकामनाएं’ असा संदेश पाठवला . ती माझ्यावर खूपच नाराज झाली. कारण तिला एक सवत होती.तिला मी नेहमी संवत्सर (सवत+मत्सर) म्हणून चिडवायचो.माझ्या संदेशावरुन तिला ‘आणखी एखादी सवत येवो,’ अशी मी इच्छा प्रकट केल्याचा संशय आला.

शेवटी मला रशियन भाषा येत असल्यानं माझ्या रशियन अवगत असणार्‍या मैत्रिणीला मी ‘नये गोद की शुभकामनाएं’ असा मेसेज पाठवला. ती विधवा असल्यानं नवीन गोदचा प्रश्नच नाही, अशी तिची धारणा होती.रशियनमधे ‘गोद’चा अर्थ वर्ष असा होतो, हे ती विसरली होती.तिनं खूप अकांडतांडव केलं व मी दिसलो, की ती मौनव्रत धारण करायला लागली.

मला हेच कळेना नवीन वर्षाला वर्ष म्हणावं की साल म्हणावं की इयर म्हणावं  मग संस्कृतमधलं ‘संवत्सर’ व रशियनमधलं ‘गोद’ तर दूरच राह्यलं !

मग मी ‘वर्षा’चा नाद सोडला व महिन्यांवर आलो. मी माझ्या  एका मैत्रिणीला संदेश पाठवला,’ तुला येणार्‍या महिन्यांमधे अजिबात त्रास न होवो.’ तिनं फणकार्‍यानं उत्तर पाठवलं,’ माझा महिन्याचा त्रास ही माझी खाजगी बाब आहे. त्यांत तू दखल न घेणं चांगलं !’                                               

मी सर्दच झालो. तरी मी शुभेच्छा पाठवण्याचा चंगच बांधला होता. त्यामुळं मी महिन्यांच्या ऐवजी दिवसांवर यायचं ठरवलं व तिला परत लिहिलं,’ तुझा कांहीतरी गैरसमज होतोय. तुला चांगले दिवस जावोत असं मला म्हणायचं होतं.’  झालं!ती नवर्‍याला घेऊन माझ्याशी भांडायलाच आली.मी नवर्‍याला वर्ष, महिने व दिवसांचं स्पष्टीकरण दिलं तेव्हां तो म्हणतो कसा,’ आता  वर्ष, महिने वा दिवस अशी काळाची गणती सोडून द्या नाहीतर तुमची काळाशी गाठ पडेल व नंतर घटकाही मोजाव्या लागतील.’

माझ्या माय मराठीनं इथं हात टेकले. खूप विचारांती  मी  त्यातून पुढील तोडगा काढला, तो आपणा सर्वांच्याही उपयोगी पडेल .                          

‘माझ्या सर्व सुहृदांना नूतन वर्षाच्या (आपण घ्याल त्या अर्थानं) मनापासून शुभेच्छा !

लेखक : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments