मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वास्तुपुरुषास पत्र…” – लेखिका: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “वास्तुपुरुषास पत्र…” – लेखिका: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

वास्तुपुरुषास,

साष्टांग नमस्कार विनंती विशेष.

 

झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले, “वास्तू प्रसन्न आहे हं तुमची. ” आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली.

तुझी शांत करून जमिनीत पुरून जेवणावळी केल्या की तुला विसरूनच जातो रे आम्ही. मग उरतं ते फक्त घर. तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा !

अगदी अपराधी वाटलं. मग काय तुझ्याशी पत्रसंवाद करण्याचं ठरवलं, म्हणून आज हे परत एकदा नव्याने पत्र !

 

तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या. जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस, ते घरकूल खरंच सोडवत नाही.

घरात बसून कंटाळा येतो, म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर चार दिवस मजेत जातात, पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते.

आजारपणात डॉक्टर म्हणतात, आराम पडावा म्हणून ऍडमिट करा. पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही, हेच खरं.

 

तुझ्या निवाऱ्यात अपरिमित सुख आहे.

अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते, दारावरचं तोरण हसतमुखाने सामोरं येतं,

तर उंबरा म्हणतो ‘थांब. लिंबलोण उतरू दे. ‘

बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी ! स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं! तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.

खरंच वास्तुदेवते, या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.

 

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक’.

दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर’.

भिंती म्हणतात, ‘ मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस’.

छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर’.

जमीन म्हणते, ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत’.

तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं, ‘स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि आत ऊन, वारा लागणार नाही’.

 

इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि निसर्गाच्या अन्न साखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद दे.

 

तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.

एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही. पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर?’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !

 

कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटामातीचं.

 

पण एक मात्र छान झालं, की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.

 

खरंच हा आमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.

 

वास्तू देवते, पूर्वी आई आजी सांगायच्या, “शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरूष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.

 

मग आज इतकंच म्हणते की “तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट एकत्र वास्तव्यास येऊ देत. “

आणि या माझ्या मागण्याला तू “तथास्तु” असंच म्हण, हा माझा आग्रह आहे.

तथास्तु!

 

लेखिका: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महिला मुक्ती… कवी : श्री अनिल दाणी ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ महिला मुक्ती… कवी : श्री अनिल दाणी ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

चिरायू होवो जागतिक महिला दिन !

पण खेदाने म्हणावे लागते

महिला मुक्तीचं शिखर अजून खूप दूर आहे.

त्याची वाट काटेरी व बिकट आहे

आजही संस्कृती रक्षकांच्या गराड्यात सापडलेली

धर्म, रुढी, परंपरेने ग्रासलेली

समाज बंधनात अडकलेली

गर्भलिंगचिकित्सेमध्ये मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यास भ्रूणहत्येचा बळी ठरलेली ती

मुलगी झाली म्हणून जाचाला, त्रासाला सामोरी जाणारी अभागी माता ती

स्त्री म्हणून जन्मापासून दुय्यम स्थानाचा शाप लाभलेली ती

 

तारुण्यात पदार्पण करताच

चहू बाजूने तिच्यावर पडणारी

कामांधांची वखवखलेली नजर

त्यामुळे ओशाळं झालेलं तिचं मन, शरीर

दोन चिमुरड्यांवर शाळेत शिपायांकडून झालेले अमानुष अत्याचार

एस टी बसमध्ये नराधमाने केलेला बलात्कार

तिने आरडाओरडा केला नाही म्हणून तो सहमतीने केलेला संभोग होता,

असा वकिलाने कोर्टात केलेला उद्वेगजनक युक्तिवाद

मंत्र्याने त्याला केलेलं पूरक विधान

19 वर्षाच्या तरुणाने 35 वर्षाच्या महिलेवर केलेला अत्याचार

व चाकूने तिच्या शरीरावर केलेले अमानुष वार

रेल्वे स्थानकात, एकांतात केले जाणारे सामुहिक बलात्कार

म्हातारपणी पंधरा वर्षाच्या नातीचा सांभाळ करणे पुढे शक्य नाही म्हणून नात्यातील तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या व्यक्तीशी लावून दिलेलं लग्न व दोन लाखात केलेली तिची विक्री

कधी वडिलांच्या, आप्तेष्टांच्या वासनेची झालेली बळी

स्त्री म्हणून विविध स्तरांवर होणारी तिची मानसिक गळचेपी

यावर मलमपट्टी करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जाणारा महिलादिन !

म्हणून मनात आलेले हे विद्रोही विचार

या दिवशी तिला, दिल्या गेलेल्या फुलांच्या पाकळ्यांनादेखील काटे असल्याची भीती वाटते, दडलेला कामवासनेचा दुर्गंध येतो.

तिच्या अमानुष अंधाराचे जाळे लवकर नष्ट व्हावे व तिला निर्भयतेने व्यापलेले मोकळे आकाश मिळावे ही शुभेच्छा !

कवी: श्री. अनिल दाणी

प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बॅंकर्स ब्रॉडकास्ट:लेजर्स… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

बॅंकर्स ब्रॉडकास्ट:लेजर्स… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

बँकेतल्या जुन्या आठवणी

झोपेत वेचत होतो

आज मी स्वप्नामध्ये

लेजर खेचत होतो…..

*

तेव्हाही करायचो आम्ही

भरपूर मरमर काम

काऊंटरसमोर असायचे

तेव्हाही कस्टमर जाम….

*

हातात असायचं तेव्हा

व्हाऊचर नाहीतर चेक

पोस्टिंग करुन फोलिओमध्ये

टॅग ठेवायचो एक….

*

डेबिट किंवा क्रेडिट

करू बेरीज वजाबाकी

गुंतलेलं डोकं वेळेत

काम संपवून टाकी….

*

वर्किंग अवर्स संपताना

काॅलिंग चेकिंग पटापट

टॅग उडवण्यासाठी

फोलिओंशी असे झटापट….

*

महिन्याच्या शेवटी नियमित

वाट्याला यायची लेजर

बॅलंसिंगमध्ये डिफरंस कधी

मायनर अथवा मेजर….

*

टॅली करायला मात्र

राहावं लागे व्यस्त

डिफरंस मिळाला की

त्याहून आनंद वाटे मस्त….

*

लेजरमध्ये असायची

रिकाम्या काॅलमची जोड

काढून प्रॉडक्ट्स सहामाही

त्यात इंटरेस्टची आकडेमोड….

*

अशा या लेजरने

दिलाय आनंद खरा

रिटायरीजनी पहावं

हळूच आठवुन जरा….

*

जुने दिवस आठवायला

मी बदाम ठेचत होतो

आज मी स्वप्नामध्ये

लेजर खेचत होतो….

क्षणभर बँकेत बसून काम करून आल्यासारखे वाटलं ! अगदी मस्त…

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

 

आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?

लुसलुशीत, खुसखुशीत,

भुसभुशीत, घसघशीत,

रसरशीत, ठसठशीत,

कुरकुरीत, चुरचुरीत,

झणझणीत, सणसणीत,

ढणढणीत, ठणठणीत,

दणदणीत, चुणचुणीत,

टुणटुणीत, चमचमीत,

दमदमीत, खमखमीत,

झगझगीत, झगमगीत,

खणखणीत, रखरखीत,

चटमटीत, चटपटीत,

खुटखुटीत, चरचरीत,

गरगरीत, चकचकीत,

गुटगुटीत, सुटसुटीत,

तुकतुकीत, बटबटीत,

पचपचीत, खरखरीत,

खरमरीत, तरतरीत,

सरसरीत, सरबरीत,

करकरीत, झिरझिरीत,

फडफडीत, शिडशिडीत,

मिळमिळीत, गिळगिळीत,

बुळबुळीत, झुळझुळीत,

कुळकुळीत, तुळतुळीत,

जळजळीत, टळटळीत,

ढळढळीत, डळमळीत,

गुळगुळीत, गुळमुळीत.

 

ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भाजलेल्या शेंगा” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “भाजलेल्या शेंगा” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली. जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत, हे लक्षात यायला काही क्षण लागले. बेल वाजवल्यावर रुममध्ये नर्स आल्या.

“गुड ईव्हिनिंग सर. ”

“कोणी भेटायला आलं होत का?”

“नाही. ”

“बराच वेळ झोपलो होतो, म्हणून विचारलं. ” मोबाईलवरसुद्धा एकही मिस्ड कॉल किवा मेसेज नव्हता.

“आता कसं वाटतंय?” नर्स.

प्रचंड बोअर झालंय. ”

“तीन दिवसात ते प्यून काका सोडून तर भेटायला दुसरं कोणीच कसं आलं नाही?”

“सगळे बिझी असतील. ”

“आपलं माणूस म्हणून काळजी आहे की नाही?” नर्स बोलत होत्या, पण मी काहीच उत्तर दिलं नाही.

“सॉरी, मी जरा जास्तच बोलले, ” नर्स.

“जे खरं तेच तर बोललात!”

ब्लडप्रेशर तपासताना दोन-तीन वेळा ‘सॉरी’ म्हणून नर्स निघून गेल्या.

त्यांनी सहजपणे म्हटलेलं खोलवर लागलं. दोन शब्द बोलायला, विचारपूस करायला हक्काचं, प्रेमाचं कोणीच नाही, याचं खूप वाईट वाटलं. एकदम रडायला आलं. भर ओसरल्यावर बाहीने डोळे पुसले. डोक्यात विचारांचा पंखा गरागरा फिरायला लागला. अस्वस्थता वाढली.

आज मला काही कमी नाही. मोठा बंगला, फार्म हाउस, तीन तीन गाड्या, भरपूर बँक बॅलन्स, सोशल स्टेटस सगळं आहे, तरीही मन शांत नाही. कशाची तरी उणीव भासतेय. प्रत्येकजणच स्वार्थी असतो, पण मी पराकोटीचा आहे. प्रचंड हुशार, तल्लख बुद्धी; परंतु तिरसट, हेकेखोर स्वभावामुळे कधीच कोणाचा आवडता नव्हतो. फटकळ बोलण्यामुळे फारसे मित्र नव्हते. जे होते, तेसुद्धा लांब गेले. माझ्या आयुष्यात कधीच कोणाला ढवळाढवळ करू दिली नाही. अगदी बायकोलासुद्धा. तिला नेहमीच ठरावीक अंतरावर ठेवलं. लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला, तरी आमच्यात दुरावा कायम राहिला. पैशाच्या नादात म्हातारपणी आई-वडिलांना दुखावले. मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली. एवढं सगळं करून काय मिळवलं, तर अफाट पैसा. सोबत विकृत समाधान आणि टोचणारं एकटेपण. विचारांची वावटळ डोक्यात उठली होती. स्वतःचा खूप राग आला. मन मोकळं करायची इच्छा झाली. बायकोला फोन केला पण “उगीच डिस्टर्ब करू नकोस. काही हवं असेल तर मेसेज कर, “असं सांगत तिनं फोन कट केला. तारुण्याच्या धुंदीतल्या मुलांशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता.

…… फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली. पुन्हा आठवणींची गर्दी. दादाचा नंबर डायल केला; पण लगेच कट केला; कारण आमच्यातला अबोला. तीन वर्षांपूर्वी आमच्यात कडाक्याचे भांडण झालं होतं. त्यानंतर पुढाकार घेऊन दादानं समेटाचा प्रयत्न केला; पण माझा ईगो आडवा आला. म्हणूनच आता तोंड उघडायची हिंमत होत नव्हती. तरीपण बोलावसं वाटत होतं. शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळे गच्च मिटले.

“हं!” तोच दादाचा आवाज

“दादा, मी बोलतोय. ”

“अजून नंबर डिलीट केलेला नाही. ”

“कसायेस?”

“फोन कशाला केलास?”

“तुझा राग समजू शकतो. खूप चुकीचा वागलो. गोड गोड बोलून तुला फसवले. ” ठरवलं नसताना आपसूकच मनात साठलेलं धाडधाड बोलायला लागलो.

“मुद्द्याचं बोल. उगीच शिळ्या कढीला ऊत आणू नकोस. आपल्यात आता काही शिल्लक राहिलेलं नाही.”

“दादा, इतकं तोडून बोलू नकोस.”

“मी तर फक्त बोलतोय. तू तर….]”

“पैशाच्या नादानं भरकटलो होतो. चुकलो.”

“एकदम फोन का केलास. सगळ्या वाटण्या झाल्यात. आता काहीच शिल्लक नाही. ”

“मला माफ कर, ” म्हणालो पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही.

“दादा!!!”

“ऐकतोय, काय काम होतं?”

“माझ्याकडून डोंगराएवढ्या चुका झाल्यात. ”

“मुद्द्याचं बोल. ”

“झालं गेलं विसरून जा. ”

“ठीकय. ”दादा कोरडेपणाने बोलला; परंतु मी मात्र प्रचंड भावूक झालो.

“झालं असेल तर फोन ठेवतो. ”

“आज सगळं काही आहे अन नाहीही. ”

“काय ते स्पष्ट बोल. ”

“हॉस्पिटलमध्ये एकटा पडलोय”

“का, काय झालं?” दादाचा आवाज एकदम कापरा झाला.

“बीपी वाढलंय. चक्कर आली म्हणून भरती झालोय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. ”

“सोबत कोण आहे? ”

“कोणीच नाही. दिवसातून दोनदा बायको आणि मुलं व्हिडीओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतात. ”

“अजबच आहे. ”

“जे पेरलं तेच उगवलं. मी त्यांच्याशी असाच वागलोय. कधीच प्रेमाचे दोन शब्द बोललो नाही. फक्त व्यवहार पाहिला. स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली. आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडलेत. ”

कंठ दाटल्याने फोन कट केला. अंधार करून पडून राहिलो.

बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या. लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला. मस्त घमघमाट सुटला होता. घाईघाईने पुडा उघडला, तर त्यात भाजलेल्या शेंगा. प्रचंड आनंद झाला.

“नक्की दादा आलाय. कुठंय????”

“मी इथंच आहे, ” दादा समोर आला.

आम्ही सख्खे भाऊ तीन वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो. दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली. फक्त एकमेकांकडे एकटक पाहत होतो. नकळतपणे माझे हात जोडले गेले.

“राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास!”

“काय करणार तुझा फोन आल्यावर राहवलं नाही. जे झालं ते झालं. आता फार विचार करू नकोस. ”

“तुला राग नाही आला?”

“खूप आला. तीन वर्षे तोच कुरवाळत होतो; पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला. तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि तडक इथं आलो. ”

“दादा!!!!!…. ”मला पुढे काही बोलता येईना. दादानं डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा खूप शांत शांत वाटलं.

“राग कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. मग ते रक्ताचं असो वा मैत्रीचं. चुका, अपमान काळाच्या ओघात बोथट होतात. जुन्या गोष्टींना चिकटून बसल्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव – आपलं नातं म्हणजे फेविकोल का जोड….. ”

दादा लहानपणी द्यायचा तसचं शेंगा सोलून दाणे मला देत बोलत होता. त्या भाजलेल्या खरपूस दाण्यांची चव अफलातून होती.

सहज कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं. त्यात शेगांच्या टरफलांच्या जागी मला माझा इगोच दिसत होता!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘म्हातारपण…’ – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘म्हातारपण… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

हा प्रसंग माझ्या सास-यांच्या बाबतीत मी पाहिलेला आहे. त्यांना जाऊन आता चार वर्ष होतील.

दहा वर्ष झाली, माझी मुलगी दीड दोन वर्षाची असेल. तिला आणि बायकोला आणायला मी निवळीला (रत्नागिरी) गेलो होतो. त्यांना घेऊन आम्ही तसेच पुढे गणपती पुळ्याला गेलो. परतीचा रस्ता तोच असल्यामुळे जाताना परत भेटायचं असं ठरल होतं. हॉर्न दिला की घाटात एका वळणावर ते येणार होते.

आम्ही परत आलो तर ते कोकणातल्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात, रस्त्याच्या कडेला एका दगडावर थोडी सावली धरून, हातात काठी घेऊन बसून होते. म्हटलं, “आधीच आलात का?” तर सासूबाई म्हणाल्या, दीड तास झाला येउन त्यांना.

आम्हांला यायला दोनेक तास लागणार हे माहित असूनही, चुकामूक होऊ नये म्हणून, चुकामूक झालीच तर नात परत वर्षभर दिसणार नाही या भीतीपोटी असेल, ते तिथे बसून होते.

आधीच ते कमी बोलायचे. मुलीचा पापा घेऊन त्यांनी आभाळ दाटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं. “आत्ता बघतोय, पुढच्या वर्षी?” हेही त्यात होतंच. निघाल्यावर गाडीचा ठिपका होईपर्यंत ते तिथेच थांबले असणार हे मागे न बघताही जाणवत होतं. खोटं नाही सांगत पण आत्ताही ते दृश्य माझ्या डोळ्या समोर उभं आहे.

म्हातारपण वाईट.

कारण मायेचे पाश तुटत नाहीत. माणसं महिनोनमहिने दिसत नाहीत. ती त्यांच्या कारणांमुळे आणि हे वयोमानामुळे मनात आलं तरी उठून जाऊ शकत नाहीत. मग सुरु होतं ते वाट बघणं. शिक्षाच आहे ती. गणपती, होळी किंवा मे ची सुट्टी याच वेळी येणार हे माहित असतं. अचानक काहीतरी कारण निघावं आणि त्यांनी यावं अशी स्वप्न काही दिवस बघितली जातात. रोज तेच स्वप्नं कितीवेळा बघणार? मग फोनवरून चौकशा चालू होतात, “जमेल का यायला?”, एवढे तीन शब्द जिभेच्या टोकावर तयारच असणार, पण ते बाहेर पडत नाहीत.

असे न उच्चारलेले पण ऐकायला आलेले शब्द फार फार आतवर रुतून बसतात.

म्हातारपण खरच वाईट. झाडावरून आंबा पडला तर, मोगरा अमाप आला तर, काही चांगलंचुंगलं खायला केलं तर, टी. व्ही. वर एखादं छान मूल दिसलं तर, यांना नातींचे चेहरे दिसतात.

“आत्ता इथे असत्या तर?” 

आणि हे सततचं वाटणं सहन झालं नाही की मग अश्रू कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत.

म्हणूनच, रडणारी म्हातारी माणसं मला कधीच दयनीय वाटत नाहीत. ते साठवलेलं रडणं असतं. अनेक महिने थोपवलेलं असतं ते.

खूप जणांना रडू येणं हे कमीपणाच वाटतं, अश्रू थोपवण्यात कसब आहे असं कुणाला वाटत असेल तर वाटू दे. पण मोकळं होण्याचा तो साधा, सोपा, सरळ, बिनखर्चिक उपाय आहे असं मला वाटतं. वेदना झाल्या की रडू येतं आणि संवेदना जिवंत असतील तर दुस-याच्या वेदना दिसल्या, वाचल्या, अनुभवल्या तरी पण रडू येतं.

मराठीत सहानुभूती असा एक सुंदर शब्द आहे. सह+अनुभूती, दुसरा जे काही आनंद, दु:खं किंवा इतर कुठलीही भावना अनुभवतोय, ती त्याच्यासह अनुभवणे, असा खरं तर त्याचा अर्थ आहे. दुर्दैवाने आपण तो फक्त दु:ख या एकाच भावनेशी चुकीचा अर्थ लावून जोडून टाकलेला आहे.

म्हातारपण गरीब असो वा सधन, मायेचा तुटवडा फार वाईट.

लेखक : श्री जयंत विद्वांस

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सुंदर दिसण्याचा सोपा उपाय !” –  लेखक : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित  ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “सुंदर दिसण्याचा सोपा उपाय !” –  लेखक : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

आनंद न देणाऱ्या नात्यांची ओझी घेऊन जगण्यात काय अर्थ आहे ?

त्यापेक्षा तीच नाती जपावीत जी आपल्याला सुख देतात, वेळ देतात आणि आपली काळजी करतात !

जे आपल्या मनाचा विचार करतात आपणही त्यांच्या मनाचा विचार करावा !

आपलं सुखदुःख त्यालाच सांगावं ज्याला त्याची किंमत असते !

तुम्ही रडत आहात आणि समोरचा हसतोय किंवा तुम्ही हसताय आणि समोरचा रडतोय अशा व्यक्तीला काही सांगून, वेळ देऊन काय उपयोग ?

ज्याचा फोन यावा वाटतो त्याच्या जवळच मन मोकळं बोलावं,

ज्याचा मेसेज यावा वाटतो त्याच्याशीच जास्त connect रहावं !

जे आपला मेसेज वाचून साधा दोन शब्दांचा सुद्धा रिप्लाय देत नाहीत, त्यांना आपली खुशाली कळवायची तरी कशाला ?

जीव लावावा आणि लाऊन घ्यावा !

कुणीतरी माझं आहे आणि मी कुणाचा तरी आहे असं वाटणं म्हणजेच प्रेम, आदर आणि मैत्री !

 अहो छोट्या छोट्या गोष्टीतही खूप मोठा आनंद असतो तो देताही आला पाहिजे आणि घेताही आला पाहिजे !

तुझा डी. पी. छान आहे, तू आज सुंदर दिसतेस, मला तुझा ड्रेस आवडला, तुझ्या हाताला खरंच खूप मस्त चव आहे… अशा साध्या प्रतिक्रिया देण्याने सुद्धा समोरच्या व्यक्तीचं मन आनंदून जातं, सुखावतं, प्रसन्न होतं !

मनाची ही प्रसन्नताच तुमचा-आमचा बी. पी., शुगर नार्मल ठेवत असते !

खरं सांगा, असं एकमेकांशी का बोलू नये ? असं बोलायला काही पैसे लागतात का ? खूप कष्ट पडतात का ?

मुळीच नाही, तरीही माणसं या गोष्टी का करत नाहीत तेच कळत नाही ?

कुढत राहण्यापेक्षा फुलपाखरा सारखं उडत रहावं आणि जीवन गाणं मजेत गावं !

ज्या व्यक्तीशी बोलून तुम्ही सुखावता त्याच्याशी अधिक बोला ! 

ज्याला आपलं सगळं दुःख सांगता येतं त्यालाच हसत हसत जगता येतं !

मन मोकळं बोलल्यामुळे निसर्गतःच आपलं फेशियल होईल आणि तुम्ही खूप सुंदर, टवटवीत दिसायला लागाल !

गालावरची खळी आणि चेहऱ्यावरची लाली, हे मनाच्या प्रसन्नतेचं प्रतिबिंब असतं, म्हणून जी माणसं जवळची वाटतात त्यांच्याशी भरभरून बोला !

प्रेम करताही आलं पाहिजे आणि प्रेम मिळवताही आलं पाहिजे !

आवडीच्या व्यक्ती सोबत तुम्ही जितकं जास्त Open होऊ शकता, शेअरिंग करू शकता, तितके तुम्ही जास्त आनंदी राहू शकता, सुखी राहू शकता !

या आनंदी मना मुळेच आपण सुंदर, प्रसन्न आणि हसतमुख दिसतो आणि सर्वांना हवेहवेसे वाटतो !

दुःख असलं तरी दुःखी राहू नये आणि पुन्हा पुन्हा तेच ते रडगाणं गाऊ नये !

आहे ते स्वीकारायचं आणि मजेत पुढे जायचं !

हिंडायचं, फिरायचं, चांगलं रहायचं, फोटो काढायचे, डी. पी. बदलायचा, समोरच्याला छान म्हणायचं आणि आपल्याला कुणी छान म्हणलं की त्याला हसून thank you म्हणायचं !

जगणं सोप्पं आहे

त्याला अवघड करू नका

आणि मन नावाच्या C. D. मध्ये

Sad music भरू नका !

थोडं तरी मना सारखं जगा

आयुष्यभर दुसऱ्याच्या मनासारखं जगलात म्हणून कुणीही तुमचा पुतळा उभारणार नाही !

  

लेखक : प्रा. विजय पोहनेरकर, छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद )

 94 20 92 93 89

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तीन धडे…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “तीन धडे…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

तीन धडे – – 

चीनचे राष्ट्रपती श्री जिनपिंग यांनी सांगितले की :

जेव्हां मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.

माझ्या वडिलांनी मला माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून तीन गोष्टींची शिकवणूक दिली.

एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाडगेभरून नूडल्स केले आणि नूडल्सचे दोन्ही वाडगे टेबलावर ठेवले. एका वाडग्यामधील नूडल्स वर एक अंड ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंड नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला जो कोणता वाडगा हवा असेल, तो तू घेऊ शकतोस. ”

त्यावेळी अंडी मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंड खायला मिळत असे.

म्हणूनच मी ज्या वाडग्यात अंड होते, तो वाडगा निवडला! जेंव्हा आम्ही जेवायला सुरुवात केली, तेव्हां मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंड खाण्यास सुरुवात केली.

जेंव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाडग्यात नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले, “बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते, असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”

दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाडगेभरून नूडल्स बनवले : एका वाडग्यात वर एक अंड ठेवले होते आणि दुसर्‍या वाडग्यावर एकही अंड नव्हते. पुन्हा त्यांनी ते दोन वाडगे जेवणाच्या टेबलावर ठेवले व मला सांगितले, “बाळा, तुला जो वाडगा हवा असेल तो घे.”

ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेला वाडगा निवडला. मला फार आश्चर्य वाटले, जेंव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंड नव्हते.

पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, “बाळा, प्रत्येकवेळेस आपल्या आधीच्या अनुभवावर, तू विश्वास ठेऊ नकोस. कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. पण अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव, एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही पुस्तकं वाचून शिकू शकणार नाही.”

तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाडगेभरून नूडल्स बनवले, एका वाडग्यावर एक अंड होते आणि दुसऱ्या वाडग्यावर एकही अंड नव्हते. त्यांनी दोन्ही वाडगे जेवणाच्या टेबलावर ठेवले आणि मला सांगितले, “बाळा, आता तू निवड. तुला कुठला वाडगा हवा आहे ?”

या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहेत. ”

माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाडग्यावर एक अंड ठेवले होते, तो वाडगा निवडला. जेव्हां मी माझ्या वाडग्यातील नूडल्स खाण्यास सुरुवात केली, तेंव्हा मला खात्री होती, की माझ्या वाडग्यात अंड नसणार. परंतु जेंव्हा माझ्या वाडग्यात दोन अंडी निघाली, तेव्हां मी खूपच आश्चर्यचकित झालो!

माझ्या वडिलांनी अत्यंत प्रेमपूर्वक नजरेने माझ्याकडे पाहिले आणि मला सांगितले, “माझ्या बाळा, हे तू कधीही विसरु नकोस, की आपण जेंव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतो, तेव्हां आपल्या बाबतीत ही आपसूकच नेहमी चांगलेच घडते !”

मी माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमीच लक्षात ठेवतो आणि त्यानुसार माझा व्यवसाय करतो. हे निर्विवाद सत्य आहे, की मला माझ्या व्यवसायात ह्यामुळेच सफलता मिळाली आहे.

– – शी जिनपिंग.

∞ ”स्वीकार्यतेला… हृदयाच्या उदारतेची आवश्यकता आहे. सर्व मतभेद लक्षात घेऊन, दुसऱ्यांचा दृष्टिकोन जाणणं आणि त्याचा सन्मान करणे हीच उदारता आहे. ”

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘क्षण प्रेमाचा…’ – कवयित्री : सुश्री कौमुदी मोडक ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘क्षण प्रेमाचा…’ – कवयित्री : सुश्री कौमुदी मोडक ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एक क्षण पुरेसा आहे, कोणाचं आयुष्य बदलून टाकायला. एखाद्या रस्त्यावरच्या भुभू च्या अंगावरून प्रेमाने, मायेने हात फिरवा… त्याचं प्रेम ते भुभु नक्की व्यक्त करेल. झाडं, पान, फुलं सगळ्यांना प्रेमाची भाषा व्यवस्थित समजते. मोकळ्या वातावरणात, मुक्तपणे वाढणारी झाडं आणि फुलं अधिक सुंदर, तेजस्वी भासतात… त्यांना वाढायला पूर्ण मोकळेपणा असतो… कोणाचं बंधन नसतं.. निसर्गाचं चक्र त्यांना अधिक तेजस्वी, अधिक बलवान बनवत. निसर्गाचं प्रेमच आहे तसं… हे ऋतुचक्र तसच तर ठरवल गेलं आहे की. खायला अन्न, प्यायला पाणी, सूर्यप्रकाश, सुखावणारा वारा, पक्षांचं गोड कुजन, फुलांचे वेगवेगळे आकार आणि सुगंध, गवताची… पानांची… वेलींची घनदाट सुखद अशी हिरवाई, पाण्याचं फेसळण… कड्या वरून झेप घेणं.. किनाऱ्यावर नक्षी काढणं… एखाद्या लहानग्या प्रमाणे खिदळत, अवखळपणाने पुढचं मार्गक्रमण करण…

… अस आणि किती अगणीत रुपात निसर्ग आपल प्रेम व्यक्त करत असतो. सगळ्या संतांनी पण सांगून ठेवलं आहे… भगवंत प्रेमाचा भुकेला आहे… त्याला मोठे समारंभ नकोत, फुलांची आरास नको, उदबत्यांचा गुच्छ नको, अवडंबर नकोच… एक क्षण त्याला द्यावा, ज्यात फक्त त्याची आठवण… त्याचेच विचार असतील. खूप मिळतंय आपल्याला… एक क्षण पुरे आहे ते सगळ अनुभवण्याचा, आणि व्यक्त होऊन देण्याचा.

तुमचा पैसा, शिक्षण, बुद्धिमत्ता प्रदर्शन कोणाला नको असतो… एक क्षण द्या तुमच्या प्रेमाचा… एक हसू, एखादा संदेश, एखादी मदतीची कृती… व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी… पण माझ्या पद्धतीने झालं नाही तर ते कसल व्यक्त होणं… अस नसत हो. ही निसर्गाची, भगवंताची…. प्रेमाची हाक त्यांच्याच पद्धतीने होत असते… ती ऐकून घेण्याची संवेदनशीलता आपल्यात शोधून वाढवायला हवी…

… आपल्यातील हे प्रेम वाढवायला हवं… भगवंताची देणगी आहे ही.. !!

हे आपल्यातलं प्रेम वाढले ना… भगवंताबद्दल, निसर्गाबद्दल… जी प्रत्येक आत्म्याची गरज आहे… की आपण नक्की बदलायला लागू… स्वतःबरोबर इतरांना समजून घ्यायला सुरुवात करू, अहंकार मुक्त होऊ, स्वच्छ सात्विक होऊ, प्रेम मय, आनंदमय होऊ… या जगाला त्याची खूप गरज आहे, आपल्याबरोबर…

फक्त रोज एक क्षण हवा…

आनंदात रहा..

कवयित्री : सुश्री कौमुदी मोडक

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राजे आणि दुसरं घर..! ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीता जोशी ☆

सुश्री सुनीता जोशी 

📖 वाचताना वेचलेले 📖

राजे आणि दुसरं घर..! ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीता जोशी

अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष.. पंचतत्वात विलीन झाला आणि… चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..

चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं – – अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..

दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.

“चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत सोडायची जबाबदारी माझी आहे. आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात, आता जरा उसंत घ्यावी. “ चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.

राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.

“चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. “ यावेळी स्वरात जरा अजीजी होती.

“ नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता…. अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात. श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं, सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला.. इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल, आणि खाली मूर्त्या आणि टाक होतील माझ्या. मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे. “

“भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही. या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.“

राजे पुन्हा हसले, “ देवा, माझी वही नीट तपासलीत ना, तुरी द्यायची कला अवगत आहे मला. “

स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला. आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला. जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन, राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.

गर्भवती १

देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे, राजकारणात जाईल, सुराज्य देईल. ’

‘ नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल असंच मूल हवंय मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती २

‘ देवी, हे मूल देतोय तुला, संस्कारी आहे, रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल. ’ 

‘ नको देवा, आपण भलं आणि आपलं घर भलं असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती ३

‘ देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे, रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही, प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल. ’ 

‘ नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला, असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती ४, ५, ६…

‘ देवींनो, होऊ घातल्या मातांनो, इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय.. स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय.. सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी, स्वतःच निर्मिलेल्या राज्यात, पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय.. कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात सामावून घ्या हा सूर्य. ’ 

‘ देवा, कितीदा सांगावं तुला, जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं, निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता. अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला… हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक. आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ. ‘ 

हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,

“ राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताहात मला. एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी, मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्त्याही विसावल्यात देव्हा-यात. पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला. “

“ देवा, असा हताश झालो असतो तर चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती.. कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो.. सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो.. अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती.. दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता.. स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती, आणि…. माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं… एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन. “ 

पण तोपर्यंत…?

तोपर्यंत – – 

राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,

आणि 

मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार.. !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares