मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जीभ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीभ 👅 👅…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

  1. ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ!
  2. रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ
  3. एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ
  4. सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ!
  5. तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.
  6. प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ,
  7. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ!
  8. सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ!
  9. बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ!
  10. दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ!
  11. काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव “जीभ”!
  12. दाताशी युती करत त थ द ध, ओठाशी युती करत प फ ब भ, दंतमूलाशी युती करत च छ ज झ, टाळुशी युती करत ट ठ ड ढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ!
  13. पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ!
  14. ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ!
  15. ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ!
  16. आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ!
  17. उगाच नाही म्हटलंय__

जेणे जिंकीली रसना । 

तृप्त जयाची वासना । 

जयास नाही कामना । 

तो सत्वगुण ।।

– दासवाणी

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हिशोब काय ठेवायचा ?… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ हिशोब काय ठेवायचा ?… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये..

आपल्या थोड्या वर्षांचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
आयुष्याने भर भरून दिले असताना..

जे नाही मिळाले त्याचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
मित्रांनी दिले आहे, अलोट प्रेम इथे…

तर शत्रूंच्या बोलण्याचा,

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
येणारा प्रत्येक दिवस,

आहे प्रकाशमान इथे..

तर रात्रीच्या अंधाराचा,

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
आनंदाचे दोन क्षण ही,

पुरेसे आहेत जगण्याला..

तर मग उदासिनतेच्या क्षणांचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
मधुर आठवणींचे क्षण,

इतके आहेत आयुष्यात..

तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
मिळाली आहेत फुले इथे,

कित्येक सहृदा कडुन..

मग काट्यांच्या टोचणीचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
चंद्राचा प्रकाश आहे,

जर इतका आल्हाददायक..

तर त्यावरील डागाचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
जर आठवणीनेच होत असेल,

मन प्रफुल्लित..

तर भेटण्या न भेटण्याचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
काही तरी नक्कीच..

खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..

मग थोड्याशा वाईटपणाचा,

हिशोब काय ठेवायचा.. !! 🙏

कवी : अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवघेव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवघेव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

देवघेव – – – 

चिटी चावल ले चली,

बीच में मिल गई दाल ।

कहे कबीर दो ना मिले,

इक ले, इक डाल ॥” 

 – – अतिशय गहन अर्थ आहे..

अर्थात :

“मुंगी” तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है’ देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली. पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली !

तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई!  तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार !

* देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.

म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो !

– – कबीरांच्या या दोह्यात असा मोठा “अर्थ” दडला आहे.

…… चला तर मग आनंदी जीवन जगू या ‼

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ अति सुखाचा ओला दुष्काळ… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)  ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अति सुखाचा ओला दुष्काळ… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

अति सुखाचा ओला दुष्काळ

– – सुख पर्वताएवढं

सुख ! सुख ! सुख !

सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस ! 

सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा ! 

कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच— सुखाचं नवं रुप— नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं.

मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला ‘अगदी काहीही सोसावं ‘ लागू नये म्हणून बिचारी धावाधाव !

एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं… अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं—यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे.

आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी— मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो. त्या—:त्या सणाची, रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडी—मेड ! 

वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद— कधीही, कुठेही दृष्टभेट— आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय. यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले न् त्याचा गंधही ! 

तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही.

त्याला हेलिकाॅप्टरनं किल्ल्यावर सोडलं, तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणार्‍या निर्झरणीची शीतलता त्याला कळणार कशी ?

अतिदारिद्र्याने काही पिढ्या संपल्या, आता अतिअति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. ते दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य ध्यासानं संपवति तरी येत होतं, हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार, असं दिसतंय.

केवळ लग्न झालं न् मूल झालं म्हणून

‘पालक’ झालो, असं समजणार्‍या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर…..

अनेक घरांत ‘ मागितलं की द्या !’ हा एककलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो.

केवळ ‘ बाईक ‘ एवढ्यात नको ;अठरा वर्षे पूर्ण होऊ दे, ‘ असं सांगणार्‍या आजीला सतरा वर्षांचा नातू संपवतो, अशी बातमी येते तेव्हा दरदरुन घामच फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहीत बसलेली ती मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यांसमोर येते. या आजीनं या नातवासाठी किती वेळा ऊन—ऊन जेवण केलं असेल,

त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल, आजारपणात रात्र रात्रभर जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल… त्या आजीला जीवे मारताना या सतरा वर्षांच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल? 

एवढी हिंस्त्रता एकाएकी येत नाही. आज नव्वद पंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्त्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे. *ना घरात प्रार्थना ! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना ! ना घरात ग्रंथवाचन ! ना पुस्तकाचं समृध्द कपाट ! ना व्याख्यानांना जाणं ! ना उत्तम संगीत ! फक्त संगणक, मोबाईल, व्हाँटसअप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि ही सुध्दा नशा कमी म्हणून की काय,

– – मैत्रीची सरहद्द ओलांडणार्‍या मजेनं सर्वनाशाची पूर्वतयारी करणं !

जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही ! 

जगलो काय न् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची महासत्ता येणार ?

आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची ! संपूर्ण विकसित माणूसपणाची !

मुलांना त्यांचा झरा स्वत:हून शोधू द्या ! त्यांचे पंख त्यांना उघडू द्या ! तुमच्या पैशाची हेलिकाॅप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील ! उड्डाण तर ज्याचं त्यानंच करायचं असतं ! त्यांच्या जीवनात तहानेची चव मिसळू द्या !

त्यांच्या पंखात आकाशाची साद उसळू द्या ! त्यांच्या मुळातल्या कणखरतेनं — त्यांच्या फांदीवर त्यांचं फूल त्यांच्या गंधानं उमलू द्या !

लेखक : प्रवीण दवणे

संकलन व प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “परमेश्वरा!” – अनुवाद: श्रीमती स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “परमेश्वरा!” – अनुवाद: श्रीमती स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

नाही दुखत पावलं टाचा मुंगीचे कधी

की हत्ती नाही करत विचार वजन कमी करण्याचा

 

कोळ्याला नाही वाटत भीती चढताना पडण्याची

घारीला नाही वाटत भीती उंच भरारी घेण्याची

 

हरणाला कधीच होत नाही गुडघेदुखी सांधेदुखी

आणि नाही करत साप कंटाळा सरपटण्याचा कधी

 

सिंहाला नसते चिंता उद्याच्या शिकारीची

जिराफाचे नाही झिजत माकडहाड किंवा मणका कधी

 

पाण्यात डुंबत राहूनही नाही होत सर्दी म्हशीला कधी

आणि चोवीस तास उभे राहूनही थकत नाही घोडा कधी

 

उच्च स्वरात कूजन करूनही नाही बसत घसा कोकिळेचा कधी

पक्षी नाही अपेक्षा करत वडिलोपार्जित घराची कधी

 

मग आपल्यालाच का भय चिंता कंटाळा थकवा झीज स्खलन

काळजी माया भोग आणि रोग ..!

 

पशु पक्ष्यांसारखे सहज सोपे साधे

जगता आले तर !

प्रयत्न तर करून बघावा

 

मला हे अद्भुत शरीर देणाऱ्या हे परमेश्वरा!

कोणताही अर्ज केला नव्हता

नव्हता लावला कोणताही वशिला

तरीही

डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यांपर्यंत

चोवीस तास रक्त प्रवाहित ठेवतोस

जिभेवर नियमित लाळेचा अभिषेक करतोस

निरंतर पडत राहतात ठोके हृदयाचे लयबद्ध

असं ते कोणतं यंत्र बसवलं आहेस देवा!

 

पायाच्या नखापासून मेंदूच्या अंतिम टोकापर्यंत

निर्वेध संदेशवहन करत राहतोस

कोणती शक्ती आहे ही ..नाही कळत मला.

 

हाडं आणि मांस यांच्यामधून वाहणारं रक्त

याचे मूळ आणि अर्थ कसे मी शोधावे 

 

हजार हजार मेगापिक्सेलवाले दोन कॅमेरे

अहोरात्र बारीक बारीक दृश्य टिपत असतात

 

दहा हजार चवी आणि अगणित संवेदनांचा अनुभव देऊ शकणारी

जिव्हा नामक अफाट सेन्सर प्रणाली

 

विविध फ्रिक्वेन्सीचे आवाज काढणारी स्वरप्रणाली

आणि येणाऱ्या असंख्य आवाजाचं कोडिंग डिकोडिंग करणारे कान

 

७५ टक्के पाणी असणाऱ्या शरीररूपी टँकरच्या

त्वचेवर असणारी कोट्यवधी छिद्रं

पण नाही येत कधी प्रश्न लिकेज आणि सिपेजचा

 

कोणत्याही आधाराशिवाय उभा राहू शकतो मी ताठ

गाडीचे टायर झिजतात पण नाही झिजत माझी पावलं कधीही

 

केवढी अजब रचना, काळजी, शक्ती, यंत्रणा, प्रतिपाळ

स्मृती शांती समज ही …… सगळंच अदभूत अविश्वसनीय

माझ्या शरीररूपी अचाट यंत्रात कोणता तंत्रज्ञ बसला आहे न कळे

या सगळ्याचे भान ज्ञान राहू दे बस,

तूच बसवलेल्या वसवलेल्या आत्म्यामध्ये. 

राहो सदबुद्धी कृतज्ञता स्मरण चिंतनाचे भान

हीच एवढी प्रेरणा प्रार्थना.

परमेश्वरा …. तू कोण कुठे असशील त्या चरणी.

अनुवाद  : श्रीमती स्मिता गानू जोगळेकर

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गाडीचे गिअर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गाडीचे गिअर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअरबरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.

गाडी सुरू झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण ‘फर्स्ट गिअर’ टाकतो. हा ‘फर्स्ट गिअर’ म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई, बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र. हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता ‘पुढे’ जात राहिली पाहिजे हा पहिला ‘संस्कार’ फर्स्ट गिअर करतो.

इथे आपल्याला निर्व्याज्य प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी ‘बंद पडणार नाही’ याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी ‘पळण्यासाठी’ इतका कमी वेग पुरेसा नसतो.

आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो. इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला… बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं. समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.

गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडालत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला-मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअरमध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.

आपण आता ‘फोर्थ गिअर’ टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, आकर्षक लेटेस्ट मोबाईल, एक बि. एच. के. मधून दोन बि. एच. के., लॅपटाॅप, ह्याऊ नि त्याऊ. या वेगाची नशाच काही और.

गंमत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही. आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार… लाख… कोटी… खर्व… निखर्व… रुपये नाहीत, गरजा.. हा ‘वेग’खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कुणी येऊ नये, ‘लाल’सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं आणि… आणि…. आणि…. ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो. गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो.

पाच.. चार.. तीन.. दोन… एक…. खाट खाट

गिअर मागे टाकत आपण आता न्यूट्रलवर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो. पाचव्या गिअरमध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअरदेखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती.. आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?

सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा ‘फर्स्ट गिअर’ ?

आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ ? कुणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ? इ. एम. आय. भरत विकत घेतलेल्या क्लासिक बेडरूमने ? नव्या कोऱ्या गाडीने ? ‘ यू आर प्रमोटेड’ असं लिहिलेल्या कागदाने ? मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने.

आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, ‘होईल सगळं व्यवस्थित’ म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी ‘बायको’ नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, ‘त्या’ काळात आपल्या नैराश्यावरचा ‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे ‘जिवाभावाचे मित्र’ हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते कां ?

माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवू या. त्याचा आनंद ही उपभोगू या. फक्त त्यावेळी आपल्या ‘फर्स्ट गिअर्स’ चं स्मरण ठेवू या. आयुष्याचा वेग मधून मधून थोऽऽऽडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.

जिंदगी हसीन है.

☆ ☆ ☆ ☆

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘लायकी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘लायकी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

“गवार वीस रुपये…

कलिंगडं शंभरला तीन!”

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डोलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो.

इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

‘दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकी आहे. तिथं पी’ असा सल्ला दिला.

‘एवढ्या सकाळी तहान कशी लागतीरे तुला?’दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं.

तसा तो पोऱ्या म्हणाला, ‘पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, तीबी संपली. म्हणून म्हणालो.’

तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, ‘वाह रे वाह शहाणा! म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना असेल, तर तो आम्हाला देऊन जाणार.’ ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं.

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्यागैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात, अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्च विद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक स्कॉर्पिओ आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली. ‘उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या,’ असं म्हणत तो माणूस पुन्हा स्कॉर्पिओत बसला आणि निघून गेला.

आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, ‘त्यांच्याकडं कामालाहे कारे तू भैय्या?’ पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला, ‘वडील होते माझे.’

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, ‘घरी स्कॉर्पिओ असून तू हातगाडीवर भाजी विकण्यासाठी इतकं हिंडतोय व्हय?’ गवार तोलत भैय्या म्हणाला, ‘घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबीहे. पुण्यातल्या मार्केटयार्डात तीन गाळेहेत. पण तात्या म्हणत्यात, आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्स आहे. आत्ताच्या काळात गरिबांबरोबर लोक जेवढं वाईट वागत्यात, तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.’

त्याचं वाक्‍य संपलं, तशे पटापट त्याच्या हातावर पैशे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी गॅलरीतून गुपचूप पाहत होतो. आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता.

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलींचं जीवन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ मुलींचं जीवन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

एक स्त्रीला तिच्या पतीचं समर्थन असेल तर ती अख्ख्या जगासोबत लढू शकते.. पण जर तिच्या पतीचंच समर्थन तिला नसेल तर ती स्वतःसोबत पण हरून जाते.. पराभूत होते.

‘नवरा’ आयुष्यभर ‘नवरा’च राहतो, ‘नवरी मुलगी’ मात्र “बायको” बनते..

नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ ‘फक्त नवऱ्यासाठीच’ ‘ती’ एका अनोळख्या घरात जाते, बाकी सासरची नाती तर नंतर निर्माण होतात हो..

पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्याआधी कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी हसत खेळणारी मैत्रीण असते..

नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण महत्त्व द्यायला विसरते.. आणि मित्रमैत्रिणींना वाटतं, लग्नानंतर ‘ती’ बदलली..

लग्नानंतर सगळ्या परिस्थितीसोबत ‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यातही पतीची साथ असेल तर ठीकच, नाही तर ‘ती’ खचून जाते हो…

माहेरी लागलेल्या सगळ्या सवयींविरुद्ध सासरी वागावं लागतं.. अचानकच मोठं व्हावं लागतं.. अचानकच जबाबदार व्हावं लागतं.. आणि ‘ती’ हे सगळं बनण्याचा प्रयत्नही खूप करते..

माहेरी ‘ए आई, मला भूक लागली. लवकर खायला दे, ‘ म्हणत असतांना, आईने सगळ्यात आधी आपल्याच हातात ताट देणे..

पण सासरी गेल्यावर खूप भूक लागूनही सगळ्यांना वाढून झाल्यावरच, सगळ्यांचे जेवण झाल्यावरच, नंतर जेवण्याची सवय लागते..

माहेरी साधी सर्दी झाल्यावर घर डोक्यावर घेणारी ‘ती’; सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी कुणाला जाणवू देत नाही..

कधी आईच्या राज्यात स्वयंपाकघरात न शिरलेली ‘ती ‘; सासरी मात्र ‘बायको’ म्हणून नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते..

कधी स्वतःच्या हातात भारी ओझं न उचललेली ‘ती’; संसाराचं ओझं मात्र उचलायला शिकते. संसाराचा गाडा ओढायला शिकते..

कधीच स्वतःची बॅग नीट न पॅक केलेली ‘ती’; सासरी मात्र स्वतःसोबत नवऱ्याचीही पॅकिंग मस्त करून द्यायला शिकते..

माहेरी बहीण-भावामध्ये सगळ्यात आधी मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..

माहेरी दुसऱ्याच्या हिश्श्यामध्ये आलेलं असलं तरी हिसकावून स्वतः घेणारी ‘ती’; सासरी मात्र स्वतःच्या हिश्श्याचं आलेलंही पतीला न कळता द्यायला शिकते..

स्वतःची तयारी स्वतः नीट न करणारी ‘ती’; सासरी मात्र नवऱ्याची, मुलांचीही तयारी करून द्यायला शिकते..

कधी स्वतःचीच योग्य काळजी न घेतलेली ‘ती’; सासरी मात्र नवऱ्याचीही, त्यांच्या घरातल्यांची काळजी घ्यायला शिकते..

कधी आईबापाची पण ऑर्डर न ऐकणारी ‘ती’; सासरी मात्र सासऱ्यांची, घरांतल्या सगळ्यांचीच ऑर्डर ऐकते..

कधी आपल्या आईबापाला पण न घाबरणारी, आईबाबांसोबत मैत्रीपूर्वक बोलणारी ‘ती’; सासरी मात्र सासू सासऱ्यांना घाबरायला लागते..

स्वतःच्या आईला कसल्याही कामात मदत न करणारी ‘ती’, सासरी मात्र सासूचं ऑपरेशन झाल्यावर त्यांची सेवा करायला लागते..

घरी भांडून हुज्जत घालणारी ‘ती’; सासरी मात्र कुणाला वाईट वाटू नये म्हणून बोलणे सहन करते..

साधं दुखलं, खुपलं, माखलं तरी सगळ्यांसमोर ढसाढसा रडणारी ‘ती’; सासरी मात्र दुःख झालं तरी आईबाबांची आठवण काढून एकांतात रडायला लागते..

आईबाबांना खाण्यापिण्यापासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’; सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही, आईबाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..

बाहेरून शॉपिंग करून आल्यावरही लगेच लोळत, ‘ए आई, चहा दे ग, ‘ म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र कितीही थकून आली, तरीही लगेच कामाला लागते..

स्वतः कितीही शिकली तरी घरी तिची ‘बायको’, ‘सून’ वा ‘आई’ म्हणून असलेली भूमिका ‘ती’ निभावत असते..

जर एक ‘मुलगी’ लग्नानंतर इतकं बदलू शकते तर मग ‘मुलाने’ व घरातल्या इतर लोकांनी थोडं बदललं तर काय होतंय.. ?

एका मुलीला फक्त आदर आणि प्रेम हवं असतं हो, बाकी तर दुय्यम आहे..

“अरे 10 दिवसाचा गणपती उठवताना हृदय पिळून निघतं, मग एवढी वर्ष सांभाळलेली मुलगी दुसऱ्यांच्या घरी देताना त्या आईवडिलांना कसं वाटतं असेल, त्या मुलीला कसं वाटतं असेल.. मुलगी सुखी राहावी, तिच्या नवऱ्याने, सासरच्या मंडळींनी तिला सुखी ठेवावं; ही केवळ एकच अपेक्षा असते.. “

ह्याची कल्पना करून पहा.. बघा ‘ती’ला आदर देणं जमतंय का?

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राम की कृष्ण ? – कवी – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ राम की कृष्ण ? – कवी – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

कोणीतरी विचारले, मला परवा,

तुला राम हवा की कृष्ण हवा?

मी म्हणाले, किती छान विचारला प्रश्न.

सांगते, कधी मला राम पाहिजे, कधी कृष्ण!

 

रामराया, पोटात घालेल माझी चूक

आणि कृष्ण भागवेल माझी भूक!

 

रात्रीची शांत झोप, रामरायाच देतो.

भूक लागली की कृष्णच आठवतो.

 

कशाचीही भीती वाटली की मला आठवतो, राम!

कष्ट झाले, दुःख झाले की कृष्णाकडेच मिळतो आराम.

 

रक्षण कर! सांगते रामरायालाच.

सुखी ठेव सांगते, मी श्रीकृष्णालाच.

 

बुध्दीचा विवेक रामाशिवाय कोणाकडे मागावा,

व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा.

 

सहनशक्ती दे रे, माझ्या रामराया.

कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्यायला.

 

रामाला फक्त शरण जावे वाटते.

कृष्णाशी मात्र बोलावेसे, भांडावेसे वाटते.

 

रामाला क्षमा मागावी,

कृष्णाला भीक मागावी.

 

रामाला स्मरावे,

कृष्णाला जगावे.

 

अभ्यास करताना प्रार्थना राजमणी रामाला!

पायावर उभे राहताना विनवणी, विष्णूला.

 

एकाचे दोन होताना घ्यावे, रामाचे आशीर्वाद.

संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद.

 

आरोग्य देणारा राम,

सौंदर्य देणारा कृष्ण.

 

राज्य देणारा राम,

सेना देणारा कृष्ण.

 

बरोबर-चूक सांगतो राम,

चांगले-वाईट सांगणे कृष्णाचे काम.

 

रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम,

कृष्णाकडे मागते मी मित्रांचे प्रेम!

 

पाळण्यात नाव ठेवताना गोविंद घ्या, गोपाळ घ्या.

अंतिम वेळी मात्र रामनाम घ्या.

 

दोघांकडे मागावे तरी काय काय?

ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,

म्हणत आहेत, अग आम्ही एकच!!

तू फसलीस की काय?

 

म्हणाले, कोण हवा? हा प्रश्नच नाही

मिळू दोघेही, नाहीतर कोणीच नाही.

 

मी रडले आणि म्हणाले, दोघेही रहा माझ्याबरोबर

परत नाही विचारणार हा प्रश्न.

राम का कृष्ण?

परत विचारले जरी

फक्त म्हणेन,

जय जय रामकृष्ण हरी,

जय जय रामकृष्ण हरी.

कवी: अज्ञात

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुटका… लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सुटका… लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

भर समुद्रात एक बोट फुटली. एक माणूस वाचला आणि एका छोट्या बेटाच्या किनाऱ्याला लागला.

तो म्हणाला, देवा, तुझा चमत्कार अद्भुत आहे. तू माझा जीव वाचवलास.

त्याने त्या निर्जन बेटावर झावळ्यांची, पानांची एक झोपडी बांधली. तिच्यात तो राहू लागला. मासे मारून, फळं तोडून खाऊ लागला. कधीतरी एखादंजहाज जवळून जाईल आणि आपली सुटका होईल, अशी त्याला आशा होती.

तो सतत देवाची प्रार्थना करत असायचा.

एक दिवस तो फळं गोळा करून परत आला, तेव्हा त्याची झोपडी जळत होती, धुराचे लोट आकाशात उठत होते. ते दृश्य पाहून तो वेडापिसाच झाला. परमेश्वराला कोसू लागला. तू निर्दय आहेस, माझा आसरा हिरावून घेतलास. देव आहेस की सैतान, असं बोलू लागला. तेवढ्यात एक जहाज त्याच्या बेटाच्या दिशेने येताना दिसलं…

…बेटावरून सुटका होऊन जहाजावर आल्यावर त्याने कॅप्टनला विचारलं, पण, या बेटावर मी अडकलोय, हे तुम्हाला कसं समजलं?

कॅप्टन म्हणाला, तू धुराचा सिग्नल दिला होतास ना, त्यावरून.

लेखक: ओशाे

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares