मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्ग… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – निसर्ग – ? ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निसर्ग ही तर खरी आठवण करून देतो 

मायावी आरसा होऊन तुझ्या समोर येतो 

ढळलेल्या मनाचा दु:खी माणूस तेव्हा

 आवेगाने  सावरून कसा सुखी होतो

*

अद्भुत किमया अचानक अशी उजागर होते 

बघणाराला ऐश्वर्याचे दृष्टी दान मिळते 

हीच अपार किमया असते परमेशाची

इथेच नात्यांची नात्याशी खरी नाळ जुळते

*

तू तुझा म्हण किंवा हवंतर माझा म्हण

पण हे जगच या जगाचा नित्य परिपोष करते 

हेच माणसांनी कधी काळी विसरू नये

येवढीच त्या अनंताची माफक अपेक्षा असते 

*

आपण काय आज आहेत उद्या कदाचित नाही 

विश्व त्याचे अफाट सौंदर्य कायम जपत राहील 

औदार्याच्या खुणा त्याच्या जगाला दिसतील कायम

पण मुक्तपणे जगणारा चिरंजीव आत्मा येईल जाईल

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कृपेचे आभाळ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – कृपेचे आभाळ – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

सुंदर लोभस | सखा पांडुरंग |

जीवनात संग | श्वासापरी ||१||

*

ललाटी शीतल | चंदनाचा टिळा |

शोभे हार गळा | तुळशीचा ||२||

*

सावळा विठ्ठल | कटेवरी कर | 

उभा वीटेवर | युगे युगे ||३||

*

मकर कुंडल | कर्ण झळकती |

तेज उधळती | दिव्यत्वाचे ||४||

*

सुवर्ण मुकुट | भव्य शिरावरी |

पंढरीत हरी | वैष्णवांचा ||५||

*

कुंतल कुरळे | सावळी ही काया |

हृदयात माया  | माऊलीच्या ||६||

*

लेकरांचा करे | माऊली सांभाळ |

कृपेचे आभाळ | धरोनिया ||७||

(चित्र सौजन्य :कु.ह्रदया सखाराम उमरीकर ) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “चल गं सखे…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– “चल गं सखे…” – ? ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆

चल गं सखे शिवारात जोडीनं जाऊ

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

ढगाच पांघरून शिवाराची माती

तुझी माझी बैलगाडी डौलात जाती

तू माझी सजनी मी गं तुझा राऊ

तुझा माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

कस सांगू तुला माझ्या मनातलं राया

तुझ्या संग लाभतोया अत्तराचा फाया

काळजाचा ठाव घेत्यात पिळदार बाहू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ 

*

मांडीवर पाय दे गं हातामधी हात

तुझ्या संग माझं सखे फुलतया नात

हुरुदाचं गुपित नजरेनं पाहू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

पायातल्या घुंगरात खुळखुळ दाटली

व्हटात डाळींब सखी मला भेटली

रानी तुझा शिणगार येडं नको लावू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गाणं गाऊ

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चांदणे सांडूनी गेले ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “चांदणे सांडूनी गेले…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

मेघ नभीचे उतरले

चांदणे सांडूनी गेले

उजळले तन काटेरी

मन तेजपुंज झाले

*

सरी बरसता अंधारी

तन नक्षत्र पांघरले

रात्र कुशीतील भय 

वाऱ्यासवे पळाले !

*

काळोखाच्या पदरी

दीप तेजाचे पसरले 

नभातल्या चांदण्यांना

ओठी हसू उमटले !

*

निसर्गाचा साक्षात्कार 

फुलाविना हा बहार

किती सुंदर देखावा  

जणू वाटे चमत्कार

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वाट हळदुली झाली… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?


☆ वाट हळदुली झाली… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

आभाळ भरून आलं  

धरती भरात आली

पाऊस भूमी मिलना

वाट हळदुली झाली

*

हळदीच्या पखरणीने

जमीन दिसते देखणी

नव्हाळी चढे अंगावर

या फुलांच्या पखरणी

*

की वाट जाहली ही

जेजुरी गडाची वाट

खंडेरायाचा भंडारा

भक्ते उधळला दाट

*

वाट जेजुरीची हिच

हीच म्हाळसाईची वाट

जाता  पुढेच लागेल

असा बाणाईचा घाट

*

या  पिवळ्याची जादू

त्याच्या रंगातुन बोले

पीत फुलांची  पखरण

किती आठवात आले !

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “विठू सावळा…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– “विठू सावळा…” – ? ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆

फणस पहा हा लेकुरवाळा

जणू भासला विठू सावळा

संत मंडळी फणस रूपाने

अंगोपांगी लागला लळा

*

विठ्ठल विठ्ठल नाद घुमावा

आसमंत ही भरून जावे

पाने पिटती टाळ्या आणि

विठू नामाचे गाणे गावे

*

आषाढाचे रूप मनोहर

जिथे तिथे मज भेटे विठ्ठल

चराचराला हिरवाईतून

भक्तांना माऊलीच भेटेल

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बातमी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बातमीश्री प्रमोद वामन वर्तक ☆

दृष्ट लागली माहेरघराला 

पडला विळखा पबवाल्यांचा 

दिवसा ढवळ्या निघू लागला 

धूर असली अमली पदार्थांचा

वाया चालली तरुण पिढी   

करू लागली विखारी नशा   

वारे वाढले गुंडगिरीचे अन्

भरकटली तरुणाई दाही दिशा

घेतली वाटे जणू समाधी 

गल्ली बोळातील देवांनी 

ऱ्हास विद्येच्या माहेर घराचा 

न पहावे म्हणती डोळ्यांनी

वाताहत ही पुण्यनगरीची 

बघवत नाही ठाणेकराला 

सद्बुद्धी द्यावी ‘त्या तरुणाईला’

विनवितो इथून दगडूशेठला

         विनवितो इथून दगडूशेठला …… 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हरवत चाललं आहे बालपण… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – हरवत चाललं आहे बालपण  – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

हरवत चाललं आहे बालपण,

मोबाईलच्या व्यसनात |

अभ्यास, मैदानी खेळ, वाचन 

गुंडाळून ठेवलंय बासनात |

*

भूलभुलैय्या या आभासी दुनियेत,

सगळेच झालेत रममाण |

कोवळ्या वयात डोळे मेंदूवर,

पडू लागलाय असह्य ताण |

*

दोन जीबी डेटाचा रोजचा,

मोबाईलला लागतो खुराक |

अनलिमिटेड वायफाय असेल 

तर सर्वच वेळ बेचिराख |

*

लुडो, पब्जी , ऑनलाइन रमी,

क्रिकेट सारेच ऑनलाईन गेम |

भावी पिढीचे व्हावे नुकसान,

हाच आहे एकमेव नेम |

*

असामाजिक तत्व मोबाईल आडून,

मुलांच्या आयुष्यात घुसत आहेत |

तुमचं आमचं साऱ्याच राष्ट्राचं,

उज्वल भविष्य नासवत आहेत |

*

प्रिय सुजाण पालकांनो,

नका पुरवत जाऊ असे बालहट्ट |

वेळ देत रहा पाल्याला,

नात्यातील वीण होऊ द्या घट्ट |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तू, मी, आणि पाऊस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – तू, मी, आणि पाऊस ?  सुश्री संगीता कुलकर्णी ☆

बरसू दे

अंगावरूनी थेंबांना

गालावरूनी निथळू दे

पापण्यांवरून ओघळू दे..

झोंबू दे वारा

मनात पसरू दे गारवा

तुझ्यासवे गंध मातीचा

झिरपू दे मनात..

घेता तुझा हात हाती

मोहक तुझ्या त्या स्पर्शाने

अंगी चमकेल वीज

गारवा पळून जाईल दूर..

स्पर्श तुझ्या नजरेचा

करतो बेधुंद माझ्या मना

बेभान होऊनी 

ओंजळीत घे या

अनमोल प्रीतीच्या क्षणांना..

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वटवृक्ष… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – वटवृक्ष – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

कुटुंबवत्सल वटवृक्ष,

पसरला दाट दुरवर!

घनदाट  छाया त्याची,

वाटसरूच्या शिरावर!

*

लहान मुले खेळती बागडती,

खेळती सुरपारंब्या मनसोक्त!

मोठ्यांना मोह न आवरे खेळाचा,

टांगाळून घेती आनंद होऊन  मुक्त!

*

प्राणवायूचे संतुलन राखतो,

विषारी वायू  स्वतः शोषून!

सहवास त्याच्या सोबत असावा,

सांगती शास्त्र आपणा उद्देशून!

*

भूजल साठा करतो मुळाशी,

सोडतो बाष्प उन्हाळ्यात!

अक्षयवृक्ष म्हणती यासी ,

हिरवागार साऱ्या ऋतूकाळात!

*

सुहासिनी पूजती यास,

मागती  दीर्घायुष्य पतीचे!

जन्मोजन्मीची साथ मांगे,

पूजन करती  पतिव्रतेचे!

*

उपयोग याचे असती अनेक,

दूर करी दंतदुखी असो मधुमेह!

लेप याचा ठरे  मोठा गुणकारी,

आयुर्वेदात महत्व नि:संदेह !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print