मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -3 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -3 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पहिले, मुली आणि सुना यात त्यांनी कधी फरक केला नाही. मुलीही माहेरी आल्या आणि हात-पाय पसरून गप्पा मारत बसल्या असं कधी झालं नाही. आजी म्हणत, ‘कामावे ते सामावे.’ आता इथून पुढे)

आजी नि नातवंडे यांचे भावबंध मायेने थबथबलेले, सायीसारखे स्निग्ध, साखरेसारखे गोड, हे तर शाश्वत सत्य. माझ्या सासुबाईंचेही आपल्या नातवंडांवर- पतवंडांवर खूप प्रेम होते. त्यांना पतवंडेही होती. चांगली मोठी, जाणती होती. ही पतवंडे म्हणजे माझ्या पुतणीची, दादांची मुलगी माधुरी हिची दोन मुले. ती त्यांना पणजीबाईच म्हणत. खेळताना मुले पडली की त्या म्हणत, ‘पडो, झडो माल वाढो.’  आमच्या सुशीताईंची मुलगी सुनंदा भारी हळवी, म्हणून आजींचे तिच्या भावांना सांगणे असे, ‘उगीच तिला चिडवू नका. ती हरीण काळजाची आहे.’ त्यांच्या बोलण्यात अशा म्हणी, वाक्प्रचार नेहमी असायचे.

आजींना नातवंडांचं कौतुक होतंच. नातवंडांनाही या आपल्या आजीचं तितकंच अप्रूप होतं. नातवंडांना आजीचं कोणतं रूप भावलं? यमुताई ही त्यांची पहिली नात. धाकट्या मुलाच्या बरोबरीची. मोठी मुलगी आक्का, हिची मोठी मुलगी. तिचं आमच्याकडे येणं आणि रहाणं सर्व नातवंडात जास्त झालेलं. तिला आजीच्या गृहव्यवस्थापनातले कायदे आठवतात.  सकाळी उठल्यावर प्रत्येकाने पाच घागरी पाणी ओढायचे. त्यावेळी सगळंच काम घरात असे. स्वयंपाक चुलीवर. जेवणं झालं की प्रत्येकाने आपापलं ताट, वाटी, भांडं याबरोबरच चुलीवरचं एक जळकं भांडं घासायचं. पुरुषांनीसुद्धा. शिळं काही उरलेलं असेल, तर सगळ्यांनी वाटून खायचं. पुरूषांना तेवढं ताजं आणि बायकांना शिळं, असा भेदभाव नव्हता. शिळं टाकायचं नाही, हे मात्र नक्की होतं. ‘अन्न हे पूर्णब्रम्ह.‘ त्या म्हणायच्या. आजीच्या व्यवस्थापनाबद्दल तिची धाकटी बहीण कमल सांगते, ‘ सुट्टी असली की आम्ही माधवनगरला जायचो. सांगलीहून माधवनगर फक्त दोन –तीन मैलांवर. त्या काळात शेंगा फोडून शेंगदाणे वापरायची पद्धत होती. मग आजी मुलांपुढे शेंगांची रास ओतायची आणि म्हणायची भांडंभर दाणे काढले की मी एक रुपया देईन. मग जत्रेतून काय हवं ते तुम्ही घ्या. जो जास्त दाणे काढेल, त्याला जास्त पैसे. ‘ दाणे काढल्यावर पैसे मिळणार, म्हटल्यावर आम्ही इरीशिरीनं दाणे काढायचो. मुलांना जत्रेसाठी पैसे मिळायचे. आजीचे काम व्हायचे.’  त्या काळात धुणं- भांडी याव्यतिरिक्त सगळी कामे घरात असत. शेंगदाणे नव्हे, वर्षाची शेंगांची पोती घेतली जात. त्या काळात माधवनगरला विठोबाची, हरीपूरला शंकराची जत्रा भरे. आजी हौसेने नातवंडांना घेऊन जत्रेला जात. टांग्याने हरिपूरला जाण्याचेही आकर्षण असे. मीदेखील तीन-चार वेळा त्यांच्याबरोबर जत्रेला गेले होते.

माझ्या लग्नाच्या वेळी घरी संपन्नता आली होती, पण सासूबाई कधी आपले जुने दिवस विसरल्या नाहीत आणि गरजावंताला मदत केल्याशिवाय कधी राहिल्या नाहीत. त्या काळात आणि एकूणच आयुष्यात ‘जिथे कमी, तिथे मी’ या वृत्तीने त्या जगल्या आणि हाच वसा त्यांनी आपल्या मुली – सुनांनाही दिला. नातेवाईकांमध्ये कुणाची अडचण आहे असं कळलं की त्या निघाल्याच आपली पिशवी घेऊन त्यांच्या मदतीला. गावात कुणाला गरज असेल, तर त्या धावायच्या. गरजवंताची गरज भागवणे, हीच त्यांची दान-धर्माची कल्पना होती. कुणासाठी काही केलं, मग ते नातेवाईक असोत वा परिचित वा आणि कुणी, ते बोलून दाखवायचा त्यांचा स्वभाव नव्हता.

माझ्या जाऊबाईंची बाळंतपणे सांगलीत झाली. डॉक्टर सहजपणे उपलब्ध होणं, हे त्याचं कारण. माझ्या जाऊबाईंची म्हणजे आमच्या वहिनींची माहेरची स्थिती त्या काळात हलाखीची होती. वडील गेलेले. चार भावंडे शिकणारी. आजींना परिस्थितीची कल्पना होती. त्या नातवंडांना बघायला गेल्या की सुनेच्या हातात पैसे ठेवून येत. त्यातही विहीणबाई जवळ नाहीत, असं बघून त्या पैसे देत. त्यांच्या सन्मानाला ठेच लागू न देता मदत करायची, असं धोरण. मला दहा वर्षांनी मुलगा झाला म्हणून त्याचं नाव अमोल ठेवलं. त्या काळात माझं माहेरी करण्यासारखं कुणीच नसल्यामुळे माझं बाळंतपण सासरीच झालं. माझ्या मुलाची मुंज आम्ही त्यांच्यासाठी आठव्या वर्षी केली. मुंज झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘आता मी मरायला मोकळी झाले.’ अर्थात त्यानंतर, त्या नऊ वर्षे जगल्या. वयाच्या ९२ वर्षापर्यंत त्या जगल्या. शेवटची दोन वर्षे त्यांना भ्रम झाला होता. सारखं पोटात दुखतय म्हणायच्या. औषध म्हणून श्रीखंडाची गोळीही दिलेली चालायची. अगदी आजारी, हांतरूणावर पडून अशा त्या फक्त चार-सहा महिनेच होत्या. बाकी त्यांनी आपलं जीवन आनंदात, सुखा – समाधानात, तृप्तीत, इतरांच्या आनंदात आनंद  मानत घालवलं.

आमच्या वहिनींच्या मावशी माधवनगरलाच रहात. त्यांच्या यजमानांना फारसं बरं नसे. त्या स्वत: फारशा शिकलेल्या नव्हत्या. शाळेत जाणार्‍या चार मुली आणि एक मुलगा. घराची शेती भाऊबंदांच्या वादात. त्यांना आजींनी मसाले, पापड, शेवया, तिखट , पुरणपोळ्या इ. करून विकायचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, ‘लोक काय म्हणतील, याचा विचार करू नकोस. लोक जेवायला घालणार आहेत का?’ मावशींचे पहिले ग्राहक आम्ही असू. आजी म्हणायच्या, ‘आपले चार पैसे जास्त गेले, तरी चालतील, पण ती आणि तिच्या घराचे अन्नाला लागले पाहिजेत. आजी त्यांना पोथी वाचून दाखवायला सांगत. त्यासाठी त्यांना पैसे देत. आजींचं हे रूप माझ्या डोळ्यापुढचं. इचलकरंजीला माझ्या दोन नंबरच्या वन्स सुशीताई रहात. त्यांच्यासमोर सौंदत्तीकर म्हणून जावा-जावा रहात. त्यांच्यापैकी धाकटीची स्थिती फारच हलाखीची होती. आजी एकदा त्यांना म्हणाल्या, ‘तुझ्या हातात कला आहे. लोकांचं शिवणकाम, भरतकाम करून दे. हलव्याचे दागिने कर आणि वीक. चार पैसे मिळतील. संसारात ते उपयोगी पडतील.’ त्यांनीही आजींचा सल्ला मानला. चार पैसे मिळू लागले. संसाराला मदत झाली.

सल्ले केवळ दुसर्‍यांनाच असत असं नाही. आम्हालाही असत. संक्रांतीच्या वेळी बायकांना हळदी-कुंकवाला बोलावून काही ना काही लुटायची पद्धत होती. त्या म्हणत,  ‘रुपया – दोन रुपयाची वस्तू तुम्ही लुटणार. त्याचा घेणाराला फार काही फायदा असतो, असं नाही. त्यापेक्षा यासाठी जेवढे पैसे तुम्ही खर्च करणार, तेवढ्या पैशाची एखादी वस्तू, एखाद्या गरजावंताला द्या. साडी म्हणा, एखादा मोठं भांडं म्हणा, चादर वगैर म्हणा, किंवा आणखी काही…. तिला गरज असेल ते.’ गरजू स्त्री ब्राह्मणाचीच असावी, असा त्यांचा हट्ट नसे. दान-धर्म, त्यातून मिळणारं पुण्य यावर त्यांचा विश्वास होता, पण दान-धर्माच्या त्यांच्या कल्पना मात्र आधुनिक होत्या.

शिक्षणाचं महत्व त्यांना होतंच. लग्न झालं, तेव्हा मी फक्त पदवीधर होते. लग्नानंतर बी. एड., एम. ए., एम. एड. हे सारं शिक्षण आजींच्या मान्यतेनं आणि प्रोत्साहनानं झालं. घरचा राबता मोठा. मला नोकरी. त्यातही एम. ए., करायचं ठरवलं. याला होकार देताना आजींनी आणखी एक गोष्ट व्यवहाराच्या दृष्टीने केली. ‘तुझी नोकरी आणि अभ्यास, त्यामुळे तिच्यावर ( माझ्या जाऊबाईंवर ) कामाचा जास्त बोजा नको. तुम्ही वेगळे रहा. मी माझ्या डोळ्यांदेखत तुम्हाला घर मांडून देते. वेगळे रहा. गोडीत रहा. गरजेप्रमाणे एकमेकींना मदत करा.’ या व्यवस्थेमुळे, मला माझ्या सोयीप्रमाणे काम करता आलं आणि अभ्यासाठी वेळ काढता आला. आम्ही दोघांनीही त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागायचा, आमच्याकडून शेवटपर्यंत प्रयत्न केला. आता आजीही नाहीत आणि त्यांचा वसा चालवणार्‍या जाऊबाईही नाहीत. मात्र त्यांनी आणि मी आजींचा वसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला आहे.

क्रमश: – भाग ३

©  सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -2 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -2 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पहिले, संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’)  आता इथून पुढे )

नाना गेल्यानंतर ओढगस्तीची दोन वर्षे सरली. दादा मॅट्रिक झाले आणि सगळ्यांच्या सांगण्यावरून कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला गेले. ते होते ४३ साल. पुण्याला त्यांचे एक दूरचे नातेवाईक दातार यांच्याकडे ते राहिले. कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा झाली. मग सुट्टीत दोन महिने त्यांनी देहूरोडला नोकरी केली. मग त्यांनी विचार केला, ‘नोकरीच करायची, तर पुण्यात कशाला? सांगलीलाच जाऊ या.’ मग ते पुना ४४साली सांगलीला परतले. इथे त्यांना माधवनगर कॉटन मिल्सला नोकरी लागली. दरम्यान ते कॉलेजची परीक्षा पास झाले. इथेही त्यांनी विलिंग्डन कॉलेजला नाव घातले, पण नोकरी आणि कॉलेज दोन्ही जमेना, तेव्हा त्यांनी शिक्षणाचा विचार सोडून दिला. माधवनगर कॉटन मिल्सला त्यांची ५० वर्षे नोकरी झाली. 

४६ साली दादांना कंपनीच्या व्यवस्थापनाने, माधवनगर येथे कंपनीच्या घरात रहायला येण्याविषयी विचारले. त्यांनी लगेच होकार दिला. तीन खोल्यांचं छोटसं घर . पुढे अंगण. मागे परस. परसात भाजीपाला होऊ लागला. पुढे आपली कार्यनिष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा, दूरदर्शित्व, व्यावहारिक शहाणपण, या गुणांच्या बळावर पदवीधर नसूनही दादा माधवनगर कॉटन मिल्सचे मॅनेजर झाले. दादांना नोकरी लागली. घरात निश्चित असे उत्पन्न येऊ लागले आणि कुटुंबाची विपत्तीतून सुस्थितीकडे वाटचाल सुरू झाली.

परिस्थिती कशीही असली, तरी कोंड्याचा मांडा करायची हातोटी आजींना छान साधली होती. माझ्या चुलत वन्स पमाताई म्हणतात, ‘आम्ही भावंड अधून मधून माधवनगरला राहायला जात असू. काकू स्वयंपाक छान करत असे. साधं पिठलं भाकरीच, पण ती इतकी चविष्ट होत असे, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. मला तर वाटतं, तिच्या हातात अन्नपूर्णेचा वास होता. ‘  कुणाला त्यांनी केलेल्या खव्या-रव्याच्या साटोर्‍या आठवतात, तर कुणाला त्यांनी केलेल्या साध्या भाकरीचा कुस्करा. 

सगळं ठाक-ठीक होतं म्हणेपर्यंत आणखी एक आपत्ती येऊन ठाकली. मात्र ही आपत्ती केवळ केळकर कुटुंबावरच आलेली नव्हती, तर सार्‍या गावावर, किंबहुना सगळ्या महाराष्ट्रावर ही आपत्ती ओढवली होती. ४८ साली गांधीजींचा खून झाला. तो करणारा ब्राम्हण. त्यामुळे ब्राम्हणांच्या विरुद्ध वातावरण अतिशय तापले. ब्राम्हण अन्य समाजाच्या रोषाचेच नव्हे, तर द्वेषाचेही बळी ठरले. त्या निमित्ताने लुटालूट झाली. जाळपोळ झाली.

माझे दीर दादा संघाचे असल्यामुळे त्यांना अटक करून तुरुंगात ठेवले. (कदाचित त्यामुळे ते सुरक्षितही राहिले.) गावात काही जणांची धिंड काढली गेली. त्यांना मारण्याचाही जमावाचा मनसुबा असावा, पण तेवढ्यात गावात मिल्ट्री आली आणि लोक वाचले. दादा तुरुंगात, उषाताई, कुसुमताई, सुशीताई, बाळू ही मुले घरात. माझ्या सासुबाईंची, आजींची ही सत्वपरीक्षाच होती. पण मोठ्या धीराने त्यांनी ते दिवस काढले. त्यांचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास होता. त्यांच्या शेजारी देशिंगचे घोरपडे म्हणून रहात होते. जे काही घरात किडूक मिडूक होतं, ते आजींनी गाठोड्यात बांधलं आणि विश्वासाने घोरपड्यांकडे सुपूर्त केलं. घर लुटलं गेलं, जाळलं गेलं, तरी निदान तेवढं तरी वाचावं, म्हणून धडपड. घोरपडे मंडळींनी तितक्याच खबरदारीने त्याचं जतन केलं आणि सगळं वातावरण निवळल्यावर ते आजींच्या स्वाधीन केलं. माणसांवर असलेला आजींचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. आमचं घर जाळायला लोक आले होते, पण तेवढ्यात कर्फ्यू लागला आणि आमचं घर वाचलं. नंतर लगेचच दादाही तुरुंगातून सुटून आले. त्या काळाबद्दल आणि त्यावेळच्या वातावरणाबद्दल ऐकलं की मला रविंद्रनाथ टागोरांचं एक मुक्तकाव्य आठवतं.  त्यांनी लिहिलंय ,

‘किती कोमल असतो माणूस आणि किती क्रूर असतात माणसं. ‘

निपाणीला आजींचे भाऊ रहात. पंचनदीकर वैद्य म्हणून ते  सुप्रसिद्ध होते. पडत्या काळात त्यांचीही आजींना खूप मदत झाली होती. आमचं सगळं कुटुंबच त्यांच्याबद्दल मनात आदर आणि कृतज्ञता बाळगून होतं. त्यांचे हे भाऊ माझ्या लग्नानंतरही माधवनागरला आमच्या घरी खूपदा आलेले आठवतात. माझ्या मनात संशोधक मामा म्हणून त्यांची प्रतिमा रुजलेली आहे. ते आले, की घरी भट्टया लावत. पार्‍यापासून सोनं करण्याचे त्यांचे प्रयोग चालत. त्यांना हवं असेल ते सगळं, आजी आणि घरातील इतर माणसं तत्परतेने उपलब्ध करून देत. पार्‍यापासून त्यांना सोने काही मिळवता आले नाही, पण ज्या एकाग्रतेने, तन्मयतेने ते प्रयोग करत, त्याचं आणि त्यांच्या प्रयोगाचं आम्हाला खूप अप्रूप वाटे.

५० साली दादांचं लग्न झालं. आजींच्या हाताखाली सून आली. हाताखाली सून आली असं म्हणण्यापेक्षा आजींनी कोठीची किल्लीच सुनेकडे सोपवली. म्हणजे आमच्या घरी कोठीला काही कुलूप नव्हतं, पण पुरवणं-उरवणं, ठेवणं- टाकणं, देणं- घेणं, मुलींची माहेरपणं, हे सगळे व्यवहार त्यांनी मुलाच्या आणि सुनेच्या हाती सोपवले आणि घरात राहूनही त्या वानप्रस्थात असल्यासारख्या राहिल्या. गरज असेल तेव्हा स्वैपाकघरात मदत, एरवी त्यांचे पोथीवाचन वगैरे चाले. भाजी आणणे, निवडणे, चिरणे ही कामे मात्र त्या मोठ्या हौसेने करत. बाहेरच्या सोप्यावर बसून त्यांचे हे काम चाले. बाहेर कुणी आलं गेलं तर लक्ष राही. तिथेच बसून त्या पोथी, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध वगैरे वाचायच्या. देवळात भजन –कीर्तन असे, तेव्हा देवळात जात.

सुनेकडे आजींनी सगळी जबाबदारी सोपवली खरी, पण त्यावेळी असेही ठरले की घरातील मिळवत्या व्यक्तीने दरमहा आजींना शंभर –दीडशे रुपये द्यायचे. मला नोकरी लागल्यावर मीही द्यायला लागले. या पैशांचा खर्च त्यांनी कसाही करावा. त्याचा त्यांना कुणी हिशेब मागू नये. त्याचं काय केलं हे विचारू नये. त्यातून त्यांचा देव-धर्म होई. कुणा गरजू व्यक्तीला पैसे द्यावेसे वाटले, तर त्यातून दिले जात. नातवंडांना त्या पैशातून बक्षिसे मिळत. सणावाराला जो नमस्कार करे, त्याला आशीर्वादासोबत एक रुपया मिळे. आजही आपण आर्थिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा करतो. ६०- ७० वर्षापूर्वी आमच्या आजींनी ते मिळवलं होतं. मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते.

माहेरवाशिणी असोत, किंवा नाती, भाच्या वगैरे असोत, देण्या-घेण्याचे व्यवहार त्यांनी केव्हाच दादा-वहिनी कडे सोपवले होते, पण घरातल्या देण्या-घेण्याव्यतिरिक्त आजींचा एक स्वतंत्र खाऊ असे. तो म्हणजे, शेवया, साबुदाण्याच्या पापड्या, तसेच उकडलेले बटाटे, आणि भिजवलेला साबुदाणा घालून केलेल्या व वाळवलेल्या चकल्या असा तो खाऊ असे. सकाळी शेवयाचं पीठ भिजवायचं किवा साबुदाणा भिजवायचा आणि बटाटे उकडायचे. दुपारी जेवणं झाली की आजींचा हा कारखाना सुरू होई. हा लघूद्योग पैशासाठी नसे. बनवणे आणि घरी आलेल्यांना तो खाऊ म्हणून वाटणे हा आजींचा छंद होता. आम्ही घरातल्या दोघी जणी त्यांच्या हाताखाली असूच. मुली-नातींना आणि आल्या-गेल्यांना हा खाऊ देताना, त्यावर त्यांचं भाष्य असे, ‘आपापली दूध-साखर घाला आणि खा’ किंवा ‘आपापल्या तेला-तुपात तळा आणि खा.’ या शेवया, पापड्या नि उपासाच्या चकल्या केवळ माहेरवाशिणींकडेच नव्हे, तर मी माहेरी निघाले की माझ्या माहेरीही आजींनी त्या दिलेल्या असत. माझ्या वडलांना डायबेटीस होता. त्यांच्यासाठी गव्हाच्या पोह्यांचा चिवडा आणि गव्हाचे पोहे घेऊन जा, असं त्यांचं खास सांगणं असे. एरवी मुली माहेरून आल्या की काही ना काही घेऊन येत, अशी रीत होती. आमच्या घरी उलटं होतं. आम्ही माहेरी जाताना सासरहून काही ना काही घेऊन जात असू. मुली आणि सुना यात त्यांनी कधी फरक केला नाही. मुलीही माहेरी आल्या आणि हात-पाय पसरून गप्पा मारत बसल्या असं कधी झालं नाही. आजी म्हणत, ‘कामावे ते सामावे.’

क्रमश: – भाग २

©  सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

इंद्रधनुष्य

 

” गौरव  गाथा  श्वानांची.”

( क्रमशः भाग दुसरा )

 

‘ एकदा साथ द्यायची ती कधीही न सोडणे ‘, हा कुत्र्याचा धर्म ! सेनादलातील चार अधिकाऱ्यांना ,

(जानेवारी ८१ ) एका कुत्र्याच्या छोट्या पिलाने १६ महिने साथ दिलेली घटना. भूतानमधील बोंगयांग या दरीतून जात असताना, तिबेटी  ‘ मँस्टिफ’ जातीचे पिल्लू त्यांच्या मागे धावायला लागले .दया येऊन अधिकाऱ्यांनी त्याला बरोबर घेतले. ‘ द्रुग ‘ (घोडेस्वार ) असे त्याचे नामकरण झाले. सिक्कीममध्ये १९५०० मीटर उंचीवरून प्रवास करताना, सगळे सहन करत आनंदाने   ‘ द्रुग ‘  प्रवास करत होता .जाताना वाटेत त्याला कसला तरी वास आला. आणि  ‘ द्रुग’  वेगळ्याच दिशेला जायला लागला. अधिकाऱ्यांना शंका आली. म्हणून जवळ जाऊन त्यांनी उकरून पाहिले. तो शाल गुंडाळलेले एक प्रेत त्यांना दिसले. दोन महिन्याच्या पिलाच्या आत्मज्ञानाला काय म्हणावे ! कर्तबगारीच्या वर्णनाला, विशेषणांचे शब्दही कमी पडावेत.

एक जुलै. अमरनाथ यात्रेचा पहिला दिवस होता. लेफ्टनंट जनरल ( चिनार कोर कमांडर ) के. जे .एस. धिल्लन, काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या ‘ के 9   योद्धा  ‘मेनका,’  या श्वानाला सलामी देत असलेला फोटो पाहिला. पाहून नवल वाटलं . धिल्लन पवित्र अमरनाथ गुहेत जात असताना, ५० मीटरवर   ‘मेनका’ श्वान कर्तव्य बजावत होते.  कोअर कमांडर तेथे पोहोचताच, श्वानाने–  ‘ मेनकेने ‘  त्यांना सलामी दिली.  धिल्लन यांनीही सलामीनेच त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या छायाचित्राखाली  धिल्लन यांनी लिहिले, ” अनेकांचे प्राण वाचविलेल्या या जिवलग मित्राला सलाम”.      

२००८ पासून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात मिरज ठाण्यात ‘ निरो ‘  या श्वानाची नियुक्ती झाली होती . दक्षिणेतून आलेल्या एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा स्टेशनमध्ये फोन आला. निरोने संपूर्ण गाडी तपासून धोका नसल्याचा निर्वाळा देऊन, सर्वांना हायसे केले. पंढरपूर यात्रेसाठी मिरजहून हजारो भाविक जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी ‘ निरो ‘ ने वेळोवेळी संपूर्ण गाड्या तपासून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि खूप मोठे काम केले . पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेला श्वान हाच तो

‘निरो’.  निरोचा जोडीदार ‘ सोलो ‘ निवृत्त झाला. आणि मग  ‘निरो ‘ एकटाच कोल्हापूर — सातारा विभागाची जबाबदारी सांभाळत होता. एक तपाच्या कर्तव्यपूर्तीनंतर तो सन्मानाने निवृत्त झाला. एखाद्या क्लास वन ऑफिसरला निरोप द्यावा , तसाच सन्मानाने त्याला निरोप दिला गेला. ” पीपल फॉर ॲनिमल ”  या संस्थेच्या मागणी आणि विनंतीनुसार त्यांच्याकडे तो सन्मानाने राहिला.

विठुरायाच्या दर्शनाचे क्षेत्र पंढरपूर. हजारो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. ते निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून सुरक्षा यंत्रणा राबत असते .या यंत्रणेचा एक भाग म्हणजे, लॅब्रॉडॉर जातीचे ‘ तेजा ‘ हे श्वान. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या बॉम्बशोधक दलातील अव्वल श्वान म्हणून ‘ तेजाला ‘ ओळखत होते .विठ्ठल गाभारा आणि मंदिराच्या सुरक्षेचे काम ‘तेजाने ‘ नऊ वर्षे इमाने इतबारे केले. इतके की त्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ‘ ‘तेजाचे ‘ एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे, नऊ वर्षे, तो विठ्ठल मंदिरात तपासणीला आल्यानंतर, गाभाऱ्यात कोणत्याही इशाऱ्याशिवाय सर्वप्रथम विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचा. आणि मग तपासणीचे काम सुरू करायचा. देवापुढे नम्र होण्याचे शिक्षण खरंतर त्याला दिले गेले नव्हते. हे शिक्षण त्याला कोठून दिलं गेलं असेल बरं ! त्याच्या आत्मज्ञानाने तर नसेल !  प्रशिक्षणानंतर २००९ साली ‘ तेजा ‘ सेवेत दाखल झाला. अव्वल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजाला २०१५, २०१६, आणि २०१७ असे सलग तीन वर्षे ,उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले . वृद्धापकाळाने तो शेवटी विठ्ठलचरणी लीन झाला .पोलीस दलाने त्याला अखेरची सलामी दिली. सलाम.

सांगलीकरांना अभिमान वाटावा असा आणखी एक हिरो म्हणजे ‘ लॅब्रॉडॉर ‘ जातीचा ‘ ‘मार्शल ‘ हा कुत्रा.  सांगली जिल्हा पोलीस पथकात बॉम्बशोधक कार्यासाठी  तो कार्यरत होता. त्याने २००९ ते २०१९ असे प्रदीर्घ काळ काम केले. २०१२ मध्ये जत तालुक्यात गोंधळेवाडी या ठिकाणी, शाळेतील मुलांना खेळत असताना एक बाँब सदृश्य वस्तू दिसली .पोलीस दलाला फोन आला. ‘ मार्शल ‘ ला पाचारण केले  गेले. त्या ठिकाणी

‘मार्शलने ‘ पुन्हा पुन्हा वास घेऊन, धोकादायक बॉम्ब असल्याचे सूचक विधान केले. पथकाद्वारे पुढील कारवाई केली गेली. आणि शाळेचे टेन्शन संपले. त्याचप्रमाणे कवलापूर येथे विहिरीचा गाळ काढत असताना, लोकांना एक संशयास्पद वस्तू दिसली.  मार्शलचे व्यक्तिमत्व सर्वांना ठाऊक होते. म्हणून त्याला बोलावले गेले .मार्शलने आपल्या पथकाला ही वस्तू धोकादायक असल्याचा “शब्देविण संवादू “,असा निर्वाळा दिला. पंढरपूर आणि पुणे येथे राष्ट्रपती दौऱ्याच्या काळात, बंदोबस्त, सुरक्षितता आणि तपासणीचे महत्त्वाचे कर्तव्य त्याने बजावले होते. आणि वाहवा मिळवली होती .पंढरपूरच्या प्रत्येक वारीच्या काळात आणि तुळजापूरला नवरात्राच्या काळात तेथील तपासणी आणि बंदोबस्ताचे जबाबदारीचे काम त्याने यशस्वीपणे केले होते. दहा वर्षे निष्ठेने कार्य करून सन्मानाने तो निवृत्त झाला. वयस्क झाला. वृद्धापकाळाने, पाच जून २०२२ या दिवशी तो विठ्ठलाचा आणि तुळजाभवानीचा वरदहस्त घेऊन, ईश्वरचरणी लीन झाला .आज त्याचे उत्तर अधिकारी म्हणून ‘सनी’ नावाचा लाब्राडोर , ‘तेजा ‘ नावाचा डॉबरमॅन, ‘ लिओ’ नावाचा  लँब्राडोर , ‘ लुसी’  नावाची जर्मन शेफर्ड हे श्वान निष्ठापूर्वक कर्तव्य बजावत आहेत.

सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना ,कौटुंबिकदृष्ट्या कर्तव्य पार पाडलेल्या श्वानांच्या असंख्य घटना सांगता येतील.

कर्जत गावाजवळ टेकडीखालील वाड्यात आरेकर यांचा ‘काळू ‘  हा लाडका कुत्रा होता. त्याचेही आरेकरांवर खूप प्रेम होते. आरेकर काकांच्या निधनानंतर, ‘ काळू ‘ त्यांच्या भोवती फिरत राहिला. कोणालाही त्यांच्याजवळ येऊ देईना. प्रेताला हात लावू देईना. अखेर त्याला घरातल्यांनी साखळीने बांधून घातले. नंतर त्यांचा देह अंत्यसंस्काराला नेला गेला .  ‘काळू’ने हिसडे मारून , आरडा ओरडा करून, साखळी तोडून तो स्मशानात आला. मालकाच्या चितेवर बसून राहिला. बाजूला घेण्याचे सर्वांनी खूप प्रयत्न केले. पण तो ऐकायला तयार नव्हता. सर्वांनी अखेर एकत्रितपणे ताकत लावून, त्याला उचलून घरी आणले . आणि खोलीत बंद केले. त्याचा आरडाओरडा चालूच होता. नंतर काकांचे अंत्यसंस्कार झाले. आठच दिवसात ‘ काळू ‘ आपल्या मालकाला भेटायला गेला.– स्वर्गात ! या प्रेमाला आणि निष्ठेला शब्दच अपुरे आहेत.   

दाविद काकडे यांचा दुग्ध व्यवसाय होता. गायीबरोबर जर्मन शेफर्डची जोडीही त्यांनी पाळली होती. रोज पत्नी आशासह ते गाईला चारा आणायला शेतात जात असत. बैलपोळ्याचा दिवस होता. शेतात जाताना एक कुत्रा बरोबर होता. आशा गवत कापत होती. आणि एक फुटावर असलेल्या नागाने फणा काढला. आशाचे लक्ष्य नव्हते. कुत्र्याने नागावर झडप घातली. नागाने कुत्र्याच्या नाकावर डंख मारला. आशाने आरडाओरडा केला . लगेच कुत्र्याला दवाखान्यात नेले. आशाचे आणि कुत्र्याचेही प्राण वाचले .कुत्र्याने मालकिणीवर होणारा दंश स्वतःवर घेतला. आणि मालकिणीचे प्राण वाचविले.

—क्रमशः भाग दुसरा

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

बर्‍याच दिवसांनी आम्ही सख्ख्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पांना रंग चढला होता. किती बोलू आणि काय बोलू, असं प्रत्येकीला झालं होतं. बोलता बोलता विषय निघला, ‘आपल्यावर कुठल्या व्यक्तीचा विशेष प्रभाव पडलाय?’

मी एकदम म्हंटलं, ‘मला वाटतं, माझ्यावर माझ्या सासुबाईंचा प्रभाव आहे.’ सगळ्या जणी काहीशा चकित मुद्रेने माझ्याकडे बघू लागल्या. कारण सासू-सुनेचे भावबंध तसे जगजाहीरच. जुन्या बायकांनी तर ओव्या-बिव्यातून ते शीलालेखासारखे शाश्वत केलेले. गाऊन जगजाहीर केलेले. त्यांनी म्हणूनच ठेवलय, ‘माय म्हणता म्हणता ओठालागी ओठ मिळे’ इती वर्षा. ‘आणि सासू म्हणता म्हणता काय ग?’ शुभदाची तत्पर विचारणा. ‘सासू म्हणता म्हणता ओठातून जाई वारे.’ वर्षाचं प्रत्युत्तर.

त्यातून माझ्या सासूबाई जुन्या पिढीतल्या. सोवळ्या. दोन पिढ्यात असावं, तेवढं आमच्यात अंतर. त्यातही त्या श्रद्धाळू. अगदी अंधश्रद्ध म्हणाव्या, इतक्या पराकोटीच्या सश्रद्ध, तर मी आगदी पराकोटीची तर्कवादी. त्यामुळे मैत्रिणींना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. मग मी म्हणाले, ‘सासू’ जर ‘माय’ झाली, तर ओठाला ओठ जुळतीलच ना! आणि ओठाला ओठ जुळल्यावर मायेचे भावबंदही तसेच घट्ट होतील! मग भले तोंडाने ‘माय’ म्हणून हाक थोडीच मारली पाहिजे? माझं लग्नं झालं, तेव्हा हल्लीसारखी सासूला ‘आहो आई’ असं म्हणायची पद्धत नव्हती. पण ही पद्धत मात्र चांगली आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या  सासू-सून जास्त जवळ येत असतील, असं वाटतं.

‘मला असं वाटतं, माझे विचार,व्यवहार, वर्तन, दृष्टिकोन यावर माझ्या सासुबाईंचा खूप प्रभाव आहे. माझ्या लेखनावरही आहे, असं म्हंटलं, तर चूक ठरणार नाही. कारण लेखकाला काही लिहिताना व्यक्तींना खूप समजून उमजून घ्यावं लागतं. मग त्या प्रत्यक्षातल्या असोत किंवा  मनाने सृजित केलेल्या असोत. व्यक्तीचं अंतरंग जाणून घेण्याची माझ्या सासुबाईंची शक्ती अजोड होती. अंतरंग जाणून त्यातील, ’सत्व ते घ्यावे, फोल टाकोनी द्यावे.’ या वृत्तीने त्या जागल्या, बोलल्या.

माझ्या सासुबाईंचं नाव लक्ष्मी. जुन्या पिढीतील थोर लेखिका लक्ष्मीबाई केळकर यांच्याशी नामसाम्य. माझ्या सासुबाईंनी लेखन केलं असतं, तर ‘माणुसकीचे गहिवर’ सारखं पुस्तक हातून लिहून झालं असतं.

‘ऐसी कळवळ्याची जाती । लाभावीण करी प्रीती।।’ या तुकोबांच्या वचनाचं मूर्त रूप म्हणजे माझ्या सासुबाई. त्यातही त्यांचा ‘प्रीती’ करण्याचा परीघ घरातल्या माणसांपुरता मर्यादित नव्हता. सगळे जवळचे, दूरचे नातेवाईक, परिचयातले, गावातले असा तो व्यापक होता.

माझं लग्न १२ मे १९६५ ला झालं. माझे पुतणे-पुतण्या सासुबाईंना आजी म्हणत. होता होता माझे दीर – जाऊबाई, यजमान सगळेच त्यांना आजी म्हणू लागले. मग मीपण त्यांना आजीच म्हणू लागले. नाही तरी त्यांची नात यमुताई, त्यांच्या मोठ्या मुलीची, अक्काची मुलगी माझ्यापेक्षाच नव्हे, तर यांच्यापेक्षाही मोठी होती. म्हणजे तसा विचार केला, तर आमच्यात दोन पिढ्यांचं अंतर होतं. म्हणजे नात्याने नसेना का, पण वयाच्या अंतराने मी त्यांच्या नातीसारखीच झाले होते आणि त्यांनीही तशीच माया माझ्यावर केली. त्यामुळे या पुढील लेखात मी काही वेळा त्यांचा उल्लेख सासुबाई असा न करता ‘आजी’ असाच केला आहे.

माझं लग्न झालं आणि मी माधवनगरला केळकरांच्या घरात आले, तेव्हा केळकरांचं खातं-पितं घर ‘सुशेगात’ नांदत होतं. पण कधी काळी, अल्पकाळ का होईना, या घराने दारिद्रयाचे चटके सोसले होते. विपत्तीचा अनुभव घेतला होता. सासुबाईंचे यजमान गेल्यावर त्यांना आणि त्यांच्या मुलांना  गरिबीत दिवस काढावे लागले होते.

माझ्या सासुबाईंना कुणी वय विचारलं की त्या सांगत , ‘साल तितकं वय’. माझे सासरे १९४१ साली निवर्तले. म्हणजे त्या अवघ्या ४१ वर्षाच्या होत्या तेव्हा. सासर्‍यांना घरात नाना म्हणत आणि ते गावात नारायणभट म्हणून ओळखले जात. ते गेले, तेव्हा सासुबाईंच्या पदरात तीन मुली आणि दोन मुले होती. मोठ्या मुलीचे म्हणजे आक्कांचे तेवढे लग्न झाले होते. त्यांचीही परिस्थिती म्हणजे ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ अशीच. नाना सांगली संस्थानच्या गणपती पंचायतनातील विष्णु मंदिराचे पुजारी होते. त्यांची भिक्षुकी वृत्ती ( व्यवसाय) होता.

नानांचे बिर्‍हाड सांगलीच्या गावभागातील तात्या केळकरांच्या वाड्यात होते. आता सात माणसांचे कुटुंब आणि आला-गेला सांभाळत असणार्‍या एखाद्या भिक्षुकाची मिळकत किती असणार? त्यात शिल्लक किती उरणार? आक्कांच्या पाठचे दादा. ते तेव्हा दहावीत शिकत होते. त्यानंतर सुशीला, कुसुम, उषा या बहिणी, नंतर माझे यजमान अनंत. त्यांना सगळे बाळू म्हणत. ते अवघे तीन वर्षाचे होते तेव्हा. आता पुढे काय? हा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे आला. ‘ आता गंगाधराने (दादांनी) शिक्षण सोडून भिक्षुकी करावी,  असेच अनेकांचे म्हणणे पडले. माझ्या सासुबाईंनी मात्र, ‘मुलाला भिक्षुक करायचे नाही. सध्या या व्यवसायाला मान-प्रतिष्ठा राहिली नाही,’ असे ठामपणे सांगितले. तरीही १० वी आणि ११वी अशी दोन वर्षे शिकत असताना दादांनी दोन देवळातली पूजा केली. देवळातला प्रसाद म्हणून दोन ताटातून भरपूर जेवण घरी यायचे. घरच्यांची एक वेळच्या का होईना, पण जेवणाची सोय व्हायची. नानांनी थोडी जमीन घेतली होती आणि ती खंडाने दिली होती. खंडाचा धान्य घरी यायचं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे सासुबाईंचं केशवपन झालं. त्याबद्दल मी पुढे केव्हा तरी दादांना विचारलं, ‘तुम्ही कसं होऊ दिलत केशवपन?’ त्यावर दादा म्हणाले, ‘ तो आजींचा स्वत:चा निर्णय होता.’ कदाचित त्यांच्यावर झालेले संस्कार, तो काळ, गावातलं वातावरण, सासरे करत असलेला व्यवसाय याचा तो एकत्रित परिणाम असेल.

‘कसं चाललं होतं तुमचं तेव्हा?’ मी एकदा आमच्या कुसुमवन्संना विचारलं होतं. ‘अपरंपार कष्ट आणि अपार काटकसर या दोन चाकांवर आमचा गाडा तेव्हा चालत होता.’ त्या म्हणाल्या.

त्यावेळी कुसुमताई दहा वर्षाच्या होत्या. सुशीताई बारा वर्षाच्या असतील. कुसुमवन्स पुढे म्हणाल्या होत्या,  ‘शेजार्‍या-पाजार्‍यांच्या रेशनचं धान्य आम्ही आणून देत असू. त्यांच्या रेशनवरची बाजारी आम्ही घेत असू. आमच्या रेशनवरची बाजरीही आम्ही घेत असू. बाजरी उष्ण. त्यामुळे घरात आम्ही कुणी ती खात नसू. आमचे चुलत भाऊ गणुदादा यांना आम्ही ती देत असू. त्या बाजरीवर ते रुपयाला दहा आणे कमिशन देत असत. इतरांचं शिवण शिवून शिलाईचे पैसेही आम्ही मिळवत असू. प्रत्येक फ्रॉकला चार आणे शिलाई मिळायची. संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’

क्रमशः …

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अण्णा उर्फ अरविन्द गजेंद्रगडकर – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆

? मनमंजुषेतून ?

☆ अण्णा उर्फ अरविन्द गजेंद्रगडकर – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

आकाशवाणी, पुणे हा  मोठमोठ्या कलाकारांनी बहरलेला, लगडलेला एक  कल्पवृक्षच होता. बा.भ.बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव अशा अनेक मंडळींनी इथे काम केले. हेही त्यापैकीच. निर्माता या पदावर  काम करणारे हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर एक उत्कृष्ट कलावंत-वादक-लेखक-संवादक अशा बहुगुणांनी  नटलेले एक व्यक्तिमत्व होते . आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम करताना अनेक दिग्गज संगीतकार आणि वादक त्यांच्या सहवासात आले. ते केवळ सरकारी बाबू नव्हते तर संगीताचे साधक आणि जाणकारही. त्यामुळे हरिप्रसाद चौरसिया असोत किंवा बेगम अख्तर, ही मंडळी यांच्या गुणग्राहकतेवर आणि संगीत साधनेवर खूश असायची. हरिप्रसाद यांना खूप मानायचे. धारवाड, नागपूर येथील आकाशवाणी केंद्रांवरची त्यांची कारकीर्दही  गाजली.

ते गोष्टी वेल्हाळ होते. गोष्ट कशी सांगायची हे त्यांच्याकडून शिकावं. हा अनोखा गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक लोभस पैलू  होता. हाडाचे शिक्षक होते ते. सायन्स पदवीधर. शिक्षण शास्त्राचाही रीतसर अभ्यास केलेले. माझे एक गृहितक आहे ते म्हणजे विज्ञान शाखेतील कोणत्याही विषयाचा अगदी साधा पदवीधर जरी असला तरी तो / ती वैचारिक दृष्ट्या एक विशिष्ट पातळी कधी सोडत नाहीत. वस्तुनिष्ठता हा गुण आणि no nonsense हा Approach त्यांचा वागणूकीचा भाग बनून जातो. अण्णाही त्या पठडीतले. संगीताचा गाढा अभ्यास ,व्यासंग इतका की केवळ संगीत साधना आणि वादन कौशल्य एवढ्यावर ते थांबले नाहीत. या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली.

पन्नालाल घोषांची शागिर्दी केलेल्या अण्णांची बासरी वादनावर तर हुकमत होतीच. पण स्वरमंडळ सारखे फारसे प्रचलित नसलेले वाद्य त्यांनी आपल्या अदाकारीने झंकारत ठेवले. संगीतावर व्याख्याने दिली. संगीत परीक्षा सुलभ व्हाव्यात म्हणून मार्गदर्शनपर पुस्तकेही लिहिली. वेगवेगळ्या पट्टीत गाणाऱ्यांसाठी त्यांनी तानपुरा वादनाच्या ध्वनीफिती बनवल्या.  वर्तमानपत्रात लेख लिहिले. संगीतातल्या सर्वच क्षेत्रात अधिकार असलेले ते एक दुर्मीळ व्यक्तिमत्व होते. 

अण्णांची (अरविंद गजेंद्रगडकर ) माझी ओळख त्यांचा मुलगा निखील याच्यामुळे झाली. तो माझ्या वर्गात होता; पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या. पण खरं सांगू का, त्यांचे माझे सूर अधिक जमले आणि खूप लवकरही. मी मुंबई दूरदर्शनला असताना ते आमच्याकडे कार्यक्रम करायला येत असत. कधी वादनासाठी तर कधी मुलाखती घ्यायलाही. माझ्या माहिमच्या मठीवरही ते अनेक वेळा येऊन गेले. दादा म्हणजे जी.एन.जोशी यांच्याकडे मी पेइंग गेस्ट म्हणून राहात होतो. अण्णांना तर त्यांच्याबद्दल विशेष आदर. मला वाटते दादाना भेटण्याच्या ओढीने ते माझ्याकडे येत असावेत. कारण काहीही असो. ते प्रेमाने येत. त्यांनी मला संगीत विश्वातील सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, पण प्रत्यक्ष घडलेल्या अनेक कथा सांगितल्या.

मुंबईत त्यांचे वास्तव्य बोरीवली इथे होते. पण संचार मात्र शहरभर असायचा. कुठे चांगले ध्वनिमुद्रण असले, एखादा दुर्मीळ गाण्याचा कार्यक्रम असला की यांची उपस्थिती ठरलेली. मला एक दोनदा त्यांनी चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही नेले होते . ‘माझा लवतोय डावा डोळा’.. शांताबाई यांच्या महानंदा चित्रपटातील लताबाई यांचे गाणे ध्वनिमुद्रित होताना मी यांच्याच सहवासात अनुभवले आहे . 

स्वतःवर ज्याला विनोद करता येतो किंवा स्वतःची फजिती ज्याला ग्रेसफुली सांगता येते तो माणूस निर्मळ मनाचा असतो. अण्णा असे अनेक किस्से सांगत. त्यातील हा एक अफलातून किस्सा — ते अनेक दिवाळी अंकांसाठी लिहित असत. पण मानधनाची मात्र वाट पाहावी लागे. अशाच एका अंकाचे मानधन आले नाही म्हणून ते त्यांच्या कार्यालायात सदाशिव पेठेत गेले. थोड्या इतर गप्पा मारुन त्यांनी मानधनाचा विषय काढला. संपादकाने नेहमीप्रमाणे रडगाणे गायले . शेवटी हे म्हणाले मग असे करा मला पाच अंक द्या. मानधन नको. त्यावर संपादक म्हणाले ते परवडणार नाही, त्यापेक्षा मानधन देतो. यावरुन मानधनाचा आकडा किती अशक्त होता हे कळले आणि आमची हसून हसून पुरेवाट झाली . 

१९८०च्या दशकात मुंबईत नुकतीच हॉटेलमध्ये लाईव्ह संगीत कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. गायक, संगीतकार यांना हॉटेलमध्ये सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करत. ३,४ तास गायन ,वादन यांच्या मैफिलींचा आनंद लुटत. ग्राहक खानपान सेवेचाही आस्वाद घेत असत. कलाकारांनाही उत्तम मानधन मिळे. वरळी व्हिलेज या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना करारावर आमंत्रित केले होते . या मंडळीना एक पाहुणा आणायला परवानगी होती. तो भाग्यवंत मीही एक दोनदा ठरलो . अण्णांची बासरी ऐकत , नयनरम्य माहोल असलेल्या त्या गार्डनमधल्या ओल्या संध्याकाळी कशा काय विसरता येतील ? 

मी पुण्यात आल्यावर तर ते आमचे हक्काचे आर्टीस्ट झाले. माझ्या अनेक जाहिरातींच्या जिंगल्सचे संगीत त्यांनी दिले. युनायटेड बँक, केप्र मसाले ,शतायुषी मासिक, एवढेच नव्हे तर माझ्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘न्याय’ या फिल्मलाही त्यांचाच संगीतसाज लाभला होता.

‘सृष्टी’ या प्रशांत कोठडियाच्या संस्थेचे ते नियमित कलाकार होते. तिथल्या अनेक मैफिली त्यांनी आपल्या शब्द सुरांनी उजागर केल्या. अनेक बड्या कलाकारांशी त्यांचा घरोबा असल्यामुळे आणि त्यांच्या कलांचे नेमके मर्म ठाऊक असल्यामुळे त्यांचे लेखन अतिशय मनोवेधक होत असे. कुमार गंधर्व आणि बेगम अख्तर यांच्यावरील त्यांचे लेख म्हणजे व्यक्तीचे आस्वादक आणि सखोल मूल्यमापन कसे करावे याचे उत्तम नमुने आहेत.

’अंतर्नाद’ हे मासिक अल्पावधीत गाजले. त्या लोकप्रियतेत यांचाही मोठा वाटा होता. आपली पंचाहत्तरी त्यांनी अनोख्या रीतीने साजरी केली होती. दोन दिवसांच्या कार्यक्रमात बासरीवर त्यांनी ७७ राग वाजवून आपल्या आयुष्यात बासरीच्या सुरांचे असलेले महत्व अधोरेखित केले होते. एक अतिशय रसिक ,चाणाक्ष , चांगल्या अर्थाने चोख व्यावसाईक, गुणग्राहक आणि जिंदादिल व्यक्तिमत्व असलेले अरविंद गजेन्द्रगडकर हे माझ्या स्मरणकुपीत ऐशआरामात कायमचे विराजमान झालेले आहेत. 

(जन्म ११ जानेवारी ,१९२८) त्यांच्या  जयंती निमित्त विनम्रतापूर्वक आदरांजली !

लेखक : डॉ केशव साठये 

[email protected]

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलू कौतिके… अर्थात  Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆

??

☆ बोलू कौतिके… अर्थात  Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆

कौतुक, प्रशंसा, स्तुती हे एकाच वर्गातील पण जरा वेगवेगळ्या भावच्छटा असलेले शब्द आहेत. कौतुक हे मनापासून असतं, प्रशंसा लोकांसमोर, जरा वाजत गाजत करायची असते पण ती खरीच असते,  तर स्तुती ही केवळ समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी, त्या व्यक्तीच्या पुढे पुढे करण्यासाठी करण्यात येते व त्यामागे स्तुतिपाठकांचा बरेचदा सुप्त हेतू ( hidden agenda) असतो. पण आत्ता आपण केवळ कौतुकाविषयीच बोलणार आहोत. एखाद्याच्या achievement बद्दल मनापासून खरं खुरं कौतुक वाटणं आणि ते वाटत असल्याचं आपण शब्दातून किंवा कृतीतून त्या व्यक्तीपर्यंत पोचवणं. मग ते कौतुक शब्दात असेल, नजरेत असेल, कृतीत किंवा पाठीवर दिलेल्या शाबासकीत व्यक्त केलेलं असेल. पण ते व्यक्त होणं महत्वाचं! 

बरेच वेळा आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीने काहीतरी वाखाणण्याजोगी कामगिरी करून दाखवलेली असते आणि ही गोष्ट इतकी सोपी नाही किंवा कदाचित ती आपल्यालासुद्धा जमणार नाही, ही गोष्ट आपल्याला मनातून खरंच पटलेली असते. पण तरीही आपण त्या व्यक्तीला मनापासून, भरभरून दाद देत नाही,  आपल्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेरच पडू शकत नाहीत.

असं का होत असावं? 

याचा जर नीट विचार केला, तर याचं उत्तर मनाच्या कोपऱ्यातच कुठेतरी दडून बसलेलं असतं. कदाचित आपण समवयस्क असू, नाहीतर मग समव्यावसायिक असू…कदाचित  ती व्यक्ती आपल्याहून वयाने, अनुभवाने लहान असेल आणि तिचं हे अनपेक्षित यश आपल्या अहंकाराला थोडासा धक्का देऊन गेलं असेल. पण मग आपण जर मनातून असं ठरवलं, की हा आपला अहंकार जरा वेळ बाजूलाच ठेवून द्यायचा आणि त्या व्यक्तीचं अगदी मनापासून, दिलखुलासपणे कौतुक करायचं..आणि आपण जर  खरोखर तसं केलं, तर त्याचा आपल्या आयुष्यावर फार मोठा, अगदी दूरगामी परिणाम दिसून येतो. 

पहिलं म्हणजे तुमच्याकडून अनपेक्षितपणे आलेल्या त्या  कौतुकाच्या शब्दांमुळे त्या व्यक्तीला अतिशय अप्रुप वाटतं, दोन मनं जवळ येतात आणि तुमच्यात व त्या व्यक्तीमध्ये एक अतूट नातं निर्माण होतं. दुसरं म्हणजे आपणच निर्मळ मनाने दुसऱ्या व्यक्तीचं जे appreciation केलेलं असतं त्यामुळे आपल्या मनाला आपलंच कौतुक वाटतं. आपण आपला अहंकार क्षणभर बाजूला ठेवू शकलो, दुसऱ्याच्या आनंदात निरामय वृत्तीने सामील होऊ शकलो, ह्याचा आनंद फार मोठा असतो. 

माझ्या मनोवृत्तीत बदल घडायला असाच एक प्रसंग घडला आणि मला त्यातून एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीची एक होती. वयाने माझ्यापेक्षा तरुण, हुशार, स्मार्ट, कॉन्फिडन्ट, लोकप्रिय.. तिच्या सहवासात येणाऱ्या इतर स्त्रियांना नक्कीच न्यूनगंड निर्माण होईल, असंच तिचं व्यक्तिमत्व होतं. मीही त्या गोष्टीला अपवाद नव्हते. आमची दोघींची मैत्री होणं शक्यच नव्हतं. 

पण एक दिवस एक वेगळीच गोष्ट घडली.

तिने एका स्पर्धेत स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, त्या स्पर्धेची मी नेमकी एकमेव परीक्षक होते.  परीक्षण गुप्तपणे करायचं असल्यामुळे तिला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. अपेक्षेप्रमाणेच ती या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरली होती. इतर स्पर्धकही तसे तुल्यबलच होते. थोडक्यात सांगायचं, तर मी त्या स्पर्धेत तिला डावलून दुसऱ्याची निवड केली असती, तरी या कानाचं त्या कानाला कळलं नसतं. स्पर्धेचा निकाल ऐकल्यावर तिचा तो कॉन्फिडन्स, तो नखरा किंचित उतरला असता, ते सुंदर धारदार नाक जरातरी खाली झालंच असतं. केवढी संधी माझ्याकडे आयती चालून आली होती.

काय करू? मीच परीक्षक असून तो मला माझ्या परीक्षेचा क्षण वाटला. मी स्वत:शी भांडले आणि अखेर माझ्या विवेकाने मला हरवलं. मी माझ्या सारासार विवेकाला म्हणाले, “ तुझं खरंय. आज मी जर नि:पक्षपातीपणाने निर्णय दिला नाही, तर मीच माझ्या मनातून उतरेन. मला माझ्या वागण्याची लाज वाटेल आणि मी स्वत:ला कधी माफ करू शकणार नाही. त्यामुळे आज मी तिचा जाहीर हिरमोड करण्याची ही संधी सोडून देते आणि तिला तिच्या पात्रतेनुसार या स्पर्धेत प्रथम क्रमांक देऊन टाकते. 

यथावकाश स्पर्धेचा निर्णय जाहीर झाला. तिने मोठ्या दिमाखात मला फोनवर ती बातमी कळवली. मी तिचं मोजक्या शब्दात अभिनंदन केलं. बक्षीस समारंभाला मी हजर राहू शकले नाही, म्हणून माझं मनोगत लिहून संयोजकांकडे पाठवून दिलं. अखेर त्या समारंभात तिला त्या स्पर्धेचं  परीक्षक कोण होतं ते समजलं. दुसऱ्या दिवशी तिचा परत माझे आभार मानायला फोन आला. मी म्हटलं, “माझे कशासाठी आभार? You deserved it, so you got it.” 

नंतर ती मला तिच्या बक्षिसाची पार्टी द्यायला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. मीही तिला एक छानशी गिफ्ट घेऊन गेले. त्या स्पर्धेचा आणि परीक्षणाचा विषय निघालाच नाही, पण आमच्या चांगल्या ३-४ तास गप्पा रंगल्या. त्या दिवशी मला एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. आमची सुमारे वीस वर्षापूर्वी झालेली मैत्री अजूनही तेवढीच घट्ट आहे. तिची मुलगी माझी लाडकी भाची आहे आणि मी तिची  फेव्हरिट मावशी. एकमेकींच्या आयुष्यातील सुखदु:खांच्या क्षणाच्या आम्ही साक्षीदार झालो आहेत. 

आपल्या मनातल्या सतत वर डोकं काढू पाहाणाऱ्या  अहंकाराला जर आपण दडपून गप्प बसवू शकलो, तर आपल्याला जन्मभर पुरेल एवढी प्रेमाची, मैत्रीची शिदोरी प्राप्त होते, हा माझा अनुभव आहे. पुढील आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, पण प्रत्येकवेळी मी मनातल्या अहंकाराला बाजूला ठेवून मनात उमटलेले  योग्य ते कौतुकाचे शब्द त्या त्या व्यक्तींपर्यंत पोचवू शकले.

गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना मला तिथे एक मैत्रीण म्हणाली, “ आमच्या इथल्या वर्तुळात खूप हेवेदावे, गटबाजी चालते. तुमच्या पुण्यात तसं काही आहे की नाही?”

त्यावर मी म्हटलं, “तसं पुण्यात आहे की नाही, याची मला खरं तर कल्पनाच नाही, कारण ना मला कुणाचा हेवा वाटतो, ना माझा कुणी हेवा करतं. आपला कुणी हेवा करावा असं  माझ्याकडे काहीच नाही आणि मला कुणाचा हेवा वाटावा, असं दुसऱ्या कुणाकडे नाही. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’, हा सुखी जीवनाचा मंत्र मी अंगिकारलेला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने खरंच स्पृहणीय कामगिरी केली असेल, तर आपण कौतुक करण्यात आखडता हात कशासाठी घ्यायचा? तुम्हाला काय वाटतं… ?

लेखिका : ## लीना सोहोनी

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी व्हायोला हाउसिंग सोसायटी बोलतेय… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

??

☆ मी व्हायोला हाउसिंग सोसायटी बोलतेय… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

माननीय महापौर,

महानगरपालिका… 

स.न.वि.वि.

को.हा.सोसायटीच्या प्रगतीकरता व विकासासाठी आपण जे निरनिराळे उपक्रम राबवता, मार्गदर्शन करता, प्रोत्साहन देता त्याकरता प्रथम मी आमच्या सोसायटी तर्फे आभार मानते.

प्रस्तुतच्या उपक्रमात आपण निरनिराळ्या सोसायट्यांची  स्पर्धा आयोजित केली त्यानिमित्त, मी व्हायोला सोसायटी, माझी ओळख व वैशिष्ट्ये, या परिसरातील माझे स्थान याविषयी माहिती सांगणार आहे.

मुंबई पुणे महामार्गाला लागून जो सर्व्हिस रोड आहे त्याला लागुनच माई मंगेशकर हॉस्पिटल पासूनची चौथी जी टोलेजंग इमारत आहे, ती माझीच बरे. माझ्या कपाळावर ठसठशीत कुंकू वापरल्याचे असणारे माझे नाव झळकते आहे. त्यामुळे माझे कपाळ उठून दिसत आहे. मी उंच असल्यामुळे खूप दूरपर्यंत दिसू शकते. मुख्य प्रवेश दारापाशी मी सर्व लोकांचे स्वागत करण्याकरता मोठ्या आनंदाने हात जोडून उभी असते.

… ‌माझा जन्म १९९८साली झाला. पण माझे नामकरण २०००साली झाले. तेव्हापासून या भागाचे प्रमुख आकर्षण व भूषण म्हणून माझी ओळख आहे

प्रवेश दारातून आत आल्यावर उजवीकडे छोटे लॉन आपले स्वागत करते. विविध वृक्षांनी हे लॉन वेढलेले आहे. निरनिराळे विविध रंगी पक्षी येथे मंजूळ गाणी गात असतात. रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी दिव्यांची आरास खूप छान दिसते. झाडांना विविध आकारांनी सजविले आहे. सकाळी लोक हिंडायला येतात. संध्याकाळी बच्चे कंपनी हुंदडत असते. जाणाऱ्या येणाऱ्याची चहल पहल असते. मी हर्षाने न्हात असते.

मी माझ्या आठ विंग मध्ये विभागली आहे. एकूण १७० सदनिका आहेत. प्रथम दर्शनी एच विंग ३बी.एच.के दिमाखात उभे आहे. त्याच्या बाजूला २बी एच.के विराजमान आहे. व त्यानंतर १बी.एच.के.आहे. या सर्व सदनिका अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त आहेत .प्रत्येक इमारतीच्यामध्ये एक छोटासा साजिरा,गोजिरा बगिचा आहे. दोन्ही इमारतींची शान वाढविण्याचे काम हा बगिचा करतो. येथेच झेंडा वंदन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम होत असतात.

ई. इमारतीजवळ वनश्रीने नटलेला एक सुरेख व सुबक स्विमिंग पूल आहे. निळेशार पाणी त्यात खुलुन दिसते. विशेषतः उन्हाळ्यात रसिकांची गर्दी उसळते. लहानापासून तो मोठ्यापर्यंत जलतरण करण्याकरता उत्सुक असतात.

माझ्या लोकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी जीमची व्यवस्था केली गेली आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र playground ची व्यवस्था केली आहे. लहान मुले नाचत बागडताना पाहिले की मी आनंदाने बेभान ‌होते.

निरनिराळे उपक्रम येथे राबविले जातात. जसे वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, स्वच्छता मोहीम ‌इत्यादि.माझे सर्व रहिवासी गुण्यागोविंदाने राहतात. ‘United we all, divided we fall ‘ हे तत्व त्यांना माहित आहे. माझा कारभार सुव्यवस्थित होण्यासाठी सक्षम कार्यकारी मंडळ योजले आहे. मी विविधतेने नटलेली असले तरी एकतेच्या धाग्यात गुंफलेली आहे.

साहेब, मी आतापर्यंत खूप बोलले. मला वाटतं की स्पधेर्च्या दृष्टीने ही माहिती पुरेशी आहे. असेच नवनवीन स्पर्धा वे उपक्रम घेत जावे, व आम्हाला  संधी देत जावे  ही विनंती.

– एक स्पर्धक

व्हायोला को.हा.सो.

©  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

२०१८च्या जून महिन्यात मी बाली इथं एका परिषदेत भाग घेण्यासाठी, तर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या एका परिषदेत सहभागी होण्यासाठी माॅरिशसला गेलो होतो. परिषदांमध्ये सहभागी होऊन मी माझे रिसर्च पेपर सादर केले. परिषदांच्या कामकाजानंतर दोन्ही देशांत साधारणत: एक एक आठवडा मुक्काम झाला. आयोजकांनी तिथल्या विविध सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील  अनेक संस्थांना आमच्या भेटी घडवून आणल्या. भरपूर साईट सिईंगही केले.निसर्गरम्य समुद्रकिनारे, रंगीबेरंगी मनमोहक फुलांच्या बागा,श्रममहात्म्याने विकास पावलेले समाज,सामाजिक सौदार्ह आणि शांतता असं  बरंच काही चांगलं पाहिलं..आपल्याकडं ज्या नाहीत, त्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी पाहून भारावून जायला नक्कीच झालं. रहाण्याची व्यवस्था, खाणंपिणं, प्रवास हेही नियोजनबद्ध आणि सुरेख होतं.

माझी मुलगी  इंग्लंडला एका नावाजलेल्या हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टर आहे. तिच्याकडं जायचं खूप दिवस चाललं होतं. पण माझ्या नोकरीच्या  काळात ते शक्यच झालं नाही. त्यात मधले काही दिवस कोरोनामुळे जमलंच नाही. जगभर सगळीकडंच सारं ठप्प झालं होतं. सप्टेंबर २०२१ ला मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालो.आणि  पत्नीबरोबर  इंग्लंडला जायचं आम्ही ठरवलं. त्यात अनेक अडचणीही आल्या. सेवानिवृत्त होऊनदेखील बरेच दिवस पेन्शन आणि इतर आर्थिक बाबी मिळण्यास खूपच उशीर झाला. अनेक शारीरिक व्याधींनी मी त्रासून गेलो. तशाही अवस्थेत अनेक संबंधित ऑफिसांत जाऊन मी पायपीट करत होतो. “तुम्ही लवकर या” असा मुलीचा  लकडा चालूच होता.आम्हा दोघांचे पासपोर्ट हातात आले. इंग्लंडचा व्हिसा कित्येक दिवस झाले तरी मिळाला नाही. दिवसांमागून दिवस जात होते. इंग्लंडला जायचं नियोजन धूसर दिसत चाललं. रशिया- युक्रेन युद्धामुळं हा वेळ लागतो,असं सांगितलं गेलं. जाण्याची जय्यत तयारी करून आम्ही व्हिसाची वाट पहात बसलो.

असाच एक दिवस सायंकाळी मोबाईलवर मेसेज आला की,आम्हा दोघांचे पासपोर्ट तयार असून ते घेऊन जावेत. इंग्लंडला जायचा मुहूर्त एकदाचा मिळाला.

मुलीशी  फोनवरून बोलून जाण्याची आणि परत भारतात येण्याचीही तारीख ठरवली. व्हिसा मिळायला उशीर झाल्यामुळे फक्त दोन महिने तिच्याकडं रहाता येणं शक्य होतं. विमानाची तिकिटं तिनंच काढली.  १९ जूनला आम्ही मुंबईहून डायरेक्ट विमानाने इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळावर पोहचलो. तेव्हा तिथं सायंकाळ झाली होती.

विमानतळावरून बॅगा घेऊन बाहेर आलो. हा सिझन तिथं तर उन्हाळ्याचा होता. पण तिथली थंडी सहन होत नव्हती. बाहेर रिमझिम पाऊसही पडत होता. जर्किन आणि कानटोपी चढवून छत्रीही उघडली. एका टॅक्सीनं आम्ही  लंडनच्या जवळ असलेल्या मुलीच्या फ्लॅटवर पोहोचलो.  पुस्तकांतून,  चित्रपटांतून दाखवलं जातं तसं जाताना अनुभवलं. खड्डे नसलेले सुबक रस्त्यावरून जाताना इतस्तत: सगळीकडं जाणवेल इतकी स्वच्छता होती. सगळं काही आखीव रेखीव होतं. रस्त्यावरून अनेक वाहने भरधाव वेगाने जात होती. पण तीही ट्रॅफिकचे नियम पाळून. आमच्या वास्तव्यात इंग्लंडमधील लंडन, केंब्रिज अशा अनेक शहरांत आम्ही जाऊन बरंच पाहिलं. लहानपणापासून मला  क्रिकेटची खूप आवड. गावी  मी खूप क्रिकेट खेळलो होतो. मला आठवतं एकदा तीन गावांची क्रिकेटची टुरनामेन्ट होती. त्यात मी सलग तीन विकेट घेऊन हॅटट्रिक केली होती.

लंडनमधील लाॅर्डसच्या ग्राऊंडला ‘क्रिकेटची पंढरी ‘म्हणतात. ते पहाण्याची संधी मला मिळाली. ते मला सोनेरी स्वप्नच वाटलं .या क्षणांना मी कवितेत गुंफले — 

पाहिलं मी लाॅर्डसचं  मैदान…

विस्तीर्ण रस्त्यांच्या महिरपींनी नटलेलं,

इंद्रधनु स्वप्नांसारखं, परिकथेतील सुंदर,

पाहिलं मी लाॅर्डसचं मैदान—

कपिलदेवसोबतच अनेक भारतीयांच्या तसबीरींनी आणि

विक्रमगाथांनी इथल्या ड्रेसिंगरूम सजल्या होत्या, 

सचिनचे प्रेरक शब्द तिथली एक भिंत अभिमानाने मिरवत होती,

१९८३ मधल्या भारताच्या विश्वविजयाचा प्रुडेनशीयल चषक 

तिथल्या म्युझियममध्ये पाहिला, आणि … 

बघता बघता लाॅर्डसचं मैदान शतपटींनी उजळून निघालं…

आपल्याकडं जत्रेत जसे पाळणे असतात तसाच एक अतिविशाल पाळणा थेम्स नदीकाठावर आहे.त्यातून लंडनमधील अनेक गोष्टी दाखवल्या जातात. त्याला ‘लंडन आय ‘म्हणतात. या लंडन आयमधून अनेक   सुंदर सुंदर बाबी आम्हाला दाखवल्या. नंतर पायी चालत लंडनमधून जाताना, लंडन आयमधून  जे दिसलं नव्हतं, त्या ब-याच बाबी पहायला मिळाल्या. हेही मी शब्दात मांडलय — 

दर्शन…

अतिभव्य पाळण्यावरच्या लंडन आयनं,

लंडनचं मनोहारी दर्शन मला दिलं ,

आकाशातल्या सूर्यकिरणांनी

चमचमणारे पाणी मला दाखवलं,

भव्य ब्रिटिश संसदेचे आणि युरोपातल्या अतिऊंच इमारतीचे 

दर्शन मला घडवलं,

जगाला भूषणावह अनेक विक्रमांच्या साक्ष असलेल्या टोलेजंग  इमारती दाखवल्या ,

त्या इमारतींच्या भवतालच्या पाचूंच्या बागांतून उमललेली रंगीबेरंगी फुलं दाखवली,

टाॅवर ब्रिजसकट अनेक सुंदर पूल दाखवले,

निखळ आनंदाने हसणारी, खिदळणारी माणसं दाखवली;

लंडनच्या रस्त्यावरून जाताना पाहिलं,

ठिकठिकाणी बोकाळलेले जुगारांचे बाजार,

खाऊन पिऊन झाल्यावर त्याचे रिकामे कागद रस्त्याच्या कडेला फेकून देणारी माणसं,

येणा-या जाणा-यांना गुलाबाची फुलं देऊन पैसे उकळणाऱ्या बायका

आणि– 

“हेल्प मी,गाॅड मे ब्लेस यू ” या पाटीआड डोकं खुपसून बसलेला मळलेल्या  कपड्यातला एक याचक— 

जगावर राज्य केलेल्या इंग्लंडमधील स्वच्छता, टापटीप, निटनेटकेपणा हे जितके भावले, त्याचबरोबर तिथल्या  समाजातील औपचारिकता मला मानवी जीवनातील कोरडेपणा जाणवून गेली. आपल्या समाजात अनेक उणिवा आहेत. त्या स्वीकारूनही इंग्लंडमधील  कुटुंबसंस्था ही मला चिंतेची बाब वाटली.आपल्या आणि इंग्लंडमधल्या समाजरचनेची तुलना करता आपल्याकडं सगळं आबादीआबाद आहे असं मला म्हणायचं नाही. तरीपण एक सांगावसं वाटतं….. आपल्याकडं प्रबोधन आणि परिवर्तनाच्या अनेक चळवळी   झाल्यात. अनेक कारणावरून त्या अनेकदा खंडितही झाल्या. या अधिक गतिमान केल्या तर — आपल्याकडील न्यूनता नक्कीच कमी होईल.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

(म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. इथून पुढे…)  

तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा ! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी …. 

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा 

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा 

…असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले ! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता,तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे. 

पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान ! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे. 

पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं ? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे. 

समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहूचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले. तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे. 

तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं. 

– समाप्त –

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

परिचय

श्री विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव

  • सेवानिवृत्त मुख्याध्यापक .
  • सोशल मीडियावर गेली सहा वर्षे सातत्याने विविध विषयांवर लेखन.
  • वर्तमानपत्र, दैनिके इ तून विविध लेख प्रसिद्ध
  • औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक आधुनिक केसरी या ई वृत्तपत्रातून अनेक लेख ‘ उगवतीचे रंग ‘ या सदराखाली प्रकाशित
  • तरुण भारतच्या ‘ आसमंत ‘ पुरवणीत ‘ थोडं मनातलं ‘ हे साप्ताहिक सदर सुरू.
  • आदर्श शिक्षक पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार इ पुरस्कार…
  • सहसचिव, म सा परिषद, पुणे शाखा चाळीसगाव

प्रकाशित पुस्तके :

  1. कवडसे सोनेरी… अंतरीचे
  2. आकाशझुला
  3. अष्टदीप (आठ भारतरत्नांची प्रेरणादायी चरित्रे)
  4. आनंदाच्या गावा जावे. (आनंद, ज्ञान देत सकारात्मक दृष्टिकोन देणारे लेख)
  5. रंगसोहळा (ललित लेख)
  6. रामायण : महत्त्व व व्यक्तिविशेष (रामायणातील पात्रे आणि त्यांचा आजच्या संदर्भातील संदेश, रामायणकालीन शिक्षण, समाजरचना इ रसाळ भाषेत सांगणारे पुस्तक)
  7. महर्षी वाल्मिकी चरित्र (या पुस्तकावर आधारित महर्षी वाल्मिकीच्या जीवनावर एक लघु चित्रपट देखील येणार आहे.)

विशेष :

  • नाशिक येथील एफ एम रेडिओ विश्वासावर गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ दर मंगळवारी व शुक्रवारी सकाळी आठ वाजता ‘या सुखांनो या’ हा कार्यक्रम प्रसारित होतोय.
  • याच रेडिओवर आनंदघन लता हा कार्यक्रम अकरा महिन्यांपासून सुरू आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत 46 भाग सादर झाले आहेत.

?मनमंजुषेतून ?

☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

गारंबीचा बापू ‘  या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे. ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा…’ रवींद्र साठे यांनी  असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की  मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे.  पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ? आपण कधी गेलो का तिथे ? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं. 

मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली ? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न. 

थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं . ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या. 

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ 

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ 

‘जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरू राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला. 

मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला ( पैस ) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत. 

पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. 

शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । 

सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥

— अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. 

काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले.  पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. 

–क्रमशः भाग पहिला 

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print