☆ “दगडातला देव …” भाग – २ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आज अचानक मीनाचा फोन आला “आहेस का घरी येऊ का?”
म्हटलं “ये…”
जोशी काकांच्या कोकण ट्रीपला तिची ओळख झाली. व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज असायचे.खर तर ट्रीप नंतर तिचा फारसा संबंध आला नव्हता. व्हाट्सअप ग्रुप वर होतो तेवढच.. त्यामुळे आज ती घरी का येते हे कळेना…
मीना आणि अजून पाच जणींचा ग्रुप होता. जोशी काका वेगळं काही सांगायला लागले की त्या बोअर व्हायच्या. तिथून निघून जायच्या…. कॉमेंट्स करायच्या .
असू दे …..बरोबर आहे त्यांचं… सगळ्यांनाच कस आवडेल म्हणून आम्ही पण काही बोलत नव्हतो.
गणपती मंदिरात मीना माझ्या शेजारी उभी होती तिनी दगड ऊचलला
आणि म्हणाली..
“हे बघ नीता काही गणपती बीणपती दिसत नाही ऊगीच आपलं .. काका काहीतरी सांगतात आणि तुमचा लगेच विश्वास बसतो “असं म्हणून तो दगड माझ्या हातात देऊन ती निघून गेली होती.
मी तिचा आणि माझा दगड पर्समध्ये ठेवला होता.
ती येणार म्हटल्यावर आज हे आठवले….
तीचं काय काम आहे समजेना…
ती आली.
जरा वेळाने म्हणाली
” मी उचललेला दगड तू घरी आणला होता तो आहे का ग?”
“आहे माझ्याकडे..पण त्याची तुला आज कशी आठवण झाली?”
“नीता तुझा लेख वाचला आणि आम्ही जोशी काकांना किती हसत होतो त्यांची टिंगल करत होतो हे आठवले. तुम्ही किंवा काका देव दिसला की लगेच स्तोत्र,आरत्या काय म्हणता म्हणून आम्ही वैतागत होतो …..काका उपदेश करतात म्हणून आम्ही त्यांची खिल्ली ऊडवायचो….
तुझा लेख वाचला आणि माझ्या वागण्याच मला खरंच वाईट वाटायला लागलं……
त्या माणसातला देव आम्ही पाहिलाच नाही….म्हणून आज मुद्दाम तुला भेटायला आले.”
“अगं होतं असं अनवधानांनी असू दे नको वाईट वाटून घेऊ…..ट्रीप मध्ये मजा ,गंमत करायची असं तुमच्या डोक्यात होत ..त्यामुळे तुम्हाला ते आवडत नसेल… “
मी तिची समजुत काढली.
“आणि अजून एक गोष्ट झालेली आहे ती तुला सांगते .माझ्या नातीचा गॅदरिंग मध्ये
“अधरं मधुरम् वदनं मधुरम्”
या मधुराष्टकावर डान्स बसवलेला आहे. ती ते मनापासुन ऐकत असते.तीचे ते पाठ पण झाले आहे. काल नातीने मला विचारले आजी तुला हे माहित आहे का? तेव्हा आठवले तुम्ही कृष्णाच्या मंदिरात हे म्हटले होते.”
“हो आठवले.तीथे कदंब वृक्ष होता.त्याची माहिती काकांनी सांगितली होती.”
यावर ती म्हणाली
“आज मनापासून सांगते .जोशी काकांची माफी मागावी असं वाटलं. आता ते नाहीत म्हणून तुझ्याकडे आले.”
तीचे हात हातात घेतले.
थोड्या वेळानंतर तीचा दगड घेऊन आले.दगड तिच्या हातात देऊन म्हटलं
” एक सांगु का? यात बाप्पा शोधायचा प्रयत्न करूच नकोस .नुसती काकांची आठवण म्हणून ठेव .या दगडाकडे पाहून तुला ईतरही काही आठवेल आणि तेच खर महत्त्वाच आहे.तुझ्या विचारांमध्ये बदल झाला आहे.ही या दगडाची किमया आहे. “
असं म्हणून तिच्या हातात तो दगड दिला
तिने तो आधी कपाळाला लावला आणि मग तो बघायला लागली……. …
आणि अचानक म्हणाली
“नीता मला गणपती दिसतो आहे…. अग खरच शपथ घेऊन सांगते..”
तिचे डोळे भरून वहात होते…
असचं असत ना…
अनमोल गोष्टी हातातून जातात आणि मग त्याचं महत्त्व आपल्याला..
पटतं……
तसेच काकांसारखी माणसं आयुष्यातून जातात पण गेल्यानंतरही अशीच शहाणी करतात… विचारात परिवर्तन घडवून आणतात…
असू दे ….
अशी माणस आपल्या आयुष्यात आली हेही आपलं भाग्य म्हणायचं. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत राहायचं….
☆ “दगडातला देव …” भाग – १ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
जोशी काकांबरोबर कोकणातली ट्रिप सुरू होती. संध्याकाळ झाली होती. आम्हाला जायचं होतं ते ठिकाण अजून लांब होत.
अचानक एका देवळासमोर गाडी थांबली. आम्हाला काही कळेना.इथे का थांबलो?….
खाली उतरलो.काका म्हणाले
“गणपतीचे दर्शन घेऊया “
एक साधेच नेहमी असते तसे देऊळ होते. दर्शन घेतले.
काका म्हणाले “आता सगळेजण आपण इथे बसून अथर्वशीर्ष म्हणुया”
काकांच हे काय चालल आहे आम्हाला कळेना..
तेवढ्यात काकांनी खणखणीत आवाजात सुरुवातही केली.
“ओम भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:..”
आम्ही पण सगळे म्हणायला लागलो..
“हरि ओम् नमस्ते गणपतये…”
अथर्वशीर्ष म्हणून झाल्यावर बाहेर आलो.
देवळाच्या आवारात छोटे छोटे असंख्य दगड टाकलेले होते आणि त्याच्या मधून छान रस्ता केलेला होता.
काका म्हणाले
“या देवळाच्या आसपासचे हे दगड बघितलेत का?”
“दगड.”
“हो ..दगडच “
त्यात काय बघायचं ?..आम्हाला समजेना..
“तुम्हाला या देवळाची एक विशेष गोष्ट सांगायची आहे.
तुम्ही देवळाची प्रदक्षिणा करा आणि कुठलाही एक दगड उचला..
तो गणपतीच आहे…
अट एकच आहे फक्त एकदाच दगड उचलायचा…”
“म्हणजे?”
काका काय म्हणत आहेत हेच आम्हाला कळेना …त्यांनी परत सगळे सांगितले.
असं कसं असेल?
आम्हाला वाटल काका आमची मजा करत आहेत.
पण काका अगदी गंभीरपणे सांगत होते.
“स्वतः करून बघा तुम्हीच…”ते म्हणाले..
आम्ही प्रदक्षिणा करून आलो..
आता गंमत सुरू झाली.
कुठला दगड उचलावा हे कळेचना… आम्ही सर्वजण उभे होतो.
काका एकदम म्हणाले
“गणपती बाप्पा मोरया…”
आणि आम्ही प्रत्येकाने खाली वाकुन एक एक दगड उचलला.
प्रचंड उत्सुकता…. कुतूहल ….अपेक्षा….
दगडाच निरीक्षण सुरू झालं…
आणि मग काय मजाच सुरू झाली….
प्रत्येकाला त्याच्या दगडात बाप्पा दिसायला लागला. तुझा बघु …. माझा बघ… प्रत्येकाने निरीक्षण केलं…
कोणाला डोळा दिसत होता ..कोणाला सोंड दिसत होती ..
काहीजण हिरमुसले… त्यांना बाप्पा दिसला नाही .मग कुणीतरी म्हटलं पालीचा आणि लेण्याद्रीच्या गणपतीचा भास होतो आहे…..
कितीतरी वेळ आम्ही त्याच नादात होतो.
काकांनी परत एकदा गणपती बाप्पाचा गजर केला.आणि म्हणाले
“चला बसा गाडीत “पुढच्या प्रवासाला निघालो..
काही जणांना ती गंमत वाटली त्यामुळे त्यांनी तो दगड टाकून दिला. तर काही जणांनी तो दगड श्रद्धेनी बरोबर घेतला..
गाडी सुरू झाली आणि लक्षात आलं की मगाशी हळूहळू गचके खात चालणारी गाडी आता सुसाट चालली होती…
गाडी दुरुस्त झाली होती.
अरेच्चा अस होत तर….
तेवढा वेळ काकांनी आम्हाला गुंगवून ठेवले होते .आणि नकळतपणे आम्ही पण त्या खेळात रंगून गेलो होतो…
गाडी बिघडली… असे सांगितले असते तर आमचा हिरमोड झाला असता. आम्ही कंटाळलो असतो… त्यासाठी काकांनी ही युक्ती केली होती.
काकांना किती छान सुचलं नाही का?
विघ्न आलं… संकट आलं की घाबरायचं नाही .आपलं लक्ष दुसऱ्या एखाद्या चांगल्या सकारात्मक गोष्टीकडे लावायचं. त्यात मन रमवायचं ….काही वेळ जाऊ द्यायचा कदाचित प्रश्न सुटतातही….
पण एक मात्र सांगू का?
त्या दिवशी आम्हाला खरंच प्रत्येकाच्या दगडात थोडा का होईना देव दिसला…..
बस मधून उतरताना काका म्हणाले…..
“आज दगडातला देव बघितलात. आता माणसातला देवही बघत जा बरं का….. देवाशी वागता तस माणसाशीही वागुन बघा …”
आम्ही सगळे स्तब्ध झालो …
त्या छोट्याशा वाक्यातून काकांनी आम्हाला खूप काही सांगितले शिकवले….
हळूहळू आम्ही शिकत आहोत.
त्या गणपतीकडे बघितले की मला हे सर्व आठवते.
माझा तो दगड अहं …गणपती आता माझ्याकडे आहे.
मला त्यात बाप्पा दिसतो…
आज काका नाहीत ..
पण त्यांनी सांगितलेले जीवनाचे तत्वज्ञान तुम्ही पण लक्षात ठेवा हं..ते आयुष्यभर पुरणारे आहे…
☆ ‘‘माझा व्यायाम शाळेतील पहिला (आणि बहुधा शेवटचा) दिवस !!’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
(…नुकताच जागतिक योग दिन साजरा झाला .. त्यानिमित्त….एक सुरम्य आठवण …)
आधीच मला व्यायामाचे वेड! (?) त्यात वेळ न मिळाल्याचे कौतुक! त्यामुळे गेली कित्येक वर्षं सर्वांनी सांगून, समजावूनही, मला व्यायाम किंवा ‘योग’ नावाची गोष्ट, मुद्दामहून कधीच करायचा योग आला नव्हता! शिवाजी पार्कला राहत असताना, घरासमोरच्या समर्थ व्यायामशाळेत रोज सकाळ-संध्याकाळ, शेकडो मुलं झरझर मल्लखांब करताना, व्यायाम करताना पाहून मला खूप कौतुक वाटे. आपणही असेच सुटसुटीत असावं, असं वाटे!
अलीकडेच मी व्यायामशाळेचे प्रमुख, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित असलेल्या श्री. उदय देशपांडे सरांनी केलेल्या विनंतीमुळे , व्यायामशाळेची विश्वस्त आणि आजीव सभासदही झाले. मी विचार केला, ‘चला, आपणही हातपाय हलवून पाहूया’, आणि मला कोण स्फूर्ती आली!!
तो सुदिन म्हणजे ७ जुलै…. माझा वाढदिवस! प्रत्येक वाढदिवसाचा निश्चय, हा नव्या वर्षातल्या पहिल्याच दिवशी करतात, तशा संकल्पासारखा – मोडणाऱ्या मनोऱ्यांसारखाच असतो, हे मला ठाऊक असूनही, मी पहाटे ६ वाजता व्यायाम शाळेत हजर झाले. तिथली उत्साही मंडळी उशा, चादरी घेऊन आली होती , तसे मी काहीच नेले नव्हते. प्रशिक्षक मॅडमनी ‘शवासना’पासून सुरुवात केली….. आणि इथेच तर खरा गोंधळ झाला…!
सर्वांनी शरीरे जमिनीवर झोपून सैल सोडली. मॅडमच्या सांगण्यानुसार, पायाच्या बोटापासून प्रत्येक जण डोळे मिटून, लक्ष केंद्रित करत होता. नंतर बराच वेळ काय चालले होते, हे मला कळलंच नाही. काही वेळाने मी दचकून डोळे उघडले, आणि पाहते तो काय?…. आजूबाजूला रंगीबेरंगी कपड्यातले बरेच पाय….. हवेत लटकताना दिसले!! मी तर पुढच्या कुठल्याही सूचना ऐकण्यापूर्वीच कुंभकर्णासारखी ठार झोपले होते तर!! नेहमीप्रमाणे ताबडतोब स्वप्नही सुरू झाले होते… कुठे दगडावरही मेली छाऽऽन झोप लागण्याची ही माझी जुनीच सवय! माझा हा अवतार पाहून, प्रशिक्षक मॅडम मला शेवटी म्हणाल्या, “अहो, सॉरी हं.. तुम्ही इतक्या छान झोपी गेलात ते पाहून आणि सेलेब्रिटी म्हणून तुम्हाला कसं उठवू? असं झालं मला!” हे ऐकून तर मला वरमल्यासारखंच झालं. पण गालातल्या गालात हसूही फुटलं!
त्यामुळे ‘शवासन’, हा माझ्यासाठी एकमेव सर्वांगसुंदर व्यायामाचा आणि परमेश्वरी कृपाप्रसादाचा प्रकार आहे, असं मी आजवर मानत आलेय!!!
एका केअर सेंटरला…..म्हणजे वृद्धाश्रमाला भेट द्यायला गेले होते. त्या दिवशी तिथे दोन मुली येऊन खुर्चीवर बसून ..करायचे हातापायाचे व्यायाम शिकवणार होत्या. मी इकडे तिकडे फिरत आश्रम बघत होते.
एक सावळा हसतमुख मुलगा पायाने थोडा लंगडणारा त्याची गप्पा मारत लगबग चालू होती. तो तिथला मदतनीस असावा.
” ए आजी तुला रोज गाऊन मध्ये बघतो आज साडी नेसलीस तर छान दिसते आहेस . इतकी कशाला नटली आहेस? ….काय दाखवायचा कार्यक्रम आहे का ? “
” हो आता 75 व्या वर्षी करते परत लग्न “ती हसत हसत बोलली.
” ए आजी चल आटप… तुझे ते दोन घास राहिले आहेत ते खाऊन घे”
” अगं आजे झालं उन्हात बसून… चल आता आत ये .. चक्कर येईल नाहीतर”
ए आजी ….ए आजे…असं म्हणत तो सगळ्यांशी गप्पा मारत होता. इतक्यात एका आजींनी त्याला हाक मारली ..
” बरं बाबा तुझ्या लक्षात येतं नाही तर माझ्या बीपीचं काही खरं नव्हतं बघ….”
” चला चला आज व्यायाम शिकायचा आहे ना”..
अस म्हणून त्यानी सगळ्यांना बाहेर आणून खुर्चीवर बसवायला सुरुवात केली.
एका आजीची ओढणी त्यांच्या पायात येत होती …. “कशाला घेतलीस ती ओढणी? पायात अडकून तूच पडशील बघ.. कोण बघतय तुला ? ” .. अस म्हणून त्यानीच ती काढून आत कॉटवर नेऊन ठेवली.
सगळ्याजणी येऊन बसल्यावर त्या मुली शिकवायला लागल्या .
तो त्यांचा व्हिडिओ काढायला लागला.
” अरे सगळे इतके गंभीर का? जरा हसा की…. ओ ताई तुम्ही त्यांना हसत हसत करायला सांगा बरं…”
मग त्यानीच हात वर केले की हा.. हा.. हा …म्हणून हसायला सांगितलं.
वातावरणच बदललं .त्या मुलींना पण शिकवायला गंमत वाटायला लागली.
इतरांना हसवणाऱ्या त्या मुलाकडे मी बघत होते. त्या लेकराच्या जीवनात कसला आनंद होता? तरी तो इतरांना आनंदी ठेवत होता …
सगळ्यांचा तो लाडका होता.. ते पण आपुलकीने ,मायेने त्याच्याशी बोलत होते .आज माझे लक्ष त्याच्याकडेच होते.
“इतका वेळ बसलीस तर पाठ दुखेल तुझी “
असं म्हणून एका आजींना आधार देऊन तो रूममध्ये घेऊन जायला लागला.
मी त्याच्याकडे बघत होते .सहजपणे आपुलकीने तो वागत होता.तो तिथेच रहात होता…ह्या वयस्कर लोकांची सेवा करत होता.
आजकाल अस कोणाला बघीतलं की डोळे आपोआप भरून येतात. शिकत राहते त्यांच्याकडून….
… माझ्याही जीवनात अमलात आणायचा प्रयत्न करते..
त्या दोन मुली शिकवत होत्या .
अर्ध्या तासानी जेवायची वेळ होणार होती. तो सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन जगमध्ये पाणी भरायला लागला होता.
…. प्रत्यक्ष पांडुरंग एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनुन पाणी भरत होता…….
त्याचीच आठवण आली…
मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला .
सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं नसलेले हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात …..
आपल्याच आसपास….. नीट बघितलं की दिसतात…
एक विनवणी करते रे ……
आता त्यांच्यातच तुला बघायची दृष्टी दे रे पांडुरंगा…
शाळेत एखादी मुलगी गणवेश न घालता रंगीत कपडे ( तो नवीनच असेल असे नाही ) घालून आली की तिचा वाढदिवस आहे, हे कळायचं..शाळेत स्टेजवरून तिचं नाव पुकारलं जायचं.तिला शुभेच्छा दिल्या जायच्या नि आम्ही पोरी ” एक दोन तीन…एक दोन तीन..एक — दोन — तीन ” अशा शिस्तबद्ध टाळ्या वाजवायचो…
” आपणही टाळ्या वाजवाव्यात की तसच उभं रहावं ” या संभ्रमात ती वाढदिवसाळु उत्सवमूर्ती तोंडावर कसनुसे भाव घेऊन कानकोंड्या अवस्थेत उभी राहिलेली असायची!!
घरची जरा बरी परिस्थिती असली तर शाळेत लिमलेटच्या गोळ्या नाहीतर रावळगाव चॉकलेट वाटलंं जाई…. अन् त्यादिवशी “ती वाटणारी मुलगी” राणीच्या थाटात वावरत असे आणि तिला मदत करणारी तिची मैत्रीण तिच्या दासीच्या..कारण तिला एक गोळी जास्तीची मिळायची!!
ती गोळी किंवा चॉकलेट खिशातून जपून घरी नेलं जाई नि आम्ही तीन भावंडे त्याचे चिमणीच्या दाताने तुकडे करून पुढचा तासभर ते चघळून चघळून खात असू..
आयुष्यातील आनंद नि त्याचा कालावधी वाढवण्याची सोपी युक्ती आम्हाला त्या गोळीनं
आम्हाला शिकवली..!!
एके दिवशी एका मैत्रिणीने साधारण बटाटेवड्याच्या आकाराचा बसाप्पाचा शिक्का असलेला पेढा वर्गातल्या प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त दिला…आम्हाला आश्चर्याने चक्कर यायचीच राहिली होती..!!
जेमतेम एखादी गोळी वाटणं सुद्धा परवडणं -नं- परवडण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आम्हा पोरींना प्रत्येकी एक एवढा मोठा पेढा हा फार मोठा सांस्कृतिक धक्काच होता..
” तिचे वडील मोठे डॉक्टर आहेत..तिला न परवडायला काय झालं ?” या घरातल्या शेरेबाजीनं…
” आपण एकतर डॉक्टर व्हायचं आणि अगदीच नाही जमलं तर किमानपक्षी डॉक्टरशी लग्न तरी करायचं ..आणि होणा-या पोरांच्या वाढदिवसाला शाळेत पेढे वाटायचे ” हा निश्चय मात्रं त्या नकळत्या वयात मनानं केला!
वाढदिवस जवळ आला की दोन विषय मनात पिंगा घालू लागायचे….. नवीन कपडा मिळणं नि मैत्रिणींना वाढदिवसासाठी घरी बोलावणं…
तीन मुलांची जबाबदारी असलेल्या आमच्या माऊलीनं घरखर्चातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवलेले असायचे..त्यातून पुढची किमान तीन वर्षे अंगाला येईल एवढा घळघळीत कपडा शिवला जायचा..नि वर्षभरातील सा-या सणवारांना, लग्नकार्यांना तो पुरवून पुरवून वापरला जायचा..!!
एखादे वर्षी घरात कुणाचं तरी आजारपण निघायचं नि साठवलेले सारे पैसे घरच्या डब्यातून डॉक्टरच्या गल्ल्यात जमा व्हायचे… त्यावर्षी आईची त्यातल्या त्यात नवी साडी फ्रॉक नाहीतर मॅक्सीचं रूप घेऊन वाढदिवसाला आम्हाला सजवायची…!!
” आई, वाढदिवसाला मैत्रिणींना बोलवूया नं गं ” ही आईच्या मागची भुणभुण काही मैत्रिणींच्या प्रेमापोटी नसायची.. तर असायची मैत्रिणींकडून भेटवस्तू मिळाव्यात म्हणून…!!
बरं त्यावेळच्या भेटवस्तू तरी काय असायच्या..
एखादी एक रुपयाची वही, पंचवीस पैशाची पेन्सिल, दहा पैशाचं खोडरबर, पंचवीस पैशाचं ” सोनेरी केसांची राजकन्या ” वगैरे पातळ कागदाचं गोष्टीचं पुस्तक, पन्नास पैशांचं कानातलं..देणा-याची आर्थिक परिस्थिती बरी असेल तर दीड-दोन रुपयांचं फाऊंटन पेन…
यातल्या ब-याच वस्तू स्वस्त पडतात म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच घाऊक आणून ठेवलेल्या..
कानातलं असंच कुणीतरी दिलेलं पण न आवडलेलं…
गोष्टीचं पुस्तक घरातल्या सगळ्या मुलांनी वाचलेलं…त्याचा आता नाहीतरी काय उपयोग म्हणून त्याचं रुपांतर भेटवस्तुत झालेलं…
बरं ..या वस्तू देताना त्याला गिफ्ट पॅकिंग वगैरे प्रकार नाही… त्यांच्या नैसर्गिक स्वरुपातच अवतरलेल्या… पण तरीही त्यांचं खूप आकर्षण असायचं… तेवढंही न मिळण्याचा तो काळ होता…
म्हणून तर पावडरचा डबा, टी-कोस्टर्स, कंपासपेटी असल्या महागड्या गिफ्ट्स देणाऱ्या एका मैत्रिणीला वर्गातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला बोलावलं जायचं…!!
भडंग, पातळ पोह्याचा चिवडा, कांदेपोहे , उप्पीट, एखादा लाडू नाहीतर डालड्यातला शिरा…यातल्या दोन पदार्थांवर वाढदिवस साजरा व्हायचा..!
मैत्रिणींकडून मिळालेली वह्या, पुस्तकं, पेन्सिली, कानातली वगैरे अख्ख्या दुनियेतल्या खजिन्याचा आनंद देऊन जायची…. हा खजिना कुशीत घेऊन निद्रादेवीच्या सोबत घडणारी स्वप्नांची सैर अद्भुत आनंद बहाल करायची…!!
…. ते दिवस कसे भुर्रकन् उडून गेले ते कळलच नाही…फुलपाखरीच होते ते..!!
आई -वडिलांचेही दिवस पालटले होते..केल्या कष्टांचं चीज झालं होतं..चार पैसे गाठीशी जमले होते..
भाऊ , बहीण मोठे झाले..कमावते झाले..
” तुला वाढदिवसाला फक्त काय पाहिजे ते सांग…”
जे पाहिजे ते मिळू लागलं होतं…पैसा आड येतच नव्हता…
पण लहानपणाची भेटवस्तूंची ओढ मात्र कुठेतरी आटली होती…. वाढदिवसाचं महत्त्व, लहानपणी वाटणारं कौतुक तारुण्याच्या रेट्यात कुठंतरी हरवून गेलं होतं..
लग्न झालं नि चित्रपटातल्या नायक-नायिकांच्या वाढदिवसाच्या भुताने झपाटलं..
वाढदिवसाला ” अलगदपणे गळ्यात हि-याचा नाजुकसा नेकलेस घालणारा ” किंवा ” वाढदिवसाला अचानक विमानात बसवून स्वित्झर्लंडला नेणारा ” किंवा ” शे-दोनशे लोकांना भव्य घराच्या भव्य हॉलमधे बोलावून पत्नीच्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी करणारा ” नायक आणि त्याने पत्नीला दिलेल्या भेटवस्तू प्रमाण होऊ लागल्या…
…… नि ” अगं हे सगळं तुझच आहे..तुला पाहिजे ते घेऊन ये ” असं म्हणून कर्तव्याला प्राधान्य देत कामाला निघून जाणारा नवरा …त्या नायकापुढे अगदीच फिका पडू लागला..
प्रत्यक्षातलं आयुष्य हे चित्रपटापेक्षा फार वेगळं असल्याचा धडा या वाढदिवसाच्या भेटवस्तुंनी शिकवला …नि स्वत:च्या वाढदिवसाची खरेदी स्वत:च करायची सवय लागली…
लेकीच्या बालपणाबरोबर मात्र बालपणाने पुन्हा आयुष्यात प्रवेश केला…
तिचा थाटाने साजरा केलेला पहिला वाढदिवस…
ती छान दिसावी म्हणून तिला टोचत असतानाही तिला घातलेले महागडे ड्रेस,
स्वत:च्या लेकरांच्या वाढदिवसांना फारशी हौस न पुरवू शकलेल्या आजी-आजोबांनी दिलेल्या सोन्या-चांदीच्या भेटवस्तू , काका, मामा, मावशी, आत्यांनी दिलेल्या गिफ्ट्स, निमंत्रितांकडून आलेले आहेराचे ढीग….
” सगळं तुझं तर आहे, तुला हवं ते तू जाऊन आण ” असं म्हणणा-या नव-याने स्वत: जाऊन लेकीसाठी आणलेल्या भेटवस्तू….. या सा-यांनी आयुष्यातल्या रिकाम्या जागा भरून काढल्या…
तिच्या वाढदिवसाला शाळेत वाटलेल्या भेटवस्तू, अगदी पेढेसुद्धा…
तिला पाहिजे तसे घेतलेले कपडे, दागिने, वस्तू..
तिच्या मित्र-मैत्रिणींना बोलावून साजरे केलेले वाढदिवस…
आणि दोस्त कंपनीकडून मिळालेल्या गिफ्ट्सनी सुखावलेली नि त्यांना कुशीत घेऊन स्वप्नांच्या राज्यात माझ्यासारखीच सैर करणारी माझी छकुली…!!
शिंप्याकडच्या कपड्यांची जागा ब्रॅंडेड वस्तुंनी घेतली… चिवडा-लाडुच्या जागी इडली, पावभाजी, पिझ्झा-बर्गर आला.
…. पण वाढदिवस नि भेटवस्तुंच्या बाबतीतल्या भावना मात्रं तिच्या नि माझ्या अगदी तशाच होत्या…तरल..हळव्या..!!
दरम्यानच्या काळात आई-वडील, सासुसासरे यांचे साठावे, पंच्याहत्तरावे वाढदिवस साजरे करून त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीही साज-या न केलेल्या वाढदिवसांचं उट्टं काढण्याचा नि त्यांना मोठाल्या भेटवस्तू देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा केविलवाणा प्रयत्न केला…
पण त्यांनी दिलेल्या “रिटर्न गिफ्टने ” अक्षरश: चपराक मिळाली नि आमच्याऐवजी त्यांनीच आमच्या सा-या वाढदिवसांचं उट्टं भरून काढलं!!
काळ फार वेगाने सरला..
वाढदिवसाला भरभरून आशीर्वाद देणारे अनेक हात काळाचं बोट पकडून दूरवर निघून गेले…
” हॅं…वाढदिवस घरी कसला साजरा करायचा !! ” या वयाला लेक पोचलीय…
आता बहीण -भाऊ, दीर -नणंद यांच्या मुलांच्या मुलांचे म्हणजे नातवंडांचे वाढदिवस साजरे होतायत..
मी आजी म्हणून त्यांना उदंड आशीर्वाद देतेय…
” थीम पार्टीज, डेकोरेशन, चकाकणारे भव्य हॉल, “खाता किती खाशील एका तोंडाने ” अशी अवस्था करून टाकणारी विविध क्युझिन्स…
मुलांचा आनंद नव्हे तर स्वत:ची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी दिलेल्या नि घेतलेल्या भेटवस्तू….
मुलाचे नि आईचे वाढदिवसासाठी घेतलेले हजारोंच्या किंमतीतील ब्रॅंडेड कपडे..
या झगमगाटात मला मात्रं दिसते ती माझी माऊली..वर्षभर पैसे साठवून लेकरांचा वाढदिवस साजरा करणारी….. रात्रभर जागून मुलांच्या वाढदिवसासाठी बेसन भाजणारी…
नि आपल्या लेकराच्या आनंदासाठी भेटवस्तू म्हणून स्वत:कडच्या चारच साड्यातील एक साडी फाडून कपडे शिवणारी.. त्यागाची मूर्ती…!!
आता माझीही पन्नाशी सरलीय…
वाढदिवस येतात नि जातात..
भेटवस्तुंचं आकर्षण कधीचच विरलय … आहेत त्याच वस्तू अंगावर येतात..
पण तरीही वाढदिवसाची ओढ मात्रं आजही वाटते…
…. कारण त्यानिमित्तांने कितीतरी जीवलगांचे , सुहृदांचे फोन येतात.. शुभेच्छा मिळतात..
आणि आपण आयुष्यात केवढी माणसं कमावली याची सुखद जाणीव होते…!!
आपण अंबांनींपेक्षाही श्रीमंत असल्याची भावना मनाला शेवरीपेक्षा तरल करून टाकते…
दिवसाच्या शेवटाला या शुभेच्छारूपी भेटवस्तुंना कुशीत घेऊन मी समाधानाने पुढच्या वाढदिवसाची वाट पहात झोपी जाते…!!
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
घड्याळात रात्रीचे साडे आठ वाजलेले पाहून आशानं ताबडतोब फोन केला पण अंजूनं उचलला नाही.इतक्यात दारावरची बेल वाजली.
“सकाळी सातला गेलेली आत्ता उगवतेस.”
“आई,रोजचाच प्रश्न विचारून डोकं पिकवू नकोस.महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला.”
“चकाट्या पिटणं हे महत्वाचं काम नाहीये.”सुरेश कडाडल्यावर बापलेकीत जुंपली.
कॉलेजला जायला लागल्यापासून अंजूचं घराबाहेर राहण्याचं प्रमाण वाढलं. सकाळीच जाणारी अंजू रात्री आठ पर्यंत यायची.आल्यावर सुद्धा फोनवर बोलणं चालूच. मैत्रिणी, मित्र आणि मोबाईल यातच गुंग.घरात अजिबात लक्ष नाही.सगळी कामं आशाच करायची.अंजूच्या बेफिकीर वागण्याची आशाला काळजी वाटत होती.खूपदा समजावलं पण काहीही उपयोग नाही.एकीकडे लेकीचं असं वागणं तर नवऱ्याची दुसरीच तऱ्हा. .घरात पैसे देण्याव्यतिरिक्त कोणतीच जबाबदारी घेत नव्हता, मात्र जरा काही मनाविरुद्ध झालं की वाट्टेल ते बोलायचा.चिडचिड करायचा.अंजूच्या वागण्याविषयी दोष द्यायचा.आशा सगळं निमूट सहन करत होती.
सुरेश आणि अंजूमध्ये वाद तर रोजचेच. त्यासाठी कशाचंही निमित्त पुरायचं.घरातल्या कटकटी वाढल्या. दोघंही आपला राग आशावरच काढायचे.नवरा आणि मुलीच्या एककल्ली वागण्याचा प्रचंड ताण आशावर होता.सहन होईना अन सांगता येईना अशी अवस्था. सगळे अपमान,अवहेलना ती आतल्याआत साठवत होती. मनमोकळं बोलावं असं तिच्या आयुष्यात कोणीच नव्हतं. शेजारी राहणाऱ्या मंगलबरोबर आशाची छान गट्टी जमायची, पण सहा महिन्यापूर्वी मंगल दुसरीकडं रहायला गेली अन आशा पुन्हा एकाकी झाली.हळूहळू तिनं बोलणं कमी केलं.फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची.घरात भांडणं सुरु झाली की कोरड्या नजरेनं पाहत बसायची. मनावरच्या ताणाचे परिणाम दिसायला लागले.तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या.निस्तेज चेहरा,डोळ्याखाली काळी वर्तुळ जमा झाली. खाण्या-पिण्यातलं लक्ष उडालं.वजन कमी झालं.खूप दिवसांची आजारी असल्यासारखी दिसायला लागली.आशामधला बदल आपल्याच धुंदीत जगणाऱ्या सुरेश आणि अंजूच्या लक्षात आला नाही.आशानं सूड म्हणूनच स्वतःकडे दुर्लक्ष केलं.
एके दिवशी नेहमीसारखी बापलेकीत वादावादी चालू असताना किचनमधून ‘धाडकन’ पडल्याचा आवाज आला.अंजून पाहिलं तर जमिनीवर पडलेली आशा अर्धवट शुद्धित अस्पष्ट बोलत होती.लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले.तीन दिवसांनी घरी सोडलं पण तब्येतीत फारसा फरक नव्हता.डॉक्टरांनी औषधं बदलली पण उपयोग नाही.खरंतर आशाला वैफल्य आलेलं.हताश,निराश मनस्थितीमुळे तब्येत सुधारत नव्हती.नाईलाजाने का होईना सुरेश,अंजू काळजी घेत होते, तरी आपसातली धुसफूस चालूच होती.आशाची ही अवस्था आपल्यामुळेच झालीय याची जाणीव दोघांना नव्हती. मन मारून जगणाऱ्या आशाचा त्रास समजून घेणारं कोणीच नव्हतं.वेदना बाहेर पडायला जागा नसल्यानं दिवसेंदिवस आशाची तब्येत खालावत होती.
—
वरील घटनेतील ‘आशा’ हे एक प्रातिनिधिक उदाहरण. तिच्यासारखंच मानसिक ओझं घेऊन जगणारे अनेकजण आहेत.
नुकताच पावसाळा सुरू झालाय.धो धो कोसळणारं पाणी वाट मिळेल तिथून पुढे सरकते पण तेच पाणी नुसतंच साठत राहिलं तर ??? अनर्थ होईल –. तोच निकष मनाला लागू पडतो.
रोज अनेक गोष्टींना सामोरं जाताना अनेकदा मनाविरुद्ध वागावं लागतं.अपमान सहन करावे लागतात.राग,संताप गिळून गप्प बसावं लागतं.नोकरदारांना तर हा अनुभव रोजचाच.या सगळ्या तीव्र भावना मनात साठल्या जातात.अशा नकारात्मक भावनांचा साठा वाढत जातो.वेळच्या वेळी निचरा होत नाही.ताणामुळे शारीरिक त्रास सुरू होतात.
पूर्वी मन मोकळं करण्यासाठी नातेवाईक,शेजारी,मित्र-मैत्रिणी अशी जिवाभावाची माणसं होती.एकमेकांवर विश्वास होता.त्यांच्याबरोबर बोलल्यानं मन हलकं व्हायचं.एकमेकांची अनेक गुपितं बोलली जायची.सल्ला दिला घेतला जायचा.थोडक्यात मनातला कचरा वेळच्या वेळी काढला जायचा.आता सगळं काही आहे– फक्त मनातलं बोलायला हक्काचं माणूस नाहीये.सुख-सोयी असूनही मन अस्थिर.आजच्या मॉडर्न लाईफची हीच मोठी शोकांतिका. बदललेली कुटुंबपद्धती,फ्लॅट संस्कृती आणि मी,मला,माझं याला आलेलं महत्त्व .. .यामुळे कोणावर पूर्णपणे विश्वास ठेवणं अवघड झालंय.मनातलं बिनधास्त बोलावं अशा जागा आता नाहीत.खाजगी गोष्टी सांगितल्यावर त्याचा गैरफायदा तर घेतला जाणार नाही ना?या शंकेनं मनातलं बोललंच जात नाही.मनाची दारं फ्लॅटप्रमाणे बंद करून मग तकलादू आधार घेऊन जो तो आभासी जगासोबत एकट्यानं राहतोय.खूप काही बोलायचंय पण विश्वासाचा कान मिळत नाही.
—
रोजचा दिवस हा नवीन,ताजा असतो.आपण मात्र जुनी भांडणं,टेन्शन्स,चिंता,मतभेद यांना सोबत घेऊन दिवसाला सामोरे जातो.शिळं,फ्रीजमधलं दोन-तीन दिवस ठेवलेलं अन्न खात नाही परंतु वर्षानुवर्षे मनात अपमान,राग,वाद जपून ठेवतो.संबधित व्यक्ती अनेक वर्षानंतर जरी भेटली तरी साऱ्या कटू आठवणी लख्खपणे डोळ्यासमोर येतात.भावना तीव्र होतात.राग उफाळून येतो आणि स्वतःलाच त्रास होतो.विचारात लवचिकता आणली तर कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता येतं.
इतरांच्या वागण्याचा स्वतःला त्रास करून घेणं…. सोडून द्या
क्षुल्लक गोष्टींचे ताण घेणं…. सोडून द्या
ऑफिसचं टेंशन घरच्यांवर काढणं…. सोडून द्या
विनाकारण राग,द्वेष करणं …. सोडून द्या
इतरांचं वागणं नियंत्रित करू शकत नाही.तेव्हा…. सोडून द्या
सगळंच नेहमी मनासारखं होणार नाही तेव्हा…. सोडून द्या.
सर्वात महत्वाचे,
आजचं जग फार प्रॅक्टिकल आहे.वारंवार इमोशनल होणं… सोडून द्या
आयुष्यात असं कोणीतरी असलं पाहिजे,ज्याच्याशी मनातलं सगळं बिनधास्त बोलता येतं
हे वाचताना ज्याची आठवण झाली तोच तुमचा जिवलग.हे नक्की… त्याच्याशी बोला.वेळच्या वेळी भावनांना वाट करून द्या . .साठवण्यापेक्षा बोलून मोकळं व्हा.
पाणी आणि मनभावना वाहत्या असल्या तरच उपयोगी नाहीतर..
तसं पावसाशी फार जीवाभावाचं नातं नसलं तरी काही गोष्टींसाठी पाऊस हवासा वाटतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्यात होड्या सोडणे. लहानपणी पावसाळ्यातल्या सुरुवातीच्या दिवसांची आतुरतेने वाट पाहायचे ते यासाठीच.
आम्ही चाळीत राहत होतो तेव्हा पहिल्या काही दिवसांत इतकं पाणी साचायचं की घराच्या मागे आणि पुढे अक्षरशः दुथडी भरून व्हायचं. आमचं घर मध्यावर होतं चढणीवरून पाणी हळूहळू उताराकडे वहायचं. तेव्हा त्या पाण्याला खूप जोर असायचा. मग घरात पावसामुळे अडकलेली आम्ही मुलं, कागदाच्या होड्या करून सोडण्यात दंग राहायचो.
राजा राणीची होडी, शिडाची होडी असे होडीचे वेगवेगळे प्रकार असायचे. एकमेकांशी स्पर्धा असायची. कोणाची होडी जास्त लांबपर्यंत जाते हा एक चर्चेचा विषय असायचा.
काही मुलं तर उत्साहाने छत्री घेऊन पळत पळत होडी कुठपर्यंत जाते ते बघायला जायची.
रस्त्यावर खड्डे असल्याने कुठे गोल खळगा तयार व्हायचा आणि त्यातलं पाणी असं गोल गोल फिरत राहायचं ते बघायला मजा यायची. पण एखादी होडी चुकून त्या खळग्यात अडकली किती तिथल्या तिथे गोल गोल फिरत राहायची. ज्याची तशी होडी अडकेल त्याला फार वाईट वाटायचं.
याशिवाय गंमत वाटायची ती कॉलनीमधल्या रस्त्यावरच्या दिव्याची. उंच उंच केशरपिवळ्या रंगाचा झोत टाकणारे ते दिवे… पावसाच्या पाण्यात थरथरतायत आहेत असा भास व्हायचा. त्यांच्या प्रकाशात खाली पडणार पाणी त्या रंगाचं वाटायचं. तेव्हा शॉवर हा प्रकार आम्हा मुलांना नुकताच माहीत झाला होता. अशा दिव्याखालून पडणाऱ्या पाण्यात रंगीत शॉवर खाली भिजण्यात मुलांना वेगळीच मौज वाटायची. मला खरंतर पावसात भिजणं हा प्रकार कधीच आवडला नाही. पण पाण्यामध्ये पडणारी लाईटची प्रतिबिंब किती वेगवेगळी दिसतात. ते बघण्यात मला कुतूहल वाटायचं. क्वचित कुणाची तरी दुचाकी असायची पण त्यातलं पेट्रोल पाण्यात पडलं की जे वेगवेगळे रंग उमटायचे ते बघण्यासाठी आमची गर्दी व्हायची.
पाण्यामध्ये उठणारे तरंग, त्यात कोणी खडा टाकेल… कोणी पाय आपटेल… त्यानंतर होणारे वेगवेगळे आकार… आपापलं प्रतिबिंब पाण्यात बघण्याची हौस… वेडे वाकडे चेहरे करून पाण्यात बघणं. एकमेकांना दाखवणं. एक फार वेगळी मौज असायची. या सगळ्यांमध्ये नेहमीचे मैदानी खेळ खेळता येत नाही याचं शल्य नसायचं.
चाळ असल्यामुळे आजूबाजूला झाडं नव्हती. पण घरांची, कौलांची प्रतिबिंब पाण्यात दिसायची. कौलातून निथळणारं पाणी झेलायला देखील मजा यायची. अगदी साधी राहणी आणि साध्या सुद्धा गोष्टी आणि त्यातून आनंद शोधणं असा साधाकाळ होता.
अलीकडे पाऊस पडल्यावर काय करायचं हा प्रश्न मुलांना पडतच नसेल कारण त्यांच्याकडे मोबाईल, टीव्ही असे भरपूर ऑप्शन्स आहेत. पण आमच्या वेळी हे काहीही नव्हतं आणि तेच बरं होतं असं आम्हाला वाटतं.
तर दोन दिवसांपासून पडणारा पाऊस बघून बालपणीच्या या अशा होडीच्या आठवणीं ओल्या झाल्या. मला एक छोटीशी साधीसुधी बालकविता सुचली...
☆ “समुपदेशन…कुणाचे ?” – लेखक : श्री अभय देवरे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
मागच्याच महिन्यात माझे एक टेम्पोचालक परिचित त्यांच्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाला घेऊन आले आणि मला म्हणाले, “या आमच्या मुलाला दुकानात ठेवून घ्या.”
पण मी त्यांना म्हटलं की, “असं कसं घेणार ? त्याचे वय अठरा नाही. त्यामुळे मी त्याला नोकरी देऊ शकत नाही.” त्यावर ते म्हणाले, “नोकरीला म्हणून ठेवून घेऊ नका. त्याला पैसे दिले नाहीत तरी हरकत नाही. दहावीची परीक्षा झाली आहे. तो मोकळाच आहे. शिक्षणातही त्याला फारशी गती नाही. जर तुमच्याकडे काम केले, तर त्याला अनुभव येईल आणि तुमच्याकडे चांगले संस्कार घडतील.”
शिक्षणासाठी त्या मुलाला ठेवायचे म्हटल्यानंतर मी तयार झालो. तो मुलगा दुसऱ्या दिवशीपासून यायला लागला. त्याच्या प्रकृतीला, उंचीला झेपेल इतकेच काम त्याला द्यायला सुरुवात केली. तोही तसा बर्यापैकी प्रामाणिकपणे काम करत राहिला. त्याचे मित्रही अधूनमधून यायचे आणि त्याच्याशी काहीतरी बाहेर जाऊन बोलायचे. पण मी फारसे लक्ष दिले नाही. एक महिन्यांमध्ये त्याने सहा दांड्या सुद्धा मारल्या, पण तेसुद्धा स्वीकारले. कारण तो शिकायला आलेला होता. जरी त्याचे वडील म्हणाले होते की, मुलाला तुम्ही काहीही देऊ नका… तरी त्याच्याकडून फुकट काम करून घेणे मला प्रशस्त वाटले नसते. महिना झाल्यानंतर मी त्याला अडीच हजार रुपये पगार घ्यायचा ठरवला. आणि सांगितलं की, आज पहिल्या महिन्यात मी तुला अडीच हजार रुपये पगार देतो. तीन महिन्यांमध्ये तुझे काम बघून वाढवतो. सहा दिवसाच्या सुट्या वजावट करून उर्वरित पगार त्याच्या हातावर ठेवला, तेंव्हा तो नाराज झालेला दिसला; पण माझ्या व्यवसायातली काहीही माहिती नसलेल्या आणि केवळ शिक्षणासाठी म्हणून दुकानात आलेल्या मुलाला अडीच हजार रुपये हे विद्यावेतन म्हणून योग्य आहे असे मला वाटले.
शिवाय उद्या त्याचे कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेजची वेळ सांभाळून इथे काम करण्याची सवलतही त्याला दिली होती. आणि त्याच्या वडिलांनी माझ्यावर संस्कार करण्याचीही जबाबदारी टाकली होती त्यामुळे सध्या प्रत्येक क्षेत्रात असणारी स्पर्धा, त्याला तोंड देण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी हळूहळू समजावून सांगत होतो. शिवाय व्यवसाय चालवायचे मला जेवढे ज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न करत होतो, तेसुद्धा त्याला विद्यावेतन देऊन ! त्याने काहीतरी चांगले वाचावे म्हणून मी त्याला भारताचे राजदूत श्री ज्ञानेश्वर मुळे यांचे ‘ माती, पंख आणि आकाश ‘ हे आत्मचरित्र वाचायला दिले. मराठी माध्यमात शिकलेला एक मुलगा स्वकर्तृत्वावर किती मोठा होऊ शकतो हे त्याला कळावे व त्याच्या मनात कष्टाचे स्फुल्लिंग जागृत व्हावे हा माझा उद्देश !
पण पठयाने त्यातील एकही ओळ वाचली नाही आणि पुस्तक परतही केले नाही. शेवटी मीच आठवण करून दिल्यावर वडिलांनी आणून दिले. नाराजीने त्याने पगार घेतला, आणि त्यादिवशी दुकान संपल्यावर जो गेला तो आज पर्यंत परत आला नाही. त्याला पहिल्या पगारातच स्मार्टफोन घ्यायचा होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. दहावीसुद्धा न झालेल्या मुलाला महिना दहा हजार रुपये पगार मीतरी देऊ शकत नव्हतो.
हीच गोष्ट माझ्या एका प्लम्बिंग कॉन्ट्रॅक्टर मित्राला सांगितली, कारण मुलाचे वडील आम्हा दोघांचेही कॉमन मित्र ! मित्र म्हणाला, आपल्या मराठी मुलांना अनुभव न घेताच पगार हवा असतो. त्यामुळे बाहेरची मुले येऊन नोक-या घेऊन जातात. त्याने एक उदाहरणही दिले.
सातारच्या हायवे जवळ एक नवीन चारमजली कपड्यांचा मोठ्ठा मॉल झाला आहे. तिथे त्याचे प्लम्बिंगचे काम चालू आहे. मालक सिंधी आहे. मॉलमध्ये दीडशे मुले काम करतात. सगळी मुले बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथील आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास ड्युटी असते. सर्व मुलांची राहण्याची, जेवणाची सर्व सोय मालकाने केली आहे. सगळी मुलं इतक्या तन्मयतेने काम करतात की, आलेला ग्राहक खरेदी न करता परत जातच नाही. आता हीच मुले सर्व शिकून घेतील आणि भविष्यात आपल्या महाराष्ट्रात स्वतःची दुकाने उघडतील. आपल्या नाकर्तेपणामुळे एकाच ठिकाणच्या दीडशे नोक-या आणि संधी गेल्या की हो ! याचा खेद, खंत आहे कोणाला ? आणि आमची मराठी मुले शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवून, चंद्रकोरीचे गंध लावून, वडिलांनी घेतलेल्या बुलेटला भगवा झेंडा लावून फिरतात ! शिवाय तथाकथित मराठीप्रेमी नेते या मुलांना तोडफोड करायला लावून त्यांचे आयुष्य बरबाद करतात……
अरे, या अमराठी लोकांना हाकलून दिले, तर त्यांचे काम किती मराठी तरुणांना येते ? सुतारकाम, गवंडीकाम, टाईलफिटर असे कितीतरी व्यवसाय मराठी व्यावसायिकांच्या हातातून निघून गेलेत. मी माझ्या दुकानासाठी कामगार पाहिजे अशी जाहिरात देतो, तेंव्हा आलेल्या उमेदवारांची मी मुलाखत घेण्यापूर्वी ती मुले माझीच मुलाखत घेतात. त्यांचे तीन प्रश्न ठरलेले असतात, पगार किती देणार ? सुट्टी केंव्हा असते ? आणि कामाचे तास किती ? पण कोणीही विचारात नाही की काम काय आहे ? त्यामुळे आता या मराठी मुलांचा भविष्यकाळ काय असेल या विचाराने माझा थरकाप होतो.
या सर्वाला आपण पालक जबाबदार आहोत असे वाटते. आपण आपल्या मुलांच्याभोवती अती सुरक्षिततेचे कवच निर्माण केले आहे. त्यांना जगाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर फेकून द्यायला हवे. एकापत्य संस्कृतीत नको तेवढे मुलांना जपत आहोत आपण. मागितले की सारे क्षणार्धात त्यांच्यासमोर हजर करत आहोत आपण त्यामुळे कोणतीही गोष्ट कष्टाने मिळवावी लागते हेच मुलांना माहीत नाही.
दोष मुलांचा नाही, आपला आहे. आपण कष्टात दिवस काढले, मुलांना कशाला त्रास हा विचार त्यांची भवितव्य बिघडवतो आहे हे आपल्याला कधी कळणार ? आज जेंव्हा रोज पिझा, बर्गर खाऊन थूलथूलीत झालेली अन कानात बुचे घालून मोबाईलसमोर वाकलेली मुले पाहतो तेंव्हा त्यांच्या पालकांनाच समुपदेशनाची गरज आहे असे वाटते.
लेखक : श्री अभय शरद देवरे.
प्रस्तुती : मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मनुष्याच्या जन्मापासून तर म्रुत्युपर्यंत त्याच्यावर एकूण सोळा धार्मिक संस्कार केले जातात. त्यामधील पहिला संस्कार म्हणजे कान टोचणे. काही अपवाद वगळता अजूनही कान टोचण्यासाठी सोनाराचीच गरज पडते. आयुष्यात मी कितीतरी वेळा कान टोचले असतील. परंतु प्रत्येक वेळी कान टोचताना ते एक आव्हानच वाटते.
बाळ जन्मल्यानंतर बाराव्या दिवशी कान टोचावे असा प्रघात आहे. बहुतेक घरांमधून तो अजूनही पाळला जातो. काही अपवादात्मक परीस्थितीत बाराव्या दिवशी जर जमले नाही, तर मग साधारण पहिल्या सव्वा महिन्यात कान टोचले जातात. अगदी लहान असतानाच कान का टोचायचे?तर त्या वेळी कानाच्या पाळ्या ह्या खुपच पातळ असतात. म्हणजे बाळाला कान टोचताना त्रास होत नाही.. आणि सोनारालाहि त्रास होत नाही. अजूनही काही घरांमध्ये पंचांगात मुहूर्त पाहून कान टोचण्यासाठी बोलावले जाते.
सोन्याची अतिशय बारीक तार घेऊन त्याचे सुंकले बनवतात. मात्र काही ठिकाणी बाळ्या हा शब्द वापरतात. साधारण अर्धा ग्रामची जोडी असे याचे वजन असते. काही जण यातही शुद्ध सोने वापरतात.त्यापेक्षा २२कैरेट सोने वापरले तर ते अधिक उत्तम. कारण त्याला थोडा कडकपणा असतो. त्याने कान अधिक सुलभतेने टोचले जातात.
या कान टोचण्याच्या विधीमध्ये खोबर्याची वाटी खूप महत्वपूर्ण भुमिका बजावते. सुंकल्याला टोक व्यवस्थित झाले आहे, हे केव्हा कळते.. तर ते खोबर्याच्या वाटीला टोचल्यावर.खोबर्याच्या वाटीला सुंकले व्यवस्थित टोचले गेले.. याचा अर्थ त्याचे टोक एकदम बरोबर झाले आहे. कारण जर टोकच व्यवस्थित नसेल तर कान नीट टोचले जाणारच नाही. हे पहिले कारण.
दुसरे कारण म्हणजे..सुंकल्याला जे खोबर्याचे तेल लागते ते कान टोचताना ग्रिसिंगचे काम करते. कोणत्याही इतर तेलापेक्षा हे तेल अधिक शुद्ध असते.
डावी तर्जनी कानाच्या पाळीखाली हातात धरून एकाच दाबात कान टोचणे आणि कान टोचताना थेंबभरहि रक्त न येणे हे कौशल्याचे काम असते. क्षणभर बाळ रडते आणि मग शांत होते. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे त्या सुंकल्याची व्यवस्थित गाठ मारणे. ही गाठ मारताना बाळाने जर जास्त हालचाल केली तर तेथून थोडे रक्त येऊ शकते, पण हे क्वचितच.
कान टोचून झाल्यावर बाळाच्या आईने खोबरे आणि मीठ एकत्र चावून, बाळाच्या कानाच्या पाळीला लावायचे असते. याचे दोन उद्देश. एक म्हणजे खोबर्यामुळे कानाची पाळी जरा नरम रहाते, आणि मीठ हे जंतुनाशक असल्याने तेथे जंतुसंसर्ग होण्याची भीती नसते. काहीजण विचारणा करतात की, तेथे कुंकू लावु का? पुर्वी ही प्रथा असावी. हळदीपासुन बनवलेले कुंकू कदाचित चांगला परिणाम देऊन जात असेल.. पण अलीकडे बाजारात उपलब्ध असलेल्या कुंकवात काही भेसळ असण्याची शक्यता असते. परीणामी ते न लावलेले योग्य.
कान टोचण्यासाठी जेव्हा सोनाराला घरी बोलावले जाते,तेव्हा त्याला मोठी अपुर्व वागणूक मिळते.एकदा एका घरी मी कान टोचण्यासाठी गेलो होतो. घरात एखादे मोठे मंगल कार्य असल्यासारखी गर्दी. हॉलमध्ये मध्यभागी समोरासमोर पाट टाकले होते. एका पाटावर मी बसलो. समोरच्या पाटावर एक वयस्क स्त्री बाळाला घेऊन बसली. कान टोचताना बाळाची आई शक्यतो तेथे उपस्थित रहात नाही. कारण तिला बाळाचे रडणे बघवत नाही. त्यामुळे बाळाची आजी, किंवा आत्या बाळाला घेऊन बसते. तर येथे कान टोचण्यासाठी बसल्यावर आजुबाजुला खूप गर्दी. लहान मुलं कुतुहलाने गोळा झाली होती. बर्याच जणांनी हा सोहळा पाहिलेला नसतो. मग त्याचे खूप प्रश्न.
“अहो, खूप दुखेल का?”
“रक्त तर नाही ना येणार?”
“किती दिवसात बरे होईल?”
प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.मी इतका अनुभवी.. पण त्या परीस्थितीत मलाही घाम फुटला. आजुबाजुला हवा येण्यास जागा नाही. बाळाला त्रास होईल म्हणून पंखा बंद. शेवटी सर्वांना जरा बाजूला व्हायला सांगितले तेव्हा कुठे हायसे वाटले. आणि मग व्यवस्थित कान टोचले गेले.
कान टोचण्यासाठी ठराविक रकमेचा आग्रह मी कधीच धरीत नाही. एक सन्मान समजून ते काम करतो. मग कधी खुपच आदरातिथ्य झाले तर मोठी दक्षिणा मिळते.. तर अकरा रूपयांवरही संभावना होते. पण त्याबद्दल माझी कधीच तक्रार नसते.
कान टोचण्याबरोबर कधीतरी नाक टोचण्याचाही प्रसंग येतो. त्यावेळी मुलगी मोठी झालेली असते. अलीकडे बुगडी घालण्याची फैशनही परत मुळ धरु लागली आहे. कानाच्या वरच्या भागात टोचण्यासाठी महिला येतात.या भागात टोचण्यासाठी सुंकले जरा जाड करावे लागते. कारण कानाचा तेथील भाग खुपच निबर आणि जाड झालेला असतो.काही जणींना त्यामुळे खुपच वेदना होतात. काही काळ त्या सहन करायची तयारी असेल तर बुगडी घालण्यासाठी कान टोचावे.
अलीकडे बऱ्याच ऐतिहासिक सिरीयल टीव्हीवर चालू असतात. त्यामुळे बिगबाळी घालण्यासाठी कॉलेजची मुले तसेच पौरोहित्य करणारी मंडळी कान टोचण्यासाठी येतात.
अखेरीस काय तर.. कान टोचणे हा एक व्यवसाय म्हणून न बघता तो आपला सन्मान आहे असे मी समजतो.
जगदीश खेबुडकरांच्या या काव्यपंक्ती आठवल्या आणि मनात विविध विचार प्रवाह वाहू लागले. झेप घेणे, भरारी मारणे, “लाथ मारीन तिथे पाणी काढेन”, भयमुक्त, निर्भय, धडाडीचे आयुष्य जगणे, “हम भी कुछ कम नही” “मनात आलं तर खडकालाही पाझर फोडू” हे सारं नक्कीच सदगुणांच्या यादीतले गुणप्रकार आहेत यात शंकाच नाही. भित्रा माणूस काहीच करू शकत नाही. तो मागेच राहतो. कसंबसं जीवन जगतो, कधीही प्रकाशझोतात सकारात्मकपणे येतच नाही.
सकारात्मकपणे हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. धोका पत्करण्यामागे दोन बाबींचा अंतर्भाव खचितच आहे. यश आणि नुकसान या त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे धोका पत्करताना सावधानता, नियमांची चौकट, आत्मभान, स्वसामर्थ्याची ओळख आणि उडी मारण्यापूर्वी पाण्याच्या संभाव्य खोलीचा घेतलेला अंदाज म्हणजेच परिपक्व, समंजस धाडस नाहीतर फक्त बेधडकपणा, एक प्रकारचा माज, मिजास, गर्व आणि पर्यायाने प्रचंड हानी! वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक..
पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात कल्याणीनगर मध्ये घडलेली “पोरशे कार धडक घटना ही या प्रकारात बसते. या घटनेनिमित्त अनेक स्तरांवरच्या, अनेक बाबींविषयी अपरंपार घुसळण झाली— होत आहे. प्रामुख्याने बदलती जीवनपद्धती, यांत्रिकतेचा अतिरेक, हरवलेला कौटुंबिक संवाद, बेदरकारपणा, “ नियम आमच्यासाठी हवेत कशाला”, “हम करे सो कायदा” ही बेधुंदी,पैसा, सत्ता याचा गैरवापर, २४x७ बोकाळलेली माध्यमे आणि नको त्या वयात नको ते अनुभवण्यास उपलब्ध झालेले मैदानं, ना कोणाचे बंधन ना कोणाची भीती आणि या पार्श्वभूमीवर पौगंडावस्थेतलं, गोंधळलेलं, अमिबा सारखं ना आकार ना रूप असलेलं एक बेढब, भेसूर, अधांतरी लटकणारं मन, शरीरात रक्तप्रवाहात चाललेलं संप्रेरकांचं सुसाट वादळ आणि त्या वादळाला शांतवण्यासाठी अस्तित्वात नसलेली आधारभूत समंजस, परिपक्व यंत्रणा.
मी जेव्हा या सद्य घटनांच्या पार्श्वभूमीवर मागे वळून माझे आयुष्य साक्षी भावाने पहाते तेव्हा मला सहजच वाटते इतर भावंडांमध्ये मी अधिक धाडसी होते. मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावासा वाटायचा. नवनवीन गोष्टींबाबत प्रचंड औत्सुक्य असायचं.(ते आजही आहे) एकाच वेळी वडील सांगत,” पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही. त्याचवेळी इतर कौटुंबिक सदस्य मला “हे करू नकोस ते करू नकोस” असेही सांगायचे. मी काही “बडे बाप की बेटी”ही नव्हते. तशी मी बाळबोध घराण्यातच वाढले. ठरवून दिलेल्या सांस्कृतिक आणि आचारसंहितेच्या नियमबद्ध चौकटीतच वाढले. तरीही माझं एक पाऊल प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी उत्सुक असायचं. कधी परवानगीने तर कधी छुपी-छुपे मी ते उचललंही. एक धडकपणा माझ्यात होता म्हणून अगदी काही वर्षांपूर्वी मी रिप लायनिंग केलं, पॅरासेलिंग केलं, थायलंडला अंडर सी वॉक” केला. मनावर प्रचंड भय असतानाही भयावर मात करत अशी मी अनेक साहसकृत्ये नक्कीच केली. जेव्हा ड्रायव्हिंग शिकले तेव्हा दुतर्फा झाडी असलेल्या मोकळ्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवाविशी वाटली पण आता असं वाटतं की अनेक भीत्यांच्या वर एक भीती सतत होती आणि तिचं वर्चस्व नाकारता आलं नाही ती म्हणजे सद्बुद्धीची. मन आणि बुद्धीतला वाद नेहमीच विवेक बुद्धीने जिंकला म्हणून माझ्या कुठल्याही धाडसात धडक असली तरी बेधडकपणा नव्हता. सावधानता होती हे नक्कीच. एक वय असतं धोक्याचं, प्रचंड ऊर्जेचं, सळसळणाऱ्या प्रवाहाचं. नदीचं पात्र सुंदर दिसतं पण जेव्हा तीच नदी किनारे सोडून धो धो पिसाट व्हायला लागते तेव्हा ती सारं जीवन उध्वस्त करते म्हणून फक्त एकच…
थोडं थांबा, विचार करा, योग्यायोग्यतेचा मेळ घाला. नंतर दोषारोप करण्यापेक्षा वेळीच यंत्रणांना चौकटीत रोखा, बाकी कुठल्याही कायद्यापेक्षाही मनाचे कायदे अधिक संतुलित हवे आणि तसेच शिक्षण सुरुवातीपासून अगदी जन्मापासून देणारी भक्कम मानवीय संस्था हवी.