मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मला भावलेला गणेश ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ मला भावलेला गणेश ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

परवाच संकष्टी झाली. गणपतीची आरती, मंत्रपुष्पांजली आणि नंतर अथर्वशीर्ष म्हणू लागले ” ओम् नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।  त्वमेव सर्वं खल्विदं  ब्रह्मासि—–” असं म्हणून झालं .आणि माझ्या मनात गणेश तत्वाबद्दल विचार सुरू झाले .गणपती, गणेश ,गजानन, विनायक ,गजमुख अशी गणेशाची कितीतरी नावं आहेत. हत्तीचे मुख असलेली ,रत्नजडित किरीट घातलेली, तुंदिलतनू असलेली, उंदीर पायाखाली घेतलेली, अशी सुंदर पार्थिव मूर्ती हीच गणेश का? मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी कितीतरी वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला दोन रुपे असतात .एक डोळ्याला दिसणारं स्थूल रूप किंवा व्यक्तरूप .आणि दुसरं शक्तिमान असलं तरी, डोळ्याला न दिसणारं ते सूक्ष्म किंवा अव्यक्त रूप. भाव हा सूक्ष्म असतो. त्यामुळे मला भावलेल्या गणेशाचे रूप हे सूक्ष्म स्वरूपाचं आहे.

“गण” याचा अर्थ संख्या किंवा मोजणे, मोजमाप करणे वगैरे वगैरे–‘ब्रह्म’ हे अनंत अपरिमित आहे . या ब्रम्हांडातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला. त्यातलंच एक अगदी छोटं आपलं जग . जग हे अंतापासून सांतापर्यंत व अपरिमितापासून परिमितापर्यंत येतं, तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होतं. मोजमाप करणारी शक्ती, गणितज्ञांचा गणितज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते. जसं की, चिकू , आंबा, फणस, यातील प्रत्येकाचं पान, फूल, फळ, निरनिराळ असतं. आंब्याच्या झाडाला चिक्कू किंवा लिंबू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई जुई लागत नाही. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे. ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप, ज्वालामुखी, पूर, आवर्षण अशा गोष्टी घडायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता टिकविणारा नियंत्रक तोच गणेश.

आपले जग हे पृथ्वी, आप ,तेज, वायू ,आकाश अशा पंचमहातत्वांनी बनलेले आहे .ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून त्याचे पंचीकरण झाले. उदाहरणार्थ अर्ध्या आकाश तत्वात उरलेली चारही तत्वे, प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली. या गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्रि देवता ( त्वं मूलाधार  स्थितोसि   नित्यम् ) ती शक्ती म्हणजेच गणेश.

ही सृष्टी ओंकारातून जन्माला आली. ओंकार हा नाद स्वरूप आहे. गणेशाचे रूपसुद्धा ओंकार प्रधान असल्याचे म्हटले आहे. आणि गणेश हा गणनाकार नाद आहे. म्हणजे या सृष्टीच्या मुळाशी जी सृजन शक्ती आहे ती म्हणजे गौरी नंदन गणेश. प्रत्येक गोष्ट ओमच आहे असे मांडुक्क्य उपनिषदामध्ये सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस हे जलतत्त्व, आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाला किंवा उष्णता हे अग्नी तत्व, या दोन्हींमधील गाठ, हे पृथ्वीतत्व, तेथून निघणारी रेषा हे वायूतत्व, वरील चंद्रकोरीची दोन्ही टोके मन आणि बुद्धी, आणि त्यावरील टिंब हे चैतन्य. आणि हे सगळं ज्याच्यामध्ये सामावलं आहे हे आकाशतत्व. अशी ही अष्टधा प्रकृती तोच गणेश.

गणेशाचा एक वैज्ञानिक अर्थही मला भावला आहे. पदार्थाचा, वस्तूचा सगळ्यात लहानात लहान घटक म्हणजे अणू. अणूच्या केंद्रकात, प्रोटॉन व  न्यूट्रॉन असतो. व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून त्याला स्थिर होण्यासाठी धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी पूरक बनून त्याची आठ आकड्यांपर्यंत गणना करून देतो, ती शक्ती म्हणजेच गणेश. कदाचित अष्टविनायकाची संकल्पना यावरूनही पुढे आलेली असावी.

निर्मिती करणारा ब्रह्मा, सातत्य राखणारा विष्णू ,आणि विलयाला नेणारा तो महेश. या सर्व शक्ती म्हणजेच गणेश.  आपण तरी काय करतो !– पार्थिव गणपती घरी आणतो. आनंदाने, अपूर्वाईने, त्याची पूजा करतो. उत्सव करतो. आणि विसर्जन म्हणजे  जल तत्वात विलय करतो. हेच चक्र निसर्गात चालू आहे. झाडे, पर्वत, समुद्रातील बेटे यांची उत्पत्ती होते, स्थैर्य येते, आणि विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म ! आणि या सगळ्यासाठी लागणारी शक्ती तोच गणेश.

‘गुर‘ हा धातू  प्रयत्न करणे, उद्योग करणे हा अर्थ दर्शवितो .गुरंपासून गौरी शब्द बनतो .गौरी म्हणजे सतत उद्यमशील अशी शक्ती. ऊर्जेचे दुसरे नावच गौरी. या ऊर्जेचा उत्सर्ग, अर्थात तिचा मळ म्हणजे गणेश. संस्कृतमध्ये 

‘मळ‘ धातू  हा ‘धारणे‘ या अर्थी वापरतात. ऊर्जेने धारण केलेली, सृष्टी निर्माण करणारी ,गणनाकार, नादमय, ईश्वरी शक्ती म्हणजे गौरी नंदन गणेश.

या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती म्हणजे, एक फार मोठे रहस्य आहे. गूढ आहे .ते उलगडणेही तितकेच अवघड व कठीण काम आहे. आणि ते काम करणारा ज्ञानमय, विज्ञानमय असा गणेश असतो.

गणेश उत्सव चालू आहे .सर्व शक्तीच्या प्रतीकाची, पार्थिव गणेशाची पूजा करत असताना, निसर्गाचा ऱ्हास न करता ,त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा, खऱ्या अर्थाने पूजा होईल. आणि प्रत्येकाला गणेश प्रसन्न होईल.  गणपतीबाप्पा मोरया.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवस सुगीचे… भाग 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.) इथून पुढे —

दिवाळी झाली की बैलांना जरा विश्रांती मिळायची. रब्बीसाठी शेत गहू, शाळू, हरभरा, करडा, जवस आदींची जुळवाजुळव व्हायची. बी राखेतच असायचे, कोण उधार उसणवार आणायचे. रब्बीसाठी कुणी कुणी बेवड राखायचे. बेवड म्हणजे शेतीत कोणतेच पीक सहा महिने घ्यायचे नाही. सारखी पिके घेतल्याने जमीन थकते, निकस होते, मरगळते म्हणून तिला विश्रांती द्यायची म्हणजे पुढचे पीक जोमात येते.

दिवाळी झाली की रब्बीच्या पेरणीला सुरुवात व्हायची. संक्रातीला गव्हाच्या ओंब्या टचटच भरायच्या. हरभऱ्याचर घाटे भरायचे. करड्याच्या लालसर पिवळ्या छटेच्या फुलांनी शेते नटत. त्यांचा दरवळ शेतातून घमघमत असे. पावट्याच्या, घेवड्याच्या पाट्यांवर पांढऱ्या फुलांच्या घोसांच्या जागी शेंगांचे भरगच्च तुरे डोलू लागत. शेंगांचा गर्द घनदाट वास शेतातून दरवळत राही. नुसत्या चटणी मिठाच्या देशी चुनुल्या पावट्याच्या कालवणाची चव जिभेवर दिवसभर रेंगाळत राही. घरोघरी पावट्याच्या शेंगा, ओल्या हरभऱ्याचे कालवण असायचे. पोरंठोरं ओल्या हरभऱ्याच्या डहाळ्यांवर तुटून पडत. शेकोटीत हावळा भाजला जाई.

बघता बघता होळी येई आणि पिके पिवळी पडत. गहू हरभरा कापणीला येई. कुणी चांदण्याने, कुणी पहाटे लवकर गहू काढायला जाई. (उन्हाच्या रटात ओंब्याची टोके हातात जोरात घुसतात म्हणून उन्हाच्या आधीच गव्हाचे काड कापले जातात. ) हरभरा उपटून जागोजागी कडवं रचली जात. गव्हाचे काड कापून पेंढ्या बांधल्या जात. शाळूच्या कडप्या ऊन खात पडत.

फाल्गुनाच्या मध्यावर किंवा शेवटी रब्बीचे धान्य घरात येऊन पडे आणि शेतकरी सुस्कारा टाकत, जरा निवांतपणा येई. शेते ओस पडत जत्रा, यात्रा, उरूस यामध्ये शेतकरी हरवून जाई.

सन ९०-९५पर्यंत तर सुगीचे दिवस, शेतातील ती लगबग, पारंपरिक शेती चालू होती. त्यापूर्वी ७२-७३मोठा दुष्काळ पडला होता. तरीही माणुसकीचे मळे मात्र हिरवेगार होते. शेतीला प्रतिष्ठा होती त्यामुळं शेतीवर प्रेम तर होतेच पण निष्ठाही होती. यामुळं लोक शेतीत कसून कष्ट करायचे. पीक कमी जास्त झाले तरी गुरांच्या वैरणीचा तर प्रश्न  मिटत होता. निसर्गाचे चक्र कधी सरळ फिरते, कधी उलटे. निसर्ग कधी कृपा करतो, कधी अवकृपा. प्रचंड प्रमाणातील वृक्षतोडीने हळू हळू पाऊस ओढ देऊ लागला. शेतीची प्रतिष्ठा, निष्ठा कमी झाली. निसर्गातील बारकावे, निरीक्षण, अनुभव सगळं मागं पडलं. शिकलेल्या मुला-मुलींना स्वतःच्या शेतात काम करायला लाज वाटू लागली. जनावरांना चारा पाणी करण्याची लाज वाटू लागली. लोकांच्या गरजा वाढल्या, शेतीचे स्वरूप बदलले. नगदी पिके घेण्याकडे कल वाढला. कडधान्यावर कीड पडू लागली शेतकऱ्यांनी देशी वाण मोडले. बेभरवशाची शेती झाली. न परवडणारी मजुरी आणि मजुरांची कमतरता यामुळं शेतीचे यांत्रिकीकरण झाले. गुरे कमी झाली. नांगर गेले, बैलगाड्या मोडल्या. ट्रॅक्टर आले, गावाशेजारील जमिनी भरारा प्लॉट पाडून विकल्या गेल्या. कीटकनाशकांचा वापर वाढला. त्यामुळं जैवसाखळीतील विशिष्ट प्रकारची झुडपे, गवत, भाज्या लुप्त झाल्या पर्यायाने त्या त्या झाडाझुडपावरील, गवतावर पोसणारी, अंडी घालणारी शेतीसाठी उपयुक्त कीटकांची, फुलपाखरांची मांदियाळी नामशेष झाली.

निसर्ग बिघडायला दुसरं तिसरं कोणी कारणीभूत नसून आपणच आहोत. निसर्गाच्या विरुद्ध आपण वागू लागलो, प्लास्टिकचा अति वापर, बेसुमार लोकसंख्या, बदलती भोग विलासी चैनवृत्ती निसर्गाचा ऱ्हास करत आहे इतका की त्याचे अस्तित्वच धोक्यात आलेय. जास्त उत्पन्न देणारे हायब्रीड आले आणि गुरांना आवडणारा आणि सकस असणारा देशी जोंधळ्याचा वाण संपुष्टात आला. क्वचित क्वचित भागातच आता मोत्यासारखा देशी जोंधळा पिकतो अन्यथा हायब्रीड आणि शाळूच पिकवण्याकडे त्या त्या भागातील लोकांचा कल वाढला. पारंपरिक शेती संपल्याने विकतची वैरण आणून जनावरे पाळणे परवडेना. त्यामुळं धष्ट- पुष्ट जनावरांचे गोठे मोडले. घरातले दूध-दुभते, दही, ताक, लोणी, चीक असलं अस्सल नैसर्गिक सकस पदार्थ शेतकऱ्याच्या ताटातून  हद्दपार झाले आणि खाऊन पिऊन समृद्ध असणारी पिढी सम्पली. याचबरोबर शेजारधर्म, आपुलकी परोपकार, एकमेकांच्या शेतात हुरडा खायला जाणे, एकमेकांच्या शेतातले पसामूठ आपापसांत घेणे देणे बंद झाले. मिळून मिसळून कामे करणे, मिळून मिसळून रानात नेलेल्या फडक्यावरील भाजीभाकरी एकत्र खाणे शेतीचे अनुभव, ज्ञान परस्परात वाटणे, ऐकणे, अनुकरण करणे संपले.

शेतातल्या सुगीबरोबरच मानवतेच्या सुगीचाही आताशा दुष्काळ पडू लागला आहे, कदाचित पृथ्वीवरील माणसाचे पिकच कधीतरी नष्ट होईल आणि निसर्गाचे चक्र मात्र पुन्हा नव्याने जन्म घेईल. . . . .

— समाप्त — 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवस सुगीचे… भाग 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(अकितीला अंगणात लावलेल्या पडवळ, दोडका, भोपळा, काटे वाळकं वेलीवर लोम्बकळत, बांधावरच्या गोल भोपळ्याच्या वेलीवर पिवळसर केशरी फुलांचा बहर यायचा.) इथून पुढे —-

आषाढाच्या भुरभुरीने पिकं गुढघ्याइतकी झालेली असत. श्रावणातील ऊन पावसाच्या खेळात पिकांना चांगलाच बहर यायचा. कुणाची कडधान्य फुलकळीला यायची तर काही कडधान्यांच्या फुलातून मूग, चवळी, श्रावण घेवडा, उडदाच्या कोवळ्या कोवळ्या शेंगांचे घोस लटकत. वेगवेगळ्या रंगांचे कीटक, भुंगे गुंजारव करत पिकांवर बसायची. रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे भिरभिरायची. काळ्या, शंखाच्या गोगलगायी चमचमीत वाटा सोडत इकडून तिकडे फिरत. पक्ष्यांचे आनंदी किलबिलाट रानोमाळ घुमत असत.

शेतातून आलेल्या बायका रात्री फेर धरून पंचमीची गाणी गात-

सासुरवासाच्या कथा सांगणारी आणि माहेरच्या आठवणी जागवणारी. ठिकठिकाणी झाडाला झोपाळे झुलायचे. शेताच्या कामातून थोडी सवड मिळालेली असायची. हिरव्याकंच कचगड्याच्या काकणाचे हातभर चुडे लेऊन बायका झोपाळ्यावर हिंदोळत रहायच्या. पंचमीची गाणी शिवारभर पिकांवर लहरत रहायची…

भादव्याला पावसाची उघडीप मिळाली असली तरी ढगांचे पुंजके आकाशातून वस्ती करायचेच. अंगणात गौरीच्या रोपांना लाल, पांढरी, गुलाबी फुले यायची. त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरांच्या झुंडीच्या झुंडी भिरभिरत रहायच्या.

ऊन चांगलंच भाजून काढायचं. पिकात शिरलं की गदमदुन जायचं. मूग, उडीद, अळसुंद(चवळीसारखेच पण तोंड काळे असते. देशी चवळी पूर्ण लाल असते किंवा पूर्ण पांढरी तोंड लाल)काळे श्रावण, कुशीचे हुलग्याच्या शेंगा वेलीवर तटतटू लागायच्या. बायका कम्बरेला वट्या बांधून वाळल्या शेंगा तोडू लागायच्या. जोंधळा कम्बरेला लागायचा. घरोघरी ओल्या मूग, अळसुंद, काळ्या श्रावणाची आमटी उसळ असायची. तोडून आणलेल्या शेंगा उन्हात वाळत पडायच्या, त्यांचा तटतट आवाज होऊन बी खाली पडायचे, टरफल मुरगळुन बाजूला व्हायची. उन्हाच्या रटाने लाल, पांढऱ्या अळ्या बाहेर पडू लागायच्या, चिमण्या त्यावर टपलेल्या असायच्या. जवळच्या बांबूच्या आड्यातल्या, कौलारू घराच्या वळचणीतून भुरदिशी चिमण्या यायच्या आणि बाहेर पडलेल्या अळ्या गट्टम करायच्या.

शेंगा चांगल्या वाळल्या की बडवून वाऱ्याला लावून स्वच्छ झाडून पाखडून किडके, मरके कडधान्य काढून स्वच्छ कडधान्ये पुन्हा कडकडीत ऊन खाऊन गरजेपुरती डब्यात बसायची, पुढील वर्ष्याच्या बियासाठी गाडग्या मडक्यातल्या, कणगीतल्या राखेत विसवायची आणि गरजेपेक्षा जास्त असतील तर बाजारात चार पैसे मिळवून द्यायची, तेलामीठाला हातभार.

कडधान्ये विसाव्याला ठेवेपर्यंत अश्विन येऊन टपकायचा. अंगणातल्या उंच उंच झेंडूच्या शेंड्याला फांदीच्या टोकातून इवल्या इवल्या कळ्या डोकवायच्या.

तुरीला फुलं-कळ्या यायला सुरुवात व्हायची. माळाच्या मटकीला कुठं फुलं कुठं शेंगा लागायच्या. जोंधळा पोटरीला आलेला असायचा, कधी निसवत असायचा. निसवलेल्या कणसावर इवली इवली फुले दिसायची. असंख्य मधमाशा कीटक इकडून तिकडे कणसावर भिरभिरत रहायचे. खाली पडलेल्या फुलांवर मुंग्या तुटून पडायच्या. भुईमूगाला पिवळी पिवळी फुले लागत. बहराला आलेली पिके वाऱ्यावर डोलायची. पिकातल्या वाऱ्याचा एक अनामिक नाद सगळ्या शिवारभर घुमत रहायचा. वाऱ्याच्या साथीने डुलणारे शेत पाहून शेतकरी मनही आनंदाने फुलून यायचे.

ढगांच्या प्रचंड गडगडाटात  हत्तीचा पाऊस हजेरी लावून गेलेला असे. निवळसंख ओढे, ओघळी खळखळ वाहत असत. शेते जीव्हळून पांदीतून पाणी वहात असे. शेतातली कारळाची पिवळीधम्मक फुले वाऱ्यावर डुलत असत. सूर्यफूले एकेका पाकळीने उमलू लागत. उमललेली पिवळीजर्द फुले शेताला शोभा आणत. भुंगे, मधमाश्या फुलांना मिठी मारून बसत. जुंधळा हुरड्याला येई. ठिकठिकाणी शेकोटी पेटवून हुरडा भाजला जाई. टपोरी कणसे खुडून आगीवर खरपूस भाजून सुपात चोळून पाखडून त्यावर चटणी मीठ टाकून चविष्ट हुरडा शेतकऱ्याच्या घरात हमखास असे. मक्याची कणसात दूध भरलेलेअसे. उकडून, भाजून, सोलून, गरम फुपुट्यात खरपूस वाफवलेली कणसे पोटभर खायला मिळत. भूमीपूजनाला धपाटी, कढी, वडी, कडाकणी, बाजरीचं उंड, भेंडी, दही भाताचा नैवेद्य शेताला दाखवला जाई आणि काढणीला आलेली पिकं काढायची धांदल सुरू होई.

सरत्या अश्विनात आणि निघत्या कार्तिकात डासं वारं भिरभिरत असे. आकाश निरभ्र झालेले असे. डास्या वाऱ्याने त्वचा तटतटू लागायची. थंडीची चाहूल लागायची. भुईमुगाची पाने काळपट तपकिरी रंगावर यायची. उंच उंच जोंधळ्याच्या डोलत्या पिकांवर पाखरांचे थवे भिरभिरायचे. मचाणी बांधल्या जायच्या, गोफणी तयार व्हायच्या. म्हातारे कोतारे, तरणे शेतावर वस्ती करत, कुणी पहाटेच उठून पाखरं राखायला जायचे. शेताशिवारातून हाकाट्यांचे आवाज, रिकाम्या डबड्यांचे आवाज घुमू लागत.

पावसाने उकणून गेलेल्या खळ्यांची डागडुजी होई.

कार्तिकच्या मध्यावर किंवा शेवटी गाव ओस पडत. खुडणी कापणीला जोर येई. कणसं खुडायची, जोंधळा पाडायची एकच धांदल उडायची. धारदार विळे बोट कापत तर कधी पायात सड घुसत. आसपासच्या औषधी पाल्याला चुरून रस काढून जखमेवर लावून चिंधकाची दशी काढून पट्टी बांधली जाई. शेंगा काढणीला नांगराची तजवीज आणि तोडणीला बायका, पोरांना शेंगाच्या रोजावर बोलवायची धांदल उडे. शेंगांचा सॉड (उतार)बघून एकूण गोळ्यांची संख्या ठरे. जितका उतार जास्त तितकी गोळ्यांची संख्या जास्त. १४, १८, २० अश्या संख्येत गोळे ठरायचे. दिवसभर रोजगाऱ्याने तोडलेल्या शेंगांचे समसमान गोळे करून त्यातला १ गोळा म्हणजेच पाटी, अर्धी पाटी किंवा दीड पाटी शेंगा दिवसभर शेंगा तोडणाऱ्यास मिळत. दिवसभर नांगरलेल्या शेतातले वेल वेचणे, ढीग घालणे मग शेंगा तोडायच्या. माणसांच्या आवाजाने राने गजबजून जात.

मागतकरी झोळ्या घेऊन रानातून हिंडत. कुणाच्या शेतातून शेंगा, कुणाच्यातून कणसे मागत हिंडत. बऱ्याचदा कणसांची चोरी व्हायची, कधी तोडून ठेवलेल्या शेंगांचीही चोरी व्हायची.

पांढऱ्याखड शेंगा पोतीच्या पोती भरून गाडीतून घरला येत. खळ्यात मोत्यासारख्या धान्याची रास पडे. धान्याच्या पोत्यांच्या थप्पी जोत्यावर येऊन पडत. जेवढी थप्पी मोठी तितकी शेतकऱ्यांची छाती अभिमानाने फुलून येई. सहा-सात महिने रात्रंदिन गाळलेल्या घामाचे चीज होई आणि उरलेल्या कामाची लगबग होई.

जोंधळ्याच्या पेंड्यांची बुचाडे लागत, शेंगांचे भुस्काट निवाऱ्याला बसे. तुरीच्या शेंगा गडद तपकिरी होत. पाला पाचोळा वेचून जनावरांपुढे पडे.

तूर मटकी काढून झाली की खरिपाचा हंगाम संपे पण माणसांच्या आणि गुरांच्या वर्षभराच्या पोटा पाण्याची सोय होई. खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.

क्रमशः …

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ☆  श्री दिनेश डोंगरे ☆

??

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ☆  श्री दिनेश डोंगरे ☆

“स्वच्छता ज्याचे घरी, लक्ष्मी तेथे वास करी “ असे सार्थपणे म्हटले जाते. 

स्वच्छता – अस्वच्छता

भाव – अभाव

धर्म – अधर्म

उल्हास – आळस

उपद्रवी – अनुपद्रवी

सुसंवाद – वाद विवाद

प्रिय – अप्रिय

चांगले – वाईट

इष्ट – अनिष्ट

या सर्व परस्पर विरोधी बाजू किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.

तद्वतच “अलक्ष्मी – लक्ष्मी ” या सुद्धा परस्पर विरोधी.  परंतू  ज्येष्ठा – कनिष्ठा अशा बहिणी आहेत.

दोन्हीही बहिणींची समुद्रमंथनातून अवतीर्णता झालेली आहे.

लक्ष्मीस जो मान देवता म्हणून मिळाला, तो मान ज्येष्ठ असूनही आपणास नाही, अशी खंत अलक्ष्मीस होती व त्याचे निराकरण करण्याच्या हेतूने श्रीविष्णू यांनी वरदान देत, अलक्ष्मीचे पूजन लक्ष्मीबरोबर वर्षातून एकदा होईल, असे नियोजन करविले. त्यानुसार पार्थीव श्रीगणेश पूजन कार्यकाळात येणार्‍या अनुराधा नक्षत्रावर “अलक्ष्मी-लक्ष्मीचे” अवाहन करणेचे, तद्नंतर दुसरे दिवशी येणार्‍या जेष्ठा नक्षत्रावर “अलक्ष्मी व लक्ष्मीचे” पूजन, नैवेद्य अर्पण करणेचे व तिसर्‍या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करणेचे, असा अनुक्रम नियोजित केला गेला. त्याअन्वये “जेष्ठ” बहीण असलेल्या “अलक्ष्मी” व कनिष्ठ बहीण “लक्ष्मी” असे  दोघींचेच पूजन करताना ” जेष्ठाकनिष्ठागौरी ” असे नामकरण केले जाऊ लागले.

इथे ” गौरी ” या शब्दाचा अर्थ ‘ निष्पक्षतेच्या देवता ‘ असा घ्यावा.

“अलक्ष्मी-लक्ष्मी “ या दोन्ही बाजूंसोबतचे  पूजन म्हणजे ‘ निष्पक्षता ‘ जाणावी.

या अनुसार, चांगली व वाईट बाजूसह, अनिष्ट गोष्टींबद्दलसुध्दा मनात पूज्यभाव बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.

व्यावहारिक भाषेत ” अलक्ष्मी ” म्हणजे व्यय (खर्च), आणि “लक्ष्मी “ म्हणजे आय (आवक)ज्येष्ठा व मूळ नक्षत्र ही भयानक नक्षत्र आहेत, आणि यातूनच ” मुळावरच आला ” असे उच्चारण वापरले जाऊ लागले.

अलक्ष्मीचे पूजन होणे, हे  तिच्यासाठी सुखावह असते, व वर्षभरासाठी विमा काढल्यासारखे पूजन करणार्‍याच्या (व्यय ) खर्चावर नियंत्रण मिळवले जाते. त्यात आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्याचे संकेत मिळतात, हे जाणावे.

त्यासाठी मनोभावे वार्षिक नियोजनाप्रमाणे ” अलक्ष्मी-लक्ष्मी “—ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी पूजन अंगीकारावे.

दिपावलीत  लक्ष्मीपूजनावेळी वेगळ्या स्थानी केरसुणीचे म्हणजेच झाडूचेही  पूजन केले जाते, कारण झाडू हे “अलक्ष्मीचे” आयुध म्हणजे अस्त्र आहे. तिचा कोप म्हणजे आपल्याकडील संपन्नतेवर झाडू फिरवला जाणे. यासाठी तिचे त्यावेळीही पूजन केले जाते.

जेष्ठा कनिष्ठा गौरी पूजनासाठी उभ्या सजवलेल्या स्थितीत असणाऱ्या दोन जणी म्हणजे या  “अलक्ष्मी आणि लक्ष्मी “. 

त्या तीनही दिवसात या दोघींचेही विनम्र नमन असावे.

खड्या स्वरुपात असणार्‍या “अलक्ष्मी-लक्ष्मी ” —

या पद्धतीच्या पूजेसाठी दोन खडे जलवाहत्या नदीतून आणावेत. कारण या जलदेवता आहेत.

पाच किंवा सात खडे आणणे म्हणजे अलक्ष्मी, लक्ष्मीसह गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, कावेरी अश्या पवित्र जलदेवता आणल्या, असे मानून पूजन व्हावे, जेणेकरुन पाण्यासारखा वाहता पैसा येत राहील व अलक्ष्मीच्या  प्रसन्नतेने आपल्या खर्चावरही अंकूश राहील. आपल्याला वाहता पैसा यावा असे वाटते, पण खर्च मात्र वाहता नसावा असेही वाटते, त्याकरिता “अलक्ष्मी-लक्ष्मी ” दोघींचे एकत्रित पूजन श्रीविष्णूंनी अग्रेषीत केले आहे असे मनोमन जाणावे.

अलक्ष्मी असण्याचे लक्षण म्हणजे – अघोरी वृत्ती, अस्वच्छता, उपद्रवी अवगुण, कलह, अमिषप्रियवर्तन, आळस हे आहे व ते टाळणेच इष्ट जाणावे.

त्यामुळेच कुठेही स्थिर न असणार्‍या लक्ष्मीचे चिरकाल स्थैर्य अवागमनासह राहणेचे होते.

गरजूंना मदत करीत लक्ष्मीला फिरते ठेवणे केंव्हाही फलदायी असते. लक्ष्मी कोंडून ठेवल्यास अयोग्यतेचे  जाणावे.

श्रीगजानन महाराज यांनी त्यांच्या समक्ष

“अर्पण निधी साठवू नये” 

“अस्वच्छता नसावी” आणि “यात्रा थांबवू नये”—असे ब्रीद संस्थान शेगांवसाठी अधोरेखीत केलेले आहे, हे वास्तव.

त्यानुसार आजही वर्षभराचा खर्च कितीही असला, तरी येणार्‍या अर्पणनिधीचा वापर सातत्याने नवनव्या संधीतून केला जातो, पण बँक डिपॉझिट करुन लक्ष्मी साठवण्याचे होत नाही.

या श्रीगजानन महाराजांच्या कृपादृष्टीने आजही संस्थान श्रीक्षेत्र शेगांव उत्तरोत्तर फलद्रूप होत आहे.  सुखासमाधानाने

 ” सेवाकार्य यज्ञ ” अखंड चालू आहे, हे आपण पहात आहोतच.

या लेखातून केलेली व्यक्तता न भावल्यास दुर्लक्षित करणेचे असावे ही विनंती व क्षमस्व. 

आशय भावल्यांस निश्चीतच अनुकरण व्हावे, ही माझी सदिच्छा व सर्वांना अनुकरणासाठी शुभेच्छा!

 

।। नमो जेष्ठाय च कनिष्ठाय च  स्तेतानाम् पतये नमः ।।

अर्थात –

” ज्येष्ठा कनिष्ठासह उपद्रवी अवगुणांनीही नमन “

।। ॐ नमो श्रीगजानन ।।

© श्री दिनेश डोंगरे

बीड

मो ९८६०९४२२५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवस सुगीचे… भाग 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 दिवस सुगीचे सुरू जाहले –

ओला चारा बैल माजले—

अशी एक सुगीचे यथार्थ चित्रण करणारी फार सुंदर कविता आम्हाला तिसरी-चौथीत होती. शेतकऱ्यांसाठी सुगी म्हणजे धामधुमीचा काळ. त्यातल्या त्यात खरीप अर्थात दिवाळीपूर्वीचा हंगाम म्हणजे वेगवेगळ्या पिकांची काढणी,कापणी, मळणी आणि धान्य घरात आणेपर्यंतचा सर्व कालावधी हा अतिशय व्यस्त,धामधुमीचा आणि आनंदाचा असतो.आतापर्यंत केलेल्या वेळेचे, पिकाचे नियोजन, आणि शेतात केलेल्या कष्टांचे चीज सुगीत होणार असते. आणि वर्षभर शेतकऱ्यांचे कुटुंब, गुरा-ढोरांच्या पोटापाण्याची बेगमी, या सुगीवरच अवलंबून असते. पीक कसे आले?यावरही सुगीचे फलित अवलंबून असते. सुगीच्या दिवसात शेतकरी कुटुंबाला वेळकाढूपणा करून, टंगळमंगळ करून चालत नाही, की एखाद्या गावाला शिवालाही जाऊन चालत नसते. घरादाराला कुलूप घालून सर्वांची रवानगी शेतात करावी लागते. कधी कधी तर शेतावरच मुक्काम ठोकायला लागतो. त्यावेळी सर्वत्र कसे एकदम धावपळीचे चित्र असायचे.

खरे तर वैशाख सुरू झाला कीच बी बेवळा जमवण्याची तयारी सुरू व्हायची. मान्सूनचे वारे वाहू लागत आणि हवेतील उष्मा थोडासा कमी होई. भुईमुगाच्या शेंगा फोडायला सुरुवात व्हायची, कारण हे बी तयार करून ठेवायला लागायचे. बाकी कडधान्ये राखेत असत, ती पटकन चाळून घेता येत. पण शेंगदाण्याचे तसे नसते. घरच्याच पोत्यातील देशी शेंगांचे बी काढावे लागे. घरोघरी आयाबाया,पोरं- ठोरं शेंगा फोडायला सुरू करायची. हे कामसुद्धा रोजगाराने असायचे. चार-आठ आण्याला मापटाभर शेंगदाणे फोडून द्यायचे. सर्व शेंगा फोडून झाल्यावर मग मापट्याच्या हिशोबाने पैसे आणि थोडेसे शेंगांचे घाटे रोजगाऱ्यास मिळत. शेंगा फोडून झाल्या की बी अर्थात शेंगदाणे निवडण्याचे काम करावे लागे. फुटके,डाळी झालेले,बारीक बारीक शेंगदाणे वेचून, मोठे टपोरे शेंगदाणे पेरणीसाठी बाजूला काढावे लागत.आकाशात इकडे तिकडे पळणारे काळे काळे ढग आता स्थिरावू लागत. थंड हवा वाहू लागे आणि बियांचे आतून रुजणे सुरू होई.

उकाड्याने हैराण झालेल्या जीवास अचानकच आलेला एखादा पावसाचा शिडकावा दिलासा देई.वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आसमंतात भरून जात. कोकीळ आणि पावशाचे प्रियाराधन तार स्वरात सुरू व्हायचे आणि शेतातील राहिलेला काडी कचरा वेचून ढेकळं फोडून जमीन एकसारखी करायला सुरुवात व्हायची. मृग नक्षत्र सुरू होताच इथं तिथं मिरगी किडे दिसत. बायका त्यांना हळदकुंकू लावून पूजत. पावसाची वर्दी देत गार गार वारे वाहू लागत आणि पाठोपाठ टपोऱ्या थेंबासह जलधारा कोसळू लागत.

घन घन माला नभी दाटल्या । कोसळती धारा ।।

असेच काहीसे वातावरण असायचे. मातीचा सुगंध चहूबाजूस दरवळू लागायचा. तप्त धरणी पाऊस पिऊन तृप्त व्हायची.

इकडं आमच्या शाळा सुरू व्हायच्या. पावसात भिजत भिजत शाळेला जायला नको वाटायचे. उलट कांबळी पांघरून घरातूनच पाऊस पहावा वाटायचा. कौलांच्या वळचणीच्या पाऊसधारा झेलाव्या वाटायच्या. शेतातल्या मऊ मातीत पाय रुतवू वाटायचे.सर्वांबरोबर शेतात जाऊन शेतातली कामे करावी वाटायची. चुलीपुढील ऊबीत बसावे वाटायचे. तरीही शाळेला जावे लागायचेच. कुणाची तरी जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीने घ्यायची. वह्या लगेच मिळत नसत आणि तसेही प्राथमिक शाळेत पाटीचा वापर जास्त होत होता, वही एखादं दुसरीच.

राखेतला बी बेवळा चाळून काढायची धांदल उडायची. आठवणीने कुरी सांदीकोपऱ्यातून बाहेर येऊन सुताराकडे दुरुस्तीला किंवा सांधायला येऊन पडत. देशी चवळी, मूग, उडीद, मटकी, काळा श्रावण, कुशीचा हुलगा, तूर, ज्वारी राखेतून काढून चाळले जायचे. देशी पावट्याचे बी, सूर्यफुलाचे, कारळ मुरडान घालायला सोबत असायचे. पसाभर हावऱ्या (पांढरे तीळ) गठूळ्याच्या एका टोकाला आठवणीने बांधल्या जायच्या. पेरणी झाली की असेच विस्कटून द्यायच्या. अडशिरी पायलीभर हावऱ्या आरामात निघायच्या.

दहीभात,नारळ पेरणीच्या श्रीगणेशाला आणि धरणीच्या शांतीसाठी. घात अर्थात वाफस्याची वाट प्रत्येकजण पहात असायचा. ओल किती खोल गेलीय याची चाचपणी व्हायची अन पेरणीची एकच धांदल उडायची. बैलगाडीत कुरी,बी बेवळा टाकून घरदार पेरणीला निघायचं. गावात सकाळी सकाळीच सामसूम व्हायची. पेरणी झाली आणि लगेच पाऊस आला की आनंदाला उधाण यायचं, कारण बी व्यवस्थित मुजून रुजणार याची पक्की खात्री व्हायची.

वैशाख-जेष्ठ महिना अशा प्रकारे सुगीच्या तयारीच्या धामधुमीतच न पेरणीतच संपून जायचा.

आषाढाचे काळे काळे कुट्ट पाण्याने ओथंबलेले ढग आकाशात गर्दी करायचे अन भुर भुर पाऊस सतत चालू रहायचा. सोबत बोचरा भिरभिर वारा. बाया माणसं पोत्याची खोळ घेऊन शेताला जायचे. गुराखी पोत्याची खोळ,काठी घेऊन गुरे चारायला निघायची. सततच्या भुरभुरीने सगळीकडे हिरवे पोपटी गवताचे कोंब जिकडे तिकडे उगवत. माळराने, टेकड्या, डोंगर हिरवाई पांघरून बसत. जनावरांना ती हिरवाई भुरळ पाडायची आणि ती हावऱ्यागत इथं तिथं मनसोक्त चरत रहायची. उन्हाळ्यात कडबा खाऊन भकाळलेलं पोट आता चांगलंच टूमटूमित व्हायचं.शेतात वित दोन वित पीक वाऱ्यावर डोलायचं. पिकाबरोबरच तणही गर्दी करायचं, इतकं की पीक मुजुन जायचं. दिवस दिवस खोळ पांघरून बायका खुरप्याच्या शेंड्याने शेंड्याने अलवार पिकाच्या मोडाला धक्का न लावता तण वेचत रहायच्या. कधी अभंग, कधी सुखदुःखाच्या गोष्टी तर कधी पिकाचा अदमास बांधत शिवारे पोत्याच्या खोळीत आणि बांगड्यांच्या किणकिणीत गजबजून जायची. सततच्या रिपरिपीने सगळीकडे चिखल चिखल व्हायचा.

मूळ नक्षत्राच्या खिचड्याला बायकांची धांदल सुरू व्हायची. उखळीत जुंधळ कांडून चुलीवर रटरटत असायचे. करडं भिजवून उखळात चेचून त्यातून दूध काढलं जायचं. ओढ्या ओघळीच्या खळखळ पाण्यावर जनावरांना मोकळं सोडलं जायचं. गळ्याइतक्या पाण्यात म्हशी, रेडकं मनसोक्त डुंबत राहायची. मालक गोड शीळ घालत चिखलाने बरबटलेली अंगे दगडाने घासून घासून स्वच्छ करायचा. बैलांना ओंजळीनं पाणी मारत मारत मायेने हात फिरवत कांती तुकतुकीत करायचा. ओल्या गवताने तृप्त झालेली जनावरे धुतल्यावर अजूनच तजेलदार दिसायची आणि ही नवी कांती बघून शेतकरी प्रसन्न व्हायचा. खिचडा,आंबील खाऊन जनावरे सुस्त होत.

पुरणपोळीचा घास सगळ्या जनावरांना मिळायचा. नवे कासरे, शिंगांचे गोंडे आणि आरशाच्या रंगीबेरंगी झुली पाठीवर लेऊन लेझीम,वाजंत्र्याच्या गजरात सजलेले बैल मिरवणुकीत सामील व्हायचे. ( या दोन दिवसात किती पण अडचण, नड-अड असली तरीही शेतकरी बैल औताला अथवा बैलगाडीला जोडायचे नाहीत.) आंब्याच्या पानांची तोरणे मातंग समाजातील लोक गोठ्याला, घराला आणून बांधत. गावभर मिरवून दृष्ट काढून बैल गोठ्यात विश्रांती घेत. अकितीला अंगणात लावलेल्या पडवळ, दोडका, भोपळा,काटे वाळकं वेलीवर लोंबकळत. बांधावरच्या गोल भोपळ्याच्या वेलीवर पिवळसर केशरी फुलांचा बहर यायचा.

क्रमशः …

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ फसवणूक…. ??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ फसवणूक…. ??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक आजी ….वय वर्षे असावे कदाचित 90 वर्षे…. 

कुत्री मांजरं …. जनावरं असली तरी एकमेकांना ती चाटतात प्रेमाने…. पण काही घरांमध्ये म्हाताऱ्या….  आजारी…. आपल्या लोकांचा हात हातात घेणे “Below Dignity” समजतात….

खुरटलेलं झाड असेल तरी ते आपल्या निष्प्राण फांदीला धरून ठेवतं मरेपर्यंत…. 

डुक्कर गटारात लोळतं असेलही…. परंतु आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन रस्त्याने दिमाखात फिरत असतं… त्याला जणू हेच दाखवायचं असतं डुक्कर असलो, तरी आम्ही आई बापाला सांभाळतो ! 

जनावरं जिथं आपल्या आई बापाला सांभाळून प्रेम करतात….  तिथं माणसाचा जन्म मिळालेली काही मंडळी आपल्या आई बापाला विसरून जातात….

अशीच ही एका सुखवस्तू घरातली आजी…. 

पायताण जुनं किंवा खराब झालं तर फेकून देतात….  तिच्यापासून आपल्याला काहीच फायदा नसतो….

अशीच मुलाबाळांनी फायदा असेपर्यंत वापरून…. जीर्ण झालेली एक आजी उकिरड्यावर फेकून दिली…. पायताण समजून….! 

रस्त्यावर ही आजी मला भेटली तेव्हा म्हणाली, “ मला काहीच दिसत नाही रे बाबा….”

तिच्या डोळ्यावर चष्मा होता…. मी तो चष्मा हातात घेऊन  नीट पाहिला, त्याला दोन्ही काचा नव्हत्या….  

ती फक्त फ्रेम घालत होती…. 

मी तिला म्हणालो, “ म्हातारे चष्म्याला काचच नाही, दिसंल कसं तुला ? “

ती हसत म्हणाली, ‘आस्सा होय मला वाटलं… माझे डोळे कामातनं  गेलेत … आत्ता कळलं माझे डोळे चांगले आहेत….चष्मा खराब झालाय… “ 

वाईटातून ही चांगलं शोधणारी ही आजी…. 

मी म्हणालो, “ चल डोळे तपासून चष्मा करून देतो…”

ती म्हणाली,  “नको …. चष्मा दिलास तरी आता कोणाला बघू बाबा  …? “

तरीही हट्टाने मी तिला मोटरसायकलवर बसवलं…. मोटर सायकल वर लहान मुलीला “पप्पा” जसा कमरेभोवती विळखा घालून बसायला सांगतो,  त्याप्रमाणे मी तिला माझ्या कमरेला विळखा घालून मोटर सायकलवर बसायला सांगितलं…. फार मोठ्या मुश्किलीने ती बसली…. 

डोळे तपासून आलो…. चष्मा करायला टाकला….!

चष्मा तयार झाल्यानंतर मी तो तिच्या डोळ्यावर अडकवला….  

चष्मा घालून तिने इकडे तिकडे टकामका पाहिलं…. 

तिला दिसायला लागलं होतं….  ती हरखली…. 

तिने बोचकयातून एक पिशवी काढली…. त्या पिशवीतून तिने बरीचशी चिल्लर काढली…. 

मला तिने पैसे मोजायला सांगितले. मी सगळी चिल्लर मोजली. एकूण रुपये 192 होते…. 

मला काही कळेना…. मी शून्य नजरेने तिच्याकडे पहात विचारलं….. “ हे काय ? “

ती म्हणाली,  “ मागल्या महिन्यात नातवाचा वाढदिवस होता,  त्याला काहीतरी घ्यायचं म्हणून पैसे साठवत होते… किती पैसे साठले ते मला माहित नाही…. तू मोज… आता नातू तर येणार नाही….  पण हे सगळे पैसे तू घे..”

मी म्हणालो,  “अगं आज ना उद्या येईल ना नातू तुझा… मला नको देऊस हे पैसे…! “

डोळ्याला पदर लावून ती म्हणाली, “ हो मी पण हाच विचार करते आहे गेल्या दहा वर्षापासून ….. येईल माझा नातू कधीतरी…. जो दहा वर्ष आला नाही तो आता इथून पुढे काय येणार ?”– ती डोळ्याला पदर लावून रडत म्हणाली….

“आता तूच माझा पोरगा आणि नातू आहेस आता हे सगळे पैसे तू घेऊन जा….” 

हे पैसे ती गेले चार महिने साठवीत होती…. नातू येईल या आशेवर….. पण….. नातू आलाच नाही…

यानंतर मी माझ्याकडच्या पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि आजीच्या हातावर टेकवत म्हणालो, “ आयला म्हातारे, तुला सांगायलाच विसरलो बघ. पण तुझा नातू मला मागच्या महिन्यात भेटून गेला आणि म्हणाला….” माझ्या आजीला हे एक हजार रुपये द्या…. मला तिची खूप आठवण येते…. पण मी तिला भेटू शकत नाही…. मला ती खूप आवडते आणि मला तिची खूप आठवण येते हा निरोप तिला नक्की द्या …..”

आजीने या पाचशेच्या दोन्ही नोटा घेतल्या आणि चिल्लर सुद्धा…. आणि कपाळाला लावून ती रडायला लागली….. मी म्हणालो,  “ आता रडतेस कशाला म्हातारे ? नातवाने तुला गिफ्ट दिलंय ना ? आता तरी तू आनंदी रहा की…. पुढे कधीतरी येऊन भेटणारच आहे असं मला म्हणाला तो…. “ 

आजीने रडतच हात जोडले आणि मला खूण करून जवळ बोलावले…. 

आणि कानात म्हणाली, “ सगळ्या जगाने फसवलं मला….. आता तू सुद्धा फसवलंस….माझा नातू मरून दहा वर्षे झाली आहेत डाक्टर … !” 

अंगावर आलेले ते शहारे मी अजूनही घेऊन फिरतो आहे अश्वत्थाम्यासारखे….. !!!

(यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझा एके ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार झाला…. सर्व वातावरण प्रसन्न आणि भारावलेले होते…. पण माझ्या डोक्यातून सकाळचा प्रसंग जात नव्हता….. 

माझं भाषण आटोपून मी माझ्या खुर्चीत बसलो आणि मला मिळालेल्या श्रीफळाकडे सहज पाहिलं, मला तोही हिरमुसल्या सारखा वाटला…! निर्जीव गोष्टींना भावना असतात मग सजीवांना का असू नयेत… ??? )

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी…???… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ मी…???… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

मी— १ मुलगी, १ बहिण, १ मैत्रीण, १ पत्नी, १ सून, १ जाऊ, १ नणंद, १ आई, १ सासू , १ आजी, १ पणजी,….

सर्व काही झाले… पण “ मी “ चं व्हायचं राहून गेलं… आयुष्य संपत आलं… अन् आता वाटतयं स्वतःसाठी जगायचंच राहिलं। 

कळत नव्हतं तोपर्यंत आईने आजीने नटवलं… नंतर दादा अन् बाबांनी बंधन घातलं… वयात आल्यावर माझ्या प्रत्येक गोष्टींचे अर्थ निघू लागले… अन् नकळत माझे चारित्र्यच चर्चेत यायला लागले… माझ्या फिरण्या वागण्या बोलण्या हसण्या वर सोईस्कररित्या बंधन आले… एका मित्राची मैत्रीण होतानाही समाजाने आडवे घातले… 

अन् आता काय शिक्षण झाले म्हणून काका बाबा स्थळ बघायला लागले…नोकरीचा प्रश्न मांडायला गेले तर म्हणे नोकरी आता कशी करणार …सासरच्यांना विचारुनच करावी लागणार… बाजारात वस्तू दाखविल्याप्रमाणे १० वेळा माझाही दाखविण्याचा कार्यक्रम झाला … प्रश्नांचं भांडार अन् अपेक्षांचा ढीग माझ्यासमोर आला… त्याचा हसत हसत स्वीकारही केला -साथीदाराकडे बघून… नंतर त्याचे फोन, त्याची मर्जी सुरु झाली… मी स्वत्व अर्पण केल्यावर त्यानेही मला खूप आश्वासने दिली… नकळत मी एका ‘ संसार ‘ नावाच्या नव्या विश्वात ढकलले गेले …

अन् पुढचे आयुष्य जणू मृगजळच झाले … घर नवरा सासू सासरे यांच्यात गुंतले… छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत म्हणून बोलणे टोमणेही ऐकले… माहेरी नाही सांगितले, वाईट वाटेल म्हणून… हसतमुख राहिले नेहमी दुःख लपवून…अन् अचानक माझ्यावर कोडकौतुकाचा वर्षाव झाला सुरू… कारण माझ्यामुळे येणार होतं घरात एक लेकरु… मुलगा की मुलगी चर्चा झाली सुरू… अन् खरचं मलाही कळत नव्हते काय काय करु… विस्कटलेल्या मनाने पुन्हा एकदा उभारी घेतली…

अन् कोमेजलेल्या फांदीला पुन्हा नवी पालवी फुटली… नऊ महिने सरले… अन् त्या निष्पाप जिवाकडे बघून मी भरुन पावले… आई असे नवे नाव मला मिळाले… त्या छोटयाश्या नावासोबतच खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आली… आनंद मानत राहिले नेहमी मुलांच्या आनंदात… वेगळीच धांदल उडू लागली माझी घर सांभाळण्यात … 

आतापर्यंत साठवलेल्या स्वप्नांना गच्च गाठ मारली… अन् मुलांसाठी पै पै साठवली… शिक्षण झाले भरपूर,  तशी नोकरीही मिळाली दोन्ही मुलांना… आई वडिलांसह सोडून गेले देशाला… मधून मधून येत होते. भेटी गाठी घेत होते. … लग्न तुम्ही जमवा म्हणाले तेच काय कमी होते? … लग्न झाले दोघांचे तशी सासूही झाले… मुलांपेक्षा जास्त आता नातवांची वाट पाहत राहिले … उतारवयात आता त्यांच्याच आधार वाटू लागला … अन् दुधात साखर म्हणजे एक नातू  माझा भारतात सेटल झाला… पुन्हा एकदा मन माझे त्याच्यात रमले… आता त्याचे लग्न झाले … नातसुनेचे पाऊल घराला लागले … मन आनंदाने भरुन गेले… अन् कवळी बसवलेल्या बोळक्याला हसू आले…

अपेक्षांचा आलेख उंचावत होता… अन् मला पणतीचा चेहरा पहायचा होता … तीही इच्छा माझी पूर्ण झाली… घरात एक  गोंडस पणती आली… पुन्हा ए कदा मीही तिच्यासोबत बालपणात गेले…

अन् आता मात्र सर्वजण वाट पाहू लागले … माझ्या मरणाची… तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी मनात घर केलं…

अन् सगळं काही झालं असताना उगाच काही तरी बाकी असल्यासारखं वाटू लागलं…संपूर्ण आयुष्याचा आढावा मी घेतला आणि लक्षात आले की… ‘मी’ व्हायचंच  राहून गेलं … सर्वांची लाडकी झाले, पण स्वतःची झालेच नाही कधी …नेहमी दुसऱ्यांचा विचार केला– स्वतःच्याही  आधी…हे सर्व लक्षात यायला ९० वर्षांचा काळ लोटला होता …

पण आता मात्र माझ्या मनाने ठाम निर्णय घेतला होता… कपाट उघडून माझ्या आवडीचा स्लिवलेस ड्रेस घातला… मस्त मेकअप करुन तयार झाले मनसोक्त फिरायला … कुठे जायचयं असं काहीच ठरलं नव्हतं …देवाला मात्र सारं काही ठाऊक होतं … त्यानेही मस्त गेम खेळला माझ्याशी … पर्स घेऊन बाहेर आले तर यमराज उभा होता दाराशी … !!

— असे होण्याआधीच जीवनाचा खरा आनंद घ्या, स्वतःला देखील वेळ द्या, आणि आपणच आपले लाड करा.

 “ मी “ ला ओळखा.

लेखक : अनामिक

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाउन साइझिंग… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ डाऊनसाइझिंग… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

नेमेची येतो मग पावसाळा, या उक्तीप्रमाणे दरवर्षी जाणारी मी, जवळजवळ तीन वर्षांनी अमेरिकेला लेकीकडे गेले. कोरोना संकटामुळे 3वर्षे जाऊ शकले नव्हते. यावेळी बरेच बदल घडलेले दिसले. तिकडे नेहमी गेल्यामुळे,तिकडे कायम राहणाऱ्या,समवयस्क मैत्रिणीही झाल्या होत्या माझ्या.  

जरा स्थिरस्थावर झाल्यावर विचारले, “रमाला करू का फोन? बरी आहे ना ती?” 

 मुलगी म्हणाली, “अग, त्या आता आमच्या शहरात राहत नाहीत.” 

रमा म्हणजे बडे प्रस्थ होते इथले. तिचे यजमान नामांकित भूलतज्ञ होते इथे. मग भाग्याला काय उणे हो? अतिशय आलिशान, लेकसाइड,  भव्यदिव्य १५-१६ खोल्यांचे घर, स्वतःची बोट, मोठा डेक  असे फार सुरेख घर होते रमाचे. माझ्या मुलीशी त्यांची दोस्ती होती. खरेतर ते माझ्या वयाचे, पण गाणे,याकारणाने त्यांची अदितीशी, आणि पर्यायाने माझ्याशीही खूप छान दोस्ती झाली.

माणसांचा खूप लोभ त्यांना. मुलगे दुसऱ्या गावात  स्थायिक झालेले आणि सुना दोघीही अमेरिकन. त्यामुळे एकत्र राहण्याचा प्रश्न संभवत नाही. दोघेही अतिशय रसिक, त्यामुळे इकडे नाटक घेऊन भारतातले लोक आले, की रमाकडेच त्यांचे रहाणे, पाहुणचार, हे ठरलेलेच. 

डॉक्टर रिटायर झाले आणि एवढ्या मोठ्या घरात खूप वर्षे दोघेही राहिले —  माणसे बोलवत, मैफिली जमवत.!! मुले मात्र खूप दूरच्या शहरात नोकऱ्या करत होती. आता संध्याछाया दिसू लागल्या. रमाची दोन्ही गुडघ्याची ऑपरेशन्स  झाली. मुले आली नाहीत ,त्यांना रजा नव्हत्या. दोघांनीच  ते निभावले. हळूहळू इतर तक्रारीही सुरू झाल्या. आता मात्र हे घर विकून टाकून, लहान घर घ्यावे आणि मुलाच्याजवळच घर बघावे, हा निर्णय रमाआणि माधवने घेतला. हा मुलगा त्यातल्या त्यात त्यांच्याजवळ होता–. म्हणजे 2 तास ड्राईव्हवर.

अतिशय दुःखाने रमा-माधवने आपले टोलेजंगी घर विकले, आणि जरा लहान घरात ते  गेले. आपले इतके वर्ष साथ देत राहिलेले शहर, मित्र मंडळ सोडून. आता त्यांना भेटायला जाणे मला शक्य नव्हते .फोनवरच बोललो आम्ही. रमाला अतिशय वाईट वाटत होते. 

मला म्हणाली, “,काय करणार ग?  कोण येणार आमच्या मदतीला सारखे? त्यापेक्षा म्हटले,जवळच्या मुलाच्या घराजवळ घर घ्यावे. त्यालाही बरे पडेल,आणि त्याच्या लहान मुलांनाही आमचा उपयोग होईल. ही अमेरिका आहे बरं. म्हातारपणी असेच डाउन सायझिंग करावे लागते. आपला पसारा आवरून लहान घरात आणि तिकडून मग  old age होम, हाच पर्याय उरतो इकडे.त्यालाही आमची मानसिक तयारी झाली आहे. बघ,जमले तर ये भेटायला,आणि नवीन घर बघायला. निराशा होईल तुझी.हे घर काहीच नाहीये आमच्या पूर्वीच्या घराच्या तुलनेत.” 

रमाने फोन खाली ठेवला. तिचा downsizing शब्द मात्र मनात रुतलाच. मी विचार करू लागले, आपणही आता म्हातारे व्हायला लागलोय, नव्हे झालोच आहोत. मी माझे घर डोळ्यासमोर आणले. एकतर मोठ्ठे  घर आणि  भयंकर हौस !!. निरनिराळे सामान, वस्तू, सुंदर क्रोकरी, बेडशीट्स, कपडे – भांडी जमवायची. —बाप रे. हौसेहौसेने मी जमवलेले  क्रोकरी सेट्स आले डोळ्यासमोर. शिवाय खूप पूर्वी आईने दिलेले म्हणून जपून ठेवलेले ‘स्टीलची १२  ताटे, १२ वाट्या ‘असे सेट्स—माझ्याकडे आता कोण येणार आहेत बारा आणि पंधरा लोक ? हल्ली आम्ही घरी शक्यतो पार्ट्या करतच नाही, आणि इतके लोक तर नसतातच ना. मग बाहेरच जमतो सगळे एखाद्या छानशा हॉटेलमध्ये.

पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पैसा कमी असायचा. बाहेर हॉटेलात जायची पद्धतही नव्हती. सगळेघरी करण्याकडे गृहिणीचा कलअसायचा, हाताशी वेळही भरपूर असायचा. आता काळ किती बदलला, आम्हीही  बदललोच  की. मी जरी अतिशय व्यस्त होते माझ्या व्यवसायात, तरी सगळे घरीच करायची. त्यासाठीही जमवलेली भांडीकुंडी आता कशाला लागणार आहेत ?

मध्यंतरी, बहिणीच्या कोकणातल्या गावात,  रामाच्या देवळात उत्सवअसतो, त्यासाठी देऊन टाकली सगळी ताटे वाट्या भांडी. कामवाल्या वंदनाला दिली धडअसलेली पण मला कंटाळाआला म्हणून नको असलेली बेडशीट्स.  कपाट आवरायला काढले तर नको असलेल्या नावडत्या ड्रेसचे ढीग काम करणाऱ्या सुरेखाच्या मुलीला देऊन टाकले, आणि एक कप्पा रिकामा झाला. हल्ली मी फार  क्वचितच साड्या नेसते. बघितले तर साड्यांची उतरंड लागलेली गोदरेजच्या कपाटात. भावजय साडीच नेसते, तिला म्हटले,घेऊन जा ग तुला हव्या त्या साड्या.—-तरी अजून सगळ्या देऊन टाकायला मन होत नाही ते वेगळे. ”एवढी आध्यत्मिक पातळी गाठली नाहीअजूनआईने,” असे उपहासाने मुली म्हणाल्याच– दुष्ट कुठल्या– असो.

असे करत, बरंच आवरत आणलंय सध्या. आता कसं सुटसुटीत वाटतंय घराला आणि मलासुद्धा. मध्ये एकदा कामवाली म्हणाली, “ताई ब्याग द्याकी एखादी जुनी. कपडे ठेवायला बरी पडेल .”  माझ्याकडच्या असंख्य मोठ्या बॅग्सपैकी एक बॅग तिला आनंदाने दिली. तिच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद मला किती समाधान देऊन गेला म्हणून सांगू.

आता मी परदेशात गेले की तिकडून येताना हावऱ्यासारखी खरेदी करत नाही. नुसते बघते सगळे पण घेत मात्र काही नाही. मन भरून तृप्त झाले माझे आता. पूर्वीसारख्या बॅग्स दाबून भरत नाही. आता नकोच वाटतो हा पसारा आणि हव्यास. मुलगी म्हणाली, ”हे काय? यावेळी काहीच नाही का खरेदी करायची?”   म्हटले, “ वा ग वा. नाही कशी?माझ्या प्रियजनांना भरपूर चॉकलेट्स नेणार,बदाम पिस्ते नेणार तर. आणि माझ्या वंदना, स्वाती,संगीता या घर काम करणाऱ्या माझ्या सहकारी बायकाना कुठे नेलपॉलिश, कुठे छानशी किसणी, कुठे नॉनस्टिक तवा, अशा त्यांना वाटणाऱ्या अपूर्वाईच्या गोष्टीच फक्त नेणार. बाकी लोकांकडेअसते सगळे. त्यांना नाही कसली अपूर्वाई.”  मुलगी हसली आणि म्हणाली, ‘रोज व्हाट्सअपवर येणाऱ्या अध्यात्मिक मेसेजचा परिणाम झालेला दिसतोय आईवर.”  म्हटले, “नाही ग बाई, उलट रमापासून धडा घेतलाय की अमेरिकेसारखे आता  पुण्यात पण आम्ही डाउन सायझिंग करायला शिकले पाहिजे. नकोच तो वस्तूंचा हव्यास, आणि व्याप तितका ताप. यावेळी खरंच येताना दोन्ही बॅग्स अगदी कमी भरल्या वजनाने. आता घरी कोणतीही वस्तू घेताना मनाला दहावेळा विचारीन,की ही खरंच हवीय का. 

रमाकडून शिकलेला हा अनमोल… पसारा आवरण्याचा धडा ,गिरवायला सुरवात केली आहे हे नक्की ! रमाने नाईलाजाने केले डाउनसायझिंग, पण मी मात्रअगदी समाधानानेआणि न कुरकुरता सुरवात केलीय.

 — तर मग मैत्रिणींनो करा सुरवातआवरायला, —आणि घराचे आणि मनाचेही डाउनसायझिंग करायला—

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द व्हावे सारथी… भाग-3 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

📓 शब्द व्हावे सारथी… भाग-3 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

(अन् इतके दिवस लेखिका, मुख्याध्यापिका, मानव संसाधन विभागाची अध्यक्षा म्हणून मिळालेल्या लौकिकावर टीकास्त्राने काळा बोळा फिरला.) इथून पुढे —-

माझे मन घायाळ झाले. ‘मी सुखी आहे शिक्षण क्षेत्रात. नको मला हे पद. ‘आपणाला लोक दूषणे देत आहेत.’ मी फॅक्स पाठवला; पण मला उत्तर आले, तात्काळ. ‘धीराने घ्या. तुमची निवड ‘मी’ केली आहे. चटकन् उठा नि झटकन् कामाला लागा. सिद्ध करा आपली योग्यता.’

विश्वकोशाचे सचिव मला न्यायला ‘पोदार’मध्ये आले. मी निघाले तर महानगरपालिकेच्या समोर कॅमेरे रोखलेले. ‘‘बाई आली? टीकेला न घाबरता?’’ हे अध्यक्षपद इतके ग्लॅमरस असेल याची मला सुतराम कल्पना नव्हती; पण सुरू केले नेटाने काम. भारतीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. गोविंद फडके आणि डॉ. सु.र. देशपांडे यांची विज्ञान आणि मानव्य विभागासाठी मी मागणी केली नि त्याच दिवशी मुख्यमंत्री विलासरावांनी ती पूर्ण केली.

पण वेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले. वाईला मी केक कापला.. झाली बातमी! विजूताईंनी केक कापला! कार्यालयात गणपतीची तसबीर लावली! विजूताई दैववादास शरण! अहो, देवाला नाही तर कोणाला माणसे शरण जातात? गणपती ही बुद्धीची देवता ना!  पण मी चार मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली विश्वकोशाची परिपूर्ती केली. खंड १७ विलासराव देशमुखांच्या काळात, खंड १८ अशोकराव चव्हाणांच्या काळात, खंड १९ पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात तर २० पूर्वार्ध, उत्तरार्ध देवेंद्र फडणवीसांच्या काळात प्रकाशित झाले.

महाजालकावर तो सीडॅकच्या मदतीने टाकला. त्याला जगातून १५ लाख वाचक १०५ देशांतून मिळवून दिले. विसाव्या खंडाचा पूर्वार्ध झाल्यावर हे आमचे मंडळ बरखास्त करण्यात आले. आता फक्त ४०० नोंदी शिल्लक राहिल्या होत्या. मला अतीव दु:ख झाले; पण तर्कतीर्थाचे पुत्र वासुदेवशास्त्री जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजींना पत्र लिहिले. ‘माझ्या वडिलांचा रखडलेला प्रकल्प विजयाबाईंनी अतीव मेहनतीने पूर्ण करीत आणलाय. त्यांनी घेतलेल्या मेहनतीस न्याय द्यावा. परिपूर्ती बाईंनी करावी, अशी तर्कतीर्थाचा पुत्र म्हणून इच्छा व्यक्त करतो.’ नि ती संधी देवेंद्रजींनी मला दिली. मंडळ पुनरुज्जीवित झाले. सारे विश्वकोश कार्यालय, माझे तरुण सहकारी, जाणते संपादक कामाला लागले. मी वाईतच तळ ठोकला. गोविंदरावांचे निधन झाले होते नि आठ विज्ञान नोंदी तपासणे गरजेचे होते. हात जोडून

डॉ. विजय भटकरांसमोर उभी राहिले. ते ‘हो’ म्हणाले अन् मोहीम फत्ते! २० व्या खंडाचा उतरार्ध पूर्ण झाला. याच कालखंडात कुमारांसाठी दोन कुमारकोश जीवसृष्टी आणि पर्यावरणावर काढले आणि सात नामवंत शास्त्रज्ञांनी ते बोलके केले अंधांसाठी. कन्याकोशाची २७५ स्त्रियांचा चरित्रगौरव सांगणारी २२ तासांची ध्वनिफीत महाराष्ट्र शासनाने दुर्गम भागातही पोहोचविली.

२४ जून २०१५ ला विश्वकोशाची परिपूर्ती देवेंद्रजींनी केली नि मला कृतकृत्य वाटले. ‘विश्वकोशा’ची गाडी सचिवांकडे देऊन माझ्या वाहनाने मी परतले..

‘‘मास्तरीण मी!’ नावाने महाराष्ट्रात १८० ठिकाणी ग्रंथवाचन स्पर्धा घेतल्या. ५००० वस्तींचे शेणगाव ते मुंबई, १८० गावं. विश्वकोशाच्या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम, कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ‘मंथन’चे आशीर्वाद मानांकन मिळाले. विश्वकोश घराघरांत पोहोचला. इतकी माणसे जोडली गेली ना! मी फार ‘श्रीमंत’ झाले..

माझ्या घराकडे मात्र पती बघत होते. प्राजक्ता-निशिगंधाची अतूट साथ होती. ‘आमचे राजकुमार आम्ही शोधू’ म्हणणाऱ्या या दोन्ही सोनपाकळ्या स्वयंसिद्ध कधी झाल्या? निशिगंधाने दोन पीएच.डी. नि प्राजक्ताने मेडिकल क्षेत्रातल्या तीन पदव्युत्तर पदव्या कधी संपादन केल्या? दोघींनी मला तीन गोडुली नातवंडे पन्नाशीत दिलीसुद्धा. त्यासाठीसुद्धा ही ‘नानी’ राबलीय हो; पण मायेचे अतूट धागे ना, श्रमांच्या मोलापेक्षा फार मोठे, फार चिवट नि पुष्ट असतात. आम्हाला पेन्शन देणाऱ्या दोघी मुली आमचे वज्रकवच नि सुखाचा मूलाचार आहेत.

सध्या २०१५ ते २०१८ मध्ये मी बारा बालकोशांचे संपादन करीत आहे. अहो, केवढे अपार सुख आहे त्यात. ‘नवचैतन्य’, ‘पाणिनी’, ‘डिंपल’ माझी पुस्तके काढतायत. आनंद आनंद आहे. दु:ख दात काढते ना. तो लहानपणी बुटात जखडलेला पाय दुखतो, ठणकतो; पण मी चालत राहाते. पवन पोदार म्हणत असत, ‘‘हाऊ डु यू वॉक विथ धिस लेग? आय गेट वरिड.’’

मी म्हणे, ‘‘सर, विथ धिस ब्रोकन लेग आय हॅव ट्रॅव्हल्ड इन फोर्टीन डिफ्रंट कंट्रीज.’’

माझी तीन भावंडे, जी कधीच हे जग सोडणार नाहीत असे मला वाटत होते.. आक्का, नाना, निरू.. निघून गेली. माय तर रोज उठता-बसता आठवते. मग मी ओजू, अर्जू, इशूत मन रमवते आणि मग नेटाने उभी राहाते. मी किती विद्यार्थ्यांची आई आहे. वाचकांची माय आहे. छोटय़ांची नानी आहे. माझा परिवार घनदाट आहे. माझ्या मुली हेच माझं कनक. सूर्यनारायणास मी रोज सांगते..

‘दे तेज तू मजला तुझे, 

दे तुझी समता मला

श्रेयसाची, प्रेयसाची, 

नाही इच्छा रे मला—-

ना क्षणहि जावो व्यर्थ माझा,

शब्द व्हावे सारथी

त्यांच्याच रे साथीत व्हावी, 

शेवटाची आरती’ —-

— समाप्त —

लेखिका – डॉ. विजया वाड 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द व्हावे सारथी… भाग-2 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

📓 शब्द व्हावे सारथी… भाग-2 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

(दिलीपने माझी ३१ पुस्तके दहा-बारा वर्षांत काढली. १२४ पुस्तकांची आई आहे. अजूनही लिहितेच आहे..) इथून पुढे —-

मी ‘गोदरेज’ मध्ये विज्ञानाची शिक्षिका होते तेव्हा माझी पुस्तके येऊ लागली होती. माझ्या ‘मेनका’ मधील कादंबरीतले काही वर्णन थोडे प्रक्षोभक होते. तेवढाच भाग अधोरेखित करून एका शिक्षिकेने डॉ. डी.डी. पंडय़ा या आमच्या मुख्याध्यापकांना दाखवला. ‘‘शोभते का हे उघडेवाघडे लिहिणे एका शिक्षिकेला?’’  त्यांनी पूर्ण कादंबरी वाचायला मागितली. ‘‘रेफरन्ससकट वाचल्यास त्यात अशोभनीय काही नाही.’’ त्यांनी क्लीन चिट दिली. माझे पुस्तक मी जय गोदरेज या संचालिका मॅडमना नियमित देत असल्याने आणि शाळेच्या वेळात ‘लेखन’ करीत नसल्याने एरवी अनवस्था प्रसंग ओढवला नाही. 

सासूबाईंनी मला शिकू दिले, पण प्रथम सासऱ्यांचा नकार होता. बीएडला फीचे पैसे देईनात. ‘‘तुझ्या आईने दिलेली चांदीची भांडी मोड नि भर पैसे. त्यावर म्हाताऱ्याचा हक्क नाही.’’ त्या म्हणाल्या. मी ‘आज्ञापालन’ केले, पण बीएडला मला कॉलेजात प्रथम क्रमांक, लायब्ररी अ‍ॅवॉर्ड, टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती, बेस्ट स्टुडंट अ‍ॅवॉर्ड, विद्यापीठात मानांकन मिळाले नि सासरे म्हणाले, ‘‘आता माझा विरोध संपला.’’ तरी ते नेहमी म्हणत, ‘‘आमच्या घरात साध्या बायका नाहीत. एक अडाणी नि दुसरी दीड शहाणी.’’ माझे सासरे जुने बीकॉम होते. तैलबुद्धीचे होते.

‘गोदरेज’मध्ये सत्तावीस वर्षे मी इमानेइतबारे नोकरी केली. एम.ए., पीएच.डी.ला अत्युच्च गुण आणि गुणांकन असल्याने सर्व मराठी शिक्षकांना डावलून मला मराठी विभागाचे प्रमुखपद दिले गेले, मी विज्ञानाची शिक्षिका असूनही. नवल गोदरेज यांनी मला मुलाखतीत पहिला प्रश्न विचारला, ‘‘हू आर युवर एनिमिज?’’

‘‘एकही नाही.’’

‘‘का बरे?’’

‘‘मला स्नेहाची नजर आहे.’’

‘‘तर मग मी तुला निवडतो; पण बाळ, तुझ्या सीनियर्सना कधी दुखावू नको. प्रेमाने जिंक. अवघड वळण आहे.’’ केवढा त्या उद्योगपतींचा दूरदर्शीपणा!

पुढे एक दिवस पोदार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका १९९९ मध्ये मला एका ‘पालकसभे’साठी बोलवायला आल्या. मी रीतसर परवानगी घेऊन गेले. ते माझे ‘सुसंवादन’ इतके आवडले पोदारांना की रात्री मला फोन आला. ‘‘मी गणेश पोदार बोलत आहे. मी तुला माझ्या शाळेत प्राचार्य म्हणून बोलावतोय. शाळा- ज्युनिअर कॉलेज देतो ताब्यात. ये, निकाल ‘वर’ काढ. बस्. आज आहे त्यापेक्षा तीन हजार अधिक पगार, गाडी, ड्रायव्हर, केबिन.. सारा थाट! ये फक्त.’’

आणि मी ‘पोदार’ची प्राचार्य झाले. माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण. ज्यासाठी मी वाट बघितली होती नि बाप्पाने मला ते अलगद हाती दिले होते. गणेश पोदारांची मी फार लाडकी होते. अतूट विश्वास! एक दिवस आपली विशेष कागदपत्रे ज्या पेटीत आहेत त्याच्या चाव्या त्यांनी माझ्या हाती सोपवल्या. ‘‘जप.’’ श्रीमती सरोज पोदार नि गणेश पोदार यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला पात्र होण्याचा मी अतोनात प्रयत्न केला. शाळेचा निकाल उंचावला. सर खूश होते; पण शिक्षकांना कामाची सवय लागेपर्यंत वेळ गेला. नाराजी सोसली मी त्यांची; पण उंचावलेला निकाल माझ्या निवृत्तीनंतरही त्यांनी जिद्दीने कायम ठेवला. मी कृतज्ञ आहे. त्यांचे चिरंजीव पवन पोदार माझी कष्टाळू जीवनपद्धती बारकाईने बघत होते. निवृत्तीनंतर त्यांनी मला ‘प्रेसिडेंट वूमन कॅपिटल’ हे फार महत्त्वाचे पद बहाल केले. मजवर प्रेम,  अधिकार, स्वातंत्र्य यांचा वर्षांव केला नि मीही ‘पोदार विद्या संकुल’साठी माझी जान ओतली.

२००५. ऑक्टोबर महिना. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला सकाळी नऊला दहा मिनिटांसाठी परिचयपत्रासह भेटायला बोलाविले. कशासाठी? काय हो कल्पना! मी गेले ‘वर्षां’वर.

‘‘भाषाशुद्धीचे तुमचे विविध प्रयोग मी नुकतेच विविध वृत्तपत्रांतून वाचले. मला ते भावले. विश्वकोशाचे अध्यक्षपद एक स्त्रीला मला द्यायचे आहे. काम अडून-पडून आहे. शास्त्रीबुवांचा प्रकल्प झटून काम करून पूर्ण करू शकाल?’’

‘‘विचार करून, माहिती काढून उत्तर दिल्यास चालेल?’’

‘‘अवधी?’’

‘‘आठ दिवस.’’

‘‘दिला.’’

मी तेव्हा ‘बालभारती’चे इयत्ता पाचवीचे पुस्तक करीत होते. श्रीमंत होनराव हे वाईचे चित्रकार मजसोबत होते. विश्वकोशाची त्यांना बारकाईने माहिती होती. त्यांनी मला सांगितली.

मला आठवडय़ाने परत दहा मिनिटे मिळाली.

‘‘सर, तिथली मानव्य विभाग, विज्ञान विभाग यांची मुख्य पदे रिक्त आहेत. प्रमुख संपादक एकटय़ाने काय करणार?’’

‘‘ती मी भरली असे समजा.’’

‘‘मग मी पद घेते. तुमच्या विश्वासास पात्र ठरेन, झटून काम करेन.’’

‘‘गुड.’’

संपली मुलाखत. मग काहीच घडले नाही. माझी नेमणूक झाल्याचे मला वर्तमानपत्रांतूनच समजले अन् इतके दिवस लेखिका, मुख्याध्यापिका, मानव संसाधन विभागाची अध्यक्षा म्हणून मिळालेल्या लौकिकावर टीकास्त्राने काळा बोळा फिरला.

क्रमशः… 

लेखिका – डॉ. विजया वाड 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares