डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ डाऊनसाइझिंग… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

नेमेची येतो मग पावसाळा, या उक्तीप्रमाणे दरवर्षी जाणारी मी, जवळजवळ तीन वर्षांनी अमेरिकेला लेकीकडे गेले. कोरोना संकटामुळे 3वर्षे जाऊ शकले नव्हते. यावेळी बरेच बदल घडलेले दिसले. तिकडे नेहमी गेल्यामुळे,तिकडे कायम राहणाऱ्या,समवयस्क मैत्रिणीही झाल्या होत्या माझ्या.  

जरा स्थिरस्थावर झाल्यावर विचारले, “रमाला करू का फोन? बरी आहे ना ती?” 

 मुलगी म्हणाली, “अग, त्या आता आमच्या शहरात राहत नाहीत.” 

रमा म्हणजे बडे प्रस्थ होते इथले. तिचे यजमान नामांकित भूलतज्ञ होते इथे. मग भाग्याला काय उणे हो? अतिशय आलिशान, लेकसाइड,  भव्यदिव्य १५-१६ खोल्यांचे घर, स्वतःची बोट, मोठा डेक  असे फार सुरेख घर होते रमाचे. माझ्या मुलीशी त्यांची दोस्ती होती. खरेतर ते माझ्या वयाचे, पण गाणे,याकारणाने त्यांची अदितीशी, आणि पर्यायाने माझ्याशीही खूप छान दोस्ती झाली.

माणसांचा खूप लोभ त्यांना. मुलगे दुसऱ्या गावात  स्थायिक झालेले आणि सुना दोघीही अमेरिकन. त्यामुळे एकत्र राहण्याचा प्रश्न संभवत नाही. दोघेही अतिशय रसिक, त्यामुळे इकडे नाटक घेऊन भारतातले लोक आले, की रमाकडेच त्यांचे रहाणे, पाहुणचार, हे ठरलेलेच. 

डॉक्टर रिटायर झाले आणि एवढ्या मोठ्या घरात खूप वर्षे दोघेही राहिले —  माणसे बोलवत, मैफिली जमवत.!! मुले मात्र खूप दूरच्या शहरात नोकऱ्या करत होती. आता संध्याछाया दिसू लागल्या. रमाची दोन्ही गुडघ्याची ऑपरेशन्स  झाली. मुले आली नाहीत ,त्यांना रजा नव्हत्या. दोघांनीच  ते निभावले. हळूहळू इतर तक्रारीही सुरू झाल्या. आता मात्र हे घर विकून टाकून, लहान घर घ्यावे आणि मुलाच्याजवळच घर बघावे, हा निर्णय रमाआणि माधवने घेतला. हा मुलगा त्यातल्या त्यात त्यांच्याजवळ होता–. म्हणजे 2 तास ड्राईव्हवर.

अतिशय दुःखाने रमा-माधवने आपले टोलेजंगी घर विकले, आणि जरा लहान घरात ते  गेले. आपले इतके वर्ष साथ देत राहिलेले शहर, मित्र मंडळ सोडून. आता त्यांना भेटायला जाणे मला शक्य नव्हते .फोनवरच बोललो आम्ही. रमाला अतिशय वाईट वाटत होते. 

मला म्हणाली, “,काय करणार ग?  कोण येणार आमच्या मदतीला सारखे? त्यापेक्षा म्हटले,जवळच्या मुलाच्या घराजवळ घर घ्यावे. त्यालाही बरे पडेल,आणि त्याच्या लहान मुलांनाही आमचा उपयोग होईल. ही अमेरिका आहे बरं. म्हातारपणी असेच डाउन सायझिंग करावे लागते. आपला पसारा आवरून लहान घरात आणि तिकडून मग  old age होम, हाच पर्याय उरतो इकडे.त्यालाही आमची मानसिक तयारी झाली आहे. बघ,जमले तर ये भेटायला,आणि नवीन घर बघायला. निराशा होईल तुझी.हे घर काहीच नाहीये आमच्या पूर्वीच्या घराच्या तुलनेत.” 

रमाने फोन खाली ठेवला. तिचा downsizing शब्द मात्र मनात रुतलाच. मी विचार करू लागले, आपणही आता म्हातारे व्हायला लागलोय, नव्हे झालोच आहोत. मी माझे घर डोळ्यासमोर आणले. एकतर मोठ्ठे  घर आणि  भयंकर हौस !!. निरनिराळे सामान, वस्तू, सुंदर क्रोकरी, बेडशीट्स, कपडे – भांडी जमवायची. —बाप रे. हौसेहौसेने मी जमवलेले  क्रोकरी सेट्स आले डोळ्यासमोर. शिवाय खूप पूर्वी आईने दिलेले म्हणून जपून ठेवलेले ‘स्टीलची १२  ताटे, १२ वाट्या ‘असे सेट्स—माझ्याकडे आता कोण येणार आहेत बारा आणि पंधरा लोक ? हल्ली आम्ही घरी शक्यतो पार्ट्या करतच नाही, आणि इतके लोक तर नसतातच ना. मग बाहेरच जमतो सगळे एखाद्या छानशा हॉटेलमध्ये.

पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पैसा कमी असायचा. बाहेर हॉटेलात जायची पद्धतही नव्हती. सगळेघरी करण्याकडे गृहिणीचा कलअसायचा, हाताशी वेळही भरपूर असायचा. आता काळ किती बदलला, आम्हीही  बदललोच  की. मी जरी अतिशय व्यस्त होते माझ्या व्यवसायात, तरी सगळे घरीच करायची. त्यासाठीही जमवलेली भांडीकुंडी आता कशाला लागणार आहेत ?

मध्यंतरी, बहिणीच्या कोकणातल्या गावात,  रामाच्या देवळात उत्सवअसतो, त्यासाठी देऊन टाकली सगळी ताटे वाट्या भांडी. कामवाल्या वंदनाला दिली धडअसलेली पण मला कंटाळाआला म्हणून नको असलेली बेडशीट्स.  कपाट आवरायला काढले तर नको असलेल्या नावडत्या ड्रेसचे ढीग काम करणाऱ्या सुरेखाच्या मुलीला देऊन टाकले, आणि एक कप्पा रिकामा झाला. हल्ली मी फार  क्वचितच साड्या नेसते. बघितले तर साड्यांची उतरंड लागलेली गोदरेजच्या कपाटात. भावजय साडीच नेसते, तिला म्हटले,घेऊन जा ग तुला हव्या त्या साड्या.—-तरी अजून सगळ्या देऊन टाकायला मन होत नाही ते वेगळे. ”एवढी आध्यत्मिक पातळी गाठली नाहीअजूनआईने,” असे उपहासाने मुली म्हणाल्याच– दुष्ट कुठल्या– असो.

असे करत, बरंच आवरत आणलंय सध्या. आता कसं सुटसुटीत वाटतंय घराला आणि मलासुद्धा. मध्ये एकदा कामवाली म्हणाली, “ताई ब्याग द्याकी एखादी जुनी. कपडे ठेवायला बरी पडेल .”  माझ्याकडच्या असंख्य मोठ्या बॅग्सपैकी एक बॅग तिला आनंदाने दिली. तिच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद मला किती समाधान देऊन गेला म्हणून सांगू.

आता मी परदेशात गेले की तिकडून येताना हावऱ्यासारखी खरेदी करत नाही. नुसते बघते सगळे पण घेत मात्र काही नाही. मन भरून तृप्त झाले माझे आता. पूर्वीसारख्या बॅग्स दाबून भरत नाही. आता नकोच वाटतो हा पसारा आणि हव्यास. मुलगी म्हणाली, ”हे काय? यावेळी काहीच नाही का खरेदी करायची?”   म्हटले, “ वा ग वा. नाही कशी?माझ्या प्रियजनांना भरपूर चॉकलेट्स नेणार,बदाम पिस्ते नेणार तर. आणि माझ्या वंदना, स्वाती,संगीता या घर काम करणाऱ्या माझ्या सहकारी बायकाना कुठे नेलपॉलिश, कुठे छानशी किसणी, कुठे नॉनस्टिक तवा, अशा त्यांना वाटणाऱ्या अपूर्वाईच्या गोष्टीच फक्त नेणार. बाकी लोकांकडेअसते सगळे. त्यांना नाही कसली अपूर्वाई.”  मुलगी हसली आणि म्हणाली, ‘रोज व्हाट्सअपवर येणाऱ्या अध्यात्मिक मेसेजचा परिणाम झालेला दिसतोय आईवर.”  म्हटले, “नाही ग बाई, उलट रमापासून धडा घेतलाय की अमेरिकेसारखे आता  पुण्यात पण आम्ही डाउन सायझिंग करायला शिकले पाहिजे. नकोच तो वस्तूंचा हव्यास, आणि व्याप तितका ताप. यावेळी खरंच येताना दोन्ही बॅग्स अगदी कमी भरल्या वजनाने. आता घरी कोणतीही वस्तू घेताना मनाला दहावेळा विचारीन,की ही खरंच हवीय का. 

रमाकडून शिकलेला हा अनमोल… पसारा आवरण्याचा धडा ,गिरवायला सुरवात केली आहे हे नक्की ! रमाने नाईलाजाने केले डाउनसायझिंग, पण मी मात्रअगदी समाधानानेआणि न कुरकुरता सुरवात केलीय.

 — तर मग मैत्रिणींनो करा सुरवातआवरायला, —आणि घराचे आणि मनाचेही डाउनसायझिंग करायला—

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments