मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूकंप – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

अखेर मोठ्या मेहनतीने मी एमबीबीएस झाले . आई बाबांची सीमा डॉक्टर झाली .यावेळी मात्र मी दादाकडे जायचं ठरवलं. त्या एका घटनेनं आमचं सगळ्यांचं आयुष्य उध्वस्त झालं होतं. तो निघून गेला होता. पण आयुष्यात भली मोठी पोकळी निर्माण करून गेला होता .

दादाकडे आल्यावर मला माहेरी आल्यासारखं वाटलं, पण क्षणभरच! सासरी कुठे गेले होते मी? कधी जाणार पण नव्हते. त्यामुळे तो विचारच झटकून टाकला. दादा चे घर, आई-बाबांनी नेटकेपणाने मांडले होते. आईचे स्वयंपाक घर म्हणजे चकाचक. पण यावेळी मात्र आई सगळे काम नाईलाजाने करते असं मला जाणवलं. सगळी कामं करणं तिला झोपत नव्हतं. खरंच तिला मदतीची गरज आहे हे मला जाणवलं .

खरं तर एव्हानाना दादाचं लग्न व्हायला हवं होतं. आम्ही आमच्या दुःखात इतके बुडालो होतो, की त्याचा विचारच केला नाही. त्याची काय चूक आहे या सगळ्यात? त्यानं का शिक्षा भोगायची ? या विषयावर त्याच्याशी बोलायचं मी ठरवलं, आणि क्षणात मला माझ्या त्या मैत्रिणीची अर्थात त्याच्या बहिणीची, माझ्या न झालेल्या नवऱ्याच्या बहिणीची आठवण झाली. ती लोकं कशी असतील ? त्यांनी हा आघात कसा सहन केला असेल ? त्या सगळ्यांचा तर एकुलता एक आधार मंगल क्षणी अमंगल करून गळून पडला. त्याच्या बहिणीचे लग्न झाले असेल का ? दादालाच काही माहिती आहे का विचारावं. त्याच्यापुढे हा प्रस्ताव आपणच मांडूया .

“अगं, काय बोलते आहेस सीमा? तू इतकी दुःखामध्ये पिचत असताना मी लग्नाचा विचार तरी करू शकेन का ? आणि तिची चौकशी का करतेस तू ? तुझं तुला कमी का दुःख आहे ?” दादा माझ्यावर जरा रागावला.

“अरे दादा, रागावू नको . थोडं शांतपणे घे . मी आता कुठे दुःखात आहे सांग बरं? अरे, आता मी डॉक्टर झालीय . पोस्ट ग्रॅज्युएशनही करणार आहे . माझी ही नवी वाट मला मिळाली की नाही ? तशीच आता तुमच्या आयुष्यातही नवीन वाट शोधूया . तुझ्या मित्रांकडून तिची माहिती काढ बर ! की आता तेही मीच करू? मी पण थोडं दरडावूनच विचारलं .

“सॉरी सॉरी . रागावू नको आपण तिची नक्की चौकशी करू . मी मित्रांना सांगतो . मला तुझं हे म्हणणं पटतय हं थोडं थोडं!”

कधी नाही तो माझा नेम बरोबर लागला होता . त्याच्या बहिणीचे लग्न अजून झालं नव्हतं . कारण त्यांचं घर या दुःखाच्या डोंगरामध्ये पार चेपलं गेलं होतं . ती एम. कॉम. झाली होती, पण दुःखी आई-वडिलांची सेवा करतच दिवस ढकलत होती.

मी आणि दादांनी आई-बाबांना आमच्या विचार पटवून दिला. सुरुवातीला ते अजिबात तयार होत नव्हते . पण अखेर त्यांना पटवण्यात आम्हाला यश आलं .

आता त्याच्या आई-वडिलांना आणि तिला समजावायचं मोठं काम आम्ही करणार आहोत . त्याच्यासाठी सगळ्यांना मुंबईला आणणार आहे . अर्थात हे काम दादाचा दुसराच एक मित्र करणार आहे . मी त्या सगळ्यांची खूप खूप वाट पाहतीय .

मला माहिती आहे की पुन्हा एकदा फार मोठा भूकंप होणार आहे . वादळ उठणार आहे . धुव्वाधार पाऊस कोसळणार आहे . पण … पण कालांतराने ते वादळ शमणार आहे. तो पाऊस कोसळल्यानंतर भूमी शांत होणार आहे . आशेचं बी रुजणार आहे . आनंदाचे कोंब पुन्हा फुटणार आहेत . त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे आणि दादाच्या घरी नंदनवन फुलणार आहे . माझेही कासावीस मन तृप्त होणार आहे . शांत शांत होणार आहे .

 – समाप्त – 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूकंप – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

मनाशी निर्धार करून घर सोडायचे ठरवले. पण आई बाबांना सोडून जाताना पुन्हा आकाश कोसळले. आईच्या डोळ्यातले अश्रू थांबायलाच तयार नव्हते. बाबाही सैरभैर झाले होते. आपल्या लाडक्या लेकीची अशी पाठवणी करायची म्हणजे मोठे संकट होते. मी निर्धाराने माझी बॅग भरली. त्या जरीच्या साड्या, चमचमते ड्रेस, दागिने, सगळे बाजूला सारले आणि फक्त साधे ड्रेस बॅगेत भरले. मला आता कुठल्याही गोष्टीचा मोह नको होता. आयुष्याचा मार्ग मी बदलणार होते. मग कशाला ती झगमग? तो मोह आणि त्या आठवणी.

आत्याकडे जातानाच्या प्रवासात माझ्या मनात अनेक विचार उंचबळत होते. एक मात्र ठाम निर्णय मन देत होतं की पुन्हा स्टॅट नको, मॅथ्स नको त्याची आठवण नको. त्यापेक्षा पुन्हा बारावी सायन्सला ऍडमिशन घ्यायची. बायोलॉजी घेऊन. अगदी मेडिकलला नाही तर निदान नर्सिंग कोर्सला ऍडमिशन मिळवायची आणि लोकांच्या व्याधी दूर करण्यासाठी धडपडायचं. माझ्या दुःखामध्ये मला जसा इतरांनी आधार दिला, तसाच आधार आपण आता इतरांना द्यायचा.

माझा हा विचार आत्याला आणि तिच्या मिस्टरांना एकदम पटला. त्यांच्या मते तसे करणे अवघड होते पण अशक्य नव्हते. त्या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला जड जात होते. हातात एक डिग्री असून पुन्हा माघारी मी फिरत होते. पण आता तसे करायलाच हवे होते. ही निवड आवडीने नाही तर परिस्थितीशी जुळण्यासाठी केली होती.

जीव ओतून मी आता अभ्यासाला लागले. दिवस आणि रात्र एकच. बारावीचा आणि एंट्रन्स परीक्षेचा अभ्यास. पुस्तक एके पुस्तक. नो टीव्ही, नो पिक्चर,  नो गाणी एवढेच काय आई-बाबांनाही भेटायला मी गेले नाही. दादाच मधून मधून येऊन जायचा. माझ्या अभ्यासाचा ध्यास बघून निश्चिंतपणे जायचा. माझी प्रगती ऐकून आई-बाबा ही निश्चिंत झाले.

जीव आणि प्राण ओतून, रात्रीचा दिवस करून मी बारावीचा पुन्हा एकदा अभ्यास केला आणि मला योग्य तेच  फळ मिळाले. एंट्रन्स एक्झॅमलाही माझे छानच स्कोरिंग झाले. त्यामुळे नर्सिंगलाच काय, मला एमबीबीएसलाच ऍडमिशन मिळाली. तिही मुंबईतल्या प्रख्यात कॉलेजमध्ये. तिथून माझ्या आयुष्याला नवीनच वळण लागले. आयुष्यातला अंधार नाहीसा झाला, मला प्रकाशाच्या नवीन मार्ग सापडला.

यावेळी आई-बाबा मला मुंबईला सोडायला आले. त्यांच्या चेहऱ्यावरही मला बऱ्याच वर्षांनी आशेचा किरण दिसून येत होता. त्यांच्या डोळ्यांमध्ये माझे कौतुक ओसंडून वहात होते. पण दादाकडे परत जाताना आईचा बांध पुन्हा फुटला, पुन्हा एकदा गंगा यमुनांनी  मला न्हाऊ घातले. मात्र यावेळी मी माझं रडू आवरलं. तिला धीर दिला, सुट्टी मिळाली की मी दादाकडे नक्की येते अशी तिची समजूत घातली.

पण एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत मी काही दादाकडे गेले नाही. कारण वर वर किती जरी मी सावरल्यासारखं दाखवत असले तरी आतून माझे मन पार कोलमडून गेले होते. आयुष्यातला तो प्रसंग मी विसरू शकत नव्हते. आई-बाबांच्या सहवासात जखमेवरची खपली आपोआप निघत होती. अजून माझे मन दगड काही बनत नव्हते.

क्रमशः – 3

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूकंप – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

तो दिवस उजाडला. घरीच सगळं आवरून आम्ही कार्यालयात जाणार होतो. मामा मामींनी घेतलेली पिवळी जरीची हिरव्या काठाची साडी नेसून मी तयार होते. माझ्याच केसातल्या मोगऱ्याचा सुगंध मला धुंद करत होता. दाग-दागिने घालून नटून थटून बसले होते. दादा, मामा मामी, आत्या काका, त्या घरच्या लोकांना बोलावणं करायला गेले होते. फुलांनी सजवलेल्या गाडीतून ती लोकं कार्यालयात गेली की आम्ही निघणार होतो .

सगळेजण तयारीनिशी सज्ज होते. मी माझ्या मैत्रिणीच्या घोळक्यात बसले होते. दर दोन मिनिटांनी आई-बाबा आत येऊन मला बघून जात होते. माझं रुपडं डोळ्यात साठवून ठेवत होते. न बोलता, न सांगताही मला ते समजत होतं.

अन अचानक बाहेर चार-पाच मोटरसायकली, दोन-तीन गाड्या येऊन थडकल्या. बाहेर काहीतरी गडबड माजली आणि घराचा नूरच पालटून गेला. बाहेरचा गलका वाढायला लागला. हा आत्ताचा आवाज सुखद नव्हता आनंदाचा नव्हता. त्याचे रूपांतर एकदम जोरजोरात रडण्यात झाले. मला काहीच समजेना. मैत्रिणी ही घाबरून गेल्या. काय झालं? कोणालाच काही समजेना.

माझ्या मावशीचा, काकूंचा, आत्याचा जोर जोरात रडण्याचा आवाज यायला लागला. मी सासरी जाणार, त्यासाठी अशा का रडताहेत त्या सगळ्या? मला काहीच समजेना. कुणाला काय झालं? एवढ्यात माझ्या दादाला धरून दोन तीन मित्र आत आले. दादाचा काळवंडलेला रडवेला चेहरा मला पहावे ना …” दादा s काय ?? ..” माझ्या तोंडातून शब्द फुटेना. दादांनी भिंतीवर लटकणाऱ्या फुलांच्या माळा जोरात ओढल्या आणि सि s मे s म्हणून टाहो फोडला. तेवढ्यात आई बाबा, काका सगळे सगळे माझ्या भोवती गोळा झाले. माझ्या मैत्रिणींना काय करावे समजेना, घाबरून सगळ्या दुसऱ्या खोलीत पळाल्या.

अजूनही मला नक्की कोणाला काय झालय, तेच समजत नव्हतं. माझ्या भोवती आई बाबा दादा हमसून हमसून रडत होते. काय झाले? का रडत आहेत  सगळे? माझ्या पोटात गोळा आला, छाती मध्ये जोराची कळ यायला लागली. ” सिमा s s” म्हणून त्यांनी मला मिठीत घेतलं, तेवढ्यात कुणीतरी माझ्या कपाळावरची चमचमती टिकलीच काढून टाकली. कोणीतरी एकीनं माझे हात हातात घेऊन माझा चुडा बुक्यानी फोडायला सुरुवात केली.

कार्यालयात जायचं सोडून असं का करताय त्या? मला समजेना. तेवढ्यात मला पोटाशी घेत आई जोरात रडत म्हणाली, “सीमे s कसलं ग नशीब घेऊन आलीस? अक्षता पडायच्या आधी त्याला हार्ट अटॅक आला. सीमे ग संपले सारे ss काय झालं ग माझ्या पोरीचं ! काय करू गं ?..” म्हणून आईने हंबरडा फोडला.

आईच्या त्या तशा बोलण्याचा, रडण्याचा संदर्भ मला समजला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला काही समजेनासे झाले आणि मी धाडदिशी भोवळ येऊन खाली कोसळले.

तब्बल चार दिवस मी बेशुद्ध होते. थोडी शुद्ध आली तर आजूबाजूला फक्त सन्नाटा आणि हुंदके …. हुंदके आणि सन्नाटा. चार दिवसांनी डोळे उघडले तर आत्या आणि तिची डॉक्टर मैत्रीण माझ्याजवळ होत्या. आत्या माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्या डॉक्टर बाईनी मला तपासले आणि कुणाला तरी माझ्यासाठी कॉफी आणायला सांगितली. मी मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले, समोरचे अंधुक अंधुक दिसत होते. समोर बाबा डोक्याला दोन्ही हात लावून बसले होते. आई गुडघ्यात डोकं खुपसून स्फुंदत होती. तिला धरून मावशी बसली होती. मी माझ्या कोरड्या ठणठणीत पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली. तोंड कडू झाड झाले होते. तोंडातून शब्दच फुटत नव्हता. ” दादा s s” कशी बशी मी हाक मारली.

आता आत्याचे डोळेही वहायला लागले. दादाला त्याच्या प्रिय मित्राच्या दिवसांसाठी जावे लागले होते. त्याचा मित्र आणि माझे सर्वस्व ….चार दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवून मला पुन्हा गरगरायला लागले. माझे पांढरे डोळे बघून त्या डॉक्टरीण बाईंनी माझ्या दंडात सुई खूपसली. सलग दोन महिने तसा प्रकार सुरू होता. मी आजारी, दुखणेकरी, आई अखंड रडत आणि बाबा डोकं गच्च धरून. दादाची नोकरी ही नवीन असल्यामुळे त्याला फार दिवस घरी राहता येईना. आत्या, मावशी, काका काकू आलटून पालटून येऊन आमच्या जवळ रहात होत्या.

धो धो पाऊस पडून, पूर यावा, तसं आमचं घर अखंड रडत होतं. कुणाचं रडणं थांबत नव्हतं. सगळ्यांना इतका जबरदस्त शॉक बसला होता की कोणीच कोणाला सावरू शकत नव्हतं. इतर नातेवाईक, मैत्रिणींच्या आया सगळे सारखे येत होते. माझ्याशी कोणी डायरेक्ट बोलत नसले, तरी काही ना काही माझ्या कानावर येत होते.

अक्षता पडून जरी माझे लग्न झाले नसले, तरी लग्नाची हळद लागली होती. त्यामुळे माझे पुन्हा लग्न होणे अशक्य होते. झालंच तर एखाद्या विधुराशी … म्हणजे ज्याची पहिली बायको मेली आहे, ज्याला एखाद दुसरं मूल आहे. ते तसलं बोलणं, ती कुजबुज, सगळ्यांचे निश्वास अन रडणे ऐकून मी फार भेदरून गेले होते. मलाही त्याच्यासारखा हार्ट अटॅक का येत नाही असेच वाटत होते.

अक्षरशः सहा महिने असे दुःखात गेले. सहा महिन्यांनी आत्या, तिचे डॉक्टर मिस्टर आणि माझा दादा ठरवून आमच्याकडे आले. आत्याच्या मिस्टरांनी आई-बाबांना आणि मला खूप समजावलं. या दुर्दैवाच्या फेऱ्यातून  मी बाहेर पडायलाच पाहिजे असं त्यांनी जरा ठणकवलच.

माझं बीएससी झालं होतं. आता घरी नुसतं रडत न बसता, पुढच्या वर्षीच्या एम एस सी च्या परीक्षेसाठी मी तयारी करावी असं त्यांचं मत होतं. त्या अभ्यासासाठी ते मला त्यांच्याकडे घेऊन यायला तयार होते. आई-बाबांनीही गाव सोडून दादा जिथे नोकरी करतोय, तिकडे थोडे महिने तरी जावं असं त्यांनी पटवलं. सगळ्यांनाच मोठा बदल हवा होता.

मला त्यांचं एक म्हणणं पटलं आणि आवडलं. ते म्हणजे मी शिकण्यामध्ये माझं मन गुंतवलं पाहिजे. त्यांनी लग्नाबद्दल काही उच्चार केला नाही. त्यामुळेच खरं तर मला त्यांच्याबरोबर जावसं वाटलं. मलाही थोडा मोकळा श्वास घ्यावा असा वाटायला लागलं होतं. आमच्या या गावामध्ये मी घराच्या बाहेरही पडू शकत नव्हते. लोकांच्या त्या नजरा, ती कुजबुज मला नकोशी झाली होती. आई-बाबांना सोडून राहायचं जीवावर आलं होतं. पण त्यांच्यासाठी सुद्धा तेच आवश्यक होतं.. मी समोर दिसले की त्यांना परत परत ते दारूण दुःख समोर येणार होतं. त्यापेक्षा काही दिवस लांब राहूनच दुःखाची तीव्रता कमी होऊ शकणार होती.

त्या दिवसापासून पुढच्या शिक्षणाबद्दल मी विचार करायला लागले होते. एम एस सी च्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करायचा, म्हणजे परत स्टॅट आले. मॅथ्स आले . . . . पुनः त्याची आठवण .. छे .. छे .. छे . .. ते तर आता मला नको होते. तो कप्पा, तो मार्ग पूर्णपणे मला बंद करायचा होता. आत्याच्या घरी राहायला जायचे म्हणजे सुद्धा सोपे नव्हते. त्यांच्या घराला लागूनच त्यांचे हॉस्पिटल होते. सतत माणसांचा राबता होता. अशा ठिकाणी जुळवून घेणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण आता पक्के ठरवले होते, जुने पाश तोडून टाकायचे होते.

क्रमशः – 2

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूकंप – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

आज कितीतरी वर्षांनी, मला कितीतरी जण भेटणार आहेत. किती म्हणजे किती वर्ष झाली बरं?  दहा-बारा वर्ष तरी अगदी सहज. हो, सहजच. एमबीबीएस ची चार वर्ष, त्यानंतर एमडी साठी एंट्रन्स ची तयारी करून ती तीन वर्ष आणि नंतर या हॉस्पिटल मधली चार-पाच वर्ष. खरंच ही सगळी वर्षं आपण फक्त काम आणि काम अन काम, अभ्यास एके अभ्यास करत राहिलो.  बाकी कशाचाही विचार केला नाही. केला नाही, म्हणून तर इथपर्यंत येऊन पोहोचलो ना!

मी अशी डॉक्टर बनू शकेन याचा विचार काय, स्वप्नही पाहिले नव्हते. त्या वयात असे स्वप्न आणि मी?  शक्यच नव्हते. कारण माझी स्वप्नं टोटली वेगळी अन छान होती ना! पंख फुटून आकाशात भरारी मारण्याची होती ती स्वप्नं! सुखद संसाराची होती ती स्वप्नं! त्या माझ्या स्वप्नात खराखुरा राजकुमार होता. नुसता स्वप्नात नव्हता तर मला खरंच भेटला होता. त्याच्यामुळेच तर मी मोरपंखी स्वप्नांमध्ये बुडून गेले होते.

किती सोपे, सरळ, सुखद होते आयुष्य! मी संख्याशास्त्र घेऊन बीएससी झाले आणि माझ्या स्वप्नांचा मार्ग आणखीन सुकर झाला. कारण त्याच वर्षी माझ्या दादाबरोबर तोही इंजिनियर झाला. गलेलठ्ठ पगाराचा जॉबही त्याला मिळाला. दादामुळे त्याची ओळख होतीच,  आता तर काय दोन्ही घरच्या संमतीने आमचं लग्न ही पक्क झालं. एकमेकांच्या घरची ओळख होती, माहिती होती, सगळ नक्की झालं होतं. त्यामुळे दादा जॉईन झाल्यावरही आम्ही दोघं भेटत होतो. फिरत होतो. स्वप्न रंगवत होतो.

तो, त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच आमच्या लग्नाची तारीख ठरवली. दोन्ही घरांमध्ये आनंद नुसता ओसंडून वहात होता. आई-बाबांना कशाची म्हणजे कशाची काळजी नव्हती. मलाही फार नवखं, फार परकं, असं काही नव्हतच. त्याची लहान बहिण, तिही माझी मैत्रिण झाली होती.

दोन्हीकडे लग्नाच्या तयारीला उधाण आलं होतं. दोघांकडची घरं रंगवून झाली, पत्रिका छापल्या, वाटूनही झाल्या. पै पाहुणे यायला सुरुवात झाली होती. माझ्या साड्या खरेदी, दागिने खरेदी, नवनवीन ड्रेस, पर्सेस बॅग… सगळं नवीन कोरं. दादाची नवीनच नोकरी असल्यामुळे तो अगदी आदल्याच दिवशी आला. घर पाहुण्यांनी भरून वाहत होतं. चिवडा लाडू घरीच बनवून त्याच्या पिशव्या भरून तयार होत्या. झाडून सगळ्या पै – पाहुण्यांना, मैत्रिणींना, आईच्या माहेरच्यांना भरभक्कम आहेर घेऊन ठेवला होता. गप्पा, हास्यविनोद, चिडवा चिडवी याला उधाण आलं होतं.

आमच्या घराला रोषणाई केली होती. दारात मोठा मंडप घातला होता, तिथं खुर्च्या ठेवून गप्पाटप्पा, चहापाणी मजे-मजेत सुरू होतं. हॉलमध्ये, स्वयंपाक घरात फुलांच्या माळा सोडल्या होत्या. आनंदाला कसं भरतं आलं होतं.

आमच्या घरच्या रिवाजाप्रमाणे आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी मला चिडवून चिडवून बेजार केलं होतं. मेंदीनं हात भरून रंगले होते. दोन्ही हातांमध्ये हिरवा कंच चुडा खुलून दिसत होता. माझं मलाच आरशात बघताना लाजायला होत होतं. काहीतरी वेगळीच संवेदना सर्वांग फुलवून टाकत होती. त्यात मैत्रिणींचं चिडवणं, सगळं कसं हवं हवंसं, सुखावून टाकणार होतं. आई-बाबा, मैत्रिणी सगळ्यांना सोडून जायची कल्पना डोळ्यात पाणी आणत होती, पण त्याचवेळी त्याची आठवण गुदगुल्या करत होती. त्याची नजर त्याच्याकडे येण्यासाठी खुणावत होती..

क्रमशः – 1

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पिंक रिबन – संग्रहातून – अविनाश वाघमारे ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

?जीवनरंग ?

☆ पिंक रिबन – संग्रहातून – अविनाश वाघमारे ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर पिंक रिबन चा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are, makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे._

प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला._

”वा, माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.” पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ”तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही पिंक रिबन लावा.”_

एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्‍या एका तरुणाच्या शर्टावर ”थँक यू, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही पिंक रिबन लावतो” असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका ऑफिसमध्ये ज्युनियर कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल नंबर मिळाला होता.

विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ”आम्ही शाळेसाठी एक प्रोजेक्ट करतो आहोत. तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?”_

कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्‍या दिवशी त्याने आपल्या बॉसपाशी जाऊन ”थँक यू You made a difference in my life ” असे म्हणत पिंक रिबनचा बो लावला. बॉस अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्‍याने बो लावल्यावर बॉसच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ”माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. थॅक्यू.”_

कर्मचार्‍याने त्याला विचारले, ”ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतले प्रोजेक्ट आहे. आयुष्यात बदल करणार्‍या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा पिंक रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?” बॉस एकदम म्हणाला, ”हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?” कर्मचार्‍याने आपल्याकडचा उरलेला बो बॉसला दिला._

बॉस घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर पिंक रिबनचा बो लावत तो म्हणाला, ”मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Who you are, makes a difference in my life “_

मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ”डॅड , मला वाटायचे की तुला मी अजिबात आवडत नाही. मी तुला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतो._

ही बघ, मी तुला व आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस डॅड._

”बॉसने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते आणि बापालाही मुलगा मिळाला होता._

आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते._

मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात._

आईला ते जन्मजात कसब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते.

पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात,_

पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष कामात मग्न रहातात._

म्हणतात की, Any man can be a Father but it takes someone special to be a Dad._

कोणीही पुरुष बाप सहज बनू शकतो, पण बाबा होणे काहींनाच जमते._

चांगला पालक होणे ही प्रवृत्ती आहे. असिधारा व्रत आहे. त्यासाठी शिक्षण, जात, धर्म यांपैकी कशाचीही जरूर नसते. फक्त इच्छा असावी लागते…_

सदर पोस्ट आवडल्यास ही पिंक रिबन इतरांनाही पाठवा कदाचित त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलले असेल…._

“जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही .”_

🍂🍃🍃🍂

” पिंक रिबन ” 🎀

अप्रतिम आयुष्य बिघडवायला वेळ लागत नाही पण घडवायला आत्मविश्वास लागतो मन मोठं असावं लागतं._

संग्रहातून ✍ – अविनाश वाघमारे

FORWARDED AS RECEIVED

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मी पण लहानच आहे नं?… भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ मी पण लहानच आहे नं?… भाग (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

आणखी एक गोष्ट आहे. मी लहान होतो, तेव्हा पप्पा माझ्यावर खूप प्रेम करायचे. सुट्टीच्या दिवशी तर मी किती तरी वेळ पाप्पांच्या पाठीवर, पोटावर खेळत राह्यचो. पप्पांचं पोट उलटी थाळी ठेवल्याप्रमाणे काहीसं फुगलेलं होतं. ते पलंगावर उताणं झोपून मला पोटावर बसवत आणि जोराजोरात श्वास घेऊन सोडत, तेव्हा मला वाटायचं मी उंटावरून फिरतोय. मम्मी पण सुट्टीच्या दिवशी तेल लावून अंगाला खूप मालीश करून आंघोळ घालायची. पण आज –काल या सगळ्या गोष्टींवर विनयने कब्जा केलाय. परवाच घडलेली गोष्ट सांगितली, तर त्यावरून आपण अंदाज बंधू शकाल. तर परवा काय झालं की मी मम्मीला म्हंटलं, ‘मम्मी माझी नखं काप ना1’ मम्मी म्हणाली, ‘पप्पांच्या शेव्हिंग बॉक्समध्ये नेलकटर आहे. ते काढून तू आपापलीच काढ ना! आता तू मोठा झालायस!’

‘हो, आणखी माहीत आहे का? आज-काल आमच्या घरी कुणी आलं की विनयबद्दलच बोलणं होतं. त्याने केव्हा कोणता खट्याळपणा केला, कुणाला काय सांगितलं, कधी काय खायला मागितलं, कधी काय खाल्लं नाही, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही… इ. इ. आधी कमीत कमी माझ्या अभ्यासाबद्दल तरी बोललं जायचं, मला कुणाच्या पुढे, पोएम म्हणायला किंवा स्टोरी सांगायला सांगितलं जायचं, पण आज-काल माझ्यासाठी कुणाकडे वेळच नसतो. आता कालचीच गोष्ट. अनिकेत अंकल आणि आंटी आले होते. त्यांची बन्नी प्री-केजीमध्ये होती. आत्ता के. जी.त गेलीय. माझ्याच शाळेत आहे. तिच्या डिव्हिजनमध्ये ती सेकंड आली. अनिकेत अंकल आणि आंटीने बन्नीबद्दल किती सांगितलं, तिची टीचर हे म्हणत होती… ते म्हणत होती. मी सेकंड क्लासमध्ये, ए. बी, सी, डी. चारी डिव्हिजनमध्ये फर्स्ट आलो होतो. मी मम्मी-पप्पांकडे बघत होतो की ते माझ्याबद्दल अनिकेत अंकल आणि आंटीशी बोलले की मी माझी रिझल्ट –शीट काढून त्यांना दाखवेन. पण काही नाही. शेवटी मी मम्मीच्या कानात सांगायला तिच्याजवळ गेलो, तर तिने माझं म्हणणं न ऐकताच मला म्हणाली, ‘आम्ही मोठी माणसं  बोलतोय ना! जरा बाहेर जाऊन खेळ बरं!’ अनिकेत अंकल – आंटी खूप चांगले आहेत. के. जी. वनमध्ये माझा रिझल्ट पाहून त्यांनी मला  शंभर रुपये दिले होते.

आज-काल माझी केवळ एकच ड्यूटी असते. आमच्या घरी कुणी आलं की उठून त्यांना नमस्ते करायचं आणि कधी कधी त्यांना पाणी आणून द्यायचं त्यानंतर सारं घर, सारं वातावरण विनयचं होऊन जातं.

आज-काल मम्मी-पप्पा नेहमी विचारतात, मी अलीकडे गप्प गप्प का असतो? काय सांगू मी त्यांना? कितीदा वाटलं, ओरडून ओरडून या सगळ्या गोष्टी, ज्या आपल्याला सांगितल्या, त्या मम्मी-पप्पांना सांगाव्या. पण मला माहीत आहे, ते काय म्हणणार? ते हेच म्हणणार, ‘अनुनय बाळा, तू आता मोठा झालाहेस. तू समजूतदार व्हायला हवंस!’ म्हणून विचार केला की आपल्यालाच सांगावं. मानलं की विनय आल्यानंतर मी मोठा झालो, पण तरीही शेवटी मी पण लहानच आहे नं?

– समाप्त –

मूळ हिंदी  कथा – ‘ मैं भी तो छोटा ही हूँ न  ’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मी पण लहानच आहे नं?… भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ मी पण लहानच आहे नं?… भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

नमस्ते. माझं नाव अनुनय. मी सात वर्षाचा आहे. आपल्याकडे जर थोडा वेळ असेल, तर मी आपल्याला काही सांगू इच्छितो. आधी मी एकटा होतो. अर्थात माझे मम्मी-पप्पा आणि मी. बस! पप्पा ऑफिसमध्ये जायचे. मम्मीला घरकामातून फुरसत नसायची. मग मम्मी मला शेजारी सोडून यायची. त्यावेळी शेजारी एक मोठं कुटुंब राह्यचं. माझ्यापेक्षा थोडी कमी अधीक वयाची तीन मुले तिथे होती आणि मी चौथा. आम्ही खूप वेळेपर्यंत खेळत राह्यचो. पण जेव्हा त्यांना माझ्याशी खेळायचं नसेल, तेव्हा ती मला घरी जायला सांगायची. आशा वेळी माझ्या मनात यायचं, माझ्या घरीच जर मला लहान भाऊ किंवा बहीण असती, तर मला हवं तेव्हा, हवं तितका वेळ, त्याच्याशी खेळत राहिलो असतो. ही गोष्ट मी किती तरी वेळा मम्मी आणि पप्पांना सांगितली आणि एक दिवस ती आनंदाची बातमी मला मिळालीच. मम्मी म्हणाली, ‘तुझ्याबरोबर खेळणाराही कुणी येणार आहे.’ मी उसळून मम्मीला विचारलं, ’कोण येणार? भाऊ की बहीण?’ मम्मी म्हणाली, ’कोणीही येऊ शकेल.’ आणि एक दिवस विनय आला. एकदम छोsssटा-सा, क्यूट विनय. विनयला पाहून मी एवढा खूश झालो, एवढा खूश झालो की आपल्याला काय सांगू? शाळेतून आलो की दप्तर एका बाजूला टाकून प्रथम विनयकडे जायचो. कधी तो झोपलेला असेल, तर तो जागा होईपर्यंत मी बेचैन असायचो.

दिवसेंदिवस विनय मोठा होऊ लागला. खोड्या करू लागला. त्याने जेव्हापासून चालायला सुरुवात केली, तेव्हापासून त्याच्या खोड्या आणखीनच वाढल्या. जेव्हा मी मम्मी-पप्पांशी याबाबत बोलतो, तेव्हा ते म्हणतात, ‘लहान मुलं असंच करतात’, आणि पुढे सांगतात, ‘जेव्हा तू लहान होतास, तेव्हा तूही असंच करायचास.’ मी सगळं ऐकत, सहन करत राहिलो पण एक दिवस मला विनयमुळे मम्मी-पप्पांकडून खूप ओरडून घ्यावं लागलं. त्याचं असं झालं की मला सुट्टी होती. मी आणि विनयने बरोबरच दूध घेतलं. मम्मीने सांगितलं होतं, की दूध पिऊन झाल्यावर दुधाचा मग नेहमीप्रमाणे बेसीनमध्ये ठेव. मी माझं दूध पिऊन झाल्यावर माझा मग सेंटर टेबलवर ठेवला. समोर टी.व्ही.वर मिकी-माऊस चालू होतं. विनयने दूध संपवलं आणि माझा मगही घेऊन किचनकडे पळत निघाला.  माझं लक्ष जाताच, मीही अरे… अरे… करत त्याच्यामागे पळालो. वाटेत कुठे तरी थोडंसं पाणी सांडलं होतं. त्याचा पाय घसरला आणि तो धडमाडीशी फरशीवर आपटला. त्याचे समोरचे दात ओठात घुसले. थोडंसं रक्तही आलं. तो जोरजोरात रडू लागला. त्याचं रडू पाहून किंवा कदाचित् त्याच्या ओठातून आलेलं रक्त पाहून मलाही रडू आलं. दोन्ही मग फरशीवर पडून फुटले होते. पप्पांनी मुद्दाम आमच्या दोघांच्या चेहर्यागचे फोटो-प्रिंट असलेले मग आमच्यासाठी तयार करून घेतले होते. ते फुटल्यावर पप्पा आणि मम्मी दोघेही मलाच ओरडले. मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की विनयला दोन मग सांभाळता येणार नाहीत, पाडेल, म्हणून मी त्याला थांबवू इच्छित होतो. मी काही त्याला पकडणार किंवा पाडणार नव्हतो. पण दोघेही म्हणाले, मी मोठा आहे, त्यामुळे मीच लक्ष दिलं पाहिजे.

यानंतर माझ्यावर ओरडा खाण्याची वेळ वारंवार येऊ लागली. विनय चुका करायचा आणि ओरडा मला खावा लागायचा. इथपर्यंत ठीक होतं पण पुढे पुढे माझा त्रास वाढतच गेला. पप्पा आम्हा दोघांना खेळणी घेण्यासाठी दुकानात घेऊन जायचे. मी जाणून बुजून खेळणं पसंत करायची संधी विनयला आधी देत होतो. पण घरी गेल्यावर विनयला माझंच खेळणं हवं असायचं. त्याने पसंत केलेलं नाही. पप्पा म्हणतात, ‘मी मोठा आहे नं म्हणून मलाच समजुतदारपणे वागायला हवं. म्हणजे मी विनयला माझं खेळणं नाही दिलं, तर मी समजूतदार नाही. एकीकडे ते मला आपल्या हक्कासाठी लढणार्याा  खरोटीची गोष्ट सांगतात आणि दुसरीकडे आपला हक्क सोडून समजूतदारपणा दाखवायला सांगतात. यामुळे मी अतिशय कन्फ्युज होतो. मागच्या वेळी तर हद्दच झाली. विनयचं असलं वागणं बघून मी विनयने जसा पसंत केला होता, तशाच रंगाचा गॅसचा फुगा पसंत केला. घरी आल्यावर विनयने आपला फुगा पप्पांच्या लॅपटॉपवर ठेवला. आणि फ्रीजमधील पाण्याची बॉटल आणायला आत गेला. त्याचा फुगा फुटला. तो पळत बाहेर आला आणि माझा फुगा आपल्या हातात घेत म्हणाला, ’हेsss दादाचा फुगा फुटला. माझा फुगा नाही फुटला.’  माझ्या हातात विनयच्या फुटलेल्या फुग्याच्या चिंध्या पाहून मम्मी आणि पप्पांना वाटलं, माझाच फुगा फुटला. आणि माझा फुगा हातात घेऊन विनय अंगणात खेळायला पळालासुद्धा. माझ्या डोळ्यातील पाणी पाहून पप्पा पुन्हा समजावू लागले, ‘तू मोठा आहेस ना…’ 

आता माझ्यासाठी नवीन खेळणं खरेदी करण्यात मला काही रुची राहिली नाही. कधी कधी पप्पा खूप आग्रह करतात, म्हणजे माझा वाढदिवस असला किंवा आम्ही जत्रेला गेलो की ते आग्रह धरतात. पण मी मनातल्या मनात हे म्हणत राहतो की हे माझ्यासाठी नाही विनयसाठी आहे कारण विनयपाशी किती का खेळणी असेनात, त्याला माझ्या हातात जे खेळणं असेल, तेच हवं असतं आणि मम्मी – पप्पांना सांगायला गेलं की ते म्हणतात, ‘तू मोठा आहेस नं, तूच समजूतदारपणा दाखवायला हवास.’

आता यासाठीही मी मनाची तयारी केली. परंतु आज-काल एक आणखीनच अडचण उभी राहिलीय. मी माझी खेळणी नीट संभाळून ठेवली होती. अगदी सगळीच्या सगळी. आता मी ती काढून खेळतो. पण आज-काल विनय आपली खेळणी बाजूला ठेवून माझ्या खेळण्यांवर जसा काही तुटून पडतो. नीट चांगलं खेळतही नाही. समजावायला गेलो, तर आपटून आपटून तोडून टाकतो. आपला विश्वास बसणार नाही पण गेल्या काही दिवसात त्याने माझी आठ – दहा खेळणी मोडून तोडून टाकलीत.

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा – ‘ मैं भी तो छोटा ही हूँ न  ’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्तित्व… सौ. आशा पाटील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे☆

? जीवनरंग ?

☆  अस्तित्व… सौ. आशा पाटील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆ 

काल सकाळपासून सारखं गरगरल्यासारखंच वाटत होतं. दररोज पहाटे साडेचार-पाचला उठणारी मी, आज साडेसहा वाजले तरी अंथरुणातून हलले नव्हते. नवीनला त्याच्या मोबाईलवर गजर झाल्याने जाग आली. तो उठल्यानंतर त्याला मी उठले नाही याचे प्रथम आश्चर्य वाटले. पण कदाचित रात्री लवकर झोप लागली नसेल म्हणून…

थोडावेळ ऑफिसचं काम करु असा विचार करत त्याने काम सुरू केले. त्या कामात त्याचा बराच वेळ गेला. काम थोडं राहिलं होतं पण सहज त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो उडालाच. 

सात वाजले होते. राजूची व्हॅन साडेसातपर्यंत येईल. त्याला उठवून तयार करायला तर हवेच. पण सोबत त्याचा डबा होणंही तितकच महत्वाचं. आज त्याच्याही ऑफिसमध्ये महत्वाच्या विषयावर मिटिंग असल्यामुळे तोही आठ- सव्वाआठला घरातून निघणार होता. नवीनच्या आई-बाबांचा नाष्टाही आठ- साडेआठला होई.

त्याने झटकन मला जोरजोरात हलवत उठवले आणि तो लॅपटॉपवर ऑफिसचे काम करायला बसला. मी कशीबशी धडपडत उठले आणि  राजूला उठवले. तो दररोज उठण्यापासून ते व्हॅनमध्ये बसून शाळेला जाईपर्यंत त्रास  देतच असे.

एवढयात सासूबाईंचा आवाज माझ्या कानी पडलाच.— “आज स्वयंपाकघर अजूनही थंडच कसे काय? मालकिण बाईंनी संप पुकारला की काय? 

“राजूही ” उशिर झाला शाळेला की बाई रागावतात ” म्हणून चिडचिड करू लागला. 

मला आता किती पळू आणि किती नको असं झालं होतं. पण त्यापूर्वी आपल्याला कुणीतरी मायेनं कपाळावर हात फिरवत, गरमागरम चहाचा वाफाळता कप आयता दिला तर… ‘ शरयू, काय होतंय तुला. त्रास होतोय का? ‘ असं विचारलं तर ताप कमी नाही होणार पण मानसिक बळ मिळून कामाचा उत्साह वाढेल.

गेल्या चार दिवसापासून जरा अंग दुखतच होते. कालपासून अंगावर काटे उभारत होते. मध्येच शहारल्यासारखे वाटत होते. मी घरात सांगावं असा विचार केला पण सांगून तरी उपयोग काय? शेवटी काम हे मलाच करावे लागणार होते. 

मी स्वतःच मेडिकलमधून तापावरची गोळी घेतली. पण ते तेवढ्यापुरतंच, कारण आज सकाळी उठल्यावर पुन्हा अंगात ताप असल्यासारखे वाटत होते. कणकणही जाणवत होती. 

मी तसे नवीनला सांगितलं. पण त्याने ऐकून अगदी सहजतेने घेतलं. “अगं असं निवांत रहाण्यापेक्षा तू कालच दवाखान्यात दाखवायचं नाही का?” म्हणून तर ओरडलाच पण सोबत “आता या सगळ्यांच्या जेवणाचं काय? ” म्हणूनही नाराज झाला.     

राजूही कावळ्यासारखी आंघोळ उरकून आला. ” आज माझ्या शाळेत मेथीचे पराठे आणायला सांगितले ” म्हणून हट्ट धरून बसला. तसं तर ही गोष्ट त्याने कालच सांगायला हवी होती. मला ताप असल्याने मी त्याच्या अभ्यासाची, उपक्रमाची चौकशी केली नाही. 

तसं तर मला त्याच्या शाळेत पालक मिटिंगसाठी जायचंच होतं. पण ही मिटिंग शाळा सुटल्यानंतर अर्ध्या तासाने होती. म्हणून तर मुलांची शाळा एक-दीड तास आधीच सुटणार होती. पण डबा झाला नाही म्हणजे जेवणाच्या सुट्टीपूर्वी मलाच डबा द्यायला जावे लागणार होतं. 

मी कसंबस माझं उरकलं आणि झटपट स्वयंपाक सुरु केला. आज कामाशी गाठ घालणं महत्वाचंच होतं. नाष्टा आणि साग्रसंगीत स्वयंपाक करायला वेळच नव्हता. 

जेवणाचे केलेले पदार्थ पाहून सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला अवघडल्यासारखं झालं. त्यांची नजर जणू मला भेदून आरपार जाईल असं वाटत होतं. तरीही त्या बडबडल्याच, “आमच्या वेळी असे नव्हते बाई, आजकालच्या पोरींना त्रास म्हणून नको. सगळं हाताशी आहे यांच्या. तरीही कामात उरक म्हणून नाही, सगळ्या कामाला हाताशी यंत्र असून सुद्धा कशानी दुखणं येतं कुणाला माहित.”

खरंतर मला काय झालं आहे. हे कुणीही जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. कमीत कमी अंगाला हात लावून ‘ताप आलाय का?’ किंवा ‘काय होतंय’ म्हणून चौकशी तरी करावी, एवढी साधी अपेक्षा माझी. 

मी सगळ्यांसाठी जमेल आणि शक्य असेल तितकं करत रहाते. सासू-सासऱ्यांची आजारपणं, येणारे जाणारे, पै पाहुणे आणि लेकराचं आजारपण, वेगवेगळे क्लास, एवढं सारं पाहायचं म्हणजे खूपच काम. पण तसं घरातल्यांना वाटतच नव्हते. 

यांची आत्येबहीण कंपनीत नोकरीला आहे. काय तिचा थाट पहायचा. धुणं, भांडी, फरशी, चपात्या, सर्व कामासाठी बाई होती. काही म्हणलं तर… ‘ बरोबरच आहे तिचं. ती पगार मिळवते ना ! मग तिला कामाला बाई ठेवावीच लागणार. बिचारी किती धावपळ करते.’ 

घरामध्ये येणारी जाणारी माणसं ही तिच्याकडे जास्त वेळ थांबत नसत. थांबली तरी आपला तिला त्रास होवू नये याची काळजी घेत. तिच्या कामात मदत करत. तिचं भरभरुन कौतुक करत.   

आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती. ‘ काय काम असतं घरात बसून? दीड-दोन तासात सर्व काम उरकले की झालं. दिवसभर आरामच आराम.’ पण घरात बसून जी काम करते त्याचा मोल भाव केला तर?

आज मीही ठरवलंच. खूप काही नाही. पण मीही स्वतःसाठी जगणार आहे. या महिन्यापासून घरात बसून गृहोद्योग सुरू करणार, पण त्यापूर्वी कुणी जरी नाही विचारले तरी स्वतःसाठी दवाखान्यात जाऊन येणार. पुर्ण आराम करणार. ‘आज संध्याकाळ आणि उद्या सकाळपर्यंत स्वयंपाक घर बंद ‘ अशी घोषणा करणार. 

घरात बसणारी असो किंवा बाहेर जाऊन काम करणारी असो.्, शेवटी ती गृहिणीच असते. बाहेर पडणारी स्त्री काही मदत न स्वीकारता काम करतेही, पण त्यामुळे ती थकून जाते. उलट घरात असणारी स्त्री ‘ सर्व कामं मीच करणार ‘ या अट्टाहासाने ती थकून जाते.

शेवटी काय? कुठेतरी स्व अस्तित्वाची जाणीव महत्वाची. आपलं मूल्य आपणच ठेवायला हवं ना ! सर्व क्षेत्र व्यापणाऱ्या स्त्रीला पाठिंबा देणारी प्रथम स्त्रीच असते.

लेखिका :  सौ. आशा पाटील, पंढरपूर.

मो. 9422433686

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुरुदक्षिणा भाग २ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ गुरुदक्षिणा भाग २ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

(असे जर मला तू वचन देत असशील तरच मी तुला जे काही घडले ते सगळे सांगेन.”) इथून पुढे —–

अनुपने त्यांना तसे वचन दिले आणि पाटीलसरांनी पुढे बोलायला सुरवात केली. ” तुझे वडील शांताराम, ह्या गावातला एक हुशार माणूस. शिक्षण त्याचे जास्त नव्हते, पण त्याची विचारशक्ती खूप प्रगल्भ होती. गावकरी त्यांचे ऐकत असत. त्यांच्यामुळे मी ह्या गावातल्या शाळेत मास्तर म्हणून आलो आणि कायमचा ह्या गावाचा झालो. मला त्यांनी ह्या गावात स्थाईक होण्याकरिता खूप मदत केली. दर गुरुवारी गावाच्या दत्त मंदिरात त्यांचे ज्ञानेश्वरी पठण होत असे. ‘ ओम् नमो जी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा || ‘ त्यांचे ज्ञानेश्वरी पठण चालू झाले की पूर्ण गाव दत्त मंदिरात जमत असे. माझ्यासाठी ते माझे गुरु होते. सगळ्या गावकऱ्यांना चांगले ज्ञान मिळावे ह्या एकाच ध्येयाने ते गावात कार्य करीत होते. सगळे गावकरी त्यांचा मान राखत असत आणि ह्याच कारणाने गावचा मुखिया, म्हणजे तुझ्याच वडिलांचा चुलत भाऊ, ह्याच्या डोळ्यात शांताराम खुपत होता. त्याने भाऊबंदकी उकरून काढून तुझ्या आईवडिलांना त्रास द्यायला सुरवात केली,आणि एके दिवशी वेळ साधून तुझ्या आईचा शेतामध्येच शेवट केला. त्यावेळेला शांताराम माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “ जर तू मला गुरु मानत असशील तर मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा पाहिजे आहे. माझ्या मुलाला- अनुपला ह्या गावाच्या बाहेर काढ आणि मोठा सज्जन आणि प्रतिष्ठित माणूस बनव.”  मी शांतारामला तसे नुसते वचन नाही दिले तर ते मी शेवटपर्यंत पाळले. त्याच रात्री तुझ्या चुलत्यांनीच शांतारामलाही संपविले आणि दोघांना विहिरीत टाकून त्यांनी आत्महत्या केल्या असा भास आणि पुरावे उभे केले. तेरा दिवसांनी मी तुला मुंबईला माझे स्नेही तनपुरे ह्यांच्याकडे तुझ्या पुढील आयुष्याची घडण करण्यासाठी पाठविले. तुझ्या चुलत्यांनी तुझा खूप वर्षे शोध घेतला. पण तू कुठे आहेस ते माझ्याशिवाय कोणालाच माहित नव्हते. शांतारामने माझ्याकडून खूप मोठी गुरुदक्षिणा मागितली होती. तुझा शाळेचा खर्च, मुंबईला रहाण्याचा खर्च हा सगळा मीच तनपुरेना पाठवीत होतो. तुझ्याकडे दुर्लक्ष होऊ नये ह्यासाठी मी लग्नही केले नाही. तनपुरे तुझे फोटो आणि तुझी चाललेली  वाटचाल मला पत्राद्वारे कळवत होता. तुझ्या यशाची वाढती कमान मी येथे बसून फोटोत बघत होतो आणि तू कॉलेजचा  प्रिन्सिपॉल झालास तेव्हा मला बरे वाटले, कारण मी माझ्या गुरूला, शांतारामला दिलेला शब्द पाळला होता. माझी गुरुदक्षिणा तेव्हा पुरी झाली. फक्त आता तू मला वचन दिले आहेस ते पाळ. मला गुरुदक्षिणा देणार आहेस ती दे, आणि ह्या गावातून कोणालाही न सांगता, न बोलता आलास तसा परत  जा.” 

जे काही पस्तीस वर्षांपूर्वी घडले होते ते पाटीलसरांनी अनुपच्या समोर जसेच्या तसे ठेवले होते. हे सगळे ऐकून अनुपचे डोके सुन्न झाले. आपल्या आईवडिलांचा खून झाला होता हे ऐकून अनुपला खूप वाईट वाटले. पाच दहा मिनिटे तशीच शांततेत गेली.

भानावर आलेल्या अनुपने पाटीलसरांना सांगितले, ” सर, मी माझा शब्द पाळतो. तुम्ही मागितलेली गुरुदक्षिणा मी नक्कीच देतो….. फक्त आता मी ह्या गावातून एकटा न जाता तुम्हीही माझ्याबरोबर मुंबईला चला– माझ्याकडे, माझ्याबरोबर आमच्या घरात रहायला चला. मी आता तुम्हाला येथे एकटे सोडून जाऊच शकत नाही. कृपा करून माझ्याबरोबर मुंबईला चला. आपण एकत्र राहू. मला माझ्या वडिलांची सेवा करायचे भाग्य नाही मिळाले तर मला माझ्या वडलांच्या गुरूंची सेवा करायचे भाग्य तरी मिळू दे.”

त्याचदिवशी अनुप, पाटीलसरांना घेऊन मुंबईत स्वतःच्या घरी  आला. रात्री पाटीलसर झोपल्यावर अनुपने त्याच्या पोलीस कमिशनर असलेल्या मित्राला फोन केला आणि पस्तीस वर्षांपूर्वीची त्याच्या आयुष्यात घडलेली गोष्ट त्याला सांगितली आणि आपल्या दिवंगत आईवडिलांना न्याय मिळविण्याकरिता त्याच्याकडून काही करता येत असेल तर ते करायला सांगितले.

अनुपने स्वतः बदला घेण्याची भावना मनात न आणता, सरकारी नियमांनुसार कारवाई करून पाटील सरांना दिलेला शब्द पाळून गुरुदक्षिणाही वाहिली आणि आपल्या आईवडिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नही केला.

— समाप्त —

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुरुदक्षिणा भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ गुरुदक्षिणा भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

अनुप कालपासून खूप बेचैन होता. काहीही करून त्याला आपल्या गावाला जावेसे वाटत होते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने गाव सोडले होते, खरे म्हणजे त्याला सोडावे लागले होते, आणि त्यावर त्याने आज ३८ वर्षे झाली तरी परत त्याच्या गावाला पाय लावले नव्हते. पण कालपासून त्याला आपल्या गावाची खूप आठवण येत होती.

हुशार असलेल्या अनुपने त्याची दहावीची परीक्षा मुंबईतच दिली. चांगल्या मार्क्सने पास झालेल्या अनुपला सायन्समध्ये प्रवेश मिळून इंजिनिअर बनता आले असते. पण त्याला गावच्या पाटीलसरांसारखे मास्तर व्हायचे होते म्हणून त्याने आर्ट्सला प्रवेश घेऊन, पुढील शिक्षण पुरे करून पदवी मिळाल्यावर कायद्याचे ज्ञान घेतले आणि वकील झाला. वकिली न करता त्याने पुढे एका शाळेत लहान मुलांना शिकवायला सुरवात केली. तीस वर्षांच्या पुढच्या प्रवासात त्याने कधी मागे वळून बघितले नाही. आपले घर आणि आपला संसार सांभाळून तो आता एका प्रतिष्ठित अशा कॉलेजचा प्रिन्सिपल झाला होता.

काल झालेल्या गुरुपौर्णिमेला त्याला भेटायला आलेल्या विद्यार्थाना बघून त्याला आपल्या गावच्या पाटीलसरांची आठवण झाली आणि तो बेचैन झाला होता. जेव्हा तो मुंबईला आला होता तेव्हा त्याला मुंबईचे काहीच माहित नव्हते. ‘ पाटीलसरांनीच त्यांच्या एका ओळखीच्या तनपुरेकाकांना एक चिट्ठी लिहून, त्यांना भेटायला सांगितले होते आणि तनपुरेकाकांनीच आपली पुढची सगळी सोय केली होती. आपली रहायची, शाळेतल्या ऍडमिशनची, खानावळीची सगळी सोय तेच बघत होते.’ आज एवढ्या वर्षांनी अनुपला आपला सगळा भूतकाळ डोळ्यासमोर येत होता. आपल्या आईवडिलांनी अचानकपणे एकाच वेळेला विहिरीत उडी मारून केलेली आत्महत्या. त्यानंतर १३ दिवसांनी पाटीलसरांनी आपल्याला मुंबईला पाठविणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या. त्यावेळेला आपल्या रहाण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च कोणी केला असेल, ह्या विचाराने तो ग्रासला होता आणि त्याने ठरविले आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही पाटीलसरांकडेच मिळतील आणि त्याने पाटीलसरांना भेटायला गावाकडे प्रस्थान केलं.

अचानक आलेल्या अनुपला सत्तरीच्या आसपास असलेल्या पाटीलसरांनी दारात बघितले आणि ते बघतच राहिले. अनुपने त्यांना विचारले, “पाटीलसर ?” अनुपने त्यांना ओळखले नसले तरी पाटीलसरांनी त्याला ओळखले होते. 

“अरे अनुप तू, हो हो , मीच पाटील. आज अचानक कसा गावाकडे फिरकलास. खूप वर्षांनी दिसतोयस. ये ये आत ये. ” पाटील सरांनी त्याला आपल्या छोटेखानी घरात आत यायला सांगितले. अनुपला पूर्वीचे त्यांचे घर काही आठवत नव्हते. त्या घरात मोजकेच सामान होते आणि पाटीलसर एकटेच दिसत  होते. आपल्याला एवढ्या वर्षानंतर भेटूनसुद्धा पाटीलसरांनी ओळखले कसे ह्याचे अनुपला आश्चर्य वाटले होते. पाटीलसर सत्तरीला पोचलेले असले तरी शरीराने एकदम फिट दिसत होते. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर घरातल्या पडवीत बसून पाटीलसरांनी बनविलेला चहा घेऊन अनुपने विषयाला सुरवात केली. ” पाटीलसर मला माझ्या बालपणीचे काहीच आठवत नाही. फक्त मी सातवीला असतांना  एके दिवशी तुम्ही मला एसटीमध्ये बसवून मुंबईला तनपुरेकाकांकडे एक चिट्ठी घेऊन पाठविले एवढेच आठवते. माझा त्यावेळच्या शिक्षणाचा, जेवणाचा, रहाण्याचा सगळा खर्च कोण करत होते? माझे आईवडील वारले आणि त्यांचे तेरावे झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही मला मुंबईला पाठविले होते. त्या दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या का केली ? मला काहीच माहित नाही. तेव्हा तनपुरेकाकांना मी खूप प्रश्न केले होते, पण त्यांनीही मला काहीच सांगितले नाही. ते फक्त तुमचा एकच निरोप नेहमी देत की,’ अभ्यास व्यवस्थित कर आणि मोठा हो.’  आज मी एका कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. खूप मुलांना मी गुरुस्थानी असलो तरी माझ्या कायम मनात हेच येत असते की, माझ्या ह्या आयुष्याला मार्ग दिलात तो तुम्ही. लहानपणापासून तुम्ही मला चांगली शिकवण दिलीत आणि दहावीला मला मुंबईला पाठविले. त्यामुळेच आज मला हे यश आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. सर तुम्ही माझे गुरु आहात. सर आज ह्या तुमच्या शिष्याला मोकळेपणाने सगळे सांगा. त्यावेळी कायकाय  झाले होते ते “. अनुपने पाटीलसरांना कळकळीने मनातले सांगितले. पाटीलसर जरा गंभीर झाले.

“अनुप तू मला खरंच जर गुरु मानत असशील तर मी तुझ्याकडे मागेन  ती गुरुदक्षिणा मला देशील का ?”

अनुपने लगेच उत्तर दिले, ” सर हे काय बोलणे झाले का ? सर तुम्ही काहीही मागा, मी खरंच देईन.”

पाटीलसरांनी पुढे बोलायला सुरुवात केली, ” ठीक आहे. मला वस्तूरूपात काहीही नको. मला तू फक्त एक वचन द्यायचे आहे की, मी जे काही सांगेन त्यानंतर तू ते फक्त ऐकून घ्यायचे आहे. त्याच्या मुळाशी जाऊन पस्तीस वर्षांपूर्वी गाढलेले मढे परत उकरून काढायचे नाहीस. बदल्याची भावना मनात न आणता तुझ्या भावी आयुष्याची वाटचाल तू चालू ठेवावीस. असे जर मला तू वचन देत असशील तरच मी तुला जे काही घडले ते सगळे सांगेन.”

— क्रमशः भाग पहिला

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print