श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ गुरुदक्षिणा भाग २ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

(असे जर मला तू वचन देत असशील तरच मी तुला जे काही घडले ते सगळे सांगेन.”) इथून पुढे —–

अनुपने त्यांना तसे वचन दिले आणि पाटीलसरांनी पुढे बोलायला सुरवात केली. ” तुझे वडील शांताराम, ह्या गावातला एक हुशार माणूस. शिक्षण त्याचे जास्त नव्हते, पण त्याची विचारशक्ती खूप प्रगल्भ होती. गावकरी त्यांचे ऐकत असत. त्यांच्यामुळे मी ह्या गावातल्या शाळेत मास्तर म्हणून आलो आणि कायमचा ह्या गावाचा झालो. मला त्यांनी ह्या गावात स्थाईक होण्याकरिता खूप मदत केली. दर गुरुवारी गावाच्या दत्त मंदिरात त्यांचे ज्ञानेश्वरी पठण होत असे. ‘ ओम् नमो जी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा || ‘ त्यांचे ज्ञानेश्वरी पठण चालू झाले की पूर्ण गाव दत्त मंदिरात जमत असे. माझ्यासाठी ते माझे गुरु होते. सगळ्या गावकऱ्यांना चांगले ज्ञान मिळावे ह्या एकाच ध्येयाने ते गावात कार्य करीत होते. सगळे गावकरी त्यांचा मान राखत असत आणि ह्याच कारणाने गावचा मुखिया, म्हणजे तुझ्याच वडिलांचा चुलत भाऊ, ह्याच्या डोळ्यात शांताराम खुपत होता. त्याने भाऊबंदकी उकरून काढून तुझ्या आईवडिलांना त्रास द्यायला सुरवात केली,आणि एके दिवशी वेळ साधून तुझ्या आईचा शेतामध्येच शेवट केला. त्यावेळेला शांताराम माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “ जर तू मला गुरु मानत असशील तर मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा पाहिजे आहे. माझ्या मुलाला- अनुपला ह्या गावाच्या बाहेर काढ आणि मोठा सज्जन आणि प्रतिष्ठित माणूस बनव.”  मी शांतारामला तसे नुसते वचन नाही दिले तर ते मी शेवटपर्यंत पाळले. त्याच रात्री तुझ्या चुलत्यांनीच शांतारामलाही संपविले आणि दोघांना विहिरीत टाकून त्यांनी आत्महत्या केल्या असा भास आणि पुरावे उभे केले. तेरा दिवसांनी मी तुला मुंबईला माझे स्नेही तनपुरे ह्यांच्याकडे तुझ्या पुढील आयुष्याची घडण करण्यासाठी पाठविले. तुझ्या चुलत्यांनी तुझा खूप वर्षे शोध घेतला. पण तू कुठे आहेस ते माझ्याशिवाय कोणालाच माहित नव्हते. शांतारामने माझ्याकडून खूप मोठी गुरुदक्षिणा मागितली होती. तुझा शाळेचा खर्च, मुंबईला रहाण्याचा खर्च हा सगळा मीच तनपुरेना पाठवीत होतो. तुझ्याकडे दुर्लक्ष होऊ नये ह्यासाठी मी लग्नही केले नाही. तनपुरे तुझे फोटो आणि तुझी चाललेली  वाटचाल मला पत्राद्वारे कळवत होता. तुझ्या यशाची वाढती कमान मी येथे बसून फोटोत बघत होतो आणि तू कॉलेजचा  प्रिन्सिपॉल झालास तेव्हा मला बरे वाटले, कारण मी माझ्या गुरूला, शांतारामला दिलेला शब्द पाळला होता. माझी गुरुदक्षिणा तेव्हा पुरी झाली. फक्त आता तू मला वचन दिले आहेस ते पाळ. मला गुरुदक्षिणा देणार आहेस ती दे, आणि ह्या गावातून कोणालाही न सांगता, न बोलता आलास तसा परत  जा.” 

जे काही पस्तीस वर्षांपूर्वी घडले होते ते पाटीलसरांनी अनुपच्या समोर जसेच्या तसे ठेवले होते. हे सगळे ऐकून अनुपचे डोके सुन्न झाले. आपल्या आईवडिलांचा खून झाला होता हे ऐकून अनुपला खूप वाईट वाटले. पाच दहा मिनिटे तशीच शांततेत गेली.

भानावर आलेल्या अनुपने पाटीलसरांना सांगितले, ” सर, मी माझा शब्द पाळतो. तुम्ही मागितलेली गुरुदक्षिणा मी नक्कीच देतो….. फक्त आता मी ह्या गावातून एकटा न जाता तुम्हीही माझ्याबरोबर मुंबईला चला– माझ्याकडे, माझ्याबरोबर आमच्या घरात रहायला चला. मी आता तुम्हाला येथे एकटे सोडून जाऊच शकत नाही. कृपा करून माझ्याबरोबर मुंबईला चला. आपण एकत्र राहू. मला माझ्या वडिलांची सेवा करायचे भाग्य नाही मिळाले तर मला माझ्या वडलांच्या गुरूंची सेवा करायचे भाग्य तरी मिळू दे.”

त्याचदिवशी अनुप, पाटीलसरांना घेऊन मुंबईत स्वतःच्या घरी  आला. रात्री पाटीलसर झोपल्यावर अनुपने त्याच्या पोलीस कमिशनर असलेल्या मित्राला फोन केला आणि पस्तीस वर्षांपूर्वीची त्याच्या आयुष्यात घडलेली गोष्ट त्याला सांगितली आणि आपल्या दिवंगत आईवडिलांना न्याय मिळविण्याकरिता त्याच्याकडून काही करता येत असेल तर ते करायला सांगितले.

अनुपने स्वतः बदला घेण्याची भावना मनात न आणता, सरकारी नियमांनुसार कारवाई करून पाटील सरांना दिलेला शब्द पाळून गुरुदक्षिणाही वाहिली आणि आपल्या आईवडिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नही केला.

— समाप्त —

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments