मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जिथे जाहला तुझा जीवनान्त!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“जिथे जाहला तुझा जीवनान्त! ☆ श्री संभाजी बबन गायके 

…. शत्रूच्या मातीत चिरनिद्रा घेत असलेला वायूवीर!

पाकिस्तानातल्या पिंडी भटीया तहसीलमधल्या कोट नाका नावाच्या कोणत्या एका गावातल्या कोण्या एका शेतात आपला एक वीर वायुवीर चिरनिद्रा घेत पहुडला आहे… त्याचा देह मातीच्या स्वाधीन झाला ती जागाही आता विस्मृतीत गेली आहे.. पण त्याच्या स्मृती गेल्या काही वर्षांत पुन्हा स्मरणाच्या पटलावर आल्या! हा वीर मातीच्या कुशीत विसावला त्या घटनेला आज सुमारे साडे एकोणसाठ वर्षे होत आहेत. पण भारताला त्याचे बलिदान समजायला दुर्दैवाने खूप कालावधी लागला… ७ सप्टेंबर, १९६५ रोजी वायूवीर अज्जामदा बोपय्या देवय्या (Squadron Leader A B ‘Tubby’ Devayya) हे जग सोडून गेले.. हे आपल्याला कळायला १९८५ वर्ष उजाडले.. म्हणजे सुमारे वीस वर्षे! तोवर युद्धात बेपत्ता झालेले पायलट एवढीच त्यांची ओळख होती!

१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. इथपर्यंत विमानांचा युद्धातला सहभाग तसा कमी होता, असे म्हणता येईल. पण पुढे पाकिस्तानला अमेरिकची अत्याधुनिक लढाऊ विमाने लाभली आणि त्यांची उड्डाणे वाढली… इतकी की त्यांनी ६ सप्टेंबर, १९६५ रोजी भारतीय वायूसेना तळांवर बेफाम हल्ला चढवला. आधी हल्ला न करण्याचे भारताचे धोरण त्यांनी त्यांच्या लाभासाठी अशाप्रकारे वापरून घेतले. याचा करारा जबाब देणे भारतीय वायूसेनेसाठी अनिवार्य होते. भारताकडे फ्रांसमध्ये बनलेली Dassault Mystere नावाची अमेरिकेच्या विमानांच्या अर्थात supersonic F-104 Star-Fightersच्या तुलनेत कमी ताकदीची लढाऊ विमाने होती. आपल्या विमानांच्या कमाल वेगात आणि त्यांच्या विमानांच्या कमाल वेगात १००० कि. मी. प्रतितास इतके मोठे अंतर होते. पण शस्त्रापेक्षा ते शस्त्र धारण करणारे मनगट बलशाली असावे लागते… आणि भारतीय सैन्य यासाठी तर जगभरात प्रसिद्ध आहे! ठरले… दुस-याच दिवशी पाकिस्तानी विमानतळावर मोठा हल्ला करण्याची योजना आखली गेली. Group Captain Om Prakash Taneja (Veer Chakra) यांच्या नेतृत्वात आपली 12 विमाने पहाटेच्या काळोखात पाकिस्तानात अगदी त्या देशाच्या मध्यभागी (आणि त्यामुळे भारतीय सीमेपासून खूपच दूर) असलेल्या सरगोधा विमानतळाकडे झेपावली. इथपर्यंत पोहोचायचे, हल्ला करायचा आणि सुरक्षित परत यायचे यात खूप इंधन खर्च होणार होते. Dassault Mystere विमानांची इंधनसाठवण क्षमता तशी जेमतेमच होती. थोडा वेळ जरी अधिक पाकिस्तानी सीमेत राहिले तर भारतात परतणे अशक्य होणार होते… कारण पाकिस्तानी वायुसेना तोपर्यंत जागी होणार होती… पण धोका पत्करणे आवश्यक होते… कारण त्याशिवाय युद्धात काही हाती लागत नाही!

ठरल्यानुसार बारा विमाने सज्ज झाली.. पहाटेच्या अंधारात ५. २८ मिनिटांनी विमाने झेपावणार होती…. सुमारे पावणेपाचशे किलोमीटर्सचे अंतर कापायचे होते. ठरवलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी एकच संधी मिळणार होती. योजनेचा एक भाग म्हणून या 12 विमानांच्या जोडीला दोन आणखी विमाने राखीव म्हणून ठेवण्यात आली होती…. आणि नेमक्या या दोन पैकी एकाचे वैमानिक होते…. युद्धाची प्रचंड जिगीषा असलेले आपले देवय्या साहेब! त्यांना हे राखीवपण चांगलेच डाचत असावे. हे मूळचे वैमानिक विद्या शिकवणारे शिक्षक. पण ऐन युद्धाच्या धामधुमीत एक कुशल वैमानिक हाताशी असावा म्हणून त्यांना ऐनवेळी बोलावून घेतले गेले होते.

अंधार होताच. त्यात धुके पसरले. आधीच्या दिवशी झालेल्या हवाई हल्ल्याने धावपट्टी तशी चांगल्या स्थितीत नव्हती. आपली विमाने दिवसाउजेडी उडण्याच्या क्षमतेची होती… रात्री अंधारात त्यांना उड्डाण करणे म्हणजे अंधा-या विहिरीत उडी घेण्यासारखे होते. चार चारच्या गटांनी उड्डाणे करण्याची योजना होती. मोहिमेच्या गुप्ततेसाठी काही वेळ एकमेकांशी रेडीओ संपर्क न ठेवण्याचे ठरले होते… पहिला गट व्यवस्थित हवाई मार्गस्थ झाला. दुसरा गटही बहुधा त्याच मार्गावर असावा. पण काहीतरी गडबड झाली म्हणा किंवा अन्य काही.. पण देवय्या साहेबांनी आपले विमान चक्क या दुस-या तुकडीच्या पुढे काढले… आणि जवळजवळ दुस-या विमानाला धडकले असते अशा अंतरावरून ते आभाळात झेपावले…. शत्रूला नेस्तनाबूत करायला! तोपर्यंत पहिली तुकडी लक्ष्यावर पोहोचली होती. त्यांनी अचूक हल्ला केला आणि पाकिस्तानची धांदल उडाली. इतक्या लांब भारतीय विमाने पोहोचणार नाही, या त्यांच्या समजुतीला हा मोठा धक्का होता. दुस-या तुकडीला तनेजा साहेबांनी लक्ष्य सांगितले… पण अंधारच इतका होता की त्यांना ते लक्ष्य दिसलेच नाही…. पाकिस्तानची बरीच अमेरिकन विमाने यामुळे बचावली. पण आपल्या या दुस-या तुकडीने मग लक्ष्य बदलले आणि तुफान हल्ला चढवला… आणि त्यांचे भरपूर नुकसान करीत आपली विमाने भारतीय हद्दीकडे माघारी वळाली… पण या तुकडीच्या मागे असलेले देवय्या साहेब आता येताना सर्वांत मागे राहिले… तोवर पाकिस्तानचे एक supersonic F-104 Star-Fighter आपल्या विमानांच्या पाठलागावर निघाले होते. देवय्या साहेबांकडे जेमतेम परत येण्याएवढे इंधन शिल्लक होते. त्यांना माघारी येणे शक्य असतानाही ते या पाकिस्तानी विमानाला सामोरे गेले… अन्यथा पाकिस्तानी विमानाने आपल्या माघारी फिरणा-या विमानांचा जीवघेणा पाठलाग केला असता आणि आपले भरपूर नुकसान झाले असते… कारण पाकिस्तानी विमान आपल्यापेक्षा अधिक वेगवान आणि आधुनिक हत्यारांनी सज्ज होते…. त्याचा वैमानिक होता.. फ्लाईट लेफ्टनंट अहमद हुसैन… त्यांचा उत्तम पायलट…. त्याने पाहिले की एक साधारण विमान आपल्या रोखाने येते आहे… त्याने देवय्या यांच्या विमानावर त्याचे अग्निअस्त्र डागले…. उष्णतेचा मागोवा घेत विमानाचा पाठलाग करीत त्याला उध्वस्त करणारे ते अस्त्र… ते कधीच अपयशी ठरले नव्हते तो पर्यंत… त्यामुळे हुसेन निश्चिंत होता… त्याला वाटले की हे विमान पाडले की भारतीय हद्दीकडे जाणा-या विमानांचा फडशा पाडू! पण देवय्या साहेबांचे इरादे हिमालयाएवढे उंच. त्यांनी अशी काही शक्कल लढवली की ते अग्निअस्त्र ब भरकटले…. भारतीय वैमानिकाच्या कौशल्यापुढे अमेरिकन तंत्रज्ञान उघडे पडले होते….. पुढे वेगाने येत हुसेन ने देवय्या साहेबांच्या विमानावर जोरदार गोळीबार केला… विमान जोरात हादरले… पण तरीही देवय्या साहेबांनी विमानावर ताबा मिळवला… त्यांचे उड्डाण कौशल्य अतिशय उच्च दर्जाचे होते… जो अभ्यासक्रम हुसेन शिकला असेल त्या अभ्यासक्रमाचे देवय्या साहेब म्हणजे जणू हेडमास्तरच होते! ते अजिबात डगमगले नाहीत… पाकिस्तानच्या आकाशात आता एक प्रचंड उत्कंठावर्धक हवाई युद्ध आरंभले गेले होते… खरं तर पाकिस्तानी विमान क्षणार्धात जिंकायला हवे होते… पण देवय्या साहेब त्याला भारी पडले. हुसेनने सात हजार फुटांची उंची गाठली… देवय्या साहेबांनी तोही धोका पत्करला आणि ते सुद्धा तेवढ्याच उंचीवर जाण्याच्या प्रयत्नात राहिले… हुसेन वेगाने त्यांच्या रोखाने आला… साहेबांनी अलगद हुलकावणी दिली… एखादे रानडुक्कर कसे थांबता न आल्याने पुढे धावत राहते… तशी हुसेनची गत झाली…. त्यांनी हुसेन याला आभाळभर फिरव फिरव फिरवले… एका बेसावध क्षणी हुसेनला गाठून त्याच्या विमानावर होत्या तेवढ्या शस्त्रांनी हल्ला चढवला… आता देवय्या माघारी जाण्याच्या स्थितीत अजिबात नव्हते… आणि त्यांना माघारी जायचेही नव्हते! पण एका क्षणी या दोन्हे विमानांची आभाळातच धडक झाली…. दोघेही वेगाने जमिनीकडे कोसळू लागले…. हुसेनच्या विमानात उत्तम दर्जाची बाहेर पडण्याची यंत्रणा होती… तो यशस्वीरीत्या विमानातून eject झाला… आणि जमिनीवर सुखारूप उतरला…. देवय्या साहेब मात्र याबाबत कमनशीबी ठरले… त्यांनीही विमानातून बाहेर उडी ठोकली होती… पण.. त्यांचा देह विमानापासून काही अंतरावर सापडला…. पण ते फारसे जखमी झालेले नव्हते! पण त्यांचे प्राण भारतमातेच्या संरक्षणार्थ खर्ची पडले होते.. आणि त्याचा त्यांना अभिमान होता. आपली पत्नी आणि दोन मुली यांना ते कायमचे पोरके करून त्यांच्या आत्म्याने परलोकी उड्डाण केले होते.

वायुसेनेच्या भाषेत दोन लढाऊ विमानांच्या अशा प्रकारच्या संघर्षाला Dog Fight अशी संज्ञा आहे… पाकिस्तानी पायलटचे माहीत नाही… मात्र लढणारा आपला वैमानिक वाघ होता… वाघासारखा लढला आणि धारातीर्थी पडला!

सरगोधा मोहिमेवर गेलेली सर्व विमाने सुखरूप भारतीय हद्दीत परतली… पण देवय्या साहेबांविषयी तनेजा साहेबांना ते त्यांच्या विमानातून खाली उतरल्यावरच समजले! देवय्या साहेबांची काहीच खबर मिळाली नाही… कालांतराने त्यांना युद्धात बेपत्ता झालेले सैनिक असा दर्जा दिला गेला. साहेबांच्या पत्नी श्रीमती सुंदरी देवय्या आणि कन्या स्मिता आणि प्रीता यांचा पुढे प्रचंड मोठा झालेला प्रतीक्षा कालावधी सुरु झाला… त्यांना सुमारे तेरा वर्षांनी देवय्या साहेबांची खबर समजणार होती…. ते हयात नाहीत ही ती खबर!

भारत पाक युद्ध थांबले. पाकिस्तानचा पराभव झाला होता… पण ते उताणे पडले तर नाक वरच आहे असे म्हणत राहतात नेहमी. त्यांनी त्यांच्या वायुदलाच्या तथाकथित पराक्रमाबाबत लेखन करण्यासाठी एक इंग्रजी माणूस नेमला…. John Fricker त्याचे नाव. त्याने Battle for Pakistan: The Air War of 1965 ही एक प्रकारची बखरच लिहिली… त्यात अर्थात पाकिस्तानची स्तुती पानोपानी होती. पण कसे कोणास ठाऊक त्याने देवय्य्या साहेब आणि हुसेनच्या लढाईचा उल्लेख केला… देवय्या साहेबांचे नाव तोपर्यंत त्यालाही ठाऊक नव्हते… जिथे देवय्या साहेब धारातीर्थी पडले होते.. त्याच शेतात त्यांना तिथल्या लोकांनी दफन केले होते. ही बाब पाकिस्तान सैन्याने खरे तर भारताला कळवायला हवी होती! असो.

तर हे पाकिस्तान धार्जिणे पुस्तक कालांतराने म्हणजे ते प्रकाशित झाल्यानंतर तब्बल सात आठ वर्षांनी भारतात पोहोचले… आणि त्यातील मजकूर तनेजा साहेबांच्या नजरेस पडला…. आणि सुरु झाला एक शोध…. एका हुतात्मा वायूवीराचा शोध. त्याला न्याय देण्यासाठीचा संघर्ष… कारण सरगोधा मोहिमेत भाग घेतलेल्या सर्व वैमानिकांना पदके मिळाली होती… पण आपला कथानायक पाकिस्तानातल्या मातीत हरवून गेला होता… आपण जणू त्यांना विसरलो होतो! पण दैवयोगाने तपासाची चक्रे फिरत राहिली… तेवीस वर्षे… आणि १९८८ मध्ये Squadron Leader Ajjamada Boppayya Devayya No. 1 Squadron IAF यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्याची घोषणा करण्यात आली. भारतीय वायूसेनेतल्या लढाऊ वैमानिकास प्रदान केले गेलेले हे आजपर्यंतचे एकमेव महावीर चक्र ठरले आहे. देवय्या साहेबांच्या पत्नी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या दोन्ही मुलींना वाढवले… साहेब कधी न कधी तरी परत येईल या आशेवर त्यांनी दिवस काढले… त्यांच्या पराक्रमाची योग्य कदर केली गेल्यानंतरच त्यांच्या कष्टी काळजाला थोडा दिलासा लाभला. त्या आता नव्वद वर्षांच्या आहेत. देवय्या साहेबांना दफन केलेली जागा स्वत: हुसेन यांनीच शोधून काढली असे बोलले जाते. परंतु आता ती नेमकी जागा विस्मरणात गेली आहे… खरे तर देवय्या साहेबांचे अवशेष भारतात परत आणण्याचे प्रयत्न व्हायला हवे होती… पण अनाम वीरांच्या नशिबी …

‘स्तंभ तिथे न कुणी बांधला… पेटली न वात! ‘ अशी स्थिती असते.

धगधगता समराच्या ज्वाला.. या देशाकाशी…

जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी…

– – हे शब्द किती खरे ठरतात ना?

देवय्या साहेब देशासाठी हुतात्मा झाले हे आता सिद्ध झाले आहे. पण त्यांच्याविषयी बरीच माहिती तशी सर्वसामान्य जनतेपासून लांबच राहिली, असे दिसते. जानेवारी, २०२५ मध्ये अक्षय कुमार यांची भूमिका असलेला स्काय फोर्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या मध्ये ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला… पण नावे, कथा, तपशील यात कमालीचा बदल करण्यात आला आहे…. हे मात्र अत्यंत दुर्दैवाचे आहे! एका ख-या वीराची कथा आपण त्याच्या ख-या नावासह सांगू शकत नाही… याला काय म्हणावे.. कारणे काहीही असोत. पण ही कथा पडद्यावर आणल्याबद्दल संबंधित निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांचे आभारही मानावेत तेवढे कमी आहेत.. कारण हल्ली वाचन नाही केले जात. सैन्यविषयक पुस्तके बरीचशी इंग्रजीमध्ये असतात… आणि जनता हल्ली चित्रपटात इतिहास शोधते आहे.. त्यामुळे चित्रपट त्यांच्या दोषांसह स्वीकारावे लागतात, हेही खरे आहे. खरे आभार मानले पाहिजेत ते ग्रुप कॅप्टन ओम प्रकाश तनेजा या वीर चक्र विजेत्या जिगरबाज वायुसेना अधिकारी वीराचे. देवय्या साहेबांचे शौर्य प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट खूप कौतुकास्पद आहेत.

मी आज संध्याकाळी स्काय फोर्स हा चित्रपट पाहिला. दर रविवारी एक सैन्य कथा प्रकाशित करण्यचा प्रयत्न करीत असतो. निवृत्त वायूसैनिक श्री. मेघश्याम सोनावणे साहेब माझ्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देत असतात. यानिमित्ताने आपल्याच वीरांच्या आपल्या विस्मृतीत गेलेल्या कथा पुन्हा सांगितल्या जातील.. जय हिंद.

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मी मोर्चा नेला नाही…”  लेखक : डॉ. सुरेश पाटील  ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मी मोर्चा नेला नाही…”  लेखक : डॉ. सुरेश पाटील  ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

(एका निष्क्रिय डॉक्टर समाजाचं मौनभंग. आत्मपरीक्षणाचे बोल.)

मी मोर्चा नेला नाही,

मी रस्त्यावर उतरलो नाही,

हॉस्पिटल पेटली तरी

आमच्या आवाजाच्या ज्वाळा भडकल्या नाही…


मी संपाचं शंखनाद केलं नाही,

मी एकजुटीचं ढोल वाजवलं नाही,

मी व्यथेवर भाष्य केलं नाही,

फक्त म्हणालो, “आपलं काही चुकलं नाही…”


डॉक्टर मित्राला मारहाण झाली 

त्याच्या कपाळावर जखम दिसली,

माझ्या अंतःकरणावर पडली छाया,

पण हललो मात्र नाही, कारण मोह माया…


मी त्याच्यासोबत ड्युटीवर झिजलो होतो,

मी भीतीतही निश्चल थांबलो होतो,

पण जेव्हा तो जमिनीवर पडला होता,

तेव्हा मी “वेळेवर ओपीडी सुरू होईल का?”

याचाच हिशोब करतो होतो…


मी मोबाईल हातात घेतला,

डोळ्यांत दोन अश्रू होते दाटले,

पण स्टेटसचा टाकून उसासा,

“Doctors deserve respect!” 

एवढंच मला वाटले…


मी त्याला ओळखायचो,

पण आज अनोखळीपणाचे कारण शोधत राहिलो,

मी एकटाच काय करणार? असं म्हणत,

मी सगळ्यांनाच एकटं करून टाकलं…


मी नाही उभा राहिलो,

मी नाही काही बोललो,

मी नाही प्रश्न विचारला,

…आणि म्हणूनच तो डॉक्टर गेला कोलमडला…

 

त्याचं रक्त… माझ्या काळजात थेंब थेंब साठलं,

पण माझं मौन… त्याच्या हत्येचं साक्षीदार ठरलं…


म्हणूनच आता……


उभा राहा तू आज,

अन्यायाविरुद्ध आवाज बनून,

नाहीतर उद्या,

तुझ्याच व्यथा जातील विसरून.


आज तू गप्प राहिलास,

उद्या कोण बोलणार?

तुझ्यासाठीच कुणी,

पुन्हा मोर्चा काढणार?


आणि आता आजपासून म्हण…


मी मोर्चा नेणार आहे 🚩

संप ही करणार आहे 🚩

निषेद सुद्धा जोरदार नोंदवणार आहे… 🚩🚩

(कविता आवडू, नाही आवडू पण आपल्या झोपलेल्या डॉक्टर मित्रांसोबत share करा… कदाचित काहीजण जागे होतील आणि चळवळीचे धागे होतील.. 🚩)

कवी : डॉ सुरेश पाटील 

मनोविकार तज्ञ, वसई नालासोपारा विरार, मो. 9987230222

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस यांचे विचार…” लेखक : शरद बावीसकर (यांच्या लेखाचा संकलित अंश) ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस यांचे विचार” लेखक : शरद बावीसकर (यांच्या लेखाचा संकलित अंश) ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

भौतिकवादाची कोनशिला समजला जाणारा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस म्हणतो की प्राप्त क्षणात अनंताचं सुख असतं. वर्तमानकाळ सत्-तत्त्व आहे. पण अनावश्यक इच्छांचा पाठलाग आणि मृत्यूचं भय माणसाला वर्तमानाच्या या सत्-वास्तवाचं (reality) आकलन होऊ देत नाही. अतृप्त आणि भयभीत मनोवस्थेमुळे माणूस प्राप्त क्षणात राहण्यास असमर्थ ठरतो. भयमुक्त होऊन प्राप्त क्षणाचा आनंद कसा घ्यावा हा मूलभूत विचार एपिक्युरसच्या सुखवादी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. त्याचं सुखवादी नीतिशास्त्र आजच्या भांडवलवादी भोगवादाचं द्याोतक नसून त्याला छेद देणारं आहे. आजचा बाजारू भोगवाद प्राप्त क्षणापासून पळ काढायला मदत करतो- तर एपिक्युरसचा सुखवाद प्राप्त क्षणात (carpe diem) अनंताचं सुख शोधायला सहाय्यभूत ठरतो. एपिक्युरसच्या सुखवादाचा आंतरिक संबंध त्याच्या भौतिकवादाशी, अनुभववादाशी, निसर्गवादाशी आणि ईहवादाशी आहे. मात्र विरोधी छावणीकडून एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास फक्त ‘खा, प्या, मजा करा’ अशा उथळ भोगवादात केला गेला.

एपिक्युरसच्या सुखवादी नीतिशास्त्राविषयी सांगायचं झालं तर त्याचा सुखवाद त्याच्या भौतिकवादी आणि अनुभववादी तर्कशास्त्राचं नैसर्गिक अपत्य आहे. भौतिक जग इतर सगळ्या गोष्टींचं आधारभूत तत्त्व असल्यानं भौतिक जगाचा आणि त्यातील स्थित शरीराचा द्वेष एपिक्युरसच्या दृष्टीनं आत्मवंचना ठरते. त्यामुळे शरीर एकाचवेळी साधन आणि साध्य ठरतं. मन, बुद्धी, चित, वेदना, सुख इत्यादी गोष्टींना शरीरेतर स्वतंत्र अस्तित्व नसून त्या शरीराच्या कृती आहेत. शरीरासोबत या शरीराधारित कृतींचासुद्धा शेवट होत असतो.

एपिक्युरसनुसार वेदना टाळणं आणि सुखाचा शोध घेणं हा मानवी स्वभाव आहे. त्यादृष्टीनं तो जेरेमी बेंथम या आधुनिक सुखवादी विचारवंताचा पूर्वसुरी ठरतो. मात्र एपिक्युरसचा सुखवाद हा भांडवलवादी भोगवादाशी संबंधित नसून त्याला छेद देणारा आहे. एपिक्युरसचा सुखवाद समजून घेण्यासाठी त्यानं केलेलं मानवी इच्छांचं वर्गीकरण लक्षात घेतलं पाहिजे. एपिक्युरसनुसार इच्छा तीन प्रकारच्या असतात. (अ) नैसर्गिक आणि आवश्यक, (ब) नैसर्गिक आणि अनावश्यक, (क) अनैसर्गिक आणि अनावश्यक.

नैसर्गिक आणि आवश्यक इच्छांच्या पूर्तीतच खरं सुख आहे असं एपिक्युरस मानतो. तहान लागलेल्या माणसाला पाणी अमृततुल्य वाटतं. श्रमानंतर केलेला आराम सुखदायी ठरतो. थोडक्यात, काम्यू म्हणतो तसं खरं सुख सगळ्यांना परवडणारं असतं. मात्र बेगडी, दिखाऊ आणि तुलनात्मक सुख महाग क्रयवस्तू बनते. एपिक्युरस म्हणतो की अतिरेकी संपत्तीसंचय, सत्ता, बेगडी नावलौकिक सारख्या अनैसर्गिक आणि अनावश्यक इच्छांचा पाठलाग सुखदायी नसून खऱ्या सुखाचा शत्रूच ठरतो. तत्कालीन नागरी जीवन आणि आजचा भांडवलवादी सुखवाद तिसऱ्या वर्गातील इच्छांवर आधारित आहे! एपिक्युरस निरर्थक गरजांनी ग्रस्त नागरी जीवनाचा त्याग करून निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाशी एकरूप होऊन जगायला सांगतो. त्यामुळे निसर्गवादाच्या बाबतीत तो रूसोचा पूर्वसुरी ठरतो. एपिक्युरसचा भौतिकवाद जीवनद्वेष्टा आणि शरीराचं दमन करणारा नसून ऐहिक जीवनावरील प्रेमाचा पुरस्कार करतो. त्यामुळे इरास्मुस, राब्ले, नित्शे, फुको सारख्या ‘लाफिंग फिलॉसफर्स’चा तो पूर्वज समजला जातो.

एपिक्युरसनं मृत्यूविषयी विस्तृत विवेचन केलं आहे. त्याच्या तर्कशास्त्रानुसार मृत्यू निरुपद्रवी आहे. मृत्यू म्हणजे शरीरासोबतच मन, बुद्धी, आत्मा, चेतना, जाणीव, भावना इत्यादी कृतींचा शेवट. चिद्वादी परंपरा मृत्यूनंतर शिल्लक राहणाऱ्या आत्म्याला शरीराचे गुणधर्म चिकटवते. शरीर तर भौतिकतेच्या ‘शून्या’त विलीन होतं. त्यासोबतच शरीराच्या वेदना, संवेदना, सुख दु:खं नष्ट होतात. मग शरीराचे गुण आत्म्याला जोडून परत शरीरसंबंधित भीतीच्या/प्रलोभनाच्या राजकारणाची आवश्यकता नाही, असं एपिक्युरस मानतो. अशा प्रकारे मृत्यूच्या भीतीला अनाठायी ठरवून त्याभोवती निर्माण झालेल्या अंधश्रद्धांसाठी तो कर्दनकाळ ठरतो. एकूणच एपिक्युरसचा विचार पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात एकाच वेळी निषिद्ध मानलं गेलेलं पण तीव्र आकर्षण निर्माण करणारं फळ आहे.

लेखक : श्री शरद बावीसकर 

 (यांच्या लेखाचा संकलित अंश) 

संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ || याजसाठी आम्ही करितो अट्टाहास || ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ || याजसाठी आम्ही करितो अट्टाहास || ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका वर्षी आम्हीं श्री क्षेत्र महाबळेश्वर ते प्रतापगड असा दोन दिवसांचा ट्रेल अनुभूती मध्ये आखला होता. आता प्रतापगडावर अगदी दरवाजापर्यंत पक्का रस्ता झाला आहे. त्यामुळं, प्रतापगड हे किती दुर्गम आणि परीक्षा बघणारं ठिकाण आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. पण हे जावळी प्रकरण आजही तसं भीतीदायकच आहे. आपण जावळीत घुसलो की, कुठं ना कुठं तरी प्रसाद मिळतोच. अंग ठेचकाळतं, करवंदाच्या जाळ्या ओरबाडून काढतात, पायात बोट-बोटभर काटे घुसतात. एकूण काय तर, जावळी आहेच दुर्गम..

महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण असलं तरी ते कुणासाठी? पर्यटकांसाठी.. पायी भ्रमंती करणाऱ्या ट्रेकर्सना घामाच्या धारा लागणं स्वाभाविक आहे. आम्ही असे चढून वाट काढत काढत गडावर गेलो. देवळाच्या बाहेरच्या पायऱ्यांवर टेकलो आणि क्षणांत झोपेच्या आधीन झालो. सहसा प्रतापगडावर येणारे पर्यटक इतके थकले-भागलेले पाहण्याची गडकऱ्यांना सुद्धा सवय राहिलेली नाही. त्यामुळं, आमच्यापैकी एकाला जाग आली तेव्हा समोरुन एक पोरगं पळत पळत आलं अन् आमची जुजबी माहिती घेऊन पळून गेलं. आमच्यापैकी कुणाच्याच अंगात त्राण नव्हतं, हे कुणालाही अगदी सहज समजत होतं. काहीजण अजून झोपले होते, काहीजण उठून बसले होते. पाच मिनिटांत दोन मुलं पाण्याची कळशी घेऊन आली. सोबत पाण्याचे दोन चार पेले होते.

“घ्या पानी. च्या आनू का?” दोघांपैकी एक पोरगं बोललं.

“आरं, भज्याचं इचार की. पंधरा वीस लोकं हायेत. पाचशे रुपयाची भजी तर अशीच हानतील गपागप.. ” दुसरं पोरगं त्याच्या कानात सांगत होतं. मी त्यांच्या मागंच पडलो होतो. त्यामुळं मला सगळं ऐकू येत होतं. “आण चहा सगळ्यांसाठी. पण साखर कमी टाक. फार गोड करु नको. ” असं त्याला सांगितलं. दोघांनी भराभर माणसं मोजली अन् पळाले. थोड्या वेळानं चहा आला.

“भजी आनू का?” 

“नको रे. आधी जरा गड फिरुन येतो. मग खाऊ भजी. ” मी म्हटलं.

“पन नक्की खानार नव्हं?” त्यानं खुंटा बळकट करण्यासाठी पुन्हा चाचपणी केली.

“हो रे बाबा. खाणार भजी. ” असं म्हणून आम्ही वर निघालो.

आमच्या गटात एक पाचवीत शिकणारा मुलगा होता. वयानं तो सगळ्यात लहान. पण चांगला काटक होता. दहाच्या दहा दिवस तो मला चिकटलेला असे. आम्ही बालेकिल्ला चढत होतो, दरवाजातून आत गेलो. प्रतापगडावर आता मोठं शॉपिंग मार्केट उभं आहे. भरपूर दुकानं आहेत. महाराजांच्या पुतळ्याकडे जाण्याच्या वाटेवर ती दुकानं लागतात. त्यापैकी एका दुकानात एक मुलगा आणि मुलगी थांबले होते. बहुधा खरेदी करत असावेत.

ऐन मे महिन्याचे दिवस. मुलीने फारच कमी कपडे घातले होते. (बहुधा जितके आखूड कपडे तितकं ऊन कमी लागत असावं) मी त्या जोडीकडं पाहिलं होतं आणि मी त्यांना पाहिलंय, ते ह्यानं पाहिलं होतं.

“ओ दादा, ह्यांना जरा गड दाखवा की. ” दुकानदारानं हाक मारुन सांगितलं. मी हातानंच खूण करुन ‘चला’ असं म्हटलं. ते दोघे आमच्यासोबत आले. मुलगा मुलीची पर्स सांभाळत चालत होता. मुलगी हातात कोल्ड्रिंक चा कॅन घेऊन आमच्यासोबत फिरत होती. आम्हीं तटावरून फिरत होतो. दूरवरून दिसणाऱ्या वेगवेगळ्या घाटवाटा दाखवत होतो.

हा सगळा मुलूख मुळातच माझ्या आवडीचा आहे. अन् विशेषतः कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मशाली अन् पलोत्यांच्या पिवळ्या तेजाळ प्रकाशात प्रतापगड जो विलक्षण देखणा दिसतो, त्याला तोड नाही.

आम्ही गड पाहिला आणि अन् पुन्हा बालेकिल्ल्याच्या दरवाजापाशी आलो. तोवर विविध ठिकाणी जोडीचे भरपूर फोटो काढून झाले होते. सोशल मीडियावर पोष्टूनही झाले होते. आमची मुलं हे सगळं बघत होती, पण मीच काही बोललो नाही म्हणून कुणीच काही बोललं नाही. त्यांचा निरोप घेताना मात्र या छोट्या मुलानं वार काढलाच.

“आपको अब तक पता चल गया होगा की, यह किला किसने बनाया और यहां क्या क्या हुआ है?” त्यानं थेट विचारलं.

“हां हां.. सब मालूम हो गया. आपके सर ने सब कुछ अच्छे से बताया. ” तो मुलगा म्हणाला.

“तो आपको यह भी समझ आया होगा की, यह किला हमारे लिए बहुत पवित्र जगह है. ” 

“हां. मालूम हो गया. “

“आप मंदिर जाते हो, तब ऐसेही कपडे पहन कर जाते हो?”

“नहीं तो. ऐसे मंदिर कैसे जा सकते हैं?”

“तो यहां पर कैसे आये?”

“हम तो महाबळेश्वर आये थे, तब कॅब वाले ने बोला की यहां पर किला है, तो हम आ गये. ” 

ज्या पद्धतीनं हा मुलगा त्या दोघांना तासत होता, ते बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. दोन्हीं हातात पट्टे चढवलेला पट्टेकरी जसा पट्टे फिरवत असतो, तसा हा छोटा मावळा त्या दोघांची पिसं काढत होता. गडावरच्या आजूबाजूच्या आयाबाया आवाज ऐकून तिथं जमल्या होत्या.

हा बहाद्दर त्या दुकानदाराला ही म्हणाला, “तुम्ही गडावर येणाऱ्या लोकांना असे कपडे घालून अशा ठिकाणी यायचं नाही असं का सांगत नाही?” दुकानदार गप्प उभा.

“लेकिन यह मंदिर नहीं है, सिर्फ एक किला ही तो हैं” ती मुलगी म्हणाली.

“आपके लिए किला होगा, हमारे लिये मंदिर ही है. आगे से किसी भी किले पर जाओगे तो पुरे कपडे पहन कर जाईये” त्यानं जोरदार ठणकावलं.

सॉरी म्हणून दोघेही तिथून भराभर खाली उतरुन चालायला लागले. अन् इकडं आमच्या ह्या मावळ्याचं गडभर कौतुक. एका आजीबाईंनी सगळ्यांना ताक दिलं. दुकानदारानं त्याला महाराजांचं चित्र असलेला एक टीशर्ट अन् एक छोटीशी मूर्ती भेट म्हणून देऊ केली. ह्यानं माझ्याकडं पाहिलं. मी मान डोलावली. त्यानं मूर्ती घेतली पण शर्ट घेतला नाही.

“महाराजांचं चित्र असं शर्टवर छापणं योग्य आहे का? लोकं हेच शर्ट घालून तंबाखू खातात, इकडं तिकडं थुंकतात, गडावर कचरा करतात. असे शर्ट विकू नका. ” एखाद्या मोठ्या माणसासारखा तो बोलला. सणकन कानफटात बसावी तसे सगळे एक क्षणभर गप्प झाले.

“एवढा माल संपल्यावर पुन्हा नाही विकणार” दुकानदार म्हणाला. पोरांनी टाळ्या वाजवल्या.

संध्याकाळचे चार वाजून गेले होते. आम्हाला पुढं शिवथरघळीत मुक्कामाला पोचायचं होतं. मी सगळ्यांना चला चला म्हणत होतो.

पुन्हा खाली मंदिरापाशी आलो. वरची धुमश्चक्रीची बातमी खाली कळली होती. ती दोन लहान मुलं खाली आमची वाटच पाहत होती.

“दादा, भजी आनू ना?” 

“आण आण” मी सांगितलं. दोघं टणाटण उड्या मारत पळाले.

जरा वेळात झकास कांद्याची अन् बटाट्याची गरमागरम भजी आली. सगळ्यांच्या पोटात भूक पेटलेली.. पाच मिनिटांत भज्यांचा फन्ना उडाला. मग पुन्हा एकदा भजी आली. नंतर चहा आला. खाऊन झाल्यावर मी पैसे विचारले. पोरं काही बोलेनात. वरुन त्यांच्या आजीनं ओरडून सांगितलं, “पैशे नाही घेनार. तुमच्या पोरांनी आज गड लई गाजवला. म्हनून आमची खुशी समजा. ” 

मी नको नको म्हणत वर गेलो. आजींना पैसे घ्यायचा आग्रह केला. तेव्हां त्या म्हणाल्या, “माजी जिंदगी गेली ओ गडावर. आता लोकं कशे बी येत्यात. कशेबी कपडे घालत्यात. लाजच नसती. कोन कुनाला बोलनार ओ? आज तुमचं ते पोरगं बोललं. मला बरं वाटलं. माज्या नातवाचीच उमर असंल त्येची. म्हनून माज्यातर्फे भेट समजा. पन पैशे घेनार नाय. ” 

असली माणसं भेटली की, अंगावर काटा फुलतो. त्यांची वाक्यं काळजावर कोरली जातात. ज्या व्यक्तीला शंभर माणसं सुद्धा ओळखत नाहीत, त्या अतिशय सामान्य माणसाच्या भावना कशा असतात, हे अशा प्रसंगांमधून दिसतं. त्यांच्या माणूस म्हणून जगण्याच्या कल्पना आजघडीला मूक असल्या तरी तितक्याच ठाम आहेत. त्या भावना जपण्यासारखं वातावरण आता या जुन्या गडकऱ्यांना दिसतच नाही. आता खिशात पैशांचा खुर्दा खुळखुळणारी माणसंच जास्त दिसतात. त्यांना खुणावणारी जीवनशैलीच निराळी असते. म्हणून, असा एखादा अपवाद दिसला की, या जुन्या माणसांच्या बुजलेल्या झऱ्यांना पुन्हा पाझर फुटतात.

“अनुभूती” मधून मुलांना नेमकं काय मिळतं, याचं उत्तर हे असं आहे. प्यायला पाणी घेताना सुद्धा मागून घेतील, ते पाणी जितकं हवं आहे तितकंच घेतील, पानात एक घाससुद्धा अन्न वाया घालवणार नाहीत, विनाकारण वीज वाया घालवणार नाहीत. कारण त्यांना या गोष्टींची खरी किंमत कळलेली असते. जेव्हा आपल्या पूर्वजांनी अभिमानानं जपलेल्या गोष्टींची टिंगल उडवण्याचा उद्योग उडाणटप्पू लोकं करतात, तेव्हा त्यांचे कान उपटण्याचं कामसुद्धा ही मुलं अगदी व्यवस्थित करतात. कारण एकच आहे – योग्य काय आणि अयोग्य काय, याची नेमकी जाणीव होणं.

यश, सत्ता, संपत्ती या फार वेगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात आधी महत्त्वाची आहे ती आपल्या मुलांची योग्य जडणघडण. त्यातला खारीचा वाटा निभावण्याचा प्रयत्न आम्ही अनुभूती च्या माध्यमातून करतो. मशागत व्यवस्थित केली की, त्याची फळं उत्तमच मिळतात. तसंच अनुभूतीचं आहे. स्वामी विवेकानंदांनी समाजाकडे मागितलेले शंभर युवक तयार करण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते आम्हीं करतो आहोत..

यंदा ७ मे, २०२५ रोजी “अनुभूती” चा शुभेच्छा समारंभ आहे, आणि ८ मे, २०२५ रोजी रात्री ब्राह्म मुहूर्तावर यंदाच्या मोहिमेचा नारळ वाढणार आहे… ! तुम्हां सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवेतच.. ! 

|| भारत माता की जय ||

(अनुभूती २०२५ – ८ मे, २०२५ ते १९ मे, २०२५ – (संपर्क – 9135329675)

(यंदा अनुभूतीला वीस-बावीस मुलं-मुली घेऊन जातोय. गडोगडीच्या डोंगरदऱ्या, वाड्या, वस्त्या, मेटी सगळं दाखवायला.. माणसांचा परिचय करून द्यायला आणि खरंखुरं आयुष्य जगायला शिकवायला..

 पुढच्या पिढीत माणूसपण रूजलं पाहिजे, आस्था-आपुलकी अंकुरली पाहिजे, त्यांची संवेदनशील मनं बहरली पाहिजेत, यासाठी गेली १९ वर्षं हा खटाटोप मांडतो आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र, पण सह्याद्रीसारखा इतिहासपुरूष या सगळ्यांना नक्की बाळकडू पाजेल, याची आम्हाला खात्री आहे. – – –मयुरेश डंके.)

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

(दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!) – इथून पुढे —-

पाऊस पडून गेल्यानंतरचा सुखद गारवा आणि मातीचा मंद सुवास म्हणजे दानिश भाई… दया, करुणा, प्रेम निर्माण होण्यासाठी अशांना एखादा प्रसंग किंवा व्यक्ती समोर असण्याची गरज वाटत नाही… यांचे पात्र कायम प्रेम आणि करुणा यांनीच काठोकाठ भरलेले आणि भारलेले असते…

तहानलेल्या बाळाला पाहून आईला जसा पान्हा फुटावा, तसं एखाद्या गोरगरिबाचे दुःख आणि वेदना पाहून यांच्या पात्रालाही पान्हा फुटतो… आणि मग झिरपत राहतात जिव्हाळा, माया आणि प्रेम नावाच्या भावना…! यातलंच एक नाव श्री. दानिश भाई…!!!

आता जागा मिळण्यासारखी अशक्यप्राय गोष्ट दानिशभाई मुळे शक्य झाली. दहा वर्षांची माझी फरपट थांबल्यानंतर, आता मला काय वाटत असेल, हे मी कोणत्या शब्दात, कसं सांगू ? 

आपण भविष्यात जेव्हा कधी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगार  केंद्र सुरू करू त्यावेळी तेथील प्रकल्प कसे असावेत याचा विचार खूप वर्षांपूर्वीच मी आणि मनीषाने करून ठेवला होता. आपण जे काही प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहोत त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांच्या शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होता कामा नये, आपण जे काही करू त्यामुळे प्रदूषण तर वाढणार नाहीच; परंतु अस्तित्वात असलेले प्रदूषण कमी होईल, कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा व्यवसायांचे प्रशिक्षण द्यायचे, जेणेकरून गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा या व्यवसायाच्या आधारावर जगू शकतो…. असे आणि आणखीही बरेच काही निकष आम्ही ठरवले होते. त्या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू करायचे ठरवले आहे. 

  1. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण) –

वैद्यकीय, त्यातूनही आयुर्वेदिक क्षेत्रात असल्यामुळे समजले, डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर हवी असते. (हल्ली ऑरगॅनिक / नैसर्गिक चा बोलबाला असल्यामुळे कंपन्यांचा भर कृत्रिम रंग आणि वास (Essence) न वापरण्याकडे आहे ) हे आमच्या पथ्यावर पडले…! अशी फुले आम्ही गोळा करून त्यांची पावडर करून या कंपन्यांना विकणार आहोत.

अनेक फुलं देवाच्या दारात, मंदिराबाहेर पडलेली असतात, त्याला “निर्माल्य” म्हटले जाते…. अनेक फुलांच्या पाकळ्या, फुलविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा रस्त्यावर अनेकदा उकिरड्यावर पडलेल्या असतात, त्याला “कचरा” म्हटले जाते… आपण कोणाच्या संगतीत आहोत त्यावरून आपली प्रतिष्ठा ठरते हेच खरं …! आपण “निर्माल्य” की “कचरा”… ? हे आपण कुणाच्या सहवासात आहोत त्यावर ठरते. असो. 

* आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून हे निर्माल्य आणि कचरा उचलतील, किलोच्या भावाने आपण तो विकत घेऊन त्यांना पैसे देऊ. 

* ज्यांना आपण बैठे काम करण्यासाठी निवडले आहे, असे आपले वृद्ध लोक फुलांची रंग आणि जाती नुसार (जात म्हणजे गुलाब, झेंडू, निशिगंधा, जास्वंद वगैरे वगैरे 😊) वर्गवारी करतील. 

* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून त्यांना विशिष्ट तापमानात सुकवले जाईल. या प्रक्रियेत सर्व अशुद्धी (Impurities) इथे नष्ट होतील. 

* यानंतर वर्गवारीनुसार फुलांची पावडर (चूर्ण) केले जाईल. 

* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. 

यातील बऱ्याचशा बाबी मशीन वर होणार आहेत, या मशीन अत्यंत सुरक्षित आणि एका क्लिकवर चालणाऱ्या आहेत… जवळपास पाच लाखांच्या या मशिन्स आपल्याला  सेंचुरी एन्का कंपनी देणार आहे. माझे ज्येष्ठ स्नेही डॉ निलेश लिमये सर यांचा या मशीन घेऊन देण्यात सिंहाचा वाटा आहे. 

तर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोफेशनली आपण हे प्रॉडक्ट विकणार आहोत, मिळालेला सर्व पैसा हा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना रोजगार म्हणून देणार आहोत.

आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत…. रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) कचरा आणि निर्माल्यामधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल ! 

  1. शोभेचा बुके

तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. माझी आई, जो बुके बनवते, त्याला फार खर्च येत नाही, दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं… आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते. 

माझ्या आयुष्यातली प्रथम शिक्षिका, प्रथम प्रशिक्षिका माझी आई… लहानपणी डोळे उघडले तेव्हा तीच दिसली होती…  तेव्हा मी तीच्या छायेखाली होतो…. आज थोडा वयाने मोठा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तीच दिसली… आता तीच्या छायेखाली माझ्यासारखे अनेक अभिजीत घालत आहे… या प्रकल्पात तिला आम्ही प्रशिक्षिका म्हणून येण्याची विनंती केली आहे… आईच ती… नाही म्हणेल कशी…. ? 

आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना विकत घेण्याची विनंती करू. रोटरी क्लब, लायन्स क्लब तथा अन्य संस्थांना कार्यक्रमावेळी फुलांचे बुके वापरण्या ऐवजी आमचे बुके विकत घेण्याची विनंती करू. यातून जो निधी मिळेल, तो आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दिला जाईल. 

  1. लिक्विड वॉश

कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत. 

यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे. (ज्येष्ठ मेहता सर हे दानिश भाईंचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत, या जन्मात तरी दोघांचे ऋण मला फेडणे शक्य नाही‌)

हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी विकत घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत, त्याचप्रमाणे आयटी कंपन्या, मॉल्स अशा मोठ्या संस्थांच्या हाउस कीपिंग डिपार्टमेंटला भेटून आपले लिक्विड वॉश विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. यातून मिळणारा निधी, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत. 

Big Bucks या कंपनीचे मालक श्री विपुल भाई शहा यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. 

  1. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे… प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे.

ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत. समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अपील करणार आहोत. पिशव्यांची विक्री करून, मिळणार आहे तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.

तर असे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे… ! हा प्रकल्प म्हणजेच आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे… ! बाळाचं नाव काय ठेवायचं ? बारसं कधी करायचं ? अशी आमच्याकडे लगबग सुरू आहे… 

भिक्षेकर्‍यांसाठी प्रशिक्षण केंद्र / रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी जागा हवी…  हे दहा वर्षे उरात जपलेलं स्वप्न पाठलाग करून सुद्धा प्राप्त झाले नाही, मी आशा सोडली होती… जेव्हा कधी या प्रकल्पाचा विचार करायचो, तेव्हा कायम समोर काळाकुट्ट अंधार दिसायचा… अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री सारखा ! परंतु अनेक अनाकलनीय घटना माझ्या सुद्धा नकळतपणे घडत गेल्या, आणि हे राखेत निपचित पडलेलं… विझत चाललेलं स्वप्न, नव्या जोमानं मशाल होत पुन्हा पेटून उठलं… या मशालीच्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले… डोळ्यासमोरच्या काळ्याकुट्ट अंधारात दूरवर दिसणारा अत्यंत प्रखर आणि तेजस्वी असा हा प्रकाश म्हणजे माझ्या आयुष्याच्या मध्यरात्री उगवलेला जणू सूर्य वाटला… !

ज्या भीक मागणाऱ्या समाजासाठी आपण काम करतो, त्यांच्याही आयुष्यात असाच काळाकुट्ट अंधार आहे ; या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्या सुद्धा घरात आता दिवा लागेल… सन्मानाने ! 

दुसऱ्याचा प्रकाश उधार घेऊन जे जगतात त्यांना ग्रह म्हणतात…. ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते तारे म्हणून मिरवतात… आजपर्यंत माझ्या आणि मनीषा च्या आधाराने जगलेले जे ग्रह आहेत, ते या प्रकल्पाच्या निमित्ताने तारे होतील…. आयुष्याच्या या टप्प्यावर, काळ्याकुट्ट मध्यरात्री, आता ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील… ते स्वयंप्रकाशित होतील… स्वयंपूर्ण होतील… तेजस्वी तारा होतील सूर्यासारखा!

ठरलं… आता ठरलं…. 

आपल्या या नवीन बाळाचं नाव ‘मध्यरात्रीचे सूर्य…!!!” हेच ठेवायचं ठरलं… 

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांमुळे इथवर तरी आलो…. आता सगळ्यात मोठे आव्हान आणि माझी परीक्षा इथून पुढे सुरू होईल…

सुरुवातीच्या टप्प्यात आपण साधारणपणे 25 लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेणार आहोत. आमच्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून …

  1. प्रत्येक व्यक्तीस रुपये 150 प्रतिदिन.
  2. सकाळचा चहा, नाष्टा आणि दुपारचे जेवण.
  3. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा.

अंदाजे रुपये 300 दर दिवशी एका व्यक्तीसाठी खर्च आहे…  25 लोकांसाठी रुपये 7500 प्रति दिवस… सुट्ट्या वगळता 25 दिवस जरी काम झाले तरी महिन्याचा खर्च रुपये 1, 87, 000 (एक लाख सत्याऐंशी हजार)… यात कच्चा माल, फिरतीसाठी वाहन, पेट्रोल, मेंटेनन्स म्हणजे लाईट बिल वगैरे वगैरे खर्च समाविष्ट नाहीत. 

आमच्याकडे काम करणाऱ्या सर्वांना रोजच्या रोज पगार देणे मला भाग आहे… रोजच्या रोज चूल पेटवायची असेल तर रोज त्यात लाकडं सुद्धा घालावी लागतील…! असो…

हा प्रकल्प नेमका काय आहे, कुठून कुठवर आलो, यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे, फलित काय मिळेल, आव्हानं काय आहेत याची सर्वांगीण कल्पना यावी, यासाठी आपल्यासमोर, वरील प्रमाणे सर्व काही व्यक्त केलं आहे. 

चैत्र शु. १ गुढीपाडवा, अर्थात 30 मार्च 2025  या शुभ दिनापासून प्रकल्प सुरू करण्याची “मनीषा” आहे…! पुढे जे जसे घडेल तसे नक्की कळवत राहीन…

प्रश्न खूप आहेत, पण तुम्हा सर्वांच्या साथीनं उत्तरं सुद्धा मिळतील, असा विश्वास आहे… इथवर ज्याने आणून सोडलंय, तो पुढे न्यायला नाही कसा म्हणेल… हि श्रद्धा आहे… आपण दिलेल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांवर, मनापासून निष्ठा आहे…

मला काही नको… फक्त सोबत रहावे, मी चालत राहीन, प्रयत्न करत राहीन, वाटेत मात्र कधी मोडला माझा कणा, तर फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा…!!!

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे,

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

ज्या स्वप्नाचा गेली दहा वर्षे जीव खाऊन पाठलाग केला, जे स्वप्न पाहताना कधी झोप आलीच नाही, ज्याने गेल्या दहा वर्षात खूप रडवले, थकवले, हरवले अशा नुकत्याच साकार होऊ पाहणाऱ्या त्या स्वप्नाची हि कथा… माऊली आपल्या सर्वांसमोर सादर… कारण हे स्वप्न पाहण्याची शक्ती तुमच्याच मुळे मिळाली आहे… फक्त तुमच्यामुळे!!!

तर, आयुष्याच्या सुरुवातीला भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती; त्यांच्या मदतीमधून उतराई व्हायचे, त्यांच्या उपकाराचे कर्ज डोक्यावर होते त्यातून उतराई व्हायचे, या भावनेतून, भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्र प्रमुख म्हणून असलेली नोकरी 2015 साली सोडून काम सुरू केले.

आमच्या या भीक मागणाऱ्या समाजाला वैद्यकीय सेवा, स्वयंरोजगार आणि पुनर्वसन तसेच भिक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण असे एका मागोमाग एक अनेक प्रकल्प सुरू झाले. हे सर्व काम भीक मागणारे लोक जिथे असतात, तिथेच म्हणजे रस्त्यावर, उकिरडा किंवा गटारा जवळ, भर गर्दीतल्या फुटपाथ वर चालते.

दीडशे किलोचे साहित्य मोटर सायकल गाडीवर आणि बॉडीवर वागवताना या दहा वर्षात अनेक छोटे-मोठे एक्सीडेंट झाले. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी हाडे मोडून घेतली. हरकत नाही, चूल पेटवायची म्हटल्यानंतर लाकडं जाळावीच लागतात…! भिक्षेकर्‍यांच्या घरात चूल पेटावी, म्हणून मी हाडं घातली..!

तर, याचना करणाऱ्या लोकांनी स्वयंरोजगार करावा, सन्मानाने नागरिक म्हणून जगावे यासाठी त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गांनी काम करण्यासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केली. हळूहळू तुम्ही सर्वजण मला भेटत गेलात… माझा हूरूप वाढला… तुम्हीच माझे आई बाप झालात…!

माझ्या आई बापाने जन्म दिला, तुम्ही कर्म दिले!

तर, हे सर्व करत असताना लक्षात आले; की जन्मल्यापासून ते आतापर्यंत शिक्षण किंवा कोणत्याही स्किल्स भिक्षेकरी वर्गाकडे नाहीत. आणि म्हणून नोकरी, धंदा – व्यवसाय यांच्यापासून हे लोक खूप दूर आहेत. यांनी नोकरी धंदा व्यवसाय करावा म्हणून, यांना काहीतरी शिकवायचे म्हटले तर, कुठेतरी बसवून यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावे लागेल याची जाणीव झाली.

यानंतर भीक मागणाऱ्या लोकांसाठी एखादे प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र उभे करून तिथे व्यवसायाभिमुख स्किल्स देऊन यांना यांच्या पायावर उभे करावे हा विचार डोक्यात आला, परंतु त्यासाठी एखादी जागा ताब्यात असणं गरजेचं होतं मग सरकारी, निमसरकारी, बिगर सरकारी अशा सर्व यंत्रणांना “आम्हाला जागा देता का? जागा…?” म्हणत झोळी घेऊन फिरलो. “अनेक माणसं भिंती वाचून, छपरापासून, इतरांच्या माये वाचून, माणूस होण्याचा प्रयत्न करत, रस्त्या रस्त्यात भीक मागत आहेत… यांना माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे… जिथून कोणी उठवणार नाही; अशी भाड्याने का होईना पण जागा देता का? जागा….?” गावकरी होण्यासाठी झटणाऱ्या, या “सम्राटांसाठी मी नट झालो… ” 

मी जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक व्हायचे…. परंतु जागा द्यायचा विषय आल्यानंतर, आमच्या जागेत हे गलिच्छ लोक येणार? किती घाण करतील हे लोक? असा विचार होऊन आम्हाला कायम नकार मिळत गेले. पुण्यातील अनेक बिल्डिंग मधल्या सोसायटी मधील चेअरमन साहेबांचे पाय धरून त्यांचा हॉल रीतसर भाड्याने मागितला, पण अत्यंत प्रेमाने, प्रत्येकाने ‘शेजारच्या बिल्डिंगमध्ये विचारा’, असा सल्ला दिला. शेजारच्या बिल्डिंग वाल्यांनी, त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगचा रस्ता दाखवला…. आम्ही रस्त्यावरचे, शेवटी रस्त्यावरच राहीलो, यांच्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र काढण्याचे स्वप्न दरवेळी भंगत गेले…!

ज्यांना भीक मागणे सोडायचं आहे, ज्यांना आमच्या केंद्रात काम करायचे आहे, असा वर्ग, दरवेळी मला भेटला; की विचारायचा, ‘सर मिळाली का जागा आपल्याला?’ अनेक हितचिंतक विचारायचे, ‘डॉक्टर तुम्हाला जागा मिळत नाही म्हणजे काय? समाजाचे काम करणाऱ्याला, दानशूर लोक दोन-चार एकर जागा सहज देतात… तुम्हाला चार-पाचशे स्क्वेअर फुटाची जागा मिळेना? अहो काय हे…??’ ”इतके पुरस्कार आणि सत्कार होतात, पण तुम्हाला कोणी जागा का देत नाही???’ या

सर्वांच्या प्रश्नामुळे माझ्या जखमेवर आपोआप मीठ पडायचे… डोकंच चालायचं नाही…!

खूप वेळा काम झाल्यानंतर, अंगावरचा apron काढून भिक्षेकऱ्यांमध्येच बसून मी काय करावं, कोणाशी बोलावं, कसा मार्ग काढावा? याचा डोक्याला हात लावून विचार करत असे… असा भिक्षेकऱ्यांमध्ये बसलेलो असताना, सहानुभूतीने, भिकारी समजून, माझ्या पुढ्यात भीक म्हणून खूप लोक पैसे टाकायचे… ‘धडधाकट आहे, अंगावर कपडे पण चांगले आहेत; तरी भीक मागतोय बघ कसा नालायक… ‘ अशी माझ्या माघारी, माझ्याच विषयी झालेली कुजबुज सुद्धा मी कितीतरी वेळा ऐकली. हे ऐकून, डोळ्याच्या वाटेने अश्रू ओघळायचे… प्रचंड राग यायचा… खूप वेळा वाटायचं, शासनाला किंवा इतर कोणालाच या कामाची गरज वाटत नाही… तर मला तरी ती गरज का वाटावी? मरू दे…. सोडून देतो उद्यापासून हे सर्व…! मी पूर्णतः हरून फ्रस्ट्रेट होऊन जायचो…

मी उठणार इतक्यात, मामा मामा, म्हणत चार-पाच वर्षाचं मूल मांडीवर येऊन बसतं… ‘तु का ललतो मामा, तुला भूक लागली?’ महिनाभर आंघोळ न केलेलं, काळकुट्ट एक बाळ माझ्या गालाचा मुका घेत विचारतं…. भीक मागण्यात व्यस्त असलेली त्याची आई मागून बोलते, ‘हा मामाला भूक लागली आसंल, म्हणून मामा रडतो…! ‘ 

भूक हेच आमच्या लोकांसाठी अंतिम सत्य…! भुकेच्या पलीकडे काही नाहीच…! भुकेसाठी लढायचं…. भुकेसाठी मरायचं…! जन्माला येऊन एवढं एकच करायचं…! ! ! या भुकेची शिसारी आली आहे आता मला…! “भूक”… मग ती कसलीही असो…. माणसाला वाकायलाच लावते…!

यानंतर ते बाळ त्याच्याकडे एकमेव शिल्लक असलेला वडापाव माझ्या तोंडापुढे धरतो आणि म्हणतो, ‘तू खा मामा, माजं पोट भरलंय… ‘ ज्याच्याकडे खूप काही आहे, त्याने देणं आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने देणं… यात खूप फरक आहे. प्रश्न एकच, खरा श्रीमंत कोण??? 

आत्तापर्यंत सावकाशपणे वाहणारे अश्रू नकळतपणे मग महापूर होतात… भावनेच्या भरात, त्या नागड्या पोराला मी घट्ट मिठी मारतो… तेवढ्यातूनही तो ‘मामा मामा’ म्हणत मला घास भरवतो… माहित नाही कसा, पण तो बाळकृष्ण होतो आणि मी सुदामा होऊन जातो…!

यानंतर मला माझीच लाज वाटायला लागते… हि नागडी पोरं अशीच नागडी जगणार, मोठी होणार, भूक भूक करत नागडी आणि बेवारस म्हणूनच मरणार… स्वतःकडे काही नसताना ज्याने तुला वडापाव खाऊ घातला, त्याला तू आयुष्यभर उपाशी ठेवणार? ज्यांनी तुला मामा म्हटलं, काका म्हटलं, बाळा, सोन्या म्हणत नातू, मुलगा मानलं, ज्यांनी तुझ्याकडे आशेने डोळे लावले… त्यांना असंच रस्त्यावर बेवारस मरायला सोडून देणार? ‘सोडून देतो सर्व म्हणताना, लाज वाटत नाही का रे तुला?’ मीच हा माझा मलाच प्रश्न विचारायचो…

डोक्यात प्रचंड गदारोळ उठायचा… पण या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मला फ्रस्ट्रेशन मधून बाहेर काढलं, लढण्याचं सामर्थ्य दिलं. यानंतर हात वर करून शरणागती पत्करलेला मी, पुन्हा पुन्हा सज्ज व्हायचो…! हे असं…. एक नाही, दोन नाही, पाच नाही, तर तब्बल दहा वर्षे, म्हणजे आजपर्यंत सुरूच आहे. दहा वर्षे मी या गोष्टीची दाहकता भोगतो आहे…

मधल्या काळात तुम्हा सर्वांसारखाच… एक मोठ्या मनाचा… मनाची गडगंज श्रीमंती असणारा भला माणूस निसर्गाने माझ्या झोळीत टाकला. त्यांचे नाव दानिशभाई शहा! ! ‘हातात पुरस्कार आणि कपाळावर नकार’ अशा माझ्यासारख्याच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला.

बिबवेवाडी परिसरात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयी करता त्यांची मालकी हक्काची बिल्डिंग आहे. त्यापुढील साधारण दोन हजार स्क्वेअर फुट जागा पार्किंग साठी त्यांनी शिल्लक ठेवली होती. ही मोकळी जागा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोफत वापरण्यास आपल्याला देऊ केली आहे. त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हातामुळे माझी दहा वर्षाची घुसमट एका क्षणात थांबली.

काही माणसं असे दैवी हात घेऊन जन्माला येतात आणि एखाद्याच्या आयुष्याचं भलं करून जातात… वर ‘आपण काहीच केलं नाही’ या अविर्भावात नामा निराळे होतात…!

मला या माणसाचा हेवा वाटतो…! ! ! ते फक्त जागा देऊन थांबले नाहीत, स्वतःच्या घरचं कार्य आहे असं समजून चारही बाजूंनी पत्र्याचे शेड आणि डोक्यावर छप्पर करून दिले… दरवेळी मला ते या जागेवर बोलावून विचारायचे ‘डॉक्टरसाहेब आणखी काय करूया?’ दरवेळी मी घुम्यागत त्यांच्या पायांकडे पाहत राहायचो… काही मागायला माझी जीभ उचलायची नाही…

मी बोलत नाही असे पाहून… ते इकडे तिकडे, जागेकडे पाहत, मागे हात बांधून फिरत राहायचे… फिरता फिरता स्वतःशीच बोलत राहायचे, ‘ उन्हाळ्यात उकडणार… मोठे पंखे लागतील… थंडीच्या दिवसात लवकर रात्र होते, लवकर अंधार होईल…. चांगल्या लाईट इथे लागतील… ‘ प्रत्येक वाक्यानंतर लाईट आणि पंख्यांची ऑर्डर दिली जायची.

पुढच्या वेळी असंच हात मागे बांधून फिरता फिरता मला विचारायचे, ‘डॉक्टर साहेब, तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही काहीच बोलत नाही… ‘ 

त्यांच्या इतक्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला मी…. भिजलेल्या मांजरागत भेदरून जायचो… मी काय बोलणार? 

पुन्हा स्वगत म्हणायचे, ‘आपल्या कडे आपल्या जागेत आता रोज पाहुणे येणार, त्यांचे सामान ते कुठे ठेवणार…?’ डाव्या तळहातावर उजव्या हाताच्या बोटांनी ताल धरत, गाणं म्हणाल्यागत ते बोलत राहायचे… ‘काय करूया…? अजुन काय करूया…? काय काय करूया….???’ म्हणत पुन्हा ते कोणालातरी फोन लावायचे, यापुढे लोखंडी कपाट आणि लॉकरची ऑर्डर, सीसीटीव्हीची ऑर्डर, रेडीमेड टॉयलेट ची ऑर्डर जायची… त्यांनी तळ हातावर धरलेला तो ताल होता; की माझ्या हृदयाची धडधड… हे मात्र मला कधी समजलं नाही…!

माझ्या या लोकांना, इतर लोक भिकारी म्हणतात, मी त्यापुढे जाऊन त्यांना भिक्षेकरी किंवा याचक म्हणतो… हा देव माणूस याही पुढे जाऊन माझ्या लोकांना “पाहुणे” म्हणतो…!

भीक मागणाऱ्या समाजात मी उठतो बसतो, त्यांच्याबरोबर माझं नातं तयार झालंय, म्हणून मला त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि प्रेम वाटणे स्वाभाविक आहे, पण दानिश भाईंचं काय? त्यांना या लोकांबद्दल का जिव्हाळा वाटत असावा? मी यावर खूप विचार करत असे.

पाऊस पडून गेल्यानंतर मागे एक आल्हाददायक वातावरण तयार होते… मातीतून एक सुगंध यायला लागतो… पाऊस पडून गेला तरी मागे त्या पावसाच्या पाऊलखुणा उरतात…!

दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ते’ सात पृथ्वीवासी -… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

‘ते’ सात पृथ्वीवासी – ☆ श्री संदीप काळे ☆

कल्याण जवळच्या मुरबाडमध्ये रेखा दळवी नावाच्या आजी राहतात. गेल्या दोन वर्षांपासून ‘त्या’ माझे लेख वाचून सातत्याने मला फोन करून, एकदा मी त्यांना भेटावे अशी विनंती मला करीत होत्या. परवा मी आजींना भेटण्यासाठी खास मुरबाडला गेलो होतो. कोणीच नसणाऱ्या आजींनी पुस्तकांना आपलेसे करून स्वतःचे आयुष्य प्रचंड समृद्ध करून घेतले आहे. माझी ७२ च्या ७२ पुस्तके आजीबाईंकडे पाहून मी एकदम अवाक झालो.

आजींची भेट घेऊन निघताना रस्त्यात अनेक मुले वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये दंग झाली, असे दृश्य मी पाहत होतो. कोणी मातीचे दागिने बनवत होते. कुणी मातीची भांडी तयार करत होते. कुणी मोठे शिल्प साकारत होते. कोणी चित्र काढत होते. कुणी फोटोग्राफी करत होते. कुणी तबल्यावर गाणं म्हणत रियाज करत होते. कुणी नाटकाची तालीम करीत होते. तिथे असणारा प्रत्येकजण कला, संस्कृती आणि मातीला धरून काम करीत होता. त्याच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता त्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही, असे होते. मी तिथे गेलो, त्या सर्वांच्या कामामध्ये सहभागी झालो. ते जे काही प्रवास करीत होते तो प्रवास समजून घेतल्यावर मी एकदम थक्क झालो.

मी आमीर खानचा ‘रंग दे बसंती’ चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात आमीर खानचे सर्व मित्र चिरंतर बदलासाठी मोठी लढाई लढतात. आणि अपेक्षित बदल त्यांच्या पदरात पडतो. ‘क्रांती’ची सुरुवात एक व्यक्ती करत असतो, आणि त्या ‘क्रांती’ची छोटी ठिणगी सगळीकडे जम बसवते. तसा एकदम बदल होत नाही, पण जो बदल होतो तो चिरंतर टिकणारा होतो. असेच ‘सेम टू सेम’ या सात मित्रांनी केले आहे.

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी असणारे, कलाकार या नात्यातून एका ठिकाणी गुंतलेले सात मित्र कलेसाठी, शाश्वत जगण्याच्या लढाईसाठी एकत्रित येतात. ते जे निर्माण करू पाहत होते, त्याचा होणारा इतिहास हा सोनेरी अक्षराने लिहिला जाणार, याचा कधी कोणी विचारही केला नसेल.

मी ज्या ठिकाणी होतो, तिथे असणारी मौर्विका मला सांगत होती, “प्रत्येक गावात, भागात असणारी कला, तिथली संस्कृती हे तिथली ओळख आहे. ती कायम टिकली पाहिजे. कलेमुळे शिक्षण घेण्यासाठी रुची वाढेल यासाठी अद्भुत प्रयोग आम्ही युवकांनी सुरू केले. ज्यातून हजारो मुले कला संस्कृतीकडे वळली. ” 

एक एक गाव काबीज करीत या सर्व तरुणांना आता अवघा देश काबीज करायचा आहे. आजही अनेक शाळांत, अनेक गावांत या युवकांना निमंत्रित केले जात आहे.

प्रतीक जाधव, मौर्विका ननोरे, राहुल घरत, कल्पेश समेळ, निखिल घरत, प्रतीक्षा खासणीस, निनाद पाटील या सात जनांनी कलेसाठी राज्यभर हाती घेतलेले काम कौतुकाचा विषय ठरले आहे. हे सात जण कला विश्व चळवळीचे नायक आहेत. हे सातही जण मोठे कलाकार आहेत. चित्रकार, फोटोग्राफर, नाट्यकलावंत इतिहासाचा उपासक आदी कलेतले हे उच्चशिक्षित आहेत.

या चळवळीची सुरुवात झाली, प्रतीक जाधव (8928682330) यांच्या चार वर्ष झालेल्या कला प्रवासातून. प्रतीक यांनी २०१९ ते २०२४ या दरम्यान देशभर सायकलवरून प्रवास केला. या प्रवासातून त्यांनी देशभरात असणारी कला, संस्कृती पाहिली, तिचा शोध घेतला. प्रतीक म्हणाला, “मी मूळचा बीडचा, पण आता मुंबईकर झालो. माझे वडील श्रीराम जाधव हे शिक्षक होते. मी सातवीत असताना बाबांचा अपघाती मृत्यू झाला. मी ११ वीमध्ये असतांना माझी आई पंचफुला जाधव हिचे कॅन्सरने निधन झाले. मी एकटाच राहिलो होतो. बाकी नातेवाईकांचा मला आधार होता, पण लहानपणापासून स्वतःच्या पायावर उभे राहून जगायची सवय लागली.

मला चित्रकला, शिल्पकलेमध्ये प्रचंड रुची होती, मी त्यात उच्च शिक्षण घेतले. तेच ते शहरातले जगणे, तीच ती नोकरी हे मला नको होते. त्यातून माझी सायकल यात्रा निघाली. मी सायकलवर भारत का फिरलो तर माझ्याकडे प्रवास करायला पैसे नव्हते. मी जेव्हा चार वर्षांनी परत आलो तेव्हा, काहीतरी वेगळे करायचे या हेतूने आम्ही ‘अर्थियन आर्ट फाऊंडेशन’ सुरू केले. “

मी प्रतीकला मध्येच म्हणालो, “‘अर्थियन’ म्हणजे काय?”

तेव्हा प्रतीक म्हणाले, “’अर्थियन’ या शब्दाचा अर्थ ‘पृथ्वीवासी’ असा होतो. निसर्गाशी सुसंगत राहण्यावर आणि मानवांना जोडण्यासाठी माणसा माणसांतील दुभंगलेपण दूर करण्यासाठी आम्ही माणुसकीसाठी गती घेऊ पाहत आहोत. आमच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ” प्रतीक सांगत होता, आणि मी सारेकाही ऐकत होतो.

हे सात मित्र एकत्रित आले आणि त्यांनी कला जोपासण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी रचना आखली आणि मग त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.

मी आणि प्रतीक बोलत असताना बाजूला एक मुलगा मातीचा मुखवटा बनवत होता. प्रतीक मला म्हणाला, “दादा, हा विजय पाते, गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्याशी जोडला गेला आहे. विजयला पूर्वी शाळेत जाण्यात, अभ्यास करण्यात रुची नव्हती. पण जेव्हापासून विजय आमच्या कार्यशाळेत सहभागी झाला, तेव्हापासून त्याच्या शाळा आणि अभ्यासातली रुची वाढली. असे हजारो मुलांविषयी झाले. मुलांना जर कलेमध्ये रुची निर्माण झाली तर आपोआप ते अभ्यासात, शाळेत नक्की रुची दाखवतील. ”

प्रतीक जे जे सांगत होता, ते सारे बरोबर होते. सर्व प्रकारच्या कलेत रुची वाढावी यासाठी मुरबाड जवळच्या पळू येथे ‘अर्थियन’ आर्ट फाऊंडेशनची सुरुवात झाली. येथे उभे केलेलं कला केंद्र गावागावांत उभे राहिले पाहिजे, असे ते मॉडेल होते. येथे मुलांसाठी होणाऱ्या कार्यशाळा, हेरिटेज वॉक, कला सादरीकरण, कला प्रदर्शन, भित्तीचित्रे, स्वछता मोहीम, हे सारेकाही पाहण्यासारखे होते.

त्या साऱ्यांना मला काय दाखवू काय नाही असे झाले होते. पळू या गावामध्ये या सर्व मित्रांनी कला केंद्रासाठी जंग जंग पछाडून तीन एकर जागा घेतली. त्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली. पळू सारखाच उपक्रम आसपासच्या वैशाखरे, सिंगापूर, मांडवत या गावात सुरू केले होते. मी जिथे जिथे या सर्व टीमसोबत गेलो तिथे तिथे या सर्वानी प्रचंड जीव ओतून काम केले होते.

मी प्रतीक आणि मौर्विका यांना म्हणालो, “तुमच्याकडे जे काही होते ते पदरमोड करून तुम्ही हे सारे उभारले. एक पुढची पिढी घडवण्याचे काम तुम्ही करताय, आता पुढे कसे करणार?”

त्यावर मौर्विका म्हणाली, “माहित नाही. काम खूप मोठे आहे, ते पूर्ण होणार आहे, पैशांची प्रचंड अडचण आहे. आणि अडचण आहे म्हणून कोणते काम थांबत नाही. “

या सर्व टीम मधील असलेली तळमळ कमालीची होती. या सर्वांना स्वतःविषयी काही देणेघेणे नाही, सामाजिक क्रांती करायची आहे आणि ती गतीने करायची आहे, हेच या सर्वांचे ध्येय आहे.

आम्ही जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून खूप मोठा सामाजिक आशय माझ्यापुढे साकारत होता. प्रतीक म्हणाला, “जगायला सर्वात महत्वाचे काय लागत असेल तर तो आनंद, समाधान असतो. शहरात हा आनंद तुम्हाला मिळणार नाही. गावातल्या प्रत्येकाच्या वागणुकीमध्ये तुम्हाला या आनंदाची झलक सतत दिसेल. मीठ आणि पेट्रोल सोडून आम्ही सर्व काही घरी बनवू शकतो. आणि आम्ही ते करतोय. या निर्मितीचा प्रत्येक विषय हा कलेशी संबंधित आहे, जो आम्ही प्रत्यक्षात उतरवतो.

परवा मला एका आजीचा फोन आला. आजी म्हणाल्या, ‘माझ्या मुलीच्या नावाने तुम्हाला काही पैसे पाठवते, ती आता या जगात नाही. तिलाही कलाकार व्हायचे होते’, असे म्हणत आजी रडायला लागली. असे मदत करणारे अनेक भावनिक हात पुढे येत आहेत. “

त्यांचे काम समजून घ्यावे तेव्हढे कमी होते. अवघा दिवस घालवल्यावर मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो. मी विचार करत होतो, इतिहासामध्ये जसा औरंगजेबाला प्रश्न पडला होता, ‘माझ्या अवघ्या टीममध्ये जर एक छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा माणूस असता तर मी अजून मोठा इतिहास घडवला असता’, तसा प्रश्न या सर्वांना भेटल्यावर, त्यांचे काम पाहिल्यावर मलाही पडला होता.

या सात पृथ्वीवासी उत्साहाने, नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या तरुणांप्रमाणे जर आपल्या राज्यातल्या प्रत्येक गावात एक तरुण जरी पुढे आला तरी रोज नवा इतिहास लिहिला जाईल. माती संस्कृतीसाठी मोठे काम उभे राहणे आवश्यक आहे. असे मोठे काम राज्यातल्या प्रत्येक गावात उभारले जाईल. बरोबर ना.. ! 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूमुखातील ते पंधरा दिवस !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“मृत्यूमुखातील ते पंधरा दिवस ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्यांना त्याच्यावर संशय होताच… पण त्यांच्या संशयाबाबतच ते काहीसे साशंक होते! कारण तो तर त्यांच्यासारखाच.. नखशिखांत अतिरेकी. भारतीय सैनिकांच्या रक्ताची तहान असलेला नवतरुण. त्याच्या भावाचा इंडियन आर्मीच्या गोळ्यांनी खात्मा झाला होता म्हणून त्याचा त्याला सूड उगवायचा होता. त्याच्याकडे हल्ल्याची संपूर्ण योजना कागदावर आणि डोक्यात अगदी तयार होती. कुणाचाही या योजनेवर विश्वास बसावा अशी ती योजना होती. भारतीय सैनिकांचा तळ नेमका कुठे आहे, तिथे एकावेळी किती सैनिक असतात, शस्त्रास्त्रे कोणती वापरली जातात… त्यांच्या गस्तीचे मार्ग कोणते इ. इ. सारी माहिती नकाशांसह अगदी अद्ययावत होती. फक्त योग्य वेळ साधून हल्ला चढवायचा अवकाश…. निदान त्यावेळे पुरती का होईना… भारतीय सेना हादरून जावी! पण या कामासाठी त्याला आणखी मदत हवी होती. म्हणून त्याने या दोघांना भेटण्याचा गेली दोन वर्षे प्रयत्न चालवला होता. शेकडो खब-यांच्या माध्यमातून या दोघांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला होता… आणि आता कुठे त्यात त्याला यश आले होते! हे दोघे होते पाकिस्तानी हिज्बुल मुजाहिदीन नावाच्या कुप्रसिद्ध अतिरेकी संघटनेचे कमांडर… अबू तोरारा आणि अबू सब्झार. या दोघांनी अनेक अतिरेकी कारवाया करून अनेकांचे बळी घेतले होते आणि शेकडो काश्मिरी तरुणांना अतिरेकाच्या मार्गावर ओढले होते. त्याची आणि या दोघांची भेट झाली आणि त्याच्या चेह-यावर एक निराळाच आनंद पसरला… मक्सद सामने था! त्यांना वाटले आणखी एक बळीचा बकरा गवसला.. याला तर भडकावण्याची गरज नाही… याच्या डोक्यात तर भारताविषयी पुरेपूर द्वेष भरलेला आहे आधीच. त्यांनी त्याचे स्वागत केले. तो त्यांच्यासमवेत डोंगरात, जंगलात लपून राहिला. भारतीय सैनिक आपला नेमका कुठे शोध घेत आहेत, हे त्याला पक्के ठाऊक होते. त्यांच्या हाती लागू नये, म्हणून त्याने या आपल्या नव्या दोस्तांना उत्तम मार्गदर्शनही केले. त्यामुळे तो त्यांच्या आणखी मर्जीत बसला.

इफ्तेखार… त्याच्या या नव्या नावाचा अर्थच मुळी होता महिमा! अर्थात कर्तृत्वातून प्राप्त होणारे महात्म्य.. मोठेपणा! हे नाव स्वीकारून त्याला फार तर आठ पंधरा दिवस झाले असतील नसतील… पण या अल्पावधीत त्याने त्याचे कुल, त्याचा देश आणि त्याच्या गणवेशात असणाऱ्या आणि येऊ पाहणाऱ्या लाखो लोकांच्या मनात कायम आदराचे स्थान मिळेल अशी कामगिरी केली. त्याचे पाळण्यातलं नाव मोहित… म्हणजे मन मोजणारा श्रीकृष्ण. तो होताच तसा राजस.. खेळकर आणि खोडकर.

खेळात प्रवीण आणि अभ्यासात हुशार. घराण्यात सैनिकी सेवेची तशी कोणतीही ठळक परंपरा नसताना या पोराने घरी सुतराम कल्पना न देता सैन्याधिकारी सेवेत प्रवेश करण्यासाठीचा अर्ज भरला.. परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. तोपर्यंत घरच्यांनी त्याला दिल्लीतून थेट महाराष्ट्रात श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात धाडून दिले होते. वर्ष होते १९९५. सैन्याधिकारी पदासाठी होणार असलेल्या मुलाखतीचे पत्र त्याच्या घरच्यांच्या हाती पडले.. पण त्यांनी त्याला काहीही कळवलं नाही! पोराने सरळ आपलं इंजिनिअर व्हावं आणि आपली म्हातारपणाची काठी व्हावं असा त्यांचा उद्देश असावा. पण आपण परीक्षा तर दिली आहे.. उत्तीर्ण तर होणारच असा त्याला इतका विश्वास होता की त्याने थेट संबंधित कार्यालयात दूरध्वनी करून निकालाची माहिती मिळवली… भोपाळ येथे होणार असलेल्या मुलाखतीसाठी त्याला बोलावणं आलं होतं. श्री संत गजानन महाराज इंजीनियरिंग कॉलेजातून बेडविस्तर गुंडाळून साहेब थेट घरी आले. आणि तेथून भोपाळची रेल्वे पकडली. आपल्या आत्मविश्वासपूर्ण वागण्या बोलण्याने त्याने मुलाखतीत बाजी मारली. त्याला पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळाला होता… एक उमदा प्रशिक्षणार्थी सज्ज होता. एन. डी. ए. मधली कारकिर्द तर एकदम उत्तम झाली. घरी चिंटू असलेला मोहित इथे ‘माईक’ बनला! मोहित यांनी बॉक्सिंग, स्विमिंग, हॉर्स रायडिंग मध्ये सर्वोत्कृष्ट पातळी गाठली. नर्मविनोदी स्वभाव आणि दिलदार असल्याने मोहित एन. डी. ए. मध्ये मित्रांचे लाडके बनले होते.

एन. डी. ए. दीक्षान्त समारंभात देशसेवेतील प्रथम पग पार करून मोहित शर्मा आपल्या अंतिम ध्येयाकडे निघाले. इंडियन मिलिटरी अकादमी मध्ये दाखल होताच मोहित यांनी आपले नेतृत्वगुण विकसित करायला आरंभ केला. त्यांना Battalion Cadet Adjutant हा सन्मान प्राप्त झाला. तत्कालीन राष्ट्रपती महामहीम श्री. के. आर. नारायनन साहेबांना भेटण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली होती. इथले प्रशिक्षण पूर्ण करून साहेब सेनेत दाखल झाले.

मोहित हे १९९९ मध्ये लेफ्टनंट मोहित शर्मा म्हणून हैदराबाद येथील ५, मद्रास मध्ये दाखल झाले. येथील कार्यकाळ यशस्वी झाल्यानंतर मोहित साहेब पुढे ३३, राष्ट्रीय रायफल्स मध्ये कर्तव्यावर गेले. तेथेही त्यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडशन अर्थात सेनाप्रमुखांचे प्रशस्तीपत्र पटकावले… एक उत्तम अधिकारी आकार घेत होता!

अतिरेकी विरोधी मोहिमेत त्यांना स्पेशल फोर्सेस सोबत काम करायची संधी मिळाली आणि ते त्या कामावर मोहित झाले… तिथे प्रत्यक्ष कारवाई करण्याची जास्त संधी होती… त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी स्पेशल फोर्सेस मध्ये प्रवेश मिळवून अतिशय आव्हानात्मक Para Commando पात्रता प्राप्त केली. वर्ष २००४ उजाडले. काश्मीर खो-यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आता समोरासमोरची लढाई उपयोगाची नव्हती… गनिमी कावा करावा लागणार होता. यासाठी सेनेने मोहित यांना पसंती दिली. मोहित साहेबांनी दाढी, केस वाढवले. काश्मिरी, हिंदी भाषा तर त्यांना अवगत होत्याच. अतिरेक्यांची बोलीभाषा त्यांनी आत्मसात केली. खब-यांचे जाळे विणले गेले. अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत यांनी त्या दोघांचा अर्थात तोरारा आणि सब्झारचा माग काढलाच… आणि मेजर मोहित शर्मा भूमिगत होऊन इफ्तेखार भट बनून अतिरेक्यांच्या गोटात सामील झाले… कुणाला संशय येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होतीच… पण जीव मात्र धोक्यात होता…. किंचित जरी संशय आला असता तर गाठ मृत्यूशी होती. अबू तोरारा आणि अबू सब्झार यांनी या त्यांच्या नव्या शिष्याची इफ्तेखार बट ची योजना समजावून घेतली आणि तयारीसाठी ते तिघे भारत-पाक ताबा रेषेच्या पार, पाकिस्तानात गेले. तिथून सारी सूत्र हलवायची होती. त्यादिवशीची सायंकाळ झाली आणि काहवा (काश्मिरी चहा) पिण्याची वेळसुद्धा. इफ्तेखार त्यांच्यात ज्युनिअर. त्यानेच चहा बनवणे अपेक्षित असल्याने त्याने तीन कप कहावा बनवला आणि ते तीन कप घेऊन तो या दोघांच्या समोर गेला. थंडी मरणाची असल्याने इफ्तेखारने अंगभर शाल लपेटली होती. अबू तोरारा याने इफ्तेखारकडे रोखून पाहिले… भारतीय सेनेची इतकी सविस्तर माहिती याला आहे यात त्याला काहीतरी काळेबेरे वाटत होते… त्याने थेट विचारले… तुम कौन हो असल में? हा एकच प्रश्न जीवन आणि मरणाची सीमारेषा ओलांडणार होता.. इफ्तेखारणे तोराराच्या डोळ्याला थेट नजर भिडवली… कितनी बार बताना पडेगा? अगर यकीन न होता हो तो उठा लो अपनी रायफल और मुझे खतम कर दो! असं म्हणत त्याने त्याच्या खांद्यावर लटकवलेली एके ४७ खाली आपटली. या त्याच्या बेबाक उत्तरावर ते दोघेही सटपटले! आपला संशय खोटा निघाला आणि या गड्याला राग आला तर एवढी मोठी मोहीम रद्द करावी लागेल.. पाकिस्तानी मालक नाराज होतील, अशी भीती त्यांना वाटणे साहजिकच होते! त्या दोघांनी कहावा चे कप उचलले आणि ते मागे वळण्याच्या बेतात असताना काहीसे बेसावध होते.. त्यांच्या खांद्यांवर एके ४७ होत्याच…. त्या खाली घेऊन झाडायला त्यांना काही सेकंद लागले असतेच… ही संधी गमवाली तर पुन्हा कधी मिळेल ते सांगता येणार नाही… इफ्तेखार याने विचार केला…. क्षणार्धात आपल्या शालीखाली कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढले… ते आधीच लोड होते… आणि para commando चे प्रशिक्षण प्रत्यक्ष व्यवहारात वापरून दाखवले… दोन गोळ्या छाताडात आणि एक डोक्यात.. अचूक. काही सेकंदात दोन अतिशय खतरनाक अतिरेकी त्यांच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेले! इफ्तेखार निवांतपणे तिथल्या बाजेवर बसले… कहावा संपवला. आणि रात्र होण्याची वाट पाहू लागले… त्यांनी भारतीय सेनेच्या इतिहासातील एक आगळेवेगळे अभियान यशस्वी पार पाडले होते! रात्रीच्या अंधारात हे इफ्तेकार भारतीय सीमेमध्ये सुखरूप परतले. या त्यांच्या अजोड कामगिरीबद्दल सेनेने त्यांचा विशेष सन्मान केला. दोन मोठे अतिरेकी गमावल्यावर आणि ते अशा रीतीने गमावल्यावर पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन पुरते हादरून गेले होते… यह इंडियन आर्मी है! ही घोषणा त्यांच्या कानांमध्ये खूप दिवस घुमत राहिली. आणि इकडे अवघ्या भारतीय सेनेते आनंदाची एक लाट पसरली होती. मेजर मोहित शर्मा यांची ही कामगिरी न भूतो अशीच होती. मोहित साहेबांना यासाठी सेना मेडल देण्यात आले.

ते जेंव्हा सुट्टीवर घरी पोहोचले तेंव्हा रेल्वे स्टेशनवर त्यांना उतरून घ्यायला आलेले त्यांचे बंधू आणि आई-वडील त्यांना ओळखू शकले नव्हते… एवढा एखाद्या अतिरेक्यासारखा त्यांचा शारीरिक अवतार झाला होता!

पुढे त्यांची बदली बेळगावच्या आर्मी कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये कमांडो इंन्स्ट्रक्टर म्हणून झाली… एवढ्या कमी सेवाकाळात या पदावर पोहोचणे एक मोठी बाब होती. दरम्यानच्या काळात रीशिमा यांचेशी मोहित विवाहबद्ध झाले. रीशिमा त्या वेळी आर्मी सप्लाय कोअर मध्ये कार्यरत होत्या. त्यांचे वडील, भाऊ हे सैन्यात आहेत.

२००८ मध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोके वर काढले. एकावेळी सुमारे दहा अतिरेकी भारतात घुसल्याची खबर आपल्या सुरक्षा दलांना मिळाली. त्यांच्याविरोधात तातडीने ऑपरेशन हाती घेणे गरजेचे होते. अशावेळी अनुभवी अधिका-याची आवश्यकता ओळखून सैन्याने मेजर मोहित साहेबांना काश्मिरात बोलावणे धाडले. प्रत्यक्ष रणभूमीवर मोहित साहेब जास्त रमत असत. त्यांच्यासाठी ही तर एक चांगली बातमी होती. सेनेची योजना आकार घेत होती. मोहित साहेबांच्या पुतणीचा वाढदिवस आणि अशाच काही कारणासाठी साहेबांना घरी जाण्यासाठी रजा मंजुर झाली होती. पण त्याच वेळी त्यांच्या एका कनिष्ठ अधिका-याच्या भावाचा अपघाती मृत्यू ओढवला. पण मोहीम अगदी तातडीने हाती घेण्याची वेळ असल्याने त्या कनिष्ठ अधिका-याची रजा मंजूर होण्यात समस्या आली. ही बाबत मेजर मोहित यांना समजताच त्यांनी स्वत:ची रजा रद्द करून त्या कनिष्ठ अधिका-यास रजा मिळेल अशी तजवीज केली आणि स्वत: मोहिमेवर निघाले.

उत्तर काश्मीर खो-यातील कुपवारा सेक्टरमधील हापरुडा जंगलात दहा अतिरेकी टिपायचे आहेत… कामगिरी ठरली… मेजर साहेबांनी आपली सैन्य तुकडी सज्ज केली. योजना आखून त्या सैनिकांची वेगवेगळ्या तुकड्यांत विभागणी केली आणि स्वत: नेतृत्व करीत रात्रीच्या अंधारात ते त्या जंगलात शिरले. अतिरेकी मोक्याच्या जागा धरून लपून बसले होते. तरीही मेजर साहेब पुढे घुसले… रात्रीचे बारा वाजले असावेत. त्यांच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. अतिरेकी शस्त्रसज्ज होते. साहेबांसोबतचे चार कमांडो गंभीर जखमी झाले. साहेबांनी गोळीबार अंगावर झेलत दोन जखमी सैनिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांनी हातगोळे फेकत आणि अचूक गोळीबार करीत दोन अतिरेक्यांना यमसदनी धाडले. परंतू अतिरेक्यांच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीराचा वेध घेतला होता. पण मेजर साहेबांनी जखमांकडे साफ दुर्लक्ष केले आणि ते अतिरेक्यांच्यावर चालून गेले. उरलेले आठ अतिरेकी गोळीबार करीत होतेच… साहेबांनी त्यांना सामोरे जात त्यांच्यावर हल्ला चढवला… साहेबांच्या शरीरावर बुलेट प्रुफ jacket होते, परंतू हे jacket फक्त पुढून आणि मागून सुरक्षितता देते… त्याच्या बाजूच्या भागांतून गोळ्या आत शिरल्याने ते जबर जखमी झाले होते. पण त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला… आपल्या इतर साथीदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी आपली जागा सोडली नाही. एक जवान rocket डागण्याच्या तयारीत असताना त्याच्या हाताला गोळी लागल्याने त्याचा हात निकामी झाला. मोहित साहेबांनी कवर फायर घेत तिथपर्यंत पोहोचून ते rocket फायर केले. त्यामुळे अतिरेकी पुढे येऊ शकले नाहीत. यात खूप वेळ गेला… छातीत गोळ्या घुसलेल्या असतानाही साहेबांनी आणखी अतिरेक्यांचा खात्मा केला… आणि मगच देह ठेवला. त्यांच्यासोबत हवालदार संजय भाकरे (1 PARA SF, SM), हवालदार संजय सिंग (1 PARA SF, SM),

हवालदार अनिल कुमार (1 PARA SF, SM), पॅराट्रूपर शबीर अहमद मलिक (1 PARA SF, KC) आणि पॅराट्रूपर नटेर सिंग (1 PARA SF, SM) हे देशाच्या कामी आले. या मोहिमेत अतिरेक्यांकडून 17 असॉल्ट रायफल, 4 अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचर, 13 एके मॅगझिन, 207 AK ammunition, 19 UBGL ग्रेनेड, 2 ग्रेनेड, 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, 1 थुराया रेडिओ सेट आणि भारतीय चलनी नोटा हस्तगत करण्यात आल्या… यावरून अतिरेकी किती तयारीने आले होते, हे समजू शकते! 

मेजर मोहित शर्मा यांच्या असीम पराक्रमासाठी देशाने त्यांना शांतता काळातील सर्वोच्च सैन्य पुरस्कार, अशोक चक्र (मरणोत्तर) प्रदान केले. त्यांच्या पत्नी, ज्या आता मेजर पदी आहेत, त्यांनी २६ जानेवारी, २०१० रोजी तत्कालीन राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अशोक पुरस्कार स्वीकारला. मेजर मोहित यांच्या भावाची मुलगी, अनन्या मधुर शर्मा त्यांचे बलिदान झाले तेंव्हा एक दोन वर्षांची होती. तिने त्यांच्यापासून पुढे प्रेरणा घेत एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. मेजर साहेबांचे वडील राजेंद्रप्रसाद आणि मातोश्री सुशीला शर्मा यांना त्यांच्या लेकाचा खूप अभिमान वाटतो. दिल्लीतील राजेन्द्रनगर मेट्रो स्टेशनला मेजर मोहित शर्मा यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. २१ मार्च हा त्यांचा बलिदान दिवस. त्यानिमित्त ह्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न.

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कीटकभक्षी मांसाहारी वनस्पती” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “कीटकभक्षी मांसाहारी वनस्पती…☆ श्री जगदीश काबरे ☆

सस्तन प्राण्यांमध्ये जसे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी वनस्पती असतात. आश्चर्य वाटले ना! पण हे खरे आहे. कारण निसर्गाचा नियमच आहे ‘जिवो जीवस्य जीवनम्’…

कीटकभक्षी वनस्पती म्हणजे अशा वनस्पती ज्या कीटक आणि इतर प्राण्यांना खाऊन स्वतःचे पोषण मिळवतात, विशेषतः अशा ठिकाणी जिथे मातीमध्ये पुरेसा नायट्रोजन नसतो.

अशा काही कीटक भक्षी वनस्पतींची उदाहरणे पाहूया…

1) व्हीनस फ्लायट्रॅप (Venus flytrap): या वनस्पतीची पाने सापळ्यासारखी असतात आणि कीटक येताच ती लगेच बंद होतात.

2) पिचर प्लांट (Pitcher plant): या वनस्पतींच्या पानांचे रूपांतरण भांडे किंवा घडासारखे होते, ज्यात कीटक अडकतात.

3) सनड्यू (Sundew): या वनस्पतींवर चिकट रोम असतात, जे कीटकांना पकडतात.

कीटकभक्षी वनस्पतींची वैशिष्ट्ये:

1) या वनस्पती नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वे मातीतून पुरेसे शोषू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कीटकांकडून पोषण मिळवण्याची गरज भासते.

2) या वनस्पती विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर करतात, जसे की चिकट रोम, बंद होणारी पाने, किंवा भांडे किंवा कीटकांना पकडण्यासाठी घडासारखे रचना असते.

3) या वनस्पती कीटक आणि इतर लहान प्राण्यांना खाऊन त्यांना आवश्यक असलेला पोषणयुक्त आहार मिळवतात.

4) या वनस्पती दमट वातावरण आणि भरपूर प्रकाश असणाऱ्या ठिकाणी वाढतात.

खालील व्हिडिओत कीटक भक्षी वनस्पतींची पाने कीटकांना कसे पकडतात हे दाखवले आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की, मानव प्राणी सोडल्यास जगात कोणीही शाकाहाराचे स्तोम माजवत नाही. जगण्यासाठी आवश्यक असेल त्या सगळ्या मार्गांचा प्राणी आणि वनस्पतींकडून उपयोग केला जातो. कारण ते खानपानाच्या संबंधात आहाराला माणसासारखे देवाधर्माचे, माणुसकीचे व भूतदयाचे भंपक लेबल लावण्याएवढे ढोंगी नसतात.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्राक्तन… ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

? इंद्रधनुष्य ?

☆ प्राक्तन… ☆ श्री हेमंत तांबे 

(तेलंगणात IT park साठी 400 एकर जंगल जाळलं आणि तिथल्या प्राण्यांचा आक्रोश ऐकवणारा व्हिडिओ कुणीतरी पाठवला. तो तुम्ही शोधा. पण त्यामुळं झालेल्या दुःखातून जे स्फुरले ते पाठवतो आहे. वाचा!) 

निश्चिंत उभ्या जंगलाला…

अरण्य जाळायचा विचार समजला तेव्हा…

त्यानं संदेश पाठवले अश्राप पक्षांना आणि श्वापदांना…

थांबू नका नका इथं, कारण तो चिता रचणार आहे त्याचीच…!

निश्चिंत प्राण्यांनी चेष्टा केली जंगलाची…

उपदेश सुद्धा केला जंगलाला, म्हणाली आठव त्याचा वानप्रस्थाश्रम…

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अशी नातीगोती सांगणाऱ्या तुक्याचे दाखले सुद्धा दिले…

खो खो हसत गिरक्या घेतल्या माकडांनी झांडां भोवती…

सर्व म्हणाले, He is a jolly good fellow, he is a jolly good fellow…!

जंगलाला नव्हती काळजी, आपण बेचिराख होण्याची…

दिसत होती त्याला राख रांगोळी, पंख न फुटलेल्या पिल्लांची…

आणि ढुशी मारून दूध पिणाऱ्या पाडसांची…

जंगलाला आधीच ऐकू येऊ लागल्या, किंकाळ्या त्या अश्राप जीवांच्या…

माजला होता कोलाहल त्याच्या अंतरंगात…

आणि इच्छा झाली त्याला, सर्व अश्रापांना घेऊन पळून जाण्याची…

पण पाय नसल्यानं पळूनही जाता येत नव्हतं…

म्हणून त्यानं फांद्या मारल्या आपल्याच कपाळावर…!

आज मात्र दुःख झालं त्याला…

साधं दुःखही साजरं करता येऊ नये, आपल्याला उन्मळून पडण्याचं…?

का आणि कुणी दिला मला असला वर…?

आदिम संस्कृती जपण्यासाठी तुझी पाळं मुळं जातील खोलवर…!

जंगलाच्या त्या असहाय उद्विग्न अवस्थेत, जेव्हा सर्व संज्ञा लुप्त झाल्या होत्या…

तेव्हा कानांवर आले सूर अश्वत्थाम्याच्या करुणघन विराणीचे…

कर्णानं अबोध गहन शापानं भोगलेल्या निःश्वासाचे…

हायसं वाटलं त्याला, कोणीतरी सोबत आहे म्हणून…

धुरामुळं नाही, पण डोळे घट्ट मिटून सामोरं गेलं ते आगीला…

तरीही प्राक्तन कुणाला चुकलं नाही म्हणून, किंकाळ्या मात्र ऐकाव्याच लागल्या…!

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares