(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.“साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है संतोष के दोहे – नारी। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
(जन्म-आश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१,आपेगाव,पैठण वैशाख वद्य द्वादशी शके १२१९ मृत्यू तापीवरील मेहूण गाव).
मुंगी उडाली आकाशी ,तिने गिळिले सूर्याशी
थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला
विंचू पाताळासी जाय , शेष माथा वंदी पाय
माशी व्याली घार झाली , देखोनी मुक्ताई हासली…
-संत मुक्ताबाई
आश्विन शुद्ध प्रतिपदा ! आज घटस्थापना, आदिशक्तीचा जागर करण्याचे पर्व आणि संत मुक्ताबाई यांचा जन्म म्हणजे एका आदिमायेचाच जन्म दिवस म्हणायला हरकत नाही. आदिशक्ती असलेली मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची प्रेरणा स्थान होती. तिचे ताटीचे अभंग हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी निर्मिती मागची प्रेरणा होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही चार भावंडे म्हणजे आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांची मुले. बुद्धिमान व विरक्त असलेले विठ्ठलपंत लग्नानंतर संन्यास घेतात आणि काशीला जाऊन राहतात. पण पतिव्रता पत्नी रुक्मिणी प्रयत्नपूर्वक त्यांना गृहस्थाश्रमात आणते.विवाह होऊन ही संन्यास घेतलेला समजताच त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा काशीच्या गुरूंकडून मिळते. पण समाज त्यांना वाळीत टाकतो. परंतु याची शिक्षा समाज त्यांना देतो ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. चार चिमुकल्या मुलांसह कुटुंबाच्या होणार्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत व रुक्मिणी ठरवतात की आपल्या मुलांना समाज त्यामुळे स्वीकारणार असेल तर आपण हे प्रायश्चित्त घेऊ आणि खरच ते दोघेही ही शिक्षा म्हणून आत्मविसर्जन करतात. देहांत प्रायश्चित्त घेतात. त्या वेळी मुक्ताबाई फक्त चार वर्षाची असते.
भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मोठ्या निवृत्तीवर येऊन पडते. निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही सन्याशाची मुलं म्हणून समाज त्यांनाही वाळीत टाकतो.आईवडिलांचे छत्र गेले तरीही समाज मुलांना स्वीकारत नाही. जन्मापासून मुलांची परवड सुरूच असते. या कोवळ्या मुलांना स्वताला सतत सिद्ध करावे लागत असते. अशा परिस्थितीत छोटी मुक्ताबाई प्रौढ झाली नाही तरच नवल. समाजाने केलेला अन्याय आणि अपमान सहन करत करत लहनाची मोठी होत असते मुक्ताई,
तात आणि माता गेलीसे येथून,तेंव्हा आम्ही लहान पांडुरंगा |
निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न ,सांभाळी सोपान मजलागी ||
तुझ्या योगे हरी क्रमियेला काळ…
असे काही अंशी दुख मुक्ताईच्या शब्दात दिसते. शिवाय त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडलेले आहेत की मुक्ताबाईने आपल्या मोठ्या भावंडांनाही मार्गदर्शन केले आहे.
समाजातून सतत उपेक्षा, अपमान सहन न होऊन एक दिवस स्वतावरच चिडून ज्ञानोबा उद्विग्न होऊन, पर्णकुटिचे दार बंद करून आत ध्यानस्थ बसले. संन्याशाच्या पोराचे दर्शन घडले म्हणून मोठा अपशकुन झाला असे ज्ञानोबाला पाहून एकाने म्हटले, त्यामुळे ज्ञानोबा खिन्न झाले. निवृत्ती आणि सोपान यांनी ही विनवण्या केल्या. पण ज्ञाना दार उघडेना. मुक्ताबाईने विनवणी करूनही ते दार उघडेनात. छोट्याशा बहिणीने मुक्ताइने लडिवाळ पणे ज्ञानाला समजावले.ज्ञाना दादा चिडलाय, त्याची मनस्थिती बिघडली हे मुक्ता बाईंना लक्षात आले. ज्ञानोबा पेक्षा लहान असलेली मुक्ता आता त्यांना मोठ्या अधिकाराने मोठी होऊन समजवायला लागली. “लोक कितीही वाईट वागले तरी तुम्ही विचलित होऊ नका. आपला चांगला मार्ग सोडू नका. ताटी उघडा आता. या अवस्थेतून बाहेर या”. असं ममतेने सांगून ज्ञानेश्वरांचे मन वळवले. संतांची लक्षणे काय आहेत. योगी कसा असावा , आपले भूतलावरील अवतार कार्य काय आहे ते मुक्ता बाईंनी ताटीच्या अभंगात सांगितले आहे. ज्ञानोबांना जागृत केलं आहे.
चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
.
योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।
विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।
. शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।
विश्वपट ब्रह्मदोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
.
ब्रह्म जैसें तैशा परी आम्हा वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चाविली कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ज्ञानदेव दिवसेंदिवस जास्तच आत्ममग्न होत चालले आहेत हे मुक्ताबाईना जाणवते . या वेळी ज्ञानोबाचे मन शांत करण्याचा प्रयत्न मुक्ता बाई करते आणि स्वच्छ, सात्विक, पावन मनाच्या या योगी पुरुषाला तिच्या ज्ञानादादाला क्षणिक रागापासून परावृत्त करून त्याचे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करते. आपल्या पेक्षा लहान असलेली लाडकी बहीण मुक्ताई आध्यात्मिक आणि ज्ञानाने ओतप्रेत भरलेली तिची प्रेमळ विनवणी ज्ञानोबा मान्य करतात, शांत होतात आणि पर्णकुटी चे दार /ताटी उघडून बाहेर येतात. मुळातच योगी असलेल्या, तत्व चिंतक असलेल्या ज्ञानदेवांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य या चिमुकल्या मुक्ताबाईत होतं. याचा परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला, ते कार्यप्रवृत्त झाले आणि नेवाशाला भावार्थ दीपिका च्या निर्मितीची सुरुवात झाली. मुक्ताबाईंचे ताटीचे ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिले आहेत.
गुरु संत निवृत्तीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई घडत होत्या. नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना आणि ज्ञानेश्वरांना पण दिली होती. त्यामुळे दोघे आता गुरुबंधु-भगिनी झाले होते, प्रेम, आदर, भक्ती, ज्ञान दोघांनाही बरोबरच मिळत राहिले. कधी कधी मनात आलेली शंका मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना विचारत असे, ते शंका निरसन करत. निवृत्तीनाथ तर आईवडिलांचेही प्रेम लहान भावंडांना देत होते. तिन्ही भाऊ तसे मुक्ता बाईंचे गुरु बंधुच होते. पण तिची जडण घडण चालू असताना ती न कळत्या वयापासून कुटुंबावर होणार्या आघता मुळे अनेक प्रसंगांना सामोरी गेली होती. तिच्या छोट्याशा आयुष्यात अनेक घटना तिच्यासमोर घडल्या होत्या. ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ नुसार विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाईंची ही चारही मुले होती.
मुक्ताई ने योगी असलेल्या ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपल्या अभंगातून घेतला आहे. मुक्ताईच्या मते ज्ञानेश्वर योगी, संत. साधू, विरक्त, ज्ञानी, सद्गुरू, परमेश्वर आणि जगद्गुरू होते. असे वर्णन त्या अभंगातून करतात.
अशा अनेक घटना मुक्ता बाईंच्या आयुष्यात घडलेल्या दिसतात की, ज्यातून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता ते आपल्याला लक्षात येतं.यामुळेच मुक्ता बाई तेराव्या शतकातली संत परंपरेतली एक ‘स्त्री गुरु’ होऊन गेली हे कळतं. गुरु शिष्य परंपरेत तर वयाने लहान असलेली पण चांगदेवांची गुरु मुक्ताबाई होती.चांगदेवांना तिने पासष्टीचा अर्थ सांगितला.हा मुक्ताबाईंचा पहिला शिष्य.
संत निवृत्तीनाथ मुक्ताईचे गुरु, गुरूंचे म्हणणे ती अजिबात खाली पडू देत नसे, एक दिवस त्यांनी मांडे खाण्याची इच्छा मुक्ताईला बोलून दाखविली. मुकताईने लगेच तयारी केली. कुंभारवाडयात ती मातीचे परळ /भांडे आणण्यासाठी गेली असता, वाटेत विसोबा चाटी भेटले. तिच्या हातातले परळ हिसकावून घेतले आणि फोडून टाकले. कुंभारवाडयात सर्वांना ताकीद दिली की हिला कुणीही परळ देऊ नये. निराश होऊन मुक्ताई घरी आली. आपण निवृत्तींनाथांची इच्छा पूर्ण करू शक्त नाही याचा तिला खेद वाटला. दु:ख झाले. तिचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानोबा मदतीला आला. त्या योग्याने आपला जठराग्नी योग शक्तीने पेटवला आणि मुक्ता बाईंना सांगितले, “भाज आता पाठीवर मांडे” .
मुक्ताबाई आता कशी मांडे करते हे पाहायला विसोबा आलाच. उलट फजिती न होता मुक्ताबाईने मांडे भाजले होते हे पाहून विसोबा आश्चर्य चकित झाला. ही भावंडे असामान्य आहेत हे समजले . स्वत:ची चूक उमगली. आपल्याला प्रायश्चित्त मिळाले पाहिजे मगच आपला उद्धार होईल असे म्हणून तो त्यांचे उष्टे अन्न खाऊ लागला. ते पाहून,मुक्ताबाईने “विसोबा तू खेचरा प्रमाणे उष्टे का खातोस?” असे विचारले. आणि या प्रसंगानंतर विसोबा मुक्ताबाईंचे शिष्य झाले. अशी आख्यायिका आहे. अशाच प्रकारे संत नामदेव यांना ही गुरु चे महत्व पटवून देऊन गुरुशिवाय तुला मोक्षप्राप्ती होणार नाही असे निर्भीडपणे सांगितले.
तीर्थ यात्रेहून परतलेल्या ज्ञानेश्वरांची भेट घेतली आणि पुढे मुक्ताबाईनी आपला भाऊ ज्ञानेश्वर याची समाधी पाहिली.महिन्याभरातच सासवडला सोपान आणि वटेश्वरांची समाधी पाहिली. पुणतांब्याला चांगदेवांची समाधी पाहिली.आपल्या बंधूंप्रमाणेच आपल्या शिष्याच्या,चांगदेवाच्या समाधीचा सोहळा व्हावा असे निवृत्तींनाथांना व सर्व संतांना मुक्ताई ने सांगितले. त्यांचीहि अवतार समाप्ती झाली. आईवडीलांच्या छत्रा नंतर या भावांनीच तिला सांभाळले होते. जिवापाड प्रेम केले होते. त्यामुळे या दोघांची समाधी तिला सहन होणारी नव्हतीच.या सगळ्या घटनांनंतर मुक्ताबाई आणखीनच विरक्त झाली. उदासीन झाली. मुक्ताबाई, निवृत्ती आणि इतर संतांबरोबर वेरूळ. घृष्णेश्वर करत, वैशाख वद्य द्वादशीला तापी काठावर, मेहुण या गावी आली. नदीवर स्नानासाठी गेले असताना अचानक वीज कडाडली आणि मुक्ताबाई कुणाला काही कळायच्या आत अंतर्धान पावली. निवृत्तींनाथ मुक्ताबाईना खूप जपत होते,तरी हे असे कसे झाले, मुक्ताई कुठेच दिसत नाही ? क्षणात त्यांनी ओळखले की ही अवतार समाप्ती आहे.
ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी, आता ऐसी सखी नाही कोणी ||
निवृत्तीनाथ मुक्ताई सोडून गेल्यावर जो मनात आकांत झाला त्यावेळी हे म्हणतात. मुक्ताई ही मोठ्या भावांची छोटी आई तर होतीच पण त्यांची एक चांगली मैत्रीण, सखी पण होती. आता अशी मैत्रीण त्यांना शोधूनही सापडणार नव्हती.
संत नामदेवांनी पण तिची अवतार समाप्ती अनुभवली आणि त्याचे वर्णन केले आहे ते म्हणतात-
कडाडली वीज निरंजनी जेव्हा l
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l
जेव्हा निरंजनी गुप्त झाली l
गेले निवारुनी आकाश आभुट l
नाम म्हणे कोठे मुक्ताबाई l
संत जनाबाईंनी आदराने म्हटले आहे , “आदिशक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||”!
अशी ही आदिशक्ती मुक्ताबाई !
ले- डॉ. नयना कासखेडीकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती.
आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले. आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं.
या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला.
चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, मालाडला जाणार होत्या, तिच्या माहेरी. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं.
तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, “अरे देवा ! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन.”
‘यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस !’ विशाखा मनात म्हणाली.
“अहो, राजूभावजींना फोन करायला हवा ना?” तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ ! प्रसन्न सगळ्यात धाकटा.
” करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर ! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा नि त्यांव ! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला. मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे.”
“अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्या येतात धावून मदतीला !”
मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा.
असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले. पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते.
आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं.
त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली.
सईचा फोन आला होता, ‘ मी येऊ का आजीजवळ बसायला? ‘ उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती ! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून /मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.
विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. ‘जिव्हाळा’ च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. “अग, सुधाताईंचं ‘सुप्रभात’ आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?”
“हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर.”
“बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी ! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता ! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच.” असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा !
‘जिव्हाळा’, हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा ‘जिव्हाळा’ ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही.
कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.
सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’, चा मेसेज टाकला म्हणजे, ‘All is well’ समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते.
विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री संध्या पूरकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कंडक्टर…” भाग-१ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
व्यवसायाच्या निमित्तानं माझं खूप वेळा बाहेरगावी जाणं व्हायचं. त्यामुळे खूप वेळा प्रवास घडायचा, त्यांच्या खूप आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. या सर्व घटना साधारण ८/९ वर्षांपूर्वी घडलेल्या असल्या तरी कधीतरी अचानक मनाच्या खोल कप्प्यातून बाहेर पडतात आणि आजूबाजूला रुंजी घालायला लागतात . मानवी स्वभावाची जडणघडण, त्यांचे वेगळेपण, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. यात भेटलेल्या सर्वच व्यक्ती या सामान्य आणि अतिसामान्य वर्गातील होत्या, पण त्यांच्या वर्तणुकीचा जो वस्तूपाठ पाहायला मिळाला त्यामुळे त्यांनी गाठलेली उंची ही त्यांना असामान्यत्व बहाल केल्याशिवाय राहात नाही. ही असामान्य व्यक्तिमत्वच आपली प्रेरणा स्थानं आहेत याची नव्याने जाणीव झाली.
ह्या सर्व घटना वर म्हटल्याप्रमाणे २०१५ ते २०१८ या काळात घडलेल्या आहेत.
त्यावेळी मी प्रत्येक बुधवारी मुंबईला जात असे.
जाताना सकाळी लवकर रेल्वेनं जाऊन येताना मिळेल तसं रेल्वे किंवा बस पकडून पुण्याला परत यायचं हे अनेक वर्षं रुटीन चालू होतं. येताना आमच्या व्यवसायाकरीता लागणारी वेलची वाशी मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणं हा सुद्धा रूटीनचा भाग होता.
असंच एका बुधवारी वाशीहून पुण्याकडे जाणा-या बस स्थानकावर बसची वाट पाहत होतो. वेलचीचं दहा किलोचं छोटं बाजकं पण बरोबर होतंच. वेलचीचा खूप घमघमाट सुटायचा हे वेगळं सांगायला नको. तास दीड तास झाला तरी शिवनेरीचा पत्ता नव्हता. ज्या एक दोन आल्या त्या भरुन येत होत्या. त्यामुळे दोन तासांनी नाईलाजाने मिळेल त्या कर्नाटक राज्याच्या बसमध्ये बसलो. बसमध्ये मोजून ५/६ जणच होते. कंडक्टर आला तिकीट घेतलं, त्यानं चौकशी केली साब ” वेलची का अच्छा खुशबू आता है ” मग वेलची कुठून आणली, कशासाठी आणली, त्याचा उपयोग काय इ.ची जुजबी माहिती त्याला दिली. इतरांना तिकीटं देण्यासाठी पुढे निघून गेला. मी आपलं नेहमीप्रमाणे वाचन करायला सुरुवात केली.
काही वेळाने कानावर कानडीमध्ये चालू असलेली जोरदार बाचाबाची ऐकू आली. एका तरुण बाईबरोबर कंडक्टर तावातावाने बोलत होता. समजत काही नव्हतं पण बहुदा तिकीटाच्या पैशाबाबत काही तरी बोलणं चालू होतं असं लक्षात आलं. शेवटी त्यानं बस थांबवली आणि त्या बाईला खाली उतरण्यासाठी आग्रह करू लागला. तेंव्हा मात्र ती गयावया करून रडायला लागली. त्याबरोबरच तिचं एक वर्षांचं बाळ आणि ३/४ वर्षांचा मुलगा पण रडायला लागले.आणि एकच गोंधळ उडाला. त्यांचं कानडी बोलणं समजत नसल्याने मीच कंडक्टरला काय प्रकार आहे हे विचारलं. त्यानं सांगितलेली गोष्ट ऐकून एकदम धक्काच बसला…..
…… ती बाई म्हणे नव-याशी भांडण करून हाताला लागतील तेवढे कपडे आणि पैसे घेऊन तिच्या माहेरी कर्नाटकात जायला निघाली होती. पण पैसे अपुरे पडत असल्यानं कंडक्टर पुण्याला उतर आणि नंतर काय करायचं ते कर असं बजावत होता. मोठाच बाका प्रश्न निर्माण झाला होता. ती तरुण बाई लहान मुलांना घेऊन कुठं आणि कशी जाईल याची काळजी मला वाटायला लागली. काहीतरी तोडगा काढण्यासाठी मी पुढे झालो पण त्या बाईला कानडीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. मग कंडक्टरलाच दुभाष्या बनवून मी अडचण समजून घेतली. ती बाई मला म्हणाली, ” तुम्हीच माझे अण्णा (मोठा भाऊ) आहात, मी रात्री अपरात्री छोट्या मुलांना घेऊन कुठं उतरू ? तुम्ही मला थोडे पैसे उधार द्या. मी गावाकडे गेले की तुम्हाला मनीऑर्डर करून पैसे परत पाठवते.”
अशा गोष्टींचा अनुभव असल्याने माझा तिच्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं. पण तरीही ती बाई चांगल्या घरातील वाटत होती त्यामुळे तिला पैसे देऊन टाकावेत, जाऊ देत बुडीत खात्यात, असा विचार मनात आला. नाहीतरी शिवनेरी बसनं गेलो असतो तर ४५०/- रुपये तिकीट पडलं असतं आणि आताच्या बसला १५०/- रू खर्च झाले आहेत. मग जास्तीचा विचार न करता ५०/- रू. जवळ ठेवून ४००/- रू. कंडक्टरकडे दिले आणि एवढे पैसे तिला तिच्या गावापर्यंत पोचायला पुरतील का असं विचारलं तेव्हा त्याने आताचं गुलबर्ग्यापर्यंतचं आणि दुस-या पुढच्या बसचं तिकीट जाऊन १०/२० रू. शिल्लक राहतील असं सांगितलं. हा प्रकार बघून बसमधील इतर ४/५ जणांनी २००/- रू गोळा करून मुलांना खाऊ म्हणून दिले. हे बघून ती बाई अक्षरशः उठून रडायला लागली , पाया पडायला लागली. तुमचा पत्ता द्या. मनीऑर्डरने पैसे पाठवते असं म्हणायला लागली. पण मी नको म्हणून सांगितलं आणि गावाला गेलीस की नव-याला बोलावून घेऊन भांडणं मिटवून टाक असा सल्ला कंडक्टरकरवी दिला.
कोथरूड आल्यावर मी उतरण्याआधी, तिला जपून जा, मुलांकडे लक्ष दे असं सांगितलं आणि कंडक्टरला पण तसं बजावून तिला सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून देण्याची सूचना दिली. घरी गेल्यावरसुद्धा ती सुखरूप घरी पोचेल की नाही याची काळजी करत बसलो आणि एकीकडे तिला आपण मदत केली यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेत राहिलो. अर्थात हे प्रकरण आठवडा भरात विसरून गेलो. माझं रूटीन चालूच होतं. दीड दोन वर्षे पूर्ण झाली असावीत या घटनेला.
क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री सुधीर खांडेकर, पुणे.
संग्राहक – श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सहावी माळ) – मुक्ता ☆ श्री संभाजी बबन गायके☆
धृतराष्ट्र आंधळा म्हणून गांधारीने उसनं आणि राजस अंधत्व मिरवलं, तसं मुक्ताबाईंना करून चालणार नव्हतं. लेकीने बापाच्या घरी रहायचं नसतं, ती परक्याची अमानत असते हे तिने लहानपणापासून ऐकलं होतंच. त्यामुळे तिच्या बालमैत्रिणींसारखं तिचंही लग्न ठरलं तेव्हा तिला वेगळं असं काही वाटलं नाही. मात्र लग्नात घरात खूप आनंदी वातावरण असतं याचा अनुभव तिने मोठया बहिणींच्या लग्नात घेतला होताच. त्या बहिणी माहेरी आल्यावर तिकडचं जे वर्णन करायच्या ते मुक्ताबाईच्याही कानांवर यायचंच. माहेरवाशिणी आणि आईचा संवाद म्हणजे ओल्या काळजांचं एकमेकांना दिलेलं मऊ आलिंगनच असतं जणू. सासरच्या गोष्टींचा भला मोठा भारा बांधून आणलेला असतो लेकीने, त्यातील एक एक काडी ती उलगडत राहते अगदी मध्यरात्रीपर्यंत. उबदार गोधडीत आईच्या मऊ हातांवर डोकं ठेऊन तिच्याशी हितगुज करण्यातलं सुख इतर कुणाच्याही वाट्याला येणार नाही. या संभाषणात आईला तिचं स्वत:चं माहेर आठवत असतं. ती वरवर हं हं म्हणत असते आणि लेकीच्या कपाळावरून उजवा फिरवत फिरवत तिला थोपटत असते, तिला एखादा कानमंत्रही देत असते आणि जिवलग मैत्रीण असल्यागत मधूनच फिदीफिदी हसतही असते. मुक्ता पलीकडच्या गोधडीत शिरलेली असली तरी तिचे कान जागे असायचे.
मुक्ताला लग्नात नवरा मुलगा तसा स्पष्ट दिसलाच नव्हता. मुक्ता ठेंगणीशी आणि तो तिच्यापेक्षा जवळजवळ दुपटीने उंच. भटजींनी अंतरपाट दूर केल्यावर तर लज्जेने त्याच्याकडे पाहणे झालेच नाही. हार घालतानाही थोडी नजर वर केली पण जुन्या जमान्यातल्या कागदी झिरमुळ्यांचं बाशिंग…नवरदेवाचं कपाळ मात्र उठून दिसलं. आणि तासाभरात व-हाडाच्या बैलगाड्या घुंगरं वाजवीत निघाल्या.
मुक्ता एकूणात तिसरी मुलगी. आधीच्याच लग्नातली आचा-याची, मांडववाल्याची देणी अजून बाकी होती. त्यातच नात्यातल्या एकाने मुक्तासाठी त्याच्या दूरच्या नात्यातलं एक स्थळ सुचवलं. नवरदेवाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय, वर्षात लग्न नाही केलं तर पुढे आणखी तीन वर्षे थांबावं लागेल, म्हणून त्यांना घाई आहे. खातंपितं शेतक-याचं घर आहे, मोठं खटलं आहे. मुक्ता संपादून जाईल त्या घरात. सांगणा-याने काही तपशील वगळून तर काही पदरचा घालून त्या स्थळाचं वर्णन केलं. आणि मुक्ताच्या वडिलांनी या स्थळामध्ये डोकं देण्याचं मनावर घेतलं. आणखी एक वावर विकलं तरी फारसं बिघडणार नव्हतं. कारण एकच लेक होता. मुक्ताच्या पाठीवर असलेल्या मुलाच्या लग्नात नाहीतरी सर्व वसुली करण्याची संधी मिळणार होतीच.
सकाळी सुपारी खेळण्याच्या वेळी मुक्ताने नव-याकडे पाहिलं आणि ती पहातच राहिली. नवरा मुलगा मात्र तिच्याकडे डोळे बारीक करून पहात हसतोय असं तिला वाटलं. तेवढ्यात मुक्ताला समोरच्या हळदी-कुंकवाच्या पाण्याने भरलेल्या ताटात अंगठी हाताला लागली. हा खेळ मुक्ता जिंकली होती….पण जिंकण्याचा आनंद तिला तसा झालाच नाही. महिपती नाव होतं नव-याचं. मैत्रिणींनी सांगून ठेवलेल्या उखाण्यांपैकी मुक्ताला एकही उखाणा आठवला नाही .. किंवा तिला आठवायचा नव्हता ! तिने कसाबसा एक साधा उखाणा घेतला. पण या उखाण्यात महिपतीरावांच्या नावाआधी आईवडिलांचा मान राखण्यासाठी मी हा विवाह केला आहे,असा आशय व्यक्त करायला ती विसरली नाही… ‘ चांदीच्या ताटात मोहरा आणि माणिक मोती…माहेरची लाज सारी लेकीच्या हाती…महिपतराव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती ! ‘
दुस-या दिवशी नव-यामुलीची पहिल्यांदा माहेरी पाठवणी झाली. रात्री आईच्या गोधडीत शिरलेल्या मुक्ताला तिला काहीही सांगावंसं वाटलं नाही. गोधडीतला अंधार तिला जास्त जवळचा वाटू लागला होता. दोन दिवसांनी मुक्ताला सासरी पाठवताना वडिलांनी मुक्ताला घट्ट जवळ घेतलं…पोरी महिपतराव डोळ्यांनी अधू आहेत…आंधळे नाहीत. देवभोळा साधा माणूस आहे. तू त्याचे डोळे हो ! मुक्ता बैलगाडीत बसली तेव्हा वडील हात हलवत होते.. पण त्यांचे पाण्याने भरलेले डोळे खाली पहात होते.
संसार सुरू झाला. पहिला मुलगा होईपर्यंत मुक्ताबाई आणि महिपतीरावांचा उघड संवाद झालाच नाही…त्याकाळी असं होणं अगदी सर्वमान्य होतं. जाऊबाईंना आपल्या अशा दीराला इतकी नीटस बायको मिळाली याचा आनंद कमी आणि हेवा अधिक वाटत होता. महिपतराव नजर अधू असूनही वाचणारे होते. कागदाला जवळजवळ पापण्यांचा स्पर्श होईल इतक्या जवळ त्यांना कागद धरावा लागायचा. पण वाचनाचा कंटाळा अजिबात नव्हता. मुक्ताबाईंनी माहेरी अभ्यासाचा कंटाळाच केला होता तसा. इथं महिपतराव मुक्ताबाईंची शाळा झाले.
महिपतरावांकडे शेतीतल्या काबाडकष्टांचा जणू मक्ताच दिला होता थोरल्याने. याचं काही लग्नं होणार नाही, त्यामुळे आपल्या मुलाला आपल्या माघारी मिळणार असलेल्या जमिनीत कुणी वाटेकरी नसणार हे तो गृहीत धरून चालला होता. सारा रोखीचा व्यवहार त्याच्याकडेच आणि घरातल्या किल्ल्यांचा जुडगा त्याच्या बायकोकडे.
मुक्ताबाई पुढे पुढे धीट झाल्या. व्यवहारात लक्ष घालू लागल्या. नवरा बैलगाडी घेऊन निघाला की कासरा आपल्या हाती धरू लागल्या…बैलगाडी गाववाल्यांच्या नजरेच्या टप्प्यापलीकडे गेल्यावर. महिपतरावांची नजर हळूहळू धूसर होत जाणार होती. दैवाने त्यांच्यासाठी मुक्ताबाईंचे दोन सुंदर, टपोरे डोळे पाठवून दिले होते. आणि आता तर हे डोळे अक्षरं वाचू लागले होते.
नावाचा महिमा असेल कदाचित, पण महिपतरावांच्या तशा तापट स्वभावावर त्यांनी प्रेमाने फुंकर घातली होती. आंधळा म्हणून हिणवणारा गाव, व्यवहारात फसवणारा थोरला भाऊ, यांच्याबद्द्ल असणारी नाराजी महिपतरावांच्या शब्दांतून आणि कधी कधी कृतीतूनही व्यक्त होई. पण मुक्ताबाईंनी त्या क्रोधाला संयमाची झालर लावून टाकली.
बापजाद्यांपासून चालत आलेल्या जमिनीच्या वादाच्या न्यायालयीन खटल्यांना कित्येक वर्षे लोटून गेली होती. निकाल काही लागत नव्हता. थोरले भाऊजी या बाबतीत तसे उदासीन होते. मुक्ताबाईंनी स्वयंपाकघरातून हळूहळू ओसरीवर प्रवेश मिळवला. कधी घरी सल्लामसलतीसाठी येणा-या वकिलांशी बोलण्याचं, त्यांना काही विचारण्याचं धाडस मिळवलं.
खटल्यातून यशस्वी माघार घेणं फायद्याचं आहे, असं सर्वांना पटवून दिलं. आणि वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या खटल्यातून सर्वांचीच सुटका केली. वाद तर चुलत घराशीच होता. ती मंडळीही मुक्ताची चाहती झाली. एकादशी, भजन करणारी, पहाटे उठून सडा रांगोळी घालणारी, तुळशीला पाणी घालणारी, जात्यावर दळण दळताना जनाबाई होणारी मुक्ता महिपतरावांच्या घराची लक्ष्मी झाली होती. मुक्ताबाईंना दोन मुलगे झाले. मुलगी हवी होती पण नाही पडली पदरात. मुलांची शिक्षणं व्यवस्थित होतील याकडे त्यांचं लक्ष असायचंच. थोरला शहरात नोकरीस लागला आणि धाकट्याने शेतीत लक्ष घातले. आता पैशांची कमतरता नव्हती. म्हणून गरजू आणि मुक्ताबाईंचं घर अशी जोडी ठरून गेली.
महिपतरावांची आई आणि मुक्ता जणू मैत्रिणीच बनल्या होत्या. म्हातारीची खूप सेवा केली मुक्ताबाईंनी. ‘माझ्या आंधळ्या लेकाचा संसार तुच कडेपतोर नेशील गं माझे बाये !’ असं म्हणून म्हातारी मुक्ताच्या गालांवरून हात फिरवायची आणि तिच्या स्वत:च्या डोक्याच्या उजव्या बाजूवर बोटं ठेवून कडाकडा मोडायची….हा आवाज मुक्ताला टाळ्यांच्या कडकडकटासारखा भासायचा. मुक्ताबाई माहेर तसं विसरूनच गेली होती.
महिपतरावांची दृष्टी आता जवळजवळ गेल्यातच जमा होती. अगदीच प्रयत्नांती त्यांना थोडंफार दिसायचं. पण बाकी सर्व व्यवहार अंदाजेच. माळकरी असले तरी महिपतरावांना पंढरी काही घडली नव्हती. गावात होणाऱ्या कीर्तनांना, काकड्याला मात्र ते नियमित हजेरी लावत. अनेक अभंग त्यांना मुखोदगत होते. मुक्ताबाईंनाही त्यांनी विठूचा छंद लावला. सूरदास, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची चरित्रे मुक्ताबाईंना खूप जवळची वाटली.
एके दिवशी पंढरीला जायचा हट्टच धरला मुक्ताबाईंनी महिपतरावांपाशी, आणि त्यांनी मुलांना सांगून तशी व्यवस्थाही करवून घेतली. देवापुढे उभी राहिली ही जोडी तेव्हा तेथील रखवालदारांनीही घाई केली नाही..मुक्ताई महिपतरावांना आपल्या डोळ्यांनी देव दाखवत राहिल्या…देवाचिये द्वारी क्षणभर उभं राहून. चारी मुक्ती त्या साधू शकणार नव्हत्या…पण पदरी पडलेलं त्यांनी पवित्र मात्र करून घेतलं होतं.
आज महिपतराव आणि मुक्ताबाई हयात नाहीत. पण प्राप्त परिस्थितीमध्ये जीवनाला सामोरे जाण्याची जिद्द दाखवणाऱ्या मुक्ताबाई स्त्रीशक्तीचं प्रतीकच बनून राहिल्या .. किमान त्या गावात तरी. नवरात्रात अशा द्विभुज देवींची आठवण येते, यात नवल नाही.
परिस्थितीमुळे, गरीबीमुळे, परंपरांमुळे असे संसार स्वीकारावे लागणाऱ्या अनेक मुक्ताबाई आधीच्या पिढीने अनुभवल्या आहेत. त्या लढाऊ दुर्गांना या सहाव्या माळेच्या निमित्ताने नमस्कार.
☆ “चौकट आक्रसत चाललीय..” – लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
माझ्या घराजवळच एक लॉन्ड्री आहे. एक 65 वर्षाच्या आजी ती लॉंड्री चालवतात. तशा त्या ‘वेल टू डू’ फॅमिलीतल्या आहेत.त्यांचा मुलगा इंजिनिअर आहे. पण वेळ छान जावा आणि तब्येत व्यवस्थित रहावी म्हणून त्या काम करतात. आठवड्यातून दोनदा मी लॉन्ड्रीत जातो. बरेचदा आजींच्या मैत्रिणी तिथे गप्पा मारण्या साठी जमलेल्या असतात. कधी कधी आजींची नातवंडं सुद्धा तिथे खेळत असतात. खोड्या करतात, भांडतात. आजी सर्वांना मायेनं सांभाळून घेतात.
असाच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच छान नटून आलेला. कपाळावर अष्टगंधाचा टिळा, छान नवे कपडे. तीन चार वर्षांचा त्यांचा नातू, छान गोरा, गुटगुटीत अन् गोड. तो त्याच्या आजीला सांगत होता, “आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ.” आजीने विचारलं, “का रे, काय केलं त्या आजीनं तुला?”
तो: “काही नाही. असंच.”
आजीनं पुन्हा पुन्हा विचारलं, पण तो काही कारण सांगत नव्हता. त्याचं आपलं एकच पालुपद, “तू त्या आजीबरोबर नाही बोलायचं.” शेवटी आजी म्हणाल्या, “थांब मी त्यांना फोन करून बोलवून घेते अन विचारतेच, काय केलं आमच्या नातवाला म्हणून.”
मग नातू सांगू लागला, “मी त्यांच्या समोरुन दोनदा गेलो. तरी आजी मला ‘हॅपी बर्थडे’ म्हणाली नाही. तू नाही बोलायचं.” अच्छा! म्हणजे आजीनं ‘हॅपी बर्थडे’ म्हटलं नाही याचा त्याला राग आला होता तर.
मला आणि त्या आजींना, दोघांनाही हसू आवरेना. तरीही हसू आवरुन आजी म्हणाल्या, “अरे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्या आता म्हाताऱ्या झाल्यात. तू सांगायचं ना त्यांना, ‘आज माझा बर्थडे’ आहे म्हणून.”
नातू: “मग मागच्या महिन्यात दिदीचा कसा लक्षात आला त्यांच्या? त्यांनी मुद्दाम केलंय. तू त्यांच्याशी नाही बोलायचं आता.”
आजी: “बरं, जाऊ दे. नाही बोलत त्यांच्याशी.” नातू परत आपल्या खेळात रमला. मला गंमत वाटली. एवढ्याशा मुलाला सुध्दा किती इगो, मान – अपमान! मी त्याच्यापाशी गेलो, हात पुढे केला अन ‘हॅपी बर्थडे’ म्हणालो. त्याने हात पुढे केला आणि थँक्स म्हटलं.
तेवढ्यात आजी म्हणाल्या, “अरे काकांना नमस्कार कर.” पण त्याने ऐकलं नाही. आजीचं कपडे मोजणं चालू होतं. मी मग शेजारच्या दुकानातून एक कॅडबरी घेतली आणि त्याला दिली. त्याने ती पट्कन घेतली आणि चट्कन मला वाकून नमस्कार करुन तो पळून गेला.
गोष्ट छोटीशीच, पण मला खूप काही शिकवून गेली. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आज इगो आहे. ‘माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येकानं वागलं पाहिजे. अन्यथा मी त्याला माझ्या आयुष्याच्या चौकटीतून बाहेर काढणार! अथवा माझी चौकट आकसून घेणार. मी दुसऱ्याला सामावून घेण्यासाठी माझी चौकट मोठी करेन’ असं कोणीच म्हणायला तयार नाही.
परिणाम… आज प्रत्येकजण आपापली अरुंद चौकट घेऊन एकटाच जगतो आहे. नातेवाईकांमध्ये तेच, मित्रांमध्ये तेच, ऑफिसमध्ये तेच, समाजात तेच. स्वतःच्या मिळकतीवर अन हिमतीवर फाजील विश्वास असल्यानेच हे सगळं असं घडतंय. पूर्वी लोक एकमेकांवर अवलंबून होते तेच बरं होतं, असं म्हणायची वेळ आलीय. लाखोंच्या गर्दीतही माणूस एकटा पडलाय. पण इगो इतका झालाय, की त्याला तेही समजेनासे झालंय.
स्वार्थ तर इतक्या टोकाला गेलाय की आपला फायदा असल्याशिवाय कोणी कोणाला विचारतच नाही. जिथे फायदा दिसतो, तेथे लोटांगण घालतील. पण फायदा नसेल किंवा फायदा करून झाला असेल, तर ते तुमच्याकडे पाहणार नाहीत. खरं तर आपण इतके वाईट कधीच नव्हतो. पण मग हे असं का व्हावं? नेमकं गणित कुठे बिघडलं अन आपली संस्कृती, संस्कार असे रसातळाला कसे गेले?
मला वाटतं, आपण पुन्हा नव्याने मुलांना ‘मी आणि माझा’ च्या पलीकडे पहायला शिकवलं पाहिजे. तेही आज आणि आत्ताच. अन्यथा परिस्थिती असहाय्यपणे बघत बसण्याखेरीज आपल्या हातात काही उरणार नाही एवढं खरं.
लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज मलाही वाटलं नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला, श्वापदांच्या पदभाराने त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती त्यासंगितातून… तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.