हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ कविता – वादा… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

श्री राजेन्द्र तिवारी

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक विचारणीय लघुकथा ‘वादा।)

☆ लघुकथा – वादा… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

बीते वक्त की तरह, याद आते हो, आते नहीं हो,

कभी तो बहारों की तरह, लौटने का वादा कर लो.

*

बहारों की तरह, लौटने का वादा कर लो,

हाथों में लेकर हाथ, चलने का वादा कर लो.

*

इस बेजान दिल को धड़कने का बहाना दे दो,

नज़ारे लौट आएंगे, साथ आने का वादा कर लो.

*

इस बेनूर से चमन में, खिल उठेंगी कलियां,

गर तुम साथ बहारें लाने का वादा कर लो. 

*

न रुठो और न रूठने दो, कभी किसी को,

दोबारा नेमत ए इश्क देने का वादा कर लो.

*

कभी, कोई न कोई रंज होगा, दिल में तेरे,

अब हमेशा मुस्कराने का वादा कर लो.

© श्री राजेन्द्र तिवारी  

संपर्क – 70, रामेश्वरम कॉलोनी, विजय नगर, जबलपुर

मो  9425391435

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ मर्मबंध… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मर्मबंध… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मी जे जगलो त्याचा हा तर मर्मबंध आहे

या गझलेचा अर्थ पसारा लांबरुंद आहे

*

साध्य साधना करून येथे पूर्ण कर्म केले

निवांत झाल्या देहकुडीचा श्वास मंद आहे

*

काळजातल्या कथाव्यथांचे स्तोम खूप झाले

त्याच सुखाच्या आठवणींचा मंद गंध आहे

*

संसाराच्या धकाधकीची रीत छान साधी

जगणे तेथे कालक्रमाने जेरबंद आहे

*

स्वैरपणाने भटकायाची शांत वेळ नाही

वातावरणातील जराशी हवा कुंद आहे

*

जमेल तितकी अध्यात्माची साथ घेत जावी

तप करण्याला सोबत तुमच्या संतवृंद आहे

*

स्वतंत्रतेचा आज जमाना फार ठारवेडा

गात आता जगणे म्हणजे मुक्त छंद आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आडात नाहि पाणी आता…☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

आडात नाहि पाणी आता☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(वनहरिणी)

 

आडात नाहि पाणी आता, सांग कसा रे भरू पोहरा

हरदासाची सरली पोथी, काय नवे ते सांगू तुजला

*

नवजाताच्या नजरेमधले, कुठे कालचे कुतुहल आता

सरळसोट अन् रटाळ केवळ, उरली झापडबंदी आता

*

तीच पुरातन नगरे आणिक अवशेषांची तीच विराणी

त्याच वाहत्या जखमा आणिक अश्रूंचीही तीच कहाणी

*

शोकामधले सरले गुंजन, वाहुन वाहुन सुकले ओघळ

तेच कालचे घाव आजही, जातिवंत तो शिणला विव्हळ

*

अंतहीन त्या अंध रातिला, का दावावा सूर्य उद्याचा

का फासावा पराभवांना, रंग विलक्षण हौतात्म्याचा

*

सृजनाचा हा जन्मोत्सव की, जन्मा आले मरण नव्याने

असा कसा हा दीपराग की, ज्योती गिळल्या काळोखाने

*

किति टांगावी वेशीवरती, मी माझी ही अशी लक्तरे

कुठवर न्यावी भर बाजारी, घरंदाज ही माझी दुःखे

*

मगरमिठीतुन तुझिया कविते, विमुक्त मजला जरा होउ दे

तुझ्या पारही बरीच दुनिया, दुनियादारी मला शिकू दे !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अवघाचि संसार सुखाचा करीन… – संत ज्ञानेश्वर ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? काव्यानंद ?

☆ अवघाचि संसार सुखाचा करीन… – संत ज्ञानेश्वर ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर 

अवघाचि संसार….

अवघाचि संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक || १ ||

*

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटण माहेरा आपुलिया || २ ||

*

सर्व सुकृताचे फळ मी लाहिन |

क्षेम मी देईन पांडुरंगा || ३ ||

*

बापरखुमादेवी वरु विठ्ठलाची भेटी |

आपुल्या सवंसाठी करुनि ठेला || ४ ||

*

अवघाची संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक ||1||

अवघाची संसार म्हणजे सगळा संसार सुखाचा करिन संसार खूप अवघड आहे तो सोपा नाही वादळ वारे संकट झेलत सावरत संसार करावा लागतो,,,,,,,,

कुटुंबाची मर्यादा पाळत सगळ्यांची मनं सांभाळून हातोटीने संसार करावा लागतो नव्हे नव्हे करावाच लागतो.

“आनंदे भरीन तिन्ही लोक “

आनंदाने, समाधाने राहून तिन्ही लोकांना आनंद देईल,,,,

तिन्ही लोक,,, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या तिन्ही लोकांत आनंद परमेश्वराच्या नामस्मरणाने देणार आहे.

परमार्थ करून प्रपंच करणं म्हणजे संसार सुखाचा होणं आहे.

संसार अवघड आहे तितकाच परमार्थ सोपा आहे पण, आपण सांसाराच्या मागे धावत परमार्थ अवघड करून ठेवतो.

वय झाल्यावर देवाची आठवण येते तेंव्हा लक्षात येत आपण आयुष्यभर विनाकारण पळालो ज्याने आपल्याला या जगात आणलं त्यालाच विसरलो.

तेंव्हा जाणीव होते आणि देवाचा धावा सुरु होतो. भक्ती कशी निस्वार्थी हवी. देव “दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू ” आहे आपल्या भक्तीचं फळ तो लगेच देतो.

संसार करत आनंद देण्याचा प्रयत्न करावा आनंद वाटत राहावा.

जाईन गे माये तया पंढरपूरा* भेटेन माहेरा आपुलिया

संसार करत परमार्थ करायचा आहे पांडुरंगा चरणी लिन व्हायचं आहे..

पंढरपूर माहेर आहे तिथे विठ्ठल रुख्मिणी माय बाप कर कटावर ठेऊन उभे आहेत…..

पंढरपूला माझ्या माहेरी जाऊन भेटून येणार आहे माझ्या माय माऊली, माझ्या मात्या पित्याला डोळेभरून बघणार आहे त्याचं ते सकुमार रूप डोळ्यात साठवणार आहे.

“सावळा तो श्रीहरी, सावळा तो विठ्ठल

रूप त्याचे मनोहर, पाहुनी होई मन समाधान “

सुंदर असे रूप पाहून देहभान हरपून जाते,,,

“पिवळा पितांबर, गळ्यात तुळशीमाळा

भाळी चंदनाचा टिळा, कटेवरी हात उभा वेटेवर”

असा तो पांडुरंग डोळ्यात साठवून मनाला शांती मिळते म्हणून माझ्या माहेरी मला जायचं भेटून यायचं आहे.

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन

क्षेम मी देईन पांडुरंगा

जे मी सत्कर्म केल जे पुण्य मी मिळवलं त्याचं फळ मला मिळेल किंवा मी ते घेऊन येईल मी पांडुरंगाची क्षमा मागेल,,,

रोजचे कर्म करत असताना चूक होतेच अशी काही चूक झाली तर पांडुरंगाची क्षमा मागून प्रायश्चित घेईल,,,

मी विठुराया चरणी नतमस्तक होईल,,,, विठुरायाला अलिंगन देऊन त्याच्या चरणी जागा दे ही विनवानी करेल त्याची दासी होऊन राहीन.

बापरखुमादेवी वरू विठ्ठलाच्या भेटी

आपुल्या संवसाठी करुनी ठेला

विठ्ठल रुख्मिणी आई वडील आहेत.

माता पित्याची भेट हे विठ्ठलाच दर्शन म्हणजे एक वरदान आहे…

आपल्या साठी तो विटेवर उभा आहे.

आपल्या रक्षणासाठी उभा आहे.

एक आषाढीची वारी निमित्य आहे आई बापाच्या भेटीचं संतांचा मेळा भरतो. संत संगत मिळते आणि आयुष्य बदलून जातं.

” दुमदूमली पंढरी, गजर कीर्तनाचा “

” मुखी नाम विठुरायाचे, सोहळा हरीनामाचा “

जय हरी माऊली 🙏🙏

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोखून धरलेली नजर… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

रोखून धरलेली नजर ☆ प्रा. भरत खैरकर 

हे कधी लक्षात आलाय कां काही लोक नेहमी तुमच्या मर्यादा, कमतरता, सीमा दाखवायला, तपासायलाच बसलेले असतात! ते कधीही तुमच्याशी धड बोलत नाहीत. सारखा अपमान करण्याच्या स्थितीमध्ये किंवा तुम्हांला कमीपणा दाखवण्याच्या नादात असतात. तुम्हांला तुच्छ लेखण्यासाठी ते सतत खूप उत्सुक असतात.

त्यांच्या अशा वागण्याला आपण हसून देतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अशाने ते थांबत नाहीत! अशावेळी काय करायचं? जे तुमचा सतत अनादर करतात. तुम्हांला हीन पद्धतीने वागवतात तर मग तुम्ही एक गोष्ट करा. अशा माणसाकडे एकदम डोळ्यात रोखून बघा! काही बोलूच नका!!

अशी माणसं तुम्हांला त्यांच्या नाटकामध्ये, तमाशामध्ये सामील करू इच्छितात. त्यासाठी तुमची प्रतिक्रिया, तुमचं घाबरलेपण, अळखळलेपणा, उत्तर देणं किंवा उलट उत्तर देणं त्यांना हवं असतं. जेणेकरून तुम्ही त्यात ओढले जाल. असं करून ते तुमचा आत्मविश्वास तोडू इच्छितात किंवा तुम्हांला हीन दाखवितात.

मात्र तुम्ही जेव्हा शांत राहून त्यांच्या नुसतं नजरेला नजर भिडवता तेव्हा मात्र त्यांचे सगळे पवित्रे फेल गेलेले असतात.. संपलेले असतात. आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या न मिळालेल्या प्रतिसादामुळे सगळा खेळच उलटफेर होतो. कारण समोरच्या व्यक्तीला हवी असलेली प्रतिक्रिया आपण न केल्याने त्याचा ‘ पोपट’ होतो. आणि तो व्यक्ती आतल्याआत तडफडायला लागतो. ज्यावेळी तुम्ही स्थिर आणि रोखून अशी एक नजर टाकता. तेव्हा तुम्ही कुठलाही शब्द न वापरता स्पष्टपणे सांगत असतात की ‘तुझ्या नाटकात मी सामील होणार नाही!’. किंवा ‘तुला हवा आहे तसं मी वागणारच नाही’.. त्यामुळे समोरच्याचा भ्रमनिराश होतो.

ही अशी एक पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही काहीही न करता समोरच्याला चितपट करू शकता. बऱ्याच वेळा स्थिर नजर आणि शांत राहणे ह्याच गोष्टी ‘कारीगर’ ठरतात.

हा उपाय रोजच्या आयुष्यात कसा उपयोगी पडतो हे बघायचे असेल तर हे ऐका.. मीटिंगमध्ये नेहमी एक व्यक्ती सारखी सारखी माझ्या मतावर प्रतिक्रिया द्यायची.. उलटसुलट रिएक्शन द्यायची. जसं काही त्याचं काहीतरी अडतयं किंवा त्याचा काहीतरी त्यात हेतू आहे.. स्वार्थ आहे.. त्याहीपेक्षा त्याला मला खालीच दाखवायचं होतं.. त्यासाठी तो चढ्या आवाजात बोलायचा.. आणि स्वतःलाच इतरांपेक्षा शहाणा समजायचा.. इतरांपेक्षा मलाच अक्कल आहे.. किंवा ‘मीच हे सर्व घडवून आणलं. ‘ हे दाखवण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.. त्यावेळी मी माझे म्हणणे अत्यंत नम्रपणे किंवा कोणालाही न दुखवता, इतरांचा आदर करत मांडायचो. तरीही त्याचा अट्टाहास काही जात नव्हता. ग्रामीण भाषेत ‘माझीच लाल’ असं बोलल्या जातं. तसा काहीसा तो व्यक्ती होता. त्यामुळे तो प्रत्येक वेळी मलाच नव्हे तर इतरांना सुद्धा मीटिंगमध्ये मधेमधे करून रोखून धरायचा.. व आपण किती हुशार आहोत हेच सांगायचा त्याचा रोख असायचा.. आता हे मात्र अती झालं होतं..

असेच एकदा मिटिंगमध्ये मी खुर्ची थोडीशी मागे केली.. रेलून बसलो.. आणि एकसारखा टक लावून त्याच्याकडे बघत गेलो.. मी शब्दही काढला नाही. माझे दोन्ही हात मी छातीशी बांधून घेतले आणि साधारण तीस-पस्तीस सेकंदापर्यंत त्या व्यक्तीला सारखा न्याहाळत राहिलो. नव्हे त्याला रोखूनच बघत राहिलो.. त्यामुळे हळूहळू मीटिंग मधील वातावरण एकदम ‘गरम’ झाले.. इतरही लोक मला फॉलो करू लागले.. तेही त्याच्याकडे टक लावून बघायला लागले.. कोणीच काही बोलत नव्हतं.. आणि आता सगळे त्याच्या रिॲक्शनची वाट बघत होते तो काय करतो किंवा काय करेल ही उत्सुकता सर्वांना लागली होती.

तो अचानक घाबरायला लागला.. त्याच्या आवाजाला कंप सुटला.. त्याचे शब्द अडखडायला लागले.. तो ततपप करायला लागला.. तो इकडे तिकडे बघायला लागला.. नजरेला नजर मिळवण्याची हिंमत करत नव्हता.. त्यानंतर झालेल्या कित्येक मीटिंगमध्ये त्याने मला मधे टोकलं नाही की रोखलं नाही. एवढंच नाही तर तिथून पुढे तो माझ्याशी इज्जतीत वागायला लागला.. आदर द्यायला लागला.. त्याला हे लक्षात आलं की मी तो व्यक्ती नाही ज्याला तो दाबू शकतो.. त्याच्या इशाऱ्यावर नाचवू शकतो.

बऱ्याच वेळा लोकांना हे दाखविण्यासाठी की तुम्ही नेमके कोण आहात हा पवित्र आजमावला पाहिजे!जेव्हा तुम्ही वरील पद्धत अवलंबता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असता की मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणारा व्यक्ती नाही. तुझ्या हातातली कठपुतली नाही. माझे धागेदोरे माझ्याच हातात आहे. ते तुला देऊन तुझ्या तमाशाचा मी भाग बनू इच्छित नाही. माझ्या भावभावनांशी खेळण्याचा तुला अधिकार मी देणारच नाही. आणि माझी मूल्ये काय आहे, हे तुझ्यासारख्या कडून सर्टिफाईड करून घेण्याची गरज नाही.

खूपदा आपला जेव्हा कोणी अपमान करतो किंवा बदनामी करतो तेव्हा आपण स्वतःला डिफेन्स करण्याचा पवित्रा आजमावतो.. आणि समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे वाव देत असतो.. आपण आपली सफाई.. आपली बाजू मांडत असतो.. जेणेकरून कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये किंवा भांडण होऊ नये. मात्र समोरचा त्या सगळ्या गोष्टींचं ‘पोतरं’ करतो.

अशावेळी तुम्ही रोखून धरलेली नजर ही काही आक्रमक कृती नाही. ती एक सौम्य पण रामबाण अशी कृती आहे! यामधून तुम्ही शांत आणि मजबुतीने उभे आहात खंबीर आहात हे समोरच्याला दिसतं.. तुमचे पाय जमिनीवर आहेत. तुम्ही उडो उडो करत नाही.. किंवा कुठलाही प्रकारचा दाखवेपणा तुम्हांला नको आहे. तुमचं काम आणि तुम्ही हे सांगण्याचा तुमचा रोख ह्यातून दिसतो. तुम्ही जिम्मेदार व्यक्ती आहात. हा सुद्धा संदेश या कृतीतून जातो.

जे लोक इतरांची बेईज्जत किंवा अपमान करत असतात त्यांना आजवर कोणीही रोखलेलं किंवा उलट बोललेलं नसतं. त्यामुळे हे लोक शेफारलेले असतात.

आपली उणीव झाकण्यासाठी असे लोक इतरांचा वापर करत असतात. त्यांना हे कोणी सांगितलं नसतं की तुमच्या अशा वागण्याने समोरच्याच व्यक्तिमत्व किंवा त्याचे सद्गुण दबून जातात.. पण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला शांत आणि रोखून धरलेल्या नजरेने बघता तेव्हा ती कृती एका आरशासारखे काम करते.. तो आरसा.. ती नजर.. त्या व्यक्तीला त्याचं प्रतिबिंब दाखवितं. तुम्ही त्याला काही सांगत नसता फक्त त्याला ‘दाखवत’ असता.

पण विश्वास ठेवा की अशा प्रकारचे लोक या पद्धतीने स्वतःला कधीही बघू इच्छित नाही किंवा त्यांनी तसं स्वतःला कधी बघितलेच नसते.. स्वतःचं असं भयानक रूप जेव्हा ते त्या आरशात बघतात.. तेव्हा ते खजील होतात.. त्यांना त्यांच्या कृतीबद्दल शरम वाटते.. लाज वाटते. त्यामुळे रोखून पाहण्याची ही त-हा.. पद्धत खूप उपयुक्त आणि परिपूर्ण आहे. चला तर मग बघूया रोखून आपला अपमान करणाऱ्याकडे! ज्यामुळे समोरचा व्यक्ती थोडा माघारी जाईल आणि आपण आतल्या आत मजबूत होवू !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माहेर… भाग-२ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ माहेर… भाग-२ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – स्वातीला किती तरी काळानंतर अशा जिवंत वातावरणाचा अनुभव येत होता. कुणी तरी अगदी जवळचं, आत्मीय भेटावं, तसा तिला आनंद झाला होता. वस्तू घेणार्‍या ग्राहकांच्या डोळ्यात दिसणारी आशा, उमंग, लाचारी यासारखे भाव तिला स्वत:चेच वाटले. किती तरी वर्षांपूर्वी ती हेच भाव घेऊन, या बाजारात नेहमीच येत होती. आता इथून पुढे)

दोघेही एका कपड्यांच्या हातगाडीपासून काही अंतरावर उभे होते. एक बाई तिथे आपल्या एका मुलाला घेऊन कपडे घ्यायला आली होती. तिने ठेलेवाल्याकडून मुलाच्या मापाची शर्ट-चड्डीची एक जोडी खरेदी केली आणि मुलाला घातली. त्याला ती अगदी बरोबर बसत होती. मुलगा नवीन कपडे पाहून खुश झाला. आता केवळ पैसे देणं बाकी होतं. ती भावाबद्दल विक्रेत्याशी घासाघीस करू लागली.

‘‘मेहुल, तुला आठवतं, अंशचा पहिला वाढदिवस होता. त्यावेळी त्याच्यासाठी कपडे घ्यायला आपण याच बाजारात आलो होतो. ‘ स्वातीने प्रेमळ नजरेने त्या मुलाकडे बघत म्हंटले.

‘हो. त्यावेळी आपला नाईलाज होता. कमाई कमी होती नं!’

‘कमाई कमी होती, पण जीवन छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी झळकत होतं.

मी पण व्यापार्‍यांशी या बाईप्रमाणेच घासाघीस करायची आणि त्याने किंमत कमी केली, की खूप खुश व्हायची. ’

आज मात्र ती बाई आणि तो मुलगा यांच्या नशिबात खुशी नसावी. खूप घासाघीस केल्यानंतरही त्या व्यापार्‍याने जो भाव सांगितला, तेवढे पैसे बाईकडे नव्हते.

तिच्याकडे वीस रुपये कमी होते. वीस रुपये कमी घेऊन कपडे देण्यासाठी ती गयावयाकरत होती. पण व्यापार्‍याने त्यासाठी आपली असमर्थता दर्शवली. तो म्हणाला, ‘ताई, यापेक्षा एक रुपयादेखाल कमी होऊ शकत नाही. माझेदेखील घर आहे. परिवार आहे. तिकडेही मला लक्ष द्यायला हवं!’

त्या बाईकडे शेवटी एकच उपाय उरला. त्या मुलाच्या अंगावरचे कपडे काढून व्यापार्‍याला परत करणं. ती जेव्हा तसं करू लागली, तेव्हा तो मुलगा मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. बघता बघता त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो म्हणू लागला, ‘तू मला नवे कपडे घेऊन देण्यासाठी आणलस, तर का घेऊन देत नाहीयेस?’ तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, बेटा, हे कपडे चांगले नाहीयेत.

आपण तुला दुसरे चांगले कपडे आणू!’ पण मुलाला काही ते म्हणणं पटलं नाही. त्याचं झगडणं चालूच होतं. बालहट्टामुळे बाईपुढे धर्मसंकट उभे राहिले. ती जोर लावून त्याने घातलेले कपडे काढायचा प्रयत्न करत होती, तर मुलगा पूर्ण ताकदीनिशी कपडे घट्ट पकडून ठेवत होता.

आता मेहुलला रहावलं नाही. तो ठेलेवाल्याजवळ गेला आणि त्याने बाईला ऐकू जाणार नाही, इतक्या हळू आवाजात ठेलेवाल्याला विचारले, ‘किती कमी पडताहेत?’

साहेब, वीस रुपये. जितके कमी करणं शक्य असेल, तेवढे मी केले. आता याहून कमी करणं खरंच मला शक्य नाही. नाही तर मी मुलाला रडू दिलं नसतं. ‘

‘तू त्यांना कपडे दे. ते गेले, की मी तुला वीस रुपये देईन. त्यांना सांगू नकोस, की बाकीची रक्कम मी देतोय, नाही तर त्यांना वाईट वाटेल. ’ मेहुल हे हळू आवाजात बोलला आणि स्वातीपाशी येऊन उभा राहिला.

‘राहूदेत त्याने घातलेले कपडे’ ठेलेवाला म्हणाला. ‘दे पैसे. वीस रुपये कमी आहेत ना, चालेल. ’

बाईने तिच्याजवळ असलेली रक्कम व्यापार्‍याच्या हातावर ठेवली.

‘आता खुश ना?’ व्यापार्‍याने प्रेमाने मुलाला विचारले. बालकाने निर्मळ नजरेने आपली प्रसन्नता व्यक्त केली.

बाई व्यापार्‍याला आशीर्वाद देत-देत आणि मुलाच्या गालावरील अश्रू पुसत पुसत निघून गेली.

बाई आणि तिचा मुलगा थोडे दूर गेल्यावर मेहुलने त्या व्यापार्‍याचे पैसे देऊन टाकले.

‘आज मला माझा हरवलेला मेहुल परत मिळाला. ’ खुश होत स्वाती म्हणाली.

‘स्वाती, आज मी ऑफीसमध्ये हरवलेल्या मेहुलला शोधण्याखेरीज दुसरं काही कामच केलं नाही. चार वाजता मला तो मिळाला आणि मी तुला लगेचच फोन केला. ’

स्वातीने मेहुलचा हात धरला. ‘चल! आता मला काहीच नको. जे हवं होतं, ते मिळालं. ’

‘अरे ! इथपर्यंत आलोय, तर राजस्थानी कचोरी खाल्ल्याशिवाय कसं जायचं?

राजस्थानी कचोरी खाल्ल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये आइसक्रीम खाल्लं. अंशूला पहिल्यांदा त्याच हॉटेलमध्ये त्यांनी आइसक्रीम खिलावलं होतं.

बाजारात चक्कर मारून ती दोघे बाईक ठेवलेल्या ठिकाणी परत आली.

मेहुलने स्वातीला मागे बसवले आणि बाईक पळवली. तो घराकडे जाणारा रास्ता नव्हता. स्वातीने विचारले, ‘इकडे कुठे? घेरी नाही जायचं?’

‘नाही. अजून एक ठिकाण बाकी आहे.’

‘कुठे?’

‘जवळच आहे.’

त्या जवळच्या जागेबद्दल स्वाती काही अंदाज बांधू लागली, पण तिचे सगळे अंदाज चुकीचे ठरले. त्या जागी मेहुलने बाईक उभी केली, तेव्हा ती चकित झाली.

‘इथे जायचे!’ बोटाने इशारा करत तो म्हणाला.

काव्य-रसिकांचं स्वागत करणारा तो टाउन-हॉल स्वातीला तिच्या माहेरासारखाच वाटला.

— समाप्त —

मूळ गुजराती कथा – पीयरियां 

मूळ गुजराती लेखक –  श्री यशवंत ठक्कर

मोबाईल: 9427539111

हिंदी अनुवाद – मायका 

हिंदी अनुवादक – राजेन्द्र निगम

अहमदाबाद 380059, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती… मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (Retd) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? मनमंजुषेतून ?

महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती… मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (Retd) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

महाकुंभपर्वामध्ये गंगास्नान करण्यासाठी मी अजूनही गेलेलो नाही हे ऐकताच तो म्हणाला, “इतक्या मोठ्या स्तरावर हा महाकुंभमेळा आयोजित करणे म्हणजे पैशांचा आणि संसाधनांचा निव्वळ अपव्यय आहे, दुसरं काय?” तो स्वतः नास्तिक असल्याचे त्याने मला आधीच सांगितले होते.

मी हसतमुखानेच त्याला म्हणालो, “तुझ्या चष्म्यातून तुला सर्व धर्मांमधल्या केवळ वाईट गोष्टीच दिसत राहणार यात काही नवल नाही. पण एका सैनिकाच्या दृष्टिकोनातून मला तरी असे दिसते की, भारताने आपले शत्रू आणि मित्र या दोघांनाही या कुंभमेळ्याद्वारे एक अतिशय स्पष्ट इशारा दिलेला आहे.”

माझे बोलणे ऐकताच त्याने भुवया उंचावून म्हटले, “सैनिकी दृष्टिकोन? पण धर्म आणि सैन्यदलांचा काय संबंध?” 

“अगदी घनिष्ठ संबंध आहे. आता असं पाहा, कोट्यवधी लोक लांबलांबून येऊन प्रयागतीर्थी एकत्र जमले, इथे राहिले आणि सर्वांनी एका सामायिक श्रद्धेने गंगेमध्ये स्नान केले. यामधून किमान चार गोष्टी स्पष्ट होतात: –

  1. कोट्यवधी भारतीयांना अशा प्रकारे एकसंध समूहात एकवटता येणे शक्य आहे.
  2. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी लागणारी योजनक्षमता आपल्यामध्ये आहे.
  3. एखाद्या सांघिक ध्येयावर जर अढळ विश्वास असेल, तर ते उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी, वैयक्तिक स्तरावर अपार कष्ट आणि गैरसोय सहन करण्याचा सोशिकपणा भारतीयांमध्ये आहे.
  4. आपल्या देशाचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कणखर आहे.

अरे, अवकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांनाही दिसू शकेल इतका भव्य सोहळा आपल्या देशात आयोजित होतोय ही गोष्ट तुला अभिमानास्पद वाटत नाहीये का? मी तुला सांगतो, आपले शत्रूदेखील या सोहळ्याकडे आज अचंबित होऊनच, पण अतिशय सावधपणे पाहत असतील!”

त्याने नुसतेच खांदे उडवले आणि म्हणाला, “असेलही. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. सैनिकी दृष्टीकोनाचा इथे काय संबंध?” 

जरासा पुढे झुकत मी म्हणालो, “कल्पना करून बघ, एखाद्या युद्धाच्या प्रसंगी अशा तऱ्हेने संपूर्ण जनसमूह एकवटून जर देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिला तर युद्धावर किती जबरदस्त प्रभाव पडेल? पाकव्याप्त काश्मीर किंवा तिबेटला शत्रूच्या जोखडातून मुक्त करायचे ठरवून जर असा जनसमूह उद्या एकवटला तर? देशावर ओढवलेल्या एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी जर जनता अशा तऱ्हेने एकत्र आली आणि त्यांनी यथाशक्ती दान केले तर केवढी प्रचंड संपत्ती उपलब्ध होऊ शकेल माहितीये? हे बघ, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यातून एक गोष्ट ठळकपणे सिद्ध होते – भारताची युद्धक्षमता केवळ सैन्यदलांचे शौर्य आणि त्यांच्या शस्त्रसामर्थ्यावर अवलंबून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनतेच्या इच्छाशक्तीमध्ये आहे. जगातला कोणीही युद्धनीतिज्ञ माझे हे म्हणणे मान्य करेल.”

आता त्याच्या चेहऱ्यावर काहीसे कडवट आणि कठोर भाव दिसू लागले, “या मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागलेत, आणि तू इथे बसून खुशाल राष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाच्या पोकळ गप्पा मारतोयस? तुझं हे बोलणं तुला विचित्र नाही का वाटत?”

एक सुस्कारा सोडत मी उत्तरलो, “अरे, जरासा व्यापक विचार करून पाहा. ती दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी तर झालीच नाही – उलट वाढलीच. शिवाय, प्रशासनानेही तेथील व्यवस्था अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला. आपली जनता आणि प्रशासन या दोघांचाही निर्धारच यातून ठळकपणे दिसतो. चीनमध्ये जर अशी चेंगराचेंगरीची घटना घडली असती तर काय झालं असतं माहितीये? एकतर त्यांनी हा सोहळाच तातडीने गुंडाळून टाकला असता, किंवा मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी राक्षसी ताकद वापरली असती – जे त्यांनी कोव्हिडकाळात केलंच होतं. त्यांच्या सैनिकांच्या गोळ्यांनी त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडतानाचे व्हिडिओ नाही का पाहिलेस तू?”

आता मात्र तो उपहासाने हसत म्हणाला, “मग काय? इतकं सगळं झालं तरी आपण आपला आनंदसोहळा साजरा करत राहायचं, असं तुझं म्हणणं आहे का?”

“सोहळा तर साजरा करायचाच. पण ही वेळ अंतर्मुख होऊन गंभीर विचार करण्याचीदेखील आहे.” 

“कसला गंभीर विचार?” तो जरा चिडखोरपणेच बोलला.

मी पुन्हा पुढे झुकत म्हणालो, “अरे, आईचं दूध प्यायलेला कोणीही शत्रू अशा वेळी आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील, आणि आपण जर गाफील राहिलो तर तो यशस्वी होईलही. “

माझी परीक्षा पाहत असल्याच्या अविर्भावात तो म्हणाला, “शत्रू आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील? ते कसं काय बुवा?”

त्याचा उपहास मला कळत होता, पण माझा प्रयत्न मी सोडला नाही. “हे बघ, कुंभमेळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे लोकांची आस्था, आणि दुसरं, आपलं कार्यक्षम नेतृत्व. आपला शत्रू एकतर लोकांची आस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न करील, किंवा आपल्या डोक्यावर कमकुवत नेते बसवण्याचा प्रयत्न करेल. भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेल्याबद्दल तू वाचलं नाहीस का?”

तो कुत्सितपणे उद्गारला, “ओहहो! आता मला माझ्यासमोर बसलेला ‘अंधभक्त’ स्पष्ट दिसायला लागला !”

मी नुसतीच मान हलवली. कारण, मुद्देसूद चर्चा सोडून आता तो वैयक्तिक टीका करू लागला होता. स्वतःमधल्या नकारात्मकतेमुळे आंधळा झालेला असूनही, तो मलाच विनाकारण ‘अंधभक्त’ ठरवू पाहत होता. मी मनातून पुरता चडफडलो होतो. पण शक्य तितक्या शांत स्वरात मी म्हणालो, “माझं दुर्दैव इतकंच की अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन असलेला, माझ्यातला एक सच्चा देशभक्त तुला दिसत तरी नाहीये, किंवा तू पाहूच इच्छित नाहीस. असो. “

याउप्पर त्याच्याशी कोणतीच सयुक्तिक चर्चा शक्य नसल्याने, मी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर होते.

‘गुरुवाणी’ मधला एक श्लोक जाता-जाता सहजच माझ्या मनात उमटला, “हम नाहीं चंगे, बुरा नाहीं कोये, प्रणवथ नानक, तारे सोये।” म्हणजेच, “मी चांगला आहे असे नाही, इतर लोक वाईट आहेत असेही नाही, नानक प्रार्थना करतो, तोच (देव) आमचा तारणहार आहे!”

मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (सेवानिवृत्त)

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’… माहिती संग्राहक : संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’… माहिती संग्राहक : संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’…  सुश्री अचला जोशी… जन्म. १९ मार्च १९३८

अचला जोशी या वाइन बनविणाऱ्या राज्यातील या पहिल्या महिला उद्योजिका असल्या तरी आजही त्याच उमेद, प्रामाणिक व पारदर्शकपणे मद्याच्या या दुनियेत ‘वाइनलेडी’ म्हणून काम करत आहेत. वाइन म्हणजे दारू नव्हे आणि ही वाइन महिलांनीच प्यायची असे काही नाही, तसेच ती कोणीही सहजरीत्या घरीही बनवू शकतं. वाइनबाबतीत अशी ठळक वाइनशास्त्र सांगणारी आणि वाइन बनविण्याचा हा व्यवसाय ऋतुमानावर अवलंबून असल्याने त्याला जोडधंदा म्हणून आवळ्याचे ‘च्यवनप्राश’ आणि ‘तळोजा क्वील्ट’ या नावाने सुरू केलेल्या व्यवसायाला लंडनच्या बाजारात पोहोचवणाऱ्या श्रीमती अचला फडके-जोशी यांनी पनवेलमधील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे.

अचला जोशी या माहेरच्या अचला फडके. दादर हिंदू कॉलनीतील कॉलनी नर्सिंग होमचे डॉ. जी. एम. फडके हे त्यांचे पिता, तर मूत्रपिंड-तज्ज्ञे डॉ. अजित फडके हे त्यांचे सख्खे भाऊ होत.

त्या वेळच्या मुंबईतील माटुंग्यासारख्या ठिकाणी डॉक्टर फडकेंचे ते प्रशस्त घर म्हणजे साहित्य संघातील दिग्गजांचा हे मुक्त वावराचे ठिकाण. साहित्य व सांस्कृतिक वातावरण अचला यांची जडणघडण झाली असली तरी स्वत:ची हौस पुर्ण करत करत त्यांनी बीए व एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबत शिवणकाम व साहित्यप्रेम हेसुद्धा कायम ठेवले. शिक्षणानंतर काही वर्षांनी १९६० साली टाटा कंपनीमधील एका अभियंत्यांसोबत सुधाकर जोशी यांच्यासोबत विवाह झाला. नवरा आणि कळायला लागलेली दोन मुले जसजशी मोठी झाली त्याच वेळी संसाराच्या पटलावरील गृहिणीचे पात्र सोडून शिक्षणाचा अजूनही काही लाभ घ्यावा अशीही सल मनात कुरकुर करू लागल्याने एका वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून त्यांनी इंडियन काऊंसिलच्या प्रदर्शनात भारताच्या शिष्टमंडळात समन्वयकाची जबाबदारी मिळवली. याच जबाबदारीतील पहिला सोहळा पार पडताना स्वत:च्या कार्यपद्धतीवर अमेरिकन अधिकाऱ्यांचे मन कामातून जिंकणाऱ्या या शिष्टमंडळाला थेट एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीचे निमंत्रण मिळाले. याच पार्टीतील रेडवाइनच्या पहिल्या घोटातील चवीने तिने मायदेशी हीच वाइन बनविण्याची जिद्द उराशी बाळगली आणि अमेरिका वारीहून भारतात परतताना अचला यांनी वाइनइस्ट सोबत घेऊन भारतामध्ये प्रवेश केला. प्रवासादरम्यान वाइन कशी बनवितात, त्याचे फायदे-तोटे याविषयी पुस्तकी ज्ञान घेतल्यानंतर मुंबईतील एका रविवारच्या दुपारी अचला या माहेरी गेल्या असताना डॉक्टर भावाला आलेल्या भेट वस्तू मधील पाच किलो द्राक्षाच्या पेटीवर अचला यांची नजर गेली. द्राक्षपेटीतून पहिले द्राक्ष जिभेवर विरघळल्यानंतर अचला यांना अमेरिकेतील त्या रेडवाइनशी जुळत्या चवीचा अंदाज आला. माहेरवाशीण आई घरची ही द्राक्षपेटी स्वत:च्या घरात त्या घेऊन गेल्यावर त्यांच्या पतीने तेवढय़ाच तडफेने द्राक्षाची वाइन बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. लगेचच मोहम्मद अली रोडवरून सात लिटर काचेचा कार्गो, एअर लॉक अशा सामग्रीची खरेदी करण्यात आली. घरातील या आईच्या वाइन बनविण्याच्या पहिल्यावहिल्या प्रयोगात लहानग्यांनी पाच किलो द्राक्ष धुण्यापासून इतर कामांची मदत केली. बघता बघता जोशींच्या घरातील एका बाजूला द्राक्ष धुऊन त्यामध्ये इस्ट टाकून ते बनविण्याची प्रक्रिया पार पडली. तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच १९७० सालच्या सप्टेंबर महिन्यातील सुटीच्या दिवशी अचला यांचा भाऊ व पती सुधाकर यांच्या उपस्थितीमध्ये वाइन झाली का याची उत्सुकता म्हणून हा कार्गो उघडून पाहण्यात आला. ५ किलो द्राक्षाची त्या वेळी सुमारे ४ ते साडेचार लिटर वाइन जोशींच्या घरातील एका कोपऱ्यातील कार्गोमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. चव घेण्यासाठी त्या वेळी अचला यांचा भाऊ यांनी पुढाकार घेतला. पहिल्यावहिल्या घरातील वाइनचा हा प्रयोग अगदी छान पद्धतीने यशस्वी पार पडल्याचे पहिले रिमार्क अचलाबाईंना त्यांच्या घरातून मिळाले. त्यानंतर अचलाबाईंचा हा प्रवास सुरूच राहिला. लिकर बनविणारे पाच हजार लिटर क्षमतेपेक्षा मोठे कारखाने मुंबईबाहेर ठेवण्याच्या नियमातून अचलाबाईंच्या प्रवासाची वाट तळोजा औद्योगिक क्षेत्राकडे १९७९ साली वळली. आजही अचलाबाई इन व्हॉगेस क्रिएशन या कंपनीच्या माध्यमातून प्रिन्सेस ही रेड, व्हाइट, पोर्ट व हनी वाइन बनवितात. सुमारे दीड लाख लिटर वाइनची उत्पादन काढताना एका बॅचमध्ये साचून ठेवलेले द्राक्षाचे अर्क गाळून वाइन तयार केली जाते.

घराच्या एका कोपऱ्यात स्वत:च्या कुटुंबासाठी बनविलेल्या वाइनला आज देशभरात मोठी मागणी होत आहे. १९७३ ते २०१६ या काळात आंध्र प्रदेश, केरळ सहित सैनिक कॅन्टिनमध्ये अचला जोशींची प्रिन्सेस रेडपोर्ट वाइन ठेवली जाते.

ऋतुवारीवर विसंबणाऱ्या वाइनच्या या व्यवसायामुळे कामगारांवर गदा न येण्यासाठी त्यांनी तळोजा क्वील्ट या नावाने मिलमधून विकत आणलेल्या संपूर्ण कॉटनच्या कपडय़ाच्या साह्य़ाने आणि विविध रंगसंगतीचा आधार घेऊन ऊबदार गोधडय़ा शिवल्या जातात. अमेरिकेसह लंडनमध्ये मोठय़ा कंपन्या गोधडय़ांचे प्रदर्शन मांडतात.

१९८३ साली अचला जोशी यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजकतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अचला जोशी या ‘द फर्स्ट वाईन लेडी’ सोबतच लेखिका असून An Amazing Grace, आश्रम नावाचे घर, हरी नारायण आपटे (चरित्र), ज्ञानतपस्वी रुद्र (न. र. फाटक यांचे चरित्र), चंद्रमे जे अलांछन : अचला जोशी यांचे बंधू डॉ. अजित फडके यांचे चरित्र अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

नोव्हेंबर २०१३ मध्ये सावंतवाडी येथे झालेल्या कोमसापच्या ४ थ्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अचला जोशी होत्या..

अचला जोशी या मुंबईच्या माटुंग्यामधील श्रद्धानंद आश्रमाच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. या महिलाश्रमाशी त्या चार दशकांहून अधिक काळ जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी या आश्रमातील महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी रजया, मसाले बनवून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ शोधली. तसेच त्या दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी आहेत.

माहिती संकलन : श्री संजीव वेलणकर

(संदर्भ : इंटरनेट/ श्री संतोष सावंत.) 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

एकदा जपानमध्ये एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करताना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते.

तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे.

त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतूहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधलं तेव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पो­कळीत हालचाल न करता ती पाल जिवंत

राहिली? हे जवळ जवळ अशक्य होतं.

त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलंच आणि तो त्या पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी, काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरीही पाल आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!

हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.

.

.

.

कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता !

पालीसारखा एक नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडून न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यापासून काहीतरी नक्कीच शिकू शकतो.

तेव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला (आई- वडील, पत्नी, पती, भाऊ, बहीण, मित्र) नेहमी आधार द्या. जेव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेव्हा “तुम्ही” म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण जग असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं, विश्वास.. ) तुटण्यासाठी एक क्षणाचं दुर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 283 ☆ व्यंग्य – गुस्ताख़ हंसी ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम व्यंग्य – ‘गुस्ताख़ हंसी‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 283 ☆

☆ व्यंग्य ☆ गुस्ताख़ हंसी

भरोसेमन्द सूत्रों से जानकारी मिली है कि देश के बड़े कारोबारियों ने सरकार को एक पत्र भेजा है जिसमें अपनी कुछ तकलीफों का ज़िक्र किया गया है। पत्र में सरकार से दरख्वास्त की गयी है कि उनकी तकलीफों का मुनासिब इलाज जल्दी खोजा जाए।

पत्र भेजने वालों ने लिखा है वे इस बात से बहुत दुखी हैं कि उन्हें ज़िन्दगी में मुश्किल से हंसने का मौका मिलता है, जबकि मामूली हैसियत वाले खुलकर हंसते हैं, हंस हंस कर दुहरे होते रहते हैं।उन्होंने लिखा है कि वे खु़द कमाने-गंवाने, अपनी संपत्ति संभालने,अपनी पांच-छः पीढ़ियों का इन्तज़ाम करने, हिसाब-किताब रखने, झूठे आंकड़े बनाने, मुकदमेबाज़ी, पारिवारिक कलह वगैर: में इतना मसरूफ़ और परेशान रहते हैं कि हंसने की फुर्सत ही नहीं मिलती। कभी-कभी दूसरों को दिखाने के लिए झूठ-मूठ ओंठ फैला लेते हैं, लेकिन भीतर कुछ नहीं होता।

उन्होंने लिखा कि  उनमें से कई लोग मजबूरी में लाफ्टर-क्लब जैसे समूह में शामिल हो जाते हैं, लेकिन वह राहत थोड़ी देर की होती है। लिखा कि उनके एक साथी हिम्मतलाल चूनावाला लाफ्टर-क्लब में हंसते-हंसते हार्ट-अटैक का शिकार हो गये और पल भर में अपनी सारी ज़र- ज़मीन छोड़कर जन्नत की तरफ रवाना हो गये। तबसे ज़्यादातर रसूखदार लाफ्टर-क्लब में जाने से कतराने लगे हैं।

पत्र में यह भी लिखा गया कि दरख़्वास्त करने वाले सभी हैसियतदारों के घरों में काम करने वालों के लिए ज़ोर से हंसने की मुमानियत है। वजह यह कि ऊंची हंसी सुनकर घर के लोग डिप्रेशन में आ जाते हैं। वैसे भी ऊंची हैसियत वालों को ज़ोर से हंसना घटिया और स्तरहीन लगता है।  इसीलिए बंगलों में काम करने वालों के लिए हंसी का डेसिबेल तय कर दिया गया है। उससे ऊपर जाने पर तनख्वाह में कटौती की सज़ा दी जाती है।

पत्र में लिखा गया कि बड़े कारोबारियों पर धन और संपत्ति के वितरण में ग़ैरबराबरी की तोहमत लगायी जाती है। कहा जाता है कि उन्होंने देश का ज़्यादातर धन बटोर लिया है। इसके लिए उन्हें गालियां सुननी पड़ती हैं, लेकिन यह नहीं देखा जाता कि उनके हिस्से बहुत कम खुशियां आती हैं। ज़्यादातर खुशियां दो कौड़ी के लोग समेट ले जाते हैं। जब संपत्ति के बराबर वितरण की मांग की जाती है तो खुशियों के बराबर वितरण पर भी तवज्जो दी जानी चाहिए।

सरकार के पास इस दरख़्वास्त के पहुंचते ही धड़ाधड़ कार्यवाही शुरू हो गयी और आदेश निकल गया कि सामान्य लोग अपनी हंसी पर काबू रखें और हैसियतदारों के बंगलों के पास से गुज़रते हुए ज़ोर से हंसने की गुस्ताख़ी न करें। मतलब यह कि रसूखदारों के भवनों से गुज़रते हुए वैसा ही आचरण करें जैसा पीसा की झुकती हुई मीनार के आसपास निर्धारित है।आदेश में यह भी कहा गया कि इसके लिए जल्दी ही हंसी का डेसिबेल तय किया जाएगा और उल्लंघन करने वालों के लिए सज़ा मुकर्रर की जाएगी।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares