(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण रचना – “वर्षा आई” । हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।)
☆ ‘चारुचन्द्रिका’ से – बाल कविता – “वर्षा आई” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
☆ आम्हीं तो चिरंतनाचें पाईक… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“सर, तुमच्या शिबिरात आल्यावर आमच्या मुलाला सकाळी लवकर उठायची सवय लागेल ना?”
“सर, आमची मुलगी झोपेतून उठल्यावर अंथरुणाची घडी सुध्दा घालत नाही. तिला ती सवय लागेल ना?”
“सर, हा आमचा मुलगा भाज्याच खात नाही. हॉटेल मधलं सगळं बरोब्बर खातो. पण घरचं जेवणच नको असतं त्याला. भाज्या नकोत, फळं नकोत, आणि उपदेशही नकोत असं आहे त्याचं. तुमच्या सोबत आला तर तो भात-वरण-पोळी-भाजी खाईल ना?”
“सर, धांदरटपणा अन् विसराळूपणा कमी व्हावा म्हणून आमच्या मुलाला तुमच्या कॅम्पला पाठवायचंय बघा. “
‘अनुभूती’चे वारे वाहायला लागले आणि नोंदणी सुरु झाली की, असे कितीतरी फोन रोज सुरु होतात.
उन्हाळी शिबिरं, छंद वर्ग आणि सहली यांचा खरा उद्देश कोणता, अन् पालकवर्ग त्याकडं कोणत्या दृष्टीनं पाहतो आहे, यातलं अंतर दिवसेंदिवस वाढतच चाललंय असं वाटतं. आपल्या मुलांना आपण नेमकं काय द्यावं आणि आपल्या मुलांनी नेमकं काय शिकावं, याची खरोखरंच नेमकी जाणीव पालकवर्गाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नदीचं मूळ शोधण्याइतकं कठीण होऊन बसलं आहे. घरचं जेवण करण्याची अन् बटाटा सोडून बाकीच्या भाज्या खाण्याची सवय लागावी यासाठी उन्हाळी शिबिर लागतं? कमाल वाटते मला.
“मोबाईल फोन नसेल तर मी जाणार नाही त्या सहलीला. ” इति वय वर्षे १५..
“आई, तुला माहितीये ना, मला एसी लागतो. एसी असेल तरच जाईन मी ट्रेकला. “असं एका मुलानं घरी ठणकावून सांगितलं. (आता महाराजांच्या गडकोटांवर एसी कुठून आणायचा?)
“त्याला नं कालवलेला भात लागतो पानात. रोज पनीर लागतं. सकाळी एक डबल ऑम्लेट आणि एक बॉईल्ड एग लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमोडची आणी गरम पाण्याची आंघोळीची सोय हवी. तुमच्या कॅम्पमध्ये या गोष्टी मिळतील ना?” असाही एका आईचा फोन होता.
काही जण तर इतके धन्य असतात की, त्यांचा शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर जाहीर नागरी सत्कारच केला पाहिजे. एका पालकांचा चौकशीसाठी फोन आला. “मुलं रोज कुठं कुठं राहणार आहेत, काय खाणार आहेत, किल्ल्यावर कोणत्या ठिकाणी आहेत याचं जीपीएस लोकेशन तुम्ही पालकांना दर तासातासाला पाठवलं पाहिजे. त्याशिवाय आम्हाला कळणार कसं?” हे ऐकताच मी धन्य झालो.. पण समोरुन सुलतानढवा चालूच राहिला.
“गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या माणसांच्या हातचं जेवायचं म्हणताय. पण ते ऑईल कुठलं वापरतात, धान्य कुठलं वापरतात हे तुम्ही माहिती करुन घेता का ? ते लोक सॅनिटायझर तरी वापरत असतील का? स्वयंपाकाला कुठलं पाणी वापरत असतील? आणि अल्युमिनियम च्या भांड्यातच अन्न शिजवत असतील. म्हणजे ते अजूनच अनहेल्दी.. कशी पाठवायची आमची मुलं?” मी शांतपणे हा तोफखाना अंगावर घेत राहिलो. समोरचा दारूगोळा संपल्यावर फोन ठेवून दिला.
पिझ्झा हट अन् मॅकडॉनाल्ड्स संस्कृतीत वाढलेल्या अन् मिसळ खाताना बोटांना तर्रीचं तेल लागतं म्हणून टिश्यू पेपरचं डबडं शेजारी घेऊन बसणाऱ्यांना सह्याद्रीची मुलुखगिरी स्वतः करणं फार अवघड आहे.
“तुम्ही रोज रात्री पुण्यात मुक्कामी येणार ना?” हा प्रश्न तर माझ्यासाठी “गिटार वाजवून झाल्यावर रोज तारा काढून ठेवायच्या ना?” असा होता. यावर मला नेमकं काय उत्तर द्यावं हेच सुचेना. असे शेकडो फोन अन् चित्रविचित्र प्रश्न.. ! डोकं चक्रावून जातं..
या माणसांच्या जगण्याच्या कल्पना तरी काय आहेत, अन् रोजचं आयुष्य ही माणसं कशी जगत असतील, या विचारानं मन अस्वस्थ व्हायला लागतं. आज नुकतीच वयात येऊ घातलेली यांची मुलं पुढं जगतील कशी? जगाशी जुळवून घेतील कशी? यांना माणसं जोडता येतील का? दुर्दैवानं करिअर मध्ये बॅडपॅच आला तर काय करतील? असे प्रश्न पडायला लागतात. अशा कितीतरी जणांना “अनुभूती तुमच्या मुलांसाठी योग्य नाही. त्याला दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमाला पाठवा. ” असं सांगून नकार द्यावा लागला. कारण, “अनुभूती” हा आम्हीं आखलेला कार्यक्रमच वेगळा आहे. त्याचा बाजच वेगळा आहे. त्यात इतिहास आहे, शौर्य आहे, धाडस आहे, संस्कृती आहे, सामाजिक बांधिलकी आहे, जिव्हाळा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीयत्व आहे.. !
प्रभाव ही फार विलक्षण गोष्ट आहे. ती विकतही मिळत नाही आणि कुणाकडून उसनीही घेता येत नाही. आपल्याला आयुष्यात उत्तम यश मिळवायचं असेल, चांगलं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल तर, त्यासाठी उत्तम प्रेरणा हवी. आणि उत्तम प्रेरणेचा मार्ग प्रभावाच्या पोटातूनच जातो. तो प्रभाव निर्माण करणारा कार्यक्रम म्हणजेच ‘ अनुभूती’… !
खेडोपाडी राहणाऱ्या, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या माणसांचं आर्थिक स्थैर्य भक्कम नसेलही. पण, त्यांचं त्यांच्या परंपरेशी आणि सांस्कृतिक पूर्वपीठिकेशी असलेलं नातं अजूनही कणखर आणि मजबूत आहे. चार-चार शतकांपासून ही माणसं गडांवर नांदलेली.. यांच्या पूर्वजांनी कदाचित महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं असेल. एखाद्या मोहिमेत हाती समशेर धरली असेल. शत्रूच्या आक्रमणांना अन् तोफगोळ्यांना तोंड देत यांनी गड झुंजवला असेल. कुणास ठाऊक.. पिंपळाचं झाड शेकडो वर्षं जुनं असलं तरी त्याच्या प्रत्येक पानाची वंशावळ, कारकीर्द अन् चरित्र कुणी लिहीत बसत नाही. ह्या माणसांच्या पूर्वजांचंही असंच आहे.
ब्रिटिश राजवटीत गड किल्ल्यांच्या अस्तित्वावरच जी संक्रांत येऊन बसली, ती काही केल्या हटायलाच तयार नाही. त्यामुळं, पिढ्या न् पिढ्या गडावर जगलेल्या या परिवारांना देशाच्या स्वातंत्र्यानंतरच खरी दृष्ट लागली. गडाच्या वस्तीकऱ्यांनाच गड सोडावे लागले. ऐतिहासिक वास्तू संरक्षित म्हणून घोषित व्हायला लागल्या. पण आज पन्नास वर्षांहून जास्त काळ उलटून गेला तरीही महाराजांच्या गडांवरची दैवतं उन्हा-पावसाचे तडाखे खात उघड्यावरच आहेत. मग त्यात कितीतरी मारुतीराय आहेत, गणपती आहेत, शिवलिंगं आहेत.
शिवाजी महाराजांच्या काळात रोजच्या रोज पुजली जाणारी देवालयं आज भग्न अवस्थेत पडली आहेत. कितीतरी गडांवर भग्नावस्थेतले नंदी आहेत. रोज संध्याकाळी देवाला दिवा लावायलासुध्दा माणसं राहिली नाहीत, सणावारांना नैवेद्य नाही. आज त्यांच्याबद्दल कुणाच्या काय भावना आहेत?
अशाच एका गडावर मुलांना घेऊन गेलो होतो. शिवाजी महाराजांनीच बांधलेला किल्ला. गडाच्या घेऱ्याशी आम्ही उभे होतो. मी गडाच्या बांधणीविषयी मुलांशी गप्पा मारत होतो. मागून पाच सात जणांचं एक टोळकं आलं. आमच्यापाशी थांबलं. त्यांना मागचा पुढचा संदर्भ काहीच ठाऊक नव्हता. सहावीत शिकणाऱ्या एका छोट्या मुलानं “पण महाराजांनी इथंच का बरं किल्ला बांधला असेल?” असा प्रश्न विचारला. मी काही उत्तर देणार तेवढ्यात “महाराज नाही, छत्रपति शिवाजी महाराज असं म्हणायचं. समजलं का?” असं त्यांच्यातल्या एकानं दरडावलं अन् खिदळत पुढं गेले. थोड्या वेळानं आम्ही चढणीच्या एका टप्प्यावरच्या मारुतीपाशी थांबलो. (हजारो माणसं गडावर येतात. सेल्फी काढून निघून जातात. पण हे मारुतीराय मात्र अजूनही उपेक्षितच राहिले आहेत. ) बघतो तर, ही मंडळी मारुतीपाशीच जेवायला बसलेली. मोबाईल फोनवर “पाटलांच्या बैलगाड्यानं घाटात केलेला राडा” सुरु होता. गौतमी पाटील बाई कशा नाचतात, याच्या सुरस कथा सुरु होत्या. अन् जेवणाच्या डब्यात अंड्यांची भुर्जी होती… ! हे सगळं मारुतीपाशी.. !
कितीतरी किल्ल्यांवर प्लॅस्टिकच्या बाटल्यांची अन् पिशव्यांची रानं माजली आहेत. कागदी प्लेट्स, कागदी कप, वेफर्सची पाकीटं पडलेली असतात. “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. ” असं आज्ञापत्रात म्हटलंय, ते कितीजणांनी वाचलंय ? गडकिल्ले हे प्रेरणास्थान आहे की पर्यटन स्थळ आहे ? याचा निर्णय व्हायला हवा. “आम्ही गडांवर जातो” हे सांगणं सोपं आहे. पण तिथं जाऊन आम्ही काय केलं, कसे वागलो हेही सांगितलं पाहिजे. महाराजांची दौलत राखायची म्हणजे नेमकं काय करायचं ? हे समाजाला सांगायला हवं.
“हर हर महादेव” या गर्जनेचा अर्थ समजून घेताना उगवत्या पिढीला त्यांची जबाबदारी शिकवण्याचं सुध्दा दायित्व आहेच ना. म्हणूनच, “अनुभूती” येणाऱ्या एकाही मुलाकडं प्लॅस्टिकचं काहीही सापडणार नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कागद गडांवर न्यायचेच नाहीत, हा नियम गेली १८ वर्षं ‘अनुभूती’ नं कटाक्षाने पाळला आहे. उलट, गड किल्ल्यांवर असा कचरा दिसला तर, तो गोळा करुन पायथ्याला आणण्याचं काम सुध्दा मुलांनी केलं आहे.
“महाबळेश्वर, खंडाळा, पाचगणी आलो होतो म्हणून सहज फिरता फिरता प्रतापगडावर आलो. कांद्याची गरमागरम भजी खाल्ली, चहा घेतला आणि आता निघालो परत. ” अशी कितीतरी माणसं तिथं रोज भेटतील. पण तिथं राजांनी अफजलखानाशी युद्ध करताना जी योजना केली होती, त्याचा नकाशा लावलेला आहे, तो कुणी पाहत नाहीत. किंबहुना त्यांच्या ते गावीही नसतं. ढालकाठीपाशी जाऊन फोटो काढणं एवढंच डोक्यात असतं. कुल्फी खात खात तटावरून फिरायचं अन् नंतर कुल्फीची काडी तिथंच फेकून द्यायची, ही लोकांची स्वाभाविक सवय आहे. बुरुजांच्या जंग्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या खुपसणं, हे तर कॉमन आहे.
पुस्तकी शिक्षण घेऊन साक्षर होता येईल. पण आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व जतन करण्याच्या साक्षरतेचं काय? तिथल्या निसर्गाच्या जोपासनेचं काय ? तिथल्या लोकजीवनाचं काय ? याचा विचार आणि भान घडत्या पिढीच्या मनात रुजवलं पाहिजे.
एखाद्या गडाच्या पायथ्याच्या वस्तीतल्या अंगणात रात्री जा. तिथली भाकरी-भाजी अन् वाफाळत्या भाताचं जेवण करा, आणि आकाशाकडं बघत बघत तिथंच अंगणात पथारी पसरून ताणून द्या. पडल्या पडल्या जी झोप तिथं लागते ना, तिला ‘सुखाची झोप’ म्हणतात. दुपारच्या सुमारास बांधावरच्या एखाद्या आंब्याच्या झाडाखाली बसून तर बघा. सूर्य उतरणीला लागला की, त्याच्या केशरी प्रकाशात एखाद्या ओढ्यात मनसोक्त डुंबून बघा. ऑनलाईन गेम्स खेळण्यापेक्षा एखाद्या वाडीतल्या मुलांसोबत कोंबड्या पकडून डालग्यात कोंबण्याचा खेळ खेळून बघा. रात्री मारुतीच्या देवळात भजनाला जा. तुम्हाला असं काहीतरी नक्की गवसेल, जे कदाचित शब्दांत व्यक्त करता यायचं नाही. पण जो आनंद आणि समाधान तिथल्या वास्तव्यात मिळेल, तो कुठल्याही मॉलमध्ये नाही मिळणार, हे नक्की.
असा आनंद, उत्साह घरबसल्या मिळणार नाही. त्यासाठी घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडायला हवं अन् मोकळेपणानं स्वतःला निसर्गाशी जोडता यायला हवं. आपलं शहरी शहाणपण सोडून देऊन प्राणी, पक्षी, झाडं, वेली, जंगलं, लेणी, मंदिरं यांच्या सानिध्यात रहायला हवं. आपल्या मुलांना मुक्त करुन पहा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहराची जी नवी पालवी फुटेल ना, ती शब्दातीत असेल…!
(चित्र साभार फेसबुक वाल – श्री मयुरेश उमाकांत डंके)
“भालचंद्र पाटील”बोरगावचे पाटील. घरची परिस्थिती उत्तम. गावात नव्हे पंचक्रोशीत त्यांच्या शब्दाला मान होता. गावासाठी सतत धावणारे, उत्तम प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. गरिबांसाठी माया, ममता होती त्यांच्याकडे. गावात शिस्त होती. आदरपूर्वक दरारा होता त्यांचा त्यांना सगळे प्रेमाने आप्पा म्हणायचे … सगळं होतं पण मुलगा नव्हता. एकच मुलगी होती तिचं नावं “इंदू” होतं.
“इंदू, शाळेत जात होती गावात बारावी पर्यंत शाळा होती. पुढचं शिक्षण शहरात घ्यावं लागणार होतं. तिची दहावी झाली आता अकरावी, बारावी झाल्यावर काय असा प्रश्न पडला, तिला पुढे शिक्षण घायचं होतं खूप इच्छा होती.
कॉलेज सुरु झालं इंदू खूप अभ्यास करायची तिचा अभ्यास बघून आप्पांना वाटायचं पोरीचं स्वप्न पूर्ण करावं व तिला शिक्षणाला पाठवावे. इंदू बारावीला तालुक्यात पहिली आली तिचा पुढचा प्रवास सुरु झाला. तिला इंजिनियरिंग ला ऍडमिशन मिळालं,,, इंदू अभ्यासात हुशार असल्यामुळे ती लगेच सर्वांची लडकी झाली.
“इंदू ” दिसायला खूप सुंदर होती, उंच सडपातळ बांधा, गोरीपान, सरळ नका, धनुष्या सारखे गुलाबी ओठ, काळेभोर पाणीदार डोळे, रेशमी मुलायम दाट आणि लांबसडक केस, बघताच कुणीही प्रेमात पडावं अशीच होती.
इंजिनियरिंगचे दोन वर्ष झाले होते, इकडे आप्पांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले… आता आई एकटीच होती. तीही फार खचून गेली होती. कधी दोघे एकमेकांना सोडून राहिले नव्हते, त्यामुळे त्या खूप उदास झाल्या होत्या. इंदू म्हणाली ‘ मी कॉलेज सोडून गावी येते ‘. पण आई नको म्हणाली, इंदुची एक मावस मावशी होती, तिचा नवरा लोकांच्या शेतात काम करून घर चालवत असे, इंदूचे मामा तिच्या आईला म्हणाले, ”आक्का सखुला राहू दे तुझ्या जवळ. तुला सोबत होईल आणि दाजी शेती बघतील,” ते सगळ्यांना पटलं व सखू व बबन तिथे राहायला आली…
आता सगळी जबाबदारी पाटलीणबाई वर आली होती. गावातील लोक मदत करत होते, सखू, बबन छान काम करत होते सगळं कसं सुरळीत चालू होतं.
इंदूच इंजिनियरिंग पूर्ण झालं व ती M. S साठी ओस्ट्रेलिया ला गेली.
इकडे बबनची आई त्याला भेटायला म्हणून आली आणि एवढं वैभव बघून तिच्या लालच निर्माण झाली. तिने बबनला सांगितलं “ तू बघतो सगळं याला कोणी वारस नाही. मुलगी तर परदेशात गेली ती काय परत येते. तू हे सगळं तुझ्या नावावर करून घे. किती दिवस गरिबीत काढायचे.. आता हे आयत हाती लागलं आहे हे सोडू नको, , , , ”, बबन ने सखुला विश्वासात घेतलं, तिला सगळं सांगितलं. तिला पण श्रीमंतीचे स्वप्न पडायला लागले. ती त्याला हो म्हणाली, आणि, त्यांनी प्ल्यान तयार केला.
पाटलीणबाईकडून हळूहळू गोड बोलून वेगवेगळे कारणं सांगून सह्या घेतल्या. काही गावातील लोकांना स्वतःकडून करून घेतलं आणि सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेतली. त्यांचं वागणं बदलू लागलं लोकांची ओरड येऊ लागली. पाटलीणबाई बबनला म्हणाल्या “आमच्या जिवाभावाची लोकं आहेत असं त्रास देऊ नका. नाहीतर तुम्ही जाऊ शकता, ” सखू म्हणाली “ होय आक्का जावंच लागेल.. पण तुला. आता हे सगळं आमचं आहे आणि तूच आमच्या नावावर केलं आहे. ”
पाटलीणबाईला धक्का बसला व त्या जागेवरच गेल्या. पै पाहुणे जमा झाले गावाला हुरहूर लागली होती. काही लोकं बबनने फसवलं म्हणून पाटलीणबाई गेल्या असं म्हणत होते, तर काही लोकं त्यांनीचं सगळं बबनला दिलं असं म्हणत होते.
इंदू आली.. अंत्यसंस्कार झाले, ती तेरा दिवस राहिली व परीक्षा होती म्हणून निघून गेली.
आप्पांचे एक मित्र होते त्यांना आप्पा सगळं सांगत होते. ते इंदुच्या मामांना भेटले व त्यांनी एका वकिलाचा फोन नंबर त्यांना दिला. त्यांच्याकडे जायला सांगितलं. तेव्हा इंदूचे मामा म्हणाले “तुम्ही चला आपण जाऊन येऊ “ त्यांनी एक दिवस ठरवलं व वकिलांना भेटायला गेले.
बबन व सखू सातव्या अस्मानावर होते. फुकटच मिळालं होतं. पैशाची, माणसांची किंमत राहिली नव्हती. उग्रट, टाकून बोलणं होतं. माणसं तुटली होती……
मामा वकिलांकडे गेले, वकिलांना सगळं सांगितलं. त्यांनी मामाला सांगितलं की असं होऊ शकतं नाही कारण प्रॉपर्टी सगळी इंदुच्या नावावर आहे आणि ती जेव्हा लग्न करेल तेंव्हाच तिला मिळेल.. असं मृत्यूपत्र केलेलं आहे. आता कुठे मामाच्या जीवात जीव आला होता.
दुसऱ्या दिवशी पोलीस व वकील गावात आले. बबन कुठे आहे? असा कडक आवाज दिला, सखू बाहेर आली, पोलीस बघून घाबरली व ते शेतात गेले असं सांगितलं, ‘ जा बोलून आणा त्याला ‘ वकील म्हणाले, सखुने एका मुलाला बबनला बोलवायला पाठवलं.
बबन आला, “ पोलीस? मी काय केलं.. तुम्ही इकडं कसे, ” असं बोलल्यावर वकील म्हणाले
“ आम्हाला इथे दुसरा केअर टेकर ठेवायचा आहे. तू घर खाली कर, ” तेंव्हा बबन म्हणाला “ हे माझं आहे पाटलीणबाईने माझ्या नावावर केलं आहे. ” असं म्हणत त्याने पेपर वकिलांच्या अंगावर फेकले, वकील व पोलीस हसायला लागले व “ खोटे कागदपत्र तयार करून धमकी देऊन सह्या घेतल्या आहेत, पण ही प्रॉपर्टी ज्याची आहे तिची सही कुठे आहे. ”
बबन गडबडला व म्हणाला म्हणजे, तस वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून वाचायला सुरवात केली तशी बबनच्या पायाखालची जमीन सरकली. खोटे कागदपत्र व फसवणूक केली म्हणून बबन सखुला अटक झाली. गावातील लोकांनी साक्ष दिली. पाटलीणबाई याच्या त्रासाने गेल्या त्या जाण्यासारख्या नव्हत्या तोही आरोप झाला व जन्मठेपेची शिक्षा त्यांना मिळाली.
वकिलांनी केअर टेकर ठेवला व प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात दिली,,,
इंदूच M. S पूर्ण झालं. ती भारतात आली. एका कंपनीत तिला जॉब मिळाला. तिचं काम हुशारीने ती CEO झाली. तिच्याच कंपनीत एक हँडसम मुलगा मॅनेजर होता. त्याच नावं ” राहुल “. तो इंजिनियर होता, खूप हुशार आणि टॅलेंटेड होता. घरची परिस्थिती नाजूक होती. त्याची खूप मोठी स्वप्न होती. त्याला एका मोठ्या कंपनीचा मालक व्हायचं होतं. तो न थकता काम करत होता.
इंदूला पण तो आवडायला लागला. दोघं मीटिंगला बरोबर असायचे, विचार जुळत होते. त्यांना एका मिटिंगला जायचं होतं दिल्लीला. दोन तीन दिवस लागणार होते. दोघेही गेले. त्या कपंनीने त्यांची राहण्याची सोय एका आलिशान हॉटेलमध्ये केली होती. ते तिथे पोहचले व फ्रेश होऊन मीटिंगला गेले, मिटिंग छान झाली. दुसऱ्या दिवशी डील फायनल झालं, त्या कंपनीने पार्टी ठेवली.
राहुल व इंदू पार्टीला गेले, तिथे खूप लोकं आले होते. त्यांना हे दोघं कपल आहे असं वाटतं होतं त्यातल्या काहींनी विचारलं देखील पण इंदू हसून शांत राहिली. राहुलला पण इंदू आवडत होती, पण परिस्थितीमुळे तो बोलत नव्हता.
मामा इंदुला भेटायला आले. इंदूबरोबर बोलतांना त्यांना राहुल दिसला. मामांना तो आवडला दोघांनाही विचारलं.. ते हो म्हणाले, पण राहुल म्हणाला “ माझी परिस्थिती नाजूक आहे, माझे स्वप्न खूप मोठे आहेत. ” तेंव्हा मामा म्हणाले “ तुम्ही दोघं हुशार होतकरू आहात, एकमेकांना ओळखता.. प्रेम आहे, पुढे अजून चांगलं होईल.”
मामा राहुलच्या आई वडिलांना भेटले व लग्न ठरवलं, राजेशाही थाटात लग्न पार पडलं…
कष्टाने त्यांनी स्वतःची कंपनी उभी केली, गुण्यागोविंदाने संसार करत होते. इकडे सगळं राहुलचे आई वडील सांभाळत होते.
वाईट परिस्थितीत संयम ठेवला व कष्ट करायची तयारी ठेवली म्हणून ते एका कंपनीचे मालक झाले. फक्त श्रीमंत मुलगा हवा म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या मुलींनी इंदूचा आदर्श घ्यावा. दोघांची साथ असेल तर जग जिंकता येत हेच खरं,,,
☆ “भिकूसासेठ…” – संकलन : श्री माधव सावळे☆ श्री मोहन निमोणकर ☆
साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी साडेसहाची वेळ. मित्राचं पेठेत दुकान आहे. बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो. येता येता त्याच्याकडे डोकावलो.
आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो. दुकान चालतंय कसलं… पळतय.
नीचे दुकान ऊपर मकान.
जनरल कम किराणा.
दूध, ब्रेड, बटर, अंडी, केक, बिस्कीटं,
घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून गर्दी करायची.
दुकानापाशी पोचलो. दुकानासमोरचा डांबरी रस्ता. तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला. पायरीपाशी कोपऱ्यात एक स्टीलची रिकामी बादली. मित्रानं पाण्याचा छान सडा घातला होता.
पाण्याचा छान ओलेता वास येत होता.
पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती.
मी दुकानात शिरलो. पाठोपाठ वहिनी सुद्धा घरात शिरली. पाच दहा मिनटं गप्पा झाल्या. मग बेल वाजली.
दुकानातला पोरगा वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला. बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे.
घुटक घुटक चहा घेत होतो. एवढ्यात एक माणूस दुकानात शिरला. पांढरा शुभ्र पायजमा. पांढरा बंडीसारखा शर्ट.
डोक्यावर गांधी टोपी.
“नमस्कार मालक. कसे आहात ?”
मित्र लगेच उठला. काऊंटरची फळी उघडून त्यांना आत घेतलं. बसायला खुर्ची दिली. पटकन वरची बेल वाजवली.
पाच मिनटात पुन्हा चहा आला. एकंदर बडी आसामी असावी.
“मालक एक विनंती आहे. वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते. तू देवाला हारफुलं वाहतोस. उदबत्ती लावतोस.
प्रसन्न वाटतं. पन तू रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावर. ते नको करत जाऊस बाबा. पाणी वाया जाते अशान्.
पाण्यामदी जीव असतो. पाणी देव हाये आमच्यासाठी. देवाचा अनमान करू नका माऊली… “
पाच दहा मिनटं गप्पा मारून पाहुणे गेले.
” कोण हे ?” मी विचारलं.
‘तू ओळखलं नाहीस ?’
‘नाही बुवा.
‘भिकूसाशेठ. चोपडा ज्वेलर्सचे मालक. एकदम सज्जन माणूस. सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष. शून्यातून उभं केलंय सगळं. एम जी रोडवरची मोठी पेढी. उपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच. घनो चोखो धंदो. पण म्हाताऱ्याला वेड लागलंय. सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो. कुणी दुकानापुढं सडा घालताना दिसला, की हात जोडून उभा राहतो. पाणी वाया घालवू नका म्हणतो. लोकं तेवढ्यापुरतं ऐकतात.. तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले. आपला गाव कसाय तुला माहित्येय. बहुतेक नळांना तोट्याच नाहीत. पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहत असतात. शेकडो लीटर पाणी वाया जातं. भिकूसाशेटच्या चुलतभावाचं हार्डवेअर शाॅप आहे.
शेटच्या हातात एक पिशवी असते.
पिशवीत पान्हा आणि तोट्या. वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो. तोटी लावून देतो. स्वखर्चानं…!! मान्य की पाणी वाया जातं. पण दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते. जरा गारवा वाटतो. हे याला कोण सांगणार? बरं, इथं पाणी वाचलं तरी ते तिकडे दुष्काळी भागात कसं पोचेल?म्हाताऱ्याची सटकलीय, झालं.
“मला हे माहितच नव्हतं. मला यात स्टोरीचा वास आला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला गाठला. तो आणखीन एका दुकानात शिरला होता. ” सकाळी दुकानापुढे पाणी मारू नका हो. “
त्याची आर्जवं, त्याची विनवणी.
त्याच्या हातातली पिशवी, तोट्या.
सगळं रेकाॅर्ड केलं. न्यूज चॅनलला पाठवून दिलं.
पेपरमधे छापून आलं. म्हातारा एका रात्रीत फेमस झाला.
तरीही बदलला नाही. त्याची रोजची प्रभातफेरी चालूच राहिली.
आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली. डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद झाले. उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं.
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.
ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला,
“‘मारवाडातलं गाव होतं माझं…. पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.
एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा.
पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग…. !!*
☆ एक ‘अग्निसाक्षी’ सैनिक !☆ श्री संभाजी बबन गायके☆
लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान
मध्यप्रदेशातील रतलाम नावाचं त्याचं जन्मगाव समुदसपाटीपासून सुमारे ४८० मीटर्स उंचीवर आणि कोणत्याही समुद्रकिना-यापासून शेकडो किलोमीटर्स दूर! पण छोट्या धर्मेंद्रला लहानपणापासूनच समुद्राचं आकर्षण होतं आणि त्यापेक्षा जास्त समुद्रात लाटांवर स्वार होत क्षितीजापर्यंत आणि क्षितीजाच्याही पल्याड जाण्या-या नौकांचं. पावसाळ्यात वाहत्या पाण्यात सोडल्या जाणा-या कागदी होड्या त्याला फारशा भावायच्या नाहीत. उलट इतिहासाच्या पुस्तकातल्या जुन्या लढाऊ जहाजांची मोहिनी त्याला पडली होती. जहाजं एवढी मोठी असतात आणि तरीही ती पाण्यावर सहजपणे तरंगत जातात तरी कशी असा प्रश्न त्याच्या बालमनाला सहज पडत असे.
हे आणि असेच काही प्रश्न मनात घेऊन हा मुलगा इंजिनीअर झाला. अर्थातच उत्तम नोकरी शोधावी आणि गृहस्थाश्रमात पडावं असं त्याला आणि त्याच्या पालकांना वाटणं साहजिकच होतं. पण धर्मेंद्र सिंग यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली होती ती सेनादलात जाण्यासाठीच. भारतीय नौदलात नौसैनिक अधिका-यांची भरती निघताच धर्मेंद्रसिंग यांनी आपली सारी बुद्धीमत्ता, शारीरिक क्षमता पणाला लावून भारतीय नौसेनेचा चमकदार सफेद गणवेश अंगावर चढवलाच. त्यांच्या डोक्यावरची नौसेनेची विशिष्ट कॅप त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या तजेलदारपणाला आणखीनच उजाळा देणारी दिसे. वर्ष होतं २०१३.
गावातल्या नदीत, तळ्यात पोहणं, नौकाविहार करणं वेगळं आणि थेट लढाऊ जहाजांवर देशसेवा करायला मिळणं वेगळं. धर्मेंद्र्सिंग आणि समुद्राचं नातं फार लवकर जुळलं आणि अर्थातच लढाऊ जहाज हे त्यांचं दुसरं निवासस्थान बनलं.
त्यांना लाभलेलं पाण्यातलं निवासस्थान काही साधंसुधं नव्हतं. तब्बल बावीस मजली इमारतीएवढी उंची होती या घराची आणि वजन होतं ४४, ५०० टन. लांबी म्हणजे फुटबॉलच्या तीन मैदानं बसतील इतकी आणि रुंदी म्हणाल तर कित्येक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स सहज मावतील एवढी. आणि नाव होतं आय. एन. एस. विक्रमादित्य! भारताची सर्वांत शक्तिशाली, आधुनिक युद्धनौका. रशियाकडून खरेदी केली गेलेली ही युद्ध नौका सरतेशेवटी अतिशय सुसज्ज होऊन २०१४ मध्ये भारतीय नौदलात प्रवेश करती झाली आणि तिने शत्रूच्या काळजात धडकी भरवली.
युद्धनौकेवर अतिशय उच्च दर्जाचं प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असतं. विक्रमादित्य वर जवळ जवळ सव्वाशे अधिकारी आणि पंधराशे नौसैनिक कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सदैव सज्ज असतात. धर्मेंद्र सिंग साहेबांनी एका नौसैनिकाला अत्यावश्यक असलेली सर्व कौशल्ये अल्पावधीत शिकून घेतली. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्यात तर त्यांनी उच्च दर्जा प्राप्त केला होता. अग्निप्रतिबंध या विषयात तर त्यांना खूप गती होती.
आय. एन. एस. अर्थात इंडियन नेवल शिप ‘विक्रमादित्य एप्रिल २०१९ मध्ये मित्रराष्ट्रांच्या सोबत मोठ्या युद्धसरावात सहभागी होणार होतं. यासाठी खूप मोठी तयारीही केली जात होती.
महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या करुणा यांचं स्थळ धर्मेंद्र सिंग साहेबांना सांगून आलं होतं. वयाची तिशी आली होती आणि विवाह योग जुळून आला होता. नौसैनिकांना खूप मोठ्या कालावधीसाठी जहाजांवर वास्तव्य करावं लागतं. युद्धनौका म्हणजे एक तरंगतं शहरच जणू. इथं राहण्यासाठी खूप मजबूत मन:शक्ती आणि संयम आवश्यक असतो.
आपलं आवडतं जहाज सरावात सहभागी असणार आणि आपण त्यावर नसू याविचाराने धर्मेंद्र सिंग साहेबांनी आपल्या विवाहानंतर काही तासांतच समुद्राची वाट धरली. विवाहात अग्निला साक्षीला ठेवून त्यांनी सात प्रदक्षिणा घालतानाही त्यांच्या मनात आपलं कर्तव्य असावं. आणि योगायोगानं विक्रमादित्यवरही त्यांना अशीच एक जीवघेणी अग्नि-प्रदक्षिणा घालावी लागेल, असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं.
विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात प्रवेश करण्याच्या अगदी बेतात असताना नौकेच्या इंजिनरूम मध्ये आग भडकल्याचं समजलं. नौकेवरची अग्निशमन यंत्रणा सज्ज होतीच आणि नौसैनिक सुद्धा. लेफ्टनंट कमांडर पदावर पोहोचलेले धर्मेंद्रसिंग चौहान साहेब या अग्निशमन मोहिमेचे धडाडीने नेतृत्व करीत होते. या कामात त्यांना उत्तम गती होती. भारताची एवढी मोठी दौलत, सोळाशेच्या वर नौसैनिकांचे भवितव्य पाण्यात लागलेल्या त्या अग्नितांडवात रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.
धर्मेंद्रसिंग साहेब मोठ्या त्वेषाने धुराने भरलेल्या कक्षामध्ये शिरले. त्यांचा आवेश पाहून इतर नौसैनिकांनाही स्फुरण चढले. आगीवर नियंत्रण मिळण्याची चिन्हे अगदी दृष्टीपथात होती. इतक्यात एक वाफेचा पाईप अचानक फुटला आणि त्यातील अतिशय उष्ण वाफ धर्मेंद्रसिंग साहेबांच्या अंगावर आली आणि ते होरपळून निघाले. नाका-तोंडात आधीच विषारी धूर गेला होताच. समोरचं काही दिसत नव्हतं. पण साहेब मागे हटले नाहीत….. शुद्ध हरपेपर्यंत ते आगीशी सामना करीत राहिले. युद्ध काही मैदानातच लढली जातात असं नव्हे. देशाची संपत्ती जतन करण्यासाठी केलेला संघर्षही युद्धापेक्षा कमी नसतो.
लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान साहेबांनी विक्रमादित्य आणि त्यावरील सोळाशे सैनिकांचं त्यादिवशी मृत्यूपासून संरक्षण केलं होतं स्वत: अग्निसाक्षी राहून. परिस्थिती नियंत्रणात येताच साहेबांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात एअरलिफ्ट करून पोहोचवण्यात आलं…. पण अग्निनं डाव साधला होता! चाळीसेक दिवसांपूर्वी विवाहवेदीवर चढलेला तीस वर्षे वयाचा एक उमदा नौसेना अधिकारी आता मृत्यूच्या वेदीवर पहुडला होता. नववधूच्या हातांवरील मेहंदी अजून फिकी पडलेली नव्हती…. मात्र तिच्या सुखी संसाराची नौका मृत्यू नावाच्या खडकावर आदळून अगदी गर्तेत गेली होती… कायमची. आईच्या हृदयचा तर विचार करूनही थरकाप उडावा. मोठ्या सन्मानानं शहीद धर्मेंद्रसिंग साहेबांना रतलामवासियांना अंतिम निरोप दिला. पण भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांच्या धीरोदात्तपणाची कमाल पहा… काहीच दिवसांत धर्मेंद्र्सिंग साहेबांच्या पत्नीने सैन्यात भरती होण्याची पात्रता पार केली. नौसेनेचा सफेद गणवेश अंगावर परिधान करून प्राणांची बाजी लावलेल्या आपल्या पतील पायदळाचा ऑलिव्ह ग्रीन गणवेश मिळवून श्रीमती करूणा सिंग एक अनोखी भेट देण्यास सज्ज झाल्या. यासाठी झालेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली. आणि त्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या! सलाम करूणा सिंग मॅडमच्या जिद्दीला. उण्यापु-या पंधरवड्याचा त्यांचा आणि धर्मेंद्रसिंग साहेबांचा सहवास…. पेशाने प्राध्यापिका असलेल्या एका नाजूक तरूणीस थेट सैनिकाचं काळीज देऊन गेला. शहीद सैनिक असेच आपल्या आठवणींतून, कर्तृत्वातून जगाच्या स्मरणपटावर आपली पावलं ठळक उमटवून जातात. यांच्या ऋणातून उतराई होणं कठीण पण त्यांचे स्मरण करणं सहजी शक्य. जयहिंद! जय हिंद की सेना.
सकाळ पासून अनेक मेसेज WA वर येत असतात. बरेचदा आपण वाचतो आणि सोडून देतो. पण काही मेसेजेस विचार करायला लावतात. त्यातलाच हा मेसेज-
‘May it be a Machine or Human Relationship,
Maintenance is always cheaper than repairing. ‘
अगदी खरंय. मशीनची efficiency टिकून राहावी, वाढावी म्हणून आपण नियमितपणे मशीनची देखभाल करतो. कधी थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी मशीन आपल्याला इंडिकेशन द्यायला लागते. तत्परतेने आपण मशीन मधला fault शोधून रिपेअर करतो.
नात्यांचे पण तसेच आहे.
आपल्या अवतीभवती अशी कितीतरी जणं असतात, जी सर्वांच्या नेहमी संपर्कात असतात, आवर्जून फोन करतात, विचारपूस करतात, अधूनमधून प्रत्यक्ष भेटतात सुद्धा. काहींना वाटतं, ही माणसं रिकामी आहेत. त्यांच्याकडे खूप वेळ आहे. तर तसं अजिबात नाही. या व्यक्ती आपल्या रोजच्या व्यापातूनसुद्धा दुसऱ्यासाठी वेळ काढतात. कारण त्यांच्या लेखी नाती महत्त्वाची असतात.
कित्येकांच्या घरी रात्रीचे जेवण घरातील सर्व सदस्यांनी एकत्र घ्यायची प्रथा आहे. मूळ उद्देश हाच की सगळे जण दिवसभरातून एकदा तरी एकमेकांना भेटतात. विचारपूस होते. विचारांची देवाण घेवाण होते. काही समस्या असतील तर त्याचे निराकरण होते. हाच routine maintenance. अशाने नाती टिकून राहतात. एकमेकांबद्दल आदर, प्रेम वाढते. आपली माणसे आपल्यासोबत आहेत, हा विचारसुद्धा खूप महत्त्वाचा असतो.
माझ्या कॉलेज /शाळेच्या ग्रुपमध्ये काहीजण आवर्जून प्रत्येकाच्या वाढदिवशी त्याला फोन करतात. काही जण सोबतचे फोटो शेअर करतात. काही जण कविता किंवा लेख लिहितात.
मला आठवतंय, लहानपणी दर १५ दिवसांनी, महिन्यांनी आजीचे, काकांचे पत्र यायचे, खुशालीचे.
आपल्या पिढीनेही पाहिली असतील पत्रे आलेली. आपणसुद्धा लिहिली आहेत पत्रं. बाहेरगावी किंवा नोकरीच्या ठिकाणाहून.
किती भारी वाटायचं ना पत्र आले की!काळाच्या ओघात पत्रं बंद झाली. आणि त्यांची जागा WA ने घेतली.
कोणी म्हणेल, कशाला करायचा फोन?इथे आपल्याला आपल्या कामाचे व्याप आहेत. आणि मी नाही केला कॉल, मी नाही केली चौकशी तर काय फरक पडणार आहे?
तसे पाहिले तर फरक काहीच पडणार नसतो. पण आपल्या एका फोनने नात्याचे बंध अधिक घट्ट होतात. समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी आपण केलेली कृती म्हणजेच Preventive मेन्टेनन्स.
म्हणूनच Machine सारखाच नात्यांचा Maintenance हवाच.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈