(त्यात परत अजून गोळी चहा,डस्ट,चाॅकलेट, ग्रीन टी ,लेमन टी हे ही उपप्रकार आहेतच)…
काही हाँटेल्समध्ये तर चहाला वेगळे नाव देऊन तो प्रसिद्धीस उतरवलाय.पुण्यामध्ये ‘अम्रुततुल्य चहा ‘ प्रसिद्ध आहे तर सांगलीमध्ये ‘ हरमन चहा ‘म्हणून प्रसिद्ध आहे.याशिवाय ‘ मटक्यातील चहा ‘सुध्दा नावारुपाला येतोय.
चहा कसा प्यायचा यातही खूप गमतीदार प्रकार आहेत.पूर्वी किंवा अजूनही काही ठिकाणी खेड्यामध्ये,झोपडीत चुलीवर साखरेऐवजी गुळ घालून चहा केला जातो.चहा पिण्यासाठी कपाचा वापर केला जातो.कपभर चहा किंवा चहाचा कप ही संकल्पना यामुळेच रुजली असेल.पण व्यक्ती आणि स्थान परत्वे चहा पिण्याच्या साधनात पण बदल होत गेला.पुर्वी किंवा आजही काही लोक चहा पिण्यासाठी कपबशीचा वापर करतात,पण आता मात्र या कपबशीची जागा ‘ मग ‘ ने घेतली आहे.बशी न देता नुसत्या मगमधून चहा देण्याची फँशन आली आणि ती रुढही झाली.वेगवेगळ्या रंगांचे,डिझाईनचे मग बाजारात उपलब्ध आहेत.त्याही पुढे जाऊन आता थर्माकोलचे युज अँड थ्रो वाले मग लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.विशेषतः समारंभात, टपरीवर अशा कपांचा वापर केला जातो.
उत्साह वाढविणार पेय म्हणून चहाकडे पाहिल जात असल तरी या चहाच्या अतिरिक्त सेवनाने त्याचे दुष्परिणाम सुध्दा दिसून येतात. चहा पिण्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो.चहा खरतरं दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घेतला जातो.पण काही जण दिवसातून तीन चार वेळा चहा घेतात.शिवाय घरात कुणी पाहुणा आला तर त्यांना कंपनी म्हणून, आँफिसमध्ये काम करताना उत्साह वाटावा म्हणून चहा घेत रहातात.दिवसातून दहा कप चहा पिणारे सुध्दा काही लोक आहेत.इतका चहा पिण्याने भूक मरते,जेवणावर परिणाम होतो हे लक्षातच घेत नाहीत.शरीरात उष्णता वाढते,पित्त वाढते हे बरेचजण विसरतात. आयुर्वेदात तर चहा पिणे वर्ज्य आहे असे म्हणतात. चहा कधीही नुसता न पिता त्याबरोबर काहीतरी खावे म्हणजे त्याचा फारसा त्रास जाणवणार नाही.
चहाबद्धल कितीही चांगल्या वाईट समजूती असल्या तरी ते एक उत्साह वाढविणारे तसेच मैत्री वाढविणारे पेय आहे हे नक्कीच.
रोडच्या एका बाजुला जरा मोकळी जागा दिसली तशी किसनने आपली कार तेथे पार्क केली.रस्त्यावर तशी शांतताच होती. एखाद दुसरी रिक्षा,स्कुटर जात येत होती.पलिकडे असलेल्या मार्केटमध्ये त्यांचे नेहमीचे सराफी दुकान होते. पण तिकडे कार लावायला जागा मिळत नाही. म्हणून मग त्याने दुसरीकडे कार पार्क केली आणि चालत मार्केटमध्ये आले.बरोबर त्याची मोठी बहिण होती.
काचेचा जाड दरवाजा ढकलुन ते दुकानात आले.रणरणत्या उन्हातुन ते आल्यामुळे त्यांना दुकानातली एसीची थंडगार झुळुक सुखावुन गेली. मंगलने पदराने घाम पुसला. जवळच्या पर्समधून पाण्याची लहान बाटली काढली.खुर्चीत टेकत दोन घोट घेतले.
दुकानात अनिलशेठ तर होतेच..पण त्यांचा मुलगाही होता.समोर लावलेल्या टीव्हीवर कुठला तरी चित्रपट पहात होते.
“या किसनभाऊ.आज काय बहिण भाऊ बरोबर. काय काम काढलंत?”
” शेठजी आम्ही आज एका वेगळ्याच कामासाठी आलोय. तुम्हाला तर माहीतीच आहे. आमचे अण्णा गेले दोन महीन्यापुर्वी”
“हो समजलं मला. बऱच वय असेल ना त्यांचं?”
“हो नव्वदच्या आसपास होतच.तर आम्ही हे दागिने आणले होते. जरा बघता का!”
किसनने पिशवीतून पितळी डबा काढला. काऊंटरवर असलेल्या लाल ट्रे मध्ये ठेवला. त्यात त्यांचे पिढीजात दागिने होते.
अनिलशेठनी ते बाहेर काढले.मोहनमाळ, पोहेहार,बांगड्या, पाटल्या, काही अंगठ्या,वेढणी,आणखी तीन चेन होत्या.
“आम्ही तिघे भावंडं. याचे तीन भाग करायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे आलोय.”
अनिलशेठनी ते दागिने पाहिले. कसोटीवर त्याचा कस उतरवुन शुध्दतेचा अंदाज घेतला.काही दागिने तापवुन घेतले.२२ कैरेटचे दागिने बाजुला ठेवले. चोख सोन्याच्या बांगड्या, पाटल्या आणि काही वेढणी होती.ते एका वेगळ्या डिशमध्ये ठेवली. वजने वगैरे करुन ते आकडेमोड करत होते.
“तु सांग ना त्यांना..”
“नको.तुच सांग..”
अनिलशेठनी मान वर करुन पाहीले.दोघा बहिण भावात काहीतरी कुजबुज चालु होती.
‘काय.. काही प्रॉब्लेम आहे का?”
किसन आणि मंगल दोघे एकमेकांकडे पहात होते. कसं सांगावं..नेमकं कोणत्या शब्दात सांगावं त्यांना समजत नव्हतं.
“बोला किसनभाऊ.निःसंकोचपणे बोला.पैसे करायचे का याचे?का फक्त तीन भागच करायचे आहे?”
मग शेवटी मंगलच पुढे झाली. शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली..
“तीन भाग तर करायचेच आहे हो,पण..”
“पण काय..?”
“दोन भागात ते चोखचे सगळे दागिने टाका.आणि उरलेल्याचा तिसरा भाग करा”
“असं कसं?तिसऱ्या भागात सगळे २२ कैरेट दागिने? अहो त्यातले काही डागी आहेत.त्याला बऱ्यापैकी घट येणार आहे”
“हां..पण तुम्ही टाका ते तिसऱ्या भागात.”
“असं कसं? मग सारखे भाग कसे होतील?”
“ते आम्ही बघू. मी सांगते तसं करा”
अनिलशेठनी मग मंगलने सांगितल्याप्रमाणे भाग केले.खरंतर ते असमान वाटप होते.पण तसं सांगण्याचा अधिकार त्यांना नव्हता. तीन डिशमध्ये तीन भाग झाले. आणि मग किसनने बहिणीला विचारले..
“ताई,बोलवू का रमेशला?’
“हांं..लाव फोन त्याला.लवकर ये म्हणावं.वेळ नाहीये आमच्याकडे”
तोवर किसनने फोन लावलाच होता.
“हैलो रम्या कुठे आहेस तु? हां..गैरेजवरच आहे ना.. लगेच ये..अरे अनिलशेठच्या दुकानात.. नाही नाही.. लगेच.वेळ नाहीये आम्हाला. थांबतोय आम्ही”
“हातात काम आहे म्हणत होता तो.”
“हो..आम्हीच बसलोय बिनकामाचे.ये आणि घेऊन जा म्हणावं तुझा वाटा”
रमेश म्हणजे त्यांचा तिसरा भाऊ.जवळच्याच एका गैरेजमध्ये काम करायचा.वयाने बराच लहान. त्याचं आणि किसन,मंगलचं फारसं पटायचं नाही. पटायचं नाही म्हणजे तोच यांच्यापासून बाजुला पडल्यासारखा झाला होता. आणि त्याचं कारण म्हणजे त्याची परीस्थिती.किसन,मंगलच्या तुलनेत तो कुठेच नव्हता.
थोड्या वेळात तो आलाच.अंगावर कामाचेच कपडे होते. काळे.. ऑईलचे डाग पडलेले. हातही तसेच.आत आल्यावर तो जरा बावरला.अश्या एसी शोरुममध्ये येण्याची त्याची ही पहीलीच वेळ.आल्या आल्या त्याने दोघांना नमस्कार केला.
” काय गं ताई..तु पण इथे आहे का? कशाला बोलावलं मला दादा?”
“हे बघ,अण्णा तर गेले. आता हे दागिने. त्यांच्या कपाटातले… त्याची वाटणी केलीय. अनिलशेठनीच वजनं वगैरे करुन तीन भाग केलेत. त्यातला हा तुझा वाटा”
असं म्हणून किसनने ती तिसरी डिश त्याच्या समोर ठेवली. आता त्याची काय प्रतिक्रिया होते याची उत्सुकता दोघांच्या.. आणि हो..अनिलशेठच्या चेहऱ्यावर पण…
रमेशने त्या डिशमध्ये ठेवलेले दागिने पाहिले. इतरही दोन वाटे तेथेच होते. तेही त्याने पाहीले.अशिक्षित होता तो..पण तरी त्याच्या लक्षात आले..ही वाटणी असमान आहे. बोलला काही नाही तो..फक्त मनाशीच हसला.
“काय रे..काय विचार करतोस? दिला ना तुला तुझा वाटा?मग घे की तो.आणि जा.घाई आहे ना तुला?”
“हो जाणारच आहे मी.ताई..दादा, तुम्ही मला आठवणीने बोलावले.. माझा वाटा दिला. खुप आनंद वाटला. पण मला तो नकोय”
किसन,मंगल,आणि अनिलशेठही थक्क झाले. त्या सगळ्यांनाच वाटलं होतं की तो आता चिडणार..जाब विचारणार. पण हा तर म्हणतोय..मला काहीच नको.
“का रे..का नको?कमी पडतयं का तुला?अं..तुलनेत काय वाटतंय.. तुला कमी दिलंय आणि आम्ही जास्त घेतलयं?”
“कमी आणि जास्त..काय ते तुमचं तुम्हाला माहीत. पण दादा, ताई खरं सांगु का? तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय”
“अरे असं का बोलतोस रमेश..” मंगलचा सूर जरा नरम झाला होता.
“नाही ताई..आई गेली तेव्हा मी लहान होतो. तुच माझं सगळं केलं. तुझ्या, दादाच्या लग्नात मी काही देऊ शकलो नाही. कारण मी कमवतच नव्हतो ना तेव्हा. तर हाच माझा आहेर समजा तुम्हाला “
असं म्हणुन त्याने त्याच्या वाट्याची डिश त्यांच्याकडे सरकवली.
” गरीबी आहे माझी.. पण मी समाधानी आहे. हे सोनं नाणं..नाही गरज मला याची.जे मिळतं त्यात सुखानं माझा संसार चाललाय. घ्या तुम्ही हे खरंच. निघतो मी.कामं आहेत मला आज जरा”
असं बोलून दरवाजा ढकलुन तो बाहेरही पडला. किसन,मंगल अवाक झाले. काय झाले.. रमेश काय बोलला हे समजेपर्यंत तो निघूनही गेला होता.
आत्ता आत्तापर्यंत लहान असलेला त्यांचा भाऊ आज त्यांना आपल्यापेक्षा मोठा वाटून गेला. गरीब असलेला रमेश त्या सर्वांपेक्षा एका क्षणात श्रीमंत ठरुन गेला.
आपल्या जीवनात सगळ्यात पॉवरफुल शब्द कुठला असा प्रश्न जर मला विचारला तर मी उत्तर देईन
‘अहोss’ …….
या शब्दाचं सामर्थ्य जाणून असलेल्या पिढीचा सध्या अस्त होत आहे. खरं म्हणजे हा शब्द, स्त्रीप्रधान संस्कृतीचा मेरुमणी आहे.
या शब्दात असं काय आहे ? असं विचारण्यापेक्षा या शब्दात काय नाही असे विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल……
….. यात प्रेम आहे, यात धाक आहे, यात जरब आहे, यात आजारी माणसाची अगतिकता आहे, मदत याचना आहे, आज्ञा आहे, यात सर्व काही आहे. ही नुसती एक हाक सुद्धा आहे. हा शब्द उच्चारल्यानंतर ज्याच्यासाठी हा उच्चारलेला असतो, ती व्यक्ती हातातलं सगळं काम सोडून धावत सुटते.
यामधली भावना, हा शब्द उच्चारण्याची पद्धती आणि स्वर यावर अवलंबून असते. या मधला अर्थ उच्चारणाऱ्याला आणि ज्याच्यासाठी उच्चारला आहे त्याला त्या दोघांनाच निश्चित समजतो.
यात परिचय ही आहे. हो, कुणाशीही परिचय करून देताना – ‘हे आमचे अहो’ असा परिचय करून दिल्यानंतर घरातील संपूर्ण परिस्थितीची जाणीव समोरच्याला येते.
हे माझे मिस्टर – हे अगदीच नाटकी वाटतं. हा माझा नवरा – हे वाक्य तर इतकं रुक्ष वाटतं की, कडक उन्हाळ्यात तापलेल्या डांबरी रस्त्याच्या बाजूच्या वठलेल्या संपूर्ण निष्पर्ण वृक्षा सारखं वाटतं.
अलीकडच्या मुलींना अर्थात आमच्या पिढीतील सुद्धा नवऱ्याला नावाने हाक मारणाऱ्या मुलींना या शब्दाच्या सामर्थ्याची कधी कल्पनाच आलेली नाही. त्यामुळेच अलीकडच्या मुलींनी घरामध्ये स्वतःचं महत्व कमी करून घेतल्याचे जाणवते.
माझ्या बायकोने जर मला ‘अरे सुनील जरा इकडे ये’ असे सांगितले असते तर मी तिला उत्तर दिले असते ‘हो थोड्या वेळाने येतो’ . पण ती जेव्हा अहोss म्हणते त्या वेळेला होss चा शेवटचा हेल संपायच्या आत मी हजर असतो.
प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा ‘अहो ss मला हरणाचं कातडं आणून द्या ना!’ असं म्हटल्या म्हटल्या लगेच धनुष्यबाण घेऊन त्या हरणा मागं धावले असतील, क्षण सुद्धा वाया घालवला नसेल. नाहीतर खरं म्हणजे त्यांनी लक्ष्मणाला सांगायला पाहिजे होतं की ‘जा रे त्या हरणाची शिकार करून ये’ पण नाही, ते अहो ऐकलं आणि सगळं संपलं!
प्रभू रामचंद्रांसारख्या ईश्वरीय व्यक्तिमत्त्वाला सुद्धा खरं म्हणजे चुकीच्या वेळेला, चुकीचं कृत्य करण्यासाठी भाग पाडणारा तो शब्द किती सामर्थ्यवान असेल त्याची कल्पना करा!
हा शब्द म्हणजे विवाहित स्त्रीचे घरातलं सामर्थ्य आहे.
नवीन पिढीतील सर्व तरुणींना प्रेम विवाहित असो किंवा लिव्हइन मधील सुद्धा, माझी एक विनंती आहे. एकदा अहोss हा शब्द प्रयोग वापरून तर पहा. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला एकदा कल्पना आली तर आपण काय मिस करत होतो याची कल्पना येईल.
…. यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेला जनाबाईचा हा अभंग ऐकला तेव्हा आतून अगदी हलून गेले. बाई म्हणून जनाबाईचा विचार तोपर्यंत इतका थेट, इतका स्पष्ट आणि इतका तीव्र असा मनात आला नव्हता. इतर संतांचे अभंग, तसे जनीचेही अभंग. ऐकता- वाचताना तिच्या स्त्रीत्वाची अशी झणझणून जाणीव नव्हती झाली.
हा अभंग ऐकताना डोळ्यांसमोर सहज आली ती एक तरुण मुलगी. निळ्यासावळ्या मंजिर्यांनी बहरलेल्या, हिरव्यागार पानांनी डवरलेल्या तुळशीच्या बनात उभी असलेली. तिच्या विठ्ठलाची आवडती तुळस. जनी त्या तुळसबनात आपली वेणी उकलून केस मोकळे करते आहे. लांब असतील का तिचे केस? आणि दाटही? की असतील लहानसर, पातळ आणि मऊशार? कुरळे असतील, का असतील सरळच? कोण जाणे ! पण तिचा विठू त्या केसांच्या मुळांना लोणी लावून चोळणार आहे. मग गरम पाण्यानं तिला न्हाऊ घालणार आहे. केवढा आनंद आहे जनीला त्या गोष्टीचा ! तिला तिचं असं कुणीच नाही जगात. पण विठू आहे. तो तिचाच आहे. अगदी तिचा. किती साधेपणानं सांगते आहे जनी, की माझा सखा मला न्हाऊ घालणार आहे.
जनीच्या या साधेपणानं मी हलून गेले. तुळशीचा असावा तसा तिच्या बाई असण्याचा वेगळाच दरवळ या अभंगातून आला. त्यानं मी हलून गेले. आणि त्याहीपेक्षा तिच्या आणि विठूच्या जगावेगळ्या जवळिकीनं हलून गेले.
जनाबाईचं महिपतींनी लिहिलेलं लौकिक चरित्र अगदी साधं आणि थोडकं आहे. ती मराठवाड्यातली- परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची मुलगी. पाच-सात वर्षांची होती तेव्हा तिची आई वारली. पंढरपूरला नामदेवांच्या घरी तिच्या वडलांनी तिला नेऊन ठेवलं. पुढे तेही वारले. जनी नामदेवांच्या घरीच राहिली, वाढली. बस्स. इतकंच तर तिचं चरित्र !
पण माणसाचं जगणं अशा ढोबळ तपशिलांपुरतं थोडंच असतं? त्या पलीकडेच तर ते बहुतेककरून उरलेलं असतं. जनीची सगळी कविता म्हणजे तिचं आंतरचरित्र आहे. आणि मराठी कवितेच्या प्रारंभकाळात अशी धीट, कणखर, नि:संदिग्ध आणि जगण्यात घुसळून आलेली कविता एका बाईनं लिहिली आहे, हे अद्भुतही फार अभिमानाचं आहे.
जनीच्या पोरकेपणाची, अनाथपणाची जाणीव तिच्या अभंगांच्या मुळाशी सारखी उमळते आहे. अगदी एकटी आहे ती. तिला तिचं माणूस कोणी नाहीच. म्हणून तर तिचं विठूशी असलेलं नातं अनेकपदरी आणि दाट, गहिरं आहे.
‘तुजवीण बा विठ्ठला । कोणी नाही रे मजला’
– असं तिनं विठूला कळवळून सांगितलं आहे.
‘माय मेली, बाप मेला । आता सांभाळी विठ्ठला’
– असं स्वत:ला त्याच्यावर निरवलं आहे. आणि त्यानंही तिचा शब्द फुलासारखा झेलला आहे. आई, बाप, सखा, सहचर, मुलगा- तिला हव्या त्या नात्यांनी तो तिला भेटला आहे.
माणसाचं आयुष्य अर्थपूर्ण करणारी जी जी नाती आहेत, ती ती सगळी नाती जनीनं विठ्ठलाशी जोडली आहेत.
‘राना गेली शेणीसाठी । वेचू लागे विठो पाठी’
किंवा
‘पाणी रांजणात भरी । सडासारवण करी ।
धुणे धुऊनिया आणी । म्हणे नामयाची जनी ।’
– असे तिचे अभंग पहा. जनी जी जी कामं करते, ती ती सगळी तिच्याबरोबर तिच्यासाठी विठू करतो आहे. तिचा एक सुंदर अभंग आहे.
साळी कांडायासी काढी । चक्रपाणी उखळ झाडी
कांडिता कांडिता । शीण आला पंढरीनाथा
कांडिताना घाम आला । तेणे पीताम्बर भिजला
पायी पैंजण, हाती कडी । कोंडा पाखडोनी काढी
हाती आले असे फोड । जनी म्हणे, मुसळ सोड
देवच साळी कांडतो आहे. घामेजून जातो आहे. हाताला फोड आले आहेत. शेवटी जनीच म्हणते आहे की, ‘पुरे कर आता. मुसळ बाजूला ठेव.’
जनीला पडणारे कष्ट, तिची होणारी दमणूक, तिचे सोलवटून निघणारे हात- जनीच्या आंतरविश्वात त्या विठ्ठलानं तिचं सगळं दु:ख स्वत:वर ओढून घेतलं आहे. तोच दमला आहे. घामानं भिजला आहे. त्याच्या हातांना फोड आले आहेत. कष्टांचं, दु:खाचं, एकटेपणाचं हे रूपांतर विलक्षण थक्क करणारं आहे.
देवाच्या थोरवीची जाणीव जनीला आहे. अगदी स्पष्ट आहे. त्याच्या पीताम्बराचा, हातातल्या सोन्याच्या कड्याचा, पायातल्या पैजणांचा उल्लेख ती करतेच आहे ना ! पण तिच्यासाठी दोघांमध्ये द्वैत नाहीच आहे. गरीब आणि श्रीमंत, किंवा उपेक्षित, वंचित आणि सुपूजित, प्रतिष्ठित, इतकाच नव्हे तर माणूस आणि परमेश्वर हा भेदही त्यांच्या नात्यात सहज नाहीसा झालेला आहे. म्हणून विठूचं तिच्याबरोबर कष्ट करणं, तिच्यासोबत सतत असणं, हे तिच्यासाठी स्वाभाविकच आहे. ती त्याला इतकी बरोबरीच्या नात्यानं वागवते, इतकी सहज त्याला रागावते, त्याला जवळ घेते, त्याला सलगी देते, की अरूपाला रूप देण्याचं, निर्गुणाला सगुण केल्याचं किंवा अलौकिकाला लौकिकात साक्षात् केल्याचं तिनं जे अपूर्व साहस केलं आहे, त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. चमत्काराच्या पातळीवर जनी विठूशी नातं सांगतच नाही; ती जणू वस्तुस्थितीचंच निवेदन करते.
पहा ना, तिच्या एका अभंगात- ती धुणं घेऊन नदीकडे निघाली आहे. उपाशी आहे. विठूवर रागावली आहे. तो मागे धावतो आहे. मला का टाळून चाललीस, म्हणून विचारतो आहे. ती फटकारते आहे त्याला. ‘कशाला मागे आलायस?’ म्हणून झिडकारते आहे. आणि तो बिचारा खाली मान घालून मुकाट तिच्यामागे चालतो आहे. इतर कुठे पाहिलं आहे असं दृश्य? फक्त जनीचाच हा अनुभव आहे.
अर्थात् हे तिला शक्य झालं आहे ते केवळ संतपुरुषांमुळेच. तिच्या बाईपणाचा अडसर तिच्या परमार्थाच्या वाटेतून त्यांनी दूर केला. त्यांनी तिच्यावरचं दडपण दूर केलं. आपण बाई आहोत म्हणून बंदिनी आहोत, क्षुद्र आहोत, असहाय आहोत आणि नीचतम आहोत, ही त्या काळात प्रत्येक बाईच्या मनात आणि जीवनात स्पष्ट जागी असणारी जाणीव संतांमुळे मालवली. संतांनी देवापाशी स्त्री-पुरुष भेद नाही, असं आश्वासन दिलं म्हणून जनीसारखीला आपलं स्त्रीपण स्वाभाविकपणे स्वीकारता आलं, ‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ अशी एक समजूत मिळाली.
या समजुतीनं जनीचं स्त्रीपण फार मनोज्ञ केलं आहे. तिच्या अभंगांमधून ते सारखं जाणवतं. असं वाटतं की, पुरुष जाणतो, पण ते बुद्धीनं जाणतो. बाई जाणते ती हृदयानं जाणते. जनीची प्रगल्भता आणि तिचं शहाणपण हे काही पुस्तकांतून आलेलं, शिक्षणातून आलेलं शहाणपण नव्हे. ते तिच्या जगण्यातून, तिच्या अनुभवांतून, तिच्या बाईपणातून आलेलं शहाणपण आहे.
ती एक शहाणी, बुद्धिमान, प्रतिभावंत आणि अनुभवी अशी बाई आहे. ती बाई आहे म्हणून विठ्ठलाला लेकुरवाळा झालेला पाहते. ती बाई आहे म्हणून त्याला ‘माझे अचडे बचडे’ म्हणून कौतुकानं कुरवाळते. ती बाई आहे म्हणून ‘विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या’ असं त्याला प्रेमानं रागे भरते. ती बाई आहे म्हणून रात्री शेज सजवून त्याची वाट पाहते. आणि ती बाई आहे म्हणून ‘पुरे पुरे रे विठ्ठला, जनीचा अंतरंग धाला’ असा तृप्तीचा उद्गार काढते.
तिच्या बाईपणाचा सर्वात उत्कृष्ट उद्गार मात्र विठूसाठी नाही. तो ज्ञानदेवांसाठी आहे. कदाचित ज्यांच्यासाठीच्या खर्याखुर्या कळवळ्यानं ज्ञानदेवांनी मराठी गीताभाष्याचा अट्टहास केला, त्या स्त्री-शूद्रांची ती प्रतिनिधी आहे म्हणून असेल, किंवा कदाचित त्या विलक्षण प्रज्ञावंताचं कोवळं वय तिच्यातल्या प्रौढ, जाणत्या बाईला विसरता येत नसेल, किंवा कदाचित- काय असेल सांगता येत नाही, पण ज्ञानदेवांविषयीची आपली आंतर-ओल व्यक्त करताना जनीनं लिहिलं आहे-
‘मरोनिया जावे । बा माझ्या पोटी यावे’
पुढच्या जन्मी माझ्या पोटी ये ज्ञानदेवा ! अविवाहित, एकट्या जनीचे हे विलक्षण उद्गार तिच्या बाईपणाच्या आंतरसालीमधला जो कोवळा गाभा प्रकट करतात, त्या गाभ्यातला तुळस मंजिर्यांसारखा निळासावळा अंधार मी इतर कुठे कधी पाहिलेलाच नाही.
(संपादित)
लेखिका : अरुणा ढेरे
संग्राहक : अनिल कुमकर
प्रस्तुती : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नरसिंहाचे नवरात्र जवळ आलं की तयारी सुरू होते. घर स्वच्छ केले जाते. पूजेची उपकरणे घासली जातात. पूजेचे सामान बाजारातून आणले जाते .अगदी देवही उजळले जातात…
खरं सांगायचं तर नेहमी सगळी स्तोत्र , म्हटली जात नाहीत. नवरात्र जवळ आलं की आधी पुस्तकं बाहेर निघतात .
नृसिंह कवच, स्तवन, प्रार्थना, भक्तीभावाने म्हटले जाते .प्रल्हादाची आरती म्हणायची.
विष्णुसहस्रनाम म्हटले जाते. द्वादशनाम स्तोत्र, शंकराचार्यांचं संकटनाशन स्तोत्र म्हणताना वृत्ती लीन होते .
रोज घरी देवाची नेहमी एकच आरती सवयीने म्हटली जाते. बाकीच्या आरत्यांची नवरात्रीच्या आधी आठवण येते..त्या म्हणून घ्यायच्या…नरसिंह पुष्पांजली म्हणायची..
या सगळ्यांची आधी जरा उजळणी करून घ्यायची असते.
आता तयारी कशाची करायची समजले आहे ……
ती करून घेतली की मग नंतर म्हणताना आनंदाने सहज हे सगळे म्हटले जाते.
आमच्या नरसिंहाचे नवरात्र सुरु होते.
साग्रसंगीत पूजा ,आरती होते.
खरंतर देव देवघरात रोजच असतात…
पण नवरात्र सुरू झालं की एकदम वेगळं वातावरण होतं.
मंद दिवा समोर तेवत राहतो..
हार फुलं घालून केलेली पूजा बघत रहावीशी वाटते …येता-जाता त्याच्याकडे बघूनही समाधान वाटतं….
आजची आरती खरचं आतून आर्ततेनी म्हटली जाते .
नमस्कार पंचक वाचताना….
दयासागर दीननाथा उदारा
मला ज्ञान देऊन अज्ञान वारा
कृपेचा तुझ्या नित्य मेवा मिळावा.
नमस्कार साष्टांग लक्ष्मी नरसिंहा
अशी प्रार्थना करायची .
आता त्याची कृपा हाच मेवा आहे हे पूर्णपणे समजले आहे .
भक्ती करत राहू ..
देवाला आळवत राहू..
मनातली श्रद्धा जागृत ठेऊ…
सांभाळायला तो आहेच ही खात्री आहे .
संकटकाळी तोच धावून येणार आहे.
फक्त त्याची सेवा आपल्या हातून प्रामाणिकपणे घडू दे.
☆ आपली उपासना फळ का देत नाही?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆
मुळात आपण ज्या नगण्य प्रमाणात उपासना करतो, बढाया मारतो व देवाकडून अखंड अपेक्षा ठेवतो, ते खरे पाहता हास्यास्पद आहे, याची जाणीव या लेखात होते.
माधवाचार्य हे थोर गायत्री उपासक. वृंदावनात त्यांनी सलग तेरा वर्षे गायत्रीचे अनुष्ठान मांडलं. पण तेरा वर्षांत अब्जावधीचा जप होऊनही ना त्यांना आध्यात्मिक उन्नती दिसली ना भौतिक लाभ. हतोत्साही होऊन ते काशीस आले आणि इथे तिथे पिसाटाप्रमाणे भटकू लागले.
तीन चार महिने असे गेल्यावर त्यांना एक अवधूत भेटला. परिचय वाढला, तसं माधवाचार्यांनी त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली.
“आलं लक्षात! गायत्रीऐवजी तुम्ही कालभैरवाची उपासना एक वर्ष केलीत, तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की होईल.”
अवधुतांचे बोलणे मनावर घेऊन माधवाचार्यांनी साधनेला सुरुवात केली. कोणताही दोष येऊ न देता त्यांनी वर्षभर साधना केली. कधी सुरू केली, हेही विसरलेले माधवाचार्य एक दिवशी उपासनेला बसले असताना त्यांना
“मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे?” असं ऐकू आलं. भास म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि उपासना चालू ठेवली.
“मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?”
पुन्हा भास समजून माधवाचार्यांनी उपासना सुरू ठेवली.
“मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?”
आता मात्र हा भास नाही याची खात्री झाल्यावर माधवाचार्यांनी विचारले,
“आपण कोण आहात? जे कोणी आहात, ते पुढे येऊन बोलाल? माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे.”
“ज्याची उपासना तू करत आहेस,तोच काळभैरव मी मनुष्यरुपात आलोय. वरदान माग.”
“मग समोर का नाही येत?”
“माधवा! तेरा वर्षे जो तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास, त्याचं तीव्र तेजोवलय तुझ्याभोवती आहे. माझ्या मनुष्यरूपाला ते सहन होणार नाही, म्हणून मी तूला सामोरा येऊ शकत नाही.”
“जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल, तर आपण माझ्या काहीच कामाचे नाहीत. आपण जाऊ शकता.”
“मी तुझे समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही. मला जाताच येणार नाही.”
“तर मग, गेली तेरा वर्षांचं माझं गायत्री अनुष्ठान का फळले नाही? याचं उत्तर द्या.”
“माधवा! ते निष्फळ झालं नाही. ते अनुष्ठान तुझी जन्मोजन्मीची पापे नष्ट करत होते. तुला अधिकाधिक निर्दोष करत होते.”
“मग आता मी काय करू?”
“परत वृंदावनात जा, अनुष्ठान सुरू कर. तुला अजून एक वर्ष करायचंय. हे एक वर्ष तुझं या जन्मातील पाप नष्ट होण्यात जाईल आणि मग तुला गायत्री प्रसन्न होईल.”
“तुम्ही किंवा गायत्री कुठे असता?”
“आम्ही इथेच असतो. पण वेगळ्या मितीत. हे मंत्र, जप आणि कर्मकांडे तुम्हाला आमच्या मितीत बघण्याची सिद्धी देतात. ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता.”
माधवाचार्य वृंदावनात परतले. शांत, स्थिर चित्ताने पुन्हा गायत्रीचे अनुष्ठान आरंभले. एक वर्ष पूर्ण झालं. पहाटे उठून अनुष्ठानाला बसणार, तोच,
“मी आलेय माधवा! वरदान माग.”
“मातेssss”
टाहो फोडून माधवाचार्य मनसोक्त रडले.
“माते! पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हटला तेव्हा खूप लालसा होती. आता मात्र काहीच नको गं. तू पावलीस तेच खूप.”
“माधवा! मागितलं तर पाहिजेच.”
“माते! हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडेपर्यंत तू साक्षीला असशील, असं वरदान दे.”
“तथास्तु!”
पुढे तीन वर्षांत माधवाचार्यांनी ‘माधवनियम’ नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला. आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे.
लक्षात घ्या. जो काही मंत्र, जप, कर्मकांडं तुम्ही श्रद्धेने करता, त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो. पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेढे घालून बसलेली असतात. देवतेची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते. जसजसे तुम्ही उपासना वाढवता, तसतसे वेढे कमी होतात, शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की ‘तेज’ चढलं. ते तेज म्हणजे खरंतर पूर्वकर्माच्या वेढ्यात झाकोळलेलं तुमचं मूळ रूप असतं.
लेखक :अज्ञात
संग्राहिका : सुश्री स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “नदियों में न पानी है…” ।)
☆ तन्मय साहित्य #230 ☆
☆ नदियों में न पानी है… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆
(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ “जय प्रकाश के नवगीत ” के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “दर्द हुआ घायल (पुराना गीत)…” ।)
जय प्रकाश के नवगीत # 54 ☆ दर्द हुआ घायल (पुराना गीत)… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक
श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈