ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
बाळ सीताराम मर्ढेकर बाळ सीताराम मर्ढेकर (१ दिसंबर १९०९ – २० मार्च १९५६)
मराठी नवकवितेचे आद्य प्रवर्तक असे ज्यांना संबोधले जाते त्या बा.सी.मर्ढेकर यांचा आज स्मृतीदिन.कवी केशवसुतांनंतरचे युगप्रवर्तक कवी म्हणून मर्ढेकरांचे नाव घेतले जाते.जोष,ठसठशीतपणा,
निर्भिडपणा,आशयसंपन्न नव्या प्रतिमा,धक्का देणा-या दोन विभिन्न कल्पनांची घातलेली सांगड ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाल्यावर त्यानी काही दिवस टाईम्स ऑफ इंडिया मध्ये संपादकीय विभागात व नंतर अध्यापक म्हणून नोकरी केली.त्यानंतर ते आकाशवाणीत रूजू झाले.
इंग्लंडमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी तेथील वांड्मयीन चळवळीळीचा अभ्यास केला.अनेक श्रेष्ठ साहित्यिक व समीक्षक यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला.बदलते सामाजिक जीवन,ताणतणाव,जीवनाची तीव्र गतीमानता,सर्वसामान्य माणसाची अगतिकता त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबीत झालेले दिसतात.
शिशिरागम हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.त्यानंतर काही कविता , व आणखी काही कविता हे दोन संग्रह आले.तांबडी माती,रात्रीचा दिवस,पाणी या कादंब-यांचे लेखन त्यांनी केले.कर्ण नावाची संगितिका व नटश्रेष्ठ नावाचे नाटकही त्यांनी लिहिले.पण काव्यलेखनातच त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.
काव्याबरोबरच त्यांनी साहित्य समीक्षाही केली आहे.सौंदर्य आणि साहित्य,वाड्मयीन महात्मा,आर्टस् अॅन्ड मॅन हे त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
20मार्च 1956 रोजी त्यांचे निधन झाले.त्यांचे स्मृतीस अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : मराठीसृष्टी, विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक वेळ आयुष्याची गुरुकिल्ली सापडेल…नव्हे! ती नाही सापडली तरी मिळालेलं आयुष्य सरत राहील पण एखादी महत्वाची किल्ली नाही सापडली तर तेच आयुष्य किल्ली सापडेपर्यंत थांबतं.अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा यक्षप्रश्न कधीतरी आयुष्यात एकदा सर्वांना पडतोच!
एका कुटुंबाचा विचार करता फ्लॅटची किल्ली, स्कूटरची किल्ली,कारची किल्ली, लॉकरची किल्ली, मोलकरणीला द्यायची डुप्लिकेट किल्ली, अशा अनेक किल्ल्या जपून ठेवाव्या लागतात. त्यातली एखादी जरी हरवली तर त्याची संपूर्ण कुटुंबाला झळ लागते. आरोप दोषारोप यानं कुटुंबातलं वातावरण गढूळ होतं. छोटीशीच गोष्ट… परंतु लहान मोठ्याना तांडव करायला लावते. लपाछपीचा खेळ बराच वेळ चालतो आणि…… किल्ली सहजी सापडली तर मात्र ‘हुश्श्य’ असा उसासाचा सगळ्यांच्याच तोंडातून निघतो आणि नाट्याची इतिश्री होते.
समजा किल्ली नाहीच सापडली तर आपल्याकडे डुप्लिकेट किल्ल्या बनवणारी माणसं लगेच हाकेला ओ देतात. त्यांच्या किल्लीनं आपलं कुलूप खळकन उघडतं आणि थांबलेले क्षण लगेच पुढे सरकतात. कुठे हरवली असेल किल्ली? हा विचार करायला एका क्षणाचीही फुरसत आपल्याला नसते. योगायोगानं ती कधी नजरेला पडलीच तर. …. काय उपयोग आता? असं म्हणून लगेचंच तिची किंमत शून्य होते..
क्षणभर मनांत विचार आला ….पूर्वीच्या काळी कधी किल्ल्या हरवत नसतील का? जानव्याला लावलेली, पोटाशी धरलेली, कमरेच्या केळात ठेवलेली, पदराच्या टोकाला बांधलेली, फडताळात बांधून ठेवलेली किल्ली जणू लाॅकर मध्येच असल्यासारखीच! कशी हरवेल बरं? लोकांची वृत्ती बदलली तसा कुलपाचा शोध लागला.जसे ते बेफिकीर झाले तसे किल्ल्या बनवणार्यांचा रोजगार वाढला.
या सर्वावर उपाय म्हणून लोकांनी स्वतःला एक शिस्त लावून घेतली की-होल्डर नावाची एक आकर्षक वस्तू घरात आली आणि सन्मानानं भिंतीवर विराजमान झाली. किल्ली कुटुंबातल्या कोणाचीही असो कितीही महत्त्वाची असो ती तिथेच असायची.क्षणभर ती तिथे दिसली नाही तरी हृदयाचे ठोके वाढायचे. ती किल्ली हरवू नये म्हणून आकर्षक की-चेन मध्ये तिला गुंफुन ठेवण्यात येऊ लागलं….
आताशा जसं जग हायटेक झालंय तशी कुलपाची संकल्पना बदलली. पर्यायानं किल्लीलाही पर्याय आले.चक्र आकडे वापरून तिजोऱ्या बंद होऊ लागल्या. दोन किल्ल्या असलेली कुलपं आली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजेच विद्युत चुंबकीय किल्ल्या आल्या. पुढे किल्ल्यांच्या जागी बटनं आले. त्याही पुढे जाऊन आता पासवर्ड आला. प्रत्येकानं जपलेला पासवर्ड हाच त्याची किल्ली झाला. आता बाकी हद्द झाली.अंगठा, चेहरा यांच्या साह्यानेही कुलपे उघडू लागली.
अंगठा दाखवणे हा वाक्प्रयोगाचा अर्थच बदलला. नाहीं म्हणावयाचें झाल्यास, मूठ मिटून अंगठा किंवा नकार घंटा दाखवितात.दानाचं उदक देतांना सरळ तळहातावर पुढें बोटांवरून पाणी सोडतात पण पितरांस उदक देतांना वांकडा हात करून अंगठयावरून पाणी सोडतात त्यावरून, नाहीं म्हणणें, नकार देणें असा अर्थ होतो. अंगठा दाखवणे म्हणजे
फसविणें,ठकविणें,प्रथम आशा दाखवून शेवटीं धोका देंणें. पण आता अंगठा दाखवून काम फत्ते होऊ लागलं.’दिल सच्चा और चेहरा झुठा’ असही म्हणायची सोय राहिली नाही.नाही तर कुलूप रुसून बसायचं…….
☆ हार्मोनिअमचे सूर – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
ठाणे स्टेशनात शिरलो की आठवते ते ३० वर्षापुर्वीचे ठाणे स्टेशन. पूर्वीच्या स्टेशनच्या वाटा आणि आत्ताच्या वाटांमध्ये खूप बदल झाला आहे. आता सर्वत्र माणसेच माणसे. घुसमटलेले श्वास, घामेजलेले स्पर्श, धक्काबुक्की आणि सतत घाईत असलेली झपाझप पावले. जगण्याच्या धावपळीत जगणंच विसरलेले सगळे आणि आपणही त्याचा एक भाग कधी होतो ते कळत नाही. भाग नाही तर त्या गर्दीतला एक ठिपका. घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे काटेकोर बंदिस्त आयुष्य. रोज तेच तेच बघत असलो तरी ती गर्दी मात्र नवीन असते. गर्दीचे चेहरे बदललेले असले तरी त्या नवीन गर्दीतला हताशपणा, हतबलता तीच असते. सकाळी कामावर जाताना असणारी घाई स्वतःशीच संवाद करायला लावून डोळ्यांवर झापडे लावून स्टेशनमधून जायला लावत असली तरी संध्याकाळी कामावरून येताना निवांतपणा जरा आजूबाजूला कान उघडे ठेऊन डोळ्यावरची पट्टी बाजूला करून बघायला लावणारा असतो.
स्टेशनच्या ब्रिजवर असलेला तो एक कुबडी घेऊन एका पायावर उभा असलेला सफेद दाढीवाला वर्षोनुवर्षे एका पायावर योगा करत उभा राहून आपल्या लंगडेपणाचे प्रदर्शन लावून असतो. त्याच्या पुढे थोड्या अंतरावर एका तान्हुलीला घेऊन बसलेली ती काळी बाई तिच्या मातृत्वाचा आधार घेऊन हात पसरत बसलेली. असते. दर दोन पावलांवर धुळीने मळलेले कपडे आणि चेहरे घेऊन हात पसरविणारे चिमुरडी मुले बघून मनावर दगड ठेऊन पुढे जावे लागत असले तरी मनात कुठे ना कुठे तरी त्यांच्याबद्दलचे विचार घोळत रहातात. परिस्थिती कोणाला कधी काय करायला भाग पाडेल ह्याची कोणालाच कधी कल्पना देत नसते.
स्टेशनचा ब्रिज उतरायला लागल्यावर कानावर ते हार्मोनिअमचे सूर यायला सुरवात होते. माझा थोडा फार गळा आहे आणि लहानपणी गाण्याच्या दोन परीक्षा दिल्याने मी स्वतःला गायक जरी समजत नसलो तरी थोडे फार गाणे आणि खूप काही चांगले गाणे कानावर पडल्याने त्या हार्मोनिअमचे सूर माझे नेहमीच लक्ष वेधून घेत. रोजच पावलं क्षणभर का होईना तेथे रेंगाळत असत. पुढे उजव्या बाजूच्या कोपऱ्यात अंधत्व आणि वृद्धत्व एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एक जीव झालेले असतात आणि त्याची बोटे गळ्यात अडकवलेल्या त्या जुनाट अशा हार्मोनिअमवर जादू सारखी फिरत असतात. जे सूर त्या जादूच्या पेटीतून बाहेर पडत असतात त्याने जाणाऱ्या येणाऱ्यावर आपली छाप टाकलेली असते त्यामुळेच त्याला काहींची नुसती दाद मिळते तर काहींची त्या दादे बरोबर खिश्यातल्या खळखळणाऱ्या नाण्यांची साथही असते. समोर ठेवलेल्या लहान भांड्यात जेंव्हा कोणी खिशातले नाणे टाकून जाते आणि त्याचा आवाज होतो तेव्हा त्या पेटीतून निघणाऱ्या सुरांना त्याचा अडथळा होत असला तरी त्या डोक्यावर कायम सफेद कॅप, डोळ्यावर गॉगल, चांगल्या घरातला वाटावा असा स्वच्छ आणि प्रसन्न चेहऱ्यावर मात्र एक स्मित हास्याची छटा उमटलेली असते आणि त्या पेटीचा भाता ही जोरात पुढंमागं होऊन आवाज वाढतो. ती बोटे पेटी वाजवतानाच समोरच्याचे आभार मानत असत.
“आत्या, परवा आमच्या ऑफिसमध्ये महिलादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एक आयुर्वेदतज्ञ आल्या होत्या. महिलांना आवश्यक अशी खूप छान माहिती त्यांनी सांगितली. पण त्यांचा एक विचार काही मला पटला नाही. त्या म्हणाल्या की खरं तर आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार आपण त्यांना जन्माला घालण्यापूर्वीच केला पाहिजे. ही जरा मला अतिशयोक्तीच वाटली.” कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणारी, नुकतेच लग्न झालेली माझी भाची पियू बोलत होती. तिच्या हातात कॉफीचा कप देत विषय बदलत मी म्हटले,“ अग पियू, गेल्या आठवड्यात तुझ्याकडून त्या शेवंतीच्या बिया आणल्या होत्या ना त्या या कुंडीत चांगल्या रुजल्याच नाहीत बघ. तुझ्याकडे किती छान बहर आला आहे शेवंतीला!” त्याबरोबर पियू लगेच त्या कुंडीकडे धावली. तिला झाडांचे खूपच वेड होते. त्या कुंडीत बघत ती म्हणाली,“ अग आत्या, कशा रुजतील बिया? ती माती चांगली वरखाली करायला पाहिजे, त्याला थोडे खत घालायला पाहिजे आणि सूर्यप्रकाश कुठे मिळतोय त्यांना नीट?” मी पटकन हसले आणि पियूला म्हटले,“ किती अचूक निदान केलेस पियू! खरं तर त्या कुंडीत बी लावलेच नाहीये. पण मगाशी तुला ज्या गोष्टीची अतिशयोक्ती वाटत होती ना तेच तुला पटवून द्यायचे होते. चांगली फुले यायला उत्तम बी- जमीन- खत- पाणी- सूर्यप्रकाश इ.इ. सर्व पूर्वतयारीची आवश्यकता असते. मग आपल्याला अपेक्षित असणारा सर्वगुणसंपन्न उत्तम बालक निर्माण करण्याची तयारी पण आधीपासूनच करायला नको?” पियू उत्सुकतेने माझे बोलणे ऐकू लागली.
“ वास्तविक शिशु म्हणजे पूर्ण मनुष्याचे बीजरुपच! मोठया वृक्षाचा पूर्ण विकास छोट्या बीजामधून होतो. आता हेच बघ, तुम्ही एखादा प्रोजेक्ट हातात घेतला की तुमचे नियोजनबद्ध टीमवर्क सुरु होते. तसेच हे टीमवर्क आहे. पती- पत्नी याचे टीमलीडर आहेत आणि त्यांचे मानसिक- शारीरिक आरोग्य, आहार- विहार अशासारखे अनेकविध घटक त्यांच्या टीमचा हिस्सा आहेत. उत्तम शिशु निर्माण करण्यासाठी कोणते घटक कसे उपयुक्त ठरतात त्याची पूर्ण माहिती तुला या https://youtu.be/viCNjJhfsgQ व्हीडिओमध्ये मिळेल बघ.
वास्तविक या विषयावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आत्ताची सर्वांची दिनचर्या बघितली तर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम हे गर्भावर होऊ शकतात. अनियमित झोप, एकाच स्थितीत बराच काळ बसून ड्रायव्हिंग करणे, गर्भनिरोधकाचा अतिरिक्त वापर, शारीरिक श्रम कमी आणि मानसिक ताण अधिक, कॉम्प्युटर- मोबाईल याचा अत्याधिक वापर अशा अनेक घटकांचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होऊ शकतो. यातील काही घटक पूर्णपणे टाळणे अशक्य आहे हे मलाही समजते. पण तरीही त्यातून मार्ग कसा काढता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे.
आता तुला प्रश्न पडला असेल की “या सर्वाचा शिशुशिक्षणाशी काय संबंध?” तर मगाशी म्हटले तसे तुला ज्या रंगांची शेवंती हवी होती तो रंग ज्या बीमध्ये आहे असेच बी तू निवडले होतेस ना? मग प्रत्यक्षात आपले स्वतःचे मूल आपल्याला हवे तसे निर्माण होण्यासाठी तसे बीज निर्माण करायला नको? आणि ज्या क्षणी या बीजापासून गर्भनिर्मिती होते तेव्हापासूनच त्याचा “ मी कोण?” चा शोध सुरु होतो. हा शोध म्हणजेच त्याचे शिक्षण आहे. आणि शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर सर्वांगीण विकासाची प्रक्रिया!
“तेव्हा पियूताई, आता तरी ‛जन्मापूर्वीपासून शिशुशिक्षण’ ही अतिशयोक्ती नाही ना वाटत?” पियूला माझे म्हणणे पूर्णपणे पटले होते हे तिच्या चेहऱ्यावरुनच समजत होते. आणि वाचकहो, मला वाटते तुम्हालाही हा विचार नक्कीच पटला असेल यात शंका नाही.