सौ. जस्मिन शेख
कवितेचा उत्सव
☆ शोध… ☆ सौ. जस्मिन शेख ☆
☆
विस्कटलेल्या विचारांच्या समजातून
नसानसात भिनलेल्या अराजकतेतून
स्वप्नीश बनलेला शिक्षक
शोधत आहे आज
उद्याचा सुसंस्कृत नागरिक।
*
अर्थहीन भविष्याचा वेध घेत
आपलीच स्वप्ने पिलांवर लादत
भरकटून गेलेला पालक
शोधत आहे आज
आपल्याच पिलांचा रक्षक
*
कागदी डोंगराचे ओझे पेलत
अंतर्मनाच्या अतिव वेदना सोसत
कळसुत्री बांधलेला बालक
शोधत आहे आज
दोऱ्या हलवणारा तो भक्षक।
*
बिनबुडी संकल्पाचे साप पायी सोडत
समाजाचा होणारा गोंधळ बघत
निर्ढावलेला तो शासक
शोधत आहे आज
आणखी एखादा निष्पाप शावक।
☆
© सौ. जस्मिन शेख
मिरज जि. सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈