श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “पडछाया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
उरात ठसली माझ्या तुझ्या प्रतिमेची पडछाया…
आणि तू जेव्हा जातोस समोरून तेव्हा ढवळून काढते अंतःकरणाला माझ्या… आणि नसतोस दिसत तेव्हा तुझ्या विरहात एकेक आठवणींचा पापुद्र्यांचे फोपडे उन्मळून पडतात.. भळभळ वाहणाऱ्या जखमेवरची खपली पडून जावी तशी…. जसे कढत आसवांचे डोळ्यातून कढ ओघळत जावे तसे…. मी अचल.. मी निर्जीव… मला कुठे असावे भावनांचे कोमल अंत:करण.. असा असतो तुझा मुळी माझ्याबाबतीतला गैरसमज… पण तुला सांगू पाषाण हृदयाला सुद्धा प्रेमाचा फुटतो पाझर असचं म्हणतात सारे…. त्याचं अंतरग आतून असतयं मृदू नि कोमल… मी जरी वरून दिसली तशी राकट दगड, पण मी तशी नाहीए… स्व:ताची सुखदुःख नसली म्हणून काय झालं! माझ्या सानिध्यात जे जे म्हणून आले त्यांच्या त्यांच्या सुखदुःखात मीही सहभागी झाले! … माझ्या भावलेले त्यांच्या भावनांचे कंगोरे मला दिलेल्या अंर्तबाह्य रंगरंगोटीतून प्रकट करते झाले…. मग मला तू असं कसं म्हणू शकतोस कि भावनाहीन आहे म्हणून! … उलट मी तर म्हणते तूच खरा भावनाहीन आहेस… फक्त आपल्या मुसक्या आवळून लगाम दुसऱ्याच्या हाती सोपवून तू त्यांच्या तालावर नाचत सारं आयुष्य काढतोस… आणि तुझ्यावर स्वारहोणाऱ्याची सुख दुखाची ओझी वावगत राहतोस… तुला काय वाटतं हे तुला सांगावसं वाटलं तरी बोलायचं स्वातंत्र्य तुला कुठे असतं! … अगदीच असह्य होतं तेव्हा पुढच्या पायाच्या टापा उंचावून जोरजोराने खिंकाळत राहतोस! … समजणाऱ्याने कसं समजावं रे ते तुझे आनंदाचे पडसाद आहेत की दुःखाचे.! . की ज्याने त्याने लावून घ्यावेत आपल्या मन स्थितीनुसार मतितार्थ… आणि तसा तुला दुसऱ्याच्या सुखदु:खाशी काहीही देणंघेणं असते कुठे म्हणा? … डोळ्यावर झापड लावलेली असतात आणि ते फक्त तुला गंतव्यस्थानाचा मार्गच तेव्हढा दाखवतात… कानात वारू शिरलेला असल्याने तू उधळत निघतोस.. तहानभूक विसरून नि देहभान हरपून.. वायू गतीने दौडत जाणे इतकंच तुला ठाऊक असल्यानं तुला वारू म्हणूनही तुला ओळखतात एव्हढंच… याच्या पलीकडे काय? काहीही नाही… इतकचं काय अवतीभवती पाहणं तुझ्या नशीबीही नाही कोणंतरी आपल्यावर फिदा आहे याची तुला शुद्धही नाही! … माझ्या मनीचा मी राजा याच भावनेत तू कायमच गुरफटलेला… रस्त्यावरून जातोस तेव्हा तुझ्या तगडक तगडक पदरवाचा ध्वनी घुमतो तेव्हा त्या नादाची कंपने माझ्या शरीरावर उमटतात… शहारून जाते काया सारी… अन तुला बघायला मला डोळे नसले जरी संवेदनाचे अंर्तचक्षू तुला टिपून घेतात… एक आनंदाची लहर सगळ्या कायाभर लहरून जाते… एक गोड शिरशिरी ची अनुभूती येते… पण तुझं लक्ष असतं का तिकडे… खुळ्या मनाची समजूत घालता शब्दही किती पडती तोकडे…. प्रत्यक्षात तुला भेटता येणं शक्य नसलं तरी तुझ्या प्रतिमेवरच मी वेडी अभिसारिका होते… बघं तुला जमेल का काही क्षण माझ्याजवळ उभा राहता येतेय का? बघशील का मला क्षण एक टक लावून… जाणून घेशील का माझ्या डोळ्यात दडलेले भाव मनीचे… तुला ते नक्कीच आवडेल.. मग करशील मान डोलावून दुजोरा देशील.. याच केवळ एका प्रतिसादाची मी अपेक्षा करतेय… मुकी असली तरी गुज माझ्या मनीचे तुला कळावेत म्हणून धडपडतेय… बाकी काही नाही जमलचं तरी स्थित प्रज्ञा सारखे जागी निश्चल उभं राहणं का कुठं चुकलयं…
… त्या रस्त्यावरून रोज ठरल्या वेळी मी जात असताना केतकी खिडकीतून मला पाहत असे आणि एक दिवस अचानक तिची माझी नजरानजर झाली आणि केतकीने ती खिडकीच बंद करून घेतली… आणि मी पुन्हा इकडे तिकडे न पाहता सरळ रस्त्यावरून चालत पुढे निघून गेलो…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈