श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
यल्लब्ध्वा पुमान्सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति ॥४॥
अर्थ : ज्या (परमप्रेमरूपा अमृतरूपा) भक्तीची प्राप्ती (लाभ) झाला असता तो पुरुष सिद्ध होतो, अमर होतो, तृप्त होतो.
आपल्याकडे, अनेक ग्रंथामध्ये जेव्हा पुरुष असा उल्लेख होतो, त्यावेळी तो पुरुष शब्द निव्वळ पुरुषासाठी ( पुलिंगधारी ) नसून तो अखिल मानव जातीसाठी असतो हे ध्यानात घ्यावे. प्रत्येक शास्त्राच्या काही संज्ञा असतात. त्यांचे तसे अर्थ घेतले गेले नाहीत तर गोंधळ होण्याची शक्यता असते. आपल्याकडे पुरुष या शब्दाचा निव्वळ पुरुषवाचक अर्थ घेतल्याने स्त्रियांना हिंदुधर्मात दुय्यम स्थान आहे असा गैरसमज नियोजनपूर्वक पसरवल्याचे आपल्या लक्षात येईल.
सर्वसामान्य मनुष्याच्या मनात कोणतीही गोष्ट करताना किंवा करण्याआधी एक प्रश्न निर्माण होत असावा? की अमुक एक गोष्ट मी केली तर मला यातून काय लाभ होईल? मागील सर्व लेख वाचताना अनेक वाचकांच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल, असे मला वाटते.
भौतिक जगात राहणाऱ्या मनुष्याच्या अपेक्षा फारच सामान्य असतात, त्यातील बऱ्याच अपेक्षा त्याचे अचूक व्यावहारिक मूल्य चुकते केल्याने पूर्ण होऊ शकतात. पण मूलभूत (आध्यात्मिक) अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निव्वळ व्यावहारिक मूल्य देऊन भागत नाही, किंबहुना तिथे व्यावहारिक मूल्याची गरज आवश्यकता नसते, तर तिथे मन, बुद्धि यांचे संपूर्ण समर्पण आणि चित्त आणि अहंकार यांचा सद्गुरूचरणी विलय होणे अपेक्षित असते. हा प्रवास संपूर्णपणे आंतरिक आणि ज्याचा त्याचा असल्याने सद्गुरू शिवाय अन्य कोणाला त्या त्या साधकाची प्रगती दिसत नाही. अनेक वेळा बाह्य लक्षणांवरून साधकाची प्रगती मोजली जाते, पण तिथे गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते…
भक्ति केल्यामुळे मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात, तो अमर होतो, मनुष्य सर्वच तृप्त होऊन जातो.
आपण एक व्यावहारिक उदा. बघू. एका मनुष्याला *दिल्ली*ला जायचे होते. त्याने भाड्याने गाडी केली आणि प्रवासाला निघाला. वाटेत त्याला अनेक शहरे लागली. अनेक नयनरम्य ठिकाणे लागली. पंचतारांकित हॉटेल लागली. वाटेत अनेक गोष्टींची त्याला माहिती मिळाली. अनेक पर्यटन स्थळे त्यांनी पाहिली. काहीवेळा तर त्याला अस वाटलं की दिल्ली कशी असेल कोणास ठाऊक? वाटेतील हेच ठिकाण सर्वात सुंदर आहे आपण इथेच थांबावे? पण त्याच्या गाडीचा चालक होता, त्याने त्याला स्मरण करून दिले की मालक आपले गंतव्य स्थान हे रम्य ठिकाण नसून दिल्ली आहे. मग तो यथावकाश दिल्लीला पोचला.
मनुष्य देह प्राप्त झालेल्या प्रत्येक जिवाचे अंतिम ध्येय हे भगवंताची प्राप्ती हेच आहे. काही लोकांना हे पटेल असे नाही. कारण अजून ते गल्लीतून बाहेर पडलेले नसावेत. पण त्यांना या जन्मात अथवा पुढील जन्मात दिल्लीला जावेच लागेल, यात काही शंका नाही. सर्व संतांनी हेच सांगितले आहे. पटतंय ना?
भक्ति केल्याने काय मिळते? तर भक्ति केल्याने अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात. कोणी पाण्यावरून चालेल, कोणी अग्नीवरून चालेल? कोणी काही करेल? तर कोणी अन्य काही करेल? सर्व संत सांगतात की भगवंत मुद्दाम सिद्धी पुढे करून मनुष्याची परीक्षा पाहत असतो. साधकाने त्यात अडकू नये. आपले गंतव्य स्थान जर दिल्ली असेल, तर तिकडे कसे त्वरित पोचता येईल ते पाहावे.
मनुष्य जेव्हा निगुतीने साधना करू लागतो, तेव्हा त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात, जो साधक त्यात अडकत नाही, त्याची वासना क्षीण होऊ लागते, पण तो अधिकाधिक तुप्त होऊ लागतो. मिठाच्या भाड्यात सतत पाणी ओतत राहिले तर काही काळाने त्यातील खारटपणा कमी होत होत शेवटी नष्ट होऊन जातो. आपल्या मनातील वासनांचा खारटपणा नष्ट झाला की मनुष्य तृप्त होऊन जातो. ती तृप्ती त्याच्या देहावर दिसून येते. अशा सत्पुरुषाला नुसते पाहिले तरी मनुष्याचे चित्त स्थिर होऊ शकते, आंतरिक समाधानाची अल्प जाणीव होऊ शकते. त्याचे मरणाचे भय नष्ट होते.
अमर होणे म्हणजे मरणाचे भय नष्ट होणे. आत्म्याला देहाचे वस्त्र घातले आहे असे सर्व संत सांगतात. वस्त्र जीर्ण झाले की जसे आपण नवीन वस्त्र परिधान करतो तसे आत्मा नवीन वस्त्र परिधान करतो. आता मला सांगा यात घाबरण्याची गरजच नाही. मनुष्य मी देह हा भाव मनात ठेवून आयुष्य व्यतीत करीत असतो, मग त्याला मी आत्मा आहे अशी जाणीव कशी राहू शकेल……?
मनुष्याने या क्षणापासून मी देह नसून आत्मा आहे, देह विनाशी आहे, मी आत्मा असल्याने अविनाशी आहे, म्हणून मला कसलेही भय नाही, हे मनाशी पक्के धरावे. म्हणजे त्याचे उर्वरित आयुष्य आत्यंतिक सुखात जाईल……!
प्रापंचिक सुख दुःखाचा त्याच्यावर काहीही प्रभाव राहणार नाही……! तो निरंतर आनंदात राहील….
जय जय रघुवीर समर्थ !!
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः सूत्र ४
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈