सुश्री प्राची जोशी
कवितेचा उत्सव
☆ साक्षीत्वाची आस… ☆ सुश्री प्राची जोशी ☆
☆
साक्षीत्वाची आस नाचते मनात
हळूच ती थिरकते मनमंदिरात
*
साक्षीत्वाची आस रमते संसारात
भावबंध सुटताना दाटे अलिप्तता मनात
*
साक्षीत्वाची आस उमटते अंतरात
देव जागा करी मनातील स्पंदनात
*
साक्षीत्वाची आस करी उद्युक्त मनास
मनाला दटावूनी धरी अध्यात्माची कास
*
साक्षीत्वाची आस देवाचा मनात वास
आतील गाभाऱ्यात उजळला आत्मध्यास
*
साक्षीत्वाची आस देहाचा आत्मिक प्रवास
प्रवासात गवसे अंतरात्म्याचा निवास
*
देह आणि आत्म्याचे हे रेशमी कोडे
परमेशाच्या साक्षीने असे अलवार उलगडे….
☆
© सुश्री प्राची अभय जोशी
मो 9822065666
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈