सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आम्ही पेशवेकालीन मोरोबादादांच्या वाड्यात…
रोड वायडिंग मध्ये आमची जागा गेली. जोगेश्वरीच्या अगदी समोरच्या दीपमाळेजवळची, जागा सोडून आम्ही पोटभरे वाड्यात म्हणजे जोगेश्वरीच्या पाठीमागे आलो. आई देवीला हात जोडून म्हणाली, ” माते आम्ही तुझ्या पोटाशी होतो तु पाठीशी घातलसआणि तुझ्या परिसरातच ठेवलंस”.
हा पेशवेकालीन मोरोबा दादांचा वाडा चार चौकी आणि पुष्कर्णी हौदाचा होता. पेशव्यांची रंगपंचमीची रंगत ह्याच वाड्यात रंगली. शानदार, नक्षीदार दरवाजातून आत गेल्यावर लांबरुंद हेssभले मोठे सुंदर हौद दिसायचे. पेशवे काळात पूर्णपणे हे हौद भरून रंग तयार केला जायचा. आणि रंगपंचमीचा जल्लोष साजरा व्हायचा. पेशवाई संपली, वाडा ओस पडला आणि ह्या वाड्यात नंतर 100 बिऱ्हाड आली. त्यात 101 च्या आकड्यात आमची वर्णी लागली. घराची दुरुस्ती, लाईट बिल खर्च, मालकांनी करायचा असा नियम होता. पण जुनी पडझडीची वास्तू, तुळया, सळया जुन्या पुराण्या झाल्या. तेलपाण्या अभावी त्यागंजलेल्या होत्या. लाकडी जिन्याच्या पायऱ्या तुटलेल्या असून, जिन्यात इतका अंधार होता की पायरी चुकली तर पावलं उचलायचा त्रास वाचून, वरचा माणूस घसरगुंडी खेळत l पहिल्या पायरीवरच पोहोचायचा. जिन्यात दिवसाढवळ्या इतका काळोख असायचा की चढणारा आणि उतरणारा टक्कर देउन कसाबसा तोल सावरत कपाळ चोळायचा. अहो!लहान काय, मोठ्ठे सुद्धा ‘ठो देरे ठोचा ‘ खेळ त्या अंधाऱ्या जिन्यात खेळायचे. मग काय कपाळावर हात मारून, एक सणसणीत शिवी हांसडून एकमेकांना म्हणायचे. “साल्या दिसत नाही कां तुला?”डोळे फुटलेत का तुझे? आंधळा झालास की काय?” पहिल्या पायरीवरून हा रंगलेला डाव बघणारे आम्ही हंसू दाबून एकमेकांना विचारायचो. ” हे तर चांगले डोळस आहेत, पण जिनाच आंधळा आहे त्याला ते तरी काय करणार?
अहो !काय सांगू तुम्हाला! पुण्यात सगळ्याच वाड्यांची ही कथा होती. कारण वाडे जुने झाले होते नां!मालक तरी काय करतील? आभाळाला किती ठिगळ जोडतील? भाडेकरूही चिवट होते. वाडा पडेपर्यंत ते बहाद्दर जाम हलले नाहीत. जिने उतरतांना तर आम्ही कड्या कठडे खुळखुळ्यासारखे हलवायचो. लाईट कनेक्शन तुटलं, मालक भाडेकरूंची शब्दांची हाणामारी झाली तरीही, चार भिंतींना जुनी बिऱ्हाड चिकटूनच राह्यली. पोटभरे वाड्यात कमीत कमी जागेचे भाडेकरूंचं भाडे होतं फक्त 2 रुपये. आमच् घर म्हणजे एक हॉलचं होता. माझ्या मावशीने आणि वर्षा वहिनीने त्याला आकार देऊन ‘टू इन वन’ केलं होतं. तेव्हा कुठली आलीय हो प्रायव्हसी, ? पण थोडीफार प्रायव्हसी असावी म्हणून आमच्या बंधूराजांनी घरात शामियान्यासारखे पडदे सोडले होते.
सगळ्या बिऱ्हाडांना जोडलेला, सार्वजनिक पटांगणासारखा भला मोठा हॉल पहिल्या मजल्यावर होता. ‘आव जाव हॉल तुम्हारा’अशी प्रथा पडून मंगळागौर लग्न, मुंज, डोहाळे जेवण सारं काहीं या फुकटच्या हॉलमध्ये फुकटात साजरं व्हायचं. वाड्यात सगळ्यात जास्त म्हणजे मोठ्या आकड्याचं भाडं आम्हालाच होतं. ते किती होतं माहितीय का? फक्त रु. 12 नगद. आजच्या लाखोवारीच्या जगामध्ये ते बारा रुपये म्हणजे कुठलातरी कोपराचं म्हणावं लागेल. मालक श्री. व सौ. पोटभरे सगळ्या भाडेकरुंचे भाऊ आणि वहिनी होते. माहेरवाशिणीचे माहेरपण तिथे कौतुकाने साजरं व्हायचं. इतकंच काय, आम्ही वाड्यातल्या मुली उपवर झालो की, आमची लग्न, रुखवत, धान्य निवडणे सारी सारी तयारी वाडा अगदी आपलं घरचं कार्य समजून करायचा. त्यात उत्साहाचा वाटा आणि गाईडन्स अर्थात पोटभरे भाऊ वहिनीचंच असायचं.
तुम्हाला एक नवलाईची गोष्ट सांगू?तिथले एक भाडेकरू श्री. कळमकर ह्यांना आई वडील भाऊ बहिण कुणीच नव्हते. खोटं वाटेल तुम्हाला पण त्यांचं लग्न या वाड्यांनी लावलं. देव देवक भाऊंनी बसवलं. करवल्या झालो आम्ही. आणि कार्यवाहक झाला संपूर्ण वाडा. असं हे शुभमंगल वाड्यातल्या हॉलनी दणक्यात लावलं. इतकचं काय त्यांचे बारा महिन्यांचे लगेचच आलेले १२ सण हौसेनी केले. मंगळागौरीचं, हरतालिकेचं जागरण, झिम्मा, दणादण फुगड्या या वाड्यानेच जागवल्या काही दिवसांनी कळमकर वहिनीनीं गोड गुपित माझ्या आईच्या कानांत सांगितलं. आईतली माय माऊली जागी झाली आणि कौतुकाने हंसली मग काय! माझ्या आईनी चोर चोळीचा कार्यक्रम गुपचूप उरकला. पुढे सातवा महिना लागल्यावर डोहाळतुलीचं सजून धजुन डोहाळेजेवणही हौसेत झालं. त्या वहिनीची तिच्या मामीकडे माहेरी पाठवणी झाली. “सांभाळून, सावकाश जा गं! तब्येतीची काळजी घे हो. जड ओझं उचलू नकोस हं!काही खावसं वाटलं तर सांग बरंका! “ अशा एका अनेक प्रेमाच्या सूचना झेलत डोहाळकरीण माहेरी रवाना झाली. आणि मग काही दिवसांनी, बालराजांना घेऊन बाळंतींण आपल्या घरी, मोरोबादादांच्या वाड्यात परतली.
बालराजांचं स्वागत अगदी थाटामाटात पायघड्यांवरून फुलांच्या मऊ शार पाकळ्यांवरून झालं. आणि बाळकृष्ण बोळकं पसरून हंसले. बाळकृष्ण कलेकलेने वाढत होता त्याचं उष्टावण झालं संक्रांत सण, बोरनहाण, करदोडे वाण, अगदी सगळे सगळे सोहळे कौतुकाने वाड्यातल्या आयाबायांनी साजरे केले. इतकचं काय मुलांची मुंज पण इथे निर्वीघ्नपणे पार पडली. प्रेम, जिव्हाळा, सहकार्य, आणि शेजारधर्म ह्या तत्वावर आधारलेली संस्कृती त्यावेळच्या जुन्या पुण्यात पाय रोउन घट्ट रुतली होती.
ते सगळं खरं आहे हो!पण ह्या वाडा संस्कृतीत देवाला स्थान हे हवेच नाही कां! वाड्याच्या मागच्या बाजूला छोटसं विष्णू मंदिर होतं आणि अजूनही आहे. बायका इतक्या उत्साही की भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत सुस्नात होऊन काकड्याला जायच्या. तितक्याच हौसेने जवळच्या प्रभात टॉकीजच्या मराठी सिनेमाला पण घोळक्यांनी भेट द्यायच्या. हळव्या रडक्या सिनेमात रडून आणि विनोदी सिनेमात हसून बाहेर पडायच्या. आमच्या वहिनीला सिनेमाची खूप आवड होती म्हणून आमची आई वाड्यातल्या बायकांना तिचं पण तिकीट काढायला सांगायची. एकदा तर गंमतच झाली बहिणीबरोबर वहिनीने 12 ते 3 सिनेमा बघितला, घरी आली तर वाड्यातल्या बायकांनी ‘मोलकरीण’ सिनेमासाठी तिचं तिकीट काढलं होतं. प्रभात टॉकीजला वेगवेगळे मॅटिनी शो असायचे त्यातून तर हा सुलोचनाचा गाजलेला कौटुंबिक चित्रपट होता. वहिनीला जेवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. ‘शो’ ची सुरुवात जायला नको म्हणून आईने घरी भाजलेले खारे शेंगदाणे आणि कोरड्या भेळेचा पुडा बायकांच्या हातात कोंबला. तेव्हा थिएटरमध्ये सर्रास शेंगा, फुटाणे, भेळ, फरसाण खायची फुल परमिशन होती. सिनेमाचा आस्वाद घेताना रसिक प्रेक्षक, शेंगा फराळ करायचे. शेंगा फोलपटांचा ढीग, कागदाचे बोळे बाकाखाली इतके पडायचे की ते आवरतांना सफाई कामगारांचं कंबरडच मोडायचं. पुढची गंमत तर ऐका ना, वहिनी बहिणीबरोबर 12 ते 3 सिनेमा बघून नुकतीच आली होती. वाड्यातल्या बायकांबरोबर 3 ते 6 दुपारचा शो बघून घरी येऊन चहा प्यायला टेकली न टेकली तोच आमचे बंधुराज घाईघाईने आले. आणि म्हणाले, “वर्षा लवकर चहा पी, मी तिकीट काढलीत, आपल्याला 6 ते 9 च्या शोला जायचय पटकन उठ. सिनेमाची सुरुवात जायला नको” आता आली का पंचाईत!. हो म्हणावं की नाही म्हणावं? ह्या विचारांच्या गोंधळात वहिनींबाईंनी आईकडे बघितलं, माझी आई सगळ्यांना सावरून घेणारी, सगळ्यांची मर्जी सांभाळणारी होती. माझ्या भावाला राग येऊ नये म्हणून तिने वहिनीला त्याच्याबरोबर जाण्याची खूण केली. अहो!वहिनीला तशी सिनेमाची आवड होती म्हणा! पण त्या एकाच दिवशी तीन प्रकारचे तीन सिनेमे बघून तिच्या डोक्यात अगदी सिनेमांची खिचडी झाली. 12 ते3, – 3 ते6 आणि शेवटचा 6 ते 9चा शो बघून घरी आल्यावर अर्धी अधिक अमृतांजनची बाटली तिने संपवली. हंसून हंसून आम्ही लोळण फुगडी घेतली. त्यानंतर मात्र वहिनीने पाच-सहा महिने ‘चला जाऊया सिनेमाला’ ह्या वाक्याचा धसका घेऊन सिनेमाचं नांवच काढलं नाही.
बरं का मित्रमैत्रिणींनो अशा गंमतीशीर आठवणी आम्हाला मोरोबा दादांच्या वाड्याने दिल्या आहेत. मग आवडली का तुम्हांला ही त्यावेळच्या वाड्यातली गमतीशीर गम्मत?.
– क्रमशः…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈