सुश्री ज्योति हसबनीस

 

(सुश्री ज्योति  हसबनीस जीअपने  “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के  माध्यम से  वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख  “कविवर्य बा. भ. बोरकरांची कविता”.  पद्मश्री सम्मान से सम्मानित सुप्रसिद्ध मराठी एवं कोंकणी भाषा के साहित्यकार स्व बालकृष्ण भगवन्त बोरकर,  बा भ बोरकर के नाम से जाने जाते हैं। थे। इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)

☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 7 ☆

☆ कविवर्य बा. भ. बोरकरांची कविता☆ 

काव्यदिंडीचा आजचा दिवस उजाडला तोच मुळी कविवर्य बा. भ. बोरकरांच्या या कवितेच्या आठवणीत. आज दिवसभर मन ह्या कवितेभोवती पिंगा घालत होतं. गोव्याच्या नितांतसुंदर निसर्गभूमीत वाढलेल्या ह्या कविश्रेष्ठाचं हे तितकंच सुंदर मुक्तायन इतकं सहजपणे मनात रूजतं ना, की खरंच चराचराची निर्मिती करणा-या त्या सृष्टीकर्त्याच्या सृजनातलं अचंबित  करणारं वैविध्य आणि सौंदर्य बघून नतमस्तक व्हावंसं वाटतं ! बकुळीचा गंध प्राजक्ताला नाही, की गुलाबाचा राजसी थाट तगरीला नाही, मोराचा डौल बदकाला नाही, की कोकिळेच्या स्वरातला गोडवा कावळ्याला नाही, मानवाची निर्मिती तर किती असंख्य मूषीतली…झाडं, पानं, फुलं, प्राणी पक्षी डोंगरमाथे, कडेकपारी, वाटावळणं या सा-यांनी चितारलेला ‘त्या ‘चित्रकाराचा विशाल कॅनव्हास आणि त्यात ‘त्याने’ केलेली विविध रंगंाची अनुपम पखरण आणि अत्यंत खुबीने प्रत्येकाचं अबाधित राखलेलं वेगळेपण केवळ थक्क करणारं ! त्याचबरोबर माणसाला श्रेष्ठत्व बहाल करून सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घ्यायला दिलखुलासपणे बहाल केलेली मोकळीक तर काळोकाळ ‘ त्याच्या ‘ ऋणातच राहायला भाग पाडणारी !

माझं काव्य दिंडीतलं पाऊल बोरकरांचं बोट धरून !

☆ कविवर्य बा. भ. बोरकरांची कविता☆ 

प्रति एक झाडा, माडा त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पाना, फुला त्याचा त्याचा तोंडावळा

असो पाखरू, मासोळी, जीव, जीवार, मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव काही आगळीवेगळी

असो ढग, असो नग, त्याची अद्रुत रेखणी
जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी

उठे फुटे जी जी लाट तिचा अपूर्वच थाट
फुटे मिटे जी जी वाट तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे! अपुली चाले यातूनच यात्रा

~बा भ बोरकर

 

© ज्योति हसबनीस,

नागपुर  (महाराष्ट्र)

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments