श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ किंमत – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(नशिबाने शेठजींना दुसरा माणूस मिळाला.पण तो चार हजार पगारावर अडून बसला.शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं.येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.) – इथून पुढे 

सोमवार उजाडला.शेठजी दुकानात आले.अजून ग्राहकांची वर्दळ सुरु व्हायची होती.प्रदीपला दुकानात पाहून त्यांना आश्चर्य वाटलं

“काय रे विचार बदलला की काय तुझा?”

प्रदीप हसून म्हणाला

“नाही शेठजी.या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय”

“बरं बरं” 

प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेला.शेठजी खुर्चीवर बसत नाही तो एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली.आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरु होणार याचा शेठजींना आनंद झाला.

” बोला साहेब “ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले

” प्रदीपला घ्यायला आलोय”

शेठजींनी एकदा कारकडे पाहिलं.एका मामुली सफाईकामगाराला घेण्यासाठी हा देखणा माणूस एवढी आलिशान कार घेऊन यावा याचं त्यांना आश्चर्य वाटलं.या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही?

“प्रदीप कोण आपला?”त्यांनी साशंक मनाने विचारलं

” प्रदीप मुलगा आहे माझा”

“काय्यsssप्रदीप तुमचा मुलगा?”

तेवढ्यात प्रदीप बाहेर आला.आल्याआल्या त्याने वेगाने धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली

” पप्पाsss” असं त्याने म्हणताच 

त्या माणसाने त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसाढसा रडू लागला.सगळे सेल्समन,नोकर जमा झाले.प्रदीपही रडत होता.हे काय गौडबंगाल आहे हे कुणाला कळेना.थोडा वेळाने प्रदीप जरा बाजुला झाला तसा तो माणूस म्हणाला.

” शेठजी मी ओंकारनाथ.माझी धुळ्यात चटईची फँक्टरी आहे.दोन इंडस्ट्रीयल वर्कशाँप आहेत.अगोदर मीही एक कामगार होतो.मेहनतीने आणि देवक्रुपेने फँक्टरीचा मालक झालो.मी गरीबी पाहिली आहे.कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढलं आहे.पण आमची मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन आली आहेत.त्यांना पैशाची,श्रमाची,माणसांची किंमत नाही.हा माझा अति लाडावलेला मुलगा माझ्या फँक्टरीत यायचा.तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा.लहानमोठा बघायचा नाही.वाटेल ते बोलायचा.माझ्या कानावर आलं होतं पण एकूलत्या एक मुलावरच्या प्रेमापोटी मी चुप बसायचो.एक दिवस त्याने लिमीट क्राँस केली. आमच्या सफाई कामगाराला वाँशरुम नीट साफ केलं नाही म्हणून सगळ्या कामगारांसमोर शिव्या दिल्या.साठी उलटलेला तो माणूस.त्याच्या मनाला ते लागलं.तो माझ्याकडे रडत आला आणि “माझा हिशोब करुन टाका.मला आता इथे रहायचं नाही “असं म्हणू लागला.माझं डोकं सरकलं.मी याला बोलावलं.म्हाताऱ्याची माफी मागायला लावली तर हा आपल्या मस्तीत.सरळ माफी मागणार नाही म्हणाला.मी उठून त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला म्हणालो की तुझ्यात एवढी मग्रुरी आहे ना तर तू मला महिनाभर सफाईचं काम करुनच दाखव.त्याने माझं चँलेंज स्विकारलं पण आपल्याच फँक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती.मला म्हणाला मी जळगांवला जातो आणि तिथे काम पहातो.मीही संतापात होतो म्हणालो तू कुठेही जा.पण हेच काम करायचं आणि महिन्याने मला सांगायचं कसं वाटतं ते!त्याचा एक गरीब शाळकरी मित्र जळगांवच्या समता नगरात रहातो.त्याच्याकडे तो आला.तुमच्या दुकानात कामाला लागला.मला फोन करुन त्याने हे सांगितलं. मला वाईट वाटलं.शेवटी बापाचं मन ते.पण म्हंटलं उतरु द्या याची मस्ती.अशीही त्याला सुटीच होती.रिकाम्या टवाळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडतर आहे हे तरी शिकेल.म्हणून मी काहीही चौकशी केली नाही.मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला खुप रडला.म्हणाला ‘मी आता खुप सुधारलो आहे.मी आठवड्याने परत येतो घरी’ मी म्हंटलं ‘मीच येतो.बघतो तुझं दुकान आणि तू कायकाय काम करत होतास ते’ म्हणून आज मी ते बघायला आणि त्याला घ्यायला आलोय”

राजूशेठ ते ऐकून अवाक झाले. म्हणाले

” तरीच मला वाटत होतं की हा मुलगा सफाईच्या कामाला योग्य नाहिये.पण हा काम तर छान करत होता”

प्रदीप हसला

“नाही शेठजी.मला सुरवातीला काम जमत नव्हतं पण या सगळ्या काकांनी मला खुप मदत केली.मी डबा आणत नव्हतो कारण मित्राची आई खरंच आजारी असायची पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला.माझ्याकडून खुप चुका व्हायच्या पण ते माझ्यावर कधी रागावले नाहीत.मला त्यांनी खुप सांभाळून घेतलं”

प्रदीप परत रडायला लागला तसं भास्करने त्याला जवळ घेतलं.

“अरे बेटा आपण सगळेच पोटापाण्यासाठी नोकरी करतो ना?मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको?”

” हो काका.पण मला हे समजत नव्हतं.आता ते कळायला लागलं.पप्पा तुम्ही मला म्हणत होते ना की मला पैशाची, श्रमांची किंमत नाही म्हणून.मला इथं आल्यावर मेहनतीची ,पैशांची,माणसांची,अन्नाची सगळ्यांची किंमत कळायला लागलीये.पप्पा शेठजींची तीन मोठी दुकानं आहेत जळगांवात, पण त्यांना कसलाही गर्व नाही.ते कुणाशीच कधीही वाईट वागले नाहीत.कारण त्यांना माणसाच्या कष्टाची जाणीव आहे.त्यांच्या घरी काहीही कार्यक्रम झाला की ते दुकानात सगळ्यांना मिठाई वाटायचे.कधीही गरीब -श्रीमंत असा भेदभाव त्यांनी केला नाही “

“बेटा हेच मला हवं होतं.तुला ते शेवटी कळलं यातच मला समाधान वाटतंय” 

” चला साहेब तुम्हांला दुकान दाखवतो” राजूशेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले “आणि भास्कर जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग.आज एक बिघडलेला मुलगा माणसात आलाय याचा मलाही खुप आनंद होतोय” 

ते तीन मजली भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना प्रदीपच्या मेहनतीची कल्पना आली.त्यांचे डोळे भरुन आले.आलेली मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले.

“चला मंडळी.आता निघायची वेळ आली.तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.आणि हो पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे.तुम्ही सगळ्यांनी धुळ्याला पार्टीला जरुर यायचं आहे.गाडी करुनच या सगळे.खर्चाची काळजी करु नका.गाडीचा खर्च मी करेन.”

प्रदीप उठला .सगळ्या सेल्समन आणि नोकरांच्या पाया पडला.मग शेठजींकडे आला तसं शेठजी त्याला जवळ घेऊन म्हणाले

“बेटा तुझ्या वडिलांनी आणि तु ही नव्या पिढिसाठी एक आदर्श घालून दिलाय”

प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले तसे सर्वजण त्यांना निरोप द्यायला बाहेर आले.गाडी निघाली.निरोपाचे हात हलले.

प्रत्येकजण आत येऊन आपापल्या कामाला लागला.शेठजींना काऊंटरवर  बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजीनियरींग करत होता.तो करत असलेले रंगढंग,त्याला लागलेली व्यसनं त्यांच्या कानावर आली होती.त्याला सुधारण्यासाठी प्रदीपसारखं काही करता येईल का याच्या विचारात ते गढून गेले.

– समाप्त – 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments