श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ मैत्रीचा गाव… ☆ श्री विश्वास देशपांडे

काही दिवसांपूर्वी मी पुण्यात होतो. माझे चाळीसगावचे एक अतिशय जवळचे सहकारी सुद्धा पुण्यातच त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते. परवाच्या दिवशी सकाळी मला अचानक त्यांचा फोन आला. त्यांचा आवाज अगदी खोल गेला होता. मला म्हणाले, ‘ सर, माझे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे. मला एकदा भेटायला येऊन जा. ‘ त्यांचे आणि माझे नाते जरी मैत्रीचे असले तरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आम्ही सगळेच त्यांना अण्णा म्हणतो. अशा या अण्णांचा फोन आला आणि आम्ही दोघं तातडीनं त्यांना भेटायला गेलो. आम्ही आल्याचा अण्णांना कोण आनंद ! तशाही अवस्थेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. काय सांगू, किती सांगू आणि कसं सांगू अशी त्यांची अवस्था झाली होती. शेवटी त्यांचा मुलगा म्हणाला, ‘ अण्णा, तुम्ही बोलू नका. मी सगळं सांगतो. ‘

गंमत म्हणजे आदल्या दिवशीच अण्णांना हॉस्पिटलमधून घरी सोडले होते. अण्णांना जास्त बोलायला डॉक्टरांनी मनाई केली होती. अण्णांनी पूर्ण विश्रांतीच घ्यावी, त्यांना कोणाच्याही फोनचा त्रास होऊ नये या हेतूने मुलांनी त्यांचा फोन काढून घेतला होता. पण तशाही परिस्थितीत अण्णांनी कुठून तरी फोन शोधला आणि पहिला फोन मला केला. त्यांना का वाटलं असेल की मला फोन करावा ? कुठून येते ही ओढ ? मी तर काही अण्णांचा जवळचा नातेवाईक नव्हतो. पण माणुसकीच्या आणि प्रेमाच्या नात्याने मी त्यांचा सगळ्यात जवळचा नातेवाईक होतो. आणि ते नातं होतं मैत्रीचं ! हे नातं रक्तापलीकडचं असतं. या नात्यात कोणी कोणाकडून काही घेत नाही आणि कोणी कोणाला काही देत नाही. देवघेव असते ती निखळ प्रेमाची. कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारं हे नातं म्हणजे मनुष्य जीवनातील एक सुंदर मुक्कामाचं ठिकाण. हा मैत्रीचा गाव प्रत्येकाचं जीवन आनंदानं उजळून टाकतो. अण्णांची भेट घेऊन आम्ही निघालो. अण्णा अगदी खुश होते. डॉक्टरांनी दिलेली औषधे तर त्यांच्याजवळ होतीच पण हा मैत्रीच्या औषधाचा डोस पोटात जाताच अण्णांचे दुखणे कुठल्या कुठे पळाले. लवकर बरे होण्यासाठी त्यांना आणखी ऊर्जा मिळाली.

अलीकडे सगळ्या गोष्टींसाठी काही अटी असतात. कोणतीही जाहिरात पहा. तिथे कुठेतरी स्टारमार्क करून अगदी छोट्या अक्षरात का होईन पण ‘ अटी लागू ‘ असे लिहिलेलं असतं. मैत्रीच्या या नात्याला मात्र कुठल्याच अटी लागू  नसतात. किंबहुना अटी असतील तर ती मैत्री कसली ? तो तर व्यवहार ! मैत्री काही मागत नाही. ना वय, ना जातपात, ना धर्म, ना लिंग. कशाकशाचीही आवश्यकता नसते. मैत्री या सगळ्यांच्या पलीकडे असते. रक्ताच्या नात्यात निवडीला चॉईस नसतो. मैत्रीत मात्र तो मुबलक असतो. आवडणाऱ्या मित्रांशी मैत्री होते असे म्हणण्यापेक्षा ती त्यांच्यासोबत जुळते, फुलते आणि खुलते. तिचे रेशमी बंध घट्ट होत जातात.

मैत्रीचं लावलेलं रोपटं बहरावं म्हणून काही काळजी जरूर घ्यावी लागते. मैत्रीत काही मिळण्याची अपेक्षा तर नसतेच ( म्हणजे ती नसावीच ! ) पण द्यायचं मात्र असतं आणि तेही परतीच्या अपेक्षेनं नाहीच. त्यात व्यवहार नसतोच ! मित्रानं विश्वासानं एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली तर ती प्राणापलीकडे जपायची असते. उद्या चुकून मैत्रीत अंतर पडलं तरी ती गोष्ट फक्त तुमच्यापाशीच ठेवायची असते. आणि सच्चे दिलदार मित्र या गोष्टी पाळतातच.

खूप वर्षांपूर्वी अमिताभचा ‘ जंजीर ‘ हा चित्रपट आला होता. त्यात अमिताभ आणि प्राण यांच्या फार सुरेख भूमिका होत्या. प्राण आणि अमिताभ असतात सुरुवातीला एकमेकांचे वैरी. पण नंतर त्यांची मैत्री होते आणि मग या मैत्रीच्या अनोख्या नात्याचे प्रेक्षक साक्षीदार होतात. या चित्रपटातील मन्ना डे यांनी गायीलेलं गाणं फार सुदर आणि अर्थपूर्ण आहे. ते प्राणच्या तोंडी आहे. ‘ यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी ‘ हे ते गाणं ! या गाण्यातल्या पुढील ओळी फार सुंदर आहेत…

छुपा ना हमसे हाल-ए-दिल सुना दे तू

तेरे हंसी की किमत क्या हैं ये बता दे तू

आपला मित्र उदास आहे, हसत नाही हे पाहिल्यावर सच्च्या मित्राला दुःख होते. त्याच्या फक्त एका हसण्यासाठी तो वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो.

कहे तो आसमांसे चाँदतारे ले आऊं

हंसी जवां और दिलकश नजारे ले आऊं

असे असतात खरे मित्र. अनेक चित्रपटातून ही दोस्तीची अजरामर कथा चित्रित झाली आहे. शोले मधील ‘ ये दोस्ती हम नही तोडेंगे..’ किंवा याराना मधील ‘तेरे जैसा यार कहाँ ‘ किंवा ‘ बने चाहे दुश्मन जमाना हमारा… हे दोस्ताना चित्रपटातील गीत असो. अशी गाणी ही हृदयाला हात घालतात.

श्रीकृष्ण आणि सुदामा, श्रीराम आणि सुग्रीव यांच्या मैत्रीच्या कथा तर प्रसिद्धच आहेत. दुर्योधन आणि कर्णाची मैत्रीही प्रसिद्ध आहे. पण त्या मैत्रीत थोड्या नकारात्मक छटा आहेत. दुर्योधन कर्णाकडे अर्जुनाचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो तर कर्ण हा दुर्योधनाच्या मैत्रीच्या ओझ्याखाली दबलेला असतो. आपण दुर्योधनाची बाजू घेतो हे योग्य आणि न्याय्य नाही हे त्याला माहिती असते पण तो काही करू शकत नाही.  सगळ्यात भावणारी मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामा यांची आहे. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे पण त्याला भेटायला जाताना गरीब सुदामा फक्त पोहे घेऊन जातो आणि श्रीकृष्णही अत्यंत आवडीने ते भक्षण करतो. जेव्हा द्वारपाल सुदाम्याला अडवतात हे श्रीकृष्णाला कळते, तेव्हा तो स्वतः त्याच्या स्वागताला जातो. त्याची नगरी सोन्याची करतो. या सगळ्यात केवळ निखळ मैत्री आणि प्रेम आहे. खरं तर श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत कमालीचा विरोधाभास आहे. पण ती परिस्थिती त्या दोघांच्या मैत्रीत कुठेही आड येत नाही. श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची मैत्रीही अशीच मनभावन आहे.

हे वर्ष आता संपत आले आहे. हे वर्ष आणि गेल्या  अनेक वर्षांनी मैत्रीची संजीवनी देत मला जगवलं आहे. गेल्या काही वर्षात खूप जिवलग मित्र मैत्रिणी मिळाल्या. त्यातील काही तर माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि मानाने मोठे आहेत पण कुठल्याही अपेक्षेशिवाय ही मैत्री पुढे जाते आहे. मैत्रीच्या बिया छान रुजल्या आहेत. त्या जोपासतो आहे. मैत्रीबद्दल बोलताना पु ल देशपांडे म्हणतात

रोज आठवण व्हावी असे काही नाही

रोज भेट व्हावी असेही काही नाही

रोज बोलणं व्हावं असंही काही नाही

पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री

आणि

तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.

मैत्रीबद्दल लिहिताना मला सुचलेल्या काही ओळी

प्रत्येकाच्या हृदयात मैत्रीचा एक गाव असावा

त्या गावात असावेत हक्काने राहणारे मित्र मैत्रिणी

कधी वाटले काही सांगावेसे तर

वे खुशाल हक्काने त्यांच्याकडे

कराव्या मोकळ्या आपल्या भावना

मैत्रीत वाटून घेता येते सारे

उणावते दुःख आणि दुणावतो आनंद

अशा मित्रांकडे काही काळ जावे

सुखदुःख सारे वाटून घ्यावे

असावा असा मैत्रीचा गाव

मित्र मित्र म्हणता म्हणता वाढत जावा

मैत्रीचा परीघ

वाढता वाढता तो विश्वव्यापी व्हावा.

माझ्या वाचन आणि लेखनाच्या छंदामुळे मला अनेक नवे मित्र मिळाले आहे. माझे अनेक वाचक सुद्धा माझ्या जिवाभावाचे मित्र बनले आहेत. काहींना प्रत्यक्ष भेटलो आहे तर काहींची अजून भेट नाही. पण त्या सगळ्यांची या निमित्ताने आठवण करतो आणि पुढील येणाऱ्या अनेक वर्षात ही मैत्री अशीच ‘ अभंग ‘ राहील असे वचन देऊन थांबतो. हा लेख माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments