डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट 🌹

तीन डिसेंबर ! जागतिक अपंग दिनानिमित्य माझ्या एका अविस्मरणीय भेटीचा अनुभव आपल्या समोर मांडते.

स्थळ- पुण्यनगरी नाशिक,

सरळ भेटण्याचा आणि पत्र व्यवहाराचा पत्ता-  श्री काशीनाथ देवराम महाजन, फ्लॅट नं १४, मधूसूदन अपार्टमेंट, त्रिवेणी पार्क, जेलरोड, नाशिक- पिनकोड – ४२२१०१, फोन नंबर – ८४५९३०००७६

माझी या स्थळी पोचण्याची सांजवेळ साधारण ५. मंडळी वरील नामनिर्देशित व्यक्ती प्रसिद्ध आहे, आपल्यापैकी कैक जण त्यांना कविसंमेलनात भेटले असाल एक कवी, अध्यक्ष, निमंत्रित अन बरेच कांही. आमच्या भेटीचा योग्य मात्र अचानकच आला पण मी मात्र त्यांचे नाव आमचे मित्र महेंद्र महाजन (मुक्काम सटाणा) यांच्या स्वरातून ऐकले होते. पर्यावरण, सायकल, भाऊबीज अन अजून विषयांवर, स्वर महेंद्रचे अन कविता-गीत काशिनाथ महाजन. सटाणा येथे महेंद्रची भेट झाल्यावर मी   त्यांना माझी नुकतीच प्रकाशित पुस्तके भेट दिली आणि तसेच काशिनाथ सरांना देखील एक संच द्यायची विनंती केली. मात्र माझे भाग्य जोरावर नक्कीच होते. महेंद्रने मला नाशिकला त्यांना प्रत्यक्ष भेटून पुस्तके द्यावीत असा सल्ला दिला.

त्यानुसार मी   काशिनाथ सरांची भेटीकरता वेळ मागितली अन त्यांना भेटले. त्यांना अंध म्हणणे म्हणजे त्यांच्या दिव्यदृष्टीचा अपमानच होय असे जाणवले. त्यांच्या जीवनाच्या प्रखर जाणीवा त्यांच्या अनुभवातून आहेत की चैतन्यमय अनुभूतीतून आहेत हा मला पडलेला मूलभूत प्रश्न! त्यांनी मला भेटीची वेळ दिल्यावर त्यांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख असलेला लेख मला अग्रेषित केला. तो माझ्या या या लेखासोबत अग्रेषित करीत आहे. त्यांनी अंधत्वामुळे आलेल्या अंधाराचे एक भव्य दिव्य प्रकाशज्योतीत रूपांतर कसे केले याचे मला नवल वाटते. लहानसहान अडचणींचा उदो उदो करणारे आपण वास्तविक परिस्थितील आशेच्या प्रकाशाच्या कवडश्याकडे कसे दुर्लक्ष करतो याचे प्रत्यंतर मला या भेटीत प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या सोबत घालवलेला अंदाजे दीड तास त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रकाशलेला होता. आपल्या दिव्य दृष्टीने माझ्याशी आनंदाने संपर्क साधत त्यांनी जणू संपूर्ण वातावरण भरून टाकले होते. ‘असा कुठलाच विषय नाही ज्यावर मी कविता रचली नाही’, हे मला तेव्हा अतिशयोक्तीपूर्ण विधान वाटले, पण भेटीनंतरच्या त्यांच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर मला सामील करून घेतल्यावर त्यांच्या कवितांचा जो ओघ सुरु आहे तो मला स्तिमित करून टाकणारा आहे. किंबहुना त्यांच्या संपूर्ण कविता वाचायचे म्हटले तरी आपले वाचन तसेच फास्ट हवे! या कवितांचे विषय विविध तर आहेतच, पण त्यांचे मन इतके संवेदनशील आहे की त्यातून उगम पावलेल्या आत्मानुभूतीच्या तीव्र आवेगातूनच त्यांच्या कविता उत्स्फूर्तपणे जन्मतात असे जाणवते. आपल्याला असलेल्या दृष्टी लाभामुळे आपले मन बऱ्याच ठिकाणी भरकटत असते, मात्र या दिव्यांग व्यक्तीचे मन भावानुभूतीत केंद्रित असते असे मला वाटते, म्हणूनच हा कवितांचा जलौघ सतत त्यांच्या दिव्यांग लेखणीतून प्रसवत असावा!

मंडळी त्यांच्या भेटीदरम्यान अनौपचारिक अन खेळीमेळीचे कौटुंबिक वातावरण अति लोभस होते. त्यांची काळजी घेणारा मुलगा, गोडगोजिरी नात, अन सर्वार्थाने त्यांची ‘पूर्णांगिनी’ शोभेल अशी सहचारिणी रेखा (त्यांची पूर्वाश्रमीची मामेबहीण) हिच्याविषयी मनात इतका आदर निर्माण झाला की, तो शब्दात मांडू शकत नाही. सौ रेखा ही काशिनाथ सरांची भाग्यरेखा म्हणून शोभत होती. रुचकर उपहारासोबत काशिनाथ सरांकडून त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीची माहिती देणे आणि जाणून घेणे सुरु होते. त्यांचा घरातील वावर आणि संवाद साधण्याचे कौशल्य बघून आणि ऐकून कुठेही भास होत नव्हता की त्यांना दिव्य चक्षूच मार्गदर्शन करीत आहेत. त्यातच मी या महान कवीला नि:संकोचपणे एक कविता ऐकवण्याची विनंती केली. कसलेच आढेवेढे न घेता त्यांनी माझ्या विनंतीला लगेच मान्य करीत एक कविता ऐकवली. त्यासाठी ब्रेल लिपीच्या त्यांच्या संग्रहातून लगोलग स्वतः कविता शोधून, त्यांनी तालासुरात आणि भावपूर्ण स्वरात स्वतःची कविता ऐकवली. मंडळी त्यांच्या कविता अशाच गेय आहेत! महाराष्ट्रातील कैक व्यक्तींनी त्या कवितांना आवाज दिलाय. यू ट्यूब वर त्या उपलब्ध आहेत. सदर कविता होती ‘चैतन्य चक्षू’. अत्यंत प्रेरणादायी अशी ही कविता, तो अनुभव विडिओत रेकॉर्ड करून जपून ठेवलाय. या लेखासोबत सदर व्हिडिओची यू ट्यूब वरील लिंक शेअर करीत आहे. स्वतःचे जीवन समृद्ध असलेल्या या विलक्षण कवीचे कौटुंबिक जीवन देखील सुखमय आहे. मुले आयुष्यात स्थिरस्थावर झालेली, पत्नीची अखंड प्रेमपूर्ण साथ, हे सर्व मला या भेटीत अनुभवास येत होते या प्रेमळ कुटुंबासोबत फोटो काढणे माझ्यासाठी गौरवाची बाब होती अन आठवणींचा खजिना देखील!

प्रसिद्ध लेखक विश्वास देशपांडे लिखित रामायण आणि महर्षी वाल्मिकी यांचे मी हिंदी आणि इंग्रजीत केलेले अनुवाद त्यांना भेट दिले तेव्हा ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांनी मोठया अगत्याने मला भेट दिले. या भेटीतून मी किती अन कशी ऊर्जा घेतली याचा अनुभव शब्दातीत आहे. आयुष्यातील कैक वर्षे मागे गेल्याचा फील आला. जराजराश्या दुःखाने खचून जाणाऱ्या स्वतःच्या जीवनातील क्षण आठवून मनात अपराध बोध देखील जागृत झाला. या उलट दुःखाचे किंवा आपल्यातील न्यूनाचे भांडवल न करता सुखाने जगणाऱ्या या आनंदयात्री व्यक्तीला माझे या जागतिक अपंग दिनी कोटी कोटी प्रणाम! काशिनाथ सरांना अशीच अक्षय ऊर्जा मिळत राहो आणि त्यातून या सरस्वतीपुत्राच्या आधीच पाच कवितासंग्रहांनी समृद्ध असलेल्या साहित्यिक खजिन्यात दर दिवशी नवनवीन माणिक मोत्यांची भर पडो ही आजच्या सुदिनी ईश्वरचरणी प्रार्थना!   

धन्यवाद!🙏🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments