सुश्री प्रज्ञा मिरासदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ… भाग-7 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने मी प्रस्तावनेसह एकूण सात भागांच्या पुस्तकांवर लिहित गेले. भागवत कथा ही कोटी सूर्याच्या तेजाएवढी आहे. मी त्यापुढे फक्त काजवा आहे. तरीही मी त्यावर लिहिण्याचे धाडस केले आहे. वाचकांनी ते गोड मानले असेल अशी अपेक्षा करते. आजच्या सातव्या दिवसाच्या पुस्तकावर लिहिताना मला खूप आनंद होतो आहे. या ज्ञानसागरातील एक बिंदू तरी मला वेचता आला, तो तुम्हासारख्या सुजाण वाचकांसमोर ठेवता आला. याचा तो आनंद आहे. यात काही संशोधन, पांडित्य प्रदर्शन अजिबातच अभिप्रेत नाही. संस्कृत भाषेचे थोडे फार ज्ञानही मला इथे उपयोगी पडले आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीस लेखकाने यानंतरच्या समाप्ती विषयी सांगितले आहे. ते असे– की सात दिवस सात पुस्तकांचे वाचन वा श्रवण करावे. रोजच शेवटी आरती करावी. त्यासाठी या भागाच्या शेवटच्या पानांवर लेखकाने संस्कृत व प्राकृत भाषेत भागवताची आरती दिली आहे. आठव्या दिवशी सामुदायिक रीत्या अठरा अध्याय गीता व विष्णुसहस्त्रनामाचे पठण करावे. महाप्रसाद करून हा सप्ताह संपवावा. असे लेखकाने स्पष्ट केले आहे.

या पुस्तकाची सुरुवात अकराव्या स्कंधाने होते. हा श्रीकृष्ण चरित्राचा उत्तरार्ध आहे. शुकाचार्य परीक्षिताला यादवांच्या विनाशाची कारणे सांगतात. प्रथम नारद व वसुदेव यांची भेट झाली. वसुदेवाला नारदांनी भागवत धर्माचे महत्त्व सांगितले आहे. भगवद् भक्तांचा श्रेष्ठ धर्म म्हणजे,

कायेन वाचा मनसेंन्द्रियैर्वा

बुद्ध्यात्मना वानुसृत् स्वभावात् |

करोति यद्यद् सकलं तदस्मै

नारायणेति समर्पयेत् तत् ||

असे नारदांनी सांगितले आहे. सर्व प्राणिमात्रात परमेश्वर आणि आपल्या आत्म्यात सर्व प्राणिमात्र आहेत. असे जो पाहतो तो खरा सर्वश्रेष्ठ भगवद्भक्त! असे भगवद् भक्ताचे लक्षण येथे दिले आहे.

भागवताचा हा कथा भाग म्हणजे केवळ गोष्टीरूप नाही तर येथे केवळ जीवनाचे तत्त्वज्ञानच महर्षी व्यासांनी सांगितले आहे. जीव, शरीर हेच आत्मा असे समजतो. कर्माची फळे भोगतो. हेही विशद केले आहे. मुनींनी सृष्टीच्या अंताची प्रक्रिया सांगितली आहे. शंभर वर्षे सतत अनावृष्टी होईल. नंतर सांवर्तक नावाचे मेघ शंभर वर्षे मुसळधार वर्षाव करतील. मग प्रलय होईल. पृथ्वीवरील सुखे लगेच नष्ट होणारी आहेत. भागवताच्या अभ्यासाने जीव तरुन जाऊ शकतो, इत्यादी तत्त्वज्ञान सांगितले आहे. शुकाचार्य सांगतात की ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो, इंद्रिये हालचाल करतात, ती शक्ती म्हणजे परमात्मा !! चराचर सृष्टीतील भगवंताची पूजा कशी करावी हे पुढे सविस्तर सांगितले आहे.

यानंतर विष्णूंनी जे चोवीस अवतार घेतले त्यांचे थोडक्यात वर्णन आले आहे. पुढे चार युगातील पूजा पद्धती कशा कशा होत्या,त्या त्या देवतांचे वर्णन केले आहे. लाभाच्या दृष्टीने कलियुग श्रेष्ठ आहे. कारण केवळ भगवंताचे नामस्मरण, कीर्तन, श्रवण यानेच या युगात मोक्ष मिळतो. असे लेखक म्हणतात.

यानंतर ब्रह्मदेवासह सर्व देव ऋषीमुनी द्वारकेत येऊन कृष्णाला भेटतात. ब्रह्मदेव श्रीकृष्णाला परत वैकुंठाला यावे अशी प्रार्थना करतात. तेव्हा यादव कुलाचा विनाश झाल्यावर मगच मी वैकुंठाला येईन असे श्रीकृष्ण म्हणतात. उद्धव मात्र श्रीकृष्णाच्या सह वैकुंठास जाण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा कृष्ण उद्धवाला उपदेश करतात. हा उपदेश म्हणजे सुद्धा फक्त जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे. श्रीकृष्ण त्यासाठी उद्धवाला अवधूत या विरक्त, आत्मानंदात मग्न असणाऱ्या तरुणाची कथा सांगतात. तो विरक्त का असतो? याचे उत्तर म्हणजे “अवधूत गीता” आहे. या अवधूतानेच हा सर्व उपदेश केला आहे, असा वृत्तांत सांगून श्रीकृष्णांनी उद्धवाला सुखदुःखाची अशाश्वतता कशी असते, हे सांगण्यासाठी अनेक उदाहरणे दिलेली आहेत. अनेक छोटे मोठे दाखले व गोष्टी या ठिकाणी आल्या आहेत. सत्संगतीचे महत्त्व, भक्ती व ध्यान यांचे महत्त्व, सर्व अष्टसिद्धींचे विवेचन करून भगवंत उद्धवाला — कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जी विभूतीची पवित्र स्थाने सांगितली– तीच स्थाने सांगतात. सर्व प्राणिमात्रातील आत्मा मीच आहे वगैरे वगैरे.

यानंतर चार वर्ण, चार आश्रम स्वीकारताना लोकांनी कसे वागावे, याचा उपदेश कृष्ण उद्धवाला करतात. ते कसे कठीण आहे हेही इथे सांगितले आहे. पुढे वैराग्य युक्त ज्ञान,भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग यांचे सविस्तर विवेचन श्रीकृष्ण करतात. पुढचे, शुद्ध काय, अशुद्ध काय याचे वर्णन तर आजच्या काळातही प्रत्येकाला उपयोगी पडणारे आहे.

अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोsपि वा |

य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यंतर:शुचि: ||

या मंत्राने कोणत्याही कर्माच्या कर्त्याची शुद्धी होते, असे श्रीकृष्ण सांगतात.

मूलतत्त्वे किती? प्रकृती- पुरुष यात भेद की अभेद? याविषयी उद्धवाच्या शंकेचे निरसन श्रीकृष्णाने केले आहे. उद्धवाने एक प्रश्न विचारला आहे की, विद्वानांनाही दुष्ट लोकांनी केलेले अपमान सहन होत नाहीत. मग सामान्यांना ते कसे शक्य होईल? यावर श्रीकृष्णाने उद्धवाला जो उपदेश केला, तो “भिक्षु गीता” म्हणून प्रसिद्ध आहे. “मी” ही भावनाच या सर्वाला कारणीभूत ठरते. यानंतर सांख्य तत्त्वज्ञान, सत्व, रज, तम या तीन वृत्ती यांचे वर्णन आले आहे. पुढे पुरूरवा व उर्वशीची छोटी कथा आली आहे. श्रीकृष्ण उद्धवाला कर्मयोग पूजा पद्धतीची माहिती देतात. ज्ञानयोग भक्तीयोग वगैरे सविस्तर सांगून श्रीकृष्ण उद्धवाला बद्रिकाश्रमात जाण्याची आज्ञा देतात. भागवत धर्माचे चिंतन केल्याने तू जीवन्मुक्त होशील असे सांगतात.

यानंतरचा कथा भाग– द्वारकेत काही उत्पात सुरू होतात. ही यादवांच्या विनाशाची चिन्हे असतात. यावर श्रीकृष्ण सर्व यादवांसह प्रभासक्षेत्री शंखोद्धार तीर्थाला जाण्याचा पर्याय शोधतात. तिथे मद्य पिऊन सर्व यादव आपापसात लढले व यादव कुळाचा विनाश झाला. बलरामही समुद्र काठावर योगधारणा करीत बसले व सदेह पृथ्वीतल सोडून गेले. श्रीकृष्णही एका पिंपळाच्या झाडाखाली डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून बसून राहिले. त्याचवेळी जरा नावाच्या शिकाऱ्याने हरीण समजून कृष्णाच्या पायावर अणकुचीदार बाण मारला. तो बाण जमिनीवर पडला. त्या भिल्लाने जवळ येऊन पाहिले तर त्याला चतुर्भुज श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्याला श्रीकृष्ण म्हणाले,” हे सारे माझ्या इच्छेनेच घडले आहे. मी आता तुला वैकुंठप्राप्ती देतो.” त्याच वेळी कृष्णाचा सारथी दारूक रथ घेऊन तिथे आला. त्याला सर्व हकीकत सांगण्यास कृष्णाने द्वारकेस धाडले. तो खिन्न मनाने द्वारकेस गेला. त्याने हस्तिनापुरासही हे वर्तमान कळविले. पुढचे वर्णन श्रीकृष्णाचे निजधामाला जाणे आणि द्वारका नगरी समुद्रात पूर्ण बुडणे याचे केलेले आहे. परमेश्वराच्या अवतार समाप्तीनंतर इथे अकरावा स्कंध समाप्त होतो.

बाराव्या स्कंधाच्या सुरुवातीला शुकाचार्य पृथ्वीवर पुढे कोणकोणत्या राजांनी राज्य केले, याची परीक्षिताला माहिती देतात. कलियुगात लोक कसे वागतील, जगतील याचे पूर्ण वर्णन, आजच्या काळात जे घडते आहे, तसेच तंतोतंत भागवतात केले आहे. पण त्यावर कलियुगातील दोषांवरचे उपायही सांगितले आहेत. प्रलय, युगे, कल्प यांचे वर्णन करताना शुकाचार्य सांगतात की, नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक व नित्य हे चार प्रलयाचे प्रकार आहेत. शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की, आपण मरणार! ही बुद्धी तू आता सोडून दे. कारण आत्मा अमर आहे.

परीक्षित राजाचा देह भस्मसात झाल्यावर त्याचा पुत्र जनमेजय सर्पयज्ञ करतो. ही कथा आली आहे. बृहस्पती त्याला उपदेश करतात. मग तो सर्पयज्ञ थांबवतो.सूत महर्षींनी शौनकांना ही कथा सांगितली. ते शौनकांना वेदविस्तार, विभागणी याविषयी विवेचन करतात. प्रथम शब्द ॐकाराविषयीची माहिती पुढे दिली आहे.

पुराणे म्हणजे काय? ती कोणती आहेत? याचे थोडक्यात वर्णन पुढे लेखकाने केले आहे. यानंतर मार्कंडेय ऋषींची कथा सांगितली आहे. त्यांना नरनारायणांनी वर दिला. त्यात त्यांनी प्रलयही अनुभवला. त्यांना नरनारायणांनी – तुम्ही कल्पांतापर्यंत अजरामर व्हाल, त्रिकालज्ञ व्हाल, पुराणांचे आचार्य व्हाल असा वर शंकरांनी प्रदान केला. पुढे सूर्याच्या सृष्टीचक्राचे वर्णन आले आहे. सनातन धर्म म्हणजे काय? हे पुढे शौनकांनी सूतांना सांगितले आहे. शिवाय पहिल्यापासून भागवतात कोणते विषय आले आहेत? त्या सर्व कथानकांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. थोडक्यात — भागवतमहिमा वर्णिलेला आहे. अठरा पुराणांची प्रत्येकी श्लोक संख्या किती? हे सांगितले आहे. अकरावा स्कंध हे भगवंताचे मन तर बारावा स्कंध हा भगवंताचा आत्मा आहे. असे लेखक म्हणतात.

यानंतर लेखकाने ब्रह्मदेव, नारद, वेदव्यास, शुकाचार्य यांना वंदन केले आहे.

सर्वात शेवटी परमात्म्याला वारंवार नमस्कार करून लेखकाने भगवंताची प्रार्थना केली आहे.

इथे बारावा स्कंध समाप्त होतो व सातव्या दिवसाचा कथा भाग संपतो.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर परब्रम्ह परमात्म्याचे समग्र दर्शन घडविले आहे.

भवे भवे यथा भक्ति: पादयोsस्तव जायते |

तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत: प्रभो ||१||

*

नामसंकीर्तनं यस्य सर्वपाप प्रशमनम् |

प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरीम् परम् ||२||

सर्वात शेवटी हे दोन श्लोक दोन वेळा म्हणून, सर्वांनी पोथीची पूजा करून, नैवेद्य आरती करावी व जयजयकार करावा असे लेखकाने सांगितले आहे. हा श्लोक म्हणजे भागवताचा उपसंहार आहे. संपूर्ण भागवत श्रवणाचा निष्कर्ष म्हणून, सर्व दुःखे दूर करून, निरंतर आनंद देणाऱ्या या भगवंत मूर्तीचे आपाद मस्तक ध्यान करून त्याच्या चरणारविंदाला नमस्कार करूया.

 || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

इथेच मी प्रस्तावनेसह लिहिलेले आठ भाग संपले. भागवत कथेवरील सात पुस्तकांचे वाचन, अभ्यास आणि तोडके मोडके का होईना, पण विवेचन करण्याचे बळ मला परमात्म्यानेच दिले. हे माझे महद्भाग्य आहे. यात जर काही चुकत असेल तर आपण मोठ्या मनाने क्षमा करावी.

 प्रज्ञा मिरासदार — पुणे

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments