डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

(निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो !!) — इथून पुढे 

आजचा तिसरा दिवस, बहात्तर तास उलटून गेलेले बाहेरचं जग पाहून. विजेची लाईन शाबूत असल्याने त्या उजेडात एकमेकांना पाहू तरी शकत होतो. पाण्याच्या बाटल्या, रेशनिंगचं धान्य संपत आलेले.  हेल्मेटमधे तांदूळ शिजवून गिळत असलेलो. काही ठिकाणी डोंगरातून पाणी ठिबकत असलेलं. तिथेही हेल्मेट उपडी ठेवलेली. ते काही वेळानं जुजबी भरत असे. सुकलेला गळा ओला करायला तेवढंसं पुरे. पण ..  पण हे असं किती दिवस? हा यक्षप्रश्न आ वासून उभा ठाकलेलाच. नुकतंच थोडंफार पोटात ढकलून आडवं पडणं झालं, डोळे पेंगुळत असलेले…. 

… तेवढ्यात सरसर आवाज आला. वाटलं जनावर वगैरे काही आलं की काय? आवाजाच्या रोखानं मोबाईलची बॅटरी रोखली तर काय सहा इंची पाईप बोगद्यात तोंड उघडत असलेला. त्यातून पाठोपाठ अनोळखी आवाज येत असलेला. ” कैसे हो सब लोग?” बोगद्यातील सर्वजण चित्कारलेच. “ ठीक है भैया, कैसे तो भी गुजारा कर रहै है. हमें यहां से निकालो जल्दी.”  आमचा आवाज ऐकून बाहेर एकच गलका झाला असावा. लगेच, “ डरो मत, हम कोशिश कर रहे हैं. जल्दही आप निकल पाओगे. धैर्य रखना, बौखनाग की कृपा से सब बाहर आओगे.” सर्वांना आठवलं, मागच्याच आठवड्यात तर बौखनागचं मंदिर पाडलं होतं. तोच कोपला असेल. सर्वांनी हात जोडून त्याचा धावा सुरू केला. त्या सहा इंची पाईपमधून पाण्याच्या बाटल्या यायला लागल्या. मग बिस्कीटांचे पुडे, ड्रायफ्रूटचे पॅकेट्स, फळं. चला, निदान शिदोरी वाढत असलेली पाहून सर्वांचे डोळे चमकले. त्या खाऊपेक्षाही बाहेरच्या जगाशी संपर्क होत असलेला पाहून हायसं वाटलं. त्यातून येणारा आवाज तर वॉकीटॉकीपेक्षाही स्पष्ट होता. 

नियमित खुराक मिळण्याची सोय तर झाली. गोळ्या औषधंही आली पाईपमधून. सगळ्यांचं मनोबल वाढावं म्हणून मनोचिकित्सक ही हजर पाईपच्या दुसऱ्या टोकाला. तितकंच बरं वाटलं. थोडंफार निर्धास्त होता आलं. कुणीतरी आपल्यासाठी धडपडतंय ही जाणीव सुखावहच. आणखीन दोन दिवसांनी तर घरच्यांचा आवाज पाईपमधून. कोळशाच्या खोलीत कोंडणारी आई  गलबलून हुंदका देत बोलत होती, 

“बबुआ कैसन बा?” कोळशाच्या खोलीत रमणारा बबुआ हमसून हमसून रडत बोलत होता, “ ठीक हूं मैय्या, फीकर मत करना, टेम से तू खाना खा लेना. ” सर्वांचेच डोळे पाणावले. 

दहाएक दिवसांनी गरम गरम जेवण मिळू लागले. छोले, पराठे अन् खिचडी.  शीख बांधवांनी लंगर चालू केलंय वाटतं. वाहे गुरू त्यांचं भलं करो. रोज चिणल्या गेलेल्या भिंतीतून मोठाले पाईप टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे हे बातम्यांसारखं सांगितलं जायचं. मधेच अडथळे यायचे. काम थांबवावं लागायचं. प्रगती खुंटायची. काहीच कळायचं नाही. बाहेर तरी निघू की नाही ही साशंकता. मग इतके दिवस नेहेमी सोबतीला असणारे, एकमेकांचेच चेहरे पाहून कंटाळलेलो, एकमेकांवरच चिडचिड करू लागलो. काहींनी तर त्रागाही केला. इंजिनीयर साहेबांनी मग वेगवेगळे खेळ खेळण्याची टूम काढली. काहींचे मोबाईल अजूनही चालू, त्यांनी मोबाईलवरच लुडो खेळायला सुरुवात केली. इंजिनीयर साहेबांनी मग मोजकेच चार्जर मागवून घेतले. चार्ज केल्यावर फोन तर लागत नव्हते, पण त्यातील खेळ व जुने मेसेजेस वाचून, दिवस वा रात्र ते काहीच कळत नव्हतं, तरीही पण ढकलत होतो.  सगळेच्या सगळे काही मोबाईल वेडे नव्हते.  मग काहींनी दगडावर रेघोट्या ओढून चल्लस खेळायला सुरुवात केली.  काही दगडी चेंडूने क्रिकेट खेळायला लागले, बोगद्याच्या भिंतीवरच स्टम्प्स उगवले. एकाने चार पाच गोल दगड  एका पाठोपाठ वर फेकत जगलर्स स्कील ही दाखवले. काहींनी गाणी म्हणायला सुरुवात केली. त्यात बंगाल्यांनी तर कहरच केला. अगोदर ऐकायला गोड वाटलं, पण किती गावं? सारखं तेच तेच कानी यायला लागलं, आमार शोनार बांग्ला आणि बाऊल गीति, काय काय ते. सगळ्यांचे कान किटले.  फिल्मी गाण्यांची अंताक्षरीही काही काळ चालली मग त्याचाही वीट आला.  

कितीही मन रमवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही मोकळ्या वातावरणाची आस प्रत्येकाच्या मनात. जसजसा वेळ सरकत होता तसे बोगद्याच्या भिंती खायला उठतात की काय? वाटायचे. एकमेकांना धीर देणं तर चालूच होतं, पण बोगद्यामधला मुक्काम लांबतच चाललेला. घरच्या माणसांची ओढही बळावत चाललेली.  कधी त्यांची गळाभेट घेऊ असं होऊन गेलेलं. उद्या सकाळपर्यंत बाहेर निघणार, अगदी चार पाच तासच उरलेत म्हणता म्हणता विघ्न समोर ठाकल्याचंही कानी यायचं. मशिन बिघडलं, बंद पडलं. अडकून पडलं. दोन दिवस अधिक लागतील.  ऐकून ऐकून कान विटले. देवाचा धावा तर सारखा चालूच होता. नवसाचंही बोलून झालं होतं. मधेच दिवाळी होऊन गेल्याचं कळलं. बाहेरच्या जगात सगळ्यांसाठी दिवाळी होती. बोगद्यात व मनात तर अंधारच अंधार दाटलेला. 

थोडक्यावर अडून पडलंय. नवीन खुदाई सुरू झालीय. काही हाताचेच अंतर बाकी आता. इंजिनीयर साहेबही तांत्रिक भाषेत बोलत होते. बाकी सगळे कधी शिळा उघडते, सीम सीम खुलजाच्या धर्तीवर याची प्राण कंठाशी आणून वाट पहात होते. काहीही करत नसले तरी सगळे दमूनभागून पेंगुळलेल्या डोळ्यांनी निपचित पडले होते. तेवढ्यात धपकन् काही पडल्याचा आवाज आला, पाठोपाठ खणन् खणन्  व लगेच कटरचा चिरपरिचित आवाज येऊ लागला.  तो आवाज पहिल्यांदाच मंजुळ नादमय वाटला. सर्वांचे डोळे बंद झालेल्या बोगद्याच्या मुखावर. त्याला चिरे पडू लागले. मोठमोठाले घाव हातोड्याचे व मग भगदाडच पडले एकदम. सरसर पाईप सरकत आत आला.  त्यातून नवा चेहरा व नवा उजेडही आत आला. सगळ्यांनी आरोळी दिली, जय हो !! तो आवाज बोगदाभर घुमला. धुळीने माखलेल्या चेहेऱ्यांवर आनंद पसरला. कुणी नाचू लागले, कुणाला अश्रू आवरेना. बौखनाग बाबांचा जयघोष केला गेला. आता खरी दिवाळी साजरी होईल याची खात्री पटली.  शेवटी एकदाचे गिळू पाहणाऱ्या बोगद्याच्या कराल जबड्यातून बाहेर येत मोकळा श्वास घेतला. हुश्श ! एक दुःस्वप्न विरलं !! 

– समाप्त – 

© डॉ. जयंत गुजराती

२९/११/२०२३

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments