सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ वागेश्वरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
(लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा)
☆
तुझ्या सारखा तूच आहे वरूणा , कुणाशीच तुलना तुझी रे नसे
जुळावे तरीही जगाचे तुझ्याशी पिता पुत्र नाते कुटुंबी जसे
☆
जगाच्या सुखाला मिळावा भरोसा म्हणोनी प्रभूने तुला धाडले
मिळाला उसासा मिळाला दिलासा , फिटे पारणे नेत्र भारावले
गुलाबी शराबी नशेने चढावे जमीनीत अंकूर वाढे तसे
जुळावे तरीही जगाचे तुझ्याशी पिता पुत्र नाते कुटुंबी जसे
☆
किती वाट पाहू तुझ्या स्वागताला तयारी कशी बघ असे जाहली
पुन्हा तू नव्याने जगावे उरावे निमंत्रण राशीच उंचावली
हिवाळा उन्हाळा तसा पावसाळा ऋतूचक्र नेमात चाले असे
जुळावे तरीही जगाचे तुझ्याशी पिता पुत्र नाते कुटुंबी जसे
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈