सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

प्रेम रंगे, ऋतू संगे

कवी: सुहास रघुनाथ पंडित

प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन आणि वितरण

प्रथम आवृत्ती:१ मे २०२३

श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रेम रंगे ऋतूसंगे हा नुकताच प्रकाशित झाला. या संग्रहातल्या कविता वाचताना प्रेम या सुंदर भावनेचा एक विस्तृत, नैसर्गिक आणि शिवाय अतिशय सुंदर शब्दात व्यक्त झालेला भाव अनुभवायला मिळाला. 

श्री सुहास रघुनाथ पंडित 

पुस्तक हातात घेतल्यानंतर माझं पहिलं लक्ष गेलं ते अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण अशा मुखपृष्ठावर.  हिरव्या धरणीच्या पार्श्वभूमीवर सुंदर बहरलेला लाल गुलमोहर आणि एक मानवी हात ज्यावरचे तर्जनी आणि अंगठा यातलं अंतर हे फारच बोलकं आहे.  कुठलाही चित्रकार जेव्हा समोरच्या दृश्याचं चित्र कागदावर रेखाटतो तेव्हा रेखाटण्यापूर्वी तर्जनी आणि अंगठा उघडून त्या अंतरातून एक माप घेत असतो. ते समोरचं  दृश्य त्याला त्या तेवढ्या स्केलमध्ये चितारायचं असतं.  कवी हा ही चित्रकारच असतो नाही का?  फक्त त्याच्यासाठी रंग, रेषा हे शब्दांच्या रूपात असतात आणि जे जे अवतीभवती घडत असते, दिसत असते ते सारे तो मनाच्या एका स्केलमध्ये टिपत असतो.  मुखपृष्ठावरचा हात आणि ही दोन बोटे अशी रूपकात्मक आहेत.  अवाढव्य पसरलेल्या निसर्गाच्या नजराण्याला मनाच्या कागदावर टिपणारं माप.  खरोखरच सुंदर, अर्थपूर्ण, बोलकं असं हे मुखपृष्ठ!

या काव्यसंग्रहाला लाभलेली डॉक्टर विष्णू वासमकर यांची प्रस्तावनाही अतिशय सुंदर, काव्याभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय आहे.  प्रस्तावनेत काव्यशास्त्र, त्याची सहा प्रयोजने, काव्याचे लक्षण, स्वरूप, तसेच काव्यशरीर या संकल्पनेत शब्द, अर्थ, रसोत्पत्ती, अलंकार, वक्रोक्ती, व्युत्पत्ती यांचे महत्त्वाचे स्थान याविषयीचे मुद्दे सुलभपणे उलगडले आहेत.  काव्यशास्त्रातील अलंकार, रस ,वृत्त ही काव्य कारणे किती महत्त्वाची आहेत हे या प्रस्तावनेत सूचकपणे सांगितलेले आहे.  सुरुवातीलाच ही प्रस्तावना वाचताना पुढच्या काव्य वाचनाला मग एक दिशा मिळते.  चांगल्या काव्याची ओळख होण्यास मदत होते. आणि जेव्हा मी पंडितांच्या  प्रेमरंगे ऋतुसंगे काव्यसंग्रहातील एकेक कविता वाचत गेले तेव्हा कवितेतला अभिजात दर्जा, त्यातले अलंकार, रस, वृत्त, छंद त्याचबरोबर प्रतिभा आणि अभ्यास या काव्य कारणांचा ही नितांत सुंदर असा अनुभव आला.  अत्यंत परिपक्व अशा या कविता आहेत.  उच्च कोटीची शब्दकळा यात आहे. काव्य म्हणजे नेमकं काय याचाच या कविता वाचताना खरा अर्थ कळतो.

या संग्रहात एकूण ६६ कविता आहेत. या सर्व कवितांमध्ये प्रेम हा स्थायीभाव आहे.  प्रेमाचे अनंत रंग यातून उलगडलेले आहेत. पंडितांनी त्यांच्या मनोगतात म्हटले आहे की ‘ प्रेम, निसर्ग आणि माणूस यांना एकमेकापासून कसे वगळता येईल?’ आणि हे किती खरे आहे याची जाणीव त्यांच्या या निसर्ग कविता वाचताना होते.

“प्रेमरंगे ऋतुसंगे”  या शीर्षकातच निसर्गाच्या बदलणाऱ्या ऋतुंसोबत उलगडणार्‍या प्रेम भावनेचे अनेक सूक्ष्म पदर दडलेले आहेत. सर्वच कवितांमध्ये गीतात्मकता, भावात्मकता, रसात्मकता आहे.  पंडितांची प्रतिभा, प्रज्ञा, अभ्यास वाचकाला थक्क करून सोडतो.  कवितांना दिलेली सुंदर आणि चपखल शीर्षके हे आणखी एक वैशिष्ट्य.

 प्रत्येक कवितेत प्रेमाचा मंत्र मिळतो, संदेश मिळतो.

       पाण्यामधली अवखळ झुळझुळ

       करात बिलवर करती खळखळ …

 

      शब्द होतील पक्षी आणि गातील गाणी तव दारी..

      लाटेवरती लाटा झेलत तूही आणिक मीही आलो

 

     खूप जाहले खपणे आता

     जपणे आता परस्परांना 

     खूप जाहला प्रवास आता

     गाठू विश्रांतीचा पार जुना.

…  अशा गेयता असलेल्या अनेक सुरेख काव्यपंक्ती पुन्हा पुन्हा वाचाव्यात असेच वाटते.

  उष्ण रश्मीचे सडे,

  कुरळे कुरळे मेघ .

  गर्भिताच्या गुहेतून अर्थवाही काजवे… यासारख्या शब्दरचना किती संपन्न, समृद्ध आहेत तेही जाणवते.

या काव्यसंग्रहातल्या ६६ही  कवितांवर खूप काही लिहिण्यासारखे आहे.  एकेक कवितेचे रसग्रहण करावे इतक्या त्या विलोभनीय आहेत, ताकदीच्या आहेत. मात्र “रात्र काळी संपली…” या एकाच कवितेबद्दल मी जरा सविस्तरपणे लिहायचं ठरवलेलं आहे.  अतिशय सुंदर, मला आवडलेली ही कविता आहे.  पण लिहिण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की कवी, कविता, वाचक यांचं नातं जुळत असताना कवीच्या मनातले अर्थ आणि वाचकाच्या मनात उलगडलेले अर्थ भिन्न असू शकतात.  विचारांची फारकत होऊ शकते. 

“रात्रकाळी संपली”  हे गीतात्मक काव्य आहे. 

       आसमंती सूर येता नूर सारा पालटे

       रात्र काळी संपली किरण किरण सांगते ।।धृ 

 

      चांदण्याचे नुपूर लेऊन निघून गेली निशा 

      केशराचे वस्त्र ल्यायलेली  अंबरी आली उषा

      पाठशिवणीचा खेळ तयाचा वसुधा पाहते 

      रात्र काळी संपली..

 

      हिरवे दवही तांबूस झाले स्पर्शून जाता रविकिरणे 

      शेपूट हलवीत सुरू जाहले मुक्या जीवांचे बागडणे

      घरट्यामधुनी उडून जाता पहा पाखरू चिवचिवते

     रात्र काळी संपली…

 

     पूर्व दिशेला विझून गेल्या नक्षत्रांच्या ज्योती

     रांगोळीपरी फुले उमलली झाडां-वेलींवरती 

     तबकासम हे गगन सजले हळद कुंकवाने

     रात्र काळी संपली…

 

     गिरणीमधुनी,  रस्त्यामधुनी चक्र गरगरा फिरे

     जागी झाली गुरे वासरे जागी झाली घरे

     क्षणाक्षणाने काळाचेही पाऊल पुढे पडते

     रात्र काळी संपली किरण किरण सांगते …

तसे हे वर्णनात्मक गीत आहे.  “घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला”  या भूपाळीची आठवण ही कविता वाचताना होते. 

.. रात्रकाळी संपलेली आहे आणि सुंदर सकाळ उगवत आहे हा या गीतामधला एक आकृतीबंध.  अतिशय सुंदर, चपखल उपमा आणि उत्प्रेक्षांनी परिपूर्ण असलेलं हे काव्य.

.. चांदण्यांचे नपुर घातलेली निशा, केशराचे वस्त्र ल्यायलेली उषा आणि उषा निशाचा पाठशिवणीचा खेळ पाहणारी वसुंधरा.. पहिल्या कडव्यातले  हे वर्णन म्हणजे शब्दरूपी कुंचल्याने रेखाटलेलं  सकाळचे वास्तविक चित्र.

दुसऱ्या कडव्यातले रविकिरणाच्या स्पर्शाने तांबूस झालेले दव, बागडणारे  मुके प्राणी आणि घरट्यातून उडून जाणारे पाखरू…हे वर्णन पृथ्वीवरची जागी होणारी पहाट अलगद उतरवते.

.. पूर्व दिशा उजळते आणि नक्षत्रांच्या ज्योती विझत आहेत, झाडांवर वेलींवर फुलांची रांगोळी सजली आहे आणि गगन कसे तर तबकासारखे आणि रविकिरणांच्या तांबूस पिवळ्या प्रकाशास हळद-कुंकवाची उपमा देऊन जणू हळद कुंकवाचे हे आकाशरुपी तबक उषेचं स्वागत करत आहे.  या तिसऱ्या कडव्यातलं हे कल्पना दृश्य कसं सजीवपणे शब्दांतून आकारले आहे. या संपूर्ण गीतात हळूहळू उलगडणारी ही सकाळ अतिशय मनभावन आहे.

शेवटच्या आणि चौथ्या कडव्यात जागं झालेलं मानवी जीवन, घरे दारे,गुरे, वासरे यांचं वाहतं वर्णन वास्तव घेऊन उतरतं. आणि शेवटच्या दोन ओळी…

..  क्षणाक्षणांनी काळाचेही पाऊल पुढती पडते

    रात्र काळी संपली किरण सांगते…

या ओळी वाचल्यानंतर या संपूर्ण वर्णनात्मक गीतातला गर्भित आत्माच उघडतो.  संपूर्ण गीताला वेगळ्याच अर्थाची कलाटणी मिळते.  मग मला हे गीत रूपकात्मक वाटले. रात्र काळी संपली हे शब्द आश्वासक  भासले. निसर्गचक्रामध्ये जे अव्याहत, नित्यनेमे घडत असते त्याचा मानवी जीवनाशी, भावविश्वाशी संदर्भ असतो. रोजच येणाऱ्या आणि जाणाऱ्या उषा आणि निशा या माणसाच्या जीवनातल्या सुखदुःखाशी रूपक साधतात.  काळ म्हणजे आलेली परिस्थिती आणि किरण म्हणजे मार्गदर्शक गुरु किंवा आशावाद.  काळाचे पाऊल पुढती पडते म्हणजेच आजची परिस्थिती उद्या नसणार आहे हे सत्य. स्थित्यंतर हे नैसर्गिकच आहे.  त्यामुळे संकटाची, दुःखाची, नैराश्याची काळी रात्र संपून केशराची वस्त्रे लेऊन सकाळ होणार आहे. ही केशरी वस्त्रे म्हणजे आनंदाची प्रतीके. नवा दिवस,नवी स्वप्ने. तमाकडून प्रकाशाकडे होणारी वाटचाल.

ज्यावेळी या अर्थाने मी हे गीतात्मक काव्य वाचले तेव्हा मला शब्दाशब्दामध्ये दडलेलं एक सकारात्मक तत्व सापडलं आणि मग हे गीत केवळ वर्णनात्मक न राहता जीवनाला खूप मोठा रचनात्मक संदेश देणारं ठरतं.  एक लक्षात आलं की या सर्वच सहासष्ट कवितांमध्ये निसर्ग आणि मानवाचं एक अतूट भावात्मक नातं शब्दांनी रंगवलेलं आहे.

खरोखरच पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा या कविता देव्हाऱ्यातली एखादी पोथी वाचताना जी प्रसन्नता आणि ऊर्जा मिळते तद्वतच या कविता वाचताना मन प्रफुल्लित होते.  वाचकांनी या काव्यवाचनाचा जरूर आनंद घ्यावा हे मी आवर्जून सांगते.

सुहास पंडितांनी त्यांच्या अर्पण पत्रिकेत म्हटलं आहे,

       रसिका तुझ्याचसाठी हे शब्द वेचले मी 

       रसिका तुझ्याचसाठी हे गीत गुंफले मी..

कवी आणि वाचकाचं नातं हे किती महत्त्वाचं असतं याची जाण त्यांच्या या शब्दातून व्यक्त होते.  या सुंदर काव्यरचनांबद्दल मी  श्री सुहास पंडित यांचे मनापासून अभिनंदन आणि वाचकांना दिलेल्या या सुंदर भेटीबद्दल धन्यवाद देऊन  त्यांच्या या सुरेल  काव्यप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते.

परिचयकर्त्या : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments