सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ पावसाची कविता – ‘भिरभिरणारे मन…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
((वृत्त~ शुभगंगा ८+८+६)
कुठून आले वादळ वारे कळले का
भिरभिरणारे मन हे माझे भिजले का
किती प्रतीक्षा वसुंधरेची थकली ती
निष्ठूर नको होऊस असा रडले का
एका वेळी अनेक शंका अशा कशा
आभाळातच काळे घन हे भरले का
कधी शांतता तुफान केव्हा काय असे
गहिवर जाता ऊन कधी ते पडले का
संततधारा कधी बरसल्या भूवरती
तशीच वर्षा मनात माझ्या झरते का
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
०९/०७/२०२३
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈