डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 62 –   स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान –  लेखांक तीन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल?त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ चिंतन करत होते.

प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. पण या दरिद्री देशात पैसे कुठून मिळणार? त्यांना आलेल्या अनुभवा नुसार धनवान मंडळी उदार नव्हती.

आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी. आता उरलेले आयुष्य भारतातल्या दीन दलितांच्या सेवेसाठी घालवायचे असा संकल्प स्वामीजींनी केला आणि शिलाखंडावरून ते परतले. समाजाला जाग आणण्याचा आणि आपल्या देशातील बांधवांचे पुनरुत्थान घडवून आणण्याचा संकल्प त्यांनी केला. त्याच बरोबर स्वतविषयी अहंकार असणार्‍या पाश्चिमात्यांना आपल्या पौर्वात्त्यांच्या अनुभवापुढे नम्र होण्यास स्वामीजी प्रवृत्त करणार होते. आणि त्यासाठी भारताचा अध्यात्मिक संदेश जगभर पोहोचविणार होते. कारण सर्व मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्ये आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली आहेत. हे त्यांनी अनुभावातून आणि वाचनातून जाणून घेतलं होतं. 

स्वामीजींनी ध्यान केलं होतं जगन्मातेचं आणि चिंतन केलं होतं भारतमातेचं. तीन दिवस तीन रात्रीच्या चिंतनातून प्रश्नाचं उत्तर स्वामीजींना मिळालं होतं. २५ ,२६, २७ डिसेंबर १८९२ ला स्वामीजींच्या वैचारिक आंदोलनाने सिद्ध झालेल्या याच शिलाखंडावर भव्य असे विवेकानंद शिलास्मारक उभे आहे.

कन्याकुमारीचे विवेकानंद शिला स्मारक हा धर्म कार्याच्या विकासाचा पहिला टप्पा होता. त्यानंतर विवेकानंद केंद्र राष्ट्रीय पातळीवर सुरू झाले हा दूसरा टप्पा तर विवेकानंद केंद्र इंटरनॅशनल  ही पुढची संकल्पना . या पातळीवर स्वामीजींच्या स्वप्नातले विश्वव्यापी काम सुरू आहे.

स्वामीजींचे जीवन पाहता त्यांचे चरित्र आणि त्यांनी दिलेला संदेश खूप सुसंगत आहेत. ते हिंदुत्वाचे सर्वोत्कृष्ट प्रतींनिधी तर होतेच पण, ते सर्वाधिक थोर आणि जाज्वल्य असे आंतरराष्ट्रीयवादी ,आधुनिक भारतीय सत्पुरुष होते .  

स्वामीजी कन्याकुमारीला पोहोचले तेंव्हा ते एक संन्यासी होते. पण या तीन दिवसांनंतर परिवर्तन होऊन तो, राष्ट्र उभे करणारा श्रेष्ठ नेता,जगाला त्याग आणि सेवेचा नवा संदेश देणारा श्रेष्ठ गुरु, एक खरा देशभक्त म्हणून जगन्मान्य झाला. स्वामीजींच्या स्वप्नातल्या कार्ययोजनेला प्रत्यक्ष स्वरूप देणारं हे  वैचारिक आंदोलन केंद्रच आहे. आज ही श्रीपाद शिला विवेकानंद शिला म्हणून सर्वदूर परिचित आहे. या स्मारकाचे प्रेरणास्थान एकनाथजी रानडे आहेत. १९६३ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांची आठवण म्हणून हे शिला स्मारक करण्याचा निर्णय घेतला. अनेक अडचणी आल्या.पण हे स्मारक आज या इतिहासाची साक्ष तर देतच आहे आणि कामासाठी प्रेरणा व विचार पण देतंय.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments