सौ. विद्या पराडकर
कवितेचा उत्सव
☆ संक्रांत ☆ सौ. विद्या पराडकर ☆
नववर्षाच्या प्रारंभी आली संक्रांत राणी
आली बघा चंद्रकला लेवूनी
शुभ्र हलव्याचा करूनी साज
लाजवी मौक्तिक माळेला आज
तिळाची स्निग्धता गुळाची गोडी
समरसतेने सजली पहा कशी जोडी
भवसागरातील जणू ही होडी
कुशलतेने पैलतीरा नेतो परमेश नावाडी
प्रेमाचे तीळ घेऊनी
कर्तव्याचा गुळ घालूनी
संयमाचे जायफळ उगाळूनी
शुध्दत्वाची विलायची टाकूनी
सुरुची युक्त लाडू वळू या
विशाल दृष्टीचे दान देवू या
एकतेच्या धाग्यात हास्य फुलवू या
संक्रांतीचा नवा अर्थ समजुन या
संक्रांत साजरी करू या
संक्रांत साजरी करू या
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈