श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अस्तित्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“.. अगं तारामती !चल चल लवकर पाय उचलत राहा… अजून तालूक्याचं गाव आलं नाही!.. पाच सहा मैलाची रपेट करायची आपल्याला… आपल्या कनवाळू  मायबाप सरकारने यंदाच्या दिवाळी साठी दुर्बल कुटुंबांना दिवाळीसामानाचं पॅकेट देणारं आहेत फक्त शंभर रुपयात….त्या स्वस्त शिधावाटप दुकानातून… आपल्याला तिथं जाऊन नंबर लावला पाहिजे तरच ते आपल्याला मिळेल…त्यासाठी आधी बॅंकेत जाऊन हया महिन्याची स्वातंत्र्य सेनानी पेंशन योजनेतील जमा झालेली पेंशन काढायला हवी… तुला एक खादीची साडी आणि मला जमला तर खादीचा सदरा घ्यायला हवा…गेली दोन अडीच वर्षे कोरोना मुळे फाटकेच कपडे तसेच वापरले गेले आणि आता तेही घालण्याच्या उपयोगी नाही ठरले… यावर्षीची दिवाळी आपली खास जोरदार दिवाळी होणार आहे बघ… एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो तेल, एक किलो डाळ, अंगाचा साबण, सुवासिक तेलाची बाटली हे सगळं त्या पॅकेट मधे असणार आहे… ते आपल्याला मिळाले कि दिवाळीचा सणाचा आनंद होणार आहे… अगं चल चल लवकर… तिकडे बॅकेत किती गर्दी असते तुला ठाऊक नाही का? . मग पैसे मिळाले की त्या रेशन दुकानावर किती गर्दी उसळली असेल काही सांगता येत नाही… “

…बॅकेत पोहचल्यावर त्यांना सांगण्यात आलं…स्वातंत्र्य सेनानीं ची पेंशन मध्ये वाढ द्यायची का नाही यावर शासनाचा निर्णय प्रलंबित असल्याने निर्णय झाल्यावरच पेंशन खात्यावर जमा होईल… तेव्हा पेंशन धारकानी बॅकेत वारंवार चौकशी करू नये… खादीची साडी नि सदरा, दिवाळीचं पॅकेट दुकानात वाट बघत राहिलं… अन पेपरला बातमी आली… सरकारी दिवाळी पॅकेज कडे लाभार्थींनी पाठ फिरवली त्यामुळे सगळी पॅकेटची खुल्या बाजारात  विक्री करण्यास अनुमती दिली आहे…

… रेशन दुकानाच्या पायरीवर ते दोघे थकून भागून बसले.. पिशवीतून आणलेल्या पाण्याच्या बाटलीतले चार घोट पाणी पिऊन तरतरीत झाले…आजही स्वतःच्या अस्तित्व टिकविण्याच्या धावपळीत  त्यांना पंचाहत्तर वर्षापूर्वीचा स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या धावपळीचा भूतकाळ आठवला… तन,मन,धन वेचून देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी योगदान दिले होते… देश स्वतंत्र झाला पण…पण  स्वतंत्र देशाच्या अनुशासनाचे आजही  ते गुलामच राहिले आहेत…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments