सौ. विद्या पराडकर
कवितेचा उत्सव
☆ स्वागत नव वर्षाचे 💐 सौ. विद्या पराडकर ☆
नव्या उषेचे नव्या दिशेचे गीत गाऊ या चला
नव वर्षाचे स्वागत करण्या सिध्द होऊ या चला
ज्ञानाचे हे दीप लावूनी
अज्ञान अंधःकार दूर लोटूनी
एकतेचा ध्यास घ्यावया सज्ज होऊ चला
स्वातंत्र्याचे रक्षण करूनी
आक्रमकांशी लढत देऊनी
देशप्रेमाचे गान गावया सज्ज होऊ चला
मानवतेचे सूत्र घेऊनी
उष:कालचे स्वागत करुनी
नव्या भारताचे गीत गावया सज्ज होऊ चला
लहान मोठा भेद सारुनी
विशाल दृष्टीचे दान देवूनी
देशहिताचे कर्तव्य करण्या सज्ज होऊ चला
समस्यांचे निवारण करुनी
एक दिलाने साथ देवूनी
स्वराज्याचे सुराज्य करण्या सज्ज होऊ चला
नव वर्षाचे स्वागत…💐
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈