श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ ठिपका… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
युद्ध लादले जर नियतीने
नियतीशीही झुंजत राहू
अखेरच्या अन् चिंधीलाही
निशाण बनवत फडकत ठेऊ !
आपण ओंजळ.. ते तर सागर
न्यून कधी हे उरी न जपणे
झुळझुळ मंजुळ..रौद्र गाज ती
आपण गावे अपुले गाणे !
स्वप्नपंथ हा अग्निपंथही
दाह तरीही साहत राहू
जरी गगन ना कवेत आले
उरि नक्षत्रे तेवत ठेवू !
जीवन ही तर गळकी घागर
किती भरावी तरी रिती रे
शापालाही उ:शापाची
दैव देतसे कधी हमी रे
स्वत: पारचे विश्व विलक्षण
दृश्य विहंगम त्याचे पाहू
रणे नंदने तीर्थस्थाने
सारे सारे ह्रदयी घेऊ !
अपुल्यास्तव जे तमात जळले
त्या दीपांना तारण जीवन
ज्या ताऱ्याचा वसा घेतला
अवघे जीवन त्यास समर्पण !
चिरंतनाचा गंध मृण्मया
देता देता विरून जाऊ
नक्षत्रांच्या रांगोळीचा
जाता जाता ठिपका होऊ !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈