श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 168
☆ धुरळा… ☆
धुरळा
काय तो धुरळा, काय ती माती, काय ते बैल
काय तो गाडा, काय तो चाबूक, काय ते फटके
बघ्यांच्या रांगेत उभे हे बोके
पाठीवर वळ तरी म्हणे ओके
काय तो पोपट, काय तो पिंजरा, काय ती कैद
काय तो पेरू, काय ती मिरची, काय ती चोच
फुटभर पिंजऱ्यात घेतोय झोके
पंख छाटले तरी म्हणे ओके
काय तो पट्टा, काय ती कुत्री, काय ते भुंकणं
काय ते खांब, काय त्या भिंती, काय ते रस्ते
गाड्या घाणीत भरती चाके
त्यांचं घर मात्र ओके
काय ती बाग, काय तो हट्ट, काय ती चर्चा,
काय तो पेंग्विन, काय ती राखण, काय तो खर्च
जनतेचा पैसा सत्तेचे डोके
कसेही वागा म्हणू आम्ही ओके
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈