मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ दिवा… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆
दिव्यांच्या झगमगाटाने उजळून गेलं गाव
जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव …
जेथे नको तेथे आपण असते सांडलेले
नको असलेले सारे नको तेथे मांडलेले
पाहिली गरिबी की खरंच काळीज घेत ठाव
जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…1
पाहिले जगाकडे पण त्यांची रीतच न्यारी
समजावले किती पण सर्वांना संपत्ती प्यारी
मतलबी या दुनियेत सापडेना एकही साव
जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…2
सुसंस्कृत विचाराचं नाही राहील झाड
कितीही बोललो तरी निघेना जुनीच राड
इच्छित स्थळी जाण्यास अपुरी पडते धाव
जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…3
हल्ली पाऊस कसाही केव्हाही पडत असतो
चतकोर तुकड्यासाठी माणूसही नडत असतो
पहा कुठल्या यादीत दिसतय का? गरिबाचं नाव
जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव ...4
करा तुम्ही दीपोत्सव पण झोपडीकडे हि पहा
जा वृद्धाश्रमाकडे आणि तिथे एक दिवस राहा
सेवा करता त्यांची तुम्हाला तिथेच सापडेल देव…5
जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव …
– मेहबूब जमादार
मु -कासमवाडी पो .पे ठ जि .सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈