श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ पितृपक्ष… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

नेहमीचाच कावळा तो, नेहमीसारखाच आला

पितृपक्ष असल्याने तो, रुबाब दाखवत बसला

नेहमीचे रुपडे काढून, बापाचा मुखडा घातला

ताटातले पदार्थ बघत, मिश्किल हसत म्हणाला

 

जिवंत असतांना काही, गोडधोड नाही दिलेस

म्हातारपणी माझे काही, लाड नाही केलेस

नको आता तुझी ती, जिलेबी आणि बासुंदी

पूर्वी कायम ठेवलीस मला, खायला ती बंदी

 

कशाला रे आता हा पानाचा दिखावा

बस कर आता हा काव काव चा धावा

गरज होती म्हातारपणी, आला नाहीस तेंव्हा

नको करुस आता ही, मेल्यानंतरची सेवा

 

डोळे लाऊन बसायचो रे, तुझ्या वाटेवरी

काय तरी घेऊन येशील, वाटे दरवेळी

वाटणीचा कागद घेऊन, आलास कोर्टाचा

शिक्का मारलास माझा, शाईच्या अंगठ्याचा

 

जिवंतपणी दाखवलास, मला वृद्धांचा आश्रम

आता कशाला घेतोस पोरा, पान दाखवायचे श्रम

म्हातारपणी वेळ देऊन, दिले असतेस लक्ष

रोज साजरा केला असता आपण, पितृपक्ष

रोज साजरा केला असता, आपण पितृपक्ष

रोज साजरा केला असता, आपण पितृपक्ष

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments