श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ काजळकाळी रात आतली… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : लवंगलता, मात्रा : ८+८+८+४)

काजळकाळी रात आतली काजळ झटकत आहे….

नव अरुणोदय नव क्षितिजावर आता उजळत आहे !

 

भुईत रुजल्या प्राणा फुटला पालव आकाशाचा

खोल आतला जागा निर्झर झुळझुळ वाहत आहे !

 

पुन्हा नव्याने जन्मे सृष्टी पुनर्जन्म घे दृष्टी

उत्कट अद्भुत सप्तसुरावट प्राणा छेडत आहे !

 

प्राणामधला प्रहर अघोरी सरता सरता सरला

पाषाणावर माझ्या माझी छिन्नी चालत आहे !

 

ताठ कण्याचा गर्व परंतू नतमस्तक मी आता

चरणांची त्या दिव्य धूळही साश्रू चुंबत आहे !

 

समक्ष माझ्या नभांगणातुन किती निखळले तारे

तृणपात्यावर थेंब दवाचे पहाट ढाळत आहे !

 

घणघण घंटा उत्तररात्री दूर मंदिरी वाजे

दुःख कुणाचे शाप कुणाचा टाहो फोडत आहे ?

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

हरिश्चंद्र कोठावदे

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments