सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️

इस्तंबूल येथील १४५५ मध्ये बांधलेला ‘ग्रँड बाजार’ म्हणजे  एक आश्चर्य आहे. ३००० हून अधिक दुकानं असलेला हा ग्रँड बाजार म्हणजे भूलभुलय्या आहे. कापड, क्रोकरी, चपला, पर्सेस, बॅगा, तयार कपड्यांपासून ते सोन्या हिऱ्यापर्यंतची सगळीच दुकानं प्रवाशांना आकर्षित करतात. बाजाराच्या आतल्या साऱ्या वाटा  चक्रावून टाकणाऱ्या आहेत.  ‘आपण इथे हरवणार तर नाही ना?’ असं सारखं वाटंत होतं. खरेदीही महाग होती. ‘स्पाइस मार्केट’ इथे गेलो. स्पाइस मार्केटमध्ये पोत्यावरी पिस्ते, अक्रोड, अंजीर, खजूर, हेजलनट्स ठेवले होते. ड्रायफ्रूट्सच्या विविध  मिठायांनी दुकानं भरली होती. इथली ड्रायफ्रूट्सनी भरलेली बकलावा नावाची मिठाई खूप  आवडली.

(गलाटा टॉवर, फनीक्युलर रेल्वे, क्रूज प्रवास)

संध्याकाळी आम्ही सर्वांनी तिथल्या ट्रामने शहराचा फेरफटका मारायचं ठरवलं.त्या ट्रामने एक स्टेशन जा नाहीतर दहा स्टेशनं! तिकीट एकाच रकमेचं होतं.  आम्हाला तिकीट म्हणून नाण्यांसारख्या धातूच्या गोल चकत्या दिल्या. प्रत्येकाने तिथल्या मशीनमध्ये ते नाणं टाकलं की तो फिरता दरवाजा उघडे. ट्राम साधारण रेल्वेच्या डब्यासारखी होती.  कार्यालये नुकतीच सुटल्यामुळे गर्दीने खचाखच भरलेली होती. धक्के खात, खिसा- पाकीट सांभाळत थोडा प्रवास झाल्यावर गर्दी कमी झाली. दुतर्फा सजलेल्या दुकानांसमोर, रुंद फुटपाथवर टेबल खुर्च्या मांडून निवांतपणे खाण्यापिण्याचा आस्वाद घेणे चालले होते. ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनला म्हणजे कलाबाश इथे आम्ही उतरलो. तिथून आम्हाला फनीक्युलर रेल्वेने प्रवास करायचा होता. डोंगराच्या पोटातून खोदलेल्या रेल्वेमार्गाने डोंगर चढत जाणारी ही गाडी होती. इलेक्ट्रिक वायरने ही गाडी डोंगरमाथ्यावर खेचली जाते. दोन डब्यांची ती सुबक, सुंदर, छोटी गाडी आतून नीट न्याहाळेपर्यंत डोंगरमाथ्याला आलोसुद्धा! या भागाला ‘इस्तीकलाल’ म्हणतात. आपल्या फोर्ट  विभागासारखा हा भाग आहे. दुतर्फा दुकानं, बँका, निरनिराळ्या देशांचे दूतावास, कार्यालये  आहेत.. केकपासून कबाबपर्यंत असंख्य गोष्टींनी दुकानं भरलेली होती. तो शनिवार होता आणि रविवारच्या सुट्टीला जोडून सोमवारी २९ ऑक्टोबरला  टर्कीच्या ‘रिपब्लिक डे’ ची सुट्टी होती. चंद्रकोर व चांदणी मिरवणारे लाल झेंडे जिकडेतिकडे फडकत होते. जनसागर मजेत खात-पीत, फिरत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मधूनच  उतरत्या वाटा आणि त्यांच्या कडेने सुंदर, स्वच्छ इमारती आहेत. बास्पोरस खाडीच्या किनाऱ्यावर दीपगृहासारख्या दिसणाऱ्या टॉवरच्या अगदी उंचावर, एक गोल प्रेक्षक गॅलरी आहे. काही हौशी लोक किनाऱ्यावरून खाली खाडीमध्ये गळ टाकून माशांची प्रतीक्षा करीत होते.

बास्पोरस खाडीच्या मुखावर असलेलं ‘गोल्डन हॉर्न’ हे एक नैसर्गिक व सुरक्षित बंदर आहे. प्रवासासाठी, व्यापारासाठी या बंदराचा फार पूर्वीपासून उपयोग केला गेला. गोल्डन हॉर्नच्या साथीने आणि साक्षीने इस्तंबूल विकसित आणि समृद्ध होत गेलं. युरोप व आशिया खंडांना जोडणारा बास्पोरस खाडीवरील जुना पूल वाहतुकीला अपुरा पडू लागल्यावर आता आणखी एक नवा पूल तिथे बांधण्यात आला आहे. गोल्डन हॉर्नमधील लहान मोठ्या बोटींवरील दिवे चमचमत होते. खाडीच्या पाण्यात त्या दिव्यांची असंख्य प्रतिबिंबे हिंदकळत होती. क्रूझमधून जुन्या बास्पोरस ब्रिजपर्यंत जाऊन आलो. बास्पोरस खाडीतच पाय बुडवून उभ्या असलेल्या, गतवैभवाची साक्ष असणाऱ्या, राजेशाही, देखण्या इमारती, काठावरचा डोल्माबाची पॅलेस, त्यामागे डोकावणारं अया सोफिया म्युझियम, दूरवर दिसणारे ब्लू मॉस्कचे मिनार यांनी रात्र उजळून टाकली होती. युरोप- आशियाला जोडणारा बास्पोरस खाडीवरील सेतू, छोट्या- छोट्या लाल निळ्या दिव्यांनी चमचमत होता.

हातांनी विणलेले लोकरीचे व रेशमी गालीचे ही टर्कीची प्राचीन, परंपरागत कला आहे. तिथल्या लालसर गोऱ्या स्त्री कारागीर, त्यांच्या लांबसडक बोटांनी गालीचे विणण्याचे काम कौशल्याने करीत होत्या. एका लेदर फॅक्टरीमध्ये आधुनिक फॅशनचा, पुरुषांच्या व स्त्रियांच्या लेदर कपड्यांचा फॅशन शो बघायला मिळाला. रात्री एका हॉटेलमध्ये गोऱ्यापान, कमनीय, निळ्या परीचा बेली डान्स पाहिला. प्रवाशांसाठी मदिराक्षी बरोबर मदिरेची  उपस्थिती हवीच! राकी नावाचं बडीशेपेपासून बनविलेलं मद्य ही टर्कीची खासियत आहे.

मारमारा समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणाऱ्या बास्पोरसच्या खाडीवरील पूल ओलांडून  आम्ही इस्तंबूलच्या आशिया खंडातील भागात असलेल्या हैदरपाशा रेल्वे स्टेशनला पोहोचलो. आज नेमका दसरा होता आणि दसऱ्याचं सीमोल्लंघन आम्ही युरोपाखंडातून  आशिया खंडात आणि ते सुद्धा बसने केलं. रेल्वेगाडीत दोन प्रवाशांची सोय असलेल्या छोट्या केबिन्स सर्व सोयींनी सुसज्ज होत्या. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी नेत्रसुखद रंगांच्या सुरेख, शोभिवंत इमारती, हिरव्या बागा, पलीकडे एजिअन समुद्र आणि थंड, स्वच्छ, कोरड्या हवेत रमत गमत चालणारे, युरोपियन पेहरावतले स्त्री-पुरुष, मुलं असं दृश्य काळोख होईपर्यंत दिसंत राहीलं.

इस्तंबूल भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments